Tuesday, January 27, 2009

मी "स्थानीक की परप्रांतीय " ??? - आपण सारेच अर्जुन ...

हा काही लेख वगैरे नाही, गेल्या काही वर्षातील अनुभवांच्या आधारावर माझ्याच मनात आलेल्या ह्या मुक्त भावना आहेत, ह्याला फारतर मुक्तक किंवा बाष्कळ बडबड असे नाव देता येईल.

पुण्यात" स्थानीक" असणारे मराठी मन ....
बेंगलोरमध्ये "परप्रांतीय" असणारे मराठी मन ....
.
.
आज पुण्यात एका नव्या कंपनीत जॉइन झालो, नवे नवे लोक भेटले, बॉसने टीमशी ओळख करुन दिली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर सगळे "आपले" लोक आहेत. बाकीचे जे "उपरे" आहेत ते काही जास्त नादी लागत नाही ह्यांच्या असे दिसतेय. गेले उडत साले, मरणाचे शिष्ठ व अतिशहाणे आहेत, आपण आपल्या लोकांशी जुळवुन घेतलेले बरे. बॉससुद्धा मराठी आहे हे बेश्ट झाले, आता जास्त अडचण होणार नाही. आपल्या लोकांबरोबर, आपल्या भाषेत काम करताना कस्सं मोकळंमोकळं वाटतेय.....
शेवटी एकदा आलो बेंगलोरमध्ये, च्यायला ह्या "अंडुगंडु गुडगुडु" च्या भाषेच काम जरा अवघडच दिसतेय, कसं जमणार हे देवाला ठाऊक. आज कंपनीत जॉइन झालो, च्यामारी सगळी कोंगाडी जनता भरली आहे. बॉसही कानडीच आहे, साल्याने बरोबर आपले आपले लोक खेचुनघेतलेत. असो. बाकी "हिंदी भाषीक" ३-४ जण आहेत हे एक चांगले झाले, जरा त्यंच्याबरोबर मिक्स होता येईल. ह्या कन्नडिगांचा ग्रॄप एकदम सॉलीड दिसतोय, खायला-प्यायला-गप्पा मारायला सगळे कसे मिळुन मिसळुन असतात, गेले उडत, कुणाला व्हायचयं त्यांच्यात मिक्स ?
=============================================

आज मिटिंगमध्ये बॉस सगळ्यांना नवे काम समजावुन सांगताना बहुतेक अनावधनाने सलग ५-६ वाक्ये मराठीत बोलला, मला काही प्रॉब्लेम नाही झाला पण हे "भय्ये" लगेच उठुन " हमें समझा नहीं, हिंदी मे या तो अंग्रेजी मे बतावो " असे म्हटले, साले एक नंबरचे हलकट आहेत, गेली १-२ वर्षे पुण्यात आहेत मग २-३ वाक्ये समजायला काय प्रॉब्लेम आहे ? का शक्य तिकडे आपला "उपरेपणा" दाखवायलाच हवा ? आता ह्यांची चांगलीच ताणली पाहिजे. बोस बिचारा सज्जन, त्याने माफी मागुन पुन्हा इंग्लिशमध्ये समजावले ....
आयला हे दाक्षिणात्य लोकं आहेत की भिंताडं, साला मिटिंगमध्ये सुद्धा आपल्याच भाषेत बोलतात, कंपनी काय ह्यांच्या घरची आहे काय ? नाही, भाषेबद्दल जाज्वल्य अभिमान वगैरे असायलाच हवा पण कॉर्पोरेट जगतात मात्रॄभाषाच बोलणार म्हणुन कसे चालेल ? आता ह्यांच्यासाठी मी कन्नड शिकायची का ? ते काही, आत्ता लगेच उठुन स्पष्ट बोलले पाहिजे.च्यामारी, चांगले सज्जनपणे "कन्नड येत नाही" हे सांगितले तर एकेकाच्या चेहर्‍यावरचे भाव कसे बदलले पहा, जळके आणि आत्मकेंद्री साले.....
==============================================
आज मित्रांबरोबर जंगली महाराज रोडवरच्या मॅक्डी मध्ये जेवायला गेलो. तिथल्या काउंटरवरच्या बाहुलीने डायरेक्ट हिंदीत बोलायला सुरवात केली , एक मित्र जरा सायकीक आहे, त्याने काउंटरवर जाऊन डायरेक्ट मराठी सुरु केले, तिला काही समजेना हा काय बोलतोय ते, हा शहाणा मराठीवरच अडुन बसला, शेवटी बाबापुता करुन त्याला बाहेर आणला. असो. पण महत्वाचा मुद्दा असा की मराठी प्रांतात हॉटेल काढत असताना मराठी भाषा येणारे कर्मचारी भरती करणे हे कंपनीचे कर्तव्य नाही का ? "हिंदी" ही काय महाराष्ट्राची राज्यभाषा अगर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे काय ? ह्यांचे काही तरी करायला हवे ....
आज जेवायला फोरममधल्या "पिझ्झा हट"ला गेलो होतो, च्यायला डायरेक्ट डोक्याला शॉट निघाला. गर्दी होती म्हणुन आधी ऍडव्हान्स बुकिंग करायला एक माणुस बाहेर उभा होता. अहो आश्चर्यम , त्याला "हिंदी" येत नाही. त्या शहाण्याने फक्त "कन्नडमध्येच" बोलेन असा नववर्षाचा प्रण केला असावा. शेवटी जास्त वाद नको म्हणुन "इंग्रजीत" बोलुन विषय संपवला. पण मुद्द्याची गोष्ट अशी की पिझ्झा हट सारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने "इंग्रजी अथवा राष्ट्रभाषा" बोलणारे लोक प्राधान्याने नौकरीला ठेवणे जरुरीचे नाही का ? सर्वांनाच कशी स्थानीक भाषा येईल ?
==============================================
च्यायला कंपनीतल्या रुपालीला डोक्याचा भाग नाही, एवढी मराठी पब्लिक असताना ही त्या भैय्या "संजय त्रिवेदी" बरोबर फिरते आहे. आमचं एक सोडा हो पण इतर मराठी पोरं काय मेली काय ? च्यायला फुकट डोक्याला शॉट निघतो असे काही पाहिले की, हे साले भैय्ये कामापुरती जवळ करतील तिला, नंतर मग कोण तु असे विचारायला कमी करणार नाहीत. छे, रुपालीला सांगायलाच हवे ही, पण ती तर कुठे मराठी पब्लिकमध्ये मिसळते, तिला तेच हवे आहेत. मरु देत
हापीसातली "सौम्या" भारी आहे राव, आजकाल जरा जास्तच आपल्याबरोबर फिरत आहेत. गप्पा मारायला, टीपी करायला, बरोबर जेवायला एकदम स्सह्ही कंपनी सापडली. पण बाकी कन्नड पब्लिक आमच्याकडे असं मारक्या म्हशीच्या नजरेने का पहात असतं ? जळतात साहे, त्यांना सौम्या काडीइतका भाव देत नाही ना म्हणुन.तिला आज विचारलं की "बै, बाकीचं कन्नड पब्लिक बोंबलतं का ? " म्हणुन, ती म्हणाली काहीच काळाजी नकोस करु, ती ह्या गोष्टींना किंमत देत नाही. असं पाहिजे राव, माणुस जोडणे महत्वाचे, आपापल्या लोकांबरोबरच रहायचे असा हट्ट म्हणजे कठिणच आहे. सौम्या एकदम "उच्च विचाराची आणि फ्री माईंडेड " आहे बो, आपण मानलं ....
==============================================
राजसाहेब म्हणतात ते करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम आहे स्थानीक भाषेत दुकानांच्या पाट्या असायला. स्थानीक भाषेला प्राधान्य आणि महत्व असायलाच हवे. समजा गावाकडुन एखादा खेडुत आला तर त्याला काय घंटा समजतं आहे हे इंग्लिशमध्ये काय लिहले आहे ते, मराठीच हवे तिथे....
आज एका मित्राकडे जरासे लांब गेलो होतो. च्यामारी, ह्या स्थानीक बसेस आहेत की चेष्टा ? सगळ्या पाट्या, आतले कर्मचारी "फक्त कन्नड" वालेच, आमच्यासारख्यांनी काय करायचे ? पोहचलो कसेबसे. ऍड्रेस आहे व्यवस्थीत पण झोल असा आहे की हे "लँडमार्क्स" शोधायचे कसे ? सगळीकडे जिलब्या पाडल्यासारखे कन्नड लिहले आहे, काडीइतके समजत नाही. नाही, जरी दाक्षिणात्यांचा हिंदी विरोध गॄहीत धरला तरी ह्यांना "इंग्रजीत" लिहायला काय प्रॉब्लेम आहे ? नाहीतरी सगळीकडे हे इंग्रजी झाडत असतातच ना ?
==============================================
आज "नॉन मराठी पब्लिक" आलं होतं फ्लॅटवर, मस्त दंगामस्ती केली सगळ्यांनी मिळुन, आता जेवायला कुठे जायचे म्हटले तर अजुन दंगा सुरु झाला. चांगलं ह्याना "मथुरा" मध्ये चला म्हणतोय, मस्त मराठमोळी भाकरी पिठलं थालपीठं वगैरे खाता येईल. हे म्हणतायतं की पंजाबी खायचं म्हणुन, रोज रोजच पोळी-भाजी खाऊन कंटाळा आला म्हणे. जाऊ दे, गाढवाला काय गुळाची चव ?च्यायला जेवतानाही शांत जेवत नाही, उगाच मोठ्ठ्यामोठ्ठ्या गप्पा मारतात लेकाचे, म्हणे काय तर "आमच्या भागात पराठे, रबडी , दम सब्जी , कचोरी वगैरे वगैरे" भारी मिळती म्हणे. आता इथे आहात ना, मल गपचुप खावा ना इथले, एवढे शिंपल समजत नाही लेकाच्यांना, मरु देत ....
च्यायला आजकाल सकाळ सकाळ सौम्याबरोबर ब्रेकफास्टला जायचे म्हणजे संकटच आहे बॉ, काय खाणार तिथे जाऊन हा प्रश्न दररोज पडतो. आयला रोज सकाळी डोसा / ईडली / वडा सांबार खायचे म्हणजे काय चेष्टा आहे का राव ? काहितरी व्हरायटी हवी का नको ? रोज तिच टेस्ट बोर होत नाही काय ? मी म्हटले सौम्याला "आमच्या पुण्यात ये, मस्त कांदापोहे, वडापाव, भजी खायला घालतो. एकदम झ्याक टेस्ट असते" .....
==============================================

तर असं आहे एकंदरीत, मीच सध्या फार मोठ्ठ्या मानसीक द्वंद्वात आहे की माझी नक्की "विचारसारणी" कशी आहे ?
अजुनतरी मला समर्पक आणि समाधानकारक उत्तर सापडले नाही ह्या प्रश्नाचे ...पाहु भविष्यात काय काय घडते ते ...
**** डिस्केमर ***
१. लेखाच्या अनुषंगाने आलेली व्यक्तींची नावे ही "काल्पनीक" आहेत अथवा "बदलली "आहेत, त्याचा वास्तवीक जीवनाशी संबंध लावण्याचा प्रयत्न करु नये.
२. कुणावर टिका करायची ह्या हेतुने हे लिखाण केलेले नाही.
३. मनातले विचार आहे तसे मांडत असल्याने काही अपशब्द आले असण्याची शक्यता आहे, त्याला माझा इलाज नाही.
**** डिस्केमर संपले ****

Sunday, January 25, 2009

महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - १

गेल्या काहीदिवसापुर्वी झालेल्या मुंबईवरच्या राक्षसी आतंकवादी हल्ल्याची स्वाभावीक प्रतिक्रीया म्हणुन भारताचे गॄहमंत्री श्री. शिवराज पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. विलासराव देशमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री ना. आर. आर. पाटील यांना राजीनामा द्यावा लागला व त्यांच्याजागी दुसर्‍या व्यक्तींनी ह्या पदांची सुत्रे संभाळली.असो. तो आपला विषय नाही.

महाराष्ट्रात नेतॄत्वबदल घडत असताना अनेक "पेल्यातली वादळे" उठली, काही जागच्या जागी शमवली गेली तर काहींचे रुपांतर मोठ्ठ्या वादळात होऊन त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण अंतर्बाह्य ढवळुन काढले. सध्याच्या स्थीतीत जुने नेतॄत्व जाऊन त्यांची जागा नवे रक्ताचे नेते श्री. अशोक चव्हाण व राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले जाणकार व धुरंधर नेते श्री. छगन भुजबळ ह्यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. हा नेतॄत्वबदल अदगी सहजासहजी व आरामात झाला नाही, त्यासाठी पक्षश्रेष्ठींना बरीच डोकेफोड करावी लागली व अनेकांना समजावता समजावता त्यांना नाके नऊ आले असेल ह्यात शंका नाही. तरीही कोकणातले बाहुबली नेते श्री. नारायण राणे ह्यांनी काँग्रेस पक्षातील त्यांच्या मुस्कटदाबीला वैतागुन शेवटी काँग्रेसला "जय महाराष्ट्र" ठोकला व नव्या दिशेकडे पाऊल उचलले. ही नवी दिशा कोणती ह्याची अजुन खात्रीलायक माहिती नाही पण यामुळेही बराच फरक पडणार आहे हे नक्की ...

तर ह्या सगळ्या पार्श्वभुमीवर माझ्या डोक्यात "पुढील विधानसभा निवडणुकीत राजकीय चित्र काय असेल ?" ह्याचा किडा आला. ह्या मुद्द्याचा मी केलेला अभ्यास व त्याच माझे विश्लेषण ह्याच्या संबंधीत हा लेख आहे.
***** डिस्लेमर *****
माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी व्यक्तीशः , आर्थीक, कौटुंबिक वा कसलाही संबंध नाही. यापुढील लिखाण मी त्रयस्थाच्या नजरेने लिहणार आहे त्यामुले माझ्यावरच्या "पक्ष समर्थकाच्या आरोपाला" मी आत्ताच केराची टोपली दाखवत आहे. तसेच ह्या लेखात व्यक्त झालेल्या सर्व भावना व्ययक्तीक माझ्याच आहेत. ह्याचा अन्य कशासी संबंध लाऊ नये ही आग्रहाची विनंती.
*****
*** काँग्रेस पार्टी ***

सगळ्यात आधी आपण सगळ्यात जुन्या, सद्यस्थीतीत विधानसभेत सर्वात मोठ्ठी संख्या असणार्‍या व स्वातंत्र्योत्तर काळानंतर बहुतांशी ९० % महाराष्ट्राचा राज्यशकट हाकणार्‍या "काँग्रेस" चा विचार करु....
"काँग्रेस का हाथ, आम आदमी के साथ" ही घोषणा देऊन हा पक्ष वर्षानुवर्षे निवडणुका लढवीत व जिंकत आला आहे. जरी हा पक्ष त्यांच्या धोरणात आम्ही "आम आदमी" च्या कल्याणासाठी वचनबद्ध आहोत असा घोष करत असला तरी ह्यांच्यात "आम " असे काहीच नाही, सर्व काही "श्रीमंत, साहेबांच्या आवेशात, सरंजामशाहीयुक्त" असा ह्या पक्षाचा थाट आहे. अगदी लहानतल्या लहान पातळीवरच्या निर्णयासाठीसुद्धा "हायकमांड" च्या आदेशाची वाट पाहण्याबाबत ह्यांचा लौकीक आहे.तसे पहायला गेले तर हे हायकमांडचा मक्ता आत्तापर्यंत बहुसंख्यवेळा "गांधी परिवार वा त्यांच्या विश्वासातल्या व्यक्ती " ह्यांच्याकडे असल्याचा इतिहास आहे, सद्य परिस्थीतीसुद्धा ह्याला अपवाद नाही. राज्यस्तरावरचे महत्वाचे निर्णय घेणारे बहुसंख्य "हायकमांड" मधले नेते हे "अमहाराष्ट्रीय" आहेत हे सत्य आहे व त्यांचे महाराष्ट्राबाबतचे अज्ञान वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या अपरिपक्व निर्णयांमध्ये व केलेल्या निवडीमधुन दिसुन आले आहे.
राज्यपातळीवर ह्या पक्षाची सुत्रे साधारणता "देशमुख/पाटील/कदम/चव्हाण" ह्यांच्याकडेच अलटुन पालटुन एकवटलेली दिसतात. असो.

तसे पहायला गेले तर गेली ८-९ वर्षे सलग मुख्यमंत्री हा कॉग्रेसचाच आहे पण त्यांच्या हातुन लक्षात राहण्यासारखे एकही भरीव काम अजुन झाले नाही. ह्यांचा बहुसंख्य वेळ आपली खुर्ची संभाळाण्यात व मजबुत करण्यात गेला. अंतर्गत राजकारणातुन सारखे "नेतॄत्वबदलाचे वारे " वाहणे व त्यातुन सारख्या दिल्ल्लीच्या वार्‍या घडुन पक्षश्रेष्ठींपुढे लोटांगणे घालुन आपली खुर्ची वाचवण्याचे प्रयत्न केल्याचे सोडुन मला श्री. विलासराव देशमुखांचे इतर कोणताही "महत्वाचे कार्य" विचार करुनसुद्धा डोळ्यापुढे येत नाही. आता तर त्यांची ऐन निवडणुकीच्या तोंडाला खुर्ची गेली आहे. वाचकांना जर आठवत असेल तर मागच्या निवडाणुकीच्या तोंडावर असेच देशमुखांना हटवुन "इमानी" सुशीलकुमार शिंद्यांना खुर्ची दिली होती व त्यांनी "माझ्यासारख्या दलिताला हा बहुमान देऊन सोनियाजींनी राष्ट्राला एक ठाम संदेश दिला आहे" अशी सरळसरळ जातीयवादी मुक्ताफळे उधळुन आपल्या पक्षाच्या "जातीयवाद विरोधी इमेज" ला काडी लावली होती. शेवटी पुन्हा निवडणुक विजयानंतर चांगल्या कारभारासाठी देशमुखांना परत आणावे लागले व शिंद्यांची रवानगी "राज्यपाल" म्हणुन आंध्रावर केली गेली. असो. पुन्हा एकदा तेच घडताना दिसत आहे. ह्या पदाला अगदीच नवखे असे "अशोक चव्हाण" हे सध्या ही जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. त्यांच्या वडीलांच्या रुपाने त्यांच्या घराण्याने हे पद पुर्वी भुषवले आहे पण कदाचित ह्यांच्या निवडीमागचा निकष नसावा हे मानायला हरकत नाही. आता सद्यस्थीतीत अशोक चव्हाणांकडे "दिवस ढकलण्याशिवाय" दुसरा पर्याय नाही, ते काही करु पाहतील तर तेवढा वेळही नाही व शिवाय टिकेच्या भितीने व अपयशाच्या शंकेने पक्षश्रेष्ठीही नव्या धाडसी निर्णयांना परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. थोडक्यात अशोक चव्हाणांना केवळ "नाईट वॉचमन" ची भुमिका पार पाडावी लागेल हे स्पष्त आहे. म्हणजे अधीक पडझड होऊ न देता ही इनिंग कशीबशी संपवणे हा त्यांना पद देण्यामागचा हायकमांडचा स्वच्छ आणि सरळ हेतु आहे असे दिसते आहे.

तसे पहायला गेली तर गेल्या कार्यकीर्दीत काही भरीव कार्य न झाल्याने आता निवडणुकीत मतदारांना काय उत्तरे द्यायची हा सर्वात महत्वाचा मुद्दा काँग्रेससमोर असणार आहे.मागच्या निवडणुकीत "मोफत विजेची घोषणा ( मग भले ती बाळासाहेब ठाकर्‍याकडुन चोरलेली का असेना )" करुन बसलेल्या ह्या सरकारला राज्याला मोफत सोडा पण अखंड वीज पुअरवता पुरवता नाके नऊ आले, सध्या राज्याच्या अनेक भागात ८-१२ तास वीज गायब असते हे ढळढळीत सत्य आहे.
सगळीकडे पाणी पुरवु म्हणावे तर अजुनही बर्‍याच ठिकाणी पिण्यालायक शुद्ध पाण्याची कमतरता आहेच.
तरुणांना रोजगार देऊ असा वायदा केला असताना त्यांच्या डोळ्यादेखत अनेक कंपन्या,कारखाने व आस्थापने राज्याबाहेर निघुन गेली ही त्यांची हारच आहे व त्यातुन सध्या बेरोजगारीची समस्या जास्तच बिकट होताना दिसत आहे. नवे रोजगार उपलब्ध करण्याचे सोडा पण सध्या असलेले संध्या टिकवण्यात आलेले अपयश हेच खरे सत्य आहे. शिवाय "सरकारी नोकर्‍यातही" महाराष्ट्राचा हक्काचा वाटा उपलब्ध करुन देण्यात सरकार अपयशी ठरल्याचे चित्र आहे, मग त्यासाठी स्वतः राज ठाकर्‍यांना उभे रहावे लागले व कसल्याही मार्गाने का असेना हा माणुस आपल्याला नोकरी मिळवुन देऊ शकतो हा विश्वास राजने लोकांच्या मनात निर्माण केला व ज्यांची खरी ही जबाबदारी आहे ते सरकार मात्र "हात चोळत व राज ठाकर्‍यांचे हात बांधत" शांत बसले हे लोकांनी डोळ्याने पाहिले.
गरिब व कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या "आत्महत्या" हा विषय गेल्या काही वर्षात जास्त बिकट बनला व त्यावरही काही भरीव योजना देण्यात सरकारला अपयश आलेले दिसते आहे व विरोधी पक्ष या मुद्द्यावर विधानसभेत नेहमीच सरकारची सालटे काढण्यात आघाडीवर असतो. उलट मदतीची अपेक्षा असताना सरकारी पातळीवरुन "त्या आत्महत्या केलेया शेतकर्‍यांच्या बाबत ते कर्जबाजारी, जुगारी, दारुडे " असल्याचे हास्यास्पद व निराशाजनक दावे केले गेले व सरकारने स्वतःचे हसे करुन घेऊन स्वतःच्या पायावर धोम्डा मारुन घेतला. आता ह्यांना कसे तोंड दाखवावे हा मुद्दा आहेच.
महागाई तर दिवसेंदिवस वाढत आहेच व त्याला "जागतीक मंदीचे" गोंडस नाव देऊन आपल्यावरची जबाबदारी झटकण्याची मनोवृत्ती सुद्धा ह्याच सरकारमध्ये दिसुन आली.
ह्या सरकारची "शिक्षणक्षेत्रात" थोडीफार भरीव कामगिरी अथवा तसे प्रयत्न दिसत आहेत हे जरी सत्य असले तरीपण राज्यातील प्राथमीक शिक्षकांना "घाण्याच्या बैलासारखे" सारखे कामाला गुंतवुन ( पदच्युत्त ) शिक्षणमंत्री श्री. वसंत पुरके अनेक वेळा टिकेचे धनी झाले. त्यांच्या काही अजब आणि अशक्य निर्णयांनी वेळोवेळी शक्य तितका जास्त गोंधळ उडवुन दिला होता.
एकंदरीत ह्यावेळी मैदान मारणे हे तितके सोपे राहिलेले नाही .....

आता पाहुयात पक्षाच्या अंतर्गत राजकारणाकडे, एक बलवान व प्रभावशाली ( व आयात ) नेते श्री. नारायण राणे ह्यांनी पक्षाला राम राम ठोकुन अजुन एक आठवडा सुद्धा उलटला नाही. उलट त्याचे "शिमागोत्तर कवित्व" अजुन बर्‍याच ठिकानहुन ऐकायला येत आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडताना आणि सोडल्यावर वर्षभर वातावरणनिर्मिती जोरदार केली होती व आता शिवसेनेच्या ताकदीला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला नेता मिळाला म्हणुन काँग्रेस खुष होते. सगळ्या पोटनिवडणुकांत आपले माजी शिवसैनिक आमदार निवडून आणण्याचा बेत 'दादां'नी निष्टेने तडीस नेण्याचा धडाका लावला. अखेर श्रीवर्धनच्या पोटनिवडणुकीत राण्यांचे शिवसेनेत असल्यापासूनचे प्रतिस्पर्धी मनोहर जोशींनी चतुर चाली रचून राण्यांचा वारू अडवला. पण यामुळे राणे यांची पक्षात येण्यामागची "मुख्यमंत्रापदाची इच्छा" ही लपुन राहिली नाही, वारंवार शक्य त्या मार्गांनी ती त्यांनी व्यक्त केलीच होती. खुद्द सोनिया गांधी यांच्या सभेत "खुर्च्यांची फेकाफेक" झाल्यावर काँग्रेस हायकमांडला जाग आली व त्यांनी राणे यांना दाबण्यास सुरवात केली. आता कुठल्याही मार्गाने "पद" मिळत नाही हे लक्षात येताच राणे सध्याच्या पदांना लाथ मारुन बाहेर पडले. खरा सामना आताच आहे कारण राणे ह्यांनी ते काँग्रेस्मध्ये असताना एक "दबावगट ( उर्फ विलासराव देशमुख विरोधीगट ) " तयार केला होता, आता त्यांच्यातली चलबिचलता वाढत जाईल. शिवाय राणे सध्या "वेळ येताच एकेकाची अंडीपिल्ली बाहेर काढतो " अशा धमक्या देत आहेत व त्यामुळे कित्येक जणांचे जीव टांगणीला लागले असतील ह्याचा अंदाज येतोच आहे. पुढे काय होणार ह्याचे उत्तर काळच देईन पण हे "राणे प्रकरण" काँग्रेसला जड जाणार हे नक्की. शिवाय त्यांच्याबरोबरच सध्या पक्षात असणारे पण "मुख्यमंत्रापदाची इच्छा" असणारे पतंगराव कदम, रोहीदास पाटील, अशोक चव्हाण, खुद्द विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे असे अनेक नेते असल्याने मुकाबला तगडा आहे ह्यात शंका नाही. पण ह्यांच्या "शह-काटशहाच्या खेळात" कदाचित काँग्रेसची नाव जलसमाधी घेऊ नये म्हणजे झाले. आपल्या प्रतिस्पर्ध्याला झोपवण्यासाठी "विरोधी पक्षांची मदत" घेणे हा कॉग्रेस संस्कॄतीचा एक भाग, पाहु आता ह्याचे किती प्रयोग होतात ते. घोडामैदान जवळच आहे.....

आता विचार करुयात पक्षाच्या समर्थक असणार्‍या सर्वसामान्य मतदारवर्गाचा. नक्की कोण ह्या पक्षाला मतदान करते हा मुद्द्याचा आणि महत्वाचा प्रश्न आहे.
गेली वर्षानुवर्षे काँग्रेसने आपली प्रतिमा "सगळ्यांना सामावुन घेणारा" अशी टिकवण्यात यश मिळवले आहेत त्यामुले अजुन त्यांचे समर्थक सर्वच जातीत व धर्मात जवळजवळ सारख्या प्रमाणात आढळतात. तरीपण सध्याच्या परिस्थीतीत "मुस्लीम समाज" हा प्रामुख्याने काँग्रेसला मतदान करत आला आहे / करत राहिल ह्यात शंका नाही. कुणीही कितीही दावा केला तरी ह्या वर्गाला काँग्रेसपासुन दुर खेचणे अजुन समाजवादी पार्टी, बसपा अथवा इतर कुणालाही शक्य झाले नाही. काँग्रेसने वेळोवेळी "जातीय व बेरजेची राजकारने" खेळत अनेक दलित नेत्यांना आपल्या पक्षात सामावुन घेऊन त्यांच्यामार्गे मते खेचण्याचा प्रयत्न केला. ह्यात त्या नेत्यांचा काही फायदा झाला नाही हे सत्य असले तरी ह्या प्रकाराने काँग्रेसला नक्की तारले हे नक्की. काँग्रेसचा नेहमीचा पारंपारीक मतदार असलेला "शेतकरी" ह्यावेळी मात्र थोडा रागावलेला दिसतो, कारण त्याच्यासाठी काहीच केले नाही अशी त्यांची भानवा आहे. नेते फक्त आपल्या "कारखान्यांची राजकारणे" करीत राहिले असा झालेला ग्रह दुर करणे व त्यांची मते मिळवणे हे नक्कीच आव्हान असणार आहे.प्रामुख्याने ह्या वर्गातुन "एकगठ्ठा मतदानाचा " प्रभाव दिसतो म्हणुन ह्यांचा उल्लेख केला आहे, बाकी तसे येतातच ...

बाकी काँग्रेसला निवडणुकीसाठी रसद म्हणुन पैसा व ग्रास रुट लेव्हलला काम करणारे कार्यकर्ते ह्यांची भरपुर बेगमी ह्या पक्षाकडे आहे. ठिकठिकाणचे साखरसम्राट, शेतकरीनेते, विकासमहर्षी, कर्मयोगी ह्यांनी हा पक्ष खचाखच भरलेला आहे ...

एकंदरीत मागच्या निवडणुकीपेक्षा ह्यावेळी परिस्थीती काँग्रेससाठी "कठिण" आहे हे नक्की.आता नक्की जागा किती मिळतील ह्याचा अंदाज व्यक्त करायला मी काही "न्युजचॅनेलवरचा भविष्यवाला पोपट" नाही त्यामुळे क्षमस्व पण जागात +/- १० जागांचा फरक पडणार हा माझा अंदाज आहे.

=====================

बाकी पक्षांचा व राजकारणाचा आढावा पुढच्या काही भागात.विस्तारभयावास्तव मी हा भाग इथेच थांबवतो, पुढचा भाग शक्य तितक्या लवकर .....
( *** क्रमश : **** )

Thursday, January 15, 2009

तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे काय ? ... भाग - १

मित्रांनो, आपण नेहमीच आंतरजालावर अनेक प्रकारचे लिखाण पाहतो. सध्या ब्लॉगविश्वाला ग्लॅमर आल्याने व त्याची मार्केटमध्ये चांगलीच बुम असल्याने दररोज अक्षरशः ढीगाने नवे ब्लॉग तयार होत आहेत.स्वाभावीकच ह्या असंख्य ब्लॉग्सवर रोज नवे लिखाण येत असते.

आपण बर्‍याच वेळा शक्य तितके वाचुन काढतो, बरेच काही आपल्याला आवडुन जाते व त्याला "प्रतिसाद" द्यावा अशी इच्छाही होते. बरं, ह्या प्रतिसादाचा उपयोग पुढेमागे आपली स्वतःची "ओळख" तयार करायला सुद्धा होऊ शकतो ही यातली गोम लक्षात घेतलीत तर तुम्हाला "प्रतिसाद" देण्यामागचे राजकारण समजेल. जरा नजर टाकुन बघा ना काही प्रसिद्ध ब्लॉग्सवर, कसे ढिगाने लोक लिहतात व त्यांना प्रतिसाद सुद्धा येतात, ह्या नेहमीच लिहणार्‍या व ते वाचुन नेहमीच प्रतिसाद देणार्‍या लोकांचा एक मस्त गॄप म्हणजे आजच्या प्रचलीत भाषेत "कंपु" तयार होतो, एकदा का तुम्ही ह्या "कंपुत" शिरलात की मग मग बर्‍याच गोष्टी साध्य होतात ( असो. कंपुबाजीविषयी नंतर केव्हातरी ).

तर कळीचा मुद्दा असा आहे "समोरच्याच्या लक्षात राहिल असा प्रतिसाद कसा द्यावा ? किंवा तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे का ?"
घ्या तर आमचे काही सल्ले ...!
तसे पहायला गेले तर आमचे आंतरजालीय मित्र "टारझन" ह्यांनी मराठी आंतरजालविश्वावरील एक अग्रणी संस्थळ असणार्‍या "मिसळपाव.कॉम" वर एक फर्मास लेख टाकला आहे ह्याविषयावर, तो आपल्याला "इथे" पाहता येईल ...

ह्याला जोडुनच आमचे पदरचे २ पैसे ...!
.....(मी टिप्स देऊ शकतो ह्याचाच अर्थ मी आंतरजालीय संस्थळावरचा यशस्वी प्रतिसादकर्ता आहे हे सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल, ज्यांना हे मान्य नाही ते हे विधान त्यांना झालेल्या "जळजळीतुन" आले आहे हे आम्ही इथे स्पष्टपणे नमुद करु इच्छितो. )

१. काथ्याकुट :
काथ्याकुट म्हणजे काय तर लष्कराच्या भाकर्‍या भाजणे. कधीतरी आपली माऊली वैतागुन म्हणते बघा " झाले तुकडे मोडुन, आता निघालं कार्ट लष्कराच्या भाकर्‍या भाजायला" , बस हेच ते.
फक्त फरक असा पडतो इथे की लोकं इथे कंपन्यात मस्त एसीची हवा खात, कंपनीतुन हायस्पीड नेट वापरुन, कंपनीच्या काम करण्याचा वेळात कामाला फाट्यावर मारुन "मेगाबाईट्स च्या मेगाबाईट्स " वाद घालत असतात ...
बरं, त्याला खास विषयांचे बंधनही नाही, अगदी अमेरिकेच्या आर्थीक धोरणापासुन ते सोमालियाच्या यादवीपर्यंत , ब्रिटनी स्पियर्सच्या मराठी बॉयफ्रेंडपासुन ते पुण्यात गणपतीला घातलेल्या स्वेटरापर्यंत ... अगदी कशावरही तुम्ही वाद घालु शकत असाल तर तुमचे ह्या प्रकारात स्वागत आहे.
आजकाल ह्या विभागाला फार चलती आहे, सगळ्यात जास्त प्रतिसाद खेचणार्‍या विभागामधला हा एक विभाग, ह्या साहित्यला प्रतिसाद न देण्याची घोडचुक करणे म्हणजे "दैव आलेय द्यायला आणि कर्म नाही घ्यायला" असा प्रकार आहे. तेव्हा ह्याला जरुर प्रतिसाद द्यावा.
ह्याचे २ प्रकार पडतात,
पहिला प्रकार म्हणजे उगाच १-२ ओळीत काहीतरी खरडुन मग कोंबड्या झुंझवण्याची मजा पहात बसणारा प्रकार. मग विषय काहीही असला तरी तो मात्र ज्वलंत, धगधगता, व्यवस्थीत चिरफाड करता येईल असे असला म्हणजे आपले काम सोपे होते.
आपण पहिल्या ५-६ प्रतिसादांची वाट पहायची, आपोआपच त्यात आरामात २ विरोधी सुर नक्की निघतात, मग १०-२०-३० / छापा-काटा करुन आपण कोणत्या बाजुला आहेत हे ठरवावे, एकदा का हा निर्णय झाला मग कसली भिती नाही. मात्र बाजु निवडताना आप्ले विरोधक जास्त असतील ही काळजी घ्यायला हवी.
सुरवात करतानाच एखाद्या आधीच पडलेल्या आपल्या विरोधी प्रतिसादातले एखादे वाक्य निवडुन त्याला लगेच "स्पष्ट असहमत, हे वास्तवीक असे पाहिजे " ह्या अर्थाचा प्रतिसाद द्यावा.
उदा : जर चर्चा "निवासी /अनिवासी " असेल तर तत्काळ "आम्हाला आमचा देश प्यारा, भाकरीसाठी परकीयांपुढे शेपटी हलवणे आम्हाला मान्य नाही" ह्या अर्थाचे वाक्य ठोकुन द्यावे, मात्र हे करत असताना आपण हा प्रतिसाद "अमेरिका, युरोप, युके" इथे ऑफीसात बसुन लिहीत नाही ना ह्याची मात्र खात्री करुन घ्यावी, उगाच ४ लोकात शोभा होते ना. एकदा का हे जमले की आपोआपच "विरोधी प्रतिसादांचे आग्यामोहळ" अंगावर धावुन येते, तुम्ही जास्त काही करु नका, ओच तोच मुद्दा वेगवेगळ्या शब्दात मांडत रहा, म्हणजे असे की " आम्ही भारतातच राहुन मीठ भाकरी खाऊ, तुमचा पिझ्झा / पाश्ता तुम्हाला लखलाभ होवो किंवा म्हातार्‍या आईवडीलांची काळजी घेणे हे मला हिरव्या नोटांपेक्षा जास्त महत्वाचे वाटते किंवा तुमच्या प्रासादापेक्षा माझी झोपडीच मला प्रिय वगैरे वगैरे " असे प्रतिसाद टाकावेत. लोक अजुन खवळुन उठुन पानपानभर प्रतिसाद खरडतात, मग हळुच कुणाच्यातरी "ग्रीनकार्डावर टिका " करणारे पिल्लु सोडु द्यावे, चर्चा अजुन भडकते व लोक पुढे तुम्ही अजुन काय खरडतात / दिवे लावताय ह्याची वाट पाहतात ...
खुप कंटाळा आला की मग शेवटी " छ्या, काहीपण म्हणा पण आपल्या देशातच चिंग होऊस्तोवर बिअर पिऊन मग गाड्यावरची भुर्जी खाण्याची मजा काही औरच.... " असा प्रतिसाद टाकुन द्यावा, अजुन ज्वाळा भडकतात ...लोक जर वैतागुन वैयक्तीक खरडी / व्यनी टाकु लागले तर शेवटी " माझ्याकडुन मी थांबतो, ह्यापुढे कसल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही " असा समारोप करावा. पण ह्या समारोपातच " जय हिंद, जय महाराष्ट्र " सारखी घोषणा टाकुन आपले देशप्रेम पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी दवडु नये.
हा हा म्हणता तुम्ही "वाद विवादातले प्रसिद्ध प्रतिसादकर्ते" होऊन जाल ...

आता दुसरा प्रकार म्हणजे "नमनालाच २ पाने भरतील एवढे लिखाण टाकुन काथ्याकुट", ह्यात जरा मुद्दे स्पष्ट असल्याने आपल्याला वाव कमी मिळतो पण यासाठी हार मानायची गरज नाही. शक्यतो लेख पुर्ण वाचु नये, वाचुन त्यातले जास्त काही कळेल असेही नाही. फक्त गाठीला असावेत म्हणुन २-४ मुद्दे नजरेखालुन घालुन ठेवावेत.
जर चर्चा "राजकारण" ह्यावर असेल तर त्वरेने "छ्या, राजकारण म्हणजे गटार" असे जाहीर करुन मोकळे व्हावे. मग सर्वात प्रथम ( जीव तोडुन २ पानं लेख खरडलेला ) लेखक भडकतो व मग बाकीचे, त्यांना व्यवस्थीत अंगावर येऊ द्यावे, मग पुन्हा एकदा "राजकारण्यांची औकाद, पक्षाचा इतिहास, नेतृत्व " ह्याविषयी एखादे आक्षेपार्ह्य वाक्य सोडुन द्यावे. म्हणजे " राहुल गांधीची अजुन पात्रता नाही / काँग्रेसमध्ये घराणेशाही सोडुन अजुन काय आहे दुसरे / बीजेपीने हिंदुत्व मुद्दा सोडुन द्यावा / राज ठाकरेने परतुनी घरट्याकडे जावे " असा सुर काढावा म्हणजे ह्याचा बाजुचे व विरोधकांचे पुन्हा ह्यावर जुंपते. तुम्ही मात्र शांत रहा, जमल्यास गुगलुन काही मिळाल्यास अजुन काही "जळजळीत सापडल्यास " ते "चु.भु.द्या.घ्या." ह्या टीपेसकट टाकुन द्यावे. चर्चा रंगत जाते ...

लोकांना जरी चर्चा लक्षात राहिली नाही तरी "उलटसुलट / भडखाऊ / आक्रस्ताळी " विधाने करणारे तुम्ही जरुर लक्षात राहता व हा हा म्हणता तुमचा "वितंडवादी भांडखोर प्रतिसादकर्ता " म्हणुन लौकीक वाढु लागतो.
*
*****
*
२. काव्यविभाग :
ह्यात प्रतिसाद देण्याआधी २ शक्यता विचारात घ्याव्यात.

पहिली म्हणजे तुम्हाला काव्य कळते का ?
ह्याचे उत्तर होय असल्यास कधीही पहिला प्रतिसाद "कविता आवडली" असा चुकुनही टाकु नये, मग तुमच्या काव्य समजण्याचा काय घंटा उपयोग ? त्याऐवजी चुका शोधण्याचा प्रयत्न करीत रहा, म्हणजे उदा. तुम्ही " आशय उत्तम आहे पण वॄत्तात / मात्रेत मार खाल्लात, शेवटच्या २ कडव्यात जरासा तोल ढासळला , चांगला प्रयत्न आहे पुढील प्रयत्नास शुभेच्छा, थोडीशी भडक वाटते आहे, यमक जुळवण्याचा नादात कवितेचा गाभा ढासळला , जर अलाण्या फलाण्याच्या जागी फलाणे फलाणे टाकले तर जमुन जाईल , आशय व्यवस्थीत समजला नाही, फारच विस्कळीत वाटली " ह्यापैकी एखादी प्रतिक्रीया पुन्हा एकदा १०-२०-३० करुन टाकुन द्यावी. मात्र नक्की काय करायला हवे हे "गुलदस्त्यात" राहु द्यावे, स्पष्टपणे सल्ला मुळीच देऊ नये.
तुम्ही फारच पट्टीचे असाल तर मात्र त्याच धाग्यात उत्तर देताना लगेच " प्रति कविता " रचुन दाखवावी व वरुन "हे जमते का पहा " असे ठेऊन द्यावे. मग मात्र "प्रतिभेला सलाम, तोडलतं, खल्लास " असे प्रतिसाद मुळ कवितेला यायच्या ऐवकी तुम्हालाच येतात व हा हा म्हणता तुम्ही "काव्य ह्या प्रांतातले दादा/अधिकारी " म्हणुन ओळखले जाऊ शकता.असो.

आता दुसरा प्रकार म्हणजे तुम्हाला काव्यातले काहीही कळत नाही, तुम्ही चक्क माठ आहात तर काय करावे. सर्वात प्रथम जी येईल त्या कवितेला वर टारझन म्हणतो तसे प्रतिसाद देत सुटावे पण ह्यात एक गोम आहे, इथे प्रत्येक प्रतिसादात " आम्हाला काव्यतले काहीही कळत नाही जे जगजाहीर आहे / आयला, आम्हाला कविता करायला फतरे जमत नाही / ज्या दिवशी कविता करत येईल त्यादिवशी मारुतीला २१ नारळं वाढवीन " हे पालुपद जोडुन द्यावे. मात्र तुम्हाला काव्यातले कळत नसुन तुम्ही असे प्रतिसाद कसे देता असा प्रश्नाल्यास सोईस्कर मौन पाळावे.
मधुन आधुन "कवितेल दुरुस्त्या" सुचवाव्यात, म्हणजे जसे की "ढळले च्या जागी कोसळले किंवा कळले कसे होईल ? / धावती गाढवे च्या जागी ...... जाऊ द्या, बोलण्यासारखे नाही ते " असे विचारत रहावे. तुमचे चुक आहे तुम्हालाही माहित असते पण कवी / कवयत्री मात्र जाम खुष होऊन स्पष्टीकरण वगैरे देतात व तुम्हाला भाव मिळतो, लगेच त्यांचे आभार मानुन मोकळे व्हावे. तुम्हाला काय व किती कळले ही बाब आधीही महत्वाची नव्हती व आताही नाही, आपले अस्तित्व जाणवुन दिल्याशी मतलब.
जर तुम्ही पुढच्या यत्तेतले असाल तर "खरडवह्यातुन" ह्या कवितेबाबत कवीशी "चर्चा" सुद्धा करु शकता, मात्र त्यासाठी थोडी हिंमत व थोडा अर्धवटपणाचा आव मात्र आणावा लागेल. ह्यातुन तुम्ही त्या कवी / कवियत्रीच्या "बडी लिस्ट / गुड लिस्ट " मध्ये सुद्धा शिरकाव करु शकता ...

तर कविता कळो अथवा न कळो प्रतिसाद हा दिलाच पाहिजे ...
असो.

( विस्ताराच्या भयाने इथेच थांबतो. बाकीचे पुढ्च्या भागात ...! )

क्रमश :

Tuesday, January 6, 2009

३१ डिसेंबरचा जल्लोश आणि तारतम्य ...!

सर्वात प्रथम आमच्या ब्लॉगच्या ( ज्या काहीं असतील त्या ) वाचकांना नव्या वर्षाच्या ( थोड्या उशीरानेच) शुभेच्छा. ह्यावेळी कसलेही सेलीब्रेशन अथवा शुभेच्छा देण्याचा मुडच नव्हता त्यामुळे लिहावे की नाही या वैचारीक द्वंद्वात होतो. असो.

एक किस्सा सांगतो, बर्‍याच मोठ्ठ्या सुट्टीनंतर हापीसात गेल्यावर एका "अ-भारतीय सहकार्‍याचे" मला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, माझे या बाबतीत थोडेसे मत वाईट/कटु असल्याने मी आपले कोरडेपणाने "हॅप्पी न्यु ईअर" केले. त्यानंतर त्याने पुढचा प्रश्न "सेलीब्रेशन कसे केले ?" हा विचारला.बराच वेळ मनात दाबुन ठेवलेल्या भावनांचा बांध फुटल्याने मी त्याला " मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ व मनालाच लाज वाटली असल्याने मी व माझ्यासारख्या अनेक भारतीयांनी ह्यावर्षी सेलीब्रेशन केले नाही" अशी त्याला नविनच असलेली न्युज सांगितली. त्यावर त्याने आश्चर्य वाटुन स्वतः बेंगलोरमध्ये अनेक ठिकाणी मोठ्ठ्या प्रमाणावर सेलीब्रेशन केले असल्याचे दाखले दिले. मला खिन्न मनाने अजुन अनेक भारतीय "मॅच्युअर" झाले नसल्याचे कबुल करावे लागले. त्याने अनेक ठिकाणी "पोलीस बंदोबस्तात सेलीब्रेशन" झाल्याचे मला सांगितल्यावर मी त्याला "ह्या परिस्थीतीत सेलीब्रेशन करणे तुला पटते का ?" असे विचारले.अंगात कठोर देशप्रेमाचे व कडव्या राष्ट्रभक्तीचे देशप्रेम वहात असलेल्या त्या जर्मन माणसाने "नाही, हे अयोग्य आहे. आम्ही सेलीब्रेशन करण्यापेक्षा ज्यांनी हा मुंबईचा हल्ला केला त्यांच्या पुढच्या ५ पिढ्या कसलेही सेलीब्रेशन करण्यासाठी सक्षम राहणार नाहीत असे प्रयत्न करणार्‍या कार्यात स्वतःला वाहुन घेतले असते " असे उत्तर दिले.
आता तुम्हीच ठरवा ....!

पण नाही, आम्ही भारतीयांना अत्यंत धडाक्यात हा " ३१ डिसेंबरचा उत्सव (?)" साजरा केला, वॄत्तपत्रांनी पानेच्या पाने बातम्या दिल्या तर इलेक्ट्रोनीक प्रसारमाध्यमांबाबत बोलायची सोय राहिली नाही. तसेही टीव्हीवर व वृत्तपत्रात वाचल्याप्रमाणे हे सेलेब्रेशन करण्यात प्रामुख्याने " धनदांडगे, नवश्रीमंत उच्च मध्यमवर्ग , कॉलेज स्टुडंट , आयटी /एम एन सी मध्ये काम करणारे व इतर व्हाईट कॉलर वर्ग " ह्यांच्या धडाक्यातल्या सेलीब्रेशनने डोळे दिपले. कॉर्पोरेट जगताने व फिल्मसृष्टीनेसुद्धा नेहमीच्याच जोषात हे साजरे केले.मनात एक किडा आला, च्यायला अतिरेकी हल्ल्यानंतर ताजसमोर "मेणबत्त्यांची आरास " करणारा हाच वर्ग होता ना ? ह्यांनीच फॉरीन कल्चरप्रमाणे पुचाट मेणबत्या पेटवत निषेध करण्याच्या कार्यक्रमात स्वतःला मिरवुन घेतले होते ना ? मग ३१ ला हे सर्व धाब्यावर बसवुन ग्लासाला ग्लास भिडवत, आरोळ्या ठोकत , एकमेकांच्या बाहुपाशात पडुन "मुंबई रॉक्स , हॅप्पी न्यु ईअर " असा गजर केला ना ? क्षणात विसरलात का ते निरपराध २०० बळी व त्यांना वाचवण्यासाठी शहीद झालेले १४ पोलीस अधिकारी ? डिस्कोमधल्या चकचकाटात बळी पडलेल्यांच्या घरात लावलेल्या पणत्यांची सोईस्कर विसर सर्वांनाच पडली का ? का स्वतःला मिरवुन घेण्यापायी मेणबत्या पेटवुन नाटकी देशप्रेमाच्या बाता करणारे नंतर ४-४ पेग अप होऊन गाण्याच्या तालांवर थिरकत सेलीब्रेशन करत होते ?
२६ डिसेंबरला ताजसमोर मोठ्ठ्या तडफेने हल्ल्याला १ महिना पुर्ण झाला म्हणुन श्रद्धांजली वाहताना मिरववलेला व वर उल्लेखला वर्ग फक्त ५ दिवसांनी सर्व काही धाब्यावर बसवुन मोठ्ठ्या मोठ्ठ्या क्लबात / पबात थिरकताना पाहुन मनस्वी राग आला. झोपलेल्या जागे करता येईल हो पण स्वतःच्या पुढारलेपणाचे, कल्चर्डपणाचे सोंग घेऊन निर्ढावल्यापणाचे कातडे डोळ्यावर ओढुन झोपेचे सोंग घेणार्‍यांसमोर आम्ही हतबल आहोत.सर्वसारासार विचारबुद्धी गहाण ठेवल्यासारखेच वागतात हे लोक. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्या प्रत्येक कृतीचा मिडीयाकडुन उदोउदो होत असल्याने ह्यांना कसल्याही घटना ह्या मिरवण्यासाठीच आहेत असे वाटते, मग ते आतंकवादी हल्ला असो वा ३१ चे सेलीब्रेशन ...काय बोलणार आम्ही ह्यांना, सर्व काही "राम भरोसे" चालु आहे हे नक्की ...

शो मस्ट गो ऑन हे जरी खरे असले तरी शो असा "धडाक्यात" नसतो करायचा हे कधी कळणार ?
मरु दे च्यायला, कुणाला काय पडले आहे ?हा नवा सो कॉल्ड सुशीक्षित उच्च मध्यमवर्गीय धनदांडगा वर्ग अजुन "मॅच्युअर" नाही हेच खरे , ह्यांना देव लवकर सुबुद्धी देवो.

या संदर्भात ९/११ नंतरची अमेरिका आठवा. जवळपास महीनाभर वर्तमानासंदर्भात विनोद करणारे अनेक टॉक शोज आणि "सॅटरडे नाईट लाईव्ह" सारखे कार्यक्रम बंद होते. नंतर चालू झाल्यावर पण त्यात बराचसा संयम होता. न्यू यॉर्कचा तत्कालीन महापौर रुडी ज्युलियानी हा सर्वांना सांगत होता की तुम्ही आनंदात रहा, परत पहील्यासारखे ("नॉर्मल") वागा, आपण तसे वागलो नाही तर अतिरेक्यांना तेच हवे आहे. लोकांनी ते ऐकले पण उस्फुर्त संयामाने.
याचा अर्थ सुतकी चेहर्‍याने बसा असा नक्कीच नाही. आणि त्यावर स्वतःच्या हातात असलेले नागरी कर्तव्यपण न करता जरी तसे बसलात तरी त्याचा काय उपयोग? मात्र आजचे वागणे हे वर म्हणलेल्या "जन पळभर म्हणतील हाय हाय" असे म्हणायच्या ऐवजी मला, "रोज मरे त्याला कोण रडे?" असे म्हणावेसे वाटते. असल्या सातत्याने होणार्‍या हल्ल्यांनी आणि त्यात "स्पिरीट ऑफ मुंबई" वगैरे सारख्या "ब्रेनवॉशिंग" वाक्प्रयोगांनी माणसे कळत नकळत "मुर्दाड" झाली आहेत असे वाटू लागले आहे.

कसल्याही आपत्तीनंतर पुन्हा उभे राहणे हे गरजेचेच नव्हे जगण्यासाठी आवश्यकच, पण ह्या कैफात आपण नकळत मुर्दाड, भावनाहीन, लाचार, मुकाट सहन करण्याची सवय असलेले होत चाललेले आहोत हे कुणाच्या लक्षात येत नाही का ?४ दिवस जोराजोरात चर्चा करुन, तावातावात मते मांडुन, मेणबत्या वगैरे लाऊन आपले देशप्रेम दाखवणारे पुन्हा तसेच वागतात ह्याने दु:ख झाले.

आमचे मिसळपाव.कॉम वरचे स्नेही विकासराव यांनी एक मस्त कविता दिली.
नाझी जर्मनी संदर्भातील एका कवितेतील डोळे उघडणार्‍या ओळी परत एकदा सांगतो - आपण, २६ नोव्हेंबरला, यातील चौथ्या ओळीपाशी जाऊन पोचलो आहोत असे वाटते.

"In Germany, they came first for the Communists, And I didn't speak up because I wasn't a Communist;
And then they came for the trade unionists, And I didn't speak up because I wasn't a trade unionist;
And then they came for the Jews, And I didn't speak up because I wasn't a Jew;
And then . . . they came for me
. . . And by that time there was no one left to speak up."
- Martin Niemöller

बघा काही शिकायला जमले तर अशी आमची कळकळीची विनंती.

माझ्या माहितीप्रमाणे मुस्लीमधर्मीयांनी ह्या हल्ल्याचा निषेध म्हणुन त्याम्चा धार्मीक सण "ईद" अत्यंत साधेपणाने साजरी केली असताना ह्या "३१ डिसेंबरचे" असे धडाक्यात सेलीब्रेशन करण्यात कसला शहाणपणा ?

अवांतर :
आजा जाता आवर्जुन उल्लेख करावा वाटतो ते "सोलापुर" शहरातल्या ३१ डिसेंबरच्या घटनेचा.
शिवसेनेच्या पुढाकाराने का होईना पण सुमारे १०००० पेक्षा जास्त लोकांनी काहीही सेलीब्रेशन न करता रात्री चौकात जमुन पोलीस अधिक्षक श्री. भुषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली "दहशतवादाशी लढण्याची शपथ" घेतली.
प्रत्येक्षात लढाई कितपत शक्य ही बाब जरी अलहिदा असली तरी इच्छाशक्ती महत्वाची. आम्हाला याचे कौतुक वाटते.
ह्या घटनेने स्वतःच्या प्राणांची बाजी लाऊन लढणार्‍या सैनिकांना आपले दु:ख समजणारे, पाठिंबा देणारे व सदैव साथ देणारे कोणी आहे हा विश्वास मिळाला तरी उत्तम.

अतिअवांतर : मी ३१ डिसेंबर साधी पोळी, बटाट्याची भाजी, मटकी उसळ, भात-आमटी खाऊन साधेपणाने पुढे ढकलला, साजरा केला म्हणण्याचा निर्लज्जपणा माझ्याकडुन होणार नाही. असो.