Tuesday, January 27, 2009

मी "स्थानीक की परप्रांतीय " ??? - आपण सारेच अर्जुन ...

हा काही लेख वगैरे नाही, गेल्या काही वर्षातील अनुभवांच्या आधारावर माझ्याच मनात आलेल्या ह्या मुक्त भावना आहेत, ह्याला फारतर मुक्तक किंवा बाष्कळ बडबड असे नाव देता येईल.

पुण्यात" स्थानीक" असणारे मराठी मन ....
बेंगलोरमध्ये "परप्रांतीय" असणारे मराठी मन ....
.
.
आज पुण्यात एका नव्या कंपनीत जॉइन झालो, नवे नवे लोक भेटले, बॉसने टीमशी ओळख करुन दिली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर सगळे "आपले" लोक आहेत. बाकीचे जे "उपरे" आहेत ते काही जास्त नादी लागत नाही ह्यांच्या असे दिसतेय. गेले उडत साले, मरणाचे शिष्ठ व अतिशहाणे आहेत, आपण आपल्या लोकांशी जुळवुन घेतलेले बरे. बॉससुद्धा मराठी आहे हे बेश्ट झाले, आता जास्त अडचण होणार नाही. आपल्या लोकांबरोबर, आपल्या भाषेत काम करताना कस्सं मोकळंमोकळं वाटतेय.....
शेवटी एकदा आलो बेंगलोरमध्ये, च्यायला ह्या "अंडुगंडु गुडगुडु" च्या भाषेच काम जरा अवघडच दिसतेय, कसं जमणार हे देवाला ठाऊक. आज कंपनीत जॉइन झालो, च्यामारी सगळी कोंगाडी जनता भरली आहे. बॉसही कानडीच आहे, साल्याने बरोबर आपले आपले लोक खेचुनघेतलेत. असो. बाकी "हिंदी भाषीक" ३-४ जण आहेत हे एक चांगले झाले, जरा त्यंच्याबरोबर मिक्स होता येईल. ह्या कन्नडिगांचा ग्रॄप एकदम सॉलीड दिसतोय, खायला-प्यायला-गप्पा मारायला सगळे कसे मिळुन मिसळुन असतात, गेले उडत, कुणाला व्हायचयं त्यांच्यात मिक्स ?
=============================================

आज मिटिंगमध्ये बॉस सगळ्यांना नवे काम समजावुन सांगताना बहुतेक अनावधनाने सलग ५-६ वाक्ये मराठीत बोलला, मला काही प्रॉब्लेम नाही झाला पण हे "भय्ये" लगेच उठुन " हमें समझा नहीं, हिंदी मे या तो अंग्रेजी मे बतावो " असे म्हटले, साले एक नंबरचे हलकट आहेत, गेली १-२ वर्षे पुण्यात आहेत मग २-३ वाक्ये समजायला काय प्रॉब्लेम आहे ? का शक्य तिकडे आपला "उपरेपणा" दाखवायलाच हवा ? आता ह्यांची चांगलीच ताणली पाहिजे. बोस बिचारा सज्जन, त्याने माफी मागुन पुन्हा इंग्लिशमध्ये समजावले ....
आयला हे दाक्षिणात्य लोकं आहेत की भिंताडं, साला मिटिंगमध्ये सुद्धा आपल्याच भाषेत बोलतात, कंपनी काय ह्यांच्या घरची आहे काय ? नाही, भाषेबद्दल जाज्वल्य अभिमान वगैरे असायलाच हवा पण कॉर्पोरेट जगतात मात्रॄभाषाच बोलणार म्हणुन कसे चालेल ? आता ह्यांच्यासाठी मी कन्नड शिकायची का ? ते काही, आत्ता लगेच उठुन स्पष्ट बोलले पाहिजे.च्यामारी, चांगले सज्जनपणे "कन्नड येत नाही" हे सांगितले तर एकेकाच्या चेहर्‍यावरचे भाव कसे बदलले पहा, जळके आणि आत्मकेंद्री साले.....
==============================================
आज मित्रांबरोबर जंगली महाराज रोडवरच्या मॅक्डी मध्ये जेवायला गेलो. तिथल्या काउंटरवरच्या बाहुलीने डायरेक्ट हिंदीत बोलायला सुरवात केली , एक मित्र जरा सायकीक आहे, त्याने काउंटरवर जाऊन डायरेक्ट मराठी सुरु केले, तिला काही समजेना हा काय बोलतोय ते, हा शहाणा मराठीवरच अडुन बसला, शेवटी बाबापुता करुन त्याला बाहेर आणला. असो. पण महत्वाचा मुद्दा असा की मराठी प्रांतात हॉटेल काढत असताना मराठी भाषा येणारे कर्मचारी भरती करणे हे कंपनीचे कर्तव्य नाही का ? "हिंदी" ही काय महाराष्ट्राची राज्यभाषा अगर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे काय ? ह्यांचे काही तरी करायला हवे ....
आज जेवायला फोरममधल्या "पिझ्झा हट"ला गेलो होतो, च्यायला डायरेक्ट डोक्याला शॉट निघाला. गर्दी होती म्हणुन आधी ऍडव्हान्स बुकिंग करायला एक माणुस बाहेर उभा होता. अहो आश्चर्यम , त्याला "हिंदी" येत नाही. त्या शहाण्याने फक्त "कन्नडमध्येच" बोलेन असा नववर्षाचा प्रण केला असावा. शेवटी जास्त वाद नको म्हणुन "इंग्रजीत" बोलुन विषय संपवला. पण मुद्द्याची गोष्ट अशी की पिझ्झा हट सारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने "इंग्रजी अथवा राष्ट्रभाषा" बोलणारे लोक प्राधान्याने नौकरीला ठेवणे जरुरीचे नाही का ? सर्वांनाच कशी स्थानीक भाषा येईल ?
==============================================
च्यायला कंपनीतल्या रुपालीला डोक्याचा भाग नाही, एवढी मराठी पब्लिक असताना ही त्या भैय्या "संजय त्रिवेदी" बरोबर फिरते आहे. आमचं एक सोडा हो पण इतर मराठी पोरं काय मेली काय ? च्यायला फुकट डोक्याला शॉट निघतो असे काही पाहिले की, हे साले भैय्ये कामापुरती जवळ करतील तिला, नंतर मग कोण तु असे विचारायला कमी करणार नाहीत. छे, रुपालीला सांगायलाच हवे ही, पण ती तर कुठे मराठी पब्लिकमध्ये मिसळते, तिला तेच हवे आहेत. मरु देत
हापीसातली "सौम्या" भारी आहे राव, आजकाल जरा जास्तच आपल्याबरोबर फिरत आहेत. गप्पा मारायला, टीपी करायला, बरोबर जेवायला एकदम स्सह्ही कंपनी सापडली. पण बाकी कन्नड पब्लिक आमच्याकडे असं मारक्या म्हशीच्या नजरेने का पहात असतं ? जळतात साहे, त्यांना सौम्या काडीइतका भाव देत नाही ना म्हणुन.तिला आज विचारलं की "बै, बाकीचं कन्नड पब्लिक बोंबलतं का ? " म्हणुन, ती म्हणाली काहीच काळाजी नकोस करु, ती ह्या गोष्टींना किंमत देत नाही. असं पाहिजे राव, माणुस जोडणे महत्वाचे, आपापल्या लोकांबरोबरच रहायचे असा हट्ट म्हणजे कठिणच आहे. सौम्या एकदम "उच्च विचाराची आणि फ्री माईंडेड " आहे बो, आपण मानलं ....
==============================================
राजसाहेब म्हणतात ते करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम आहे स्थानीक भाषेत दुकानांच्या पाट्या असायला. स्थानीक भाषेला प्राधान्य आणि महत्व असायलाच हवे. समजा गावाकडुन एखादा खेडुत आला तर त्याला काय घंटा समजतं आहे हे इंग्लिशमध्ये काय लिहले आहे ते, मराठीच हवे तिथे....
आज एका मित्राकडे जरासे लांब गेलो होतो. च्यामारी, ह्या स्थानीक बसेस आहेत की चेष्टा ? सगळ्या पाट्या, आतले कर्मचारी "फक्त कन्नड" वालेच, आमच्यासारख्यांनी काय करायचे ? पोहचलो कसेबसे. ऍड्रेस आहे व्यवस्थीत पण झोल असा आहे की हे "लँडमार्क्स" शोधायचे कसे ? सगळीकडे जिलब्या पाडल्यासारखे कन्नड लिहले आहे, काडीइतके समजत नाही. नाही, जरी दाक्षिणात्यांचा हिंदी विरोध गॄहीत धरला तरी ह्यांना "इंग्रजीत" लिहायला काय प्रॉब्लेम आहे ? नाहीतरी सगळीकडे हे इंग्रजी झाडत असतातच ना ?
==============================================
आज "नॉन मराठी पब्लिक" आलं होतं फ्लॅटवर, मस्त दंगामस्ती केली सगळ्यांनी मिळुन, आता जेवायला कुठे जायचे म्हटले तर अजुन दंगा सुरु झाला. चांगलं ह्याना "मथुरा" मध्ये चला म्हणतोय, मस्त मराठमोळी भाकरी पिठलं थालपीठं वगैरे खाता येईल. हे म्हणतायतं की पंजाबी खायचं म्हणुन, रोज रोजच पोळी-भाजी खाऊन कंटाळा आला म्हणे. जाऊ दे, गाढवाला काय गुळाची चव ?च्यायला जेवतानाही शांत जेवत नाही, उगाच मोठ्ठ्यामोठ्ठ्या गप्पा मारतात लेकाचे, म्हणे काय तर "आमच्या भागात पराठे, रबडी , दम सब्जी , कचोरी वगैरे वगैरे" भारी मिळती म्हणे. आता इथे आहात ना, मल गपचुप खावा ना इथले, एवढे शिंपल समजत नाही लेकाच्यांना, मरु देत ....
च्यायला आजकाल सकाळ सकाळ सौम्याबरोबर ब्रेकफास्टला जायचे म्हणजे संकटच आहे बॉ, काय खाणार तिथे जाऊन हा प्रश्न दररोज पडतो. आयला रोज सकाळी डोसा / ईडली / वडा सांबार खायचे म्हणजे काय चेष्टा आहे का राव ? काहितरी व्हरायटी हवी का नको ? रोज तिच टेस्ट बोर होत नाही काय ? मी म्हटले सौम्याला "आमच्या पुण्यात ये, मस्त कांदापोहे, वडापाव, भजी खायला घालतो. एकदम झ्याक टेस्ट असते" .....
==============================================

तर असं आहे एकंदरीत, मीच सध्या फार मोठ्ठ्या मानसीक द्वंद्वात आहे की माझी नक्की "विचारसारणी" कशी आहे ?
अजुनतरी मला समर्पक आणि समाधानकारक उत्तर सापडले नाही ह्या प्रश्नाचे ...पाहु भविष्यात काय काय घडते ते ...
**** डिस्केमर ***
१. लेखाच्या अनुषंगाने आलेली व्यक्तींची नावे ही "काल्पनीक" आहेत अथवा "बदलली "आहेत, त्याचा वास्तवीक जीवनाशी संबंध लावण्याचा प्रयत्न करु नये.
२. कुणावर टिका करायची ह्या हेतुने हे लिखाण केलेले नाही.
३. मनातले विचार आहे तसे मांडत असल्याने काही अपशब्द आले असण्याची शक्यता आहे, त्याला माझा इलाज नाही.
**** डिस्केमर संपले ****

4 comments:

Unknown said...

आपण सारे भारतीय हे एकदा मान्य केले की स्थानिक की परप्रांतीय हा वादच चूकीचा ठरतो.
आणि हा वाद उठवणारे लोकदेखील स्वतःवर जेंव्हा बेतते तेव्हा शेपुट घालतात असा अनूभव आहे.

-- नितीन
http://nitinmutha.blogspot.com/2008/10/thackeray.html

Anonymous said...

सॉलिड हाय हा हे आम्ही तुमच्या ब्लॉग चे ४०४० वे वाचक बरे

Sayli said...

mastach lihila ahes tu...
khara aahe na shabdanchaa ghatananchyaa paribhasha kinwa wyakhya manasa ganik pranta ganik badalat jatat.. drishtikonacha farak asato... balanced wichar karne mahatwache..shewati hya saglya relative terms aahet nahi ka?
khupach chan lihila aahes nehemi pramane..:-)
me mipawar pan tuze lekh wachte.. asach lihit ja..

Anonymous said...

kon ha donya?swatala atich samajtoy? sarv rajkarnyana ulatsulat bolnara ha kon tirshinrao?blogchya madhyamatun chhupepane aapli ati budhhimatta vaya ghalavtoys re tu.aapla abhyas kivha kam manapasun kar samajal.