Thursday, January 15, 2009

तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे काय ? ... भाग - १

मित्रांनो, आपण नेहमीच आंतरजालावर अनेक प्रकारचे लिखाण पाहतो. सध्या ब्लॉगविश्वाला ग्लॅमर आल्याने व त्याची मार्केटमध्ये चांगलीच बुम असल्याने दररोज अक्षरशः ढीगाने नवे ब्लॉग तयार होत आहेत.स्वाभावीकच ह्या असंख्य ब्लॉग्सवर रोज नवे लिखाण येत असते.

आपण बर्‍याच वेळा शक्य तितके वाचुन काढतो, बरेच काही आपल्याला आवडुन जाते व त्याला "प्रतिसाद" द्यावा अशी इच्छाही होते. बरं, ह्या प्रतिसादाचा उपयोग पुढेमागे आपली स्वतःची "ओळख" तयार करायला सुद्धा होऊ शकतो ही यातली गोम लक्षात घेतलीत तर तुम्हाला "प्रतिसाद" देण्यामागचे राजकारण समजेल. जरा नजर टाकुन बघा ना काही प्रसिद्ध ब्लॉग्सवर, कसे ढिगाने लोक लिहतात व त्यांना प्रतिसाद सुद्धा येतात, ह्या नेहमीच लिहणार्‍या व ते वाचुन नेहमीच प्रतिसाद देणार्‍या लोकांचा एक मस्त गॄप म्हणजे आजच्या प्रचलीत भाषेत "कंपु" तयार होतो, एकदा का तुम्ही ह्या "कंपुत" शिरलात की मग मग बर्‍याच गोष्टी साध्य होतात ( असो. कंपुबाजीविषयी नंतर केव्हातरी ).

तर कळीचा मुद्दा असा आहे "समोरच्याच्या लक्षात राहिल असा प्रतिसाद कसा द्यावा ? किंवा तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे का ?"
घ्या तर आमचे काही सल्ले ...!
तसे पहायला गेले तर आमचे आंतरजालीय मित्र "टारझन" ह्यांनी मराठी आंतरजालविश्वावरील एक अग्रणी संस्थळ असणार्‍या "मिसळपाव.कॉम" वर एक फर्मास लेख टाकला आहे ह्याविषयावर, तो आपल्याला "इथे" पाहता येईल ...

ह्याला जोडुनच आमचे पदरचे २ पैसे ...!
.....(मी टिप्स देऊ शकतो ह्याचाच अर्थ मी आंतरजालीय संस्थळावरचा यशस्वी प्रतिसादकर्ता आहे हे सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल, ज्यांना हे मान्य नाही ते हे विधान त्यांना झालेल्या "जळजळीतुन" आले आहे हे आम्ही इथे स्पष्टपणे नमुद करु इच्छितो. )

१. काथ्याकुट :
काथ्याकुट म्हणजे काय तर लष्कराच्या भाकर्‍या भाजणे. कधीतरी आपली माऊली वैतागुन म्हणते बघा " झाले तुकडे मोडुन, आता निघालं कार्ट लष्कराच्या भाकर्‍या भाजायला" , बस हेच ते.
फक्त फरक असा पडतो इथे की लोकं इथे कंपन्यात मस्त एसीची हवा खात, कंपनीतुन हायस्पीड नेट वापरुन, कंपनीच्या काम करण्याचा वेळात कामाला फाट्यावर मारुन "मेगाबाईट्स च्या मेगाबाईट्स " वाद घालत असतात ...
बरं, त्याला खास विषयांचे बंधनही नाही, अगदी अमेरिकेच्या आर्थीक धोरणापासुन ते सोमालियाच्या यादवीपर्यंत , ब्रिटनी स्पियर्सच्या मराठी बॉयफ्रेंडपासुन ते पुण्यात गणपतीला घातलेल्या स्वेटरापर्यंत ... अगदी कशावरही तुम्ही वाद घालु शकत असाल तर तुमचे ह्या प्रकारात स्वागत आहे.
आजकाल ह्या विभागाला फार चलती आहे, सगळ्यात जास्त प्रतिसाद खेचणार्‍या विभागामधला हा एक विभाग, ह्या साहित्यला प्रतिसाद न देण्याची घोडचुक करणे म्हणजे "दैव आलेय द्यायला आणि कर्म नाही घ्यायला" असा प्रकार आहे. तेव्हा ह्याला जरुर प्रतिसाद द्यावा.
ह्याचे २ प्रकार पडतात,
पहिला प्रकार म्हणजे उगाच १-२ ओळीत काहीतरी खरडुन मग कोंबड्या झुंझवण्याची मजा पहात बसणारा प्रकार. मग विषय काहीही असला तरी तो मात्र ज्वलंत, धगधगता, व्यवस्थीत चिरफाड करता येईल असे असला म्हणजे आपले काम सोपे होते.
आपण पहिल्या ५-६ प्रतिसादांची वाट पहायची, आपोआपच त्यात आरामात २ विरोधी सुर नक्की निघतात, मग १०-२०-३० / छापा-काटा करुन आपण कोणत्या बाजुला आहेत हे ठरवावे, एकदा का हा निर्णय झाला मग कसली भिती नाही. मात्र बाजु निवडताना आप्ले विरोधक जास्त असतील ही काळजी घ्यायला हवी.
सुरवात करतानाच एखाद्या आधीच पडलेल्या आपल्या विरोधी प्रतिसादातले एखादे वाक्य निवडुन त्याला लगेच "स्पष्ट असहमत, हे वास्तवीक असे पाहिजे " ह्या अर्थाचा प्रतिसाद द्यावा.
उदा : जर चर्चा "निवासी /अनिवासी " असेल तर तत्काळ "आम्हाला आमचा देश प्यारा, भाकरीसाठी परकीयांपुढे शेपटी हलवणे आम्हाला मान्य नाही" ह्या अर्थाचे वाक्य ठोकुन द्यावे, मात्र हे करत असताना आपण हा प्रतिसाद "अमेरिका, युरोप, युके" इथे ऑफीसात बसुन लिहीत नाही ना ह्याची मात्र खात्री करुन घ्यावी, उगाच ४ लोकात शोभा होते ना. एकदा का हे जमले की आपोआपच "विरोधी प्रतिसादांचे आग्यामोहळ" अंगावर धावुन येते, तुम्ही जास्त काही करु नका, ओच तोच मुद्दा वेगवेगळ्या शब्दात मांडत रहा, म्हणजे असे की " आम्ही भारतातच राहुन मीठ भाकरी खाऊ, तुमचा पिझ्झा / पाश्ता तुम्हाला लखलाभ होवो किंवा म्हातार्‍या आईवडीलांची काळजी घेणे हे मला हिरव्या नोटांपेक्षा जास्त महत्वाचे वाटते किंवा तुमच्या प्रासादापेक्षा माझी झोपडीच मला प्रिय वगैरे वगैरे " असे प्रतिसाद टाकावेत. लोक अजुन खवळुन उठुन पानपानभर प्रतिसाद खरडतात, मग हळुच कुणाच्यातरी "ग्रीनकार्डावर टिका " करणारे पिल्लु सोडु द्यावे, चर्चा अजुन भडकते व लोक पुढे तुम्ही अजुन काय खरडतात / दिवे लावताय ह्याची वाट पाहतात ...
खुप कंटाळा आला की मग शेवटी " छ्या, काहीपण म्हणा पण आपल्या देशातच चिंग होऊस्तोवर बिअर पिऊन मग गाड्यावरची भुर्जी खाण्याची मजा काही औरच.... " असा प्रतिसाद टाकुन द्यावा, अजुन ज्वाळा भडकतात ...लोक जर वैतागुन वैयक्तीक खरडी / व्यनी टाकु लागले तर शेवटी " माझ्याकडुन मी थांबतो, ह्यापुढे कसल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही " असा समारोप करावा. पण ह्या समारोपातच " जय हिंद, जय महाराष्ट्र " सारखी घोषणा टाकुन आपले देशप्रेम पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी दवडु नये.
हा हा म्हणता तुम्ही "वाद विवादातले प्रसिद्ध प्रतिसादकर्ते" होऊन जाल ...

आता दुसरा प्रकार म्हणजे "नमनालाच २ पाने भरतील एवढे लिखाण टाकुन काथ्याकुट", ह्यात जरा मुद्दे स्पष्ट असल्याने आपल्याला वाव कमी मिळतो पण यासाठी हार मानायची गरज नाही. शक्यतो लेख पुर्ण वाचु नये, वाचुन त्यातले जास्त काही कळेल असेही नाही. फक्त गाठीला असावेत म्हणुन २-४ मुद्दे नजरेखालुन घालुन ठेवावेत.
जर चर्चा "राजकारण" ह्यावर असेल तर त्वरेने "छ्या, राजकारण म्हणजे गटार" असे जाहीर करुन मोकळे व्हावे. मग सर्वात प्रथम ( जीव तोडुन २ पानं लेख खरडलेला ) लेखक भडकतो व मग बाकीचे, त्यांना व्यवस्थीत अंगावर येऊ द्यावे, मग पुन्हा एकदा "राजकारण्यांची औकाद, पक्षाचा इतिहास, नेतृत्व " ह्याविषयी एखादे आक्षेपार्ह्य वाक्य सोडुन द्यावे. म्हणजे " राहुल गांधीची अजुन पात्रता नाही / काँग्रेसमध्ये घराणेशाही सोडुन अजुन काय आहे दुसरे / बीजेपीने हिंदुत्व मुद्दा सोडुन द्यावा / राज ठाकरेने परतुनी घरट्याकडे जावे " असा सुर काढावा म्हणजे ह्याचा बाजुचे व विरोधकांचे पुन्हा ह्यावर जुंपते. तुम्ही मात्र शांत रहा, जमल्यास गुगलुन काही मिळाल्यास अजुन काही "जळजळीत सापडल्यास " ते "चु.भु.द्या.घ्या." ह्या टीपेसकट टाकुन द्यावे. चर्चा रंगत जाते ...

लोकांना जरी चर्चा लक्षात राहिली नाही तरी "उलटसुलट / भडखाऊ / आक्रस्ताळी " विधाने करणारे तुम्ही जरुर लक्षात राहता व हा हा म्हणता तुमचा "वितंडवादी भांडखोर प्रतिसादकर्ता " म्हणुन लौकीक वाढु लागतो.
*
*****
*
२. काव्यविभाग :
ह्यात प्रतिसाद देण्याआधी २ शक्यता विचारात घ्याव्यात.

पहिली म्हणजे तुम्हाला काव्य कळते का ?
ह्याचे उत्तर होय असल्यास कधीही पहिला प्रतिसाद "कविता आवडली" असा चुकुनही टाकु नये, मग तुमच्या काव्य समजण्याचा काय घंटा उपयोग ? त्याऐवजी चुका शोधण्याचा प्रयत्न करीत रहा, म्हणजे उदा. तुम्ही " आशय उत्तम आहे पण वॄत्तात / मात्रेत मार खाल्लात, शेवटच्या २ कडव्यात जरासा तोल ढासळला , चांगला प्रयत्न आहे पुढील प्रयत्नास शुभेच्छा, थोडीशी भडक वाटते आहे, यमक जुळवण्याचा नादात कवितेचा गाभा ढासळला , जर अलाण्या फलाण्याच्या जागी फलाणे फलाणे टाकले तर जमुन जाईल , आशय व्यवस्थीत समजला नाही, फारच विस्कळीत वाटली " ह्यापैकी एखादी प्रतिक्रीया पुन्हा एकदा १०-२०-३० करुन टाकुन द्यावी. मात्र नक्की काय करायला हवे हे "गुलदस्त्यात" राहु द्यावे, स्पष्टपणे सल्ला मुळीच देऊ नये.
तुम्ही फारच पट्टीचे असाल तर मात्र त्याच धाग्यात उत्तर देताना लगेच " प्रति कविता " रचुन दाखवावी व वरुन "हे जमते का पहा " असे ठेऊन द्यावे. मग मात्र "प्रतिभेला सलाम, तोडलतं, खल्लास " असे प्रतिसाद मुळ कवितेला यायच्या ऐवकी तुम्हालाच येतात व हा हा म्हणता तुम्ही "काव्य ह्या प्रांतातले दादा/अधिकारी " म्हणुन ओळखले जाऊ शकता.असो.

आता दुसरा प्रकार म्हणजे तुम्हाला काव्यातले काहीही कळत नाही, तुम्ही चक्क माठ आहात तर काय करावे. सर्वात प्रथम जी येईल त्या कवितेला वर टारझन म्हणतो तसे प्रतिसाद देत सुटावे पण ह्यात एक गोम आहे, इथे प्रत्येक प्रतिसादात " आम्हाला काव्यतले काहीही कळत नाही जे जगजाहीर आहे / आयला, आम्हाला कविता करायला फतरे जमत नाही / ज्या दिवशी कविता करत येईल त्यादिवशी मारुतीला २१ नारळं वाढवीन " हे पालुपद जोडुन द्यावे. मात्र तुम्हाला काव्यातले कळत नसुन तुम्ही असे प्रतिसाद कसे देता असा प्रश्नाल्यास सोईस्कर मौन पाळावे.
मधुन आधुन "कवितेल दुरुस्त्या" सुचवाव्यात, म्हणजे जसे की "ढळले च्या जागी कोसळले किंवा कळले कसे होईल ? / धावती गाढवे च्या जागी ...... जाऊ द्या, बोलण्यासारखे नाही ते " असे विचारत रहावे. तुमचे चुक आहे तुम्हालाही माहित असते पण कवी / कवयत्री मात्र जाम खुष होऊन स्पष्टीकरण वगैरे देतात व तुम्हाला भाव मिळतो, लगेच त्यांचे आभार मानुन मोकळे व्हावे. तुम्हाला काय व किती कळले ही बाब आधीही महत्वाची नव्हती व आताही नाही, आपले अस्तित्व जाणवुन दिल्याशी मतलब.
जर तुम्ही पुढच्या यत्तेतले असाल तर "खरडवह्यातुन" ह्या कवितेबाबत कवीशी "चर्चा" सुद्धा करु शकता, मात्र त्यासाठी थोडी हिंमत व थोडा अर्धवटपणाचा आव मात्र आणावा लागेल. ह्यातुन तुम्ही त्या कवी / कवियत्रीच्या "बडी लिस्ट / गुड लिस्ट " मध्ये सुद्धा शिरकाव करु शकता ...

तर कविता कळो अथवा न कळो प्रतिसाद हा दिलाच पाहिजे ...
असो.

( विस्ताराच्या भयाने इथेच थांबतो. बाकीचे पुढ्च्या भागात ...! )

क्रमश :

2 comments:

विनायक said...

mitraa ha lekh mipavar tak na
jaast maja yeil
aamhehee prayatn karatoy yaa kamput yayaca

Anonymous said...

फर्मास लेख. पुढील भागाची वाट पाहतोय.
आणि कंपूबाजी विषयी लेख वाचायला
नक्कीच आवडेल.