Monday, March 8, 2010

महिला दिन ... "इव्हेंट" की "तळमळ" ?

आज महिला दिन.
रोजच्या आयुष्यात असंख्य रुपाने आणि हातांनी आपल्याला उपयोगी पडणार्‍या महिलांच्या कष्टाची जाण आणि त्याला जमेल तशी मानवंदना म्हणुन "महिला दिन" साजरा करणार्‍याचे ठरले. वरकर्णी पाहता त्यात चुकीचे असे काही नाही.

ह्यातुन जे काही चांगले घडते आहे त्याचे आम्हाला नक्कीच कौतुक आहे पण हे सर्व पाहताना मनात 'महिला दिन' हा दिवस पण "इव्हेंट" बनवुन त्याचा बाजार मांडला जातोय काय अशी आजकाल शंका यायला लागली.

गेल्या ३-४ दिवसांपासुन पेपरवाल्यांनी ह्या दिवसाची प्रचंड जाहिरातबाजी सुरु केली, त्यांच्या स्वतःच्या खास पुरवण्याही आज पेपराबरोबर आल्या. नेहमीप्रमाणे त्यात काही अपवाद वगळता गेल्यावेळी झळकलेल्या सुप्रसिद्ध (?) महिला ह्यावेळीही झळकताना दिसल्या. तेच सिनेमा, मॉडेलिंगमधले नेहमीचे प्लास्टिकचे चेहरे, तेच यशस्वी उद्योजिका वगैरे, त्यात जुन्या ३-४ क्रिडापटु, अजुन अशाच विविध क्षेत्रात काम करणार्‍या नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना आज पुन्हा फ्रंटपेजवर पाहुन अखेर महिलादिनाचाही "इव्हेंट" झाल्याचे कळुन आले.
आता उद्या अजुन पंतप्रधान / राष्ट्रपती / इतर उच्चपदस्थ यांची महिलांबरोबर किंवा एखाद्या 'एन जी ओ' ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढलेली छायाचित्रे, लोकल मिडियातुन लोकल एखाद्या बड्या धेंडाच्या चमच्यांनी ह्या निमित्ताने केलेला त्याचा उदोउदो, ह्या निमित्ताने महिला डॉमिनिटेड पेज-३ पार्ट्या ( दचकु नका, अशा जाहिराती होत्या ) वगैरे पहायची तयारी ठेवली आहे.

पण ह्या सर्व घोळातुन सर्वसामान्य महिलेच्या आयुष्यात नक्की काय फरक पडतो आहे ?
'महिला दिन' साजरा करणे म्हणजे केवळ गोड गोड संदेश देऊन समारंभ करणे अशा खुळात आपण किती दिवस राहणार आहोत ?
ज्यांना खरच मदतीची आणि सहानभुतीची गरज आहे अशा महिलांपर्यंत आपण केवळ ह्या महिलादिनाच्या निमित्ताने तरी पोचणार आहोत की नाही ?

- अजुनही भारतातल्या कित्येक खेड्यात आणि बर्‍यापैकी शहरातही सासुरवास किंवा सासरी केला जाणारा छळ ही प्रमुख समस्या आहे. त्याच्या अनुषंगाने हे महिलादिनवाले काय करतात ?
- रोजच्या प्रवासात, सामाजिक आयुष्यात अनेक प्रकारचे लैंगिक, मानसिक, शारिरीक अहवेलना आणि शोषण सहन करत आपले आयुष्य जगणा-या महिलांसाठी आपण आता तरी "सेफ झोन" तयार करणार आहोत की नाही ?
- अवघ्या ५ वर्ष्याच्या चिमुरडीपासुन ते थेट ७० वर्षाच्या म्हातारीवर बलात्काराच्या घटना मिडियामधुन येत असताना ह्या महिलादिनाची उपयुक्तता आणि यशस्विता ह्यावरच प्रश्नचिन्ह नाही का उभे रहात ?
( कालच कुर्ल्याला एका ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खुन केल्याची घटना महिलादिनाच्या पुर्वसंध्येला समोर आली, ह्याबाबत महिलादिनवाले काय करणार आहेत ? सामान्य पब्लिकने कालच पोलिस स्टेशनवर हल्ला बोलुन आपला निषेध नोंदवला )
- शिक्षणाची समस्या आहेच, अजुनही स्त्री केवळ "चुल आणि मुल" ह्याएवढीच मर्यादित समजली जात असेल तर तिचा कसला आलाय महिलादिन वगैरे ?
- देशातल्या काही भागात मुलगी जन्माला येताच ते नको म्हणुन तिला मारुन टाकण्याची घ्रुणास्पद प्रथा आहे, त्याच्या प्रबोधनासाठी काही संस्था काम करत आहेत पण त्यांना मदत ह्या 'हाय प्रोफाईल महिलादिनवाल्यांनी' करायला नको का ?
- सुशिक्षित आणि नोकरदार वर्गात स्त्रीयांना भेडसावणारी आणि बहुसंख्यवेळा दाबुन टाकली जाणारी "लैंगिक शोषणाची समस्या" अजुनही तेवढीच बिकट आहे.
मग तरीपण कंपन्या काही कमिट्या स्थापन करुन आपले हात कसे झटकु शकतात ?
समोर आलेल्या किती केसेसमध्ये खरोखर निष्पक्षपाती निर्णय होतो ?
बहुसंख्यवेळा मानसिक त्रासाला कंटाळुन स्त्रीयांनीच जॉब बदलल्याचे दिसते, बाकी क्रिमिनल तसाच मोकाट फिरत असतो.

असे १ नाही हजारो प्रश्न आहेत.
त्यांचे गांभिर्य व त्यानिमित्ताने त्यातुन स्त्रीयांचे आयुष्य सुखकर होण्याला आपण काही सिरीयस विचार करणार आहोत की नुसताच इव्हेंट साजरा करत राहणार आहोत ?

असो.
आज आम्ही महिलादिनाच्या निमित्ताने काय पाहिले ते सांगतो :
- मस्त साड्यावगैरे नेसुन दागदागिने घालुन आणि नटुन "इव्हेंट" साजरा करणार्‍या महिला.
- काही हॉटेलात आज महिलांना म्हणे डिस्काऊंट आहे बिलावर
( डिडन्ट मेक्स सेन्स अ‍ॅट ऑल )
- कॉर्पोरेट कंपन्यांनी काय केले तर रांगोळी, फॅशन शो, डान्स, म्युसिक अशा स्पर्धा घेऊन त्याचाही "इव्हेंट" साजरा केला. ह्याच्या निमित्ताने 'एच आर' मधल्या वरिष्ठ मुलींनी कंपनीतल्या काही कनिष्ठ आणि नवशिक्या मुलींना भरपुर राबवुन 'महिलादिन' साजरा केला.
- छान छान आणि गोड गोड भाषणे झाली, काही बाहेरुन वक्ते आले होते, ह्यानिमित्ताने 'एच आर'च्या खात्यावर ४ गुण जास्त लागले.
- रोजच्या प्रवासात शुभेच्छांची देवाणघेवाण झाली व त्यानिमित्त्ताने कुणाकुनाच्या 'लुक्स'चे कौतुक झाले ...

थॅट्स इट, असा साजरा करतो आपण एक मह्त्वाचा दिवस ...

असो, तमाम महिलावर्गालाही आमच्याकडुन महिलादिनाच्या अनेक शुभेच्छा !!!

अवांतर :
ह्या निमित्ताने "मी मराठी" ह्या संकेतस्थळावर घडत असणारी चर्चा आपल्याला इथे पाहता येईल ....

3 comments:

Anonymous said...

masta......agadi mazhyacha manat yevun gelele vichar...vachti ahe ase vatale....
eka purushane ya bhavna samajun ghyavyat, he nakkicha eka mahilene uchalele pudhache pavul yogya vatevar ahe yacha purava ahe...arthatacha ti mahila mhanaje Chotya Don var sanskar karnari Aai, Aaji, Mavshi, bayako, maitrin konihi asu shkate...chotya don che vishesh abhinandan
Ek mahila

Unknown said...

Very Correct

Anonymous said...

Barobar!!!..."Mahila Din" mhanje "bailpolya"sarkha san aahe...ek diwas nusatich hawa.....dusryadiwashi tech...Ra. Wa. U. Ka....hyala kahi artha nahi....Murkha pan aahe...ek stri asoon dekhil mi kunalawish karat nahi mahila dina sathi...karnaar_hi nahi.....


Suv