Tuesday, June 30, 2009

संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे ....


टीप : लेखात आलेले विचार अथवा असंबद्ध विधाने ही केवळ वैयक्तीक माझ्या वैचारीक कल्लोळामधुन आली आहेत, त्याचा कुणी सर्वसंमत अर्थ काढुन कॄपया गैरसमज करुन घेऊ नये. तसेच लेखातला बराच भाग हा विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे, पण ते मनातले विचार आहे तसे उतरवले असल्याने त्याला पर्याय नाही.

"तुम्ही ना भौ पक्के स्युडो सेक्युलर लोकं, आपला धर्म,
संस्कॄती आणि देव मानणार नाहीच पण त्यावर टिका करायची म्हणलं ना की सर्वात पुढे" -
इति : एक आंतरजालीय मित्र
"अरे ३ महिन्यातुन आज घरी आला आहेस, सकाळी १५-२० मिनीटे काढुन जर
घरातल्या देवाची पुजा वगैरे केली तर काय तुला पाप लागणार आहे का ? " इति : आई
"चल आज रात्री तुला विठ्ठलाचे पायाचे दर्शन घेऊन
आणतो २० मिनीटात, तसाही तु दिवसात रांगेतुन जाणार नाहीसच"- इति : गावाकडचा देवभोळा मित्र
"समोर दिसणार्‍या आणि जाणवणार्‍या अशाच गोष्टींवर विश्वास ठेवणे हे
भुमिका फारच टोकाची आहे, नव्हे मुर्खपणा आहे. देवाचे अस्तित्व ह्यापलिकडे आहे" -
इति : बाबा
" पुण्यात आलाच अहेस तर माह्या समाधानासाठी माझ्याबरोबर दगडुशेठला
जाऊन येऊयात, तुझी व्ह्युव्ह्स आपण नंतर सविस्तरपणे बोलु" - पुण्यातले मित्र
"पुढच्या वेळी सुट्टी काढताना १ दिवस जास्त काढ, तु
आणि हा शिर्डीला जाऊन या. सारखं टाळाटाळ करणे बरोबर नाही" - इति : काकु/काका
" आज तुझा वाढदिवस आहे ना, मग सकाळी देवळात गेला होतास का
? ते नसेल जमले अजिबात" - इति : असेच कुणीतरी
" भोसडीच्या विकेंडला रुमवर सकाळी सकाळी टीव्हीवर
गाणी बघत बस पण देवळात नको येऊस " - इति : असाच एक कोणीतरी अजुन एक मित्र.
" तुमची कशावर अंधपणे श्रद्धा नाही हीच तुमची अंधश्रद्धा
आहे" - इति : अजुन एक आंतरजालीय मित्र

??
????
म्हणजे काय ?

म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ह्या सर्वांना ? मी काय ठार नास्तिक आहे ? ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ? का मी चक्क ढोंगी आहे असे त्यांचे मत आहे ? किंवा मी हे न करुन माझ्या शिकलेल्या शहाणपणाचे कौतुक करुन घेतो असे तर त्यांचे मत नाही ?

तसे लहानपण अतिशय देवभोळ्या, देवाचे अधिष्ठान असलेल्या व कर्मकांडाधिष्ठित समाज असलेल्या एका छोट्याश्या गावात गेले. कुटुंब आणि शेजारपाजारचे ही म्हणाल तर पक्के धार्मिक पण देवदेव आणि कर्मकांडाचा अतिरेक नसलेले, पण कसल्याश्या पुराण रिती आणि रुढींच्या कल्पना मनात घेऊन सर्वच गोष्टी अगदी मनोभावे करणारे. सर्वच वातावरण असे असल्याने व गावात १२ ही महिने "इश्वरनिष्ठांची मांदियाळी" असल्याने लहानपणातच अनेक स्त्रोत्रे, प्रार्थना, ष्लोक, ऋचा, स्तुत्या वगैरे तोंडपाठ झाल्या होत्या, तेव्हा अर्थ कळत नव्हता ह्या सर्वांचा पण म्हणताना अतिशय छान वाटायचे. इनफॅक्ट लहानपणी सगळीकडेच "मला सर्व पाठ आहे" हे दाखवण्याचा अट्टाहास झाल्याने आणि आज अगदी त्याच्या विपरीत असे काहीच औत्सुक्य न राहिल्याने स्वभाविकपणे सर्वांचा " मी नास्तिक होत चाललो आहे" हा काळजीचा विषय बनला आहे. लहानपणी जेव्हा आजोबा सकाळी सकाळी शुचिर्भुत होउन एखाद्या ध्यानस्त ॠष्यासारखे पुजेला बसायचे, तो फुला-उदबत्यांच्या सुगंध आणि आजोबांची धीरगंभिर आवाजात चाललेली विवीध संस्कॄत स्लोकांची आवर्तने ह्याने वातावरणच असे व्हायचे की मी सुद्धा स्वाभाविकपणे ह्यात ओढला जाऊन कधी आजोबांच्या मांडीला मांडी लाऊन रोजच्या रोज नियमाने पुजेला बसायला लागलो हे मलाच समजले नाही, मग मला नंतर "आवड आहे हो त्याला देवदेवाची, रोज सक्काळी पुजा केल्याशिवाय बाहेर जात नाही हो" वगैरे कौतुक ऐकुन मनातुन गुदगुल्या व्हायच्या.
पुढे मग शिक्षणाचे, नोकरीचे व्याप मागे लागले, घर ही सुटले. ह्या काळात आडवेतिडवे वाचन आणि चर्चाही बर्‍याच झाल्या. लहानपणी असलेल्या संस्कारामुळे म्हणा अथवा आंतरीक ओढीमुळे म्हणा पण "धर्म नक्की काय सांगतो" ह्यावर बरेच काही ढुंढाळले व पचवुन घेतले. "अहं ब्रम्हास्मी, तत्वमसी. मी सर्व चराचरात आहे" वगैरे वाक्ये भुरळ पाडु लागली. हा काळ बराच मोठ्ठा होता, यादरम्यान वेळ न मिळाल्याने म्हणा अथवा तसे पुर्वीसारखे वातावरण न जमल्याने पुर्वीसारखी "पुजेला बसण्याची" गोडी राहिली नाही. शिवाय देवाच्या जवळ जायला पुजाच करायला हवी व त्यासाठी संस्कॄत श्लोकच म्हणायला हवे हा जो गोड गैरसमज होता तो आता पुर्ण संपला होता. मात्र देवाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या जवळ जाण्याची ओढ होतीस, इनफॅक्ट जास्तच तीव्र झाली होती.मग जेव्हा केव्हा घरी जायचो तेव्हा हे तात्विक वाद नक्की असायचे, घरी फक्त लोळुन आराम करु वाटत असायचा व घरच्यांचा आग्रह वेगळाच. मात्र कधी कधी माझ्या "पुजा न करण्याचे" लॉजीक जेव्हा इथे " मी नास्तिक झालो" असे लावले गेले तेव्हा हमखास तात्विक चर्चा घडायच्या. शेवटी "तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही" ह्या ब्रम्हवाक्यात झाली की मी निमुटपणे उठुन पुजेला बसायचो, आजही बसतो ...
म्हणजे "मी एका जागी बसुन केलेया मंत्रोच्चाराच्या घोषात केलेल्या पुजेवर माझी "अस्तिक असणे वा नास्तिक असणे" अवलंबुन आहे" हा विचार माझ्या मनाला त्रास देऊन जातो....

आमची लहानपणीची शाळाही सांस्कॄतीक वारसा वगैरे सांभाळणारी, इथेही कर्मकांडांचे प्रस्थ फार. अर्थात हे सर्व चुकच असते असे नव्हे पण समजा हे केले नाही तर मात्र समोरचा कोणीतरी पापी आणि अपवित्र प्राणी आहे हे मात्र अवश्य ठासुन मनात भरले जायचे. लहानपणी मी इर्ष्येने " इदं तु ते गुह्यतमं, प्रव्यक्षाम्यनं सुयवे. ज्ञानं विज्ञानं सहितम्, यज्ञात्वा मोक्षसे शुभात" असे गीतेचे अध्याय वगैरे पाठ केले होते व स्पर्धाही गाजवल्या होत्या. थोडक्यात शाळेच्या दृष्टीकोणातुन मी एक "आदर्श असा संस्कारी विद्यार्थी" वगैरे होतो.
मग हळुहळु मोठ्ठा झालो, शाळा सोडुन बाहेरच्या जगात आलो. "गीतेच्या तत्वज्ञानाची" हळुहळु ओळख पटु लागली, गीता किती महान गोष्टी शिकवते हे ही लक्षात येऊ लागले.पण मन पुन्हा भुर्रकन मागे गेले, अरे आमच्या शाळेने आमच्याकडुन ४-४ अध्याय पाठ करुन घेण्यापेक्षा २ श्लोक व्यवस्थित अर्थासह सांगितले असते तर तेच उत्तम होते हे ही उमगले. आजही मला "इदं तु ते गुह्यतमं..." अशी सुरवात करुन दिली की आख्खा अध्याय म्हणता येतो पण त्याचा अर्थ नाही सांगता येत. मग असे पांगळे "पाठांतर" व ते ही "संस्काराच्या नावाखाली" जे लहानपणी माझ्यावर ठासवले गेले त्याला आज माझ्या दॄष्टीने काहीच किंमत उरत नाही. आमची शाळा खरेतर "तमसो मा ज्योतिर्गमय" हे ब्रीद घेऊन चालणारी, पण खरे आवश्यक ज्ञान देण्यात शाळेची नक्की गल्लत होत आहे असे आज वाटते.आजही तेच चालु आहे, कधीमधी गावाकडे गेले आजही तसेच गीतेचे अध्याय तोंडपाठ म्हणुन दाखवणारे विद्यार्थी दिसतात, ह्याबद्दल खेद व्यक्त केला आणि माझे विस्तॄत म्हणणे मांडले की "लहानपणी असा नव्हतास रे तु, आता अचानक असा का संस्कारांना तुझा विरोध आहे ?" असा संपुर्ण चुकीचा अर्थ लावतात ....
माझा विरोध खरोखर संस्कारांना आहे ? की संस्काराच्या नावाखाली नुसते अंध पाठांतर करुन घेण्याला ? संस्काराचा जर अर्थच समजत नसेल तर ते संस्कार काय कामाचे असे माझे म्हणणे चुक आहे ?

तेच पुन्हा येते ते वैश्विक शांती आणि बंधुतेचा संदेश देणार्‍या माउलींच्या "पसायदाना"बद्दल, आयुष्यभर इतरांकडुन पसायदानाची रोजची १०८ आवर्तने घोकुन घेणारे महाभाग जेव्हा मी दाराशी आलेल्या गरिब वारकर्‍यांना त्रास देतात तेव्हा "भुता परस्परे पडो, मैत्र जिवांचे" हे पसायदानाचेच तत्वज्ञान सोईस्करपणे विसरतात तेव्हा त्यांनी केलेया संस्काराला काय अर्थ उरतो ? मग तेच मात्र संस्कारी आणि आम्ही स्पष्ट बोलतो म्हणुन सम्स्कारविरोधी असा जो आमच्यावर अन्याय होतो त्याचे काय ?

लहानपणी गावाकडे पुजापाठ, व्रतवैकल्ये, याग, यज्ञ वगैरेंची बरीच रेलचेल, सत्यनारायणपुजा वगैरे तर अगदी नेहमीचेच. लहानपणीही कधी कसलीशी कथा वाचली म्हणुन बुडलेले जहाज वर येते ह्यावर मी अंधविश्वास कधी ठेवला नाही, मात्र ते वातावरण आणि जे काही घडते आहे त्यातुन ती पुजा घालणार्‍याच्या चेहर्‍यावर दिसणारे समाधान मात्र बरोबर वाचता यायचे. मग मोठ्ठेपणी पेशवाई आणि सत्यनारायणाची पुजा हा इतिहास समजला व लहानपणी आपण जे काही समजत होतो ते अगदीच चुक नव्हते ह्याचे समाधान वाटले. पण आजही मला सत्यनारायणाची पुजा आणि त्याचे धार्मिक महत्व काही केल्या समजत नाही, नपेक्षा मला स्वतःला कधी अशी पुजा घालावी वाटेल असे वाटत नाही. अर्थात मी हे बर्‍याच वेळा उघडपणे बोलुन दाखवल्याने समोरच्याच्या चेहर्‍यावरचे माझ्यबद्दल असणारे "धर्मबुडवेपणा"चे भाव मी सहजच वाचतो.
पण मी आजही जेव्हा केव्हा आमंत्रण येईल तेव्हा प्रसादाला जातो, पुजेच्या सारंजामापाशी बसलेले त्या घरातले कर्ते अथवा एखाद्या वयोवॄद्ध आजी/आजोबांना पाहुन मला कसेनुसेच होते, मी आपला मुकाटपणे नतमस्तक होतो व प्रसाद घेतो. त्यावेळचे त्यांच्या चेहर्‍यावरचे "अवघे सार्थक झाले" हे समाधान वाचताना त्यांच्या समस्यांचे जहाज हाच विश्वास वर आणेल ह्याचीही खात्री असते.मात्र तरीही मला माझा सत्यनारायण पुजेच्या महत्वावर विश्वास नसणे व म्हणुन मी "धार्मिक नसणे" हा संबंध कळत नाही...

देवाला भेटण्यासाठी अथवा त्याच्याशी तादात्म्य पावण्यासाठी खास देवळातच जावे लागते हा गोड गैरसमज कधीच नव्हता. मात्र लहानपणी देवळातले वातावरण भारुन टाकत असल्याने देवळात जायची ओढ मात्र जरुर होती, अर्थात इथे देवळातल्या देवाच्या मुर्तीसमोर किती वेळ बसलो ह्याला तेव्हाही काही अर्थ नव्हता आणि आजही नाही. मात्र तेव्हा तेव्हा बरोबरच्या कंपनीमुळे म्हणा अथवा तेव्हाचे पवित्र, शांत आणि कमर्शियल न झालेले देऊळ मला जरुर खुळवत असायचे व देवळाकडे ओढला जायचो. हां, आता देवळात जाऊन तिथल्या मोठ्ठ्या पटांगणात आम्ही लहानपणी खेळायचो वगैरे ही माझी वैयक्तीक बाब झाली, इथे मी खास करुन देवाला भेटायला जात आहे असे केव्हाच नव्हते, पण समाजाच्या दॄष्टीने मात्र मी "रोज नेमाने देवळात जाणारा मुलगा" असे होतो.
आज मात्र तितकीशी ओढ नाही, देवळातल्या मुर्तीची तर कधीच नव्हती. मात्र पुर्वी जे हवेहवेसे वाटायचे ते वातावरणही आज न राहिल्याने मला आज देवळात जाणे ह्या उपचाराला तितकेसे महत्व देऊ वाटत नाही. देवावरची श्रद्धा तर तितकीच आहे जितकी पुर्वी होती. मात्र आज देवळात गेल्याने तिथले अवडंबर आणि प्रस्थ पाहुन संताप आणि चिडचिड वाढते, ज्या हेतुसाठी मी कधीकाळी देवळात जात होतो तो हेतुच आता उरला नसेल तर मला देवळात जाणे तितकेसे प्रशस्त वाटत नाही. शिवाय देवळात जाणे म्हणजेच देवावर श्रद्धा असणे हे गुणोत्तर कधीच पटले नाही, तेव्हाही नाही आणि आता तर मुळीच नाही.
जातायेताना रस्त्यावर दिसणार्‍या कोपर्‍याकोपर्‍यातल्या मंदिरापाशी थांबुन दर्शन घेणे, सकाळी कितीही गडबडीत असलो तरीही दर गुरुवारी साइमंदिराची आरती गाठणे, दर चतुर्थीला ट्राफिक ज्यॅम करुन गणपतीची आरती करणे वगैरे गोष्टींचे मला कधीच आकलन झाले नाही व ह्या गोष्टी कधीही करु वाटल्या नाहीत.मग सध्याच्या देवळातल्या कमर्शियलायझेशन, गर्दी, आरडाओरड वगैरेला कंटाळुन तिकडे जायला खुष नसलेला मी अचानक "नास्तिक" कसा ठरतो ?
देवावरची म्हणजे सुप्रिम पॉवरवर असलेली मनातील श्रद्धा ह्याला काहीच किंमत नाही का ?पण,पण आजही मी कोणी मनापासुन आणि तळमळीने देवळात चलण्याचा आग्रह करीत असेल तर जरुर देवळात जातो, बरोबरच्याच्या चेहर्‍यावरच्या दिसणार्‍या समाधानातच मला बर्‍याच वेळा देव दिसतो व माझ्या देवळातल्या देवाच्या दर्शनाचे सार्थक होते...

आमच्या गावातल्या वाळवंटात आपला सर्व अहंकार बाजुला ठेऊन लक्ष-लक्ष संत कुळे "विठ्ठल विठ्ठल" चा जयघोष करत नाचली व ह्या गावाची मातीच त्यांनी पवित्र करुन टाकली, इथल्या प्रत्येक गोष्टीत एक पावित्र्य भरभरुन वहाते. तर आमच्या अशा ह्या गावात एकमेकांच्या "पाया पडण्याची" एक फार महान आणि पवित्र पद्धत आहे. लहानपणी हा काहितरी महान सोहळा आहे असे वाटायचे व मी त्यात कधी सामिल व्हायचो हे कळायचे नाही. कधी दुसर्‍या गावाला गेलो तर तिथले लोक "विठुमाऊलीची पाऊले" म्हणुन माझेच पाय धरायचे तेव्हा फार अवघडल्यासारखे व्हायचे आणि मनात काहितरी उच्च वाटायचे. तर सांगायचा मुद्दा हा की "पाया पडणे" ह्या संस्काराचे महत्व माझ्या लहानपणी खुप होते.
मग मोठ्ठा झालो, मी कुणाच्या का व कशासाठी पाया पडतो आहे व ते तरी माझ्या का पाया पडत आहेत वगैरे प्रश्न पडु लागले.ह्यांची उत्तरे जरी वर दिल्यासारखी असली तरी ती मनाला पटेनात. मी जरी त्या गावचा असलो तर मी असा काय तीर मारला आहे की लोकांनी माझ्या पाया पडावे ? उलट मी तर ऑलरेडी गावाकडे "नास्तिक, धर्मबुडवा, वरच्या वार्‍याला लागलेला" वगैरे म्हणुन बदनाम आहे, मग ही लोकं माझ्या का पाया पडत आहेत ?पाया न पडण्यामागे "अहंकार" वगैरे अजिबात नाही पण बुद्धीला पटेल असे कारण मिळत नसल्याने मला आजकाल हे नकोसे वाटत आहे, निदान केवळ मी त्या गावचा आहे म्हणुन वयाने मोठ्ठ्या लोकांनी माझे पाय धरणे तर साफ नामंजुर आहे. माझ्या वैयक्तीक बाबतीत म्हणाल तर तडजोड म्हणुन जास्त वाद न वाढवता मी आपला समोरच्याला मान देऊन वाद संपवतो, मनात काय आहे हा भाग अलहिदा.तर लोकांच्या मते इथेही मी माझे "संस्कार विसरत चाललो आहे" , चालायचेच ...

खरोखर मी संस्कार विसरत चाललो आहे का ?
कुणाला एखाद्याला चुकुन पाय लागला तर मी पटकन रिफ्लेक्स अ‍ॅक्शनने त्याच्या पाया पडुन घेतो हे संस्कार नव्हे का ? इथे मला आपण त्याला चुकुन लाथ मारली आहे व त्याची आपण दखल घेऊन माफी मागितली आहे हे दाखवणारे "पाया पडणे" हे जर संस्कार असतील तर मी का ते विसरलो आहे ?
आजही कुठल्या महत्वाच्या कामाला बाहेर निघायच्या आधी पुर्वी आई जे हातावर "दही-साखर" द्यायची त्याची आठवण होते, हे काय फक्त वरवरचे आहे का ?
रोज सकाळी आन्हिके उरकताना आपोआप "गणपतीस्तोत्र" मुखातुन बाहेर पडते, त्यामागचे देवदेव वगैरे सोडले तर ते म्हणताना त्या तालातुन व ध्वनीतुन मला मिळणारा आनंद व सुख मला दिवसभरासाठी एनर्जी देते हे खरेच आहे.
कुठलाही नवा कपडा घेतला तर त्याला आधी पाणी दाखवुन मगच तो अंगावर चढवावा ह्या संस्कारामागचे शास्त्रिय कारण मला पटल्याने ते नाकारण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही, मग मी सध्या जे करतो ते संस्कार नव्हेत काय ?
असो.
अशी उदाहरणे ढिगाने देता येतील, त्याला तरी काय अर्थ आहे ?
कारण, ऑलरेडी इथे समाज आणि आमच्या आसपासचे आम्हाला "नास्तिक, धर्म न मानणारा, देवावर श्रद्धा नसणारा" वगैरे ठरवुन मोकळे झाले आहेत ...

थोडक्यात काय तर आम्ही म्हणजे एक नंबरचे "नास्तिक, धर्म न मानणारे, देवावर श्रद्धा नसणारे" असे संस्कार विसरलेले विक्षिप्त इसम आहोत ...
चालायचेच ...!!!!

धन्यवाद ...!!!
जाता जाता : ह्याच अनुषंगाने मेघना आणि संवेद ह्या दोघांचेही पोस्ट आणि त्यावरची चर्चा वाचण्यासारखे आहे.
सध्या "मिसळपाव.कॉम"वर ह्याच लेखावर घडत असलेली चर्चा आपल्याला
इथे पाहता येईल ...

2 comments:

सर्किट said...

background image ani font cha color yamule vachayala awaghad jaate aahe. :(

छोटा डॉन said...

धन्यवाद सर्किटशेठ कळवल्याबद्दल ...

खरे तर मला "आय ई" वर लेख व्यवस्थित काळ्या अक्षरात दिसत होता, पण मी जेव्हा "गुगल क्रोमवर" पाहिले तेव्हा तो चक्क "फिक्कट हिरव्या" रंगात दिसला ...
आता दुरुस्ती केली आहे ...

आभारी आहे ...

- छोटा डॉन