Tuesday, June 15, 2010

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - स्पेन : दी रेड फ्युरी ...

आले ...
ते
आले आहेत ...
फुटबॉल
विश्वचषकाच्या महासंग्रामासाठी दक्षिण आफ्रिकेच्या कुरुक्षेत्री ते डेरेदाखल झाले आहेत...

ते आले आहेत एका विजेत्याच्या उन्मादात ...
ते आले आहेत आपल्या लाखो
पाठिराख्यांच्या मुखातुन निघणार्‍या विजयी गर्जना आणि लाखो पावलांनी केलेल्या विजयी नृत्याच्या पदन्यासासह ...
ते आले आहेत ते आपल्या देशाचा राष्ट्रध्वज घेऊन, जो त्यांनी संपुर्ण पात्रता फेरीत निर्विवाद विजयाच्यादिमाखाने आणि अभिमानाने फडकत ठेवला होता व आता तोच राष्ट्रध्वज घेऊन ते सज्ज झाले आहेत ह्या विश्वचषकाचे मैदान मारण्यासाठी ...
ते आले आहेत आपल्या समोर येणार्‍या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला चिरडण्यासाठी, मैदानावर त्यांना चारीमुंड्या चीत करुन आपल्या लाखो पाठीराख्यांना आणि आपल्या राष्ट्राला एका अतुलनीय विजयश्रीची भेट देण्यासाठी ...
पात्रता फेरीतल्या १० सामन्यांमध्ये चक्क १० विजयांचे झळाळत्या सोन्यासारखे चोख यश घेऊन त्यांना आपला राष्ट्रध्वज दिखामात फडकत ठेवला. एकुण १० सामन्यांमध्ये त्यांनी तब्बल २८ गोलांची बरसात करुन व केवळ ५ गोल खाऊन त्यांनी आपला अश्वमेध १० सामन्यांमध्ये ३० गुणांसह दिमाखात पुर्ण केला.
"१० सामने - १० विजय - ० बरोबरी - ० पराभव" अशी दृष्ट लागेल अशी आकडेवारी घेऊन ते कुरुक्षेत्री दाखल झाले आहेत.
त्यांच्या स्ट्रायकर्सनी प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीच्या भिंती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळवल्या, त्यांच्या आक्रमणाच्या धडकांसमोर समोर बचावाचे काम करणारे मिडफिल्डर्स पाल्यापाचोळ्यासारखे उडुन गेले, त्यांच्या विद्युल्लतेची चपळाई घेऊन आणि वार्‍याचा वेग घेऊन मारलेल्या फटक्यांसमोर प्रतिस्पर्ध्यांचे सारे गोलरक्षक हतबद्ध होऊन चारीमुंड्या चीत झाले.
ह्यांच्या मिडफिल्डर्ससमोर प्रतिस्पर्धी प्रशिक्षक आणि मिडफिल्डर्स ह्यांनी रचलेले 'व्युव' चक्रीवादळात उडणार्‍या पालापाचोळ्यासारखे उडुन गेले, महाभारताच्या कुरुक्षेत्री संपुर्ण युद्धभुमीवर अनिर्बंध आणि बेधडक धुमाकुळ घालणार्‍या भीम-अर्जुनासारखा ह्यांच्या मिडफिल्डर्सनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात धुमाकुळ घातला व संपुर्ण वर्चस्व मिळवले. ह्यांच्या मिडफिल्डर्सनी रचलेल्या चाली पहाताना प्रतिस्पर्ध्यांची गत महाभारतासारखे चक्रव्युव भेदुन बेधडक आत घुसणार्‍या अभिमन्युकडे कौरवसेना जशी आश्चर्याने पहात बसली होती तशी झाली होती.
धारदार आक्रमणाइतकाच ह्यांचा बचावही अभेद्य, ह्यांच्या बचावपटुंनी आपल्या गोलक्षेत्रात बचावाच्या अशा कणखर भिंती उभारल्या की प्रतिपक्षी स्टायकर्स त्यावर डोके आपटुन दमले पण हा बचाव काही त्यांना भेदता आला नाही. प्रतिपक्षाची एक से एक धारदार आक्रमणे ह्या बचावफळीसमोर निष्प्रभ ठरली व त्यांना हात हालवत निघुन जावे लागले.शोलेमधला "हमारें इजाजत के बिना यहाँ परिंदाभी पर नहीं मार सकता" हा डायलॉक ह्यांच्या बचावफळीने व गोलरक्षकाने शब्दशः खरा करुन दाखवला.


आता ते आले आहेत दक्षिण आफ्रिकेतल्या मुख रणभुमीत, ते सध्या आहेत भयंकर फॉर्मात आणि जोशात, त्यांना पाठिंबा आहे तो अंगावर राष्ट्रध्वज नाचवत आरोळ्यांनी त्यांना प्रोत्साहन देणार्‍या त्यांचा लाखो देशवासियांचा आणि इतर करोडो पाठिराख्यांचा ...
ते आले आहेत मैदान मारण्याच्या इर्शेनेच, समोरच्या टीमला चिरडुन त्यांची विजयश्री मिळवण्याच्या हेतुनेच ...
ते आहेत "दी रेड फ्युरीज ... "
ते आहेत " स्पेन : दी स्पॅनिश फ्युरी , दी रेड फ्युरी ... "

स्पेन :

रियाल माद्रिदसारख्या जायंट क्लबच्या मिडफिल्डचा कणा असलेला आणि त्यांचे प्रमुख अ‍ॅटॅकिंग टॅलेंट तसेच 'प्लेमेकर' अशा विविध भुमिका बजावणार्‍या अनुभवी "झॅबी ओलेन्सो" च्या नेतॄत्वाखाली ह्यावेळी स्पेन विश्वचषकाला सामोरे जात आहेत. रियाल माद्रिद, बार्सिलोना, सेव्हिली, लिव्हरपुल , व्हॅलेंसिया अशा एकाहुन एक दादा क्लबमधुन खेळणार्‍या व त्या त्या संघाचे "सुपरस्टार" असणार्‍या खेडाळुंचा भरणा असलेला हा "टीम ऑफ चॅम्पियन्स" ह्यावेळी खरोखर विश्वचषकाची "चॅम्पियन टीम" ह्या पदासाठी आपला दावा मजबुतीने पेश करत आहेत.
१९७८ नंतर सातत्याने विश्वचषकाला पात्र ठरुनही त्यांनी मजल कधीही 'उपांत्यपुर्व सामन्याच्या पुढे" गेली नाही.
२००२ सालच्या कोरियन विश्वचषकात त्यांना काही वादग्रस्त निर्णयांमुळे कोरियाकडुन पनल्टी शुट आउटमध्ये मात खाऊन बाहेर पडावे लागले, त्यानंतर त्यांनी टीमची संपुर्ण फेररचना केली व आज त्यांनी त्यांच्या टीमला चॅम्पियन्सच्या क्षमतेला आणुन ठेवले.
२००८ सालचे युरोकपविजेत आणि २००९ च्या फिफा कॉन्फिडरेशन कपमध्ये तिसरा क्रमांक असे दिमाखदार रेकॉर्ड घेऊन ते ह्या विश्वचषकाला सामोरे जात आहेत.
मध्यंतरीच्या काळात त्यांच्या अनेक खेडाळुंनी 'इंग्लिश प्रिमियर लीग, इटालियन लीग, स्पॅनिश लीग आणि चॅम्पियन्स लीग' अशा अनेक स्पर्धा आपल्या खतरनाक आणि नैपुण्यवान खेळाने गाजवल्या व आपापल्या क्लबच्या गळ्यातले ते ताईत आहेत.
आता ते खेळणार आहेत ते मायदेशासाठी, आपल्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी व आपल्या करोडो पाठिराखांच्या आशा-अपेक्षांना योग्य न्याय देऊन त्यांना ह्या "विश्वचषकाची भेट" देण्यासाठी.

संघ :
(प्रत्येक खेडाळुच्या पुढे कंसात दिलेले त्याच्या सध्याच्या क्लबचे नाव त्या खेडाळुचा लौकिक सांगण्यास पुरेसे आहे.)

गोलरक्षक : इकर कॅसिलास (रियाल माद्रिद), पेपे रैना (लिव्हरपुल), व्हिक्टर वाल्देस (बार्सिलोना)

बचावफळी : चार्लस पुयॉल (बार्सिलोना), जेरार्ड पिके (बार्सिलोना), राऊल अल्बालियो (रियाल माद्रिद), सॅकियो रॅमॉस (रियाल माद्रिद), कार्लोस मार्चेना (व्हॅलेंसिया), अल्वॅरो अर्बिलोआ (रियाल माद्रिद), योहान कॅप्डिविला (विल्लेरियाल)

मिडफिल्डर्स : आन्द्रेयस इनियेस्टा (बार्सिलोना), शॅबी हर्नाडेझ (बार्सिलोना), चेक फॅब्रिगास (आर्सनेल), झॅबी ओलेन्सो (रियाल माद्रिद), सर्जियो बिस्किट्स (बार्सिलोना), डेव्हिड सिल्वा (व्हॅलेंसिया), झिझस नवास ( व्हिली ), झॅवी मार्टिनेझ (अ‍ॅथलेटिक बिल्बायो), जोआन मॅन्युअ माटा (व्हॅलेंसिया)

स्ट्रायकर्स : डेव्हिड व्हिला (बार्सिलोना), फर्नांडो टोरेस (लिव्हरपुल), पेड्रो ऱोड्रिगेझ (बार्सिलोना), फर्नांडो लॉरेन्ट (अ‍ॅथलेटिक बिल्बायो)


ज्यांनी स्पॅनिश लीग पाहिली असेल त्यांना टिपीकल बलदंड आणि अवाढव्य अशा स्पॅनिश बचावपटुंमधुन तुरुतुरु धावत चपळाईने गोल करुन गोलांचा अक्षरशः रतिब घालणारा एक छोट्या चणीचा 'व्हॅलेंसिया'चा स्ट्रायकर आठवत असेल, तोच हा "डेव्हिड व्हिला". ह्या सिझनमधला सर्वात जास्त चर्चेत असणारा खेळाडु. नुकतेच त्याला बार्सिलोना ह्या जायंटने तब्बल ४० दशलक्ष युरो एवढी किंमत मोजुन आपल्या संघात सामिल करुन घेतले. लियोनेल मेस्सी, पेड्रो, झ्लाटान इब्राहिमोविच अशी बलदंड आघाडीची फळी असणार्‍या बार्सिलोनाला पुढच्या सिझनला 'चॅम्पियन्स लीग' जिंकण्यासाठी आपल्या टीममध्ये 'डेव्हिड व्हिला' हवा असे वाटते ह्यातच सर्व काही आले. आजच्या घडीला जगात एक अत्यंत भरवश्याचा स्ट्रायकर अशी व्हिलाची ओळख.
गोल करण्याच्या १० संधींपैकी ९ वेळा हमखास गोल करणार अशी त्याची ख्याती, एक सुप्रिम फिनिशर. अप्रतिम पदन्यासाचे ड्रिब्लिंग कौशल्य, बॉलवर अचुक नजर व त्याचा अचुक अंदाज, दुरवरुन शॉट मारताना लागणार्‍या ताकदीची करेक्ट कॅल्क्युलेशन व अप्रतिम शारिरीक समतोल ह्या त्याच्या खास बाबी.
स्ट्रायकर असुनही आपल्या सहकार्‍यांना योग्य पासेस देण्याचा नावलौकिक व त्यामुळे कदाचित ह्याचा नावावर 'गोल असिस्ट'चेही दमदार रेकॉर्ड.

ब्रिटिश क्लब लिव्हरपुलच्या लालेलाल जर्सीमध्ये त्याहुन लालबुंद होऊन जोरदार धावणारा हा त्यांचा प्रमुख स्ट्रायकर 'फर्नांडो टोरेस', त्यांच्या व सध्या स्पेनच्या आघाडीचा प्रमुख महारथी. संघाची पणाला लागलेली इज्जत संभाळण्यासाठी नेहमीच अत्युच्च पर्फॉर्मन्स देण्याचा ह्याचा लौकिक. २००८ च्या युरो कपच्या वेळी ह्याचा साथिदार व्हिला जखमी असताना ह्याने गोल करुन आपल्या संघासाठी विजयश्री खेचुन आणली व देशाचा तब्बल ४४ वर्षांचा आंतरराष्ट्रीय चषकाचा दुष्काळ संपवला, असा हा "यदा यदा ही संघस्य, ग्लानिर्भवती मैदान ..." साठी धावुन येणारा आमचा लाडका "फर्नांडो टोरेस".
हवेतला खेळ करणार्‍यांमध्ये सर्वोत्कृष्ट, वेगवान आणि चापल्ययुक्त खेळाचा बादशहा, लाँग पासेस करेक्ट रीड करुन ते गोलमध्ये बदलण्याचे कौशल्य, काही खास ड्रिब्लिंग आणि स्प्रिंट स्कीलची खासियत, पेनल्टी स्पेशालिस्ट आणि परफेक्ट टीम प्लेयर असे टोरेसचे वर्णन करता येईल.
पण आमचा हा टोरेस शरिराने इतरांच्या जरासा नाजुक असल्याने बलदंड आणि धसमुसळा खेळ करणार्‍या बचावपटुंसमोर जरा बिचकतो, ह्याच बाबींमुळे ह्याच्या दुखापतींची संख्याही बरीच आहे, एवढीच एक चिंतेची बाब.


रेमंड त्यांच्या जाहिरातीत म्हणते ना "दी कंम्पिट मॅन ..." तसेच 'आन्द्रेयस इनियेस्टा'च्या बाबतीत म्हणतात " दी कंम्पिट फुटबॉलर ...".
फुटबॉल बॉलवर त्याचे प्रेम, त्याचा कंट्रोल वादातीत आहे. बासिलोना आणि स्पेनचा आघाडीचा फिडफिल्डर आणि "प्लेमेकर" अशी इनियेस्टाची थोडक्यात ओळख. कुठल्याही पोझिशनला खेळु शकणारा आणि संघाच्या कुठल्याही अपेक्षा पुर्ण करणारा हा त्या संघाचा मुख्य आधारस्तंभ. आघाडीच्या स्ट्रायकर्सना गोल करण्यासाठी बॉल देतादेता हा पठ्ठ्या स्वतः बॉल कधी जाळ्यात धाडतो हे प्रतिस्पर्धी संघाला कळतही नाही, पासिंगचा आव आणत क्षणार्धात पलटी मारुन लांबुन जोरदार फटक्याने बॉल जाळ्यात धाडणारा हा इनियेस्टा, पेनल्टी कॉर्नर घेणारा आणि बॉल करेक्त गोलपोस्टसमोर हळुवारपणे आणुन सोडण्याचे कौशल्य. फ्री-किकसाठी सर्वात भरोश्याचा खेळाडु.
एकदम लै भारी ड्रिब्लिंग कौशक्य, चपळता, बॉलचा अचुक अंदाज व त्यावर नजर, लहान-मोठ्ठे असे सर्वच पासेस अचुक देण्याचे व आघाडीशी योग्य समन्वय साधण्याचे कौशल्य.
अडचणीचे मुद्दे म्हणजे त्याचा फिटनेस, जरी त्याचा स्टॅमिना भयंकर असला तरी मध्यम चणीच्या शारिरयष्टीमुळे जखमी होण्याचा संभव जास्त असतो व त्याचा बिनधास्त भिडण्याचा स्वभाव ह्याची रिस्क जास्त वाढवतो. मॅन टु मॅन मार्किंगमध्ये ह्याला पॅक केल्यास हा मनाजोगता खेळ खेळु शकत नाही हा एक कच्चा दुवा.

झॅबी ओलेन्सो हा जगातल्या सर्वोत्तम मिडफिल्डर्सपैकी एक, झॅबी ओलेन्सो हा जगातल्या सर्वोत्तम 'प्ले मेकर्स'पैकी एक.
रियाल माद्रिदसारखा जायंट क्लबचा कप्तान, आघाडीचा मिडफिल्डर आणि प्लेमेकर असलेला झॅबी सध्या स्पेनच्या कप्तानीची धुरा संभाळत आहे. मिडफिल्डच्या केंद्रात खेळणारा झॅबी हा ४०-५० यार्डचे अचुक पासेस देण्यात माहिर आहे, तसेच बचावपटुंच्या गर्दीतुन योग्य वेळी आणि योग्य वेगातुन बॉल काढुन तो स्ट्रायकर्सकडे ढकलणे ही झॅबीची खासियस. इनियेस्टाप्रमाणे हा ही पेनल्टी स्पेशालिस्ट.
झॅबीच्या नावावर जास्त गोल नसले तरी त्याने असिस्ट केलेल्या आणि त्याने रचलेल्या चालीवर झालेल्या गोलांची संख्या ढीगाने आहे.

चेक / झेक फेब्रिगास ...
ज्याच्यासाठी आर्सनेल आणि बार्सिलोना ह्या २ दादा क्लबच्या सामान्य खेळाडुपासुन ते पार कॅप्टन आणि थेट मालकापर्यंत सगळ्यांनाच बोली लावायला लागली, असा हा महान योद्धा फॅब्रिगास.
अगदी लहान वयापासुन बार्सिलोनाच्या अ‍ॅकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेऊन खेळाचे बारकावे शिकलेला व स्पॅनिश फुटबॉल अगदी कट टु कट आत्मसात केलेला फॅब्रिगास हा प्रत्येक क्लबचा व खुद्द स्पेनचा आवडता खेळाडु झाला ह्यात नवल ते काय ?
अप्रतिम पासिंग कौशल्य, प्रतिस्पर्ध्याच्या गोलक्षेत्रात बेधडक घुसण्याकडेचा आणि दणकेबाज शॉट्स मारण्याकडेचा कल ह्या त्याला एक उत्तम मिडफिल्डर बनवतात पण त्याबरोबर त्याचा बॉलचा अचुक अंदाज, सहकार्‍यांशी योग्य ताळमेळ, प्रत्येकाच्या स्टाईलनुसार त्याच्याशी जुळवुन घेऊन त्याला सपोर्टिंग खेळ करण्याचे कौशल्य ह्यामुळे फॅब्रिगास हा एक उत्तम 'प्ले मेकर' म्हणुन ओळखला जातो. २५-३० यार्डावरुन मारलेली फ्री-किक सर्वांना चुकवुन अचुक जाळ्यात धाडण्यात ह्याचा हातखंड.
अजुन एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फुटबॉलमधला सर्वात सभ्य खेळाडु असा त्याचा लौकिक, सर्वात कमी बुकिंग्स आणि फाऊल त्याच्या नाववर आहेत.

जेव्हा प्रतिस्पर्ध्यांचे मिडफिल्डर्स किंवा स्ट्रायकर्स सर्वांना चुकवुन बॉल घेऊन स्पेनच्या गोलपोस्टपुढे धावत येतात त्यांना समोर दिसतो तो एक अवाढव्य शरिरयष्टी असलेला, अस्ताव्यस्त केस वाढलेला आणि दात-ओठ खाउन त्यांच्याकडे बेगुमान धावत येणारा एक राक्षस. झाले, त्यांचे निम्मे अवसान इथेच संपले व तो राक्षक त्यांच्याकडुन बॉल कधी काढुन घेतो किंवा त्याला घाबरुन हे त्याला बॉल कधी बहाल करतात हे त्यांनाही कळत नाही. तो राक्षस असतो ... पुयॉल.
पुयॉल म्हणजे स्पेनचा ( आणि बार्सिलोनाचाही ) सेंटर बॅक ह्या गोलचे रक्षण करणार्‍या बचावफळीचा मुख्य कणा.
पेनल्टीच्यावेळी आणि स्वतःच्या गोलच्या बचावावेळी हवेतला अप्रतिम खेळ हे पुयॉलचे वैशिष्ठ्य. प्रतिस्पर्ध्यांच्या मॅन टु मॅन मार्किंगमधला तज्ज्ञ. बेधडक टॅकल्स ( ज्यामुळे बहुतेकवेळा यलो / रेड कार्डाचा धनी ) , अप्रतिम क्लियरन्सेस, अगदी सहजतेने ६०-६० यार्डाच्या फ्री-किक्स आदी गोष्टी पुयॉलला जगातल्या सर्वश्रेष्ठ डिफेंडरमधला एक महत्वाचा असामी बनवतात.
ह्या सर्वांहुन अधिक म्हणजे पुयॉलचे नेतॄत्वगुण, सध्या तो बार्सिलोना ह्या क्लबचा सर्वात लोकप्रिय कर्णधार आहे.
स्वतःच्या संघासाठी "मिस्टर रिलायबल" असणारा पुयॉल हा प्रतिस्पर्ध्यांसाठी मात्र खुप धोकादायक आहे, त्याच्या एखाद्या खतरनाक टॅकलमुळे त्यांचा एखादा महत्वाचा खेळाडु जायबंदी होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊनच त्यांना पुयॉलला सामोरे जावे लागते व त्यांचा निम्मा जोश तिथेच संपते हे पुयॉलचे यश.

जगातला सर्वात श्रेष्ठ फुल बॅक कोण ही चर्चा "सॅकिओ रॅमॉस'चे नाव त्या यादीत घेतल्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. आधी होल्डिंग मिडफिल्ड किंवा सेंटर बॅकला खेळणारा रॅमॉस हळुहळु कधी साईडहुन खेळायला लागला, कधी आपल्या पोझिशनपासुन ते पार प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रापर्यंत धुमाकुळ घालु लागला व स्ट्रायकर्सना क्रॉस देऊ लागला व स्वतः डिफेंडर असुनही गोलांची बरसात करु लागला हे सगळे आश्चर्यच आहे. आजही तो कोणत्याही पोझिशनला आरामात खेळु शकतो.
आज तो रियाल माद्रिदसारख्या दादा क्लबचा प्रमुख साइडबॅक म्हणुन अभिमानाने आपले बिरुद मिरवतो.
छोट्या चणीची शरिरयष्टी असलेला रॅमॉस अत्यंत चपळाईने हालचाली व ड्र्ब्लिंगसाठी प्रसिद्ध आहे. अक्षरशः १०-१० फुट घसरत मारलेल्या त्याच्या स्लायडिंग टॅकल्स आणि त्यानंतर चपळाईने घेतलेला बॉलचा ताबा हे सगळेच पाहण्यालायक.
रॅमॉस म्हणजे चपळाई, रॅमॉस म्हणजे अ‍ॅथलिट्ससारखे कौशल्य व हवेत उड्या. ह्यामुळेच रॅमॉसला आवरायला प्रतिस्पर्ध्यांना एखाद्या पेनल्टीच्या वेळी ३-३ लोक त्याच्यामागे लावायला लागतात.
ह्याशिवाय त्याचा अप्रतिम स्टॅमिना व फिटनेस ह्या गोष्टी संघाच्या प्रशिक्षकासाठी 'आपल्या टीमचा साईड बॅक कोण?' हा प्रश्न एका फटक्यात सोडवतात.
मात्र पुयॉलप्रमाणेच अत्यंत दांडगाई व धसमुसळा खेळ करणारा रॅमॉस कधीही कार्ड घेऊन मैदानाबाहेर जाऊन आपल्या संघाची डोकेदुखी वाढवु शकतो.


इकर कॅसिलास, व्हिक्टर वाल्देस आणि पेपे रैना .... गोलसमोरच्या अभेद्य तटबंद्या !
'देवाला मागतो एक डोळा व देव देतो ३ डोळे' अशी गत स्पेनबाबत 'गोलकिपर' ह्या पोझिशनसाठी आहे. अंतिम ११ मध्ये केवळ १ गोलकिपर हवा असताना ह्यांच्याकडे ह्याचे ३ मजबुत दावेदार आहेत.
तिघेच्या तिघे सर्वोत्तम आहेत. त्यातल्या त्यात कॅसिलास व वाल्देस हे तर पहिल्या ३ मध्ये येतात.
ह्यांच्याबद्दल अधिक काही लिहण्याची गरज नाही, प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्या त्यांच्या क्लबविरुद्ध अथवा फ्रान्सविरुद्ध मारलेल्या गोलांची "बोटावर मोजण्याइतकी संख्या" हाच त्यांच्या कामगिरीचा एक उत्तम दाखला आहे.

स्पेनची ताकद :
स्पेनचा संघ हा जगातल्या सर्वोत्तम स्ट्रायकर्स, सर्वोत्तम मिडफिल्डर्स, सर्वोत्तम डिफेंडर्स आणि सर्वोत्तम गोलरक्षक ह्यांनी बनलेला आहेत ह्यात वाद नाही.
त्यामुळे ह्या प्लेयिंग ११ मधल्या कोणाही ३-४ जणांची जादु चालली तरी विजयश्री कठिण नाही.
स्पेनच्या टीममध्ये आपापल्या दादा क्लबचे नेतॄत्व करणारे पुयॉल, फॅब्रिगास, कॅसिलास, ओलेन्सो सारखे भरपुर अनुभव असलेले दिग्गज खेळत असल्याने अनुभवाची कमी नाही.
बहुतेक सर्व खेळाडुंपैकी बरेच जण सध्या एकाच क्लबमधुन खेळत असल्याने ताळमेळाची समस्या जास्त भेडसावणार नाही.
सध्या प्रचंड फॉर्मात असलेले टोरेस आणि व्हिलासारख्या खेळाडुंनी इथेही आपला जलवा दाखवला तर त्यांना रोखणे ही प्रत्येक टीमची डोकेदुखी असु शकते.
डिफेंडर्स लाईनमध्ये पिके-पुयॉल आणि अल्बालियो-रॅमॉस सारख्या जोड्या एकाच क्लबखाली खेळल्या असल्याने त्यांच्याच उत्तम समन्वय आहे व त्यामुळे ही बचावफळी भेदणे हे खरेच जिकरीचे काम आहे.

स्पेनचे कच्चे दुवे :
सध्या त्यांच्यासमोर असलेला सर्वात मोठ्ठा प्रोब्लेम म्हणजे खेळाडुंची तंदुरुस्ती.
मेन प्लेमेकर इनियेस्टा अजुनही १००% फिट नाही, टोरेस आत्ता कुठे दुखापतीतुन सावरला आहे व त्यामुळे सुरवातीला जरा जपुनच खेळेल असा अंदाज आहे.
सर्वात मोठ्ठे चॅलेंज म्हणजे इथे "टीम ऑफ चॅम्पियन्स" ला एकसंध अशा "चॅम्पियन टीम" म्हणुन खेळावे लागेल.
अपेक्षांचे ओझे, स्पेनची टीम आत्तापर्यंत सर्वोत्तम असल्याने अपेक्षांचे प्रचंड ओझे आहे, ह्या टीमवर भरपुर पैसाही लागला आहे.
विश्वचषकाच्या परंपरेनुसार "काही टॉप कन्टेडर्स सुरवातीलाच बाहेर पडतात" हे सत्य असल्याने आपल्या अति-आत्मविश्वासात हे स्पेनबाबत घडु न देण्याची काळजी ह्यांना घ्यावी लागेल.
बाकी सर्व उत्तम ... !!!

आमचा अंदाज :
सर्वच घोडे विनमध्ये आले आणि चाली बरोबर रचल्या गेल्या तर ह्यावेळचा विश्वविजेता नक्कीच "स्पेन" असेल. ह्यांच्यासाठी ड्रॉ ही तसा फार कठिण नाही.
तरीही वर्स्ट केसमध्ये अंतिम फेरी किंवा उपांत्य सामना नक्कीच अवघड नाही, ते आरामात इथपर्यंत जातील.

3 comments:

Anonymous said...

Aaj eka online newspaper madhe khalil comment vachli

"Once and again, the old rule is proven: in big tournaments, all the dancing around the penalty box matters not; the ball in the net does. Swiss one, Spain zero."

shaggy said...

bad luck kharab distay tuza harry.2 team baddal blog takle tu, doghanchi lagliye.thode diavs brazil,germeny baddal nako lihu,khelu de tyanna thoda :)

Anonymous said...

Spain win final, took World Cup home, 1st time.