Thursday, February 28, 2008

बेंगलोर आख्यान ..... भाग १

आज बेंगलोरला येउन बरोबर ६ महिने पूर्ण झाले, खरचं केती लवकर निघून जातो ना काळ ? बिलकूल वाटले नाही की आपण येवढ्या सहजपणे ६ महिने पूर्ण करू म्हणून . वाटते आहे की आत्ताच कुठे आपण पुणे सोडून या दूरदेशी आलो आहोत. आजून त्या पुण्याच्या रम्य आठवणी मनात तशाच ओल्या आहेत. पण आता हळूहळू येथे स्थिरावर आहे. तसे आजच्या प्राकृत भाषेत सांगायचे म्हणल्यास मी आता 'अलमोस्ट सेटल ' झालो आहे. पण आता वाटत आहे की थोडे सिंहावलोकन करून पहावे गेल्या ६ महिन्याचे [ काय आहे , असे दमदार शब्द वापरल्याशिवाय लेख वजनदार होत नाही ] काही डोंबलाच सांगण्यासारखं घडलं नाही तरी "दिसामागे काहितरी (च) लिहावे " या आमच्या बाण्याला स्मरून हा लेख मी पुढे चलू ठेवतो ..........

तसे माझे 'बेंगलोरला' येणे अगदीच काही अनपेक्षीत असे काही नव्हते , कारण त्याच्या आधीच साधारणता २ महिने माझ्या मनात "पक्षांतराचा " विचार चालू होताच. तेव्हा मी काम करत असलेल्या पक्षात माझा 'दम घुट रहा था' . मला काही आंतरराष्टीय पातळीवर काम करण्याची संधी दिसेना आणि काही मोठे पद मिळण्याचे चान्सेस कमी होते [ आपले प्रमोशन हो ] कारण आमचा पक्ष [ म्हणजे कंपनी ] पडला फक्त राज्याच्या राजकारणातच समाधान मानणारा. मग त्यासाठी आम्ही ईतर मोठ्या व प्रस्थापित पार्ट्यांशी बोलणी चालू केली. पण हे सगळे आमच्या पक्षाच्या कार्यकारणीला अंधारात ठेउनच चालू होते. आमच्या पक्षांतर हेतूची कुणकुण आमच्या 'हाय कमांड' ला लागलीच आम्हाला 'मातोश्री' वर बोलावणे आले [ म्हणजे जनरल मॅनेजर च्या केबिनमध्ये ], त्यांनी अगदी प्रेमाने आमची चौकशी केली व आमच्यासाठी भविष्यात रचलेल्या योजनांची एक मस्त गोष्ट सांगितली. राजकारणात पैशापेक्षा, सत्तेपेक्षा जनमानसातील प्रतिमेला कसे महत्व आहे हे सांगण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला. आम्ही पण त्यांच्या हो मध्ये हो मिळवली। पक्षाच्या कार्यकारणीच्या एका बैठकीत आमच्या 'साहेबांनी' आमची खूप स्तूती केली. पक्षाच्या बांधणीत , घडणीत व अडचणीच्या काळात आम्ही कशा महत्वाच्या भूमिका बजावल्या याचा त्यांनी पाढा वाचला. आम्हाला "कडवा, कडवट यंत्रसैनीक " असे बहूमानही बहाल करण्यात आले. पक्षात आमची व्यवस्थीत घेतली काळजी जाईल अशी ग्वाही आम्हाला देण्यात आली. पण परिस्थीती सुधारण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. आमची पक्षा कुचंबणा, अपमान [ म्हणजे खराच नाही , पण लिहावे लागतं ] चालूच होती. थोडक्यात सगळ्या चर्चा , बैठका ह्या 'बोलाचीच कढी व बोलाचाच भात ' आहेत हे मला उमजले .....

तेवढ्यात आम्हाला एका जागतीक पातळीवर काम करणाऱ्या एका मोठ्या पक्षाची ऑफर आली। हा पक्ष "जगातील सगळ्यात मोठी ऑटोमोबाईल कंपनी " म्हणून ओळखली जाते. त्यांनी आम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणात संधी तसेच पक्षात महत्वाचे पद यासारख्या अनेक गोष्टी कबूल केल्या. अशा ह्या मान्यवर व जनतेमध्ये एक 'इमेज' असलेल्या जागतीक पक्षाच्या माध्यमा द्वारे जनतेची 'सेवा' करून चांगला 'मेवा' मिळवण्याचा संकल्प आम्ही सोडला . लवकरच आम्ही एका शूभमुहूर्तावर आमच्या सध्याच्या पक्षाच्या "सर्व पदांचा व सदस्यत्वाचा" राजीनामा देउन पक्षाला "जय महाराष्ट्र" ठोकला. त्यामुळे आम्हाला "उडाले ते कावळे, राहिले ते मावळे","गद्दाराला क्षमा नाही" अशे अनेक (????) बहूमान प्रदान करण्यात आले. पण आम्हाला जागतीक राजकारणाची स्वप्ने पडत असल्याने आम्ही त्याला भीक घातली नाही व बेंगलोरच्या दिशेने पहिले पाउल टाकले....
थोडे दिवस मस्तपैकी घरी आराम करून , मिळालेले "ऑफर लेटर" सगळीकडे मिरवून , तिथल्या स्थानिक दोस्तात नव्या कंपनीविषयी 'ढिगाने पुड्या "सोडून व शेवटी "आईवडीलांचे आशिर्वाद व श्री विठ्ठलाचे " दर्शन घेउन आमची स्वारी बेंगलोरच्या दिशेने कुच करण्यासाठी पुण्याच्या दिशेन रवाना झाली. पुण्यात आमच्या लिवलग मित्रांबरोबर २ दिवसाचे "जिवाचे पुणे" करून झाल्यावर सर्व मित्रांनी आमचे 'पार्सल' बेंगलोरला जाणाऱ्या गाडीत बसवून रवाना करून दिले .....


असा शेवटी 'रोजच्या भाकरी' साठी आम्ही आयुष्यात कधीही न पाहिलेल्या 'बेंगलोरच्या' दिशेने आमचा प्रवास सुरू झाला .......

2 comments:

सिनेमा पॅरेडेसो said...

khupach chan.

विनायक अनिवसे said...

इनोबा म्हणे...
मस्तच आहे.
’दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे’ हे आमचेही धोरण आहे.तेव्हा लिहायला सुरुवात करतो.