Wednesday, February 3, 2010

राजपुत्र बिहारात बहु बडबडला ....

राहुल गांधी हे एका फार फार मोठ्ठ्या घराण्याचे ( म्हणजे इतक्या मोठ्ठ्या की एका महान काँग्रेसी नेत्याने ह्या घराण्यातील एका महान पंतप्रधानांना "देशापेक्षा मोठ्ठे'" ठरवले होते। असो. ) वारस आहेत. मान्य !
सध्या ते काँग्रेस पक्षाचे युवराज असुन त्यांच्यापुढे आलेल्या कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर नाकारुन ( ह्या बातमीची काही चरणभाटांमार्फत लै पब्लिशिटी करण्यात त्यांचा वैयक्तिक काही स्वार्थ नव्हता हे उगाच जाताजाता नमुद करतो ) त्यांनी साधी "खासदारकी" स्विकारली. काँग्रेसी भाषेत ह्याला "अंतरात्म्याचा आवाज" की "आत्मसन्मानार्थ त्याग" असे काही तरी म्हणतात बॉ, आपल्याला त्यातले जास्त काही कळत नसल्याने तुर्तास मान्य एवढेच म्हणतो.
झालच तर लै शिकले वगैरे आहेत, शिक्षण फॉरीनात झाले ही हे आपल्यासारख्या अडाणी/अल्पशिक्षित मंत्री आणि खासदार निवडुन देणार्‍या देशात व्हॅल्यु अ‍ॅडिशन मानायला हरकत नसावी.


असो, आजकाल म्हणे ते ग्रामिण भारत पाहण्यासाठी आणि जनसामान्यांच्या हालअपेष्टा पाहण्यासाठी ( त्या दुर करणे ही कुठल्याच राजकारण्याची जबाबदारी नाही ) दौर्‍यावर निघाले आहेत म्हणे. ठिकठिकाणची गरिब, बेरोजगारी, रोज जिवंत राहण्यासाठी रोज संघर्ष करायला लागणारी उघडी-नागडी जनता आपला "राजपुत्र" पहायला हातातली कामे बाजुला सारुन अगदी उत्साहात येत आहे, अर्थात ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण आपल्या जनतेला "नेता" हा जोवर आपला "मालक" वाटत राहणार तोवर हे असेच घडणार।
असो, इथे म्हणे युवराज राहुल मोठ्ठीमोठ्ठी भाषणे वगैरे देऊन काहीकाही वायदे वगैरे करत आहेत ( व त्यांचे चमचे त्यावर "लेका लेका पंतप्रधान का नाही झालास?" असा चेहरा करत टाळ्या वाजवत आहेत ). जोवर हे रुटिन ( म्हणजे ह्यांना दौरा केल्याचा आनंद व जनतेला राजपुत्र प्रत्येक्ष डोळ्यांनी पाहिल्याचा आनंद ) चालु आहे तोवर आमची काही तक्रार असण्याचे कारण नाही।

मात्र परवा युवराजांनी एक गंमतच केली बघा। हो, गंमतच.
ते बिहारातल्या कुठलाश्या गावी गेले होते आपले टोळके घेऊन, मस्त गावगन्ना गर्दी अणि मिडियाचा फौजफाटा वगैरे जमला होती त्यांना बघायला. ह्यासर्व वातावरणामुळे उत्साहित झालेले युवराज उत्साहाच्या भारात जे बोलु नये ते बोलुन बसले. आता युवराजच ते, मनात आले बोलुन टाकले, मॅटर खतम, ते काय महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे नेते किंवा मंत्री आहेत काय शब्दाशब्दाला हायकमांडची परवानगी मागायला ? सध्या ते काय करतात तर विवीध भागांचा दौरा करतात व तिथले प्रश्न असे चुटकीसरशी फटाफट सोडवुन टाकतात, नुकताच त्यांनी "मुंबई आणि युपी/बिहारी जनांच्या नविन लोढ्यांचा प्रश्न" असाच बसल्या बैठकीत सोडवला, ह्याला म्हणतात युवराज. आता ह्याच हिशोबाने नॉर्थ -ईस्टचे प्रश्न, कर्नाटक्-तामिळनाडु ह्यांच्यातला कावेरी वाद, आंध्रातला तेलंगाणाप्रश्न, कर्नाटक-महाराष्ट्रातला सिमाप्रश्न , गुजराथेतला सरदारसरोवर प्रकल्पाचा वाद, काश्मिर प्रश्न वगैरे दिर्घकाळ भिजत घोंगड्यासारखे पडुन असणारे प्रश्न आता युवराज एका बैठकीत सोडवणार ह्याबाबत आमच्या मनात अजिबात संदेह नाही, देरी आहे ती फक्त त्यांनी त्या त्या भागाचा दौरा करायची. दौर्‍यावर जायचे, गर्दी आणि मिडिया जमवायचा, बैठक घ्यायची की सोडवायचा प्रश्न अशी एकदम शिंपल प्रोसिजर आहे, तुम्ही पहात रहा आता अनेक प्रलंबित वाद आता कसे फटाफट सुटतात ते.
असो, फारच विषयांतर झाले.

बोलता बोलता युवराज राहुल म्हणाले की "२६/११ रोजी मुंबईवर भीषण हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, उत्तर प्रदेशच्या एनएसजी कमांडोंनी. त्यामुळे दहशतवाद्यांशी लढायचे तर बिहारींना मुंबईतच राहू दे".
हम्म्, अशा बोलण्याला बालीश म्हणतात का हो ?
असो.
एनएसजीचे कमांडो हे राज्याच्या कोट्यानुसार निवडतात व त्यानुसारच त्यांच्या पलटणी तयार केल्या जातात ही नवी माहिती मिळाली.
तदनुसार मुंबई वाचवायला आलेल्या टीममध्ये युपी आणि बिहारी ह्या "कोट्यातल्याच तुकड्या" पाठवल्या गेल्याचेही नविनच समजले।
ह्याच युद्धात वीरमरण आलेला एनएसजीचा कमांडो शहिद संदीप उन्नीकृष्णन हा युपी/बिहारी होता ही बातमी कोणत्या उल्लुच्या पठ्याने युवराजांना सांगितली हो ?
तसेच ह्याच तुंबळ युद्धात ज्यांनी देश आणि मुंबई वाचवण्यासाठी आपल्या प्राण दिले ते हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे असे अधिकारी व इतर अनेक पोलीस तसेच कसाबच्या हातातली स्टेनगन आपल्या पोटावर धरुन त्याला जिवंत पकडवण्यात फार मोठ्ठी भुमिका बजावणारे तुकाराम ओंबाळे हे काय खास युपी/बिहारातुन मुंबई वाचवायला आले होते काय ?
शिवाय हे युद्ध लढत असताना देश आणि मुंबई वाचवायच्या प्रामाणिक भावनेतुन मैदानात उतरलेल्या "एनएसजी कमांडों"चा "युपी/बिहार" असा विशिष्ठ प्रदेश ठरवुन राहुलजींनी नक्की काय साधले ? म्हणजे ह्याच हिशोबाने देशाच्या सिमेवर लढणारा प्रत्येक जवान हा आपल्या देशाचे नसुन आपापल्या राज्याचे नेतॄत्व करतो की काय ?
रोज उठुन मनसे / शिवसेनेला झोडपण्याच्य निमित्ताने तमाम मराठी माणसाला "देश तोडणारे , विघटनवादी, प्रांतिक अस्मिता बाळगणारे" अशी शेलकी विशेषणे देणारे सो कॉल्ड देशप्रेमी मात्र राहुलजींच्या ह्या 'कमांडोंचा प्रदेश ठरवुन सैन्याचा अपमान करणार्‍या' विधानावर मात्र मुग गिळुन शांत आहेत.

असो, आता उगाच आपली राहुलजींना माहिती असावी म्हणुन देशासाठी लढलेल्या व योगदान दिलेल्या काही "मराठी" भाषिक जनांची आणि त्यांच्या कार्याची माहिती देतो, यादी अगदी संपुर्ण नाही पण जशी आठवेल तशी आहे, बहुदा तेवढी पुरेशी असावी.
१. जनरल अरुणकुमार वैद्य :
जेव्हा खलिस्तानवाद्यांनी पंजाबमध्ये रस्त्यांवर नंग्या तलवारी नाचवत सरकारविरुद्ध मोर्चे काढलेले आणि रक्तपातानी आख्खा पंजाब वेढीला धरुन अमॄतसरमधल्या 'सुवर्णमंदिरा'ला आपला लढाऊ गड बनवुन ठेवले होते तेव्हा जनरल वैद्यांच्या नेतॄत्वाखाली 'भारतीय सैन्य' तिकडे घुसले होते व 'ऑपरेशन ब्ल्यु स्टार' करुन देशाची वेशीवर टांगलेली लाग वाचवली होती.
ह्यामागे वैद्यांचा हेतु पुढेमागे मराठी माणसाला पंजाबात आरामात राहता यावे असा मुळीच नव्हता.
नंतर त्यांना ह्या प्रकरणाची किंमत सेवानिवॄत्तीनंतर एका हल्ल्यात आपले प्राण गमावुन द्यावी लागली होती.

२. एअर चिफ मार्शल प्रदिप नाईक :
त्यांनी २००९ मध्ये हवाईदळाचे नेतृत्व स्विकारले व समस्त देशाच्या हवाई संरक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली.१९७१ च्या युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, मराठी असल्या कारणाने आपले विमान घेऊन मुंबईवर घिरट्या घालत केवळ मुंबईचे संरक्षण करण्याच्या फंदात ते पडले नाहीत.

३. राम रघोबा राणे :
हे कोकण मराठा रेजिमेंटचे एक लेफ्टनंट ऑफिसर होते. १९४८ च्या पाकीस्तानी घुसखोरीला उत्तर देण्यासाठी जाणार्‍या सैन्यात ह्यांच्या तुकडीचे नेतृत्व राणे ह्यांनी केले. घुसखोरांनी ठिकठिकाणी सुरुंग पेरुन आणि अडथळे उभारुन भरतीय सैन्याच्या हालचालीवर बंधने आणली तेव्हा राणे ह्यांच्या तुकडीनी अनेक भु-सुरुंग निकामी करण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. त्यामध्ये त्यांच्या सहकार्यांना प्राण गमवावे लागले तर ते स्वतः जबर जखमी झाले होते.त्यांच्या ह्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना "परमवीर चक्र" देऊन सन्मानीत करण्यात आले होते.

४. अ‍ॅडमिरल विष्णु भागवत :ह्यांनी भारतीय नौसेनेचे नेतृत्व केले.

५. अनिल टिपणीस :भारतीय वायुसेनेचे माजी चीफ ऑफ एअर स्टाफ.

ह्याशिवाय इतर काही सामाजिक आणि राजकीय योगदाने,
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर :
ह्यांनी संपुर्ण स्वतंत्र भारताच्या घटना समितीचे 'अध्यक्षपद' भुषवले. स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांमध्ये पदासाठी आणि सन्मानाच्या खुर्च्यांसाठी चढाओढ चालु असताना मात्र ह्यांचे निस्वार्थी योगदान लक्षात घेण्यासारखे आहे.

२. स्वातंत्रपुर्व काळात इंग्रजांविरुद्धच्या असंतोषाची मुहुर्तमेढ इथे महाराष्ट्रातच रोवली गेली. तेल्यातांबोळ्यांचे पुढारी म्हणवले जाणार्‍या लोकमान्य टिळकांना आख्खा भारत हा "भारतीय असंतोषाचे जनक" म्हणुन ओळखतो. त्यांच्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर, फडके बंधु, राजगुरु, आगरकर ह्यांच्यासारख्या अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान बजावले आहे.

३. स्वांतंत्र्यानंतर अधुनिक भारताच्या उभारणीत मोलाची भुमिका बजावल्याबद्दल "महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संस्कॄतपंडित काणे" ह्यांचा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न" देऊन सन्मान करण्यात आला आहे.शिवाय ह्या यादीत आपल्या "लतादिदी आणि स्वरभास्कर भीमसेन जोशी" हे सुद्धा आहेत.

४. भारतात सिनेयुग आणि चलतचित्रपटाची सुरवात "दादासाहेब फाळक्यांनी" केली.

अशी उदाहरणे हजारो आहेत पण सगळीच यादी देण्यात मतलब काय ?
थोडक्यात सांगतो, ह्यातल्या एकानेही आपले कार्य पुढे न्हेताना ते फक्त महाराष्ट्र किंवा मराठी जनांपुरते मर्यादित ठेवण्याचा आपमतलबी करणे सोडा पण त्याचा कधी विचारही केला नाही, इतकेच काय पण नंतर कधी त्याचा साधा उल्लेखही केला नाही.

देशाच्या कल्याणासाठी आणि हिमायलाच्या संरक्षणासाठी नेहमीच धाऊन जाणार्‍या ह्या सह्याद्रीच्या मराठीच्या महाराष्ट्रादिकांना कुणी "देशप्रेम" शिकवायच्या आणि "राष्ट्रीय एकात्मतेचे धडे" शिकवायच्या भानगडीत पडु नये हेच खरे, ते आमच्या रक्तातच आहे....
अवांतर : युवराजांना कोणी महाभारतातल्या विराटपुत्र युवराज उत्तर ह्याची गोष्ट नाही का सांगितली ?

Thursday, January 21, 2010

मुंबई, टॅक्सी आणि मराठी ... च्या निमित्ताने

नमस्कार मित्रांनो,
अवघ्या २४ तासातच "इथुन पुढे टॅक्सीचे परवाने हे १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असणार्‍या मराठी भाषा लिहीता वाचता येणार्‍या लोकांनाच दिले जातील" हा लोकाभिमुख निर्णय फिरवुन राज्यसरकारने पुन्हा दिल्लीश्वरांपुढे आपले गुडघे टेकवुन शरणागती पत्करली आहे. आता ह्यांनी "मराठी" च्या ऐवजी "स्थानिक भाषा ( पक्षी : हिंदी आणि गुजराथी ) " असा बदल केला आहे ...

इनफॅक्ट सरकार म्हणते की हे परवाने कित्येक वर्षे जुने अशा प्रादेशिक परिवहन अधिनियम ह्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार दिले जातील.

मग एवढा गदारोळ का झाला ?
जर परवान्याच्या नियमात काही बदल केला नसेल तर त्याची एवढी न्युज का झाली ?

१. मुळात नियम न बदलता त्यातला सोईस्कर "मराठी भाषा जाणणे" हा उल्लेख मिडियासमोर वापरुन चव्हाण सरकारला 'मराठी कार्ड' तर खेळायचे नव्हते ना ?एकदा ते खेळुन झाल्यावर आणि स्थानिक लोकांकडुन कौतुक तर देशपातळीवर मिडिया आणि पक्षश्रेष्ठींकडुन आगपाखड ऐकल्यावर जर हा निर्णय फिरवला किंवा सावरासावर करुन नियमांवर बोट ठेवले तर तो जनतेची दिशाभुल केल्याचा गुन्हा होत नाही का ?

२. मुळात मराठीसाठी कायद्यात स्पेशल अशी काही दुरुस्ती नसताना त्याचा प्रचार मात्र "मराठी कार्ड" खेळल्यासारखा केला व ते आंगलट येताच सोईस्कर पल्टी मारली.जर सरकारला स्थानिक पातळीवरचे निर्णयसुद्धा दिल्लीश्वरांच्या मर्जीनेच घ्यावे लागत असतील तर ह्याला काय अर्थ आहे ?

३. इतर राज्यातील 'महानगरां'मध्येसुद्धा परवान्याच्या नियम ह्याच पातळीवर आहेत का ?म्हणजे हिंदी येत असेल अशी आपण अपेक्षा करु पण जर त्याला 'स्थानिक भाषा' येत नसेल तर परवाना मिळतो का ?

४. आजकाल कुणीही उठतो आणि टॅक्सी चालक बनतो, त्याला न धड स्थानिक भाषा येते ना त्या परिसराची माहिती असते. केवळ आपला मलिदा अबाधित रहावा म्हणुन वर्षानुवर्षे धाब्यावर बसवले गेलेले नियम किमान सुधारण्याच्या ( अंमलबजावणी बघु नंतर ) हा गोल्डन चान्स सरकारने अशी गडबड करुन घालवला का ?

५. आता राज ठाकरेने स्पष्ट सांगितल्याप्रमाणे 'अमराठी आणि बाहेरुन आयात केलेले परवानाधारक असलेल्या टॅक्स्या रस्त्यावर आल्या आणि जर तोडफोड" झाली तर जबाबदारी राज ठाकरेची का सरकारची ?
गुपचुप हे सर्व होऊ शकत असताना राजकीय लाभापाई सरकारने त्याचा इश्यु केला व आता राज त्याचा फायदा घेऊ पहात असताना दोष राज ठाकरेकडे कसा जाईल ?
दोषी हे चव्हाणसाहेबच धरले गेले पाहिजेत....

६. मुळात आधी गडबडीत ह्या निर्णयाची घोषणा करुन देशपातळीवर चर्चेच विषय बनलेल्या सरकारची आता अशी पल्टी ही देशपातळीवर महाराष्ट्राची इज्जत घालवते व त्याबद्दल ह्यांना दोष द्यायचाच नाही का ? किमान ह्या घटनाक्रमाबद्दल सरकार जाहीर दिलगिरी का व्यक्त करत नाही ?

७. अजुन एक म्हणजे जेव्हा एखादा निर्णय हा मंत्रीमंड्ळाच्या बैठकीत चर्चेला आणतात तेव्हा त्यावर आधी खातेनिहाय पुरेशी चर्चा झालेली असते, मग विधी आणि अर्थ खाते त्याच्या बाजु तपासुन पाहुन त्यावर अभिप्राय देत, मग फाईल येते संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे व तो ती बैठकीत पटलावर ठेवतो व इथे मंत्र्यांमध्ये चर्चा होऊन प्रस्ताव ( बहुदा एकमताने व गरज पडली तर मतदानाने ) पास होतो.मग एखाद्या मंत्रिमंडळाने आणि खात्याने पुर्णतः विचारांशी घेतलेला निर्णय फिरवण्याचा अधिकार एका मुख्यमंत्र्याला कितपत आहे ?
जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकावा ....

असो, झाले ते झाले.आम्ही तुर्तास मात्र महाराष्ट्राला लाज वाटेल असे वर्तन आणि अक्षम्य वेंधळेपणा ह्या सरकारने केला आहे असे म्हणु इच्छितो.
ह्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया बोलकी आहे. "घुमजावमुळे मुख्यमंत्री पदाचे आणि महाराष्ट्राचे अवमूल्यन झाले". सहमत आहोत आम्ही ...

Friday, November 20, 2009

स्टार माझा आणि वाचकांचे आभार ... जिंकलो रे !!!

आज सकाळी सकाळीच आमच्या एका अस्सल पुणेकर मित्राचा आमच्या मोबाईलवर फ़ोन आला, च्यायला म्हणलं आता सकाळ सकाळ शिव्या खाव्या लागणार.
पण अहो आश्चर्यम, त्याने २-३ माफ़क शिव्यातच आपला मायना आवरता घेऊन "तुला स्टार माझाच्या ब्लॊग माझा ह्या स्पर्धेत बक्षिस मिळाले आहे" अशी बातमी दिली.

ऒफ़िसमध्ये जाऊन ई-मेल्स चेक करुन बघितले असता स्टार माझाचे संपादक "श्री. प्रसन्न जोशी" ह्यांची अभिनंदन करणारी व निकाल घोषीत करणारी मेल दिसली.
खुप आनंद झाला मित्रानों.
खुप खुप आभारी आहे.

एवढा व्यापक आणि अवाढव्य आवाका असलेली स्पर्धा भरवुन ती यशस्वीपणे पेलल्याबद्दल स्टार माझाचेही अभिनंदन व आभार ...
अशा संस्थांकडुन मिळणा-या प्रोत्साहनामुळे आणि कौतुकामुळे लिहायला हुरुप येऊन नवे अजुन ब्लॊग्स ह्या मराठी ब्लॊगर्सच्या विश्वात दाखल होतील असा आमचा विश्वास आहे.
धन्यवाद स्टार माझा ...

ह्याबरोबर आम्ही आमच्या ह्या यशाचे श्रेय मिसळपाव.कॊम लाही देऊ इच्छितो.
कारण आमच्या भल्या-बु-या लेखनाची सुरवात, कौतुक, विकास हा इथेच घडला.
आजसुद्धा मिपाकरांनी आमचे भरपुर कौतुक केले. धन्यवाद मित्रांनो ...

नॊट दी लिस्ट, आमच्या ब्लॊगच्या तमाम वाचकांचे व हितचिंतकांचे आभार कारण तुमच्या कौतुकामुळे व पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही नवनविन विषयावर उत्साहात लिहीत असतो.
असाच लोभ राहुद्यात ...

स्पर्धेतल्या इतर विजेत्यांचेही मनापासुन अभिनंदन ...!!!
असेच लढा दोस्तांनो.

धन्यवाद ... !!!

- ( आभारी ) छोटा डॊन

Tuesday, November 17, 2009

स्ट्रेट ड्राईव्ह, हाराकिरी आणि ऒफ़साईड वगैरे वगैरे...

म्हणजे बघा सिच्युएशन प्रचंड कॉप्लेक्स आहे. भल्याभल्या समिक्षकांचा आणि ह्या क्षेत्रातल्या दादा माणसांचा ह्यात कस लागु शकतो.

" एक वेल सेट फलंदाज (उदा : सचिन तेंडुलकर ) कसलेल्या गोलंदाजीला समर्थपणे तोंड देत एखाद्या भिंतींसारखा खेळपट्टीवर उभा आहे. विरुद्ध बाजुच्या कर्णधाराचे आणि गोलंदाजचे सर्व डावपेच त्याच्या सरळ बॆटीमधुन आलेल्या ड्राईव्हच्या फ़टक्याबरोबर सीमीरेषेपार वाहुन जात आहेत. बघता बघाता त्याचे द्विशतक जवळ आले आहे, १९९ धावा बोर्डावर लागल्या आहेत. पटकन १ धाव काढुन द्विशतक पुर्ण करण्याची तडप त्याच्या चेहर्‍यावर सहाजिकच स्पष्टपणे दिसत आहे व ह्याच घोळात तो एक चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न करतो. अर्थातच ही धाव मुळीच चोरटी वगैरे नसते, तो असते विरुद्ध संघाच्या धुर्त कर्णधाराचा ( उदाहरणार्थ : हिंदी-इंग्लिश मिडीया ) एक कसलेला डाव. बॅटवर आलेला एक सरळ, साधा चेंडु कव्हरकडे हलकेच ढकलुन तो धव घेण्यासाठी पळायला प्रारंभ करतो. ठरल्याप्रमाणे गोलंदाज चेंडुला कव्हर देण्याच्या बहाण्याने फलंदाजाला आडवा जातो व त्याचा धक्का लागुन फलंदाज पडतो. तोवर तिकडे दक्ष असलेल्या क्षेत्ररक्षकाचा थ्रो बरोबर स्टंपकडे जाऊन यष्ट्या उद्धवस्त होतात. गोलंदाज व क्षेत्ररक्षक जोरदार अपिल करतात व नियमाप्रमाणे जरी फलंदाज बाद असला तरी नैतिकदॄष्ट्या हे चुकीचे आहे हे माहित असुनसुद्धा आपले कर्तव्य म्हणुन पंच ( इथे उदाहरणार्थ : बाळासाहेब ठाकरे ) त्याला बाद देतात. फलंदाज निराश होऊन तंबुत परततो व टीव्हीसमोर बसलेले स्वयंघोषीत समिक्षक ( उदाहरणार्थ : विविध पक्षांचे प्रवक्ते की ज्यांना कधीमधी अशा घटनांवर प्रतिक्रिया देऊन लाईमलाईटमध्ये रहावे लागते. असो, तो मुद्दा वेगळा ), सामान्य प्रेक्षक, क्रिडाप्रेमी विरुद्ध संघाचा डावपेच समजुन न घेता पंचाच्या नावाने मनोसोक्त खडे फोडुन रिकामे होतात ....."

सध्या असेच काही घडले आहे ना ?

आपल्या (अरे हो, आख्ख्या देशाच्या म्हणावे लागेन ना. आजकाल उगाच कशाला रिस्क घ्या बाबा) सचिनच्या कारकिर्दीला २० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने घडत असलेल्या समारंभात व मुलाखतीत एका (हलकट म्हणावे का?) पत्रकाराने मुद्दामुन खाजवुन खरुज काढण्याच्या उद्देशाने "मुंबई"विषयी प्रश्न विचारला. अर्थातच सचिन (आमच्या पवारकाकांसारखा) कसलेला राजकारणी नसल्याने त्याने निरागसपणे आणि प्रामाणिकपणे "I am extremely proud of being a Maharashtrian, but Mumbai is a part of India and I play for India" असे उत्तर दिले. तसे पाहिले तर टेक्निकली ह्या उत्तरात अजिबात काही चुक नाही, त्याचा अर्थही अगदी सरळ आहे.
पण आता कहानी मे ट्विस्ट इथे आहे, लगेच ह्या वाक्याला प्रमाण मानुन व त्याला हवे तसे वाकवुन देशभरातल्या मिडीयाने "सचिन म्हणतो, मुंबई सगळ्यांचीच. प्रदेशवादाला सचिनचे स्ट्रेटड्राईव्हद्वारे खणखणीत उत्तर" वगैरे कंड्या पिकवायला सुरवात केली. वास्तविक पहाता ज्याची काही आवश्यकता नव्हती त्या वादाला सुरवात इथे मिडियाकडुनच घडाली. मुळात ते वाक्य त्या उद्देशाने उच्चारले गेले नसतानाही त्याचा हवा तसा अणि स्वतःच्या सोईचा अर्थ काढुन उगाच रान पेटवणे हे मिडियाच्या कोणत्या तत्वात बसते ?
जवळपास ३ प्रहरे मिडियाने हा हैदोस घातल्यानंतर (राज ठाकरेच्या मराठी टक्क्याच्या जबरदस्त तडाख्याने आधीच घायाळ असलेली) शिवसेना आता ह्या वादात उतरली. दुसर्‍या दिवशी सकाळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधुन " सचिन, तू तुझी आंतरराष्ट्रीय खेळपट्टी सांभाळ! " ह्या शिर्षकाखाली सचिनला ( सो कॉल्ड ) ४ खडे बोल सुनावणारे शिवसेनाप्रमुखांचे (?) पत्र प्रसिद्ध झाले.
अपेक्षेप्रमाणे देशभरचा मिडिया अधिक पावसाळ्यातील छत्रीसारखे उगवणारे समिक्षक, प्रवक्ते वगैरे टिनपाट लोक लगेच ठाकर्‍यांवर आणि शिवसेनेवर तोंडसुख घेऊ लागले. इथे ठाकर्‍यांनी तर फक्त त्यांचे कर्तव्य केले होते हे मात्र सर्व सोईस्करपणे विसरले.

----------------------------------------------------------------

आता काही आमचे मुद्दे किंवा अस्ताव्यस्त विचार :

१. सचिनने ह्या प्रश्नातली खोच ओळखुन ह्याला तेवढेच पोलाईट किंवा कमीत कमी हवे तसे वाकवता न येणारे उत्तर दिले असते तर हा वाद वाढलाच नसता. अगदी सचिनने "'मी मराठी आहे आणि मुंबैकर आहे आणि मुंबै ही सर्वप्रथम मराठी माणसाचीच आहे!" असे प्रखर महाराष्ट्रवादाचे उत्तर देणे अपेक्षित नसले तरी कमीत कमी हा चेंड सोडुन द्यायला अथवा शांतपणे पोलाईटली तटवायला हवा होता.
सचिनला आम्ही देव मानतो व त्याच्या प्रत्येक गोष्टीवर अथवा कॄतेवर आम्ही डोळे झाकुन विश्वास ठेवतो की नाही?
होय ना, मग आमच्या देवानेच जरा जपुन वागायला नको का ?
देवाने देवासारखेच पोलाईट रहायला नको का ?
(ह्या बाबतीत आमच्या पवारकाकांचा हातखंड आहे, एकदा त्यांनी रिलायन्सबाबत वारंवार प्रश्न विचारुन त्रास देणार्‍या पत्रकाराला भर पत्रकार परिषदेतच "Are you agent of Relience ?" असे विचारुन त्याच्याच धोतराखाली फटाकड्याची माळ लावली होते. सचिनने असेच समकक्ष केले असते तर ते सर्वांच्याच सोईचे झाले असते. असो.)

२. बाळासाहेब ठाकरे ह्यांचे तसे पहायला गेले तर काय चुकले ?
एखाद्या फालतु माणसाने ( नीट वाचा, मी इथे कुठल्याही राजकारण्याचे नाव घेतले नाही. फक्त राजकारणीच फालतु असतात असा माझा अजिबात दावाही नाही.) हे करणे आणि सचिनसारख्या "आयकॉन"ने हे करणे ह्यात फरक आहे.सचिन जेव्हा एखादे वाक्य उच्चारतो तेव्हा ते त्याचे वैयक्तिक मत रहात नाही तर ती एखाद्या समाजाची समुहभावना म्हणुन ओळखली जाते.
मग अशा परिस्थीतीत जेव्हा शिवसेना की जी नेहमी मुंबई महाराष्ट्रात अणि मराठी माणसांचीच रहावी ह्यासाही झटली आहे किंव झटते आहे त्यांनी मैदानात उतरणे हे काय चुक आहे ? ते स्टेटमेंट देणारा कोणीही असो, मात्र त्यातल्या भावना जर मराठी माणसाला दुखावणार्‍या असतील तर त्यावर शिवसेनचा आसुड बरसणारच. ह्यात चुक आहे ते काय ? ह्याच स्वभावधर्माला किंवा कर्तव्याला जागुन बाळासाहेब मैदानात उतरले व त्यांची मुळातच सचिनवर माया असल्याने त्यांनी सचिनला आपलेपणाने त्या पत्रात बरेच काही समजावुन सांगितले की ज्यातले बरेच मुद्दे पटण्यासारखे आहेत.

३. त्यानंतर जो मिडिया आणि इतर चिल्लर नेतेमंडंळी शिवसेनाप्रमुखांवर ज्या पद्धतीने बरसली ते पाहुन मात्र आश्चर्य वाटले. "आयत्या बिळावर नागोबा" कशाला म्हणतात ते लक्षात आले. ना ह्यांना सचिनशी , ना बाळासाहेबांशी, ना मराठी माणसाच्या कल्याणाशी देणेघेणे, जर काही असेल तर ते मात्र मुंबईतुन मिळणार्‍या प्रचंड मलिद्याशी मात्र ह्यांना "देणे" नसले तरी "घेणे" नक्कीच आहे व सध्या सर्व अट्टाहास त्याचसाठी चालला आहे असे वाटतेय. पण तेवढ्यात २ बाईट्स देऊन उगाच मिडियावर झळकण्याच्या ह्यांच्या माकडचाळ्याचा मात्र आम्हाला प्रचंड वैताग आला.

४. हा वाद आता इथेच संपवणे उत्तम. उगाच विषयाला फाटे फुटत राहिले तर गरज नसताना उगाच तेढ निर्माण होईल. झाले तेवढे झुप झाले हे सर्वांनीच समजुन घेणे उत्तम.

ता.क. :यांच्यासाठी हा सर्व अट्टाहास केला गेला तो "मनसे" मात्र ह्या वादापासुन दुर राहण्याचा हुशारीपणा आणि परिपक्वपणा दाखवण्यात येशस्वी झाला आहे. ह्या समजुतदारपणासाठी मनसेचे अभिनंदन ...!!!

आता २ शब्द सचिनसाठी :
सचिन तु आमचा देव होतास आणि आहेस आणि चिरंतन राहशीलही. पण तुझे देवत्व आम्ही फक्त क्रिकेटच्या खेळपट्टीपुरतेच मानतो ह्यात मात्र गल्लत होऊ देऊ नकोस, समोरच्याचे डावपेच ओळखुन बॉल तटवायला लागला तरी हरकत नाही.
तु जर ह्या जागी फुटबॉल खेळत असता तर आम्ही त्वरित "ऑफसाईड" चा फ्लॅग दाखवला असता, कमीत कमी ह्या खेळात ह्या क्षणाला खेळ थांबुन पुर्वीची चाल बाद ठरुन पुन्हा पहिल्यापासुन चाली रचाव्या लागतात.
मात्र क्रिकेटचे आणि समाजकारणाचे ( किंवा राजकारणाचे ) असे नाही , इथे फलंदाजाने एकदा टोलावलेला चेंडु किंवा तुझ्यासारख्य एखाद्या आयकॉनने मुखातुन उच्चारलेले वाक्य ह्याला परतीचे वाट नसते....त्याचा परिणाम काहीही होऊ शकतो, चेंडु सीमापार जाऊन विजयध्वज फडकावु शकतो किंवा झेल जाऊन आख्खा सामनाच गमावण्याची पाळी येऊ शकते.

- तुझा एक चाहता
छोटा डॉन

Thursday, November 12, 2009

यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !

प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं. त्यांनी करदात्यांचे वैफल्य, सामान्य माणसाचे जिवन, राडेबाजी ह्या मुद्द्यांचा आधारे आपल्या राखीव कुरणात बेसलेस विधाने आणि आगापिछा नसलेले आरोप घेऊन बराच उतमात घालता.शेवटी आमच्या पराला "शोध विचारवंताचा " नामक मोहीम राबवावी लागली.
सूहासने एक दणदणीत अणि मुद्देसुद प्रतिसाद देऊन ह्या विचारवंतांच्या धोतरालाच हात घातला व अवलियाशेठनी त्यांच्या निषेधाद्वारे ह्यांच्य वर्मावरच घाव घातला.

त्याच पार्शभुमीवर आम्ही ४ ओळी खरडल्या आहेत, मुळ प्रेरणा हे "मंगेश पाडगावकरांची एक कविता" ...
जे आहे ते गोड मानुन घ्या ... ;)

********************************************************


यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

नव्या रक्ताचे सुशिक्षीत युवक
'नवनिर्माणासाठी' जमणार,
चर्चा, निदर्शन, आंदोलन, निषेध
करीत प्रवाहात उरतणार !

यांच सुख नसतच मुळी
कधी ह्यांच्यासाठी,
एकच गोष्ट यांची असते
कपाळावर आठी !

कधीसुद्धा यांचा संयम ढासळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

'मराठी अस्मिते'चे बोला तुम्ही
यांना नैतिक त्रास होतो.
'जय महाराष्ट्र' म्हणल्यावर यांना
देश तोडल्याचा भास होतो ?

यांचा धोशा सुरु असतो
'रस्त्यावर उतरणं वाईट,
त्यानं ट्राफिक ज्याम होतं !
आंदोलनं मुळीच करु नका,
त्याने सामान्यांचं जीणं हराम होतं !
क्रांत्या-बिंत्या सगळं झुट,
त्याने करदात्यांना वैफल्य येतं! '

संयमाचे पुतळेच हे
यांच रक्त चुकुनही सळसळत नाही !
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

सगळेच कसे ऑफिसातुन
लंबेचौडे तात्विक लेख लिहणार ?
किंवा हातामध्ये गीता घेऊन
'चिंता विश्वाची' करीत बसणार?

पांढरपेशी सुखवस्तु कोष झुगारुन कोणी
अन्यायाविरुद्ध उभारतचं ना ?
हातात फलक घेऊन जयघोषात
रस्त्यावर उतरतंच ना?

असं काही दिसलं की
यांच माथं भनकलचं,
यांच्या वैचारिकतेचं गळु
अवघड जागी ठणकलचं !

वांझोट्या शाब्दिक चर्चांचं यांच्या
वेगवाग घोडं असतं !
पण यांना समविचारी भेटतात कसे
हे एक कोडं असतं ?

या कठिण कोड्याचं उत्तम मात्र मिळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

कसल्याही राड्याला
हे सतत भीत असतात
एरंडेल प्यावं तसं
आयुष्य पीत असतात

एरंडेल प्याल्यावर
आणखी वेगळं काय होणार ?
एकच क्षेत्र ठरलेलं
दुसरीकडे कुठे जाणार ?

कारण आणि परिणाम
यांच नातं टळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

- (राडेबाज) छोटा डॉन