Wednesday, June 30, 2010

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार : अर्जेंटिना ...

तुम्ही म्हणाल की अर्धा वर्ल्डकप संपला आणि 'अर्जेंटिना' आता ऑलरेडी शेवटच्या ८ संघात पोहचुन पुढच्या उपांत्य सामन्यात जर्मनीशी लढायला तयार झाली आहे.

मग मी हे अर्जेंटिनाबद्दलचे घोडे आता वरातीमागुन का नाचवत आहे ?
तेच नेहमीचे 'वर्ल्डक्लास प्लेमेकर, अप्रतिम ड्रिब्लिंग स्किल्स, हवेतल्या खेळात सर्वोत्तम, बचावफळीच्या भिंती, गोलपोस्टसमोर पहाडासारखा उभा राहणारा गोली, बचाव भेदणारे मिडफिल्डर्स, बचावपटुंना चकवा देणारा स्ट्रायकर, तेच लेफ्ट बॅक-राईट बॅकचे पुराण .... वगैरे वगैरे' लिहुन आम्हाला बोअर करणार का ?
नाही, अजिबात नाही !
मी ह्या ओळखीत अजिबात काही टेक्निकल लिहणार नाही, नाही म्हणजे नाही, अगदी पुज्य !
बास झाले तिच्यायला तेच नेहमीचे पुराण ...अर्जेंटिना आहे ती एका राजकीय पक्षासारखी, फार्फार तर एका 'राष्ट्रीय राजकीय पक्षा'सारखी आहे असे म्हणा, त्याने फार फरक पडेल असे नाही पण म्हणा. राष्ट्रवादीला उगाच 'राष्ट्रीय' म्हणल्यावर काय फरक पडतो आणि नाही म्हटले तरी काय फरक पडतो ? काहीच नाही, तसेच आहे आर्जेंटिनाचे, तुम्ही त्यांना काहीही म्हणा ते आपले काम करत राहतात.
आता कसे की एखादा राजकिय पक्ष कशी येईल ती निवडणुक लढवतोच तशी अर्जेंटिनाही बहुतेक सगळ्याच 'विश्वचषक स्पर्धांना' कायदेशीरपणे पात्र झाली आहे आणि लढली आहे. जिंकणे-हरणे हा भाग सोडा पण लढणे हे महत्वाचे. तशी त्यांनी १९७८ साली आणि १९८६ च्या 'मॅराडोनाच्या करिष्म्याच्या लाटेत' चक्क विजेतेपदाला गवसणी घालुन ४-४ वर्षे 'विश्वविजेते' ही खुर्चीही उबवली आहे. ह्यावेळेस पण ते "युवराज लियोनेल मेस्सीच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्पष्ट बहुमताचा दावा" करत आहेत.
ज्याप्रमाणे सर्वच पक्षांची असते तशी अर्जेंटिनाचीही रितसर आघाडीवर लढुन गोल करुन पक्षाची शीट संभाळणार्‍या स्ट्रायकर्सची फळी आहे,ग्रासरुट लेव्हलवर 'संघ प्रचारकांप्रमाणे एकनिष्ठ आणि गोलांची अपेक्षा न ठेवता प्रामाणिक' काम करुन आपल बालेकिल्ला मजबुत आणि सुरक्षित ठेवणार्‍या बचावपटुंची बचावफळी आहे, तसेच हायकमांड आणि लोकल कार्यकर्ते ह्यांच्यात जशी स्थानिक नेतेमंडळी , जिल्हाकार्यकारणी ताळमेळ ठेवते तेच काम करणारी आणि आघाडी व बचावफळीचा दुवा साधणारी मधली फळीही आहे, अहो एवढेच काय पण एखादा मतदारसंघ खिशात घालुन फिरणार्‍या व पक्षाची इमेजला तडा जाऊ न देण्याचे काम करण्यासाठी एकेकाच्या नाड्या बांधुन ठेवणार्‍या मात्तबर साखरसम्राटाएवढा ताकदवान असा 'गोलरक्षक' पण ह्यांच्याकडे आहे. हे सगळे झाले रितसर फ्रंटवर लढणार्‍यांचे, हे झाले अ‍ॅक्च्युअल लढती जिंकणार्‍या व हारणार्‍यांचे.
अहो महाराज पण हे सगळे करण्यासाठी पक्षाला एक 'तात्विक, वैचारिक, नैतिक बैठक देणारा थिंक-टँक किंवा पॉलिट ब्युरो' असतो ना तसाच ह्यांचाही एक कायदेशीर कोच आणि इतर 'कोचिंग स्टाफ' आहे व हेच त्यांच्या पार्टीला ... हे आपलं संघाला लढतीसाठी तयार करत असतात. पडद्यामागुन चाली खेळणारे हे पण ह्यांच्यावर बरेच काही अवलंबुन असते बरं का.
असो.

आता आपण ह्या पक्षाच्या बांधणीचा एक धावता आढावा घेऊ .... 'लियोनेल'रावचंद्रजी 'मेस्सी'साहेब :
जसे काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही सभेची किंवा बातमीची सुरवात 'गांधी घराण्याच्या जयजयकाराशिवाय होत नाही' तसेच आजकाल अर्जेंटिनाचा कुठेही उल्लेख आला की आधी आपण 'लियोनेलरावचंद्रजी मेस्सीसाहेब यांचा विजय असो ...' ही घोषणा देऊन टाकावी. अर्जेंटिना पक्षाचे हे युवराज आणि शेंडेफळ, पहिल्यापासुन राजेशाही थाटात आपली कारकिर्द घडवायला घेतली. पक्षाची ही धडाडती तोफ, अगदी राज ठाकरेसारखी. जिकडे जाईल तिकडे मैदान मारुनच येईल.
प्रतिपक्षाने अगदी जीवाचे रान करत जनमत आपल्या बाजुने वळवत आणावे, प्रचाराचे रान व्यवस्थित पेटले असावे, चाली-शह ह्यांना उत आला असावा व अशात मेस्सीयुवराजांची एन्ट्री व्हावी. ह्यांनी लगबगीत मध्यफळी आणि बचावफळीच्या दरम्यान 'रोड शो' करावा, काही वेळा पेनल्टी कॉर्नरच्या 'कोपरा सभा' घ्याव्यात व बोलत-चालत एक असा टोला लगावावी की डायरेक्ट प्रतिपक्ष भुईसपाट. शरदकाका पवारांच्या 'रात्रीत मतदान फिरवले' च्या आख्यायीका आपण जर नुसत्याच ऐकल्या असतील तर मेस्सीसाहेबांचा 'एका चालीत गेम पलटवला' हा खेळ पाहणे ही आपल्यासाठी नक्कीच पर्वणी असेल.
कुठल्याही पक्षाला हवा असणारा हा'फायरब्रँड, तडाखेबंद, धडाडी'चा १० नंबरची जर्सी घालणारा नेता .... लियोनेलरावचंद्रजी मेस्सीसाहेब !. 'कार्लोस'दादा तवेझ :
अर्जंटिना ह्या पक्षाच्या 'दादा' ह्या पदाला १००% पात्र अशी ही असामी 'कार्लोस'दादा तवेझ, अगदी शेम टु शेम आपल्या नारायणदादा राण्यांसारखी. तसाच बेघडकपणा, तोच तेजतर्रारपणा, तीच भेदक चाल आणि तसेच देवाला ओवाळुन टाकल्यासारखे प्रतिपक्षाच्या टेरिटरीत बेगुमान हुंदडणे. कार्लोसदादा ह्या पक्षाचे आघाडीच्या फळीचे नेते, रोज उठुन प्रतिपक्षाला फैलावर घेणे, त्यांच्याशी झुंबडी घेणे, उगाच हाणामार्‍या होण्याची परिस्थीती निर्माण कारणे, आपल्या व्यक्तिमत्व व माणसे जोडायच्या कसबीवर एखादी अवघड असणारी जागा सहज जिंकुन आणणारे आमचे कार्लोसदादा. हळुहळु कार्यकर्ते जोडत हे स्वतःच कधी बेगुमानपणे प्रतिस्पर्धी पक्षात घुसुन त्यांची गोलकिपरच्या डायरेक्ट धोतराला हात घालुन व गोल डागुन कधी त्याची इज्जत चव्हाट्याला मांडतील ह्याचा नेम नाही.
तशी वेळ आलीच तर थेट प्रतिस्पर्ध्यांची टाळकी फोडण्यासाठी ख्याती असलेले (गेल्या चॅम्पियन्स लीगला मॅन-यु कडुन खेळताना त्यांनी असाच राडा केली व त्याला तोंड देण्यासाठी चेल्सीला आपला ड्रोग्बा शहिद करावा लागला ) कार्लोसदादा आपल्या पक्षातली 'अत्यंत फटकळ तोंडाचे' म्हणुन प्रसिद्ध आहेत.
पण एकदा का जीव टाकला जी पक्षासाठी एक तर स्वतःचा जीव देतील किंवा समोरच्याचा जीव घेतील असे मिस्टर डेपेंडिबल .... कार्लोसदादा तवेझ !३. गोंझालोजी हायग्वेन-महाजन :
अर्जेंटिना ह्या पक्षाचा सर्वात सभ्य, सुसंस्कॄत, प्रामाणिक, कष्टाळु , स्वतःची एक खैळिक बैठक असणारा 'पक्षाचा चेहरा'. मी ह्यांची तुलना डायरेक्ट प्रमोदजी महाजनांशी करत असल्याने आपल्याला गोंझालोजींच्या व्यक्तिमत्वाचा बर्‍यापैकी अंदाज आला असेलच. आपल्या पक्षासाठी अत्यंत शिस्तबद्ध चाली व कार्यक्रम रचुन ते जातीने लक्ष घालुन व 'गोल'रुपाने ते राष्ट्राला अर्पण करुन एक 'कामसु, हमखास काम करणारा, देशाचे प्रेरणास्थान' वगैरे विषेशणाला गोंझालोजी हायग्वेन पुरेपुर उतरतात.
संघापुढे कसलीही समस्या असु देत, गोंझालोजी आपली सर्व ताकद पणाला लाऊन बाजी पलटवणार हे निश्चित. भाजपाचे हायकमांड जसे सगळे काही प्रमोदजी महाजनांच्या खांद्यावर सोपवुन स्वतः झोपा काढत तसे अर्जेंटिनाने केली तर हे महाशय २-३ मिडफिल्डर्स हाताशी धरुन यशाचा झेंडा नक्कीच नाचवतील असे खुद्द त्यांचे प्रतिस्पधी बोलुन दाखववतात.
कसल्याही घोटाळे, राडे, कट-कारस्थानं, षडयंत्र, चिखलफेक ह्यापासुन स्वतःला दुर ठेऊन आपले काम प्रामाणिकपणे करुन सदैव पक्षाच्या भल्यासाठे झटणारे व नेहमीच विजयश्रीची भेट देणारे हे .... गोंझालोजी हायग्वेन-महाजन !
. ज्युआन'दादा' वेरॉन-पवार :
आम्ही त्यांच्या नावात 'दादा' व 'पवार' हे दोन्ही शब्द वापरले त्यावरुन हा असामी नक्की काय असेल ह्याचा आपल्याला अंदाज आलाच असेल. ;)
जसे महाराष्ट्रात 'सकाळी सकाळी उठुन दादांच्या भेटीला जाऊ नये' हा अलिखित संकेत आहे त्याप्रमाणे फुटबॉलमध्येसुद्धा 'शक्यतो वेरॉनदादांच्या नादी लागु नये' असा अलिखित संकेत आहे, मग काय हो उगाच खेळता खेळता ' काय रे *डव्या, मस्ती आली का तुला ? ' अशी मुक्ताफळे कोण ऐकुन घेईल ? एकदा का भांडणे लागली की वेरॉनदादा असा तोंडाचा पट्टा सोडतात की त्यासमोर "वाटले तर अजुन ४ गोल करा पण वेरॉनदादांचे तोंड आणि हात आवरा' असेच प्रतिपक्ष म्हणतो.
तसे म्हणले तर पक्षाच्या 'मध्यफळी' ह्या पक्षबांधणीच्या कामाला जुंपलेले हे वेरॉनदादा उगाच कधी 'आघाडी'त घुसुन दांडगाई चालु करुन एखादा गोल करतील ह्याचा काही काही भरोसा नाही.
आपल्या अजितदादांच्या 'फटाफट फायली क्लियर करण्याच्या' स्टाईलप्रमाणेच ह्यांची 'फटाफट पासेस कंप्लिट करुन कधी एकदा गोल मारतो, कधी एकदा सामना संपतो व मी कधी एकदा डाकबंगल्यावर जाऊन पडतो' हीच शैली असते. ह्यांच्या 'पासेस्'च्या सुसाट वेगाच्या कामासमोर प्रतिपक्षाची सोडाच पण अहो स्वतःच्या पक्षाच्या नेतेमंडळी व नोकरशहांची फे-फे उडते.
पण कसेही असले तरी वेरॉनदादांचा एक दरारा आहे, त्यांच्यामुळे कामे होतात, प्रतिपक्ष टरकुन वागतो हे सत्य आहे !
. झेव्हियर'आबा' मॅशेरानो-पाटील :
एक जुना-जाणता, कष्टाळु, शुन्यापासुन सुरवात करुन कठोर मेहनतीने जुन्या जमान्यातल्या एक उत्तम पक्षबांधणी करणारा व पक्षाचे स्थान मजबुत करणारा 'मध्यफळी'तला नेता अशी ख्याती असलेल्या झेव्हियर'आबां'ना आता उतारवयात हायकमांडने 'कर्णधार पदाचे बक्षिस देऊन' त्यांच्या कार्याची योग्य किंमत केली असेच आम्हाला वाटते.
ही त्यांची शेवटचीच निवडणुक व आपल्या कारकिर्दीत पक्षाला 'निर्विवाद बहुमत' मिळवुन देण्याची ते इच्छा ठेवतात व आपल्या वयाचे जास्त कौतुक करुन न घेता अजुन 'मध्यफळी'त जिवाचे रान करतात.
आपल्या पक्षातल्या आघाडीच्या फायरब्रँड नेत्यांना योग्य कुमक पुरवणे, सर्व ठिकाणी पक्षनिधीची विनियोग उत्तम होतो आहे का ह्याची जातीने पहाणी करणे, कधी ग्रासरुटलेव्हलवरच्या बचावफळीतल्या 'भेगा बुजवणे' व त्यांना चुचकारुन पुन्हा उभे करणे आदी सर्व प्रकारची कामे झेव्हियरा'आबा' अगदी सराईतपणे करतात.
अनेक उन्हा-पावसात अनेक देशातल्या अनेक फिल्डवर खेळण्याचा रग्गड अनुभव पाठिशी असणारे जुने-जाणते झेव्हियर'आबा' मॅशेरानो-पाटील हे पक्षाच्या ह्या निवडणुकेच्या मोहिमेसाठी एक घटक आणि एक नेता म्हणुन अत्यंत महत्वाची असामी !. मार्टिन'भाई' डिमिचेलिस :
महाराष्ट्राच्या राजकारणात 'भाई' एकच ... छगनभाई भुजबळ !
अर्जेंटिनाच्या संघातही "भाई" एकच ... मार्टिन'भाई' डिमिचेलिस !
मार्टिन'भाई' काय करत नाहीत म्हणुन तुम्हाला सांगु ? अहो सर्वगुणसंपन्न असे पक्षाचे आशास्थान आहे हे. तसे म्हणले तर हे "बचावफळी"च्या 'सेंटर-बॅक" ह्या पोझिशनला खेळतात.
छगनभाई जसे जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे एकटेच आमदार असतानासुद्धा सरकारी पक्षाच्या मंत्र्यांना सळो की पळो करुन सोडायचे तसेच आमचे मार्टिन'भाई' जरी कर्मयोगाने आपल्या गोलक्षेत्रात बचावासाठी एकटेच उरले तरी प्रतिपक्षाच्या 'आघाडीच्या नेत्याचे' एक चालु देत नाहीत, अगदी त्याच्या मुसक्या बांधुन त्याला परत पाठवतात व वर हल्ला परतवल्यावर आपल्या गोलपोस्टचे 'शुद्धीकरण' करुन घेतात, आता बोला !
गेल्या चॅम्पियन्स लीगमध्ये ह्यांच्या धडाधड टॅकल्ससमोर मॅन-युचे भले भले खंदे वीर साफ शरणागती पत्करुन कपाळमोक्ष करुन घेऊन गेले व ह्यांनी प्रतिपक्षाचा मोर्चा काही आपल्या 'बालेकिल्ल्यात' घुसु दिला नाही.
छगनभाईंप्रमाणे प्रतिपक्षाच्या क्षेत्रात ह्यांचा एकदा पेनल्टीवेळी उड्यांचा पट्टा सुरु झाला भल्याभल्यांची फे-फे उडते व त्या घोळात हे कधी गोल मारुन नाचत, वाजतगाजत, मिरवणुकीने आपल्या गोलक्षेत्रात परत येतात हे कुणालाच कळत नाही.
असे हे पक्षाची ताकद आणि बचाव दोन्ही असलेले .... मार्टिन'भाई' डिमिचेलिस !

And last but Not the least ...

कुठल्याही पक्षात किंवा एकंदर राजकारणतच "साहेब" ह्या उपाधीला फार मोठ्ठे महत्व आहे, आज गल्लीबोळात जरी अनेक स्वयंघोषीत साहेब दिवसागणीक निर्माण होत असले तरी खरे साहेब दोनच ... बाळासाहेब आणि पवारसाहेब.
अर्जेंटिना ह्या पक्षाचे 'साहेब' मात्र दुसर्‍या साहेबांच्या जराश्या जवळ जाणारे ... दिएगो मॅराडोनासाहेब !
'साहेब' हा विषेशणाला पात्र ठरण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते, रस्त्यावर उतरुन रक्त आटवावे लागते, विरोधकांच्या 'फायली' तयार कराव्या लागतात व वेळ येईत तशा त्या एक तर दडपाव्या लागतात किंवा खोलाव्या लागतात, पक्षाचे नेतृत्व करावे लागते, आघाडीवर लढुन विजयश्री खेचुन आणावी लागते, पराजय झाल्यास प्रांजळपणे तो स्विकारुन वर आपल्या सहकार्‍यांचे मनोधैर्य टिकवावे लागते व पुढच्या संघर्षासाठी जोमाने पुन्हा उभे रहावे लागते.
साहेब होणे ही की काही चेष्टीची बाब नाही गुरु, बहुत पापड पेलने पडते है आणि छोटी छोटी गल्तीया टाळाव्या लागतात.
मात्र 'मॅराडोना'साहेब ह्यासाठी अगदी अचुक पात्र ठरतात, त्यांचे व्यक्तिमत्वच तसे आहे.
त्यांनी पद स्विकारले व लिजंडरी 'पेले' ने त्यांच्यावर "पैशासाठी हा प्रशिक्षक झाला" असा बॉंम्ब टाकला, ह्यापेक्षा अजुन तुम्हाला वेगळा काय पुरावा हवा मॅराडोना "साहेब" असण्याचा ?
स्वतःच्या उमेदीच्या काळात "हँड ऑफ गॉड" ने का होईना १९८६ साली स्वबळावर सरकार स्थापन करुन दाखवण्याची किमया मॅराडोनासाहेबांनी केली.
ऐन भरात असताना प्रतिपक्षाच्या मैदानावर आपल्या पायांतुन निघणार्‍या फटक्यांनी व मैदानाबाहेर तोंडातुन निघणार्‍या मुक्ताफळांनी पार वाताहत करुन टाकली, स्वतःच्या पक्षाला अनेक सन्मान मिळवुन दिले.
आजही त्यांचे वय झाले असले तरी फुटबॉल विश्वात त्यांच्या शब्दाला किंमत आहे व अजुनही त्यांचे ह्या 'वर्तुळा'त स्वतःचे असे खास स्थान आहे.
असे आहेत अर्जेंटिना पक्षाचे प्रशिक्षक .... दिएगो मॅराडोना साहेब !

--------------------------------------------------------------------------
आता तुम्ही म्हणाल की अर्जेंटिना पक्षाची ताकद व कच्चे दुवे काय आहेत ?
अहो वर जे लिहले ती सगळी ताकद आहे वे तेच कच्चे दुवे आहेत.
अहो जिकडे हात घालीन तिकडे सोने काढणारे अनेक पाटील-देशमुख-पवार हे जशी काँग्रेस-राष्ट्रवादीची नेहमीची विश्वासाची ताकद असते तसे तेच सगळे 'दादा-भाई-काका-राव' वगैरे ग्रह फिरले की कच्चे दुवे बनतात.
ह्यालाच राजकारण व ह्यालाच खेळ म्हणतात.
अहो राजकारण हासुद्धा एक खेळ आहे आणि खेळसुद्धा राजकारणापासुन अजिबात अलिप्त नाही.
मग त्यांचे नियम कसे बदलतील ?

आता तुम्ही विचाराल आमचा अंदाज काय ?
अहो समोर आपला कंप्लिट बाजार उठणार हे शिवसेनेतल्या नेत्यांना माहित असतानासुद्धा ते 'स्वबळावर सत्ता' हा दावा करतातच की. तर महत्व आहे ते लढण्याला, खेळात आणि राजकारणात हार-जीत चालतच असते.
मुंबईत काँग्रेसच्या ऐन भरात असणार्‍या स.का. पाटलांची माती करणार्‍या शिवसेनेच्या ढाण्यावाघासारखीच भल्याभल्यांना धुळ चारण्याची ताकद अर्जेंटिनात नक्कीच आहे व ह्याच शिवसेनेने अविचारात किंवा अतिआत्मविश्वासात ह्यावेळी माहिममध्ये 'वहिनीसाहेब बांधेकरांसारखा' कच्चा उमेदवार देऊन जी स्वतःची माती करुन घेतली तीच मानसिकता आणि तोच अतिआत्मविश्वास ह्या अर्जेंटिना संघात आहे.

पुढचा सामना आहे तो लढावय्य जर्मनीशी, जो व्यवस्थित खेळेल तो त्यादिवशीची गेम जिंकेल, सो सिंपल !
पण अर्जेंटिनामध्ये ह्यावेळी "स्वबळावर सरकार स्थापन करण्याची पात्रता नक्कीच आहे" असे सांगतो व मी माझे ४ शब्द संपवतो.

तर ....
विचार करा पक्का आणि अर्जेंटिनाच्या चिन्हावर मारा शिक्का !

अरे येऊन येऊन येणार कोण ? अर्जेंटिनाशिवाय आहेच कोण ?

बघतोयस काय रागाने ? कच्चा खाल्ला अर्जेंटिनाने !9 comments:

Pankaj - भटकंती Unlimited said...

अफाट भारी.

विनोदकुमार शिरसाठ said...

एकदम झकास .........

मनमौजी said...

जबर्‍या....च्यामारी एकदम धरून फट्याक!!!

आनंद पत्रे said...

जबरेश्ट (जबरदस्त आणि बेष्ट )

THE PROPHET said...

मस्त एकदम भाऊ!
आवडलं!

मुक्त कलंदर said...

डॉनराव झक्कास गोल केला राव तुम्ही....

रोहन चौधरी ... said...

दोन भाई... मस्त लिहिलंय.... तुलना भारी. वाचताना मला उगाच ह्या फोटोंच्याऐवजी आपल्या पवार, पाटील, राणे आणि महाजन यांचे फोटो दिसत होते ... हा हा .... आवडले... १ नंबर...

Anonymous said...

1 Number mitra!!! layeech bhaari...chaludyat niwant

madhura said...

hey mr chota don, 1 rqst. can i get blog address of ur friend mr prashant (famous Tarzan on Misalpav) pls email it to me on mrsmadhurakadam@gmail.com