Monday, April 6, 2009

आमची गध्धेपंचविशी आणि थोडी बाष्कळ बडबड ...

परवाच म्हणजेच मागच्याच आठवड्यात (च्यायला, बघता बघता ८ दिवस झाले. अख्खे आयुष्य असेच झटपट निघुन जाणार असे दिसतेय. जाऊ देत, आयुष्यात खंत तरी किती गोष्टींची बाळगायची) बर्‍यापैकी उत्साहात आणि आनंदात आमचा वाढदिवस "घडुन" गेला. एकदाचे आम्ही २५ वर्षाचे झालो. (आयला वय जाहीर केल्याने ब्लॉगचे वाचक कमी होणार नाहीत ना ? "छोटा डॉन" हा "स्त्री आयडी" वाटत नसल्याने तशी शक्यता कमीच आहे म्हणा. असो). ह्यालाच आम्ही "गध्धेपंचविशीत आलो" असेही म्हणता येईल. आता इथे "घडुन जाणे" ह्या क्रियापदाला एक नैतिक अधिष्ठान (म्हणजे काय कोण जाणे, पण एकदाचा हा शब्द वापरला, द्या टाळी) आहे. त्याचे कसे आहे की आपले वाढते वय लपवणे हा (प्रामुख्याने) स्त्रियांचा व (आजकाल शाहरुखने फेअर & हँडसम क्रीमची ऍड केल्यापासुन) पुरुषांचासुद्धा (आयुष्यातल्या अनेक पालथ्या धंद्यापैकी एक प्रमुख) धंदा आहे. त्यामुळे वाढत्या वयाची आठवण करुन देणारा "वाढदिवस" हा बर्‍याच जणांना नकोसा झाला आहे असे आमचे विचारांती, अनुभवांती, व्यासंगांती मत झाले आहे (हा, मात्र ह्यादिवशी अभक्ष्यभक्षण व अपेयपेयपान ह्याला प्रत्यवाय नसावा). तर मुद्दा असा की वाढदिवस साजरा करणारे आपण कोणी नसतो, तो सत्यनारायणाच्या पुजेसारखा घडुन जातो. असो.

वाढदिवस नेहमीप्रमाणे चांगला थाटामाटात साजरा झाला (ह्याचा आदल्या दिवशी आमच्या गावाजवळ सापडलेल्या हजारो लीटर अवैध देशी-विदेशी मद्याच्या साठ्याशी काहीही संबंध नाही). सर्व काही सोपस्कार पुर्ण करुन आम्ही दुपारी (जेवणामुळेच्या)अंमळ सुस्तीत "चिंता करितो विश्वाची "असा चेहरा करुन बसलो होतो (ह्यालाच काही दुष्ट लोक "असा काय शुंभासारखा चेहरा करुन बसला आहेस ?" म्हणुन हिणवत होती, चालायचेच). मनात (भलत्यासलत्या) विचारांचा ( की अविचारांचा ? ) कल्लोळ उडाला होता (कदाचित ह्या "कल्लोळाचा" आवाज हा सामान्य जनांना "घोरण्यासदॄष्य" वाटत असल्याने मातोश्रींनी आम्हाला "घोरु नकोस, शांतपणे झोप" असा आमचा मुड घालवणारा सल्ला दिला असावा. चालायचेच) . बरेच काही मनात येत होते आणि विचारांचा प्रवाह हा धीरगंभीर नाद करीत आमच्याच मस्तकावर कोसळत होता. आम्ही एका निर्वाणीच्या क्षणी लॅपटॉप घेऊन ह्या उदात्त विचारांच्या निर्मळ झर्‍याला लेखणीवाटे वाट करुन द्यायचा विचार केला. पण ह्या कॄतीचा "पुर्वेतिहास" हा तेवढा प्रेरणादायी नसल्याने आम्ही हा बेत त्वरित डाव्यांच्या/मायावतींच्या पाठिंब्यासारखा मागे घेतला ( आता नको ती आठवण, मागे एकदा आम्ही आमचा ब्लॉग आमच्या आप्तांना वाचायला दिल्यावर त्यांच्या कुजकट कमेंट्समुळे आम्हाला २ दिवस रुमालात तोंड लपवुन फिरायची नामुष्की आली होती. असो). आम्ही ह्या कानाची त्या कानाला खबर न देता आमची "लेखनाची इच्छा" ही पवारसाहेबांच्या मनातल्या पंतप्रधानपदाच्या इच्छेसारखी मनात दाबुन ठेवली व वरकर्णी काही घडलेच नाही असा (कलमाडींसारखा) चेहरा करुन बसलो ....

आता हापीसात ( कुणी नसल्याने व कामही तितकेसे नसल्याने ) भयंकर रिकामा वेळ सापडल्याने आम्ही आम्ही आमचे असंबद्ध आणि बाष्कळ विचार कागदावर उतरवायचे ठरवले. प्रामुख्याने आम्ही "गध्धेपंचविशी" ह्या आयुष्यातल्या महत्वाच्या कालखंडाच्या सुलभतेच्या दॄष्टीने व अर्थात मानवतेच्या रक्षणाच्या हेतुने काही विचार मांडत आहोत. "तरुण हेच देश घडवत असतात " हे सर्वमान्य असल्याने सरकारनेसुद्धा ह्या बाबींचे विवीध पैलु तपासुन योग्य तो निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे ....

१. "गध्धेपंचविशीतले" तरुण हे आयुष्यातल्या महत्वाच्या कालखंडातुन मार्गक्रमण करत असल्याने त्यांच्या मार्गात फुल ना फुलाची पाकळी म्हणुन त्यांचे कामाचे तास त्वरित "अर्धे" केले जावेत तसेच विकांत हा ३ दिवसाचा करावा ...
हा महत्वाचा कालखंड आस्थापनाचे भविष्य घडवण्यात जात असल्याने तरुणाला स्वतःला घडवायची संधी मिळत नाही व पर्यायाने देशाच्या घडवणुकीवर अनिष्ट परिणाम होतो.असे "न घडलेले" तरुण आपल्या देशाचे भविष्य काय "घंटा घडवणार" ?

२. सध्या महागाई ही (पवारसाहेबांच्या गोंधळात टाकणार्‍या विधानांच्या वेगापेक्षा डब्बल) वेगाने वाढत असल्याने आजकाल "संवाद माध्यमं" महाग झाली आहेत, सबब "गध्धेपंचविशीतल्या" तरुणांना (ते काम करत असतील तर) आस्थापनातल्या फोनचा अमर्याद वापर करण्याची परवानगी असावी. मोबाईल फोन्सचे बिल प्रतिमास हे नाममात्र (म्हणजे मुंबई महानगरपालिका मुंबईतली मौक्याची जागा ज्या कवडीमोल दराने बिल्डर्स आणि कंपन्यांच्या घशात घालते त्या) दराने आकारावे ...
आस्थापनात फोनवरच्या वापराला आक्षेप घेतला तर त्याची "मानवी हक्काची पायमल्ली" ह्या गंभीर आरोपालाखाली चौकशी व्हावी (हवे तर ह्या आंदोलनासाठी सेटलवाडबाईंना त्या अजुन "पंचविशीत आहेत" असे सरकारी प्रमाणपत्र उपलब्ध केले जावे.)

३. स्वत:ला घडवण्यासाठी रात्री/अपरात्री चिंतन करीत रस्त्यावर हिंडणार्‍या "गध्धेपंचविशीतल्या तरुणांना" अडवुन त्यांना अपमानास्पद, मानहानीकारक व गंभीर प्रश्न करणार्‍या पोलीसांची बदली ही गडचिरोली/चंद्रपुरला करावी अथवा त्यांना भारताच्या सिमेवर घुसखोरांना "अडवण्यासाठी" पाठवुन द्यावे ...

४. उठसुठ "आजची बिघडलेली तरुणाई, ढासळती मुल्ये, विस्मॄतीत गेलेले संस्कार" ह्यावर तरुणांना बौद्धीके देणार्‍यांना "रासुका"खाली अटक करुन त्यांची रवानगी तुरुंगात केली जावी.

५. चॅनेल व्ही, एम टीव्ही , फॅशन टीव्ही अथवा तत्सम तरुण घडवण्यास मदत करणार्‍या चॅनेल्सला "राष्ट्रीय चॅनेल्स्"चा दर्जा दिला जावा, त्यावर अधिक प्रबोधक ( का उन्मादक ) कार्यक्रम कसे येतील ह्यासाठी एक "उच्चस्तरीय ( की हुच्चस्तरीय ) कमिटी" नेमली जावी ...

६. विवीध शितपेये अथवा मादक द्रव्ये ह्यांना त्वरित "शासकीय दुध योजनेच्या" समकक्ष आणुन त्यावर सरकारी अनुदान दिले जावे व ठिकठिकाणी ह्यांचे वाटप सुलभ व्हावे ह्यासाठी "सरकारमान्य विक्री केंद्रे" काढावीत ...
आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या विवीक्षित "सरकारमान्य क्षक्षक्ष विक्री" केंद्राचा दर्जा हा (काँग्रेसपक्षापेक्षा) खालवला असल्याने त्याच्याकडे त्वरित लक्ष दिले जावे ...

७. बर्गर, पिझ्झा, पास्ता, चायनीज ह्यां जंकफुड्सना "राष्ट्रीय खाद्यान्नाचा" दर्जा दिला जावा ...स्वस्त "झुणका-भाकर केंद्राच्या" धर्तीवर सवलतीत वरील पदार्थ विकणार्‍या वस्तुंची ठिकठिकाणी केंद्रे खोलावीत ...

८. सार्वजनिक स्थळी "प्रेमलाप" करण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाच्या कॄतीला "ऐतिहासीक घोडचुक" असल्याचा दर्जा दिला जावा व ह्याचे प्रायश्चित्त म्हणुन ठिकठिकाणी "प्रेमविहार उद्याने" बांधली जावीत. चौपाटी, पुण्यातला झेड ब्रीज सारख्या स्थळांना "कपल्स ओन्ली" म्हणुन आरक्षित केले जावे ...

९. "टाईम्स ऑफ इंडिया" ह्या अग्रगण्य वॄत्तपत्राने त्यांच्या प्रमुख आवॄत्तीचा आकार ३२ पानांवरुन ४ पानी करावा व त्या बदल्यात "पुणे/मुंबई/बेंगलोर टाईम्स" ह्या आवॄत्यांच्या पानांची संख्या ४/६ वरुन ३६/४० वर न्हेली जावी ....

१०. तरुणांच्या फॅशनेलबल, झकपक, मॉड अशा असलेल्या वरंतु फाटक्या, ढिगळे लावलेल्या अशा अल्पवस्त्रांवर उर्फ शॉर्ट्सवर नाके मुरडणार्‍यांना "तालिबानी" ठरवुन त्यांची रवानगी अमेरिकेच्या "ग्वाटेनामोच्या तुरुंगात" केली जावी ...

११. आजकाल पळुन जाऊन लग्न करणे ही बर्‍याच जणांची सामाजीक व मानसीक जबाबदारी बनल्याचे व ह्यातुन त्यांना बराच सामाजीक, मानसीक व काही अंशी शारिरीक त्रास सहन करावा लागतो असे आमच्या लक्षात आले आहे.म्हणुन आम्ही अशा जोडप्यांना किमान "पद्मश्री" हा सन्मा दिला जावा व त्यांना त्रास देणार्‍यांना "रासुका" लावावा ही सुधारणा सुचवत आहोत ...
(अक्षयकुमारला जर पद्मश्री मिळत असेल आणि वरुण गांधीला जर रासुका लागत असेल तर उपरोक्त गोष्टी अशक्य नाहीत असे आमचे मत आहे.)

१२. पॅरीस, ऍमस्टरडॅम, लंटन, काश्मिर, कुलु मनाली, उटी यासारखी स्थाने "केवळ तरुणांसाठी" म्हणुन आरक्षित केली जावीत. इथे तरुणांच्या "सवलतीत" अथवा जमल्यास "सरकारी खर्चाने फुकटात" सहली आयोजीत कराव्यात ...
ह्यासाठीचा आवश्यक असणारा पैसा हा अनेक मंत्रीमहोदयांच्या सर्दी-पडश्याचा इलाज हा "न्युयॉर्कला सर्जनकडुन" न करता "मौजे पिंपळवाडीच्या वैंदुकडुन" केला तर सहज उभा रहाण्यासारखा आहे ...

१३. बॉली/हॉलीवुडमध्ये वयाच्या २७ व्या वर्षानंतर पुरुषांना व २५ नंतर स्त्रियांना सक्तीची निवृत्ती द्यावी. नव्या "दमाच्या" पिढीला संधी ही मिळायलाच हवी.सिनेमागॄहात जमल्यास सर्व सीट्स ह्या "कॉर्नर सीट्स"मध्ये बदलुन घ्याव्यात, हवी असल्यास त्यात आस्थापनात असतात तशी क्युबिकल्स उभारण्यास प्रत्यवाय नसावा ...
तिकीटांची "विक्री" न करता त्यांना "स्वागतमुल्य" ठेवावे, ज्याची जेवढी इच्छा आहे तेवढे दान तो टाकेल ...
(तसेही पैसे देऊन पहाण्याचे लायकीचे चित्रपट निघतात कुठे ? शिवाय पैसे देऊन थेट्रात खास शिन्माच पहातो कोण ? )
*********************

तुर्तास इतकेच, बाकी आठवेल तसे.
गध्धेपंचविशीतल्या तरुणाईचा जय हो ....!!!

9 comments:

Bhagyashree said...

lol... sahi lihlays !!
gaddhepanchvishi alyavar kay vatta tyache yatharth varNan!!! ti asahaayy hatabalata malaahi ali hoti.. (arechya vay jahir kele ki kay!:( jaude!)

mast lihlays ! and belated happy bday !! :)

Anonymous said...

Vadhadivasachya shubhechchha..
good post.

प्रसाद मुळे said...

ek number !!
majjaa aali vachayla !!

Sanhita / Aditi said...

डानराव, उगाच पंचवीस वर्षांचे झालो म्हणून मोठे झालो असं समजू नका. अजून ३ आकडा जवळ नाही आहे! ;-)
बाकी लिखाण नेहेमीप्रमाने फर्स्ट-क्लासच.

Pratul said...

Katarnak re Donyaa.

Huchhastariya vagaire, mast kotya aahet.

Pratul

छोटा डॉन said...

धन्यवाद भाग्यश्री, आंद्या, महेंद्र, अदिती आणि प्रतुल आपल्या प्रतिक्रियांबद्दल ...
बहुसंख्य पंचविशीतल्या अगर स्वतःला अजुन पंचविशीतच मानणार्‍या तरुणाईला लेख ( कसला फालतु बडबड म्हणा हवे तर. असो. )आवडल्याचे पाहुन आनंद झाला ...
अशीच आपली संख्या आणि ताकद वाढत राहिली तर ह्या मागण्या मान्य करुन घेणे अशक्य नाही.
लगे रहो तरुणाई ...!!!

आभारी आहे ...

PrAsI said...

वाह डॉनराव एकदम खुसखुशीत लेख. आजुबाजुच्या ताज्या घडामोडींच्या दिलेल्या संदर्भामुळे लेख वाचताना एक वेगळीच मजा येते. काहि काहि पंच तर एकदम खासच.
या गद्धेपंचविशीत आपल्या हातुन उत्तरोत्तर असेच सकस लिखाण होत जावो.

मी बिपिन. said...

डान्राव... लै भारी बरं का...

ऍडी जोशी said...

अरे नालायका अजून किती वर्ष पंचविशीचा होणारेस????????