Monday, October 20, 2008
दै. सामना चे आभार ...
त्या सोहळ्याचा आनम्द आम्ही इथे जर्मनीत बसुन "स्टार माझा" ह्या वाहिनीवर उदाहरणार्थ इंटरनेटवर ऑनलाईन टेलीकास्ट पाहुन घेतला व तो पाहुन आम्ही धन्य झालो.
मग त्याच भारलेल्या अवस्थेत व तीरमिरीत आम्ही एक "लेख - एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !" खरडुन टाकला व तो "मिसळपाव.कॉम" ह्या आम्च्या जीव की प्राण साईटवर ( व तसेच ह्या ब्लॉगवर ) टाकला, त्यावर भरपुर चर्चाही घडली.
असो। तर ह्यात दै. सामनाचा काय संबंध ?
तर दै। सामना ने ह्या लेखाची व त्यावरील चर्चेची दखल घेऊन आमच्या लेखात आम्ही व्यक्त केलेल्या भावना आहे तश्या त्यांच्या उदाहरणार्थ " १४ ऑक्टोंबरच्या अंकात" प्रसिद्ध केल्या.आम्हाला फार बरे वाटले.
आमचे बाळासाहेबांवर फार प्रेम आहे, हा लेख म्हणजे त्यांना आमची दसर्याची भेट म्हणुन फुल ना फुलाची पाकळी होती।सामनाने त्याची दखल घेऊन आमचाही सन्मान केला म्हणुन दै. सामनाचेही आभार !!!
हा मुळ लेख आपल्याला "इथे" पहायला मिळेल ...
दै। सामनाने त्याची घेतलेली "दखल" इथे पाहता येईल ...
मिसळपाव.कॉम वर घडलेली चर्चा व प्रतिक्रीया इथे पाहता येतील ...
धन्यवाद वाचकहो आणि दै. सामना !!!!
तसेच आम्हाला ही संधी उपलब्ध करुन देणार्या "स्टार माझा " वाहिनीचेही आभार !!!
Friday, October 10, 2008
एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !
आज सकाळपासुनच खुप उत्साहात आहे, आजचा दिवस दसर्याचा, सण हा "आनंदाचा, मांगल्याचा, आप्तजनांना शुभेच्छा व आपट्याची पानेरुपी सोने" देण्याचा। अतिशय उत्साहात सर्वांना शुभेच्छा देऊन झाल्या व रुटीन कामाला सुरवात झाली. हे सर्व करत असताना आठवण मात्र घरातल्या धामधुमीची, उत्साहाची व खास मराठमोळ्या डौलात साजर्या होणार्या दसर्याचीच होती।
आज दसरा म्हणजे विजयादशमी, अरे हा तर महत्वाचा दिवस, महाराष्ट्राच्या सन्मानाच्या शिरपेचात मोत्याचा तुरा व महाराष्ट्राच्या समाजकारणातील व राजकारणातील अजुन एक महत्वाची घटना दरवर्षी ह्याच मुहुर्ताला घडते ना? मग आज काही हालचाल आहे का नाही ? तसाच आहे का आजपण सळसळता उत्साह, डौल, सारंजाम व मराठी अभिमानाची शान ? चला, जरा पेपर चाळुयात, पाहु या काही आलयं का त्यात ? का गेल्या काही वर्षांसारखी कुठली तरी नैसर्गीक अथवा मानवी आपत्ती येऊन ही परंपरा खंडीत तर झाली नाही ?
चायला, २ वाजले की म्हणाजे भारतात चक्क संध्याकाळचे ५,३० !!! छे, सोहळा सुरु झाला असेल, कुठे पहायला मिळेल ? जीवाची नुसती तगमग होत आहे, माहिती नसले तर ठीक होते आता संयम राखणे कठीण आहे।कुठुन तरी लिंक मिळवायला हवीच त्या टेलीकास्टची ....
हुश्श्श !!! हुर्रे ....सापडली ,स्टार माझा लिंक मिळाली, ह्यावर आहे लाईव्ह टेलीकास्ट ...
"एकच दिवस, एकच मैदान, एकच वक्ता, गेले ४३
अर्रे बापरे, काय गर्दी जमली आहे, किती लोक आले आहेत साहेबांना ऐकायला व त्यांचे विचार ऐकायला, च्यायला कसली ही प्रेरणा व केवढे हे प्रेम ...गर्दीवर नजर ठरत नाही, अक्षरशः लाखांच्या संख्येने लोक येतात भौ , जबरदस्त ...अख्खे मैदान भगव्या रंगात न्हाऊन निघाले आहे, अवघा हिंदुत्वाचा जागर म्हणता येईल ....
काय पाहतो आहे मी, साक्षात "उद्धव ठाकरे" अक्षरशः प्रचंड जनसमुदायाला संबोधीत करत आहेत, थोडा लेटाच झाला साईट उघडायला, आधी कोण कोण बोलले, काय काय बोलले, कुणाला फाडले, काही कळायला मार्ग नाही, असो हे पहात रहावे ....
व्वा, भारी बोलत आहे की उद्धव, ह्याला लोक " संयमी व्यक्ती" म्हणुन बदनाम का करतात ? शोभतो खरा हा "सिंहाचा छावा" , चढ बाप्पु, जबरदस्त ...फारच वाईट मारतो आहे सगळ्यांची, सगळ्या मुद्द्यांचा परामर्ष घेत आहे. वा काय बोलतो आहे "मुंबई आमच्या बापाचीच, मुंबईत येऊन मुंबई कुणाची असे विचारण्याची हिंमत कशी होते कुणाची ?". जबरदस्त, भारी ठोकला, असेच बोलायला पाहिजे, माजलेत हे उपरे. त्याचावर होणार्या कमजोरपणाच्या टीकेबद्दल काय बोलतो हा ? दिले ह्याने उत्तर, म्हणे " हिंदुहॄदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी मांजराची पिल्ले नव्हे वाघाचे बछडे जन्माला घातले आहेत. शिवसेनाप्रमुखांची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत, इतर कुणी काळजी करु नये "ये हुई ना बात, जबरदस्त उत्तर दिले. ह्या लोकांच्या भुमीका व त्यामगेचे राजकीय डावपेच गेले चुलीत, दमदार बोलतो आहे नक्की, बाकीच्याशी आपल्याला काय देणेघेणे ?
अरे सगळे हाच बोलतो आहे, "साहेब" येणार आहेत की नाही ? कुठे तशी घोषणाही होताना दिसत नाही ? नक्की काय होणार ?
आले ... आले रे ... साहेब आले रे !!!
सर्व जमाव शांत !!! एकदम चिडीचुप शांतता ...
बाळासाहेब स्वतःच्या ताकतीवर उठले, बाकीच्यांना बाजुला सारुन समोर जमलेल्या विशाल, अगणित जनसमुदायाला नमस्कार केला व खास त्यांच्या स्टाईलीत अभिवादन केले ....
आयला, अंगावर काटा आला हे पाहुन, शेर जरी म्हातारा झाला तरी अजुन आपली चाल नाही विसरला, अजुन तोच कणखरपणा ....
जनसमुदायला काय करावे कळेना, प्रचंड जयघोष सुरु " बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद , शिवसेना झिंदाबाद " !!!
त्यांना खुर्चीवर बसवुन त्यांच्यापुढे माईक ठेवण्यात आला, साहेबांनी सुरवात केली ....
जिंकले !!!! अगदी शब्दश : जिंकले .....
पुढचे सांगण्यात अर्थ नाही, माझी शब्दसंपदा दुबळी पडत चालली आहे, फक्त डोळेभरुन पाहुन घेतले आणि धन्य झालो ....
डिस्लेमर : हे लिखाण कुठल्याही राजकीय पक्षाचा अथवा नेत्याचा "उदोउदो" करण्यासाठी लिहलेले नाही. मी पाहिलेल्या एका अभुतपुर्व घटनेचे माझ्या अतिक्षुद्र लेखणीतुन हे वर्णन. कसलाही "पक्षसापेक्षत्वाचा आरोप" आम्ही आत्ताच फेटाळतो ...
अवांतर : मी दिलेले "लेखाचे शिर्षक" मला अजुन परफेक्ट वाटत नाही. जोग्य व समर्पक शिर्षक सुचविल्यास आपला मी आभारी राहिन. धन्यवाद !!!
Wednesday, October 8, 2008
कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!
आता तसे पहायला गेले तर "बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयात" काम करण्याचा अनुभव हा आयुष्यात प्रथमच असा काही भाग नव्ह्ता, तिकडेही करतच होतोच की.पण इकडे सर्व वेगळे आहे, ह्याला मी म्हणेन "बहुराष्ट्रीय कंपनीचे परफेक्ट कार्यालय" ....
स्वाभावीकच मग मन प्रत्यक्षात अनुभवलेल्या व काहीच्या बोलण्या, लिहण्यातुन ओळख झालेल्या "देशी कचेरी उर्फ़ भाऊसाहेबांचे हापीस" यांचा विचार करु लागले ...
मग माझ्या डोळ्यासमोर आपल्या "जुन्या देशी कचेरी" चे कल्पनाचित्र आले. आता "कचेरी" ह्याचा अर्थ येथे साधारणता "सरकारी कचेरी वा एखाद्या देशी कंपनीची कार्यालये" ह्या अर्थाने घ्यावा. म्हणजे तेथील वातावरण, काम करण्याची पद्धत, त्याची भाषा, तेथील काम करणारी मंडळी, त्यांचे वागणे, पेहराव व बोलचाल आठवले. नकळतच मी त्याची तुलना जराशी सध्याच्या "Corporate Office " शी करुन बघीतली. मला स्वत:शीच प्रचंड हसु आले एवढा प्रचंड फरक आहे त्यांच्यातनक्की काय फ़रक आहे ते एकामागे एक पाहु....
जुन्या कचेरीत प्रवेश करायच्या आधीच त्या इमारतीकडे एकदा पहा, ती जर अगदी जुन्या छापाची इमारत अगदी लाल कौलासह, बाहेर सायकली व मोटारींची ही गर्दी यातुन वाट काढत आत प्रवेश केल्याकेल्या समोर काही दिसु नये याची काळजी घेणारा अंधार, जागोजागी केलेले तंबाखु व पानाच्या पिचकाऱ्यांची नक्षी, दिशाभुल करणाऱ्या पाट्या [असतील तर] , जिन्याच्या मोडलेल्या पायऱ्या, मोडलेल्या फरश्या, बगलेत फ़ायले मारुन कुणाकडेही ढुंकुनही न पाहता पळापळ करणारे कारकुन, जिन्यात साहेब्याच्या पट्टेवाल्यापाशी वशिला लावण्यासाठी त्याच्याभोवती कोंडाळे केलेली सर्वसामान्य जनता असा जर सारंजाम असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहचला आहात हे समजायला हरकत नाही. ही झाली टिपीकल जुन्या कचेऱ्यांची मांडणी....
जुन्या कचेरीत प्रवेश करतानाच तुमच्या चेहऱ्यावर एका आगंतुकाची भावना आपसुकच येते, कारण ते वातावरण व आत्तापर्यंत न्य़ात असालेली ऐकीव माहिती. शिवाय आत गेल्या गेल्या "काय पाहिजे ? कोण पाहिजे ? काय काम आहे ? कुणी पाठवले ? परवाना हाय का ? ओ तिकडे नका जाऊ ? आधी बाहेर व्हा. " असा प्रश्नांची सरबत्ती झाली नाही [ कुणी जर तुमच्याकडे लक्ष दिले तर ] तर तुम्ही नशिबवान आहात असे समजायला हरकत नाही . आत गेल्यागेल्या आलेला माणुस गोंधळुन, घाबरुन, बावरुन गेला पाहिजे हा ह्या कचेऱ्यांचा "अलिखीत कायदा" व बाकीचे कायदे नाही पाळले तरी ह्याचे पालन मात्र एकदम इमानाने होते.
बाकीच्या गोष्टी जाउ दे, आता आपण कार्यालयाच्या आत व्यवहार कसा होतो हे पाहु. मी शक्यतो आतल्या कर्मचारी वर्गाच्या कामाशी संमंधीत संभाषणाबद्दल लिहतो आहे. आता "साहेब व त्याचा पट्टेवाला" ह्या दोन्ही गोष्टी कालबाह्य झाल्याने त्यांच्याशी संमंधीत गोष्टीच्या मजेला आपण मुकलो आहोत.
पुर्वीच्या काळी जर काही कारणामुळे कुणाला कचेरीत पोहचायला उशीर झाला व ते "हजेरी रजिस्टर" साहेबाच्या टेबलावर गेले असेल तर बिचाऱ्याचा जीव अर्धा होऊन जायचा. सामान्यत: हे कर्मचारी मध्यमवर्गीय व बहुसंख्य चाळीत राहणारे असल्याने त्यांना "पाणी उशीरा आले, दुध नासले, गॅस संपला, ट्राम निघुन गेली, पोराला शाळेत सोडायला गेले, सकाळी देवळात गेल्यावर तेथील गर्दी" अशा कारणामुळे उशीर होत. यामुळे कचेरीत उशीरा पोहचल्यावर व साहेबाने ते पाहिल्यावर त्या बिचाऱ्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकत, एक तर ठरलेला "हाफ डे" व वरुन साहेबाची "कंपनी काय घरची समजलात का ? मी किती वेळा गप्प बसायचं ? पुढच्यावेळी मेमो देईन" वगैरे बोलणी....
आधी जर काही काम जास्त पेंडिंग पडले तर साहेब त्या कारकुनाला सगळ्या जनतेसमोर "काय रे, काम कोण तुझा बाप करणार का ? चल पटपट उरक, नुसते नाचुन दाखवुन दाखवुन नकोस. माजलेत साले, काम करायला नको, नुसत्या पाट्या टाकायला येतात भाडे" अशा शब्दात "झाडत". आता मुळात कल्चरच बदलल्याने तो "कडकपणा" गेला. आता फ़क्त एक "Urgency Mail" येतो व परिस्थीती हाताबाहेर चालली तर बॉस त्याला "केबीनमध्ये" बोलावुन "See, we are already running out of deadline. You have to work hard.You know meeting deadlines is very important for our corporate image. We don't have any other option than to work for overnights" असे साध्या शब्दात समजावतो.
जुन्या काळी असा प्रसंग घडल्यावर तो अभागी कारकुन आपला साहेब निघुन गेल्याची खात्री करुन जमलेल्या बघ्या सहकाऱ्यांसमोर उसन्या आवसानाने " साला आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही, समजलात काय ? साहेब असेल तो त्याच्या घरी, इथं आमच्याशी गाठ आहे म्हणावं. कायस्थाचं रक्त आहे, एकवेळ शीर तोडुन देऊ पण इमानाला बोल लावलेला ऐकुन घेणार नाही" अशी सफ़ाई देत पण हे बोलताना साहेब कुठे जवळपास नाही ना याची खात्री आपल्या तिरक्या नजरेने करुन घेत. बाकीचे सहकारी पण मग " जाउ दे वसंतराव, ८ दिवसाचा पाव्हणा आहे. आपल्याला सायबाचेसगळे छक्केपंजे माहित आहेत. चला, चहा घेऊ, थोडे डोके शांत होईल" अशी मांडवली करत. आताच्या वातावरणात असे प्रसंग घडणेच शक्य नाही. जर असा प्रसंग घडलाच तर तो "एंप्लॉयी" जागेवर त्या साहेबाच्या तोंडावर राजीनामा फेकेल वा उलट साहेबालाच डोस देईल "You are crossing limits. This is not way to behave." वगैरे वगैरे।
पुर्वी कचेऱ्यांना सध्याच्या काळासारखे "Client" वगैरे असा प्रकार नसायचा त्यामुळे तिथला "साहेबच" तिथला सर्वेसर्वा. तो म्हणेल ती पुर्व दिशा. अशा परिस्थीत जर कोणी त्याच्याकडे कामाच्या "अर्जंट" असण्याची व ते लवकर करण्याची बोलणी करायला गेले तर संवाद असा घडायचा, " अरे लवकर करा म्हणजे, आम्ही काय इथे माश्या मारतोय का ? मला सांगणारा तो कोण टिकोजीराव लागुन गेला ? मला काय त्याच्या बापाचा नौकर समजला काय ? चल हकाल गाडी, जेव्हा होईल तेव्हा सांगु.". मग तो बिचारा आपला मान खाली घालुन निघुन जायचा. हा किस्सा कचेरीतल्या बाकीच्यांना ८ दिवस पुरे, मग साहेबाने त्याची कशी "बिनपाण्याने केली" ह्यावर अनेक परिसंवाद घडत....
आता एखाद्याला जर त्याच्या सध्याच्या कामाचे स्वरुप, त्याचा मोबदला, त्याची पोसीशन पसंत पडले नाही वा त्याच्या कंपनीकडुन अजुन काही अपेक्षा असतील तर तो डायरेक्ट बॉसशी बोलु शकतो. किंबहुना त्याच्यासाठी खास " H R Department" बनवले आहे. तिथे तो बिनधास्त आपले म्हणणे मांडु शकतो. त्यातुनही काही मार्ग निघाला नाही तर तो "पेपर टाकुन" लगेच निघुन जाऊ शकतो कारण सध्या उपलब्ध असलेल्या अनेक संधी. पुर्वी असे नसायचे, मुळात संधीच कमी त्यामुळे माणसे एकदा चिकटली की मग त्यापुढे "ठेविले तैसेची रहावे" ह्या तत्वानुसार वागत, फ़ार त्यांची तक्रार नसे....
त्यातुन कुणी तक्रार घेऊन साहेबाकडे [ हो, त्या काळी HR वगैरे असे लाड नव्हते ] गेलेच तर मग "जंगी खडाजंगी" ठरलेलीच. त्यावेळाच संवाद साधारणता असा ...
एवढ्यावर संवाद संपुन हिरमुसल्या चेहऱ्याने तो कारकुन परत जागी येऊन कामाला लागत असे व "पगारवाढीची व घरखर्चाची चिंता" करीत असे. मधल्या सुट्टीत साहेब स्वत: त्याच्या टेबलजवळ येऊन आपुलकीने खांद्यावर हात ठेऊन " हे पहा बंडोपंत, मी बोललो आहे, १०० रुपये मिळेल ह्या महिन्यापासुन. पोराची काळजी घ्या. त्याच्यासाठी गाईचे दुध लावा, तब्येतीला चांगले असते लहान पोराच्या. बाकी काही लागले तर सांगा. " असा आपुलकीचा सल्ला देऊन जात असे. त्यावर तो गेल्यावर "बंडोपंत" आपले डोळे बाहीने पुसत " साला बोलतो फ़डाफ़ड पण माणुसकी आहे त्याच्यात अजुन" म्हणुन सहकाऱ्यांना आपल्या साहेबाच्या "चांगुलपणाचा दाखला" देत।
जास्त पाल्हाळ जाऊ दे, थोडक्यात पाहु....
लोक पुर्वीही कामं करायची, आताही करतात पण कामाची एक "Effiecient Work Policy" आली आहे. त्यामुळे कामाचा जास्त बाऊ होत नाही. पुर्वी सर्व गोष्टी ह्या आपपसातील संबंध व जुळवुन घेण्याच्या पद्ध्तीने चालत असल्याने एखाद्या चुकीचे खापर हे एखाद्या "गरिब कारकुनावर" फुटायचे व त्या बिचा-याची २ वर्षे वगैरे इंक्रीमेंट्स थांबायची, तिकडे साहेब मात्र नामानिराळा.
आज तसे नाही, इथे प्रत्येक गोष्टीचे एक कायमस्वरुपी रेकॉर्ड ठेवले जाते, जे काय आहे ते लिखीत स्वरुपात " ई-मेल" मधुन पाठवले जाते त्यामुळे जबाबदारी ढकलता येत नाही.एखाद्या मोठ्ठ्या चुकीबद्दल जशी इंजीनीअरवर आफत येते तसा डायरेक्ट " सी ई ओ" सुद्धा फायर होऊ शकतो, यामुळे कामात एक "सुसुत्रता व परफेक्शन" आले आहे.आजकाल कंपनी कर्मचा-यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्याही आरोग्याची काळजी घेते, पुर्वीही हे असायचे पण आज "माणसाला" जास्त किंमत आली आहे. त्यामुळे कर्मचा-यांचे आयुष्य नाही म्हटले तरी ब-यापैकी सुखाचे झाले आहे।
हे सर्व झाले फ़ायदे, परंतु काही अनिष्ट गोष्टीही आल्या ....
बाकी ह्या "कॉर्पोरेट लाईफ़ने" खुप काही दिले आम्हाला, अजुनही देतेच आहे फक्त आमच्या कुटुंबियांबरोबर मनोसोक्त वेळ घालवण्याचे स्वातंत्र्य जर मिळाले तर " जगी सर्व सुखी असा कोण आहे ?" ह्या प्रश्नाचे उत्तर मी मोठ्ठ्याने ओरडुन मनापासुन " मी आहे !!! " असे देईन।
असे म्हणातात की काही मार्ग तुम्हाला खुप काही देतील, सुख व दु:ख दोन्हीही, पण त्या मार्गावर जायचा "एक दरवाजा" असेल पण परत यायला "दरवाजाच नसेल" तर ???