Tuesday, February 22, 2011

'धोबीघाट' विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ...

सध्या म्हणे क्रिकेटचा विश्चचषक सुरु आहे आणि त्यात "भारत" म्हणे आघाडीचा दावेदार आहे, आम्ही हे क्रिकेट वगैरे पहातो अशातला काही भाग नाही पण उगाच काहीबाही ४ लोक बोलतात ते आमच्या कानी पडते व त्यावर आम्ही ( कधीमधी ) भाष्य करत असतो. मुळात इन मीन ८-१० (रिकामटेकडे) देश आपला वेळ जात नाही म्हणुन दिवस दिवस जो निरर्थक खेळ खेळतात त्याच्या चक्क विश्वचषक स्पर्धा ?
नाही, मी मान्य करतो की एकुण १०० च्या आसपास देश म्हणे ह्या "आय सी सी ( ही आमच्या पवारकाकांची बरं, नाद नाय करायचा )" शी संलग्न आहेत, पण त्याने कुठे खेळ मोठ्ठा होतो का ? बरं, ह्या १०० तले किती देश नुस्ते नाममात्र क्रिकेट खेळतात हा दुसरा मुद्दा, उरलेल्या मन लाऊन खेळणार्‍या देशांमध्ये ( बरं का, ह्या देशांमध्ये जनरली पॉलिटिशियन जन्तेला चुना लावत असतात व त्यांचे लक्ष ह्या मुद्द्यांकडे जाऊ नये म्हणुन क्रिकेटसारख्या रिकामटेकड्या खेळाला इथे उगाच प्रमोट केले जाते ) मेन ४ देश आशियातलेच ( किंवा भारतीय उपखंडातले, त्यातले ३ म्हणजे स्वातंत्र्यापुर्वीचा भारत, आता बोला) आहेत आणि एकुण उत्पन्नामधला निदान ८०% भाग इथुनच येतो, आता पैसा आला की प्रमोशन आलेच व म्हणुन असल्या स्पर्धेचा गाजावाजाही आला, असो हरकत नाही.

आता तुम्ही म्हणाल की काही आफ्रिकन आणि इतर अरबी देश क्रिकेट खेळतात आणि शिवाय ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड आणि खुद्द इंग्लंडचा पण संघ इथे खेळतो.
अरबी देशांचे काय हो, त्यांच्याकडे मनोरंजन व्हावे म्हणुन कोंबड्यांच्या झुंजी, उंटांच्या शर्यती पासुन ते थेट माणसांच्या ( पक्षी : विकत घेतलेल्या गुलामांच्या ) झुंजी लावतात, मग मला सांगा क्रिकेट खेळवणे ही काय त्यांना अवघड बाब आहे का ?
बाकी त्या शारजाच्या मैदानात मॅच पहायला जमलेले ( काळा गॉगलवाले) रसिक पाहुन आजही आम्हाला ह्या 'जंटलमेन गेम'चे आश्चर्य वाटते बरं.
( बाकी सध्या काही लक्ष्मीपुत्रांनी "आय पी एल" नामक स्पर्धेत असेच प्लेयर्स 'विकत' घेऊन ते आपापल्या गावात मनोरंजनासाठी खेळवणार असल्याचा घाट घातला आहे, ह्यावरुन एका कॅबिनेट मंत्र्याला आणि बीसीसीआय मधल्या एका दिग्गज आसामीचा गुल्ल व्हावे लागले ह्यावरुन आम्हाला ह्या स्पर्धेच्या 'स्पिरीट्'ची अंधुकशी कल्पना येते आहे, असो पण सध्या विषय तो नाही, नंतर ह्यावर सविस्तर भाष्य करु )

असो, भारताने म्हणे १९८३ साली ही स्पर्धा जिंकुन हा विश्वचषक भारतात आणला होता, नाही नाही, ही गोष्ट अभिनंदन करण्यासारखीच आहे त्याबद्दल वाद नाही, त्या संघाचे अभिनंदन आहेच.
अहो पण त्यानंतर त्या स्पर्धेत खेळलेले खेळाडु, मैदानात बाटल्या उचलायला असणारा दुय्यम खेळाडु, सपोर्ट स्टाफ, त्यावेळी मैदानाबाहेर गोळ्या-बिस्कीटे विकणारे ह्यापासुन ते थेट तो सामना झाडावर बसुन फुक्कट पाहणारे हे सगळेच आजकाल मिशीला तुप लाऊन 'क्रिकेट एक्सपर्ट' म्हणुन हिंडतात व काहीही मुक्ताफळे उधळतात ह्याचे आम्हाला मनोसोक्त हसु येते.
आणि बरं का, सन १९८३ नंतर दर ४ वर्षांनी आपल्या इथल्या जनतेला "विश्वचषक विजेते" होण्याची स्वप्ने दाखवुन जो बेमालुम चुना लावण्याचे कार्य इथल्या 'इव्हेंट मॅनेजर्स'नी हाती घेतले आहे त्याला तोड नाही.
असो, पैसा म्हटले की हे आलेच नै का ...
अजुन एक किस्सा सांगु का, मागच्यावेळी की नै आपण ना ( पक्षी : भारत ) पहिल्या फेरीतच धुळ खात गारद झालो ( भेंडी काय दमदार वाक्य होते हे ) असे एका पेप्रात वाचले होते, मग काय हो, धंदाच बसला की ह्या क्रिकेटवाल्यांचा. कारण ह्या पराभवानंतर भारत आणि पाकीस्तान ( ते ही आपले भावंड, पडले पहिल्याच फेरीत बाहेर ) मधले तमाम रसि भयंकर निराश झाल्याच्या बातम्याही आम्ही वाचल्या.
मग काय झाले तर एक गंमतच घडली, २०-२० नामक ह्या क्रिकेटचे एक छोटेसे पिल्लु जन्माला घालण्यात आले, त्याचाही अचान्क विश्वचषक भरवण्यात आला आणि त्यात ना भारत-पाकिस्तान ही 'फायनल' खेळवण्यात आली ( हो हो, खेळवण्यात आली हे बरोबर आहे ) आणि बरं का त्यात ना भारत जिंकला, पुन्हा इथे क्रिकेटचे रोपटे जोमाने फोफावले व पुन्हा पैशाच ओघ सुरु झाल. कालांतराने मग लोकांना हा '२०-२० नशेचा डोस' फार आवडला असे उत्पादकांचे मत झाले व त्यासाठी खास त्यांनी 'आय पी एल' नामक स्पर्धा दरवर्षी भरवण्याचे ठरवले, बघा लेको किती क्रिकेट बघताय ते................................. परफेक्ट बिझीनेस, नै का ?

असो, आम्ही एकदा लिहीत गेलो मी मुळ विषय हरवुन काहीतरी तिसरेच लिहण्याची आम्हाला ( राऊतांसारखी ) सवय आहे, सबब आता आम्ही 'बॅक टु विषय' येतो.
सध्या म्हणे क्रिकेटचा विश्चचषक सुरु आहे आणि त्यात "भारत" म्हणे आघाडीचा दावेदार आहे,पुन्हा असोच.
आमचा तसा ह्याला विरोध वगैरे नाही बरं का पण ह्या निमित्ताने जे 'रान पेटवले' गेले आहे ते पाहुन आम्हाला अंमळ काळजी वाटत आहे की ह्या आगीत आपले किती महत्वाचे विषय उगाच भक्षस्थानी पडणार आहेत.
ह्या महान देशातले लोक आता कामंधंदे सोडुन जिथे मिळेल तिथे क्रिकेट बघत बसणार आणि बाकीचे विषय आपोआप फाट्यावर मारले जाणार.

- आता युनियन बजेट, रेल्वे बजेट आणि अन्य घटना ह्याच कालावधीत घडतील व आपण आणि मिडिया (ह्यांना क्रिकेटचेही देणे नाही आणि बजेटशीही घेणे नाही, पैसा बोल्ता है साब ) ह्याकडे चक्क दुर्लक्ष करु.
- आता सरकारी कार्यालये, खासगी कचेर्‍या, इतर महत्वाच्या सेवा इथले कर्मचारी 'ऑनड्युटी' मॅच बघत बसणार व कामे तुंबणार
- जे लोक आधीच रिकामटेकडे आहेत ते आता चौकाचौकात टीव्ही लाऊन किंवा एखाद्या दुकानासमोर रस्त्यावर उभे राहुन मॅच बघणार, आरडाओरडा करणार व त्यामुळे काय नुकसान होते ते तुम्हीच सांगा, आम्हाला सांगण्याची इच्छा नाही.
- मार्च / एप्रिल म्हणजे परिक्षांचा सिझन हो, आता कसला अभ्यास आणि कसल्या परिक्षा ? मारुन मुटकुन अभ्यासाला बसवणे म्हणजे त्रासच ना ?
- मेन म्हणजे आता ह्या कालावधीत 'वेळ आणि सेवेची गणिते' धडाधड चुकणार
( ( आमची तक्रार नाही, आम्हाला केवळ गंमत वाटते हे आधीच कबुल करतो ) किस्सा पहिल्या दिवशीचा, शनिवारी दुपारनंतर आमच्या भागातली बहुसंख्य दुकाने उगाच बंद किंवा इनअ‍ॅक्टिव्ह झाली, इतर सेवापुरवठादारांनी हक्काची 'मॅच बघायची सुट्टी' घेतली, बाहेर निघालो असतो २-३ ठिकाणी रस्त्यावरच टीव्ही लाऊन भारत्-बांग्लादेश ह्यांच्यातले महायुद्ध(?) पाहण्याचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जोशात चालु होता, त्यामुळे झालेल्या ट्रॅफिकच्या गमतीत आम्हाला उशीर झाला, नंतर एका हॉटेलात जेवायला गेलो असता तिथे चक्क मोठ्ठी स्क्रीन लाऊन सामने पहाणे चालु होते व सर्व सेवापुरवठा करणारे कर्मचारी ते पाहण्यातच व्यस्त होते, सामने पाहण्याचा त्यांचा मुलभुत हक्क मान्य केला तरी 'ऑनड्युटी' हे असे वर्तन आता अजुन ४० दिवस चालणार आहे का ? हे राम ! )

असो, उगाच जास्त वितंडवाद घालत नाही !
क्रिकेट हा एकेकाळी 'बघण्यालायक' खेळ होता, आम्ही बघयचो व तो आता 'बघवेना' असा झाला म्हणुन ही ४ वाक्ये.

बाकी ही सुरवात आहे.
आम्ही आमच्या ह्या आवडत्या खेळावर असेच भाष्य करत राहु, स्पर्धा अजुन ४० दिवस आहे म्हणतात

मध्यंतरी 'धोबीघाट' हा अत्यंत प्रगल्भ, सामाजिक जाणिवा असणारा, आंतरिक संवेदनांना हात घालणारा, आधुनिकोत्तर साहित्यात मानाचे पान असणारा असा लै भारी अभिजात सुंदर चित्रपट आहे असे ऐकले होते ( व म्हणुनच आम्ही तो पाहिला नाही हा भाग वेगळा ).
म्हणुनच आम्ही ही आमची लेखमाला "धोबीघाट" ह्या संकल्पनेच्या स्वरुपात सादर करणार आहोत व एकेका विषयाची मनोसोक्त धुलाई करणार आहोत.

पुढचे आकर्षण : 'धोबीघाट' विश्वविजेतेपदाच्या दावेदारांचा - भाग # १ : भारत

धन्यवाद !

Monday, February 7, 2011

चांगला चित्रपट / वाईट चित्रपट

गेले काही दिवस एका विचित्र प्रश्न कम समस्येने आम्हाला भयंकर छळले आहे. ह्या विषयात आमचे ज्ञान जरा कमीच आहे, पण ह्यामुळे लफडा असा होतो की कुठे काय पॉलिटिकल करेक्ट मतप्रदर्शन करावे ह्यासंबंधी आमचा फार घोळ होऊ लागला व आम्हाला लोकांचे 'तुला चित्रपटातले काय कळते, मुर्ख आहेस, तु चित्रपट पाहुच नकोस' वगैरे टोमणे ऐकावे लागत आहेत.

आम्ही माठ आहोत व आम्हाला कशातलेच काही कळत नाही हे मान्य आहे, पण आता चारचौघात निदान चित्रपटांविषयी मतप्रदर्शन करताना आपली झाकली मुठ सव्वा लाखाची कशी असावी ह्यासंबंधी मार्गदर्शन हवे आहे.

चित्रपट 'चांगला' असतो म्हणजे नक्की काय आणि चित्रपट 'वाईट, फालतु, भिकार, थर्डक्लास' असतो म्हणजे नक्की काय ? तसेच कुठल्या चित्रपटाला चांगले का म्हणावे किंवा त्या चित्रपटाला वाईट का ठरवावे ह्यासंबंधी काही सर्वसाधारण समज असतील तर ते नक्की कोणते असे प्रश्न मला पडले आहेत..
गेले काही वर्ष मला समजणारा चित्रपट आणि मिडिया, मित्र, संबधित ह्यांना कळणारा चित्रपट व आम्ही दोघांनी केलेले त्यांची मुल्यांकन ह्यात जमिन-आस्मानाचा फरक पडत आहे.

१. बर्‍याच लोकांनी नाके मुरडलेला आणि 'अब्राम्हण्यम' ठरवलेला 'दबंग' हा चित्रपट वाईट कसा असु शकतो तेच मला कळत नाही. चित्रपट बनवताना त्यांनी डिफाईन केलेली कक्षा आणि तो बघायला जाताना माझ्या असणार्‍या काही 'किमान अपेक्षा'ह्यांचे समिकरण व्यवस्थित जुळत असेल आणि तो चित्रपट जर मला पुरेपुर आनंद देत असेल तर त्याचा 'फालतुपणा' मी कुठल्या खात्यावर मोजायचा ?
मनोरंजन ही किमान अपेक्षा ठेऊन जर मी दबंग पहात असेन आणि त्यात मी पुर्ण समाधानी असेन तर त्यामध्ये 'प्रकाश झा, सत्यजीत रे, (आजकाल ) आमीर खान, अमोल पालेकर ( ही मंडळी एका पंक्तीत बसवल्यामुळे काही जणांच्या भावना दुखावल्या सतील तर क्षमस्व हो बाबांनो )' ह्यांच्या चित्रपटात असलेले तथाकथित 'मुल्य' घेऊन मी त्याची तुलना दबंगशी का करावी ?
भली त्यातली गाणी रेहमानच्या सुरेल गाण्यासारखी सफाईदार नसतील पण म्हणुन का ती फालतु गाणी होतात ?
दबंगमध्ये मख्ख चेहर्‍याचे अभिनेते, काही केल्या घंटा कळत नाही असा त्यांचा अभिनय व त्याचा अर्थ, जडबंबाळ संवाद, अगम्य कॅमेरा अँगल्स आणि प्रकाशयोजना वगैरे नाहीत म्हणुन त्याला 'फालतु' ठरवावे का ?
पण बहुतेकांच्या मते 'दबंग' हा तद्दन टुकार, फालतु सिनेमा आहे व त्याच्याशी आम्ही साफ 'असहमत' आहोत.

२. आजकालचा भरमसाट चर्चा झालेला 'उडान' ... मला नाही आवडला.
इनफॅक्ट मला बोअर आणि बर्‍यापैकी कंटाळवाणा वाटला. त्यातली जमली म्हणावी अशी पात्रनिवड आणि त्यांनी केलेला निखळ अभिनय सोडला तर त्या चित्रपटात काय आहे ते मला अजिबात समजले नाही. १० मिनिटाची स्टुरी उगाच २ तास आणि ७ मिनिटे लांबवली आहे, त्यासाठी अगदीच अनावश्यक, रटाळ, बाळबोध आणि बर्‍यापैकी पुनरावृत्ती होणारे सिन्स घुसडले आहेत. काही पात्रांची उगाच युसलेस एंन्ट्री आणि समावेश. शेवटचा एक दणका सीन सोडला आणि १-२ गाण्यातली काही कडवी सोडली तर ह्या चित्रपटाचा 'महानपणा' मी कोणत्या खात्यावर मांडायचा ?
अभिनय चांगला मान्य !
अहो पण नुस्ता अभिनय जर तुम्हाला २ तास एका ठिकाणी बसवुन ठेऊ शकत नसेल, स्टोरी आणि पटकथेचे एकमेकांशी जुळत नसेल, पात्रे एकमेकांशी अगम्य व्यवहार करत असतील, तेच तेच (रटाळ) सीन्स पुन्हापुन्हा येत असतील तर मी हा चित्रपट उगाच का 'आवडुन घ्यावा' ?
असो, पण पण बहुतेकांच्या मते 'उडान' हा अत्यंत सुंदर, सफाईदार, क्लासिक आणि उच्च निर्मीतिमुल्य असलेला सिनेमा आहे व त्याच्याशी आम्ही साफ 'असहमत' आहोत.

ही केवळ उदाहरणे झाली, पण असेच काहीसे सर्वच बाबतीत आढळते.
मग चांगल्या चित्रपटाची व्याख्या काय आणि एखादा चित्रपट वाईट आहे असे मत कोणत्या चाचणीनंतर बनवावे ?

१. केवळ चांगली ( पक्षी : फेमस, स्टारडम असलेली ) स्टारकास्ट, एखादा मोठ्ठा बॅनर, गाजलेला नामवंत संगीतकार, दिग्गज दिग्दर्शक वगैरेंनी बनलेला सिनेमा इन जनरल 'चांगलाच' असतो का ?
२. अचाट स्टोरीलाईन , अगम्य कॅमरा अँगल्स, रटाळ आणि अगम्य संवाद, साबणछाप अभिनेते व त्यांचा तसलाच अभिनय आणि सोबत 'समांतर सिनेमा'च्या नावाखाली उच्चभ्रु आणि मिडियाने ओढुनताणुन चालवलेला उदोउदो ह्यामुळे तो तद्दन टाकावु सिनेमा 'चांगला' कसा ठरतो ?
३. दे दणादण मारामारी, मस्तपैकी अ‍ॅक्शनदृष्ये, खुसखुषीत ( पण कमी साहित्यमुल्य असलेली टपोरी म्हणता येईल अशी ) डायलॉकबाजी, मस्त मस्त लोकेशन्स आणि डान्स वगैरे, त्या वेळेपुरती खुष करुन टाकणारी उडत्या चालीची गाणी ( क्वचित आयटम साँग ) आणि ह्यासोबत इतर प्रेक्षकांचा जल्लोश, हिरोच्या एंट्रीला पडणार्‍या कचकचीत शिट्ट्या, एखाद्या कमेंटनंतर प्रेक्षकांचे खळखळुन हसणे, गाण्याच्यावेळी आरोळ्या / शिट्ट्यांचा गदारोळ आदी बाबी मला मस्तपैकी मनोरंजन देत असतील तर तो चित्रपट 'फालतु' कसा होतो ?
४. 'गरम मसाला' सारख्या सिनेमात असलेला मस्त सावळागोंधळ, पळापळ, टायमिंगवाले डायलॉक्स, छान छान हिरॉईन्स,माफक कॉमेडी, १-२ गरमागरम आयटम साँग्स, काही फारिन लोकेशन्स आदी मला २ तास मस्त करमणुक देत असतील तर त्यांचा 'फालतुपणा' मी कोणत्या खात्यात मांडायचा ?

असो, अशी अनेक उदाहरणे देता येतील ...
माझा एकच प्रश्न आहे, एखादा चित्रपट चांगला का असतो किंवा तो वाईट का असतो व ते कसे किंवा कोणत्या चाचण्यांच्या आधारे ठरवावे ?

अवांतर :
आजकाल अत्यंत हेटाळणीच्या सुरात खिजवण्यासाठी "पिटातले प्रेक्षक" हा शब्दप्रयोग करणार्‍यांचेही मला आजकाल ज्याम आश्चर्य वाटते. बाय द वे, एकुण व्यवसायापैकी किमान ७०% व्यवसाय ह्याच पिटातल्या प्रेक्षकांकडुन होतो व बहुतेक सिनेमे त्यांच्यासाठीच निघतात असा माझा अंदाज आहे.
बाकी तथाकथित समांतर, उच्च अभिरुचीमुल्य असणारे, कलात्मक सिनेमांना किती प्रेक्षक असतात हे ज्यांचे त्यांना पहावे, कमी प्रेक्षक असण्याला मी कमीपणा मानत नाही पण जे हा चित्रपट पहात नाही किंवा ज्यांना असे चित्रपट कळत नाहीत असा तद्दन खोटा प्रचार चालवणार्‍या सिनेमातील उच्चभ्रुंचे मला कौतुकमिश्रित आश्चर्य वाटते. त्यांनी असे चित्रपट जरुर कौतुकाने आपापला कंपु जमवुन व शक्य तितके आंबट तोंड करुन पहावेत, आमचे अजिबात लुस्कान नाही, मात्र ह्या चित्रपटांचे कौतुक करताना बिचार्‍या त्या 'पिटातल्या प्रेक्षकां'ना हिणवुन त्यांच्या नसलेल्या कमीपणाच्या जोरावर स्वतःचा नसलेला महानपणा सिद्ध करणार्‍या पातक करु नकात एवढेच आमचे मत आहे.
दोन्हीहा गटांचे क्लास वेगळे आहेत, वेगळेच रहावेत ह्यात शहाणपण आहे. जो तो आपापल्या जागी ग्रेट आहे !