Saturday, May 2, 2009

रिक्षावाले, संप आणि आम्ही ...

आज सकाळी (जरासे अंमळ उशीरानेच) उठलो, नेहमीच्या सवयीनुसार आधी लॅपटॉप चालु करुन नेट चालु केले व काय चालु आहे ह्याची चाचपणी केली. सकाळ-सकाळ एका महत्वाच्या बातमीने आमचे लक्ष वेधुन घेतले(काळजी नको, अजुन कोण नवा चप्पल्/बुट फेकीचा नवा बकरा झाले नाही. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.) ते म्हणजे "दरकपातीच्या निषेधार्थ पुण्यातले २५००० रिक्षावाले संपावर ....".
हीच बातमी जवळपास सगळ्या पेपरमध्ये आणि सोशल वेबसाईटवर दिमाखात झळकत आहे. बरोबर आहे ना, अहो हा प्रश्न "पुण्याशी" निगडीत आहे ना, मग त्याला "वैश्विक प्रश्नाचा" दर्जा नको द्यायला ? आज ही बातमीकडे दुर्लक्ष केल्याची गुस्ताखी पुणेकरांनी माफ केली तर उद्या "पुण्यात ह्यावेळी कडाक्याची थंडी" ही बातमीही तुम्ही लेको मिडीयावाले छापणार नाही,नरकात जाल, कुठे फेडाल असली पापं ?
असो. तर मुद्दा पुणेकर हा नसुन पुण्यातल्या रिक्षावाल्यांचा संप असा आहे ...

बातमी वाचुन आमचे अंमळ मनोरंजन झाले व धक्काही बसला, रिक्षावाल्यांनी आम्हाला धक्का देण्याची ही दुसरी खेप. मागे एकदा आम्हाला बेंगलोरमध्ये रात्री ८.३० वाजता एक रिक्षावाला चक्क यायला तयार झाला, हिंदीतही व्यवस्थित बोलला, मीटर प्रमाणेच भाडे घतेल, उरलेले सुट्टे मात्र ३ रुपये परत केले व वर जाताना "गुड नाईट सर" असे म्हणाला तेव्हा असाच धक्का बसला होता, त्या धक्क्याने आम्ही एवढे अंतर्बाह्य हादरुन गेलो होतो की रिक्षातुन उतरल्यावर आजुबाजुच्या माणसांचा आम्ही फुल्ल टल्ली होऊन कसेबसे रिक्षातुन घरापर्यंत परत आलो आहोत व अजुन लटपट लटपट चालत आहोत असा (कन्नडमधुन) गैरसमज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 बातमी सविस्तर वाचल्यावर आमच्या असे लक्षात आले की " रिक्षाच्या भाड्यामध्ये (पक्षी : दरामध्ये, मी रिक्षावाल्याला भाड्या असे म्हटलो नाही, तो शब्दच तसा आहे.) प्रति किमी मात्र १ रुपायाने कपात करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (बापरे, काय अवघड शब्द आहे, च्यायला असल्या जड सरकारी शब्दांविरुद्ध एकदा संप पुकारावा लागणार ) दिल्याने त्याच्या निषेधार्थ पुण्यातल्या सुमारे २५००० रिक्षावाल्यांनी (सुमारे म्हणजे अंदाजे, रिक्षाच्या "सुमार दर्जाशी" ह्याचा काही संबंध नाही) बेमुदत संप पुकारला आहे. "
मला नाही कळाले.
रिक्षावाल्यांचा संप म्हणजे काय व तो कसा जस्टिफाईड असु शकतो ?

रिक्षा ह्या व्यवसायावर पोट कुणाचे अवलंबुन आहे ? 
गरज कुणाला आहे ?
ह्याच चालीवर उद्या समजा भिकार्‍यांनी कमीत कमी मात्र १० रुपये भीक मिळावी म्हणुन, पुण्यातल्या दुकानातल्या ग्राहकांनी त्यांना दुकानात सन्मानजनक वागणुक मिळावी म्हणुन, दारुड्यांनी एका बाटलीबरोबर सोडा/थम्सप फ्री मिळावे म्हणुन ,अन्नछत्रातल्या यात्रेकरुंनी जेवणात ताटात तुपाची धार कमी पडते आहे म्हणुन्,भंगार गोळा करणार्‍यांनी भंगार वस्तुतल्या खालावत्या क्वालिटीचा निषेध म्हणुन संप पुकारावा हे जस्टिफाईड आहे का ?
तसा जर ह्यांना हक्क नसेल तर मनमानी करुन वागणार्‍या, अडवणुक करणार्‍या,ग्राहकांना कस्पटासमान वागणुक देऊन त्यांच्याशी उद्धट व्यवहार करणार्‍या, मनाला येईल ते भाडे मागणार्‍या, ग्राहकाची गैरसोय न पाहता एखाद्या रुटवरचे भाडे नाकारणार्‍या ह्या डोईजड रिक्षावाल्यांना "मात्र १ रुपये/किमी" च्या दरकपातीसाठी संप करणे बरोबर वाटते का ?

रिक्षा पंचायतीच्या पदाधिकार्‍यांच्या मते ... जाऊ दे, आधी ह्या "पंचायत" वाल्यांना पाहु. हे लोक नक्की कोण ? भाषणबाजी आणि आडवणुक सोडली तर ह्यांचा रिक्षा ह्या व्यवसायाशी संबंध काय ? हे नक्की काय करतात ? ह्यांचा पोटापाण्याचा धंदा हा रिक्षा अथवा तत्सम आहे का ? वर्षातुन एकदा चौकात भलामोठ्ठा मंडप टाकुन सत्यनारायण घालणे व त्यावेळी रिक्षांची मिरवणुक काढणे ह्याव्यतिरीक्त ही पंचायत रिक्षावाल्यांसाठी नक्की काय करते ? एखाद्या पक्षाच्या मंचावर ह्यांच्या नेत्यांनी जाणे व रिक्षावाल्यांनी त्या पक्षाचे झेंडे रिक्षांवर लाऊन मग्रुरी करत गुंडागर्दी करणे हे कलम रिक्षा पंचायतीच्या अधिकॄत घटनेत लिखीत स्वरुपात आहे का ? नसल्यास मग पंचायत अशा समाजविरोधी तत्वांच्या विरोधात का संप करत नाही ?
जसे १ रुपायाने भाडे कमी होणे हा मुद्दा रिक्षावाल्यांसाठी महत्वाचा ठरतो तसेच रिक्षाच्या ग्राहकांसाठी " सन्मानजनक वागणुक, शुद्ध व सज्जन आचरण असणारे व कमीत कमी उर्मट आणि शिव्यागाळी न करणारे रिक्षावाले, मीटरप्रमाणे भाडे, सर्व मार्गांवर हव्या त्या वेळी सेवा , एखाद्या विशिष्ठ मार्गावर सेवा न नाकारणे, रिक्षामध्ये मद्यपान धुम्रपान आणि इतर व्यसने न करणे, रिक्षांचा दर्जा सुसह्य राखणे" ह्याविषयी पंचायतीकडे काही कार्यक्रम आहेत का ? का ह्या गोष्टी त्यांच्या "रिक्षाकुलाला बौलु लागेल" अशा कॅटॅगिरीत येतात ?

मुळात ५ रुपयाने डिसेल कमी झाले असताना १रु./किमी दरकपात कशी अन्यायकारक ठरते हेच मला समजेना, हे लोक आता सुटे भाग व ऑईलची दरवाढ, दंडाच्या रकमेत वाढ वगैरे सांगत आहेत. योगायोगाने मी ह्याच क्षेत्रातला असल्याने (१ मिनीट, मी रिक्षावाला नाही, वाहननिर्मीती उद्योगातला म्हणत आहे) ह्या गोष्टींची महागाई किती वाढली व ह्याचा दरसाल कितपत खर्च येतो ह्याची मला व्यवस्थित कल्पना आहे. हे सरळसरळ वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे. हां, इथे जर सर्व जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किमतींचा विचार केला तर आपला रिक्षावाल्यांना सॉफ्ट कॉर्नर असु शकतो.
पण हे सगळे केव्हा ?
जेव्हा रिक्षावाले शुद्ध आणि सरळ "मिटरप्रमाणे" भाडे आकारतील तेव्हा ....
आयला दर भाड्यामागे १०-१५ रुपये जास्त मागायचे, मिटर फास्ट करुन ठेवायचे, डिसेलच्या जागी रॉकेल मिश्रीत इंधन वापरायचे आणि वरुन "१ रुपया दरकपातीविषयी" बोंबाबोंब करायची हा कुठला न्याय ?

पुण्यतल्या सो कॉल्ड २५००० रिक्षांपैकी किती रिक्षा मात्र "डिसेल्"वर चालतात ? कारण आम्ही "सी एन जी"वर चालणार्‍या रिक्षा रस्त्यावर धावत असल्याच्या बातम्या वाचतो. रिक्षावाल्यांच्या व्याख्येनुसार शहराच्या आउटसाईडला ( म्हणजे अख्ख्या पुण्यात ) मिटरप्रमाणे भाडे चालत नाही, मग हा १रु/किमी दर येतोच कुठे ? जर ६-आसनी रिक्षावाले ह्यात सामिल असतील तर त्यांनी कॄपया मिटरवर चालणारी ६-आसनी रिक्षा दाखवावी, आम्ही स्वखर्चाने त्यांचा "महावस्त्र(पक्षी:शाल) व श्रीफळ" देऊन सत्कार करु व मिटरपेक्षा १० रुपये जास्त बक्षिशी देऊ.किती रिक्षांचे मिटर योग्य मापकाप्रमाणे रिडिंग दाखवातात ? कारण आम्ही शि. नगर ते स्वारगेट ह्या मार्गावर "२२ रुपये ते ४० रुपये ह्याप्रमाणे कितीही मिटरप्रमाणे भाडे" दिल्याचे आठवते.
मग असे असताना १रु/किमी दरकपातीची एवढी बोंबाबोंब करुन पब्लिकला वेठीस का धरत आहेत हे रिक्षावाले ?
प्रामाणीकपणे कष्ट करुन जगणारे रिक्षावाले ह्यात भरडले जातात हे मान्य आहे पण तरीसुद्धा त्यांना मिळणारा पैसा हा तितकासा अन्यायकारक नाही हे सत्य आहे ...

मग हा एवढा माज आणि मस्ती कशासाठी ???
त्याचे कसे आहे की आज्-उद्या सुट्टी आहे म्हणुन आपण घरी बसुन आरामात "माजले आहेत हे रिक्षावाले भ**, एकेकाला चाबकाने फोडुन काढायला हवे, हवे तर घरी बसा म्हणावं, गेले उडतं" अशा आरामात प्रतिक्रिया देऊ, सध्या कसे सगळे गारगार आहे.
पण सोमवारी जेव्हा रणरणत्या उन्हात सकाळी हापीसाला जाताना गच्च भरलेली बस ३ वेळा सोडावी लागेल तेव्हा साहेब तुम्हाला "ए भैय्या, हिंजवडी चलेगा क्या ? " असे रिक्षावाल्यालाच विनवावे लागेल हे सत्य आहे. कितीही नाकारले तरी पुण्यातले "सार्वजनिक परिवहन" हे अत्यंत भिकार आहे हे सत्य आहे, ते तुम्हालाही माहित आहे आणि रिक्षावाल्यांनाही. तुम्ही त्याचा दर्जा सहन करत फार वेळ प्रवास करु शकणार नाही हे रिक्षावाल्यांना व्यवस्थित माहित असल्याने त्यांचा हा माज आहे ...

असो, त्यालाही पर्याय नाही..
एवढीच अपेक्षा करु की ह्याची पुढची पायरी ही रिक्षावाल्यांच्या आंदोलनात न होऊन दगडफेक, जाळपोळ, प्रवाश्यांची अडवणुक वगैरे प्रकारात होऊ नये ...
नुकत्याच निवडणुका झाल्याने अशा गोष्टी अशक्य नाहीत अशी शक्यता वाटते ...

"जे जे होईल ते पहावे, न्हेले रिक्षावाले तरच हापीशी जावे ..."

बाय द वे, रिक्षावाले हा लेख वाचण्याची शक्यता नाही ना ? नायतर पुढच्या पुणे वारीत मला रिक्षावाल्यांच्या माझ्यावर संभाव्य बहिष्कारामुळे पदयात्रा करण्याची पाळी येईल. तसे असेल तर सांगा, लगेच नाव बदलुन "रिक्षावाल्यांच्या समर्थनार्थ " अजुन एक खणखणीत लेख लिहायला बसतो. काय करणार बाबा, सवाल पुणे मे प्रवास का है...

* पुर्वप्रकाशित : मिसळपाव.कॉम ... 
ह्या लेखाला तिथे आलेल्या प्रतिक्रिया आपण "इथे" पाहु शकता ...