टीप : लेखात आलेले विचार अथवा असंबद्ध विधाने ही केवळ वैयक्तीक माझ्या वैचारीक कल्लोळामधुन आली आहेत, त्याचा कुणी सर्वसंमत अर्थ काढुन कॄपया गैरसमज करुन घेऊ नये. तसेच लेखातला बराच भाग हा विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे, पण ते मनातले विचार आहे तसे उतरवले असल्याने त्याला पर्याय नाही.
"तुम्ही ना भौ पक्के स्युडो सेक्युलर लोकं, आपला धर्म,
संस्कॄती आणि देव मानणार नाहीच पण त्यावर टिका करायची म्हणलं ना की सर्वात पुढे" -
इति : एक आंतरजालीय मित्र
"अरे ३ महिन्यातुन आज घरी आला आहेस, सकाळी १५-२० मिनीटे काढुन जर
घरातल्या देवाची पुजा वगैरे केली तर काय तुला पाप लागणार आहे का ? " इति : आई
"चल आज रात्री तुला विठ्ठलाचे पायाचे दर्शन घेऊन
आणतो २० मिनीटात, तसाही तु दिवसात रांगेतुन जाणार नाहीसच"- इति : गावाकडचा देवभोळा मित्र
"समोर दिसणार्या आणि जाणवणार्या अशाच गोष्टींवर विश्वास ठेवणे हे
भुमिका फारच टोकाची आहे, नव्हे मुर्खपणा आहे. देवाचे अस्तित्व ह्यापलिकडे आहे" -
इति : बाबा
" पुण्यात आलाच अहेस तर माह्या समाधानासाठी माझ्याबरोबर दगडुशेठला
जाऊन येऊयात, तुझी व्ह्युव्ह्स आपण नंतर सविस्तरपणे बोलु" - पुण्यातले मित्र
"पुढच्या वेळी सुट्टी काढताना १ दिवस जास्त काढ, तु
आणि हा शिर्डीला जाऊन या. सारखं टाळाटाळ करणे बरोबर नाही" - इति : काकु/काका
" आज तुझा वाढदिवस आहे ना, मग सकाळी देवळात गेला होतास का
? ते नसेल जमले अजिबात" - इति : असेच कुणीतरी
" भोसडीच्या विकेंडला रुमवर सकाळी सकाळी टीव्हीवर
गाणी बघत बस पण देवळात नको येऊस " - इति : असाच एक कोणीतरी अजुन एक मित्र.
" तुमची कशावर अंधपणे श्रद्धा नाही हीच तुमची अंधश्रद्धा
आहे" - इति : अजुन एक आंतरजालीय मित्र
म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ह्या सर्वांना ? मी काय ठार नास्तिक आहे ? ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ? का मी चक्क ढोंगी आहे असे त्यांचे मत आहे ? किंवा मी हे न करुन माझ्या शिकलेल्या शहाणपणाचे कौतुक करुन घेतो असे तर त्यांचे मत नाही ?
तसे लहानपण अतिशय देवभोळ्या, देवाचे अधिष्ठान असलेल्या व कर्मकांडाधिष्ठित समाज असलेल्या एका छोट्याश्या गावात गेले. कुटुंब आणि शेजारपाजारचे ही म्हणाल तर पक्के धार्मिक पण देवदेव आणि कर्मकांडाचा अतिरेक नसलेले, पण कसल्याश्या पुराण रिती आणि रुढींच्या कल्पना मनात घेऊन सर्वच गोष्टी अगदी मनोभावे करणारे. सर्वच वातावरण असे असल्याने व गावात १२ ही महिने "इश्वरनिष्ठांची मांदियाळी" असल्याने लहानपणातच अनेक स्त्रोत्रे, प्रार्थना, ष्लोक, ऋचा, स्तुत्या वगैरे तोंडपाठ झाल्या होत्या, तेव्हा अर्थ कळत नव्हता ह्या सर्वांचा पण म्हणताना अतिशय छान वाटायचे. इनफॅक्ट लहानपणी सगळीकडेच "मला सर्व पाठ आहे" हे दाखवण्याचा अट्टाहास झाल्याने आणि आज अगदी त्याच्या विपरीत असे काहीच औत्सुक्य न राहिल्याने स्वभाविकपणे सर्वांचा " मी नास्तिक होत चाललो आहे" हा काळजीचा विषय बनला आहे. लहानपणी जेव्हा आजोबा सकाळी सकाळी शुचिर्भुत होउन एखाद्या ध्यानस्त ॠष्यासारखे पुजेला बसायचे, तो फुला-उदबत्यांच्या सुगंध आणि आजोबांची धीरगंभिर आवाजात चाललेली विवीध संस्कॄत स्लोकांची आवर्तने ह्याने वातावरणच असे व्हायचे की मी सुद्धा स्वाभाविकपणे ह्यात ओढला जाऊन कधी आजोबांच्या मांडीला मांडी लाऊन रोजच्या रोज नियमाने पुजेला बसायला लागलो हे मलाच समजले नाही, मग मला नंतर "आवड आहे हो त्याला देवदेवाची, रोज सक्काळी पुजा केल्याशिवाय बाहेर जात नाही हो" वगैरे कौतुक ऐकुन मनातुन गुदगुल्या व्हायच्या.
आमची लहानपणीची शाळाही सांस्कॄतीक वारसा वगैरे सांभाळणारी, इथेही कर्मकांडांचे प्रस्थ फार. अर्थात हे सर्व चुकच असते असे नव्हे पण समजा हे केले नाही तर मात्र समोरचा कोणीतरी पापी आणि अपवित्र प्राणी आहे हे मात्र अवश्य ठासुन मनात भरले जायचे. लहानपणी मी इर्ष्येने " इदं तु ते गुह्यतमं, प्रव्यक्षाम्यनं सुयवे. ज्ञानं विज्ञानं सहितम्, यज्ञात्वा मोक्षसे शुभात" असे गीतेचे अध्याय वगैरे पाठ केले होते व स्पर्धाही गाजवल्या होत्या. थोडक्यात शाळेच्या दृष्टीकोणातुन मी एक "आदर्श असा संस्कारी विद्यार्थी" वगैरे होतो.
तेच पुन्हा येते ते वैश्विक शांती आणि बंधुतेचा संदेश देणार्या माउलींच्या "पसायदाना"बद्दल, आयुष्यभर इतरांकडुन पसायदानाची रोजची १०८ आवर्तने घोकुन घेणारे महाभाग जेव्हा मी दाराशी आलेल्या गरिब वारकर्यांना त्रास देतात तेव्हा "भुता परस्परे पडो, मैत्र जिवांचे" हे पसायदानाचेच तत्वज्ञान सोईस्करपणे विसरतात तेव्हा त्यांनी केलेया संस्काराला काय अर्थ उरतो ? मग तेच मात्र संस्कारी आणि आम्ही स्पष्ट बोलतो म्हणुन सम्स्कारविरोधी असा जो आमच्यावर अन्याय होतो त्याचे काय ?
लहानपणी गावाकडे पुजापाठ, व्रतवैकल्ये, याग, यज्ञ वगैरेंची बरीच रेलचेल, सत्यनारायणपुजा वगैरे तर अगदी नेहमीचेच. लहानपणीही कधी कसलीशी कथा वाचली म्हणुन बुडलेले जहाज वर येते ह्यावर मी अंधविश्वास कधी ठेवला नाही, मात्र ते वातावरण आणि जे काही घडते आहे त्यातुन ती पुजा घालणार्याच्या चेहर्यावर दिसणारे समाधान मात्र बरोबर वाचता यायचे. मग मोठ्ठेपणी पेशवाई आणि सत्यनारायणाची पुजा हा इतिहास समजला व लहानपणी आपण जे काही समजत होतो ते अगदीच चुक नव्हते ह्याचे समाधान वाटले. पण आजही मला सत्यनारायणाची पुजा आणि त्याचे धार्मिक महत्व काही केल्या समजत नाही, नपेक्षा मला स्वतःला कधी अशी पुजा घालावी वाटेल असे वाटत नाही. अर्थात मी हे बर्याच वेळा उघडपणे बोलुन दाखवल्याने समोरच्याच्या चेहर्यावरचे माझ्यबद्दल असणारे "धर्मबुडवेपणा"चे भाव मी सहजच वाचतो.
देवाला भेटण्यासाठी अथवा त्याच्याशी तादात्म्य पावण्यासाठी खास देवळातच जावे लागते हा गोड गैरसमज कधीच नव्हता. मात्र लहानपणी देवळातले वातावरण भारुन टाकत असल्याने देवळात जायची ओढ मात्र जरुर होती, अर्थात इथे देवळातल्या देवाच्या मुर्तीसमोर किती वेळ बसलो ह्याला तेव्हाही काही अर्थ नव्हता आणि आजही नाही. मात्र तेव्हा तेव्हा बरोबरच्या कंपनीमुळे म्हणा अथवा तेव्हाचे पवित्र, शांत आणि कमर्शियल न झालेले देऊळ मला जरुर खुळवत असायचे व देवळाकडे ओढला जायचो. हां, आता देवळात जाऊन तिथल्या मोठ्ठ्या पटांगणात आम्ही लहानपणी खेळायचो वगैरे ही माझी वैयक्तीक बाब झाली, इथे मी खास करुन देवाला भेटायला जात आहे असे केव्हाच नव्हते, पण समाजाच्या दॄष्टीने मात्र मी "रोज नेमाने देवळात जाणारा मुलगा" असे होतो.
आमच्या गावातल्या वाळवंटात आपला सर्व अहंकार बाजुला ठेऊन लक्ष-लक्ष संत कुळे "विठ्ठल विठ्ठल" चा जयघोष करत नाचली व ह्या गावाची मातीच त्यांनी पवित्र करुन टाकली, इथल्या प्रत्येक गोष्टीत एक पावित्र्य भरभरुन वहाते. तर आमच्या अशा ह्या गावात एकमेकांच्या "पाया पडण्याची" एक फार महान आणि पवित्र पद्धत आहे. लहानपणी हा काहितरी महान सोहळा आहे असे वाटायचे व मी त्यात कधी सामिल व्हायचो हे कळायचे नाही. कधी दुसर्या गावाला गेलो तर तिथले लोक "विठुमाऊलीची पाऊले" म्हणुन माझेच पाय धरायचे तेव्हा फार अवघडल्यासारखे व्हायचे आणि मनात काहितरी उच्च वाटायचे. तर सांगायचा मुद्दा हा की "पाया पडणे" ह्या संस्काराचे महत्व माझ्या लहानपणी खुप होते.
खरोखर मी संस्कार विसरत चाललो आहे का ?
अशी उदाहरणे ढिगाने देता येतील, त्याला तरी काय अर्थ आहे ?
थोडक्यात काय तर आम्ही म्हणजे एक नंबरचे "नास्तिक, धर्म न मानणारे, देवावर श्रद्धा नसणारे" असे संस्कार विसरलेले विक्षिप्त इसम आहोत ...
धन्यवाद ...!!!