Monday, June 22, 2009

पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ....

.
आमचा एक अनोखा छंद आहे, गर्दीतला गडबडीत आणि धांदलीत स्वतःच्या विश्वात मग्न असणारा सामान्य माणुस न्याहाळण्याचा. आता ह्यात आम्ही स्त्री, पुरुष, लहान, थोर, गरिब , श्रीमंत असा कुठलाही भेदभाव करीत नाही. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकवेळा गर्दीच्या ठिकाणी जावे लागते, थोडे थांबावे लागते, थोडा काळ व्यतीत करावा लागतो आणि मग इथे आम्ही आमचा छंद पुरवुन घेतो. अर्थात हे करत असताना समोरच्याला त्रास अजिबात त्रास होणार नाही अथवा अवघडल्यासारखे वाटणार नाही ह्याची पुर्ण काळजी आम्ही घेत असतो, हो ना, नाहितर "कसा टक लाऊन पाहतो आहे बघ मेला, घरात आई-बहिणी नाहीत वाटतं, मुडदा बशिवला ह्याचा ...." वगैरे मुक्ताफळे ऐकण्याची हौसही नाही व सोसही नाही.


गेल्या काही दिवसापुर्वी इकडे भयानक पाऊस झाला व तो ही विकांताला, त्यामुळे नेहमीचे व्यस्त कार्यक्रम सोडुन झक मारत घरातच बसावे लागले ( व रुममेट्सचे टोमणे ऐकुन न ऐकल्यासारखे करावे लागले ) . नेमका हाच मुहुर्त साधुन आमच्या कुक-बुवानेही मस्तपैकी टांग दिली , ऐनवेळी असा घोळ घालण्याच्या बाबतीत त्याने अगदी धोनीच्या हातावर हात मारला आहे . संध्याकाळच्या जेवणाचा काहीच सर्वमान्य तोडगा निघण्याची चिन्हे न दिसल्याने मी ( मनमोहनसिंग साहेबांसारखा ) सर्वसंमती होऊ शकणारा "पिझ्झा ऑर्डर करु" हा उपाय सुचवला, सहाजिकच पुढची सर्व कार्यवाही करण्याही जबाबदारी माझ्यावर आली. "३० मिनीटात पिझ्झा घरपोच" ह्या सुविधेला आम्ही फोन केला, त्यावरच्या सुंदर व मोहक ( आवाजाच्या ) कन्येने आमची सर्व माहिती व्यवस्थित विचारुन घेतली व शेवटी पडलेल्या आवाजात "पावसामुळे आम्ही होम डिलीव्हरी करणे तात्पुरते स्थगित केले आहे" असे अत्यंत दु:खद आवाजात आम्हाला सांगितले व रुममधले टोळभैरव पुढच्या कार्यक्रमाचा अंदाज आल्याने खदाखदा हसले . शेवटी त्या कन्येने अजुनच दिलगिरीच्या सुरात त्यांच्या अडचणींचा पाढा वाचायला सुरवात केल्याने आता ही स्वतःच आपल्या रुमवर येऊन पटकन राईस्-रस्सम बनवुन देते की काय ह्या शंकेने घाबरेघुबरे होऊन आम्ही स्वतःच तिथे जाऊन ऑर्डर आणायचे ठरवले.

आता बाबासाहेब पुरंदर्‍यांच्याच भाषेत सांगायचे तर अर्जुनाच्या धनुष्यातुन सुटणार्‍या तीरांचा कहारीपणा घेऊन पाऊस संततधार कोसळत होता, रणदुंदभींच्या कल्लोळासारखाच पावसाचा व रस्त्यावर धावणार्‍या गाड्यांचा आवाज अवघे आसमंत भरुन टाकत होता, पोतराजाच्या कडाडणार्य आसुडासारखी वीज कडाडत होती आणि विद्युल्लतेच्या चपळाईने लख्खकन चमकत होती, नुकतीच जुलमी मोगलाईची टोळधाड येऊन गेल्यासारखे रस्ते शांत आणि निर्मनुष्य दिसत होते, सह्याद्रीच्या बेलाग कड्यावरुन बेदुंधपणे कोसणणार्‍या पाण्याच्या अवखळ लोटासारखे रस्त्यावरुन पावसाचे पाणी आपली वाट काढत मुक्तपणे वहात होते, (लाईट गेल्याने ) किर्र अंधार होता. अशातच २ निघड्या छातीचे वीर ( पक्षी : मी आणि माझा मित्र ) अंगावर कांबळे ( पक्षी : रेन जॅकेट्स ) पांघरुन हळुवारपणे पावले उचलत ( चिखल उडु नये म्हणुन ) गुपचुपणे गड ( पक्षी : आमची रहाती इमारत ) उतरले, त्यांनी इकडेतिकडे बघुन अंदाज घेत घोड्यावर ( पक्षी : दुचाकीवर ) मांड ठोकली व औरंगजेबाच्या तंबुवर चमकणारा सोन्याचा कळस कापुन काढायला धावणार्‍या संताजी/धनाजींच्या अधिरतेने त्यांनी "पिझ्झा हट" ह्या गडाकडे सुसाटपणे धाव घेतली.
( हा हा हा, लै भारी वाटते असे लिहायला, आता बास झाले पण )

पोहचल्यावर आत गेलो तो ही ऽऽऽऽ गर्दी , पुण्याची शनिवार्-रविवारची चुल न पेटवण्याची परंपरा ह्यांनीही बरोबर उचलली आहे, त्यामुळे तिथे "अवघा हिंदु एकवटला ... च्च च्च .. अवघे जन एकवटले" असे झाले होते ( च्यामारी, सामना पेपर वाचणे जरा कमी केले पाहिजे ). थम्ब रुलप्रमाणे आमची जी ऑर्डर फोनवरुन घेतली गेली होती ती मध्येच पावसात विरघळुन गेल्याने इथपर्यंत पोहचली नव्हती, पिझ्झा हटवाल्यांनी अनेक मधुर शब्दांची पेरणी करत झालेली चुक मान्य करत लांबड लावायला सुरवात केली व वाट पहायची विनंती करायला सुरवात केली (बुद्धुच आहेत लेकाचे, असल्या पडत्या पावसात हातचे सोडुन पळत्याच्या पाठीमागे बाहेर निघुन जायला आम्ही काय तेलगु देसमचे नेते वाटलो की त्यांना ? ) . शेवटी त्यांचे तुपात घोळवुन बडबड एवढी वाढली की आम्ही त्यांना समाजवाद्यांच्या आवेशात " भुकेल्यांना ४ प्रेमाच्या शब्दांपेक्षा पटकन मिळालेल्या भाकरीच्या तुकड्याचे (पक्षी: पिझ्झा पीसेसचे) महत्व आणि कौतुक जास्त असते" असे सडेतोड बोल सुनावणार होतो ( पण हे आंतरजाल नव्हे असे लक्षात आल्याने ) व त्यांनी फुक्कटची पेप्सी ऑफर केल्याने आम्ही ( लाच घेतलेल्या कस्टम अधिकार्‍यासारखे ) हसत " हॅ हॅ हॅ, होते असे कधीकधी, त्यात काय एवढे, आम्ही वाट पाहु " म्हणत तिथेच वाट पहाणे पसंत केले ...

पुन्हा त्यांनी नमनालाच घडाभर तेल घालुन आमची "ऑर्डर घेतली" व आम्हाला एक कोपर्‍यात असणारा एक मस्तपैकी कोच दाखवला व तिथे बसुन वाट पहाण्याची विनंती केली. ( तिथे असलेल्या सुंदर कन्या पाहुन ) आमचा मित्र आमच्या आधीच तिथे पोहचला ( आणि सगळीकडचाच "चांगला व्ह्युव्ह मिळेल" अशी ) जागा पाहुन त्याने तिथे ठाण मांडले. आम्ही आपले मुंबईतल्या लोकलच्या चौथ्या सीटवर बसणार्‍या मनुक्षाचा अवघडलेलापणा घेऊन उरलेल्या जागेत बसुन घेतले.समोर पाहिले तर अनेक लोक दिसत होते ( हो हो, अनेक सुंदर कन्याही दिसत होत्या (कॄपया फोटोंचा आग्रह करु नये, अपमान होईल ) पण तो महत्वाचा मुद्दा नाही ) , आमच्या "व्यक्तिनिरीक्षणाची" हौस भागवण्याची सुयोग्य जागा ह्याहुन दुसरी सापडली नसती. आम्ही आपले स्वतःवरच " यही है राईट प्लेस ( राईस प्लेट नव्हे ) बेबी, आहा ..." म्हणत खुष झालो. मित्राची काळजी करण्याची गरजच नव्हती, "अशा ठिकाणी" कसा टाईमपास करावा हे त्याला सांगणे म्हणजे साबा करिमने गांगुलीला ऑफसाईडला गॅप कसा काढावा हे शिकवण्यासारखे आहे.
तो त्याच्या "उद्योगाला" लागला व आम्ही शांतपणे समोरचे निरीक्षण करु लागलो ....

* क्रमश : *
( आजकाल वय झाल्याने ( गैरसमज नको, एका जागी न बसवण्याच्या तारुण्याबद्दल कैफाबद्दल ( कत्रिना नव्हे, पुन्हा अजुन गैरसमज नकोत ) बोलतो आहे मी ) एका बैठकीत पहिल्याएवढे लिखाण होत नाही.

1 comment:

प्रशांत said...

मग मिळाला की नाही पिझ्झा शेवटी?