Monday, April 15, 2013

We are not here to make friends ... खरंच ?

मी शक्यतो व्यक्तिचित्रं वगैरे लिहीत नाही....

माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या घटना आणि त्याच्याशी संबंधित असणारे अनेक लोक ह्यांबाबत कधी ब्लॊगवर काही लिहीत नाही, मला ते तितकेसे आवडत नाही....
तसेच आपण काम करत असलेल्या जागेबद्दल आणि तिथे घडत असलेल्या घटनांबद्दल ब्लॊगवर लिहणे हे ही मला तितकेसे योग्य वाटत नाही....
पण आज थोडंसं हे सर्व बाजुला ठेऊन ४ शब्द लिहावेसे वाटत आहेत.

सध्या तसं पाहता आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ कुठे जात असेल तर ऑफ़िसात. दिवसातले जागेपणातले महत्वाचे निदान ९-१० तास तरी आपण ऑफ़िसात असतो. इथे मग अनेक लोकांशी आपला संबंध येतो. मुळात ऑफिस म्हणजे काय तर जिथे ४ लोक एकत्र जमुन मी जे काही करतो ते सगळ्यात भारी कसे आहे आणि त्यामुळे कंपनीला अमुकतमुक फायदा कसा होतो हे सांगायचा प्रयत्न करत असतात ती जागा, ऑफिस म्हणजे काय तर हेच ४ लोक जरा चान्स मिळाला की भले दुसर्याच्या डोक्यावर पाय देऊन का होईना पण पदजेष्ठतेच्या वरच्या पायरीवर जायचा प्रयत्न करतात ती जागा .. भले ह्याला मग फास्ट ट्रॅक करियर वगैरे म्हणतही असतील, ऑफिस म्हणजे काय तर ज्याच्याशी आपले पटत नाही किंवा समोरच फारच स्पष्ट आणि खरे बोलतो हे लक्षात आल्यावर इतर ३ जणांनी कंपु करुन त्याला कुठे ना कुठे दाबायला बघणे आणि त्याला होणार्या त्रासात स्वतःला सुख मानुन घेण्याची जागा, ऑफिस म्हणजे काय तर वरच्या पोझिशनसाठी आणि हेवी पे-पॅकेजेससाठी जमेल ती तडजोड करणे आणि त्याला नंतर अॅाजिलीटी/व्हर्साटाईल असल्याचे गोंडस नाव देणे ... असे बरेच काही लिहता येईल आणि ते बहुतांशी खरेच आहे. ऑफिसमध्ये वर लिहले आहे असे काही घडत नाही असे ज्यांना वाटते ते साधुसंत आहेत असे माझे प्रामाणिक मत आहे आणि ते हिमालयात जायचे सोडुन चुकुन ह्या सिमेंटच्या जंगलात आले आहेत असेही मला वाटते.


ऑफ़िसमध्ये शक्यतो एक समंजसपणाचा मुखवटा चढवुनच रहावे लागते, ह्याची गंमत अशी की ह्यामुळे समोर पाहताच मुस्काटात मारावी अशी इच्छा होत असुनसुद्धा एखाद्याशी उगाच गोडगोड बोलावे लागते ...तर दुसरीकडे एखादा अगदी आपल्यासारखाच आहे आणि तो आपला परफ़ेक्ट दोस्त बनु शकतो हे कळत असतानाही काही अलिखित ऒफ़िशियल कारणांमुळे आपण त्याच्याशी हवे तेवढे मोकळेपणाने वागु शकत नाही .. मुखवट्याची कृपा.
एवढी सगळी लफडी असताना आणि स्वतःला प्रोजेक्ट करायचे एवढे काम बाकी असताना ऑफिसात दोस्ती वगैरे करायचा भानगडी हव्यातच कशाला? दोस्ती वगैरे ठिक आहे हो, पण उद्या हाच दोस्त आपल्या प्रमोशनच्या रस्त्यात दत्त म्हणुन उभा राहिला किंवा ह्याच्या तिथे असण्यामुळे आपले एखादे भारी ट्रेनिंग किंवा ऑनसाईट व्हिसिट वगैरे धोक्यात येत असेल तर ह्याचय दोस्तीचे काय लोणचे घालायचे ? बरं, समजा मी ह्याच्यासाठी शक्य त्या तडजोडी केल्या आणि समोरुन त्याने काहीच न करता जिथे चान्स मिळेल तिकडे चान्स मारला तर मी तक्रार तरी कुणाकडे करायची ? एकंदरीत हे रिस्कीच प्रकरण नाही का ?

म्हणुनच बरेच जाणकार सांगतात की ऑफिसात शक्यतो प्रेमाच्या आणि दोस्तीच्या फंदात पडु नये .. पहिले जमले, दुसरे साफच गंडले, असो.
पण काहीही असले तरी मी शक्यतो ऒफ़िसात मित्र बनवत नाही, त्या मित्रांचा त्रास होतो, त्रास होतो म्हणजे असा की त्यांच्या अपरिहार्य असणा-या दुरावण्यामुळे त्रास होतो, असा अनुभव निदान २-३ वेळा घेऊन झाला आहे त्यांमुळे आजकाल जरासा मी सावधच असतो, उगाच पटकन कोणीतरी यायचा आणि दोस्त होऊन जायचा, ही साली दोस्ती नंतर उदाहरणार्थ गंमतच होऊन बसते. त्यापेक्षा आपलं मुन्नाभाईमधल्या जे. अस्थाना ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे "We are not here to make friends" हे पाळावे आणि निदान ऒफ़िसात मित्र वगैरे बनवायच्या भानगडीत पडु नये. शाळा / कॊलेजात बनणारे मित्र हे शक्यतो आपल्यासारखे येड** असल्याने त्यांचा कधी त्रास होत नाही पण ऒफ़िसात बनणारे मित्र उगाच समंजस वगैरे असतात. काही लफ़डे किंवा वादविवाद झाले तर शाळा/कॊलेजातल्या मित्रांशी कसे ’तु आधी *कात जा अन मी पण इकडे भ*त जातो’ म्हणुन प्रश्न मिटवता येतो, पण हे ऒफ़िसातला मित्र साले उगाच समंजस वगैरे असल्याने स्वत:ही भो*त जा नाहीत आणि समोरच्यालाही जाऊ देत नाहीत, म्हणुन सांगत असतो की शक्यतो ऒफ़िसात दोस्ती वगैरे करु नये.
पण ही दोस्ती पण अशी नाठाळ चीज आहे की साली उगाच होऊन जाते, झालेलीही कळत नाही. रितसर चेतावणी वगैरे देऊन दोस्ती होत असली तर आपली काय हरकत नाय, निदान सावध होऊन सेफ़ होण्याचा चान्स मिळतो, पण हे असे अचानक दोस्त होऊन जाणे म्हणजे आफ़तच आहे.


आयडियली स्पिकिंग ऑफिसात होणार्‍या दोस्तीला कुठेना कुठे अंत असतोच, अंत म्हणजे अगदी दी एंड नव्हे पण एखाद्याने काही कारणासाठी दुसर्‍या ठिकाणी निघुन जाणे हे अगदीच स्वाभाविक आहे. करियर म्हणा, वैयक्तिक तडजोडी म्हणा किंवा अन्य काही कारणाने म्हणा पण हे घडतेच, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करत असणारे आणि पक्के दोस्त असणारे ह्यांचीही उदाहरणे विरळ नाहीत पण आजच्या घडीला हे तितकेसे स्वाभावीक नाही.
मुळ ज्या गोष्टीमुळे आपण एकत्र आलेलो असतो त्या ऑफिसला ह्या मुव्हमेंटमुळे काही फरक पडत नाही (निदान वरकर्णी असे म्हणायची पद्धत आहे). कारण एक गेला की त्याला जागा घ्यायला इतर ४ जण तयार असतात, इनफॅक्ट त्याच्या जाण्याची वाटच बघत असतात. पण इथे प्रत्येकजण निराळा आहे आणि कुणीच कुणाची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही हे सत्य आहे तेच बर्याचदा लोकांना कळत नाही.

रुटिन कामाचे एक ठिक आहे हो ते कसेही होऊन जाते, पण निघुन गेलेला माणुस त्याच्याबरोबर जी एनर्जी घेऊन गेला ती कुठुन आणणार? इथुन निघुन गेलेल्या माणसाचा समंजसपणा आणि कामे करुन घेण्याचे व त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे कामे करण्यास माणुस तयार करण्याचे स्कील कुठुन आणणार? एखाद्याचे डेडिकेशन आणि कमालीचा आत्मविश्वास ह्यामुळे इथे दिसणारा परिणाम असा सहजासहजी रिप्लेस करता येतो? एखाद्या इव्हेंटवेळी त्याच्याकडुन येणार्या क्रिएटिव्ह आयडियास अशा सहजासहजी रिप्लेस करता येतात? वरुन कितीही दडपण आले तरी त्याची झळ खालच्या लेव्हलपर्यंत येऊ न देता मधल्यामध्ये सर्व काही शांत करण्याची खुबी अशी जादुसारखी उभी करता येते?

नाही .. सगळ्याच गोष्टींना रिप्लेसमेंट देता येत नाही म्हणुनच अशा मुव्हमेंट्स जस्टिफाईड नसतात .. समाजासाठी आणि त्या त्या ग्रुपसाठी.

हे ही सर्व एक वेळ जमुन जाईल, पण ह्याचा परिणाम जो पर्सनल लेव्हलला होतो त्याचे नुकसान मात्र कधीही भरुन ने येण्यासारखे असते. डिटेल लिहायची गरच नाही पण अगदी छोट्याछोट्या गोष्टीतही एखाद्याच्या असण्याची सवय झाली असते, आता त्याचे इथे नसणे एवढे रिप्लेसेबल नक्कीच नसते.



पण अपरिहार्य आहे हे सगळे .. हे सगळे करावेच लागते.
तुमची अगदी लाख इच्छा नसली तरी ह्या गोष्टी घडतात आणि त्यातुनच माणुस पुढे जातो, आता किंचित लांब असल्याने दोस्ती अजुनही गहिरी होत जात असते कदाचित, निदान अशा अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे ?
'अतिपरिचयात अवज्ञा' टाळावी असे म्हणतात, म्हणजे असे की एखाद्याशी फारच घसट वाढली की त्यातुन मानापमानाचे प्रसंग उद्भवतात असा मानवी स्वभाव आहे. परिचय कधी 'अति' झाला असे वाटलेच नाही, अवज्ञेचा तर प्रश्नच येत नाही, तरीही ह्या उपरोक्त वचनाची प्रचिती कशी येते ते बघु येत्या काळात ...



असो, फारच तात्विक आणि काहीसे सेन्टीमेन्टी टाईपचे लिखाण झाले.
असे काही होण्याचा अन असे काही लिहण्याचा माझा स्वभाव नाही, एकंदरीत भावनांचे प्रदर्शन न करण्यातच मला जास्ती सुख वाटत आले आहे. खुद्द माझ्या बाबतीतच सांगायचे म्हटले तर बेंगलोरच्या ३ वर्षापेक्षा जास्त सहवासानंतर ते सोडायची जेव्हा वेळ आली होती तेव्हा भावना ह्यापेक्षा जास्त उत्कट झाल्या होत्या, मात्र काळ हेच औषध ठरले, असो.
आता हे सर्व उकरुन निघण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात आमचा एक दोस्त ट्रान्सफर होऊन दुसरीकडे गेला, त्याच्या सेन्डॉफसदृष्य कार्यक्रमाला माझ्या सुभाग्याने मी हजर नव्हतो, जरी हजर असतोच तरी हेच बोललो असतो (बोलता आले असते का नाही ते माहित नाही), पण नसल्याने हे राहुन गेले होते, आता तेच इथे उतरले आहे ...

काटेकोर नियम असा नाही पण ब्लॊगवर शक्यतो मी मित्रांबाबत लिहीत नाही ... पण हे खास श्रीकांतसाठी !!!


Shrikant

Friday, January 20, 2012

ड्रिबल, टॅकल, किक & सेव्ह : फूटबॉल क्लब मॅनजर्स

भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीवर काढलेला 'चक दे' पिक्चर तुम्ही पाहिला आहे का ?
त्यात शाहरुख खानचा १ डायलॉक आहे ' हर एक टीम में बस एक ही गुंडा हो सकता है, और इस टीम का गुंडा मै हुं'.
पाहिला असेल तर लक्षात ठेवा, पाहिला नसेल तर पाहुन घ्या आणि मग लक्षात ठेवा, कशासाठी ते आपण पुढे कुठेतरी नक्की पाहुयात.

चवीने खाणे कुणाला आवडत नाही ?
पण एखादा पदार्थ 'चांगला' होण्यासाठी आणि त्याचा आस्वाद घेतल्यानंतर जो काही 'तृप्ती'ची अनुभुती होते ती साधण्यासाठी नक्की काय काय लागते हो ?
'बेस्ट इन क्लास' उपकरणे असलेले अद्ययावत स्वयंपाकघर ? जगभरातुन कष्टाने हुडकुन आणि मागेल ती किंमत मोजुन गोळा केलेला विविध प्रकारचा कच्चा माल ? का 'हे कसे करावे, ते कसे करु नये' ह्याच्या हजारो टिपा देणारे प्रकाशित साहित्य ?
केवळ हे एवढे सगळे आणि तत्सम 'अत्युत्तम' गोळा करुन पदार्थ बनवता येतो ?
का त्यासाठी लागतो तो प्रत्येक वस्तुची किंमत ओळखणारा आणि ती वस्तु कशी, किती, केव्हा व कुठे वापरता येईल ह्याची नेमकी जाण असणारा निष्णात 'बल्लवाचार्य' ?

पुन्हा एकदा असाच प्रश्न विचारतो. बर्‍याचदा आपल्याला एखाद्या गाण्याची एखादा सुरेल तुकडा आवडुन जातो, तो आपल्या कर्णपटलवर वारंवार रुंजी घालत असतो व सवयीने आपणही ते गाणे गुणगुणत असतो. तर ते गाणे एवढे 'नादमधुर' बनवण्यासाठी काय लागते हो ?
विविध प्रकारची वाद्ये वाजवणारे त्या त्या वाद्याचे जगभरातले दादा कलाकार ? काळजापर्यंत जाऊन भिडणारा मधुर आवाज असलेले गायक/गायिका ? रेकॉर्डिंगची 'बेस्ट इन क्लास' सुविधा असलेला रेकॉर्डिंग स्टुडियो ? अत्युच्च दर्जाचे काव्य लिहणारे गीतकार ?
ह्या सर्वांना एकत्र आणले तर प्रत्येक गाणे हे 'क्लास' होईलच का ?
का त्यासाठी आपल्याला लागतो तो हे प्रत्येक घटक कुठे, कसे वापरावे ह्याचे ज्ञान असलेला आणि ह्या सर्वांच्या ताळमेळातुन एक प्रकारची जादु करुन अजरामर गीत पेश करणारा एक जादुगार ?

भलेही कुठल्याही दैदिप्यमान यशामागे 'टीमवर्क'चे स्थान वादादीत असले तरीही ह्या 'टीम'ला सरळ वळण लाऊन, त्या टीममधल्या प्रत्येकाची किंमत आणि महत्व अचूकपणे ओळखुन वेळ येईल तशी त्याचा चाणाक्षपणे वापर करणारा 'टीम मॅनेजर' हा ह्यात सर्वात महत्वाचा घटक नाही का ?
'गुरुविण कोण दाखवेल वाट' ह्या वचनामध्ये ज्याची आवश्यकता सांगितली जात आहे तो गुरु म्हणजे टीम मॅनेजर नव्हे काय ? समजा हाच गुरु 'अपात्र' असेल तर त्या टीमवर 'गुरुविण कोण लावेल वाट' म्हणण्याची वेळ येणार नाही काय ?

असो, नमनालाच घडाभर तेल वाहुन झाल्यावर आपण आता मुळ मुद्द्याकडे वळुयात.
फूटबॉल हा आमचा आवडता खेळ आहे, ह्या खेळावर, ह्यातल्या प्रसिद्ध टीम्सबद्दल, त्यातल्या जिगरबाज खेळाडुंबद्दल आणि त्यांच्या खेळावर मनापासुन प्रेम करुन टीमसोबत त्यांची हार-जीत साजरी करणार्‍या लाखो खेळवेड्या रसिकांबद्दल अनेकांनी खुप काही लिहुन ठेवले आहे, आम्हीही बर्‍याचदा ह्यावर जमेल तसे लिहले आहे.
पण ह्या सर्वांपेक्षा एक वेगळाच आयाम असलेल्या 'टीम मॅनेजर्स'बद्दल काही लिहुन त्यांचेही आमच्यावर असलेले ऋण फेडायचा बर्‍याच दिवसापासुन विचार होता त्याला आता मूर्त स्वरुप देत आहोत. ह्या लेखात मी फूटबॉल टीम्सच्या काही नावाजलेल्या मॅनेजर्सबद्दल ४-४ वाक्ये लिहुन तुम्हाला त्यांचे थोडक्यात ओळख करुन देणार आहे.
अगदी सर्वांबद्दलच सर्वच माहिती लिहण्याचा अट्टाहास करणे हे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे, ते जमणे शक्य नाही. पण ह्या निमित्ताने सध्याच्या काळात फूटबॉलमधले अगदी जरी देव नसले तरी अवलिये नक्कीच असणार्‍या काही महान व्यक्तींसमोर आमच्या फूटबॉलप्रेमात भिजवलेली सांजवात लावण्याच्या ह्या लेखाद्वारे प्रयत्न करतो आहे.


१. सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन - मँचेस्टर युनायटेडचा वास्तुपुरुष :


बायचान्स तुमचा देवावर विश्वास असेल तर एक श्रद्धा म्हणुन केवळ त्याच भावनेने तुम्ही कधी केरळमध्ये असलेल्या पद्मनाभ मंदिराला भेट दिली आहे का ? ह्या पद्मनाभ मंदिरातले नंबी (नंबुद्री) ब्राम्हण पुजारी पाहिले आहेत का ? निदान त्यांच्या भगवान पद्मनाभस्वामींवर असलेल्या श्रद्धेबद्दल आणि त्या सोपस्कार व कर्मकांडातुन त्यांच्यात येत असलेल्या कर्मठपणाबद्दल आणि ध्येयनिष्ठेबद्दल तुम्ही कधी काही पाहिले, वाचले, ऐकले आहे काय ?
ओके. पाहिले नसल्यास किंवा देवावर अथवा फारफारतर कर्मकांडावर विश्वास नसल्याने त्याची सत्यता जोखण्यास तुम्हाला त्रास होत असेल तर त्याचे समकक्ष उदाहरण म्हणुन तुम्ही अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्याकडे पहा असे सुचवेन.
फूटबॉल हा धर्मच मानला तर मँचेस्टर युनायटेडचे स्थानमहात्म्य, त्याचा इतिहास, त्याची भव्यता ही पद्मनाभ मंदिरापेक्षा तसुभरही कमी नाही. ह्यांचेही जगभरात लाखो भाविक आहेत आणि त्यांची 'मॅन-यु'वर अगदी भगवान पद्मनाभाएवढीच श्रद्धा आहे. ह्या मॅन-युची गेली २५ वर्षे अव्याहत सेवा करणारे सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांची श्रेष्ठताही कुठल्याही नंबीपेक्षा कणभरही कमी नाही.

किमान ७५००० ह्या संख्येने ओल्ड ट्रॅफर्डवर संघाच्या जर्सीचा रंग असलेल्या लाल रंगाचे कपडे घालुन 'रेड डेविल्स' म्हणवले जाणारे पाठिराखे "Glory glory glory Man United, And the reds go marching on, on, on..." चा जयघोष करत असतात आणि त्याच एनर्जीवर जेव्हा मॅन-युचे ११ खेळाडु मैदानावर कमाल करत प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडाला फेस आणत असतात तेव्हा मैदानाच्या टचलाईन म्हणवल्या जाणार्‍या रेषेवर उभा राहुन एक ब्रिटिशांच्या व्याख्येतला जंटलमन पोषाख केलेला सत्तरीच्या घरातला जख्ख म्हातारा अगदी शांतपणे हा खेळ बघत असलेला दिसला तर ती व्यक्ती अन्य कुणी नसुन खुद्द सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन आहे हे लक्षात ठेवा. भगवान पद्मनाभाचे सर्व पुजापाठ आणि विधी पद्धतशीरपणे झाले पाहिजेत ह्या चिंतेत नंबी लोक ज्याप्रकारे सर्व काही विसरुन आराधनेत मग्न असतात तोच आवेश सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्यामध्ये असतो. ह्या सोपस्कारादरम्यान जे जे काही रितीला सोडुन आणि पाठिराख्यांना अप्रिय असे काही घडत असेल ते ते टाळण्यासाठी कधी प्रेमाने, कधी धूर्तपणे तर कधी चिडचिड करुन जे जे शक्य आहे ते करण्यासाठी जी चिकाटी आणि जो कर्मठपणा अंगी असावा लागतो तो असातसा मिळत नाही, अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांनी तो कमावला आहे.
त्यांचा आवर्जुन सांगण्यासारखा एक गुण म्हणजे त्यांनी शब्दांतुन निर्माण केलेला दरारा. बाळासाहेब ठाकरे जसे विरोधकाला निवडणुकीच्या आधी आणि मग नंतर जसे कच्चे खाऊन टाकतात तोच आवेश ह्या सायबांचा 'प्री-मॅच कॉन्फरंस'ला असतो. साहेब शक्यतो मिडियाला नाराज करत नाहीत व कही ना काही 'न्युज' देतातच.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या दिग्गज खेळाडुंची नुसती नावे जरी लिहायची म्हटली तर ह्य लेखात इतर काही लिहण्याइतकी जागा उरणार नाही. इथे खेळुन अणि मग बाहेर जाऊन 'स्टार' झालेले तर ढिगाने आहेत पण मॅन-युचा हा अढळ ध्रुवतारा अजुनही अचलच आहे.
सलग २० वर्षे मॅन-युचे मॅनेजरपद संभाळताना अ‍ॅल्क्स फर्ग्युसन ह्यांनी जे जे उपलब्ध आहे ते ते सर्व कमावले आहे. 'Nothing left to prove' असे जर म्हणायचे झाले तर ते सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्याबाबत म्हणता येईल.
१२ वेळा प्रिमियर लीगची विजेतेपद, ५ वेळा एफ.ए. कप, १० वेळा कम्युनिटी शिल्ड, २ वेळा अत्युच्च चँपिय्सन्स लीग, एकदा क्लब वर्ल्ड कप ........... अजुन काय अपेक्षा असते एका मॅनेजरकडुन ?
ह्याशिवाय प्रिमियर लीगमधला सर्वश्रेष्ठ मॅनेजर हा सन्मान १० वेळा, एक युएफा मॅनेजर ऑफ द ईअर, बीबीसीकडुन क्रिडाक्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च सन्मान ३ वेळा, एक ब्रिटिश हॉल ऑफ फेम, एक युरोप हॉल ऑफ फेम, एक फिफा प्रेसिडेन्ट अ‍ॅवॉर्ड ह्याहुन जेष्ठ असा सन्मान म्हणजे ब्रिटिश सरकारकडुन 'सर' ही पदवी देऊन बहुमान व सर्वात महत्वाचे म्हणजे करोडो पठिराख्यांचे प्रेम.
लोक मॅन-युला कितीही शिव्या देत असले तरी जेव्हा सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांचे नाव येते तेव्हा समोरच्याच् शब्दातुन आणि वागण्यातुन 'आदर' हा दिसावा लागतो आणि तो दिसतोच.

शेवटी थोडक्यात सांगतो, आजच्या काळात जर 'दिग्वीजय आणि राजसुय यज्ञ' वगैरे संकल्पना असत्या तर सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांची १० वेळवेगळे संघ घेऊन प्रत्येकवेळी हे काम आरामात पुर्ण केले असते, हा माणुसच असा आहे .... दिग्वीजयी आणि श्रेष्ठ !

२. आर्सेन वेंगर - आर्सनेलचे गुरु द्रोण आणि इंग्लिश फूटबॉलमधला बनिया :

समजा आज महाभारताचा काळ असला असता आणि फूटबॉलला समजा राजाश्रय वगैरे मिळुन राष्ट्रखेळ असल्याचा दर्जा मिळाला असता आणि इथल्या राज्यकर्त्यांनी हस्तिनापुरात कुरुंनी जसे सर्व विद्या, अस्त्र, धर्म, निती शिकण्यासाठी 'गुरुकुल' स्थापन केले होते त्याच धर्तीवर फूटबॉल शिकण्यासाठी आणि त्याच्या प्रसारासाठी एखादी संस्था काढायचे ठरवले असते तर त्या शाळेचे नाव नक्की 'आर्सनेल' ठेवले असते आणि 'महर्षी आर्सेन वेंगर' तिथे कुलगुरु म्हणुन जाऊन बसले असते. इथे शिकलेल्या सर्व निष्णात खेळाडूंनी आपल्या कौशल्याने ह्या गुरुकुलाची किर्ती जगभर पोहचवली असती आणि त्याने 'आर्सेन वेंगर' व पर्यायाने आर्सनेलच्या जेष्ठतेत अजुन भर पडली असती.
पण सध्या महाभारताचा काळ नाही आणि राजाश्रय, गुरुकुल वगैरे संकल्पना अस्तित्वात नाहीत.
पण 'आर्सेन वेंगर' हा माणुस अशा परिस्थितीत हार खाऊन घाबरुन जाणार्‍यातला नाही, तो १९९६ पासुन ते थेट आजही आर्सनेलच्या टीमसाठी एकाहुन एक सरस खेळाडू घडवत आहे, जगभरातुन त्यांना हुडकुन आणुन त्यांच्या कौशल्याला आपल्या अनुभवाने पैलू पाडत आहे, हे पैलू पाडलेले हिरे आर्सनेलच्या कोंदणात लखलखुन त्यांना योग्य सन्मान मिळवुन देत आहेत व त्याबरोबर बाहेरच्या जगाचेही लक्ष वेधुन घेत ह्या हिर्‍यांसाठी मोठ्ठी किंमत मोजण्यास त्यांना भाग पाडत आहेत.

अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्यासारखे ढिगभर कप जर आर्सनेलने वेंगर ह्यांच्यासोबत जिंकले नसले तरी त्यांनी गेली १५ वर्षे आर्सनेलला एक 'लढाऊ टीम' म्हणुन जी ओळख मिळवुन दिली आहे ती आजही टिकुन आहे. सध्या भयंकर फॉर्मात असलेली अजेय बार्सिलोना जर कुणाला घाबरत असेल तर ती आर्सनेलच्या खेळाला आणि त्याचे शिल्पकार आहेत ते आर्सेन वेंगर.

आर्सेन वेंगर ह्यांना इंग्लिश फूटबॉलचा 'बनिया' म्हणुन ओळखले जाण्याचे कारण म्हणजे जिथे चेल्सी, मॅन-सिटी, लिव्हरपुल, रियाल माद्रिद अशा टीम्स ट्रान्सफर विंडोमध्ये करोडो रुपये घालवुन चांगले स्टार्स विकत घेतात ते स्टार्स हे वेंगर ह्यांच्या आर्सनेल मधुन येतात. हे स्टार्स अगदी तरुण असताना व त्यांच्याभोवती एवढे वलय नसताना वेंगर त्यांना अगदी कवडीमोल म्हणावे अश भावात विकत घेतात, त्यांच्या खेळाला पैलु पाडतात, त्यांच्याकडुन मैदान गाजवुन घेतात आणि वेळ आली की अव्वाच्या सव्वा किमतीत त्यांना विकतात.
जेव्हा इतर टीम्स प्लेयर्सच्या खरेडी-विक्रीमध्ये करोडो रुपायांच्या बुडीत खात्यात असतात तेव्हा इकडे वेंगर तेच करोडो कमावुन एखादी नवी ट्रेनिंग अ‍ॅकेडमी उघडुन उद्याचे करोडो रुपये किंमत असलेले स्टार्स बनवण्यात मग्न असतात.
धिरुभाईंना यदाकदाचित फूटबॉलमध्ये रुची असली असती तर त्यांनी नक्की आर्सेन वेंगर ह्यांना घेऊन 'रिलायन्स फूटबॉल कॉर्पोरेशन' स्थापुन करोडोंचा बिजीनेस केला असता, हा माणुस त्यासाठी अगदी योग्य आहे.

३. आन्द्रे विया बोयास - चेल्सीचा ध्येयवेडा तरुण मॅनेजर :

वर वर्ष ३५ !
हे वय काही मॅनेजर वगैरे होऊन जवळपास आपल्याच वयाच्या प्लेर्यसना 'कसे खेळावे' हे शिकवण्याचे नाही. तूर्तास ह्याचे प्रतिस्पर्धी असलेले इतर टीम्सचे मॅनेजर हे तसे म्हटले तर वयोवृद्ध म्हणु शकता असे असताना आणि एकेकाचा अनुभव विया-बोयासच्या एकुण वयाएवढा असताना हा पठ्ठ्या त्यांच्या नाकावर टिच्चुन चेल्सीसारख्या लोकप्रिय, ग्लॅमरस आणि रशियन उद्योगपतीच्या धनाढ्य पाठबळामुळे मॅनजर ह्या पदासाठी 'हॉट सीट' ठरलेली जागा पटकावुन 'युरोपियन दिग्विजया'ची स्वप्ने बघतो ही घटना अचाट आणि अतर्क्य आहे. बाय द वे, कुठल्या प्लेयरसाठी किती ट्रान्सर मनी दिला आणि त्याला किती पगार मिळतो आदी बातम्या मिडिया चवीने चघळत असताना खुद्द मॅनेजरसाठी ट्रान्सफर मनी देऊन त्याची बदली करुन घेण्याचा व एवाढ्या कमी वयात सर्वात जास्त 'कमावणारा' मॅनेजर अशी विया-बोयास ह्यांची ख्याती आहे.
आजही फूटबॉलमध्ये त्याच्या वयाचे किंवा अगदी त्याच्यापेक्षा मोठ्ठे असणारे प्लेयर्स मैदान गाजवत असताना हा तरुण रक्ताचा बेरकी माणुस समोरच्याच्या प्रदिर्घ अनुभव आणि जाण ह्यावर स्वतःच्या असिम इच्छाशक्ती आणि काही करुन दाखवण्याची प्रामाणिक भावना ह्या जोरावर भल्याभल्या टीमसमोर मोठ्ठे आव्हान उभा करत आहे ही बाब आवर्जुन नोंद घेण्यासारखी नक्की आहे.
तिकडे सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन गेली २० वर्षे एकहाती मॅन-यु संभाळत असताना त्यांच्या प्रदिर्घ अनुभवासमोर हा पठ्ठ्या "Well, It comes with confidence and time" म्हणत उभा रहातो आणि त्याचा हाच कॉन्फीडंस अजिंक्य मॅनचेस्टर सिटीचा प्रिमियर लीगमधला पहिला पराभव घडवुन आणतो. त्यासोबतच हा "It was important for us to win, but it's not about me, it's about this club, and at the moment this club is fifth in the table" असे सांगुन पुढील आव्हानास तयार असल्याचे संकेतही देतो.
मागच्या वर्षीच कुणाच्या ध्यानीमनी नसताना 'एफ सी पोर्टो' ह्या त्याच्या मायदेशातल्या पोर्तुगीज टीमला घेऊन त्याने अनेक दादा क्लब्सना धूळ चारत 'युरोपा लीग' पटकावली तेव्हाच 'ये तो भाई लंबी रेस का घोडा है' अशी नोंद अनेकांनी करुन घेतली.

तसा म्हटला तर हा जुगार आहे, अपयश आल्यास गच्छंती अटळ आहे आणि त्याची संपुर्ण कल्पनाही विया-बोयासला आहे. पण 'ध्येयवेडे तरुण' इतिहास घडवतात असे म्हणतात, ते त्याने मागच्या वर्षी पोर्टोसोबत करुन दाखवले व म्हणुनच आज चेल्सी मॅनेजरच्या 'हॉट सीट'वर तरुणतुर्क आद्रे विया-बोयास दिमाखात आणि संपुर्ण आत्मविश्वासाने बसला आहे.
खेळात हार-जीत चालतच रहाते, पण जेव्हा काही अनपेक्षित घडवण्याची ठामपणे खात्री देणारा नव्या विचाराचा एखादा माणुस उभा रहातो तेव्हा त्याची दखल घ्यायलाच हवी, नाही का ?

------------------------------------------------------

थोडक्यात सांगायचे तर टीम कितीही मोठ्ठी असली, क्लबचा इतिहास कितीही दैदिप्यमान असला आणि त्यांनी गतकाळात कितीतरी ट्रॉफी जिंकल्या असतील, सध्या क्लबमध्ये जगातले बेस्ट टॅलेंटेड सुपरस्टार असले तर 'मॅनेजर' ही व्यक्ती महत्वाची आहे/असते.

आता कळाले का मी लेखाच्या सुरवातीला तो शाहरुखचा 'चक दे' मधला डायलॉक का लिहला ते ?
सामर्थ्य आहे टीमचे । जो जो खेळील तयाचे। परंतु तेथे मॅनेजरचे । अधिष्ठान पाहिजे।।

( क्रमशः)

Sunday, November 6, 2011

’देव’ नाही ’देवळा’त ...

सिनेमा पहाणे ह भक्तिभाव मानला तर सिनेमा थेट्राला 'देऊळ' मानायला हवे आणि आपण ज्या श्रद्धेने ह्या देवळात 'सिनेमाची स्टोरी, चित्रण, गीत-संगीत, नावजलेले कलाकार अणि त्यांनी समर्थपणे पेललेल्या भुमिका' पहायला आणि त्यांचा आस्वाद घ्यायला जातो त्यांना 'देव'च म्हणायला हवे.
आपल्या अपेक्षांप्रमाणे सिनेमात सर्व काही असेल तर थेटररुपी देवळात साक्षात 'देवदर्शन' झाल्याचे समाधान लाभते व ह्या देवळाची वारी एक उत्सव होऊन जातो.

उमेश कुलकर्णींच बहुचर्चित 'देऊळ' हा सिनेमा खास थेट्रात जाऊन पाहिला असता आम्हाला 'देव नाही देवाळात' असा अनुभव आला. ज्या अपेक्षेने आम्ही देवाचे दर्शन घ्याला गेलो तो देवच तिथे नव्हते, बाकी मंदिराची दिव्यभव्यता आणि जाहिरातीद्वारे सुरु असलेला भक्तीचा जागर मात्र डोळ्यात मावेना इतका प्रचंड होता.
हे आमच्यासारख्य भक्तीभावाने सिनेमा पाहणार्‍या पटण्यासारखे नाही, म्हणुनच 'देऊळ'बद्दल आमचे हे ४ शब्द ....



’देऊळ’ हा सिनेमा लोकांना शक्यतो आवडणार नाही.
१. लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही.
२. तगडी स्टारकास्ट घेऊन उगाच शास्त्रापुरते सत्य दाखवणे त्याहुन आवडत नाही.

मला ’दुस-या कारणा’मुळे देऊळ तितकासा आवडला नाही. पिक्चर बर्‍यापैकी जमला नाही असे मला म्हणावेसे वाटते.
वलयांकित असे मोठ्ठे कलाकार घेऊन आणि त्याचा भरपुर गाजावाजा करुन शेवटी यथातथाच असलेला चित्रपट असे मी ह्याचे वर्णन करेन.
पुर्वार्धात हा चित्रपट भयंकर संथ आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर रटाळ वाटला.
गाजावाजा करुन मोठ्ठे मोठ्ठे कलाकार घेऊन त्यांना ह्या सिनेमात अक्षरशः वाया घालवले आहे असे वाटते. त्या त्या कलाकाराच्या क्षमतेला न्याय देणारे एकही पात्र ह्या चित्रपटात नाही ... अपवाद गिरीश कुलकर्णींचा केशा आणि दिलीप प्रभावळकरांचा अण्णा.
त्यांच्या पात्राची पार्श्वभुमी अथवा घडण चित्रपटात कुठेच ठळकपणे दिसत नाही. वातावरण निमिर्ती आणि पात्र ओळखीसाठी अत्यावश्यक असलेले डिटेलिंग इथे भरकटले आहे, उलट त्या नादात ह्या विषयाशी अगदीच अनावश्यक असलेले प्रसंग उगाच घुसडले गेले आहेत असे वाटले. मी तर असे म्हणेन की ह्या बड्या नावाऐवजी अगदी कुणीही त्या त्या भुमिका सहजपणे करु शकला असता, असे असताना उगाच मोठ्ठी नावे वापरुन, त्यांना यथातथा भुमिका देऊन उगाच 'बिग बजेट' अशी जाहिरात करणे हे पटले नाही.
नाना पाटेकर, मोहन आगाशे, किशोर कदम ह्यांना अक्षरशः वाया घालवला आहे.
सोनाली कुलकर्णी ह्यांची भुमिका खास आहे म्हणण्यात अर्थच नाही, इनफॅक्ट त्यांच्या व्यक्तिरेखेला तसा वावच नाही, हेच कारण बहुदा सर्वच बड्या नावांबाबत घडते.
नसरुद्दिन शहाचे पात्र ह्या सिनेमात 'उगाच' घुसडल्यासारखे वाटते, उगाच २-३ डायलॉक आणि अनावश्यक प्रसंग रचना ह्याने काय मिळाले ते कळत नाही. हां, बड्या नावांची जाहिरात करायची असेल तर मात्रचे आमचे मौन बाबा, त्यातले आम्हाला जास्त समजत नाही.
चित्रपटाचे संगीत, गाणी आदी बाबत न बोललेलेच बरे. सध्या जरा वादग्रस्त असलेले 'दत्ताचे गाणे' हे बर्‍यापैकी सत्यपरिस्थीतीच्या जवळ जाणारे आहे आणि नादमधुर नसले तरी गुणगुण्यासारखे वाटले.

सिनेमात काही चांगल्या गोष्टी आहेत पण त्या पेलण्यात जरा गडबड झाली आहे.
'एका देवस्थानाचा जन्म' अशी एका व्याख्या करता येण्याजोगा हा चित्रपट आहे, विषयाच्या निवडीला आणि त्यात दाखवलेल्या बर्‍यापैकी डिटेलिंगला फुल्ल नसले तर उत्तम गुण.
मात्र ह्याच अनुषंगाने आम्ही वर केलेल्या 'लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही' ह्या विधानाबाबत २ शब्द न लिहणे हे ह्या सिनेमावर अन्याय ठरेल.
एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी जे जे घडते ते ते दिग्दर्शकाने जसे आहे तसे दाखवले आहे. स्थानिक ग्रामस्थांचा संपुर्ण बाजारपेठेवर कब्जा, देवस्थानाच्या निमित्ताने चालणारे अन्य उद्योग-धंदे व त्यालाही असणारी बरकत, सतत येणार्‍या पैशाचा ओघामुळे दिवसेंदिवस 'श्रीमंत' होत जाणारे देवस्थान आणि त्याचे व्यवस्थापक, ह्याच पैशाचा जोरावर देवळाला अजुन 'मोठ्ठे' करण्याची व त्यामार्गे अजुन पैसा कमवण्याची इच्छा, कालांतराने भक्तीभावाला बाजुला सारुन केवळ दिखावा, सारंजाम, भपकेपणा आणि त्यात कमी की काय म्हणुन स्थानिक राजकारणाचा हातभार आदी बाबींबर 'देऊळ' व्यवस्थित भाष्य करतो.
खरे तर हे सत्य सर्वांनाच माहित आहे, अशी 'उभारलेली' देवळंही अनेकजणांना माहित असतील, पण ही बाब स्पष्टपणे दाखवण्याचे धाडस केल्याचेही कौतुक आहे.
मुर्ती चोरीला गेल्यावर पहिल्यापेक्षा अधिक भारी मुर्ती आणुन येनकेनप्रकारे 'देऊळ' चालु राहिले पाहिजे हा सोसही मस्त दाखवला आहे.
ह्या
निमित्ताने दिग्दर्शकाने 'देवस्थानाचे बाजारीकरण' ह्यावर बर्‍यापैकी कठोर भाष्य केले आहे असे म्हणायला हकरत नसावी. ह्याच्या जोडीला ग्रामीण भागातले राजकारण, लोकांच्यातला बेरकीपणा, मिडियाची ताकद, ग्रामीण जीवनातला एकंदरीत संथपणा आणि रिकाम्या हाताचे व निवांत डोक्याचे लोक वेळ घालवण्यासाठी काय काय करत असतात हे चांगले दाखवले आहे.

उपरोक्त बाबींमुळे चित्रपट बर्‍यापैकी पाहण्यासारखा होतो, पण हे आणि इतकेच दाखवण्यासाठी बड्या नावांची अजिबात गरज नाही हे सत्यही पुन्हा ढळढळीतपणे समोर येते.
'कंचुकी तंग दाटली उरी, मट्रीअल आत मायीना... आनं माळावर प्रकटला दत्त, पर भाव मनी दाटना....' सारख्या संवाद/काव्याची ह्या लेव्हलला आणि चित्रपटात एवढे बडे कलाकार असताना गरज नव्हती, असली स्ट्रॅटेजी बी ग्रेडी चित्रपटाने वापरायची असते, ती तिकडेच शोभून दिसते, अन्यथा उगाच हसे होते, असो.

तर एकंदरीत चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे, आवर्जुन थेट्रात पाहण्याची गरज नाही, मराठी चित्रपटसृष्टीला मदत करायची असेल तर पाहु शकता, यथावकाश टिव्हीवर येईलच.
माझे ह्या चित्रपटाचे एका वाक्यात वर्णन .... बडा घर, पोकळ वासा. असो.

- (चित्रपटाबद्दल असामाधानी आणि स्ट्रॅटेजीवर नाराज) छोटा डॉन

रेटिंग वगैरे द्यायचे असल्यास : (विषयाची निवड आणि त्यासंदर्भातले काही प्रसंग इत्यांदीमुळे राउंडफिगर ) २ स्टार **

Sunday, October 16, 2011

अकिला & दी बी ...

शिक्षणातली गुणवत्ता आणि विद्यार्थ्याची कौटुंबिक्/सामाजिक्/आर्थिक पार्श्वभुमी ह्यांचे परस्परसंबंध आहे म्हटला तर आहे आणि नाही म्हटला तर नाही.
लाखा-लाखाने फिया घेऊन 'हमखास' यश मिळवुन देणार्‍या संस्था/क्लासेस आहेत, त्यात जाणारे विद्यार्थीही आहेत. आणि दुसर्‍या बाजुला अत्यंत कठिण आणि शिक्षणाला बिलकुल 'अयोग्य' अशा परिस्थीतीतही धैर्याने व चिकाटीने अभ्यास करुन गुणवत्ता यादीत झळकणारे गुणवंत आहेत.
वर्षानुवर्षे शिक्षणाचा अधिकार नाकारल्या गेलेल्या किंवा न मिळालेल्या समाजातुन दैनदिन जगण्यातला संघर्षही संभाळुन यश मिळवणार्‍यांची अनेक उदाहरणे आहेत.

'Akeelah and the Bee*' ही गोष्ट आहे अशाच एका लढ्याची आणि त्यात मिळवलेल्या दैदिप्यमान यशाची...





'अकिला अँडरसन', केवळ ११ वर्षाची, चारचौघींसारखीच म्हणण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा थोडी कमीच असलेली निग्रो वंशाची साधी मुलगी. घरात नवर्‍यापासुन वेगळी झालेली आई, २ बहिणी आणि १ उडाणटप्पु भाऊ असल्यावर कुटुंबाची सर्वसाधारण जी आर्थिक आणि सामाजिक स्थिती असेल अगदी तशीच ह्या कुटुंबाची असते. आपल्या मुलीने भरपुर शिकावे आणि एखादे मानाचे पद मिळवावे अशी अपेक्षा तिच्या आईची असते व म्हणुनच अशा हालाखीच्या परिस्थीतीतही अकिलाचे शिक्षण सुरु राहते.
मात्र अकिलाला वेड असते ते 'शब्दांचे स्पेलिंग पाठ' करण्याचे, ह्या वेडाच्या नादात तिचे अर्थातच इतर शिक्षणाकडे जरासे दुर्लक्षच होत असते व त्यानंतर आई नाराज होणे वगैरे सोपस्कार घडतात.
मात्र अकिलाची पॅशन एकच ... शब्दांचे स्पेलिंग अचुक सांगणे / घोकणे / पाठ करणे.

घरातल्या काही निमित्ताने ती टिव्हीवर चालु असलेल्या 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी' ह्या स्पर्धेचा शेवटचा भाग पाहते व आपणही हे बक्षिस मिळवु शकतो अशी एक इच्छा तिच्या मनात निर्माण होते.
अकिलाच्या शिक्षिका व खासकरुन त्या शाळेचे मुख्याध्यापक तिला शाळेतल्या शाळेत होणार्‍या 'दी बी( स्पेलिंग स्पर्धा)' मध्ये भाग घ्यायला लावतात.
ह्या शाळेच्या स्पर्धेत लाजणारी, जनसमुदायासमोर येऊन स्पेलिंग सांगताना आतुन घाबरलेली, समोर होणार्‍या टिंगलटवाळीला वैतागुन गेलेली आणि त्यामुळे थोडी नर्व्हस अन विचलीत होणारी 'अकिला'...
आणि त्या नंतर आधी शाळा, मग जिल्हा, मग राज्य अशा सर्व पातळ्या पार करत थेट 'राष्ट्रीय स्पर्धेला' धैर्याने, मोकळेपणाने आणि एका जबरदस्त आत्मविश्वासाने सामोरी जाऊन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी अकिला ...
असा हा प्रवास आणि त्याचेच हे चित्रण असलेला 'Akeelah and the Bee' ...

ह्या प्रवासात आपल्याला भेटतात ते स्पेलिंग तज्ज्ञ आणि अकिलाचे कोच असणारे डॉ. लॅरबी, अकिलाबरोबर ह्या विजेतेपदासाठी झुंझणारे झेवियर आणि डिलन नावाचे परस्परांविरुद्ध अ‍ॅटिट्युड असणारे २ विद्यार्थी.
कुठल्याही शब्दाचे स्पेलिंग तयार करताना नुसते पाठांतर न करता त्यामागची पार्श्वभुमी, शब्दाचा उगम असलेली भाषा, जोडाक्षरांचे महत्व, शब्दाची व्याख्या आणि तो शब्द वाक्यात वापरताना त्यामागे असलेले साधारण नियम आणि त्यामागची भुमिका प्रथम समजावुन घेणे आवश्यक असते ह्या तत्वाला चिटकुन राहणारे डॉ. लॅरबी. शब्दाचे स्पेलिंग सांगताना एक लय प्राप्त व्हावी, एकाग्र व्हावे म्हणुन त्याचाही सराव करुन घेणारे डॉ. लॅरबी.
आणि ह्याउलट केवळ स्पेलिंग 'पाठ' करण्याच्या घोकमपट्टी पद्धतीवर विश्वास असणारा डिलन आणि त्याचे वडिल. ह्यासाठीच सर्व इतर छंद आणि विरंगुळा ह्यांना फाटा देणारे डिलन आणि त्याचे वडिल, मजेतल्या खेळातही एकदम खालच्या स्तरातुन आलेल्या अकिलाने चक्क २ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेता असलेल्या डिलनला चांगलेच झुंजावल्याने नाराज आणि अस्वस्थ असणारे डिलनचे वडिल.
ह्या आणि अशा इतर व्यक्तिरेखांद्वारे आपण ह्या संपुर्ण प्रवासात अकिलाबरोबर असतो.

राष्ट्रीय स्पर्धेत शेवटच्या फेरीतला अकिला आणि डिलनचा सामना पाहण्यासारखा आहे. डिलनला ह्यावेळी स्पर्धा जिंकणे आवश्यक असण्याचे प्रेशर समजलेली अकिला, त्यासाठी जी काही मदत करता येईल ते करु म्हणुन मुद्दाम स्पेलिंग चुकणारी अकिला आणि अकिला स्पेलिंग मुद्दाम चुकली आहे हे जाणुन स्वतःही पुढचा शब्द चुकीचा स्पेल करणारा डिलन आणि त्यानंतर दोघांच्यातला संवाद हे सर्व मजेशीर आहे.
अशा चित्रपटचा शेवट नक्की काय होणार हे सर्वांनाच माहित असेल, पण तो कसा होतो हे पाहणे रंजक ठरेल.

ह्या चित्रपटाचे गुणवत्तामुल्य, निर्मीतीमुल्य किंवा अन्य भव्यदिव्यता किती ह्यावर मला काही लिहायचे नाही, ते महत्वाचे नाही.
पण २ तास निखळ मनोरंजन करणारा आणि 'स्पेलिंग बी' सारख्या वेगळ्या विषयाला हाताळणारा हा चित्रपट पाहणे नक्कीच एक चांगला अनुभव असेल ...

टीप : छायाचित्र आंतरजालावर साभार

विकिपेडियावर असलेली ह्या चित्रपटाची माहिती
आयएमडीबीवर ह्या चित्रपटाचे परिक्षण

Monday, July 4, 2011

गंमतशीर बातमी - गंमतशीर निर्णय - गंमतशीर कनेक्टिव्हीटी - गंमतच गंमत ...

आज बर्याच दिवसांनी एक निखळ मनोरंजन करणारी बातमी वाचायला मिळाली ह्या बातमीची आम्हाला खुप गंमत वाटल्याने ती वाचकांसमोर ठेवण्याच्या मोह आम्हाला आवरला नाही.
गंमतच गंमत ...

http://72.78.249.107/esakal/20110704/4700594298586467547.htm

थोडक्यात सार असे ...

"कनेक्टिंग इंडिया'चा नारा देणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेडने आता "कनेक्टिंग ओबीसी मिशन' हाती घेतले आहे. राज्यातील ओबीसी समाजाच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क "ओबीसी टू ओबीसी अनलिमिटेड फ्री ग्रुप कॉलिंग'ची अभिनव योजना सुरू केली आहे, त्यामुळे "ओबीसी' असणाऱ्या सर्वांना अगदी फुकटात गप्पा मारता येणार आहेत. मंडल आयोगात समाविष्ट करण्यात आलेल्या ओबीसींच्या 357 जाती या योजनेत एकमेकांशी जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

राज्यात ओबीसींच्या जातींचे संघटन करणाऱ्या ओबीसी सत्यशोधक परिषदेच्या मेंदूतून या योजनेने जन्म घेतला आहे. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर बीएसएनएलच्या मुख्य महाव्यवस्थापकांसमोर ही योजना मांडली. अर्थात, त्यांनीही या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर "ओबीसी टू ओबीसी' फ्री कॉलिंगची संकल्पना अस्तित्वात आली, असे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी "सकाळ'ला सांगितले.

मंडल आयोगात समावेश असणाऱ्या महाराष्ट्रातील रंगारी, भावसार, शिंपी, साळी, तेली, परीट, नाभिक, सुतार, लोहार, आतार, बागवान, कासार, झुल्लीया, माळी, कोळी, धनगर, बंजारा, वंजारी, गुरव, गवळी, जैन, कोष्टी आदींसह 357 जातींचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
सत्यशोधक ओबीसी परिषदेमार्फत येत्या तीन महिन्यांत सहा हजार ओबीसींना या योजनेच्या माध्यमातून बीएसएनएल सत्यशोधक ओबीसी परिषदेशी "कनेक्' करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आहे की नाही गंमत ?
म्हणजे एकगठ्ठा मतांसाठी केले जाणारे राजकारण आणि त्यासाठी आणल्या जाणार्या योजना किती गंमतशीर असतात ह्याची उदाहरणे कित्येक आहेत, पण आज ह्या निर्णयाने सर्वांवर डायरेक्ट धोबीपछाड डाव टाकला आहे.
मला ह्यातले लॉजिक नाय समजले.
सध्या ओबीसी समाजाला किती आरक्षण आहे वगैरे ह्या भानगडीत पडता मी साधारणता भारतातले ३०% लोक ओबीसी आहेत असे मानतो ( अरे, ही फिगर तर 'बहुसंख्य' कडे चालली आहे, असो ). त्यांना 'संधी' उपलब्ध व्हाव्यात म्हणुन मदत, शिक्षणाच्या पद्धतीत सवलत, आर्थिक फायदे, नोकर्यात आरक्षण वगैरे समजु शकतो पण हे 'अनलिमिटेड बोला' ही सवलत म्हणजे नक्की काय ?

असो, मला टिका वगैरे करायची नाही, टिका करणारे आम्ही कोण त्याने काय फरक पडतो हे सत्य माहित आहेच.

पण लेट्स एंजॉय.
आपण काय करु की ह्या सरकारी संस्थांना अशाच 'सुपीक' आयडिया सुचवु, म्हणजे कसे विकासाचा मक्ता एकटा काय सरकारनेच घेतला नाही, आपणही मदतीचा हात देऊ शकतो अशी माझी प्रामाणिक भावना आहे.

असो, तर खालील उपाय मला 'पटकन' सुचले आहेत, पुढेमागे ह्याची अंमलबजावणी झाली तर माझा एखाद्या 'पद्मश्री' वगैरे पुरस्कारासाठी विचार व्हावा असा एक प्रस्ताव जाताजाता मांड्तो.

. 'अबक' ह्या जाती-जमातींवर खुप वर्षे अन्याय झाला आहे त्यांना आता ह्याबाबत बोलता यावे म्हणुन मोबाईल बीलात ५०% सवलत.
. 'क्ष' वर जरा जास्तीच अन्याय झाला किंवा त्यांना सुधारण्याची संधी दिली जावी म्हणुन संपुर्ण बील माफ.
. '' हे फारच मागास आहेत, त्यांना त्वरित 3G तंत्रज्ञान असलेला फोन फुकट दिला जावा आयुष्यभर बील माफ असावे.
. '' ला जास्त शैक्षणिक संधी मिळाव्यात म्हणुन अनलिमिटेड इंटरनेट उपलब्ध करुन द्यावे.
. '' वाले फार माजले आहेत, वर्षानुवर्षे ह्यांनी शोषण केले आहे म्हणुन त्यांचे मोबाईल हिसकावुन घ्यावेत किंवा त्यांना भरमसाट बील येईल व्यवस्था करावी किंवा त्यांना अत्यंत मर्यादीत अशी बँडविड्थ द्यावी.
. '' ह्यांचे आत्तापर्यंत खुप कौतुक झाले आहे, आता त्यांनी एकदम बेसिक हँडसेट वापरावेत दिवसातुन दोनच फोन्स करावेत, इनकमिंगला पैसे पडतील, एसेमेसचे लाड चालणार नाहीत
. '' ह्यांची कंडिशन आता सुधारली आहे, सबब त्यांनी आता येईल ते बील भरावे, भरल्यास निषेध खलिता पाठवीला जाईल.
. 'ज्ञ' हे लोक खुप धोकादायक आहेत, त्यांना मोबाईल वापरण्यास सोडा पण पाहण्यासही बंदी असावी, तसे आढळल्यास देशद्रोहाचा खटला भरण्यात येईल.
. '' लोकांचा संवाद वाढावा म्हणुन त्यांना 'व्हिडिओ कॉलिंग, कॉल कॉन्फरंस' वगैरे सुविध मोफत मिळाव्यात, वापरणे जमत नसल्यास खास 'प्रशिक्षक' पद निर्माण करुन त्यांच्या उपलब्ध संधीत वाढ केली जावी.
.
.
.
इथेच थांबतो ...

काय आहे, आत्ताच एक फोन आला आहे, ते मोबाईल कंपन्यांचे धोरण बिरण बदलायच्या आधी 'इनकमिंग फ्री' म्हणुन बोलुन घेतो, उद्याचे कुणी पाहिले आहे हो.
बाकी ते 'पद्मश्री'चे वगैरे विसरु नका बरं का सर्कारी बाबूलोकं, काही शंका वगैरे असतील तर 'मिस्स कॉल' द्या, मी फोन करतो, कसे ? Wink

एक उद्धट आणि अवांतर चौकशी :
बीएसएनएलकडे 'मुर्ख टु मुर्ख कॉलिंग फ्री' अशी बीलिंग स्कीम आहे का ?
असल्यास मी ह्यासाठी अर्ज करु इच्छितो, सदर चौकशी कुठे करावी हे कळावे. आवश्यक ती प्रमाणपत्रे सादर केली जातील ( सदर लेखही 'मुर्खपणा'चा पुरावा म्हणुन ग्राह्य धरला जावा ही नम्र विनंती )