Tuesday, March 10, 2009

उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला.

ही आमची पाककॄती आम्हाला महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी अनेकविध पदार्थांची नावे सांगुन आमचा जीव टांगणीवर लावणार्‍यांना , आंतरजालावर त्याचे फोटो टांगुन आमची गोची करणार्‍यांना , फराळ करतान आमची आठवण काढणार्‍यांना आणि न काढणारे अशा सर्वांना अर्पण ...!!!
तर मेहरबान, कदरदान, खानदान आणि ए.आर. रेहमान ( ऑस्कर मिळलयं म्हटलं त्याला, आहात कुठे ? ) सादर आहे एक धमाल रेसिपी " उपवासाची बॅचलर साबुदाणा थालिपिठे" ...
आता हे "...उर्फ डॉन्याचा सल्ला" असे का लिहायचे ?ह्याचे कारण असे आहे की असे लिहल्याशिवाय पाककॄतीला वजन येत नाही असा ह्या क्षेत्रातली डॉन असलेल्या मेघनाचा सल्ला आहे. असो, आपल्याला काय लेखाला वजन आल्याशी मतलब ;)
***********************
तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे काय ह्याचा पुर्ण विचारान्ती आणि होशोहवासमध्ये ( हो, कारण उपवास सोमवारी होता आणि त्याआधीचा दिवस म्हणजे रविवार ;) ) निर्णय घ्यावा ( हो ना, अन्यथा उपवास नसेल तर उपवासाचे पदार्थ पदराला खार लाऊन करतो कोण ? ज्या गावाला जायचेच नाही त्याचा डिटेल पत्ता काढण्यात काय हाशील ? ) , एकदा का बार उडवायचा ठरले की मग अजिबात मागे हटणे नाही ...
तर आपला "उपवास" आहे हे नक्की झाले मग आता उपवाला चालणारे, इथे मिळणारे, लवकर तयार होणारे आणि स्वस्त असणारे पदार्थ हुडकायला सुरवात करावी व सर्व चाचपणी करुन झाल्यावर आपल्याला "साबुदाणा खिचडी" करायची आहे हे ठरवुन घ्यावे. काळजी नको, मी जरी वर टायटल "थालपीठ" असे टाकले असताना इथे मी "खिचडी" लिहणे म्हणजे महाशिवरात्रीच्या प्रसादाचा पर्यायाने भांगेचा प्रताप नव्हे, ते पुढे कळेलच ..!!!

* साहित्य :
साधारणता १ किलो साबुदाणा
१ /४ किलो शेंगादाणे
1/२ किलो बटाटे
15 -२० हिरव्या मिरच्या
बचकभर जीरे ,
३-४ चमचे जीरेपुड ,
तुप / तेल ( प्रमाण ? छ्या, दारु पिताना काय तुम्ही प्रमाण पाहुन पिता काय ? ) ,
मीठ, तिखट हाताला येईल तसे ( जे मीठ आणि तिखट यांचे व्यवस्थीत प्रमाण सांगु शकतात ते काश्मिर समस्येवर अचुक उपाय सुचवु शकतात ),
२ लिंबं,
एक मोबाईल, एक लॅपटॉप ( इंटरनेट कनेक्शन असलेला ) , एक टीव्ही.
१ ट्रॉपीकाना ऑरेंज ज्युसची बाटली ( कशाला ? नंतर सांगेन ),
आपल्यासारखेच टुकार ५-६ मित्र,
१ ऐनवेळी टांग मारणारा पगारी स्वैपाकी उर्फ कुक
महत्वाचे : रिकामा ३-४ तासाचा वेळ

सर्वात प्रथम उठुन हापीसात गेल्यावर गेल्यागेल्या "आज माझा उपवास आहे" हे जाहीर करावे व स्वतःचे कौतुक करुन घ्यायला सुरवात करावी. दररोज ज्यांच्याबरोबर ब्रेकफास्टला जाताय ( नावे ? आम्ही नाय सांगणार बॉ, लाज वाटते आम्हाला ) त्यांनी आज ठामपणे " नाही" म्हणुन सांगावे, फारच आग्रह झाला व समोरची व्यक्ती अगदीच सोडेनाशी झाली तर त्यांच्याबरोबर जाऊन आपण फक्त "मोसंबी ज्युस" प्यावा व हाच सर्वात उच्च आणि श्रेष्ठ उपहार आहे ह्यावर त्यांचे बौद्धिक घेऊन त्यांना काव आणावा, ते वैतागुन तुमचे ज्युसचे बील स्वतःच भरतील. आख्खा दिवस शक्यतो ज्युस ,फळे, सहकार्‍यांनी "काहितरी खाऊन हे" म्हणुन केलेला आग्रह ह्यावर काढावा.आज उपवास आहे ह्यासबबीखाली हापीसातुन लवकर घरी निघावे व पुढच्या तयारीला लागावे ...

अर्थातच आपल्या फ्लॅटवर साबुदाणा नावाचा प्रकार नसतोच, मग आधी त्याला हिंदी/इंग्रेजीत काय म्हणतात हे आठवायचा प्रयत्न करावा, शेवटी "सागु / सॅगो " हे इंग्रजी नाव आठवल्यावर शंभु महादेवाचे नाव घेऊन खरेदील निघावे. आपले मराठी व इंग्रेजी मिश्रीत हिंदी व त्यांचे शुद्ध कन्नडा अशी २-३ ठिकाणी खडाजंगी झाल्यावर शेवटी एक किलोभर "सब्बक्की उर्फ कन्नड साबुदाणा" घेऊन यशस्वीरित्या घरी यावे.मग लॅपटॉप उघडुन आंतरजालावर कुठे काही रेसिपी दिली आहे का ह्याची चाचपणी सुरु करावी, सर्वात शेवटी मिपाकर असलेल्या चकली यांचा ब्लॉग उघडुन "उपवासाचे पदार्थ" हे पान खोलावे, त्यात साबुदाणा खिचडी हे पाहुन घावे व आपल्याला जमेल इतका कॉन्फीडंस आला की मग पुढ्च्या तयारीत लागावे ...

सर्वात प्रथम साबुदाणा स्वच्छ धुवुन घ्यावा, मग तो "भिजण्यासाठी" एक पातेल्यात मुबलक पाणी घेऊन त्यात टाकुन द्यावा. ब्लॉगवर लिहलेली "उरलेले पाणी काढुन टाकावे" ही सुचना सोईस्कर विसरुन जावी. आपण लै भारी काम केले ह्या आनंदात फटाफट मित्रांना "खिचडी जमते आहे रे " असा समस टाकुन रिकामे व्हावे, त्यांचा फोन येण्याची शक्यता गॄहीत धरुन पटकन कमीत कमी तासभर गप्पा मारता येतील अशा व्यक्तीला फोन लावावा, आपण मस्त गप्पा मारत बसावे व मित्रांच्या "वेटिंगवर असलेल्या कॉल्स" कडे सोईस्कर दुर्लक्ष करावे. शेवटी बसुन, झोपुन, लोळुन, उभे राहुन अथवा कसेही फोन हातात पकडायचा व बोलायचा कंटाळा आला की फोन बंद करावा व मित्रांना परत फोन करुन "काय झाले?" असा प्रश्न करुन काही "प्रेमळ शब्दांची व स्तुतीपर वाक्यांची देवाणघेवाण" करावी, सर्वात शेवटी त्यांना येताना बरोबर आणायच्या पदार्थांची अशी लिश्ट द्यावी की त्यांना त्यापेक्षा पुण्याला जाऊन खिचडी खाऊन येणे परवडेल असे वाटले पाहिजे. असो.
त्यात एका मित्राच्या बोलण्यात "भिजवताना उरलेले पाणी काढुन टाकलेस का ?" असा उल्लेख ऐकल्याबरोबर धावत किचनमध्ये जावे पातेल्यात तयार झालेला " साबुदाण्याचा लगदा" पाहुन डोक्याला हात लावावा व हातासरशी लवकर का बोलला नाही म्हणुन मित्राला ४ शिव्या घालुन घ्याव्यात ...

छे , आता सर्वच गंडले, रात्रीचे जेवण बोंबलणार ह्या कटकटीने टेन्शन आल्यास लॅपटॉप उघडुन मिपामिपा खेळत बसावे अथवा क्रिकेट गेम खेळत बसावी. आत सर्व काही शंभु महादेवाच्या हातात आहे असे मानुन आपण आपले काम ( म्हणजे गेम खेळणे ) मन लाऊन करावे ...

आपण केलेल्या "समस"चा इफेक्ट म्हणुन एखादा मित्र लवकर घरी आल्यस त्याला आल्याआल्या किचन मध्ये न्हेऊन तो "लगदा" दाखवावा व त्याला झीट आणावी. मग तो ज्वर ओसरला की आता ह्याचे काय करता येईल ह्यावर प्रबोधक चर्चा करावी, मित्राची " तो लगदा गॅसवर तापवुन पाहु का ?" ही कल्पना ३-४ शिव्यांच्या आधारे फेटाळुन लावावी ...
मग दोघांनी मिळुन "चकली ब्लॉगवर" अजुन काय शक्य आहे ते पहावे ...
आता खिचडी जमणे अशक्य अशी २-३ ठिकाणी फोन करुन खात्री झाल्यावर आपण आता मस्त "साबुदाणा थालपिठे" करु असे ठरवुन घ्यावे व त्याच्या तयारीत लागावे ...

सोईस्करपणे आपल्या सध्याच्य्या अल्पवस्त्रस्थितीचे कारण पुढे करुन मित्राला बटाटे आणायला हाकलावे व तोवर मी शेंगादाणे भाजतो अशी त्याला खात्री द्यावी. म्हटल्याप्रमाणे कढाई गॅसवर ठेउन, गॅस फुल्ल करुन त्यात शेंगादाणे ओतावेत व ते भाजताना सतत हलवावे लागतात ही महत्वाची गोष्ट विसरुन आपण शांतपणे हॉलमध्ये जाऊन टीव्ही लावावा व त्याचवेळी कुणाला तरी फोन करुन आत्मानंदी तल्लीन व्हावे. थोड्या वेळाने मग काहीतरी तडतड आवाज व जळाल्याचा वास आला की धावत किचनमध्ये जाऊन गॅस बंद करावा व मित्र यायच्या आत जळालेले शेंगदाणे डस्टबिनमध्ये टाकुन द्यावेत, आता मात्र आणिबाणीची परिस्थीती आली असे समजुन थोड्याश्या गांभिर्याने "शेंगदाणे भाजणे" हे कार्य पुर्णत्वाला न्ह्यावे. मित्र आल्यावर त्याच्याकडुन बटाटे घेऊन ते उकडायला कुकरमध्ये लाऊन द्यावेत.

थोड्या वेळाने आणखी १ बॉडीबिल्डर मित्र आल्यावर त्याला आधी हरबर्‍याच्या झाडावर चढवुन त्याला "शेंगादाणे कुटायच्या" कार्याला बसवावे व तोवर आपण आपला क्रिकेटचा गेम पुर्ण करत रहावा....
अजुन १-२ मित्र आल्यावर व त्यांनी आपला व्यवस्थीत उद्धार करुन ते आता सफिशियंट वैतागले आहेत ह्याची खात्री झाल्यावर सर्व तयार असलेले रॉ मटेरियल घेऊन "साबुदाण्याची थालिपीठे" करायला सुरवात करावी ...

एक मोठ्ठी परात घेऊन त्यात उकडलेल्या बटाट्यांचा लगदा करायला घ्यावा, मनोसोक्त बटाटे स्मॅश करुन झाल्यावर त्यात मगाशी तयार झालेला साबुदाण्याचा लगदा + शेंगादाण्याचा कुट + लिंबाचा रस + जीरे आणि जीरेपुड + मीठ + तिखट हे हाताला येईल त्या प्रमाणात मिसळावे. चव जमली आहे की नाही हे तपासण्याशीठी चमचा-चमचा ह्या हिशोबाने टेस्ट करत रहावे व जेव्हा २ वाट्या मिश्रण असेच फस्त होईल तेव्हा ते योग्य जमले आहे असे जाहीर करावे ...
शेवटी हा ( म्हणजे मी ) आता थालिपीठी तयार करणार अशी मित्रांची खात्री झाली व ते निवांत बसले की " अरेच्च्या, मिरच्यांचा ठेचा टाकायचा राहिलाच चुकुन " अशी त्यांना आठवण करुन द्यावी. मग ते चिडुन मिरच्या कुटत असताना आपण शांतपणे हात धुवुन, फ्रीजमधली ज्युसची बाटली काढुन आरामात मिपामिपा खेळत बसावे. त्यांनी ज्युस मागीतल्यास तो उष्टा आहे व उपासाला असे चालणार नाही असे सांगुन एक मोठ्ठा घोट घेऊन तो ज्युस "क्लासऽऽऽऽ" आहे हे जाहीर करावे.शेवटी मिरच्यांचा लगदा मनोसोक्त आधीच्या तयार मिश्रणात मिसळत बसावा ...

मग कंटाळा आला की ते सर्व घेऊन किचनमध्ये जावे. गॅस चालु करुन एक नॉनस्टीक तवा गरम करायला ठेऊन द्यावा व पुन्हा बाहेर जाऊन टीपी सुरु करावा, तवा तापला आहे ह्याची खात्री मित्रच करतील पण मित्रसुद्धा तापले आहेत ह्याची खात्री अपणच करावी , मग आपण एकदम टेचात उठुन किचनमध्ये जावे व कुणाला तरी "एक प्लास्टीकच्या कागदाचा तुकडा आण रे" असा हुकुम सोडावा. तो बिचारा हुडकत बसतो, नियमाप्रमाणे त्याला लवकर सापडत नाहीच. मग आपण इतर मित्रांबरोबर त्याचा व्यवस्थीत उद्धार करुन घ्यावा...
शेवटी सर्व सारंजाम जमला की तयार मिश्रणाचे "मध्यम आकाराचे गोळे" तयार करुन घ्यावेत, ह्या कामात मित्र तुम्हाला खात्रीने मदत करतील. मग त्या कागदाला थोडेसे तुप लाऊन त्यावर हा गोळा ठेवावा व व्यवस्थीत थापुन साधारणता गोल व समान जाडीचा असा पराठासदॄष्य आकार बनवावा. तुप सोडण्यासाठी त्याला मध्ये बोटाने छोटेसे भोक पाडुन ठेवावे ...
मग तो परठा न मोडता तव्यावर तुप सोडुन त्यावर टाकण्याच्या अवघड कामाला सुरवात करावी. शंभु महादेवाला तुमची दया आल्याने हे काम व्यवस्थीत पार पडते.आता हे पलटुन भाजण्यचे काम एका नवशिक्या मित्राकडे सोपवुन द्यावे व आपण संजीव कपुरच्या आवेशात त्याला सुचना करत रहाव्यात. त्याच्या हातुन थालिपीठ तुटते , कधी कच्चे रहाते, कधी कागदावरुन तव्यावर जायच्या ऐवजी निम्मे ओट्यावर पडते पण आपण सन्यस्त दृष्टीने हे सर्व एंजॉय करावे, जो काही समाचार घ्यायचा आहे तो बाकीचे मित्र घेतील ...

आपला थोडा थालपिठे लाटायच्या कार्यात व मित्राचा भाजण्यात हात बसल्यावर मात्र पुढचे सर्व व्यवस्थीत पार पडते. पण त्याआधी वाया गेलेल्या थालपिठांचे दु:ख मानु नये, थॉमस अल्वा ऍडीसननेसुद्धा विजेचा बल्ब बनवताना ९९९ वेळा चुक केली होती हे लक्षात असु द्यावे ...

सर्व थालिपीठे तयार झाल्यावर एका ताटलीत हे थालिपीठ + दही + बटाटा वेफर्स + तुप + द्राक्षे घेऊन आरामात तंगड्या पसरुन टीव्ही पहात मित्रांबरोबर थट्टा मस्करी करत व आज काय काय "पाहण्यालायक" दिसले ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा करत हादडावे. अशा कठोर व्रताने महाशिवरात्र भरभरुन पावते व शंभुमहादेव तुमच्यावर प्रसन्न होतो असे डॉनबाबा बेंगलोरी ह्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहले आहे ....

महत्वाची गोष्ट : फोटो ; आंतरजालावर फोटोविना पाककॄती म्हणजे बॅटविना तेंडुलकर, अंगभर कपडे घालुन मल्लिका शेरावत किंवा निरपेक्ष लिहणारे सुमर केतकरच ...
थोडक्यात अशक्य व अमान्य ...पण वरच्या पाककृतीवरुन आपल्याला जर याचा "फोटो काढता येईल" अशी खात्री असेल तर आपल्या पायाचा फोटो आम्हाला पाठवावा, आम्ही तो फोटो व आमच्या पाककॄतीचा फोटो त्वरित आंतरजालावर टाकु... ;)

Tuesday, March 3, 2009

स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग-२

नमस्कार मंडळी,
ह्या आधीचा भाग आपल्याला स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... इथ पहायला मिळेल ...
नुसता कोरडेपणाने दुसरा भाग सुरु करणे हे अभद्रपणाचे लक्षण, म्हणुन काही मसाला टाकत आहे ..सर्वांनी आत्तापर्यंत राजकीय प्रतिक्रीया पाहिल्या / वाचल्या, पण कोणी "वॄत्तपत्रांकडे" लक्ष दिले का ? भले त्यांनी दमदार अग्रलेख छापले असतील पण संपादक मनातुन काय म्हणतात ते पहा ...
=============================

* सुमार केतकर , लोकसत्ता :
कल्पनेच्या तीरावरील जग सेल्युलॉईडच्या पट्टीवर जिवंत करण्यात आयुष्य घालवलेल्या कलावंतांच्या आयुष्याला सोनेरी किनार प्राप्त करून देणार्‍या या ऑस्करच्या सोहळ्यात एकदम ८ पुरस्कार मिळवुन निर्भेळ यश मिळवणर्‍या स्लमडॉगचे अभिनंदन. गेल्या निवडणुकीत माननीय सोनिया गांधीच्या नेतॄत्वाखाली काँग्रेसने असेच यश मिळवले होते पण ते भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांना पहावले नाही, त्यांनी थयथयाट करुन सोनियाजींना पंत्रप्रधान होण्यापासुन रोखले.
"...ऍण्ड ऑस्कर गोज टू स्लमडॉग मिलेनियर!' या घोषणेनंतर लॉस एंजलिसच्या कोडॅक थिएटरबरोबरच नरिमन पॉईंटवरच्या उत्तुंग इमल्यापांसून धारावीतल्या झोपडपट्टीपर्यंत आणि बनारसच्या दशाश्वमेध घाटापासून झुमरीतलय्यातल्या हवेलीपर्यंत सर्वत्र जल्लोष झाला. भारताच्या धर्मनिरपेक्ष एकात्मतेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मात्र मोदी आणि विहिंप यांनी गुजरात बरोबरच आता कर्नाटक राज्यही हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनवुन तिथे अमानुष हिंसाचाराचे तांडव चालवले आहे व धार्मीक सौर्हाद्याच्या गळ्याला नख लावले आहे, महाराष्ट्रात तर ठाकर्‍यांचा कुणानाही न जुमानता नंगा नाच सुरुच आहे. अशा परिस्थीतीत आपल्याला एका समर्थ नेतॄत्वाची गरज आहे व त्यासाठी आमच्या मते सोनिया गांधींपेक्षा योग्य उमेदवार देशात शोधुन सापडणार नाही.
शेवटी पुरस्कार घेताना रेहमान म्हणतो "'आयुष्यभर मला प्रेम व तिरस्कार यांच्यातून निवड करावी लागली. मी कायम प्रेमाचाच पुरस्कार केला आणि म्हणूनच मी आज येथे उभा आहे! ". धर्माधिष्ठीत राजकारण करणार्‍यांना ही एक सणसणीत चपराक आहे. “धर्म ही अफूची गोळी आहे" असे कार्ल मार्क्सने म्हटले आहे. पण आत ह्याच लालभाईंनी अणुकराराच्या मुद्द्यावर ऐनवेळी पाठिंबा काढुन घेऊन युपीएचा कात्रजचा घाट करण्याचा प्रयत्न केला व त्यांना भाजपा व जात्यंध राजकारण करणार्‍या मायावतींची फुस होती. पण सोनिया गांधींनी एकाच तडाख्यात सर्वांना आस्मान दाखवले.
आता काही मंडळी भारताच्या इमेजचे हनन केले म्हणुन स्लमडॉगच्या नावाने कंठषोश करत आहेत, चांगल्या कामात नाक कापुन अपशकुन करण्याचा हा प्रकार, ह्याला कट असेच म्हणणे योग्य ठरेल. असाच कट भाजपा व त्यांच्या पिल्ल्यांनी मुम्बई हल्ला घडला त्या वेळी करुन सरकारचा राजीनामा मागितला होता, डाव्यांनी अणुकराराच्या मुद्द्यावर सरकारला कट करुन अडचणीत आणले होते. सोनिया गांधींना व पर्यायाने काँग्रेसला अडचणीत आणुन भारतीय लोकशाहीच्या मुळावर उठणार्‍या असल्या हलकट प्रवॄत्तीचा आम्ही निषेध करतो.
असो.
स्लमडॉग चे अभिनंदन ...!!!

* डॉ. वरुण टिकेकर :
कसल्याही लोकशाहीवादी निवडणुकीतुन झालेल्या निवड प्रक्रीयेत मिळणारे यश हे निर्भेळच असते, म्हणुनच स्लमडॉगचे अभिनंदन. आता भारताच्या सांप्रत काळात एकंदरच समाजवादी व उदारमतवादी विचारप्रणाली नामशेष होत असताना स्लमडॉगने असे यश मिळवणे ही एक स्पॄहणीय घटना आहे. लोकहितवादी आगरकर, टिळक व न्या. रानडे ह्यांनी समाजात रुजवलेला उदारमतवाद व सामाजीक सौर्हाद्य ह्याची जर पुन्हा रुजवणी झाली तर भविष्यात यशाच्या अनेक पायर्‍या आपण चढु याबद्दल मनात किन्तु नाही ...

* स्वानंद आगाशे , पुणे सकाळ :
स्लमडॉगने पुरस्कार मिळवुन अख्ख्या जगात आपले नाव करणे ही महत्वपुर्ण घटना आहे. तसेही जगात आजच्या घडीला स्लमडॉग सोडला तर पुणे सोडुन पहाण्यासारखे आहेच काय ? पुण्यातल्या राजकारण्यांनी बीआरटी, रस्ते, पाणी ह्यासारखे मुलभुत प्रश्न आधी सोडवणे गरजेचे आहे. पुणे महोत्सव हा कुणाच्या नेतॄत्वात व्हावा हा मुद्दा गौण आहे. लवकरच आम्ही सप्तरंगमध्ये ह्याबद्दल लिहणार आहोत ...
स्लमडॉगच्या निमीताने युवा पिढीला बोलते करण्यासाठी पुन्हा "युवा सकाळ" सुरु होत आहेच...

*रोखठोक राऊत, सामना :
मराठी माणसाचा मानबिंदु असणार्‍या मुंबईवर बेतलेल्या स्लमडॉगला ऑस्कर मिळण्याची घटना ही अभुतपुर्वच म्हणावी लागेल. काही दळभद्री, पोटार्थी, भिकारड्या, नेभळट व भाकरी शैली असणार्या पत्रकारजंतुंनी आधी ह्याविरुद्ध बरीच आरडाओरड केली होती. तो चित्रपट परकीय आहे म्हणुन का त्यावर असा हल्ला करावा ? ही लोकशाही आहे का मोगलाई ? व्यक्तीस्वातंत्र्याला नख लावणा-या या औरंगजेबी प्रवृत्तींना जागीच ठेचले पाहिजे. असल्या सुपारीबाज व मराठी माणसाच्या मुळावर उठणार्‍या प्रवॄत्तीला आत्ताच जागा दाखवली पाहिजे. काही निवडक धनदांडग्या व आपमतलबी लोकांच्या दाड्या कुरवाळण्याचे प्रकार थांबणार कधी ???

* शरदकुमार राऊत, राज्यसभा खासदार, स्तंभलेखक मटा :
एकंदरीतच सर्वंकष विचार केला तर ही घटना स्पृहणीय आहे असेच म्हणावे लागेल. स्लमडॉगचा सन्मान हा फक्त चित्रपटाचा नसुन समस्त भारतीय जनतेचा व त्यातल्या त्यात झोपडपट्टीत हलाखीचे जीवन जगणार्‍या लढावय्यांना दिलेली आदरांजलीच म्हणावी लागेल. मटानायक उद्धवजी यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना नेहमीच अशा वर्गाच्या मागे उभे राहिली आहे, आत्तापर्यंतचा इतिहास जर आपण सुक्ष्मदॄष्टीने पाहिला तर आपल्याला ठायीठायी ह्या गोष्टी जाणवतील ....
( मग ते बराच वेळ उद्धवजी, अफझल गुरु, नरेंद्र मोदी, गोध्रा, ओबामा, मायावती , भाजपा, समाजवाद , सांस्कॄतीक एकता, शिवसेनेचे कार्य , महाराष्ट्राची प्रगती, मुंबईचे स्थान, मुंबई हल्ला, निष्क्रीय राज्यकर्ते ह्या विषयांवर बोलत राहिले ...
शेवटी मुळ मुद्दा काय होता हे विसरुन गेल्याने त्यांनी एकदम गंभीर मुद्रा करुन थोडेसे खाकरुन आम्हाला "आता निघा" असा सिग्नल दिला. )

* मिखील वागळे , आयबीएन लोकमत :
अरे ऑस्कर देत नाय म्हणजे काय ? स्वतःला समजता कोण ? भारतीय समाज व चित्रपटांना कमी लेखणे थांबणार कधी , किती दिवस ह्या गोष्टींवर टिका करणार ? माझ्यावर तर अनेकदा टिका होते, आरडाओरड होते परंतु मी कधी डगमगलो नाही. परंतु हे कोठेतरी रोखण्याची गरज आहे असे तुम्हांला वाटत नाही का? आपल्याकडे येथे अनेक मान्यवर आहेत, अपण त्यांचे विचार जाणुन घेण्यासाठी त्यांच्याकडे वळणारच आहोत. पण त्याआधी मी घेतो एक ब्रेक, आपण पहात आहात "आय बी एन लोकमत" .....
( असे म्हणुन त्यांनी २ ग्लास पाणी पिले, व दाढी खाजवत विचार करु लागले )
पुन्हा उसळुन ते म्हणाले " अरे असे पडद्याआडुन वार करणे ****चे लक्षण आहे, हिंमत असेल तर स्वतः चित्रपट बनवुन ऑस्कर मिळवुन दाखवावा. मी इतकी वर्षे पत्रकारीतेत आहे, स्पष्ट बोलायला मी कुणाच्याही **ला घाबरत नाही... हा शुद्ध *** आरोप झाला.."
( शेवटी आम्ही त्यांना हा "आजचा सवाल" कार्यक्रम नाही असे भीतभीत सुचवले, त्यांनी मुद्रा एकदम क्रुद्ध केल्याने आम्ही तिथुन काढता पाय घेतला )

* ब्रिटीश नंदी , लोकप्रभा :
ऑस्कर मिळाले ही चांगलीच गोष्ट आहे ह्यात वाद नाही पण महत्वपुर्ण मुद्दा असा की आपण ह्यातुन काही शिकलो आहोत का ?मी माझी "ब्रिटीश नंदी" ही मालिका ह्यात हेतुन सुरु केली होती, जनजागरण ...!!!
पण कुठलेही मत मांडताना मग ते वॄत्तपत्रात असो वा चित्रपटाद्वारे तेव्हा संयम आणि मर्यादाशीलपणा तसेच एकंदर सामाजीक क्षोभाचे भान राखणे अत्यावश्यक ठरते. माझ्या मते इथे स्लमडॉग थोडासा मार खातो. तरीही हरकत नाही ...
अभद्र, असभ्य भाषेत संवाद वा चित्रण, तसेच श्लीलतेच्या मर्यादा ओलांडणारी आयटम सॉग्स वा खळबळजनक गॉसीप्स दाखवुन मलिदा खाणार्‍या व स्वतःची तुंबडी भरणार्‍यांचा आम्ही निषेध करीत आहोत. हे प्रकार जर थांबले तर ऑस्कर बरोबर जनाश्रयही मिळेल असे आम्ही अंतरात्म्याला साक्ष ठेऊन प्रतिपादन करु इछितो ...
========================================
जय हो ...!!!

विषेश आभार : नामवंत वॄत्तपत्रांचे अग्रलेख, बातमीदार ब्लॉग व आजानुकर्णाचा एक जुना लेख ...!