Monday, July 27, 2009

परिक्षण : मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ...

"महेश मांजरेकर हे एक जेष्ठ व प्रतिष्ठित सिनेव्यक्तिमत्व आहे का ?"

आहे.

“महेश मांजरेकर हे उत्कृष्ठ अभिनेते आहेत का ?“
असु शकतात, नक्की सांगता येणार नाही. ते भाई अगर डॊनच्या रोलमध्ये जितके जिवंत वाटतात तितकेच ते शिवाजीमहाराजांच्या अस्थायी वाटतात. अर्थातच हा मतमतांतराचा मुद्दा असु शकतो.

“महेश मांजरेकर हे एक उत्कॄष्ट आणि हुशार निर्माते / दिग्दर्शक आहेत का ? “
हो आहेत, हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. आता त्यांना हुशार आणि पब्लिकची नाडी बरोबर ओळखणारे निर्मातेही समजण्यास प्रत्यवाय नसावा कारण मराठी माणसाच्या मनाचा नेहमीच हळवा कोपरा राहिलेला महाराजांचा विषय निवडुन त्यांनी “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” ह्या चित्रपटाची निर्मीती केली.




“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा एक उत्कृष्ट, चांगला आणि गाजलेला चित्रपट आहे का ?”
एका शब्दात अगर वाक्यात हे सांगणे कठिण आहे. “एखादा चांगला आणि उत्कृष्ट चित्रपट हा गाजेलच असे सांगता येत नाही तसेच एखादा भयंकर गाजलेला चित्रपट हा उत्कृष्टच असेल असेही छातीठोकपणे म्हणता येत नाही” हा चित्रपटसॄष्टीचा मुलभुत नियम आहे, तोच इथे चपखल लागु होतो. हा चित्रपट भयकंर गाजला आणि पब्लिकला आवडला हे सुर्यप्रकाशाइतकेच सत्य आहे, सादरीकरणही भव्य आहे ह्यातही वाद नाही मात्र मला हा चित्रपट चांगला किंवा उत्कृष्ट वाटला नाही.
मात्र हा चित्रपट एका हुशार माणसाने ( पक्षी : महेश मांजरेकर ) बनवलेला अतिशय धंदेवाईक आणि सरळसरळ भावनांना हात घालुन मराठी माणसाला चित्रपटगृहात खेचण्यात यशस्वी झालेला एक गाजलेला चित्रपट आहे हे मात्र तेवढेच निर्वीवाद सत्य आहे. असो.

“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ही नक्की कशाची कहाणी आहे ? नक्की कुणावर फ़ोकस करुन हा चित्रपट पुढे सरकरतो ? “
ही कथा आहे एका न्युनगंडाने पिचलेल्या आणि मुंबईतुन हद्दपार होण्याच्या भितीने आत्मविश्वास गमावुन बसलेल्या व आपल्या प्रत्येक अपयशाचे दुसयाच्या कर्तुत्ववानपणावर आणि कष्टावर फ़ोडणा-या एका प्रातिनिधीक मध्यमवर्गीय पापभिरु मराठी माणसाची म्हणजे दिनकर भोसले यांची.
ऒफ़ीसमध्ये, बाजारात, रस्त्यावर, घरी, दुकानात असे पदोपदी अपमान सहन करुन राहणारे दिनकर भोसले, उत्तम मार्क असुन स्वत:च्या मुलाला एका स्वत:च्या मित्राच्या कॊलेजात पैसे देण्याची ऐपत अथवा तयारी नाही म्हणुन इंजिनीयरिंगची ऎडमिशन घेऊन देऊ न शकलेले दिनकर भोसले, मराठी आडनावावे सिनेसृष्टीत अडचण होते अशी स्वत:च्या मुलीची मुक्ताफ़ळे हताशपणे ऐकणारे दिनकर भोसले, स्वतःसाठी एक शर्ट विकत घेण्यासाठी अ‍ॅरियर्सची वाट पहाणारे दिनकर भोसले, ऑफीसमध्ये आपल्या साहेबांचा जाच अकारण सहन करणारे दिनकर भोसले, दररोज घरात विवीध कारणांवरुन आपल्याच बायकोचे टोमणे ऐकुन घेणारे व त्यावरुन तिच्याशी वाद घालणारे दिनकर भोसले.
पण बाहेरच्या जगाचा राग आपल्या अमराठी भाडेकरुंवर अकारण काढणारे हेच ते दिनकर भोसले, दु:ख आणि अपमान दारुच्या नशेत विसरायला एका मद्राश्याच्या बारमध्ये जाऊन अकारण आरडाओरडा आणि अरेरावी करणारे हेच ते दिनकर भोसले, स्वतःच्या अनावश्यक मस्तीमुळे त्याच बारमधुन मार खाऊन बाहेर पडणारे व नशेत बरळत स्वतःच्या घरच्यांना त्रास देणारे हेच ते हेच ते दिनकर भोसले.

"सिनेमाचे मध्यवर्ती कथासुत्र काय आहे ? "
ती आहे एक झुंज, २ असमान पातळीवर असणार्‍या व्यक्तीमत्वांची.
सोशीक, पदोपदीच्या अपमानाने पिचुन गेलेल, आत्मविश्वास हरवुन बसलेले दिनकर भोसले आणि स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय यंत्रणेला खिशात घालणारा, अत्यंत धुर्त आणि मस्तीखोर असा गोसालिया बिल्डर.
गोसालियांचा दिनकररावांच्या ऐन मोक्याच्या जागी असलेल्या राहत्या घराच्या जागेवर डोळा असतो, त्याला तिथे एक कमर्शियल कॉंप्लेस उभे करायचे असते. पण भोसले ती जागा सोडायलाअ नकार देतात व त्याच्या अमिषाला भिकही घालत नाहीत.
ह्या सर्वांमुळे पेटुन उठलेला गोसालिया व आपल्या निर्णयावर ठाम असणारे भोसले ह्यांची झुंज हे मध्यवर्ती कथासुत्र ...

"मग ह्यात शिवाजी महाराजांचा कुठे संबंध येतो ?"
दारुच्या नशेत जेव्हा दिनकररावांवर आपल्या अपमान आनि कुचंबणेच्या आठवणींच्या सहस्त्र इंगळ्या जेव्हा डसतात तेव्हा ते कंत्रोल सुटुन ह्या सर्वांचे खापर आपल्या "मराठीपणावर ( पक्षी : मराठी म्हणुन जन्म घेतल्यामुळे सोसाव्या लागणार्‍या यातनांवर ) " फोडतात व "मला मराठी असल्याचे लाज वाटते" हे वाक्य ओरडुन ओरडुन सांगतात तेव्हा रायगडावरच्या राजदरबारात बसलेल्या महाराजांच्या कानावरचे कल्ले रागाने थरथरुन उठतात. ज्यांना सुखाने जगता ह्यावे म्हणुन आपण ज्या हिंदवी स्वराज्याच्या अट्टाहास केला तोच मराठी माणुस आज आपल्याला "लाज वाटते" असे म्हणतो हे पाहुन महाराजांच्या संतापाला सीमा रहात नाही व ते ह्याचा जाब विचारायला दिनकर रावांकडे निघतात व कथेत "शिवाजी महाराजांचा प्रवेश" होतो.

"महाराजांच्या येण्याने असा काय फरक पडतो ? "
महाराज दिनकर भोसल्यांचे ब्रेनवॉशिंग करतात व त्याचा खचलेला आत्मविश्वास पुन्हा जागॄत करतात, त्याला हिंमतीने लढायला उद्युक्त करतात, मराठी माणसाने पुन्हा एकत्र येऊन आत्मविश्वासाने उभारले पाहिजे व हिंमतीने संकटाचा सामना केला पाहिजे हा विश्वास त्याच्यात जागवतात. अजुन बरेच काही काही म्हणतात पण मुळ सुत्र तेच त्यामुळे इतकेच ...

" मग नक्की काय बदल होतो भोसल्यांच्यात व त्या परिस्थीतीत ? "
स्वतःचा स्वाभिमान, आत्मसन्मान आणि हिंमत परत मिळवलेले भोसले सर्वच पातळ्यांवर आपल्या हिंमतीचे प्रदर्शन घडवतात व यश मिळवतात. मग ते मुलाच्या कॉलेजचे अ‍ॅडमिशन असो, वा मुलीचे सिनेमातले करियर मार्गी लावणे असो, आपल्या साहेबाला त्याची जागा दाखवणे असो, पैशाला चटावलेल्या महानगरपाहिकेतल्या शासकिय अधिकार्‍यांची चुक त्यांना कठोरपणे दाखवुन देऊन स्वतःचे काम करुन घेणे असो, वा गोसालियाच्या नाकावर टिच्चुन दुसर्‍या एका मराठी बिल्डरकडुन त्याच जागेवर स्वतःला हवे तसे आणि स्वतःचेही हित पहाणारे कॉप्लेक्स उभारणे असो ह्या सर्व परिस्थीती यश हे दिनकर भोसल्यांचेच असते.
मधल्या काही पटकथेच्या मागणी असणार्‍या घटना रुढीनुसार घडुन शेवटी आपल्याला हवा तसा गोडगोड शेवट होतो व भोसले "मला मराठी असल्याचा गर्व आहे" ह्या वाक्याला एक प्रतिष्ठा मिळवुन देतात ...

"मग हा एवढा चांगला विषय हाताळणारा चित्रपट मला भरकटलेला आणि तद्दन गल्लाभरु का वाटला ? "
सांगतो, सिनेमाच्या सुरवातीपासुन दिनकर भोसल्यांचे जे "अपमान सहन करणे" दाखवलेले आहे ते अत्यंत बटबटीत आणि बेसलेस आहे, एवढा अपमान कोणी अकारण करत नसतो व कोणी केला तर समोरचा सहन करत नसतो, सहन करण्याला माणुस म्हणुन जगण्याचा हक्क नाही, असल्या नेभळट आणि हतभागी माणसाची समाजाला अजिबात गरज नाही. इथे अनावश्यकरित्या अपमानांचे उदात्तिकरण करुन जनमानसाच्या भावनेला हत घालल्याचे व त्या पेटवण्याचा प्रयत्न सुरवातीच्या काही घटनातुन होतो.
ठिकठिकाणी अपमान सहन करणारे दिनकर भोसले मात्र जेव्हा बारमध्ये जातात तेव्हा एवढा कमालीचा माजोरडेपणा, भांडखोरपणा अणि मस्तीखोरपणा का करतात ह एक प्रश्नच आहे ? त्याचे समर्थन कसे होऊ शकते ?
शिवाय जेव्हा महाराजांचा शुभ-आशिर्वाद आणि भेट म्हणुन भवानी तलवार मिळते तेव्हा ह्याच भोसल्यांचे रुपांतर एका सुपर हिरोत होते व रॉबीनहुडसारखी अचाट, अतर्क्य, न पटणारी कॄत्ये करु लागतात. हा काय मुर्खपणा ? ज्या घटना पटणे शक्य नाही किंवा लौकिक अर्थाने शक्य नाहीत त्या ते सहजपणे चुटकीसरशी पार पाडतात ?
महानगरपालिकेचे मदमस्त अधिकारी एका भाषणाने ( किंवा सडेतोड बोलण्याने ) सुधारणे व त्यांनी लगेच इमानदारीने काम करणे, शौर्य पुरस्कार मिळालेला एक पोचलेला पोलीस अधिकारी केवळ शुटिंग चालु आहे म्हणुन भोसल्यांकडुन केल जाणारा अपमान सहन करणे , सरकारात मंत्री असलेल्या एका मंत्राच्या कॉलेजात अ‍ॅडमिशनसाठी म्हणुन भोसल्यांनी त्याला भेटणे व त्याला बोलण्यात गुंतवुन मोबाईलवर त्याचे शुटिंग घेऊन त्याचे फुटेज मिडियाला देणे व मंत्र्याची हकालपट्टी होणे, मुख्यमंत्राने साळसुदपणे "मला असल्या व्यक्तींबरोबर काम करण्यापेक्षा सत्ताच नको " असे बाळबोध विधान करणे , मुलीच्या करियरसाठी भोसल्यांनी एका अमराठी निर्मात्याला भेटणे व त्याला ४ शब्द सुनावणे व त्यामुळे त्याचा कायापालट होऊन त्याने मुलीला साईन करणे व स्वतः मराठी असल्याची कबुली देत स्वतःचा हापीसात मुर्खासारखा मराठीपणाचा डांगोरा पिटणे, एका सराईत गुंडाचा कायापालट केवळ काही प्रसंगामुळे व वाक्यामुळे होणे, ऑफीसमध्ये स्वतःच्या साहेबाला कसेही बोलुन त्यांचीए प्रतारणा करणे व स्वतःला हवी तिथे सही मिळवुन घेणे, शेवटच्या फायनल फायटिंग सीनमध्ये गोसालियावर भवानी तलवारीने वार करणे व इतर ३-४ जणांना असेच सहजपणे कापणे , आपसुकच मिळालेल्या प्रसिद्धिचा फायदा उठवण्यासाठी मुख्यमंत्रांना भेटुन निवडणुक लढवण्याबरोबरच मंत्रीपद मागणे, इत्यादी इत्यादी ....
का हो, ह्या घटना अत्यंत बालीश, बाळबोध आणि हास्यास्पद व तसेच "गल्लाभरु" आणि केवळ टाळ्या मिळवण्यासाठी केल्यासारख्या वाटत नाहीत का ?
माझ्या मते इथे सिनेमा घसरला व क्वालिटी हरवुन बसला ...

" मग पाहण्यासारखे आहे तरी काय नक्की ? "
येस्स, नक्कीच पाहण्यासारखे आहे व शिवाय त्यातुन बोध घेण्यासारखेही बरेच काही आहे.
खासक्रुन महाराजांचे सुरवातीचे काही डायलॉग्स बरेच काही सांगुन जातात. सर्व व्यवसाय परकीय ( पक्षी : अमराठी ) व्यक्तींने बळकावले ह्याचे खापर त्यांच्यावर न फोडता तुम्ही स्वतः झटुन कामाला लागले पाहिजे, कसलेही काम करण्याची लाज नाही वाटली पाहिजे, " आमची कुठेही शाखा नाही" ह्याचा अभिमान व वाटता लाज वाटुन व्यापाराचा विस्तार केला पाहिजे, "वेडात मराठी वीर दौडले सात" नव्हे तर "वेडात मराठी वीर दौडले एकसाथ" हे झाले पाहिजे असे मोलाचे संदेश महाराज दिनकररावांना व प्र्यायाने आपल्याला देतात.
हे डायलॉग्स लिहणार्‍या कलाकाराला सलाम, फारच उत्तम जमले आहेत ...
शिवाय महाराजांच्या आयुष्यात त्यांना आलेल्या अडचणींचा सामना त्यांनी धिराने व आपल्या चातुर्याने कसा केला व त्याचा आजही कसा उपयोग होऊ शकतो हा संदेशही हा चित्रपट नक्की देतो ...
"मराठी वाटण्याची लाज न वाटता" असे काम करा की "मराठी असल्याचा अभिमान ( इथे सिनेमात वापरलेला "गर्व" हा शब्द अप्रस्तुत आणि चुकीचा आहे असे आमचे मत आहे ) वाटायला हवा " हा फार मोलाचा संदेश हा चित्रपट देतो ...

"तांत्रिक बाबी, सादरीकरण आणि कलाकारांच्या पर्फोर्मन्सबद्दल काही ... "
काही तुरळक आक्षेप सोडले तर तांत्रिकदॄष्ट्या भव्यदिव्य असा हा सिनेमा आहे. बहुतेक सर्व कलाकारांचे काम उत्तम आहे, सचिन खेडेकरने उभारलेला दिनकर भोसले मस्तच. मात्र त्यांच्या पत्नी असलेल्या "बांधेकरवहिनी" उगाचच अनावश्यक बेअरिंग घेऊन अख्ख्या चित्रपटात वावरल्याने त्यांचा आक्रस्ताळा अभिनय अंगावर येतो. महेश मांजरेकर आणि सिद्धर्थ जाधव आपापल्या ठिकाणी उत्तम. मकरंद अनासपुरेचा रायबा असा विनोदी का दाखवला हे कळाले नाही,त्याच्या शैलीला अनुसरुन त्याला संवाद देताना म्हणींचा अतिरेक झाल्याने घासात खडा लागावा असे ते टोचते. भरत जाधवाचा शाहीर पहाणे हा मात्र अत्याचार आहे, दुसरा कुणीही चालला असता, केवळ स्टारडम आणायचे म्हणुन त्याला वापरणे साफ फसले.
आता महत्वाचे म्हणजे तो बहुचर्चित आणि भव्यव्दिव्य असा "एक करोड रुपयांच पोवाडा" ...
माझ्या मते शुद्ध मुर्खपणा कारण तो जेवढा जमायला हवा तेवढा अजिबात जमला नाही. आयुष्यात मी पाहिलेल्या अनेक "अफजलखानाच्या वधा"च्या प्रसंगातला सगळ्यात फालतु/बेताबेताचा/फसलेला प्रयोग ह्या सिनेमातला, ह्यापेक्षा पुण्यातल्या गणेशोत्सवात मस्त जमतो हा प्रसंग डेकोरेशन म्हणुन. आता त्यासाठी १ करोड कुठे आणि का घातले हे काही कळाले नाही. त्य पोवाड्यातले काव्य अप्रितम पण ते भरत जाधवांच्या साजातुन ऐकताना सर्व मज्जा निघुन गेली, उदेश उमप हा एक मस्त ऑप्शन होऊ शकला असता ...

" हा सिनेमा नक्की काय सांगतो व आपल्यात काय बदल घडवायला प्रवॄत्त करतो ? तो का पहावा ?"
मुळात ही कहाणी आज जरी दिनकर भोसल्यांची वाटत असली तरी ही गाथा आहे शतानुशतके चालत आलेल्या मराठी माणसाची, त्याच्य मनोवॄत्तीची, त्याच्या लढ्याची व त्याच्या यशापयशाची ...
आपला स्वाभिमान आणि हक्क अबाधित राखण्यासाठी लढलेल्या, झुंजलेल्या, शत्रुच्या नाकावर टिच्चुन यश मिळवणार्‍या अशा थेट ज्ञानोबा माऊली, तुकोबांपासुन ते शिवाजी महाराजापर्यंतच्या, लोकमान्य टिळकांपासुन ते बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यसुर्य सावरकरापर्यंतच्या, यशवंतराव चव्हाणांपासुन ते सीडी देशमुखांपर्यतच्या व कालच्या बाळासाहेब ठाकर्‍यांपासुन ते आजच्या राज ठाकर्‍यांपर्यंतच्या अनेक महान मराठी व्यक्तीमत्वांच्या लढाऊपणाचा वारसा आणि आत्मसन्मानाचे बीज आपल्यापर्यंत आणणार्‍या एका क्षात्रतेजाची ...
परिस्थीती जरी बदलत असली तरी समस्या त्याच आहेत, मराठी माणुसही तोच आहे त्याच्या लढाऊपणा आणि हक्कासाठी कुणाविरुध्दही उभारण्याचे सिंहाचे काळीज बरोबर घेऊन. मराठी माणसाचा आत्मसन्मानही तोच आहे, त्याचा कणखरबाणाही अजुन तसाच आहे," मोडेन पण वाकणार नाही " हे अजही मराठी माणुस अभिमानाने म्हणतो व त्याप्रमाणे वागतोही.
फक्त काही काही वेळा काळाच्या जादुमुळे म्हणा अथवा निसर्गचक्राला अनसरुन म्हणा हे "मराठी स्फुलिंग" राखेच्या ढिगार्‍याखाली दबले जाते व त्याचे "तेज" कमी होते, ह्याचा अर्थ ते विझले असा होत नाही, आता त्याला जरुर असते ती कुणीतरी एक "जादुई फुंकर" मारण्याची, त्याने सगळी धुळ उडुन जाईल व मराठी कर्तुत्वाचे क्षात्रतेज पुन्हा तळपुन उठेल ....
पुन्हा एकदा " मी मराठी असण्याचा अभिमान वाटतो" हे वाक्य मोठ्ठ्या अस्थेने उच्चारले जाईल ...

इतिहासात अनेक लोकांनी हे फुंकर घालण्याचे काम केले, बरीच नावे मी वरच्या परिच्छेदात घेतली, बहुसंख्यही राहुन गेली.
पण आजच्या काळात हेच काम " मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा सिनेमा करतो असे आमचे मत आहे म्हणुन प्रत्येकाने हा सिनेमा जरुर पहा असे तळमळीने वाटते ...
तेवढ्या एकाच बाबीसाठी बाकी सर्व गोष्टी आणि चुका माफ ...

धन्यवाद ...!!!!