Friday, October 10, 2008

एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !


दिवस : रामाच्या रुपाने विश्वातल्या चांगल्या शक्तींनी रावणाच्या रुपातल्या वाईट, अमंगल शक्तींवर विजय मिळवुन आपल्या विजयी सेनेसह भारत भुमध्ये प्रवेश केला तो ... विजयादशमीचा ...
स्थळ : आर्यांचा देश .... जर्मनी !
अजुन विस्तारात सांगायचे म्हटले तर माझ्या आस्थापनाचे कार्यालय ...
वेळ : दुपारी १ वाजल्यानंतर संध्याकाळी ६ पर्यंत ....

आज सकाळपासुनच खुप उत्साहात आहे, आजचा दिवस दसर्‍याचा, सण हा "आनंदाचा, मांगल्याचा, आप्तजनांना शुभेच्छा व आपट्याची पानेरुपी सोने" देण्याचा। अतिशय उत्साहात सर्वांना शुभेच्छा देऊन झाल्या व रुटीन कामाला सुरवात झाली. हे सर्व करत असताना आठवण मात्र घरातल्या धामधुमीची, उत्साहाची व खास मराठमोळ्या डौलात साजर्‍या होणार्‍या दसर्‍याचीच होती।

आज दसरा म्हणजे विजयादशमी, अरे हा तर महत्वाचा दिवस, महाराष्ट्राच्या सन्मानाच्या शिरपेचात मोत्याचा तुरा व महाराष्ट्राच्या समाजकारणातील व राजकारणातील अजुन एक महत्वाची घटना दरवर्षी ह्याच मुहुर्ताला घडते ना? मग आज काही हालचाल आहे का नाही ? तसाच आहे का आजपण सळसळता उत्साह, डौल, सारंजाम व मराठी अभिमानाची शान ? चला, जरा पेपर चाळुयात, पाहु या काही आलयं का त्यात ? का गेल्या काही वर्षांसारखी कुठली तरी नैसर्गीक अथवा मानवी आपत्ती येऊन ही परंपरा खंडीत तर झाली नाही ?

हुश्श ! होणार आहे ह्या वर्षी, पुर्वीपेक्षा मोठ्ठ्या प्रमाणात, जरा जास्तच उत्साहात, डौलात व मुर्तीमंत मराठी टेचात हा सोहळा होणार आहे ...

पेपरात तर भरभरुन येत नाही, आपण कसे वाचले नाही ?

जाऊ दे, आता कुठे पहायला मिळते का ते पाहु , दाखवतील ना कुठेतरी ह्या प्रचंड आंतरजाल विश्वात ...कित्येक प्रसंग आपण लाईव्ह पाहिले आहे, हा जर पहायला मिळाला तर "आजी सोनीयाचा दिन असे अमॄताचा क्षण " हे अनुभवायला मिळेल ...

चायला, २ वाजले की म्हणाजे भारतात चक्क संध्याकाळचे ५,३० !!! छे, सोहळा सुरु झाला असेल, कुठे पहायला मिळेल ? जीवाची नुसती तगमग होत आहे, माहिती नसले तर ठीक होते आता संयम राखणे कठीण आहे।कुठुन तरी लिंक मिळवायला हवीच त्या टेलीकास्टची ....

च्यायला ह्या भैय्या चॅनेल्सचे काहीतरी वेगळेच चालले आहे, सारखी त्या मनमोहन आणि सोनीयाच्या दिल्लीच्या प्रगतीमैदानातल्या "रामलीलेचे क्षणचित्रे" अथवा अन्य काही फुटकळ। च्यायला अजुन एक पोरगं खड्ड्यात पडलं का? झालं आता हे लोक हीच बातमी दाखवणार, मरु दे तिच्यायला, दुसरीकडे पाहु ...

हुश्श्श !!! हुर्रे ....सापडली ,स्टार माझा लिंक मिळाली, ह्यावर आहे लाईव्ह टेलीकास्ट ...
शेवटी स्टार माझा त्याच्या किर्तीला जागला म्हणायचा ....

आयचा घो, साक्षात तोच सोहळा सुरु आहे, आता मरु दे काम , हेच पहात रहावे ....

"एकच दिवस, एकच मैदान, एकच वक्ता, गेले ४३
वर्षेशिवसेनेचा दसरा मेळावा, स्थळ : शिवाजी पार्क ;मुंबई, वक्ता : बाळासाहेब ठाकरे "

अर्रे बापरे, काय गर्दी जमली आहे, किती लोक आले आहेत साहेबांना ऐकायला व त्यांचे विचार ऐकायला, च्यायला कसली ही प्रेरणा व केवढे हे प्रेम ...गर्दीवर नजर ठरत नाही, अक्षरशः लाखांच्या संख्येने लोक येतात भौ , जबरदस्त ...अख्खे मैदान भगव्या रंगात न्हाऊन निघाले आहे, अवघा हिंदुत्वाचा जागर म्हणता येईल ....


काय पाहतो आहे मी, साक्षात "उद्धव ठाकरे" अक्षरशः प्रचंड जनसमुदायाला संबोधीत करत आहेत, थोडा लेटाच झाला साईट उघडायला, आधी कोण कोण बोलले, काय काय बोलले, कुणाला फाडले, काही कळायला मार्ग नाही, असो हे पहात रहावे ....
व्वा, भारी बोलत आहे की उद्धव, ह्याला लोक " संयमी व्यक्ती" म्हणुन बदनाम का करतात ? शोभतो खरा हा "सिंहाचा छावा" , चढ बाप्पु, जबरदस्त ...फारच वाईट मारतो आहे सगळ्यांची, सगळ्या मुद्द्यांचा परामर्ष घेत आहे. वा काय बोलतो आहे "मुंबई आमच्या बापाचीच, मुंबईत येऊन मुंबई कुणाची असे विचारण्याची हिंमत कशी होते कुणाची ?". जबरदस्त, भारी ठोकला, असेच बोलायला पाहिजे, माजलेत हे उपरे. त्याचावर होणार्‍या कमजोरपणाच्या टीकेबद्दल काय बोलतो हा ? दिले ह्याने उत्तर, म्हणे " हिंदुहॄदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी मांजराची पिल्ले नव्हे वाघाचे बछडे जन्माला घातले आहेत. शिवसेनाप्रमुखांची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत, इतर कुणी काळजी करु नये "ये हुई ना बात, जबरदस्त उत्तर दिले. ह्या लोकांच्या भुमीका व त्यामगेचे राजकीय डावपेच गेले चुलीत, दमदार बोलतो आहे नक्की, बाकीच्याशी आपल्याला काय देणेघेणे ?

अरे सगळे हाच बोलतो आहे, "साहेब" येणार आहेत की नाही ? कुठे तशी घोषणाही होताना दिसत नाही ? नक्की काय होणार ?


बेश्ट, उद्धवने भाषण आवरते घेतले व " शिवसेनाप्रमुखांचे शिवतिर्थावर आगमन" ही घोषणा झाली ...
हुर्रे, साहेब आले। लोकांना आशांना त्यांनी ठेच पोहचु दिली नाही ....कुठे आहेत साहेब ? कुठे आहेत ? आता कसे दिसतात ? वय खुप वाढले आहे ? नुसतेच येणार की भाषण पण करणार ?

आले ... आले रे ... साहेब आले रे !!!
"साहेबांना" लिफ्टमधुन स्टेजवर आणण्यात येत आहे, अरेरे बघता बघता वार्धक्याने ह्या सिंहालासुद्धा सोडले नाही। चेहर्‍यावर वय स्पष्ट दिसत आहे ...अनेक संकटे स्वतःच्या निधड्या छातीवर झेलणारे बाळासाहेब आज शिवसैनिकांच्या आधारने पाऊले टाकत आहेत ...आले, स्टेजवर आले ते, आल्याआल्या " मॉंसाहेब, प्रबोधनकार व बिंदुमाधव" च्या प्रतिमांना हार घातला। चांगले आहे, आपल्याला साथ देणार्‍यांचे विस्मरण कधीही न होऊ देणे हे कधीही स्तुतीपरच ...शेवटी समोर आले ते, स्टेजच्या मध्यभागी आले, खरच थकले आहेत आता, त्यांना आधार देऊन खुर्चीवर बसवले व भोवती कोंडाळे आहे ....

सर्व जमाव शांत !!! एकदम चिडीचुप शांतता ...

बाळासाहेब स्वतःच्या ताकतीवर उठले, बाकीच्यांना बाजुला सारुन समोर जमलेल्या विशाल, अगणित जनसमुदायाला नमस्कार केला व खास त्यांच्या स्टाईलीत अभिवादन केले ....




आयला, अंगावर काटा आला हे पाहुन, शेर जरी म्हातारा झाला तरी अजुन आपली चाल नाही विसरला, अजुन तोच कणखरपणा ....

जिओ बाळासाहेब, जिओ ....
जनसमुदायला काय करावे कळेना, प्रचंड जयघोष सुरु " बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद , शिवसेना झिंदाबाद " !!!
उद्धव, मनोहर जोशी आणि इतर गलबलुन गेलेले दिसत आहेत। खुप सोसले साहेबांनी व अजुनही हिंमत नाही हरलेत ...

त्यांना खुर्चीवर बसवुन त्यांच्यापुढे माईक ठेवण्यात आला, साहेबांनी सुरवात केली ....
" इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो .... "

जिंकले !!!! अगदी शब्दश : जिंकले .....
पुढचे सांगण्यात अर्थ नाही, माझी शब्दसंपदा दुबळी पडत चालली आहे, फक्त डोळेभरुन पाहुन घेतले आणि धन्य झालो ....
तसेही सगळे सविस्तर पेपरमध्ये आलेच आहे ...
मला मात्र दसर्‍याची उत्तम भेट मिळाली .... धन्य झालो !!!

डिस्लेमर : हे लिखाण कुठल्याही राजकीय पक्षाचा अथवा नेत्याचा "उदोउदो" करण्यासाठी लिहलेले नाही. मी पाहिलेल्या एका अभुतपुर्व घटनेचे माझ्या अतिक्षुद्र लेखणीतुन हे वर्णन. कसलाही "पक्षसापेक्षत्वाचा आरोप" आम्ही आत्ताच फेटाळतो ...

अवांतर : मी दिलेले "लेखाचे शिर्षक" मला अजुन परफेक्ट वाटत नाही. जोग्य व समर्पक शिर्षक सुचविल्यास आपला मी आभारी राहिन. धन्यवाद !!!

No comments: