Friday, June 11, 2010

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - २ : फ्रान्स - दी ब्ल्युज ...

अंगाची लाहीलाही करणार्‍या कडक उन्हाळ्यानंतर आलेल्या अशाच एका रणरणत्या दुपारी अचानक आभाळ दाटुन बरसलेल्या पावसाचे थ्रिल शब्दात कसे वर्णावे हो ?

आयुष्यात मिळालेल्या पहिल्या स्व-कमायीच्या पगाराच्या पैशाचे मोल आणि त्यातुन आपल्या आप्तजनांना भेटी देण्यातले थ्रिल शब्दात कसे वर्णावे हो ?

बराच काळ वाट पाहुन व त्यासाठी कठोर परिश्रम करुन जेव्हा तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच जेव्हा आपल्या 'प्रिय' बरोबर एखाद्या छानशा संध्याकाळी कॉफीसाठी भेटण्यासाठी जाता व ती समोर येते तेव्हा हृदयात होणार्‍या धकधकीची वर्णन शब्दात कसे करतात हो ?

अवघड आहे ना ?

नक्कीच अवघड आहे, मग मला सांगा ह्या फुटबॉल वर्ल्डकपच्या पहिल्या मॅचच्या 'किकऑफ'चे वर्णन व त्याचा तो रोमांच ह्याचे वर्णन मी शब्दात कसे करु ?

६ तास, केवळ ६ तास ... काउंटडाऊन सुरु झाले आहे.

आकडे फार फसवे असतात नाही?

अहो ६ तास वाट पहातो कोण?

प्रेक्षकांच्या दॄष्टीने ऑलरेडी ह्या मॅचचा किकऑफ झाला आहे, आपापल्या देशाचे झेंडे आणि आपल्या संघाचे पोषाख वगैरे घेऊन ऑलरेडी लाखो पाठिराखे जोहान्सबर्गमध्ये डेरेदाखल झाले आहेत. ज्यांना तिकडे जाणे जमले नाही त्यांनी ऑलरेडी संध्याकाळचे प्लानिंग केले आहे, आज करोडो डोळे टीव्हीसंचाला चिकटतील, हजारो हॉटेल्स आणि पब्ज खचाखच भरतील व लाखो लिटर उत्साहवर्धक द्रव्याच्या कैफात दिलेल्या आरोळ्यांनी अजुन ६ तासानंतर सर्व फुटबॉलप्रेमी एकाच नशेत धुंद होतील.

सॉकर ... सॉकर ... सॉकर !!!
सॉकर ... सॉकर ... सॉकर !!!

घड्याळाप्रमाणे सांगायचे तर ह्या क्षणाला अजुन ६ तासानंतर एक दिमाखदार सोहळ्यानंतर ह्या स्पर्धेचे यजमान 'दक्षिण आफ्रिका' आणि अमेरिकन उपखंडातील 'मेक्सिको' हे जोहान्सबर्ग इथे तब्बल ९०००० प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या 'सॉकर सिटी स्टेडियम' वर एकमेकांशी भिडणार आहेत. जेव्हा ह्या सामन्याच्या सुरवातीची सुचना देणारी शिट्टी वाजेल तेव्हा केवळ ह्या दोन संघातल्या सामन्याची सुरवात होणार नसुन आख्ख्या जगाचे लक्ष लागुन राहिलेल्या एका महान संग्रामाचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

ह्या सामन्याचा कैफ उतरतो न उतरतो तोच तिकडे 'केप टाऊन'मध्ये फुटबॉलचे २ दिग्गज व पुर्वाश्रमीचे विजेते असे 'फ्रान्स' आणि 'उरुग्वे' भारतातल्या मध्यरात्रीच्या वेळेला आपापल्या देशाच्या राष्ट्रध्वज आपल्या अंगावर घेऊन स्टेडियमला विजयी फेरी मारण्यासाठी सज्ज झाले असतील.

हे दोन्ही सामने खेळले जाणार आहेत ते जगातल्या सर्वोत्कृष्ट अशा ३२ संघातल्या ८ गटांपैकी "गट-अ" ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या समुहात. तेव्हा आम्ही आमच्या विश्लेषणाचे प्रथम पुष्प ह्या 'गट-अ' च्या पायी अर्पण करतो.

* गट - अ :
संघ : फ्रान्स, उरुग्वे, मेक्सिको आणि यजमान दक्षिण आफ्रिका

ह्यातला प्रत्येक संघ एकमेकाशी प्रत्येकी १-१ सामान खेळेल व पुढच्या फेरीत प्रवेश करणार्‍या अंतिम २ संघात आपली वर्णी लावण्यासाठी व जमल्यास झळाळत्या विश्वचषकावर आपले नाव कोरुन आपल्या राष्ट्रातल्या पाठिराख्यांना एक अनोखी भेट देण्यासाठी प्राण पणाला लाऊन मैदानात उतरेल.

फ्रान्स :

मॅन्चेस्टर युनायटेड सारख्या दिग्गज क्लबचा अ‍ॅटॅकिंग डिफेंडर आणि साईड-बॅकचा कणा असलेल्या 'पेट्रिक इव्हरा' च्या नेतृत्वाखाली ह्यावेळी फ्रान्स संघ ह्या विश्वचषकासाठी आपला डाव मांडतो आहे. अनेक जागतीक क्लब्स गाजवणारे भरमसाट स्टार आणि त्यांची अफाट कौशल्ये ह्यांनी हा संघ संपुर्ण समतोल वाटतो आहे.
१९९८ साली एकहाती विश्वचषक जिंकुन देणार्‍या व २००६ साली फायनलमध्ये इटलीच्या माटेराझ्झीच्या छातीवर डोक्याने धक्का देऊन व नंतर 'रेड कार्ड' घेऊन मैदानाबाहेर जाणार्‍या व त्या धक्क्यातुन संपुर्ण संघ न सावरल्याने केवळ 'उपविजेते' ह्या पदावर समाधान मानावे लागलेल्या 'झिनादेन झिदान' चा फ्रान्स संघ.
१९९८ साली विश्वचषक जिंकल्यानंतर पुढच्या वेळी २००२ मध्ये ह्यांना 'फेव्हरिट' मानले जात असताना आश्चर्यकारकरित्या पहिल्याच फेरीत बाद होणारा हाच तो झिनादेन झिदानचा फ्रान्स संघ, पण ह्यावेळी तो खेळणार आहे झिदानच्या अनुपस्थितीत. झिदान ह्या टीममधुन बाहेर गेले आणि ह्यांचे नशिबही फिरले, यशाचा प्याला काठोकाठ भरुन जल्लोश साजरा करणार्‍या ह्या फ्रान्सला झिदाननंतर यशाचा एक थेंब घेण्याकरता खुप झगडावे लागत आहे.
पण १९५४ पासुन अगदी मोजके अपवाद वगळता युरोप सारख्या कठिण गटातुन नेहमीच 'पात्र' ठरणारा हा संघ.
लोकल फुटबॉलही जोरदार आहे, अनेक हुशार खेडाळु देशोदेशीचे क्लब्ज गाजवत आहेत, ह्यावेळच्या चॅम्पियन्स लीगमध्ये फ्रान्सच्याच 'लियॉन' संघाने स्पॅनिश जायंट 'रियाल माद्रिद' ह्या संघाला पाणी पाहुन त्यांना नॉक-ऑट करण्याचा भीमपराक्रम केला.

संघ

गोलरक्षक : सेड्रिक कॅरासो, ह्युगो लॉरिस

बचावफळी : ईरिक आबिदाल, पेट्रिक इव्हरा, विल्यम गॅलास, गायल क्लिची, मार्क प्लॅनस, अ‍ॅन्टानियो रिव्हेलेरी, सॅग्ना.

मिडफिल्डर्स : डैबी, डिएरा, फ्लॉरेंट मलुडा, फ्रँक रिबेरी, जेरमी टॉलॉन, योहान गॉर्कुफ्फ

फॉर्वर्ड्स : थियरी हेन्री, निकोलस अनेल्का, सिडने जियेवु, आन्द्रे सिग्नॅक

प्रशिक्षक : रेमंड डॉमनिक ( फ्रान्स )


ह्यावेळी फ्रान्सची मुख्य मदार आहे ती झिदानचा वारसदार म्हणुन नावारुपाला येत असलेल्या व सध्या जर्मनीतल्या बायर्न म्युनिक ह्या क्लबच सुपरस्टार असलेल्या 'फ्रॅंक रिबेरी' ह्याच्यावर, हा फ्रान्सचा 'प्ले मेकर' आणि आघाडीचा मिडफिल्डर आहे. कमालीच्या वेगवान हालचाली, बेघडक टॅकल्स, फ्री-किकचा बादशाह आणि फोर्वर्डसना क्रॉस पासेस देण्यात हातखंड असलेला एक अत्यंत 'तापट' खेडाळु असे रिबेरीचे वर्णन करता येईल.
आत्तापर्यंतच्या ४५ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७ गोल मारलेल्या व ११ गोलांना मदत केलेल्या रिबेरीने आत्तापर्यंत एकुण ८ वर्ल्डकप सामने खेळले आहेत व आपला एकमेव गोल हा २००६ ला स्पेन विरुद्ध मारुन फ्रान्सला १-१ बरोबरी साधण्याचा चमत्कार करणार्‍या व उरलेला वर्ल्डकप बेंचवर बसुन झिदानचा खेळ पहात घालवणार्‍या रिबेरीकडुन ह्यावेळी फ्रान्सला भरपुर अपेक्षा आहेत.


ह्यानंतर फ्रान्सच्या आक्रमणाचा भार संभाळेल तो चेल्सीचा सुपरस्टार 'निकोलस अनेल्का', दिदियर ड्रोग्बाच्या बरोबरीने ह्याने इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये गोलांचा रतिब घातला आहे. मिडफिल्डर्सबरोबर अत्यंत सुरेख ताळमेळ व पेनल्टीच्या वेळी खात्रीशिर 'हेडर' मारण्याची ख्याती असलेला अनेल्का नक्कीच फ्रान्ससाठी आशेचा किरण ठरु शकतो. आर्सनेल, रियाल माद्रिद, चेल्सी, लिव्हरपुल अशा दादा क्लबमधुन खेळलेल्या अनेल्काकडे अनुभवाची कमी नाही, फक्त आता त्याला तोच अनुभव इथे देशासाठी पणाला लावायचा आहे.
फ्रान्सकडुन ३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या अनेल्काच्या नावावर ८ गोल आहेत, ह्यावेळी फ्रान्सला नक्कीच जास्तीची अपेक्षा आहे.


चेल्सीच्या ईपीएल विजयाचे शिल्पकार जरी लँपार्ड आणि ड्रोग्बा असले तरी त्यांना मदत झाली ती "फ्लॉरेन्ट मलुडा" ह्या फ्रान्सच्या विंगरची. मैदानाच्या एका कोपर्‍यातुन नेत्रदिपक ड्रिबलिंक करत बॉल जाळ्यापर्यंत न्हेणारा व बचावपटुला चकवुन जाळ्याकडे सुरेख क्रॉस देणारा मलुडा बॉल लगदी स्ट्रायकरच्या पायात आणुन ठेवतो, तो जाळ्यात सारणे हे केवळ काम उरते. जरी मलुडाचा वैयक्तिक गोल स्कोअर कमी असला तरी त्याने क्रॉस देऊन असिस्ट केलेल्या गोलांची संख्या अफाट आहे. फ्रान्सच्या आघाडीला बॉल चारण्यासाठी मलुडासारखा 'विंगर' फार महत्वाचा ठरणार आहे.


थियरी हेन्रीसारख्या महारथ्याकडुन व रिबेरी, अनेल्का, गलास सारख्या अतिरथ्यांच्या स्पर्धेत संघाची कॅप्टनशिप पटकावणारा व मॅन-युचा फुल बॅक डिफेंडर असणारा "पेट्रिक इव्हरा" हा फ्रान्सच्या प्ले मेकिंगमध्ये नक्कीच मोठ्ठी भुमिका बजावेल. डिफेंडर लाईनपासुन थेट प्रतिस्पर्ध्याच्या गोलपर्यंत धडका मारणे, अचुक लाँग पासेस देण्याचे कौशल्य, प्रतिस्पर्धी विंगरला रोखण्याची कामगिरी आणि बॉल थ्रो इनवेळी करेक्ट पासेस ही इव्हराची वैशिष्ठ्ये.


विल्यम गॅलास हा फ्रान्सच्या बचावफळीचा मुख्य मोहरा, गोल समोरच्या बॉक्समध्ये भिंतीसारखा उभा राहणारा गॅलास. त्याच्या अवाढव्य शरिरयष्टीचा उपयोग करुन प्रतिस्पर्धी स्ट्रायकरकडुन बॉल काढुन घेण्याचे व तो क्लियर करण्याचे निर्विवाद कौशल्य. त्याच्या बेधडक स्लायडिंग टॅकल्स, चपळाईच्या हालचाली, परफेक्ट मार्किंग आणि बॉलचा अचुक अंदाज ह्या गोष्टी त्याला जगातला एक बेस्ट डिफेंडर बनवतात. गॅलासची जादु जर चालली तर त्याला ओलांडुन फ्रान्सच्या गोलपर्यंत पोहचणे ही प्रत्येक टीमची डोकेदुखी ठरणार आहे. हा सध्या 'आर्सनेल' ह्या इंग्लिश क्लबच्या बचावफळीचा महत्वाचा मोहरा म्हणुन ओळखला जातो, आता त्याच्याकडुन फ्रान्स हीच अपेक्षा ठेवणार हे नक्की.


सेड्रिक करॅसो हा फ्रान्सचा नंबर १ चा गोलरक्षक. चित्याची चपळाई, हवेत उड्या घेण्यात प्रभुत्व, पेनल्टीच्या वेळी बचावपटुंची भिंत उभी करण्यातला अभ्यास, गोलसमोर बिनधास्त धावत येऊन स्ट्रायकरला टॅकल करुन बॉल काढुन घेण्याची क्षमता.
करॅसोची सगळ्यात मोठ्ठी ताकद म्हणजे एखादा फटका त्याच्याकडुन अर्धवट अडवला गेला आणि बॉल पुन्हा प्रतिस्पर्ध्याच्या ताब्यात गेला तर पटकन योग्य पोझिशन घेऊन पुन्हा डिफेंडला उभे राहण्याची क्षमता. ह्याचा आणि बचावफळीचा योग्य ताळमेळ जमला तर फ्रान्सवर गोल चढवणे हे प्रतिस्पर्ध्यांसाठी नक्कीच आव्हान असेल.

फ़्रान्सची ताकद :

अफाट अनुभव असलेली आघाडीची फळी आणि मिडफिल्डर्सचा संच तसेच रिबेरीसारखे नवे युवा टॅलेंट. थियरी हेन्रीसारखा अनेक पावसाळे बघितलेला नेता अजुन संघात आहे. वेगवान खेळ करण्याकडेचा कल आणि आता रिबेरीसारख्या प्लेमेकरचा गवगवा.
गॅलास, इरिक अबिदाल आणि कॅरासो ह्यांचे त्रिकुट जमले तर गोल भेदणे प्रतिपक्षाला अवघड जाणार.
मलुडा आणि अनेल्का हे एकाच क्लबकडुन खेळत असल्याने समन्वयात होणारा फायदा.

फ्रान्सचे कच्चे दुवे :

अनुभव जरी प्रचंड असला तरी थियरी हेन्रीसारखा खेडाळु सध्या वय वाढल्याने तितकासा खेळ करु शकत नाही, दुखापतीची चिंता आहेच, गॅलास अजुन संपुर्ण तंदुरुस्त नाही. सराव सामन्यात चीनकडुन १-० ने मात खावी लागल्याचाही धक्का आहेच. रिबेरीचा भडकुपणा कधीही त्याला बाहेरचा रस्ता दाखवु शकतो व त्यामुळे टीम अडचणीत येऊ शकते.
प्रशिक्षक डोमनिक ची स्ट्रॅटेजी अजुन क्लियर वाटत नाही व नेतृत्वही प्रभावी वाटत नाही.
इव्हराकडे कप्तानी आल्याने टीमच्या आत किंचित नाराजी असु शकते व त्यातच त्याने 'रेसिझम'चा सुर आळवल्याने मामला बिकट झाला आहे.
प्रक्षिक्षक डॉमनिकचा रियाल माद्रिदचा स्ट्रायकर "करिम बेंझामा" ह्याला वगळण्याचा निर्णय सगळ्यांनाच धक्का देऊन गेला, आता थिररी हेन्रीच्या अनुपस्थितीत आक्रमणाची ताकद बेंझामा नसल्याने काही अंशी कमजोर होणार हे निश्चित.
शिवाय अपेक्षांचे ओझे हा फार मोठ्ठा फॅक्टर फ्रान्सला टॅकल करावा लागेल ...

आमचा अंदाज :

फ्रान्स मुश्लिलीनेच सेमीफायनलपर्यंत जाऊ शकते. फायनलचा ड्रॉ आणि चषकाचे स्वप्न अवघड आहे असे दिसतेय. पहिली फेरी मात्र विनासायास पहिल्या नंबराने पार करतील.

1 comment:

Indli said...

Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com