Wednesday, November 3, 2010

पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१० ...

नमस्कार,

आज धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण १२ शके १९३२. आजच्या या शुभदिनी 'पुस्तकविश्व'चा पहिलावहिला दिवाळी अंक आपल्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा अंक ऑनलाईन तसेच पीडीएफ स्वरुपात एकाच वेळी प्रसिद्ध होत आहे.

अनुभव, पुस्तकपरिचय, लेखकांचे परिचय, मुलाखत आणि कवितासंग्रहाचे परिचय असे विविधरंगी लेखन आपणास या अंकात वाचायला मिळेल. पुस्तकविश्वचा अंक म्हणजे पुस्तक/लेखकांबद्दल असे जरी असले तरी लेखांच्या विषयात वैविध्य राखायचा प्रयत्न केला आहे.

या दिवाळी अंकाचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांची दिलखुलास मुलाखत. 'भिन्न' आणि 'ब्र' या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांबद्दल त्यां भरभरुन त्या भरभरुन बोलत आहेत, या पुस्तकांसाठी काम करतांना त्यांना आलेले अनुभव सांगत आहेत तसेच त्यांच्या इतर प्रकल्पांची माहिती देत आहेत. छापील पुस्तकांची पुढची पिढी म्हणजे डिव्हीडीवरचे पुस्तके येउ घातलीत, त्यांच्याबद्दल मत-प्रदर्शन करत आहेत.

'पुस्तकविश्व'ची सुरुवात होऊन अजून उणेपुरे वर्षही झाले नाही. या एवढ्याश्या कालखंडात त्याने छान बाळसे धरले आहे. तुम्हां सर्व पुस्तकवेड्या रसिक वाचकांमुळेच हा पल्ला आपण गाठला आहे, ही जाणीव मनी ठेवून मी आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा अंक आपणास आवडेल अशी आशा करतो.

पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०



ऑनलाईन वाचा.
डाउनलोड करा.

- व्यवस्थापन
पुस्तकविश्व डॉट कॉम

Wednesday, June 30, 2010

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार : अर्जेंटिना ...

तुम्ही म्हणाल की अर्धा वर्ल्डकप संपला आणि 'अर्जेंटिना' आता ऑलरेडी शेवटच्या ८ संघात पोहचुन पुढच्या उपांत्य सामन्यात जर्मनीशी लढायला तयार झाली आहे.

मग मी हे अर्जेंटिनाबद्दलचे घोडे आता वरातीमागुन का नाचवत आहे ?
तेच नेहमीचे 'वर्ल्डक्लास प्लेमेकर, अप्रतिम ड्रिब्लिंग स्किल्स, हवेतल्या खेळात सर्वोत्तम, बचावफळीच्या भिंती, गोलपोस्टसमोर पहाडासारखा उभा राहणारा गोली, बचाव भेदणारे मिडफिल्डर्स, बचावपटुंना चकवा देणारा स्ट्रायकर, तेच लेफ्ट बॅक-राईट बॅकचे पुराण .... वगैरे वगैरे' लिहुन आम्हाला बोअर करणार का ?
नाही, अजिबात नाही !
मी ह्या ओळखीत अजिबात काही टेक्निकल लिहणार नाही, नाही म्हणजे नाही, अगदी पुज्य !
बास झाले तिच्यायला तेच नेहमीचे पुराण ...



अर्जेंटिना आहे ती एका राजकीय पक्षासारखी, फार्फार तर एका 'राष्ट्रीय राजकीय पक्षा'सारखी आहे असे म्हणा, त्याने फार फरक पडेल असे नाही पण म्हणा. राष्ट्रवादीला उगाच 'राष्ट्रीय' म्हणल्यावर काय फरक पडतो आणि नाही म्हटले तरी काय फरक पडतो ? काहीच नाही, तसेच आहे आर्जेंटिनाचे, तुम्ही त्यांना काहीही म्हणा ते आपले काम करत राहतात.
आता कसे की एखादा राजकिय पक्ष कशी येईल ती निवडणुक लढवतोच तशी अर्जेंटिनाही बहुतेक सगळ्याच 'विश्वचषक स्पर्धांना' कायदेशीरपणे पात्र झाली आहे आणि लढली आहे. जिंकणे-हरणे हा भाग सोडा पण लढणे हे महत्वाचे. तशी त्यांनी १९७८ साली आणि १९८६ च्या 'मॅराडोनाच्या करिष्म्याच्या लाटेत' चक्क विजेतेपदाला गवसणी घालुन ४-४ वर्षे 'विश्वविजेते' ही खुर्चीही उबवली आहे. ह्यावेळेस पण ते "युवराज लियोनेल मेस्सीच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्पष्ट बहुमताचा दावा" करत आहेत.
ज्याप्रमाणे सर्वच पक्षांची असते तशी अर्जेंटिनाचीही रितसर आघाडीवर लढुन गोल करुन पक्षाची शीट संभाळणार्‍या स्ट्रायकर्सची फळी आहे,ग्रासरुट लेव्हलवर 'संघ प्रचारकांप्रमाणे एकनिष्ठ आणि गोलांची अपेक्षा न ठेवता प्रामाणिक' काम करुन आपल बालेकिल्ला मजबुत आणि सुरक्षित ठेवणार्‍या बचावपटुंची बचावफळी आहे, तसेच हायकमांड आणि लोकल कार्यकर्ते ह्यांच्यात जशी स्थानिक नेतेमंडळी , जिल्हाकार्यकारणी ताळमेळ ठेवते तेच काम करणारी आणि आघाडी व बचावफळीचा दुवा साधणारी मधली फळीही आहे, अहो एवढेच काय पण एखादा मतदारसंघ खिशात घालुन फिरणार्‍या व पक्षाची इमेजला तडा जाऊ न देण्याचे काम करण्यासाठी एकेकाच्या नाड्या बांधुन ठेवणार्‍या मात्तबर साखरसम्राटाएवढा ताकदवान असा 'गोलरक्षक' पण ह्यांच्याकडे आहे. हे सगळे झाले रितसर फ्रंटवर लढणार्‍यांचे, हे झाले अ‍ॅक्च्युअल लढती जिंकणार्‍या व हारणार्‍यांचे.
अहो महाराज पण हे सगळे करण्यासाठी पक्षाला एक 'तात्विक, वैचारिक, नैतिक बैठक देणारा थिंक-टँक किंवा पॉलिट ब्युरो' असतो ना तसाच ह्यांचाही एक कायदेशीर कोच आणि इतर 'कोचिंग स्टाफ' आहे व हेच त्यांच्या पार्टीला ... हे आपलं संघाला लढतीसाठी तयार करत असतात. पडद्यामागुन चाली खेळणारे हे पण ह्यांच्यावर बरेच काही अवलंबुन असते बरं का.
असो.

आता आपण ह्या पक्षाच्या बांधणीचा एक धावता आढावा घेऊ ...



. 'लियोनेल'रावचंद्रजी 'मेस्सी'साहेब :
जसे काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही सभेची किंवा बातमीची सुरवात 'गांधी घराण्याच्या जयजयकाराशिवाय होत नाही' तसेच आजकाल अर्जेंटिनाचा कुठेही उल्लेख आला की आधी आपण 'लियोनेलरावचंद्रजी मेस्सीसाहेब यांचा विजय असो ...' ही घोषणा देऊन टाकावी. अर्जेंटिना पक्षाचे हे युवराज आणि शेंडेफळ, पहिल्यापासुन राजेशाही थाटात आपली कारकिर्द घडवायला घेतली. पक्षाची ही धडाडती तोफ, अगदी राज ठाकरेसारखी. जिकडे जाईल तिकडे मैदान मारुनच येईल.
प्रतिपक्षाने अगदी जीवाचे रान करत जनमत आपल्या बाजुने वळवत आणावे, प्रचाराचे रान व्यवस्थित पेटले असावे, चाली-शह ह्यांना उत आला असावा व अशात मेस्सीयुवराजांची एन्ट्री व्हावी. ह्यांनी लगबगीत मध्यफळी आणि बचावफळीच्या दरम्यान 'रोड शो' करावा, काही वेळा पेनल्टी कॉर्नरच्या 'कोपरा सभा' घ्याव्यात व बोलत-चालत एक असा टोला लगावावी की डायरेक्ट प्रतिपक्ष भुईसपाट. शरदकाका पवारांच्या 'रात्रीत मतदान फिरवले' च्या आख्यायीका आपण जर नुसत्याच ऐकल्या असतील तर मेस्सीसाहेबांचा 'एका चालीत गेम पलटवला' हा खेळ पाहणे ही आपल्यासाठी नक्कीच पर्वणी असेल.
कुठल्याही पक्षाला हवा असणारा हा'फायरब्रँड, तडाखेबंद, धडाडी'चा १० नंबरची जर्सी घालणारा नेता .... लियोनेलरावचंद्रजी मेस्सीसाहेब !



. 'कार्लोस'दादा तवेझ :
अर्जंटिना ह्या पक्षाच्या 'दादा' ह्या पदाला १००% पात्र अशी ही असामी 'कार्लोस'दादा तवेझ, अगदी शेम टु शेम आपल्या नारायणदादा राण्यांसारखी. तसाच बेघडकपणा, तोच तेजतर्रारपणा, तीच भेदक चाल आणि तसेच देवाला ओवाळुन टाकल्यासारखे प्रतिपक्षाच्या टेरिटरीत बेगुमान हुंदडणे. कार्लोसदादा ह्या पक्षाचे आघाडीच्या फळीचे नेते, रोज उठुन प्रतिपक्षाला फैलावर घेणे, त्यांच्याशी झुंबडी घेणे, उगाच हाणामार्‍या होण्याची परिस्थीती निर्माण कारणे, आपल्या व्यक्तिमत्व व माणसे जोडायच्या कसबीवर एखादी अवघड असणारी जागा सहज जिंकुन आणणारे आमचे कार्लोसदादा. हळुहळु कार्यकर्ते जोडत हे स्वतःच कधी बेगुमानपणे प्रतिस्पर्धी पक्षात घुसुन त्यांची गोलकिपरच्या डायरेक्ट धोतराला हात घालुन व गोल डागुन कधी त्याची इज्जत चव्हाट्याला मांडतील ह्याचा नेम नाही.
तशी वेळ आलीच तर थेट प्रतिस्पर्ध्यांची टाळकी फोडण्यासाठी ख्याती असलेले (गेल्या चॅम्पियन्स लीगला मॅन-यु कडुन खेळताना त्यांनी असाच राडा केली व त्याला तोंड देण्यासाठी चेल्सीला आपला ड्रोग्बा शहिद करावा लागला ) कार्लोसदादा आपल्या पक्षातली 'अत्यंत फटकळ तोंडाचे' म्हणुन प्रसिद्ध आहेत.
पण एकदा का जीव टाकला जी पक्षासाठी एक तर स्वतःचा जीव देतील किंवा समोरच्याचा जीव घेतील असे मिस्टर डेपेंडिबल .... कार्लोसदादा तवेझ !



३. गोंझालोजी हायग्वेन-महाजन :
अर्जेंटिना ह्या पक्षाचा सर्वात सभ्य, सुसंस्कॄत, प्रामाणिक, कष्टाळु , स्वतःची एक खैळिक बैठक असणारा 'पक्षाचा चेहरा'. मी ह्यांची तुलना डायरेक्ट प्रमोदजी महाजनांशी करत असल्याने आपल्याला गोंझालोजींच्या व्यक्तिमत्वाचा बर्‍यापैकी अंदाज आला असेलच. आपल्या पक्षासाठी अत्यंत शिस्तबद्ध चाली व कार्यक्रम रचुन ते जातीने लक्ष घालुन व 'गोल'रुपाने ते राष्ट्राला अर्पण करुन एक 'कामसु, हमखास काम करणारा, देशाचे प्रेरणास्थान' वगैरे विषेशणाला गोंझालोजी हायग्वेन पुरेपुर उतरतात.
संघापुढे कसलीही समस्या असु देत, गोंझालोजी आपली सर्व ताकद पणाला लाऊन बाजी पलटवणार हे निश्चित. भाजपाचे हायकमांड जसे सगळे काही प्रमोदजी महाजनांच्या खांद्यावर सोपवुन स्वतः झोपा काढत तसे अर्जेंटिनाने केली तर हे महाशय २-३ मिडफिल्डर्स हाताशी धरुन यशाचा झेंडा नक्कीच नाचवतील असे खुद्द त्यांचे प्रतिस्पधी बोलुन दाखववतात.
कसल्याही घोटाळे, राडे, कट-कारस्थानं, षडयंत्र, चिखलफेक ह्यापासुन स्वतःला दुर ठेऊन आपले काम प्रामाणिकपणे करुन सदैव पक्षाच्या भल्यासाठे झटणारे व नेहमीच विजयश्रीची भेट देणारे हे .... गोंझालोजी हायग्वेन-महाजन !




. ज्युआन'दादा' वेरॉन-पवार :
आम्ही त्यांच्या नावात 'दादा' व 'पवार' हे दोन्ही शब्द वापरले त्यावरुन हा असामी नक्की काय असेल ह्याचा आपल्याला अंदाज आलाच असेल. ;)
जसे महाराष्ट्रात 'सकाळी सकाळी उठुन दादांच्या भेटीला जाऊ नये' हा अलिखित संकेत आहे त्याप्रमाणे फुटबॉलमध्येसुद्धा 'शक्यतो वेरॉनदादांच्या नादी लागु नये' असा अलिखित संकेत आहे, मग काय हो उगाच खेळता खेळता ' काय रे *डव्या, मस्ती आली का तुला ? ' अशी मुक्ताफळे कोण ऐकुन घेईल ? एकदा का भांडणे लागली की वेरॉनदादा असा तोंडाचा पट्टा सोडतात की त्यासमोर "वाटले तर अजुन ४ गोल करा पण वेरॉनदादांचे तोंड आणि हात आवरा' असेच प्रतिपक्ष म्हणतो.
तसे म्हणले तर पक्षाच्या 'मध्यफळी' ह्या पक्षबांधणीच्या कामाला जुंपलेले हे वेरॉनदादा उगाच कधी 'आघाडी'त घुसुन दांडगाई चालु करुन एखादा गोल करतील ह्याचा काही काही भरोसा नाही.
आपल्या अजितदादांच्या 'फटाफट फायली क्लियर करण्याच्या' स्टाईलप्रमाणेच ह्यांची 'फटाफट पासेस कंप्लिट करुन कधी एकदा गोल मारतो, कधी एकदा सामना संपतो व मी कधी एकदा डाकबंगल्यावर जाऊन पडतो' हीच शैली असते. ह्यांच्या 'पासेस्'च्या सुसाट वेगाच्या कामासमोर प्रतिपक्षाची सोडाच पण अहो स्वतःच्या पक्षाच्या नेतेमंडळी व नोकरशहांची फे-फे उडते.
पण कसेही असले तरी वेरॉनदादांचा एक दरारा आहे, त्यांच्यामुळे कामे होतात, प्रतिपक्ष टरकुन वागतो हे सत्य आहे !




. झेव्हियर'आबा' मॅशेरानो-पाटील :
एक जुना-जाणता, कष्टाळु, शुन्यापासुन सुरवात करुन कठोर मेहनतीने जुन्या जमान्यातल्या एक उत्तम पक्षबांधणी करणारा व पक्षाचे स्थान मजबुत करणारा 'मध्यफळी'तला नेता अशी ख्याती असलेल्या झेव्हियर'आबां'ना आता उतारवयात हायकमांडने 'कर्णधार पदाचे बक्षिस देऊन' त्यांच्या कार्याची योग्य किंमत केली असेच आम्हाला वाटते.
ही त्यांची शेवटचीच निवडणुक व आपल्या कारकिर्दीत पक्षाला 'निर्विवाद बहुमत' मिळवुन देण्याची ते इच्छा ठेवतात व आपल्या वयाचे जास्त कौतुक करुन न घेता अजुन 'मध्यफळी'त जिवाचे रान करतात.
आपल्या पक्षातल्या आघाडीच्या फायरब्रँड नेत्यांना योग्य कुमक पुरवणे, सर्व ठिकाणी पक्षनिधीची विनियोग उत्तम होतो आहे का ह्याची जातीने पहाणी करणे, कधी ग्रासरुटलेव्हलवरच्या बचावफळीतल्या 'भेगा बुजवणे' व त्यांना चुचकारुन पुन्हा उभे करणे आदी सर्व प्रकारची कामे झेव्हियरा'आबा' अगदी सराईतपणे करतात.
अनेक उन्हा-पावसात अनेक देशातल्या अनेक फिल्डवर खेळण्याचा रग्गड अनुभव पाठिशी असणारे जुने-जाणते झेव्हियर'आबा' मॅशेरानो-पाटील हे पक्षाच्या ह्या निवडणुकेच्या मोहिमेसाठी एक घटक आणि एक नेता म्हणुन अत्यंत महत्वाची असामी !



. मार्टिन'भाई' डिमिचेलिस :
महाराष्ट्राच्या राजकारणात 'भाई' एकच ... छगनभाई भुजबळ !
अर्जेंटिनाच्या संघातही "भाई" एकच ... मार्टिन'भाई' डिमिचेलिस !
मार्टिन'भाई' काय करत नाहीत म्हणुन तुम्हाला सांगु ? अहो सर्वगुणसंपन्न असे पक्षाचे आशास्थान आहे हे. तसे म्हणले तर हे "बचावफळी"च्या 'सेंटर-बॅक" ह्या पोझिशनला खेळतात.
छगनभाई जसे जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे एकटेच आमदार असतानासुद्धा सरकारी पक्षाच्या मंत्र्यांना सळो की पळो करुन सोडायचे तसेच आमचे मार्टिन'भाई' जरी कर्मयोगाने आपल्या गोलक्षेत्रात बचावासाठी एकटेच उरले तरी प्रतिपक्षाच्या 'आघाडीच्या नेत्याचे' एक चालु देत नाहीत, अगदी त्याच्या मुसक्या बांधुन त्याला परत पाठवतात व वर हल्ला परतवल्यावर आपल्या गोलपोस्टचे 'शुद्धीकरण' करुन घेतात, आता बोला !
गेल्या चॅम्पियन्स लीगमध्ये ह्यांच्या धडाधड टॅकल्ससमोर मॅन-युचे भले भले खंदे वीर साफ शरणागती पत्करुन कपाळमोक्ष करुन घेऊन गेले व ह्यांनी प्रतिपक्षाचा मोर्चा काही आपल्या 'बालेकिल्ल्यात' घुसु दिला नाही.
छगनभाईंप्रमाणे प्रतिपक्षाच्या क्षेत्रात ह्यांचा एकदा पेनल्टीवेळी उड्यांचा पट्टा सुरु झाला भल्याभल्यांची फे-फे उडते व त्या घोळात हे कधी गोल मारुन नाचत, वाजतगाजत, मिरवणुकीने आपल्या गोलक्षेत्रात परत येतात हे कुणालाच कळत नाही.
असे हे पक्षाची ताकद आणि बचाव दोन्ही असलेले .... मार्टिन'भाई' डिमिचेलिस !

And last but Not the least ...

कुठल्याही पक्षात किंवा एकंदर राजकारणतच "साहेब" ह्या उपाधीला फार मोठ्ठे महत्व आहे, आज गल्लीबोळात जरी अनेक स्वयंघोषीत साहेब दिवसागणीक निर्माण होत असले तरी खरे साहेब दोनच ... बाळासाहेब आणि पवारसाहेब.
अर्जेंटिना ह्या पक्षाचे 'साहेब' मात्र दुसर्‍या साहेबांच्या जराश्या जवळ जाणारे ... दिएगो मॅराडोनासाहेब !
'साहेब' हा विषेशणाला पात्र ठरण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते, रस्त्यावर उतरुन रक्त आटवावे लागते, विरोधकांच्या 'फायली' तयार कराव्या लागतात व वेळ येईत तशा त्या एक तर दडपाव्या लागतात किंवा खोलाव्या लागतात, पक्षाचे नेतृत्व करावे लागते, आघाडीवर लढुन विजयश्री खेचुन आणावी लागते, पराजय झाल्यास प्रांजळपणे तो स्विकारुन वर आपल्या सहकार्‍यांचे मनोधैर्य टिकवावे लागते व पुढच्या संघर्षासाठी जोमाने पुन्हा उभे रहावे लागते.
साहेब होणे ही की काही चेष्टीची बाब नाही गुरु, बहुत पापड पेलने पडते है आणि छोटी छोटी गल्तीया टाळाव्या लागतात.
मात्र 'मॅराडोना'साहेब ह्यासाठी अगदी अचुक पात्र ठरतात, त्यांचे व्यक्तिमत्वच तसे आहे.
त्यांनी पद स्विकारले व लिजंडरी 'पेले' ने त्यांच्यावर "पैशासाठी हा प्रशिक्षक झाला" असा बॉंम्ब टाकला, ह्यापेक्षा अजुन तुम्हाला वेगळा काय पुरावा हवा मॅराडोना "साहेब" असण्याचा ?
स्वतःच्या उमेदीच्या काळात "हँड ऑफ गॉड" ने का होईना १९८६ साली स्वबळावर सरकार स्थापन करुन दाखवण्याची किमया मॅराडोनासाहेबांनी केली.
ऐन भरात असताना प्रतिपक्षाच्या मैदानावर आपल्या पायांतुन निघणार्‍या फटक्यांनी व मैदानाबाहेर तोंडातुन निघणार्‍या मुक्ताफळांनी पार वाताहत करुन टाकली, स्वतःच्या पक्षाला अनेक सन्मान मिळवुन दिले.
आजही त्यांचे वय झाले असले तरी फुटबॉल विश्वात त्यांच्या शब्दाला किंमत आहे व अजुनही त्यांचे ह्या 'वर्तुळा'त स्वतःचे असे खास स्थान आहे.
असे आहेत अर्जेंटिना पक्षाचे प्रशिक्षक .... दिएगो मॅराडोना साहेब !

--------------------------------------------------------------------------
आता तुम्ही म्हणाल की अर्जेंटिना पक्षाची ताकद व कच्चे दुवे काय आहेत ?
अहो वर जे लिहले ती सगळी ताकद आहे वे तेच कच्चे दुवे आहेत.
अहो जिकडे हात घालीन तिकडे सोने काढणारे अनेक पाटील-देशमुख-पवार हे जशी काँग्रेस-राष्ट्रवादीची नेहमीची विश्वासाची ताकद असते तसे तेच सगळे 'दादा-भाई-काका-राव' वगैरे ग्रह फिरले की कच्चे दुवे बनतात.
ह्यालाच राजकारण व ह्यालाच खेळ म्हणतात.
अहो राजकारण हासुद्धा एक खेळ आहे आणि खेळसुद्धा राजकारणापासुन अजिबात अलिप्त नाही.
मग त्यांचे नियम कसे बदलतील ?

आता तुम्ही विचाराल आमचा अंदाज काय ?
अहो समोर आपला कंप्लिट बाजार उठणार हे शिवसेनेतल्या नेत्यांना माहित असतानासुद्धा ते 'स्वबळावर सत्ता' हा दावा करतातच की. तर महत्व आहे ते लढण्याला, खेळात आणि राजकारणात हार-जीत चालतच असते.
मुंबईत काँग्रेसच्या ऐन भरात असणार्‍या स.का. पाटलांची माती करणार्‍या शिवसेनेच्या ढाण्यावाघासारखीच भल्याभल्यांना धुळ चारण्याची ताकद अर्जेंटिनात नक्कीच आहे व ह्याच शिवसेनेने अविचारात किंवा अतिआत्मविश्वासात ह्यावेळी माहिममध्ये 'वहिनीसाहेब बांधेकरांसारखा' कच्चा उमेदवार देऊन जी स्वतःची माती करुन घेतली तीच मानसिकता आणि तोच अतिआत्मविश्वास ह्या अर्जेंटिना संघात आहे.

पुढचा सामना आहे तो लढावय्य जर्मनीशी, जो व्यवस्थित खेळेल तो त्यादिवशीची गेम जिंकेल, सो सिंपल !
पण अर्जेंटिनामध्ये ह्यावेळी "स्वबळावर सरकार स्थापन करण्याची पात्रता नक्कीच आहे" असे सांगतो व मी माझे ४ शब्द संपवतो.

तर ....
विचार करा पक्का आणि अर्जेंटिनाच्या चिन्हावर मारा शिक्का !

अरे येऊन येऊन येणार कोण ? अर्जेंटिनाशिवाय आहेच कोण ?

बघतोयस काय रागाने ? कच्चा खाल्ला अर्जेंटिनाने !



Tuesday, June 15, 2010

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - स्पेन : दी रेड फ्युरी ...

आले ...
ते
आले आहेत ...
फुटबॉल
विश्वचषकाच्या महासंग्रामासाठी दक्षिण आफ्रिकेच्या कुरुक्षेत्री ते डेरेदाखल झाले आहेत...

ते आले आहेत एका विजेत्याच्या उन्मादात ...
ते आले आहेत आपल्या लाखो
पाठिराख्यांच्या मुखातुन निघणार्‍या विजयी गर्जना आणि लाखो पावलांनी केलेल्या विजयी नृत्याच्या पदन्यासासह ...
ते आले आहेत ते आपल्या देशाचा राष्ट्रध्वज घेऊन, जो त्यांनी संपुर्ण पात्रता फेरीत निर्विवाद विजयाच्यादिमाखाने आणि अभिमानाने फडकत ठेवला होता व आता तोच राष्ट्रध्वज घेऊन ते सज्ज झाले आहेत ह्या विश्वचषकाचे मैदान मारण्यासाठी ...
ते आले आहेत आपल्या समोर येणार्‍या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला चिरडण्यासाठी, मैदानावर त्यांना चारीमुंड्या चीत करुन आपल्या लाखो पाठीराख्यांना आणि आपल्या राष्ट्राला एका अतुलनीय विजयश्रीची भेट देण्यासाठी ...
पात्रता फेरीतल्या १० सामन्यांमध्ये चक्क १० विजयांचे झळाळत्या सोन्यासारखे चोख यश घेऊन त्यांना आपला राष्ट्रध्वज दिखामात फडकत ठेवला. एकुण १० सामन्यांमध्ये त्यांनी तब्बल २८ गोलांची बरसात करुन व केवळ ५ गोल खाऊन त्यांनी आपला अश्वमेध १० सामन्यांमध्ये ३० गुणांसह दिमाखात पुर्ण केला.
"१० सामने - १० विजय - ० बरोबरी - ० पराभव" अशी दृष्ट लागेल अशी आकडेवारी घेऊन ते कुरुक्षेत्री दाखल झाले आहेत.
त्यांच्या स्ट्रायकर्सनी प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीच्या भिंती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळवल्या, त्यांच्या आक्रमणाच्या धडकांसमोर समोर बचावाचे काम करणारे मिडफिल्डर्स पाल्यापाचोळ्यासारखे उडुन गेले, त्यांच्या विद्युल्लतेची चपळाई घेऊन आणि वार्‍याचा वेग घेऊन मारलेल्या फटक्यांसमोर प्रतिस्पर्ध्यांचे सारे गोलरक्षक हतबद्ध होऊन चारीमुंड्या चीत झाले.
ह्यांच्या मिडफिल्डर्ससमोर प्रतिस्पर्धी प्रशिक्षक आणि मिडफिल्डर्स ह्यांनी रचलेले 'व्युव' चक्रीवादळात उडणार्‍या पालापाचोळ्यासारखे उडुन गेले, महाभारताच्या कुरुक्षेत्री संपुर्ण युद्धभुमीवर अनिर्बंध आणि बेधडक धुमाकुळ घालणार्‍या भीम-अर्जुनासारखा ह्यांच्या मिडफिल्डर्सनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात धुमाकुळ घातला व संपुर्ण वर्चस्व मिळवले. ह्यांच्या मिडफिल्डर्सनी रचलेल्या चाली पहाताना प्रतिस्पर्ध्यांची गत महाभारतासारखे चक्रव्युव भेदुन बेधडक आत घुसणार्‍या अभिमन्युकडे कौरवसेना जशी आश्चर्याने पहात बसली होती तशी झाली होती.
धारदार आक्रमणाइतकाच ह्यांचा बचावही अभेद्य, ह्यांच्या बचावपटुंनी आपल्या गोलक्षेत्रात बचावाच्या अशा कणखर भिंती उभारल्या की प्रतिपक्षी स्टायकर्स त्यावर डोके आपटुन दमले पण हा बचाव काही त्यांना भेदता आला नाही. प्रतिपक्षाची एक से एक धारदार आक्रमणे ह्या बचावफळीसमोर निष्प्रभ ठरली व त्यांना हात हालवत निघुन जावे लागले.शोलेमधला "हमारें इजाजत के बिना यहाँ परिंदाभी पर नहीं मार सकता" हा डायलॉक ह्यांच्या बचावफळीने व गोलरक्षकाने शब्दशः खरा करुन दाखवला.


आता ते आले आहेत दक्षिण आफ्रिकेतल्या मुख रणभुमीत, ते सध्या आहेत भयंकर फॉर्मात आणि जोशात, त्यांना पाठिंबा आहे तो अंगावर राष्ट्रध्वज नाचवत आरोळ्यांनी त्यांना प्रोत्साहन देणार्‍या त्यांचा लाखो देशवासियांचा आणि इतर करोडो पाठिराख्यांचा ...
ते आले आहेत मैदान मारण्याच्या इर्शेनेच, समोरच्या टीमला चिरडुन त्यांची विजयश्री मिळवण्याच्या हेतुनेच ...
ते आहेत "दी रेड फ्युरीज ... "
ते आहेत " स्पेन : दी स्पॅनिश फ्युरी , दी रेड फ्युरी ... "

स्पेन :

रियाल माद्रिदसारख्या जायंट क्लबच्या मिडफिल्डचा कणा असलेला आणि त्यांचे प्रमुख अ‍ॅटॅकिंग टॅलेंट तसेच 'प्लेमेकर' अशा विविध भुमिका बजावणार्‍या अनुभवी "झॅबी ओलेन्सो" च्या नेतॄत्वाखाली ह्यावेळी स्पेन विश्वचषकाला सामोरे जात आहेत. रियाल माद्रिद, बार्सिलोना, सेव्हिली, लिव्हरपुल , व्हॅलेंसिया अशा एकाहुन एक दादा क्लबमधुन खेळणार्‍या व त्या त्या संघाचे "सुपरस्टार" असणार्‍या खेडाळुंचा भरणा असलेला हा "टीम ऑफ चॅम्पियन्स" ह्यावेळी खरोखर विश्वचषकाची "चॅम्पियन टीम" ह्या पदासाठी आपला दावा मजबुतीने पेश करत आहेत.
१९७८ नंतर सातत्याने विश्वचषकाला पात्र ठरुनही त्यांनी मजल कधीही 'उपांत्यपुर्व सामन्याच्या पुढे" गेली नाही.
२००२ सालच्या कोरियन विश्वचषकात त्यांना काही वादग्रस्त निर्णयांमुळे कोरियाकडुन पनल्टी शुट आउटमध्ये मात खाऊन बाहेर पडावे लागले, त्यानंतर त्यांनी टीमची संपुर्ण फेररचना केली व आज त्यांनी त्यांच्या टीमला चॅम्पियन्सच्या क्षमतेला आणुन ठेवले.
२००८ सालचे युरोकपविजेत आणि २००९ च्या फिफा कॉन्फिडरेशन कपमध्ये तिसरा क्रमांक असे दिमाखदार रेकॉर्ड घेऊन ते ह्या विश्वचषकाला सामोरे जात आहेत.
मध्यंतरीच्या काळात त्यांच्या अनेक खेडाळुंनी 'इंग्लिश प्रिमियर लीग, इटालियन लीग, स्पॅनिश लीग आणि चॅम्पियन्स लीग' अशा अनेक स्पर्धा आपल्या खतरनाक आणि नैपुण्यवान खेळाने गाजवल्या व आपापल्या क्लबच्या गळ्यातले ते ताईत आहेत.
आता ते खेळणार आहेत ते मायदेशासाठी, आपल्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी व आपल्या करोडो पाठिराखांच्या आशा-अपेक्षांना योग्य न्याय देऊन त्यांना ह्या "विश्वचषकाची भेट" देण्यासाठी.

संघ :
(प्रत्येक खेडाळुच्या पुढे कंसात दिलेले त्याच्या सध्याच्या क्लबचे नाव त्या खेडाळुचा लौकिक सांगण्यास पुरेसे आहे.)

गोलरक्षक : इकर कॅसिलास (रियाल माद्रिद), पेपे रैना (लिव्हरपुल), व्हिक्टर वाल्देस (बार्सिलोना)

बचावफळी : चार्लस पुयॉल (बार्सिलोना), जेरार्ड पिके (बार्सिलोना), राऊल अल्बालियो (रियाल माद्रिद), सॅकियो रॅमॉस (रियाल माद्रिद), कार्लोस मार्चेना (व्हॅलेंसिया), अल्वॅरो अर्बिलोआ (रियाल माद्रिद), योहान कॅप्डिविला (विल्लेरियाल)

मिडफिल्डर्स : आन्द्रेयस इनियेस्टा (बार्सिलोना), शॅबी हर्नाडेझ (बार्सिलोना), चेक फॅब्रिगास (आर्सनेल), झॅबी ओलेन्सो (रियाल माद्रिद), सर्जियो बिस्किट्स (बार्सिलोना), डेव्हिड सिल्वा (व्हॅलेंसिया), झिझस नवास ( व्हिली ), झॅवी मार्टिनेझ (अ‍ॅथलेटिक बिल्बायो), जोआन मॅन्युअ माटा (व्हॅलेंसिया)

स्ट्रायकर्स : डेव्हिड व्हिला (बार्सिलोना), फर्नांडो टोरेस (लिव्हरपुल), पेड्रो ऱोड्रिगेझ (बार्सिलोना), फर्नांडो लॉरेन्ट (अ‍ॅथलेटिक बिल्बायो)


ज्यांनी स्पॅनिश लीग पाहिली असेल त्यांना टिपीकल बलदंड आणि अवाढव्य अशा स्पॅनिश बचावपटुंमधुन तुरुतुरु धावत चपळाईने गोल करुन गोलांचा अक्षरशः रतिब घालणारा एक छोट्या चणीचा 'व्हॅलेंसिया'चा स्ट्रायकर आठवत असेल, तोच हा "डेव्हिड व्हिला". ह्या सिझनमधला सर्वात जास्त चर्चेत असणारा खेळाडु. नुकतेच त्याला बार्सिलोना ह्या जायंटने तब्बल ४० दशलक्ष युरो एवढी किंमत मोजुन आपल्या संघात सामिल करुन घेतले. लियोनेल मेस्सी, पेड्रो, झ्लाटान इब्राहिमोविच अशी बलदंड आघाडीची फळी असणार्‍या बार्सिलोनाला पुढच्या सिझनला 'चॅम्पियन्स लीग' जिंकण्यासाठी आपल्या टीममध्ये 'डेव्हिड व्हिला' हवा असे वाटते ह्यातच सर्व काही आले. आजच्या घडीला जगात एक अत्यंत भरवश्याचा स्ट्रायकर अशी व्हिलाची ओळख.
गोल करण्याच्या १० संधींपैकी ९ वेळा हमखास गोल करणार अशी त्याची ख्याती, एक सुप्रिम फिनिशर. अप्रतिम पदन्यासाचे ड्रिब्लिंग कौशल्य, बॉलवर अचुक नजर व त्याचा अचुक अंदाज, दुरवरुन शॉट मारताना लागणार्‍या ताकदीची करेक्ट कॅल्क्युलेशन व अप्रतिम शारिरीक समतोल ह्या त्याच्या खास बाबी.
स्ट्रायकर असुनही आपल्या सहकार्‍यांना योग्य पासेस देण्याचा नावलौकिक व त्यामुळे कदाचित ह्याचा नावावर 'गोल असिस्ट'चेही दमदार रेकॉर्ड.

ब्रिटिश क्लब लिव्हरपुलच्या लालेलाल जर्सीमध्ये त्याहुन लालबुंद होऊन जोरदार धावणारा हा त्यांचा प्रमुख स्ट्रायकर 'फर्नांडो टोरेस', त्यांच्या व सध्या स्पेनच्या आघाडीचा प्रमुख महारथी. संघाची पणाला लागलेली इज्जत संभाळण्यासाठी नेहमीच अत्युच्च पर्फॉर्मन्स देण्याचा ह्याचा लौकिक. २००८ च्या युरो कपच्या वेळी ह्याचा साथिदार व्हिला जखमी असताना ह्याने गोल करुन आपल्या संघासाठी विजयश्री खेचुन आणली व देशाचा तब्बल ४४ वर्षांचा आंतरराष्ट्रीय चषकाचा दुष्काळ संपवला, असा हा "यदा यदा ही संघस्य, ग्लानिर्भवती मैदान ..." साठी धावुन येणारा आमचा लाडका "फर्नांडो टोरेस".
हवेतला खेळ करणार्‍यांमध्ये सर्वोत्कृष्ट, वेगवान आणि चापल्ययुक्त खेळाचा बादशहा, लाँग पासेस करेक्ट रीड करुन ते गोलमध्ये बदलण्याचे कौशल्य, काही खास ड्रिब्लिंग आणि स्प्रिंट स्कीलची खासियत, पेनल्टी स्पेशालिस्ट आणि परफेक्ट टीम प्लेयर असे टोरेसचे वर्णन करता येईल.
पण आमचा हा टोरेस शरिराने इतरांच्या जरासा नाजुक असल्याने बलदंड आणि धसमुसळा खेळ करणार्‍या बचावपटुंसमोर जरा बिचकतो, ह्याच बाबींमुळे ह्याच्या दुखापतींची संख्याही बरीच आहे, एवढीच एक चिंतेची बाब.


रेमंड त्यांच्या जाहिरातीत म्हणते ना "दी कंम्पिट मॅन ..." तसेच 'आन्द्रेयस इनियेस्टा'च्या बाबतीत म्हणतात " दी कंम्पिट फुटबॉलर ...".
फुटबॉल बॉलवर त्याचे प्रेम, त्याचा कंट्रोल वादातीत आहे. बासिलोना आणि स्पेनचा आघाडीचा फिडफिल्डर आणि "प्लेमेकर" अशी इनियेस्टाची थोडक्यात ओळख. कुठल्याही पोझिशनला खेळु शकणारा आणि संघाच्या कुठल्याही अपेक्षा पुर्ण करणारा हा त्या संघाचा मुख्य आधारस्तंभ. आघाडीच्या स्ट्रायकर्सना गोल करण्यासाठी बॉल देतादेता हा पठ्ठ्या स्वतः बॉल कधी जाळ्यात धाडतो हे प्रतिस्पर्धी संघाला कळतही नाही, पासिंगचा आव आणत क्षणार्धात पलटी मारुन लांबुन जोरदार फटक्याने बॉल जाळ्यात धाडणारा हा इनियेस्टा, पेनल्टी कॉर्नर घेणारा आणि बॉल करेक्त गोलपोस्टसमोर हळुवारपणे आणुन सोडण्याचे कौशल्य. फ्री-किकसाठी सर्वात भरोश्याचा खेळाडु.
एकदम लै भारी ड्रिब्लिंग कौशक्य, चपळता, बॉलचा अचुक अंदाज व त्यावर नजर, लहान-मोठ्ठे असे सर्वच पासेस अचुक देण्याचे व आघाडीशी योग्य समन्वय साधण्याचे कौशल्य.
अडचणीचे मुद्दे म्हणजे त्याचा फिटनेस, जरी त्याचा स्टॅमिना भयंकर असला तरी मध्यम चणीच्या शारिरयष्टीमुळे जखमी होण्याचा संभव जास्त असतो व त्याचा बिनधास्त भिडण्याचा स्वभाव ह्याची रिस्क जास्त वाढवतो. मॅन टु मॅन मार्किंगमध्ये ह्याला पॅक केल्यास हा मनाजोगता खेळ खेळु शकत नाही हा एक कच्चा दुवा.

झॅबी ओलेन्सो हा जगातल्या सर्वोत्तम मिडफिल्डर्सपैकी एक, झॅबी ओलेन्सो हा जगातल्या सर्वोत्तम 'प्ले मेकर्स'पैकी एक.
रियाल माद्रिदसारखा जायंट क्लबचा कप्तान, आघाडीचा मिडफिल्डर आणि प्लेमेकर असलेला झॅबी सध्या स्पेनच्या कप्तानीची धुरा संभाळत आहे. मिडफिल्डच्या केंद्रात खेळणारा झॅबी हा ४०-५० यार्डचे अचुक पासेस देण्यात माहिर आहे, तसेच बचावपटुंच्या गर्दीतुन योग्य वेळी आणि योग्य वेगातुन बॉल काढुन तो स्ट्रायकर्सकडे ढकलणे ही झॅबीची खासियस. इनियेस्टाप्रमाणे हा ही पेनल्टी स्पेशालिस्ट.
झॅबीच्या नावावर जास्त गोल नसले तरी त्याने असिस्ट केलेल्या आणि त्याने रचलेल्या चालीवर झालेल्या गोलांची संख्या ढीगाने आहे.

चेक / झेक फेब्रिगास ...
ज्याच्यासाठी आर्सनेल आणि बार्सिलोना ह्या २ दादा क्लबच्या सामान्य खेळाडुपासुन ते पार कॅप्टन आणि थेट मालकापर्यंत सगळ्यांनाच बोली लावायला लागली, असा हा महान योद्धा फॅब्रिगास.
अगदी लहान वयापासुन बार्सिलोनाच्या अ‍ॅकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेऊन खेळाचे बारकावे शिकलेला व स्पॅनिश फुटबॉल अगदी कट टु कट आत्मसात केलेला फॅब्रिगास हा प्रत्येक क्लबचा व खुद्द स्पेनचा आवडता खेळाडु झाला ह्यात नवल ते काय ?
अप्रतिम पासिंग कौशल्य, प्रतिस्पर्ध्याच्या गोलक्षेत्रात बेधडक घुसण्याकडेचा आणि दणकेबाज शॉट्स मारण्याकडेचा कल ह्या त्याला एक उत्तम मिडफिल्डर बनवतात पण त्याबरोबर त्याचा बॉलचा अचुक अंदाज, सहकार्‍यांशी योग्य ताळमेळ, प्रत्येकाच्या स्टाईलनुसार त्याच्याशी जुळवुन घेऊन त्याला सपोर्टिंग खेळ करण्याचे कौशल्य ह्यामुळे फॅब्रिगास हा एक उत्तम 'प्ले मेकर' म्हणुन ओळखला जातो. २५-३० यार्डावरुन मारलेली फ्री-किक सर्वांना चुकवुन अचुक जाळ्यात धाडण्यात ह्याचा हातखंड.
अजुन एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फुटबॉलमधला सर्वात सभ्य खेळाडु असा त्याचा लौकिक, सर्वात कमी बुकिंग्स आणि फाऊल त्याच्या नाववर आहेत.

जेव्हा प्रतिस्पर्ध्यांचे मिडफिल्डर्स किंवा स्ट्रायकर्स सर्वांना चुकवुन बॉल घेऊन स्पेनच्या गोलपोस्टपुढे धावत येतात त्यांना समोर दिसतो तो एक अवाढव्य शरिरयष्टी असलेला, अस्ताव्यस्त केस वाढलेला आणि दात-ओठ खाउन त्यांच्याकडे बेगुमान धावत येणारा एक राक्षस. झाले, त्यांचे निम्मे अवसान इथेच संपले व तो राक्षक त्यांच्याकडुन बॉल कधी काढुन घेतो किंवा त्याला घाबरुन हे त्याला बॉल कधी बहाल करतात हे त्यांनाही कळत नाही. तो राक्षस असतो ... पुयॉल.
पुयॉल म्हणजे स्पेनचा ( आणि बार्सिलोनाचाही ) सेंटर बॅक ह्या गोलचे रक्षण करणार्‍या बचावफळीचा मुख्य कणा.
पेनल्टीच्यावेळी आणि स्वतःच्या गोलच्या बचावावेळी हवेतला अप्रतिम खेळ हे पुयॉलचे वैशिष्ठ्य. प्रतिस्पर्ध्यांच्या मॅन टु मॅन मार्किंगमधला तज्ज्ञ. बेधडक टॅकल्स ( ज्यामुळे बहुतेकवेळा यलो / रेड कार्डाचा धनी ) , अप्रतिम क्लियरन्सेस, अगदी सहजतेने ६०-६० यार्डाच्या फ्री-किक्स आदी गोष्टी पुयॉलला जगातल्या सर्वश्रेष्ठ डिफेंडरमधला एक महत्वाचा असामी बनवतात.
ह्या सर्वांहुन अधिक म्हणजे पुयॉलचे नेतॄत्वगुण, सध्या तो बार्सिलोना ह्या क्लबचा सर्वात लोकप्रिय कर्णधार आहे.
स्वतःच्या संघासाठी "मिस्टर रिलायबल" असणारा पुयॉल हा प्रतिस्पर्ध्यांसाठी मात्र खुप धोकादायक आहे, त्याच्या एखाद्या खतरनाक टॅकलमुळे त्यांचा एखादा महत्वाचा खेळाडु जायबंदी होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊनच त्यांना पुयॉलला सामोरे जावे लागते व त्यांचा निम्मा जोश तिथेच संपते हे पुयॉलचे यश.

जगातला सर्वात श्रेष्ठ फुल बॅक कोण ही चर्चा "सॅकिओ रॅमॉस'चे नाव त्या यादीत घेतल्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. आधी होल्डिंग मिडफिल्ड किंवा सेंटर बॅकला खेळणारा रॅमॉस हळुहळु कधी साईडहुन खेळायला लागला, कधी आपल्या पोझिशनपासुन ते पार प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रापर्यंत धुमाकुळ घालु लागला व स्ट्रायकर्सना क्रॉस देऊ लागला व स्वतः डिफेंडर असुनही गोलांची बरसात करु लागला हे सगळे आश्चर्यच आहे. आजही तो कोणत्याही पोझिशनला आरामात खेळु शकतो.
आज तो रियाल माद्रिदसारख्या दादा क्लबचा प्रमुख साइडबॅक म्हणुन अभिमानाने आपले बिरुद मिरवतो.
छोट्या चणीची शरिरयष्टी असलेला रॅमॉस अत्यंत चपळाईने हालचाली व ड्र्ब्लिंगसाठी प्रसिद्ध आहे. अक्षरशः १०-१० फुट घसरत मारलेल्या त्याच्या स्लायडिंग टॅकल्स आणि त्यानंतर चपळाईने घेतलेला बॉलचा ताबा हे सगळेच पाहण्यालायक.
रॅमॉस म्हणजे चपळाई, रॅमॉस म्हणजे अ‍ॅथलिट्ससारखे कौशल्य व हवेत उड्या. ह्यामुळेच रॅमॉसला आवरायला प्रतिस्पर्ध्यांना एखाद्या पेनल्टीच्या वेळी ३-३ लोक त्याच्यामागे लावायला लागतात.
ह्याशिवाय त्याचा अप्रतिम स्टॅमिना व फिटनेस ह्या गोष्टी संघाच्या प्रशिक्षकासाठी 'आपल्या टीमचा साईड बॅक कोण?' हा प्रश्न एका फटक्यात सोडवतात.
मात्र पुयॉलप्रमाणेच अत्यंत दांडगाई व धसमुसळा खेळ करणारा रॅमॉस कधीही कार्ड घेऊन मैदानाबाहेर जाऊन आपल्या संघाची डोकेदुखी वाढवु शकतो.


इकर कॅसिलास, व्हिक्टर वाल्देस आणि पेपे रैना .... गोलसमोरच्या अभेद्य तटबंद्या !
'देवाला मागतो एक डोळा व देव देतो ३ डोळे' अशी गत स्पेनबाबत 'गोलकिपर' ह्या पोझिशनसाठी आहे. अंतिम ११ मध्ये केवळ १ गोलकिपर हवा असताना ह्यांच्याकडे ह्याचे ३ मजबुत दावेदार आहेत.
तिघेच्या तिघे सर्वोत्तम आहेत. त्यातल्या त्यात कॅसिलास व वाल्देस हे तर पहिल्या ३ मध्ये येतात.
ह्यांच्याबद्दल अधिक काही लिहण्याची गरज नाही, प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्या त्यांच्या क्लबविरुद्ध अथवा फ्रान्सविरुद्ध मारलेल्या गोलांची "बोटावर मोजण्याइतकी संख्या" हाच त्यांच्या कामगिरीचा एक उत्तम दाखला आहे.

स्पेनची ताकद :
स्पेनचा संघ हा जगातल्या सर्वोत्तम स्ट्रायकर्स, सर्वोत्तम मिडफिल्डर्स, सर्वोत्तम डिफेंडर्स आणि सर्वोत्तम गोलरक्षक ह्यांनी बनलेला आहेत ह्यात वाद नाही.
त्यामुळे ह्या प्लेयिंग ११ मधल्या कोणाही ३-४ जणांची जादु चालली तरी विजयश्री कठिण नाही.
स्पेनच्या टीममध्ये आपापल्या दादा क्लबचे नेतॄत्व करणारे पुयॉल, फॅब्रिगास, कॅसिलास, ओलेन्सो सारखे भरपुर अनुभव असलेले दिग्गज खेळत असल्याने अनुभवाची कमी नाही.
बहुतेक सर्व खेळाडुंपैकी बरेच जण सध्या एकाच क्लबमधुन खेळत असल्याने ताळमेळाची समस्या जास्त भेडसावणार नाही.
सध्या प्रचंड फॉर्मात असलेले टोरेस आणि व्हिलासारख्या खेळाडुंनी इथेही आपला जलवा दाखवला तर त्यांना रोखणे ही प्रत्येक टीमची डोकेदुखी असु शकते.
डिफेंडर्स लाईनमध्ये पिके-पुयॉल आणि अल्बालियो-रॅमॉस सारख्या जोड्या एकाच क्लबखाली खेळल्या असल्याने त्यांच्याच उत्तम समन्वय आहे व त्यामुळे ही बचावफळी भेदणे हे खरेच जिकरीचे काम आहे.

स्पेनचे कच्चे दुवे :
सध्या त्यांच्यासमोर असलेला सर्वात मोठ्ठा प्रोब्लेम म्हणजे खेळाडुंची तंदुरुस्ती.
मेन प्लेमेकर इनियेस्टा अजुनही १००% फिट नाही, टोरेस आत्ता कुठे दुखापतीतुन सावरला आहे व त्यामुळे सुरवातीला जरा जपुनच खेळेल असा अंदाज आहे.
सर्वात मोठ्ठे चॅलेंज म्हणजे इथे "टीम ऑफ चॅम्पियन्स" ला एकसंध अशा "चॅम्पियन टीम" म्हणुन खेळावे लागेल.
अपेक्षांचे ओझे, स्पेनची टीम आत्तापर्यंत सर्वोत्तम असल्याने अपेक्षांचे प्रचंड ओझे आहे, ह्या टीमवर भरपुर पैसाही लागला आहे.
विश्वचषकाच्या परंपरेनुसार "काही टॉप कन्टेडर्स सुरवातीलाच बाहेर पडतात" हे सत्य असल्याने आपल्या अति-आत्मविश्वासात हे स्पेनबाबत घडु न देण्याची काळजी ह्यांना घ्यावी लागेल.
बाकी सर्व उत्तम ... !!!

आमचा अंदाज :
सर्वच घोडे विनमध्ये आले आणि चाली बरोबर रचल्या गेल्या तर ह्यावेळचा विश्वविजेता नक्कीच "स्पेन" असेल. ह्यांच्यासाठी ड्रॉ ही तसा फार कठिण नाही.
तरीही वर्स्ट केसमध्ये अंतिम फेरी किंवा उपांत्य सामना नक्कीच अवघड नाही, ते आरामात इथपर्यंत जातील.

Friday, June 11, 2010

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - २ : फ्रान्स - दी ब्ल्युज ...

अंगाची लाहीलाही करणार्‍या कडक उन्हाळ्यानंतर आलेल्या अशाच एका रणरणत्या दुपारी अचानक आभाळ दाटुन बरसलेल्या पावसाचे थ्रिल शब्दात कसे वर्णावे हो ?

आयुष्यात मिळालेल्या पहिल्या स्व-कमायीच्या पगाराच्या पैशाचे मोल आणि त्यातुन आपल्या आप्तजनांना भेटी देण्यातले थ्रिल शब्दात कसे वर्णावे हो ?

बराच काळ वाट पाहुन व त्यासाठी कठोर परिश्रम करुन जेव्हा तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच जेव्हा आपल्या 'प्रिय' बरोबर एखाद्या छानशा संध्याकाळी कॉफीसाठी भेटण्यासाठी जाता व ती समोर येते तेव्हा हृदयात होणार्‍या धकधकीची वर्णन शब्दात कसे करतात हो ?

अवघड आहे ना ?

नक्कीच अवघड आहे, मग मला सांगा ह्या फुटबॉल वर्ल्डकपच्या पहिल्या मॅचच्या 'किकऑफ'चे वर्णन व त्याचा तो रोमांच ह्याचे वर्णन मी शब्दात कसे करु ?

६ तास, केवळ ६ तास ... काउंटडाऊन सुरु झाले आहे.

आकडे फार फसवे असतात नाही?

अहो ६ तास वाट पहातो कोण?

प्रेक्षकांच्या दॄष्टीने ऑलरेडी ह्या मॅचचा किकऑफ झाला आहे, आपापल्या देशाचे झेंडे आणि आपल्या संघाचे पोषाख वगैरे घेऊन ऑलरेडी लाखो पाठिराखे जोहान्सबर्गमध्ये डेरेदाखल झाले आहेत. ज्यांना तिकडे जाणे जमले नाही त्यांनी ऑलरेडी संध्याकाळचे प्लानिंग केले आहे, आज करोडो डोळे टीव्हीसंचाला चिकटतील, हजारो हॉटेल्स आणि पब्ज खचाखच भरतील व लाखो लिटर उत्साहवर्धक द्रव्याच्या कैफात दिलेल्या आरोळ्यांनी अजुन ६ तासानंतर सर्व फुटबॉलप्रेमी एकाच नशेत धुंद होतील.

सॉकर ... सॉकर ... सॉकर !!!
सॉकर ... सॉकर ... सॉकर !!!

घड्याळाप्रमाणे सांगायचे तर ह्या क्षणाला अजुन ६ तासानंतर एक दिमाखदार सोहळ्यानंतर ह्या स्पर्धेचे यजमान 'दक्षिण आफ्रिका' आणि अमेरिकन उपखंडातील 'मेक्सिको' हे जोहान्सबर्ग इथे तब्बल ९०००० प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या 'सॉकर सिटी स्टेडियम' वर एकमेकांशी भिडणार आहेत. जेव्हा ह्या सामन्याच्या सुरवातीची सुचना देणारी शिट्टी वाजेल तेव्हा केवळ ह्या दोन संघातल्या सामन्याची सुरवात होणार नसुन आख्ख्या जगाचे लक्ष लागुन राहिलेल्या एका महान संग्रामाचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

ह्या सामन्याचा कैफ उतरतो न उतरतो तोच तिकडे 'केप टाऊन'मध्ये फुटबॉलचे २ दिग्गज व पुर्वाश्रमीचे विजेते असे 'फ्रान्स' आणि 'उरुग्वे' भारतातल्या मध्यरात्रीच्या वेळेला आपापल्या देशाच्या राष्ट्रध्वज आपल्या अंगावर घेऊन स्टेडियमला विजयी फेरी मारण्यासाठी सज्ज झाले असतील.

हे दोन्ही सामने खेळले जाणार आहेत ते जगातल्या सर्वोत्कृष्ट अशा ३२ संघातल्या ८ गटांपैकी "गट-अ" ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या समुहात. तेव्हा आम्ही आमच्या विश्लेषणाचे प्रथम पुष्प ह्या 'गट-अ' च्या पायी अर्पण करतो.

* गट - अ :
संघ : फ्रान्स, उरुग्वे, मेक्सिको आणि यजमान दक्षिण आफ्रिका

ह्यातला प्रत्येक संघ एकमेकाशी प्रत्येकी १-१ सामान खेळेल व पुढच्या फेरीत प्रवेश करणार्‍या अंतिम २ संघात आपली वर्णी लावण्यासाठी व जमल्यास झळाळत्या विश्वचषकावर आपले नाव कोरुन आपल्या राष्ट्रातल्या पाठिराख्यांना एक अनोखी भेट देण्यासाठी प्राण पणाला लाऊन मैदानात उतरेल.

फ्रान्स :

मॅन्चेस्टर युनायटेड सारख्या दिग्गज क्लबचा अ‍ॅटॅकिंग डिफेंडर आणि साईड-बॅकचा कणा असलेल्या 'पेट्रिक इव्हरा' च्या नेतृत्वाखाली ह्यावेळी फ्रान्स संघ ह्या विश्वचषकासाठी आपला डाव मांडतो आहे. अनेक जागतीक क्लब्स गाजवणारे भरमसाट स्टार आणि त्यांची अफाट कौशल्ये ह्यांनी हा संघ संपुर्ण समतोल वाटतो आहे.
१९९८ साली एकहाती विश्वचषक जिंकुन देणार्‍या व २००६ साली फायनलमध्ये इटलीच्या माटेराझ्झीच्या छातीवर डोक्याने धक्का देऊन व नंतर 'रेड कार्ड' घेऊन मैदानाबाहेर जाणार्‍या व त्या धक्क्यातुन संपुर्ण संघ न सावरल्याने केवळ 'उपविजेते' ह्या पदावर समाधान मानावे लागलेल्या 'झिनादेन झिदान' चा फ्रान्स संघ.
१९९८ साली विश्वचषक जिंकल्यानंतर पुढच्या वेळी २००२ मध्ये ह्यांना 'फेव्हरिट' मानले जात असताना आश्चर्यकारकरित्या पहिल्याच फेरीत बाद होणारा हाच तो झिनादेन झिदानचा फ्रान्स संघ, पण ह्यावेळी तो खेळणार आहे झिदानच्या अनुपस्थितीत. झिदान ह्या टीममधुन बाहेर गेले आणि ह्यांचे नशिबही फिरले, यशाचा प्याला काठोकाठ भरुन जल्लोश साजरा करणार्‍या ह्या फ्रान्सला झिदाननंतर यशाचा एक थेंब घेण्याकरता खुप झगडावे लागत आहे.
पण १९५४ पासुन अगदी मोजके अपवाद वगळता युरोप सारख्या कठिण गटातुन नेहमीच 'पात्र' ठरणारा हा संघ.
लोकल फुटबॉलही जोरदार आहे, अनेक हुशार खेडाळु देशोदेशीचे क्लब्ज गाजवत आहेत, ह्यावेळच्या चॅम्पियन्स लीगमध्ये फ्रान्सच्याच 'लियॉन' संघाने स्पॅनिश जायंट 'रियाल माद्रिद' ह्या संघाला पाणी पाहुन त्यांना नॉक-ऑट करण्याचा भीमपराक्रम केला.

संघ

गोलरक्षक : सेड्रिक कॅरासो, ह्युगो लॉरिस

बचावफळी : ईरिक आबिदाल, पेट्रिक इव्हरा, विल्यम गॅलास, गायल क्लिची, मार्क प्लॅनस, अ‍ॅन्टानियो रिव्हेलेरी, सॅग्ना.

मिडफिल्डर्स : डैबी, डिएरा, फ्लॉरेंट मलुडा, फ्रँक रिबेरी, जेरमी टॉलॉन, योहान गॉर्कुफ्फ

फॉर्वर्ड्स : थियरी हेन्री, निकोलस अनेल्का, सिडने जियेवु, आन्द्रे सिग्नॅक

प्रशिक्षक : रेमंड डॉमनिक ( फ्रान्स )


ह्यावेळी फ्रान्सची मुख्य मदार आहे ती झिदानचा वारसदार म्हणुन नावारुपाला येत असलेल्या व सध्या जर्मनीतल्या बायर्न म्युनिक ह्या क्लबच सुपरस्टार असलेल्या 'फ्रॅंक रिबेरी' ह्याच्यावर, हा फ्रान्सचा 'प्ले मेकर' आणि आघाडीचा मिडफिल्डर आहे. कमालीच्या वेगवान हालचाली, बेघडक टॅकल्स, फ्री-किकचा बादशाह आणि फोर्वर्डसना क्रॉस पासेस देण्यात हातखंड असलेला एक अत्यंत 'तापट' खेडाळु असे रिबेरीचे वर्णन करता येईल.
आत्तापर्यंतच्या ४५ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७ गोल मारलेल्या व ११ गोलांना मदत केलेल्या रिबेरीने आत्तापर्यंत एकुण ८ वर्ल्डकप सामने खेळले आहेत व आपला एकमेव गोल हा २००६ ला स्पेन विरुद्ध मारुन फ्रान्सला १-१ बरोबरी साधण्याचा चमत्कार करणार्‍या व उरलेला वर्ल्डकप बेंचवर बसुन झिदानचा खेळ पहात घालवणार्‍या रिबेरीकडुन ह्यावेळी फ्रान्सला भरपुर अपेक्षा आहेत.


ह्यानंतर फ्रान्सच्या आक्रमणाचा भार संभाळेल तो चेल्सीचा सुपरस्टार 'निकोलस अनेल्का', दिदियर ड्रोग्बाच्या बरोबरीने ह्याने इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये गोलांचा रतिब घातला आहे. मिडफिल्डर्सबरोबर अत्यंत सुरेख ताळमेळ व पेनल्टीच्या वेळी खात्रीशिर 'हेडर' मारण्याची ख्याती असलेला अनेल्का नक्कीच फ्रान्ससाठी आशेचा किरण ठरु शकतो. आर्सनेल, रियाल माद्रिद, चेल्सी, लिव्हरपुल अशा दादा क्लबमधुन खेळलेल्या अनेल्काकडे अनुभवाची कमी नाही, फक्त आता त्याला तोच अनुभव इथे देशासाठी पणाला लावायचा आहे.
फ्रान्सकडुन ३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या अनेल्काच्या नावावर ८ गोल आहेत, ह्यावेळी फ्रान्सला नक्कीच जास्तीची अपेक्षा आहे.


चेल्सीच्या ईपीएल विजयाचे शिल्पकार जरी लँपार्ड आणि ड्रोग्बा असले तरी त्यांना मदत झाली ती "फ्लॉरेन्ट मलुडा" ह्या फ्रान्सच्या विंगरची. मैदानाच्या एका कोपर्‍यातुन नेत्रदिपक ड्रिबलिंक करत बॉल जाळ्यापर्यंत न्हेणारा व बचावपटुला चकवुन जाळ्याकडे सुरेख क्रॉस देणारा मलुडा बॉल लगदी स्ट्रायकरच्या पायात आणुन ठेवतो, तो जाळ्यात सारणे हे केवळ काम उरते. जरी मलुडाचा वैयक्तिक गोल स्कोअर कमी असला तरी त्याने क्रॉस देऊन असिस्ट केलेल्या गोलांची संख्या अफाट आहे. फ्रान्सच्या आघाडीला बॉल चारण्यासाठी मलुडासारखा 'विंगर' फार महत्वाचा ठरणार आहे.


थियरी हेन्रीसारख्या महारथ्याकडुन व रिबेरी, अनेल्का, गलास सारख्या अतिरथ्यांच्या स्पर्धेत संघाची कॅप्टनशिप पटकावणारा व मॅन-युचा फुल बॅक डिफेंडर असणारा "पेट्रिक इव्हरा" हा फ्रान्सच्या प्ले मेकिंगमध्ये नक्कीच मोठ्ठी भुमिका बजावेल. डिफेंडर लाईनपासुन थेट प्रतिस्पर्ध्याच्या गोलपर्यंत धडका मारणे, अचुक लाँग पासेस देण्याचे कौशल्य, प्रतिस्पर्धी विंगरला रोखण्याची कामगिरी आणि बॉल थ्रो इनवेळी करेक्ट पासेस ही इव्हराची वैशिष्ठ्ये.


विल्यम गॅलास हा फ्रान्सच्या बचावफळीचा मुख्य मोहरा, गोल समोरच्या बॉक्समध्ये भिंतीसारखा उभा राहणारा गॅलास. त्याच्या अवाढव्य शरिरयष्टीचा उपयोग करुन प्रतिस्पर्धी स्ट्रायकरकडुन बॉल काढुन घेण्याचे व तो क्लियर करण्याचे निर्विवाद कौशल्य. त्याच्या बेधडक स्लायडिंग टॅकल्स, चपळाईच्या हालचाली, परफेक्ट मार्किंग आणि बॉलचा अचुक अंदाज ह्या गोष्टी त्याला जगातला एक बेस्ट डिफेंडर बनवतात. गॅलासची जादु जर चालली तर त्याला ओलांडुन फ्रान्सच्या गोलपर्यंत पोहचणे ही प्रत्येक टीमची डोकेदुखी ठरणार आहे. हा सध्या 'आर्सनेल' ह्या इंग्लिश क्लबच्या बचावफळीचा महत्वाचा मोहरा म्हणुन ओळखला जातो, आता त्याच्याकडुन फ्रान्स हीच अपेक्षा ठेवणार हे नक्की.


सेड्रिक करॅसो हा फ्रान्सचा नंबर १ चा गोलरक्षक. चित्याची चपळाई, हवेत उड्या घेण्यात प्रभुत्व, पेनल्टीच्या वेळी बचावपटुंची भिंत उभी करण्यातला अभ्यास, गोलसमोर बिनधास्त धावत येऊन स्ट्रायकरला टॅकल करुन बॉल काढुन घेण्याची क्षमता.
करॅसोची सगळ्यात मोठ्ठी ताकद म्हणजे एखादा फटका त्याच्याकडुन अर्धवट अडवला गेला आणि बॉल पुन्हा प्रतिस्पर्ध्याच्या ताब्यात गेला तर पटकन योग्य पोझिशन घेऊन पुन्हा डिफेंडला उभे राहण्याची क्षमता. ह्याचा आणि बचावफळीचा योग्य ताळमेळ जमला तर फ्रान्सवर गोल चढवणे हे प्रतिस्पर्ध्यांसाठी नक्कीच आव्हान असेल.

फ़्रान्सची ताकद :

अफाट अनुभव असलेली आघाडीची फळी आणि मिडफिल्डर्सचा संच तसेच रिबेरीसारखे नवे युवा टॅलेंट. थियरी हेन्रीसारखा अनेक पावसाळे बघितलेला नेता अजुन संघात आहे. वेगवान खेळ करण्याकडेचा कल आणि आता रिबेरीसारख्या प्लेमेकरचा गवगवा.
गॅलास, इरिक अबिदाल आणि कॅरासो ह्यांचे त्रिकुट जमले तर गोल भेदणे प्रतिपक्षाला अवघड जाणार.
मलुडा आणि अनेल्का हे एकाच क्लबकडुन खेळत असल्याने समन्वयात होणारा फायदा.

फ्रान्सचे कच्चे दुवे :

अनुभव जरी प्रचंड असला तरी थियरी हेन्रीसारखा खेडाळु सध्या वय वाढल्याने तितकासा खेळ करु शकत नाही, दुखापतीची चिंता आहेच, गॅलास अजुन संपुर्ण तंदुरुस्त नाही. सराव सामन्यात चीनकडुन १-० ने मात खावी लागल्याचाही धक्का आहेच. रिबेरीचा भडकुपणा कधीही त्याला बाहेरचा रस्ता दाखवु शकतो व त्यामुळे टीम अडचणीत येऊ शकते.
प्रशिक्षक डोमनिक ची स्ट्रॅटेजी अजुन क्लियर वाटत नाही व नेतृत्वही प्रभावी वाटत नाही.
इव्हराकडे कप्तानी आल्याने टीमच्या आत किंचित नाराजी असु शकते व त्यातच त्याने 'रेसिझम'चा सुर आळवल्याने मामला बिकट झाला आहे.
प्रक्षिक्षक डॉमनिकचा रियाल माद्रिदचा स्ट्रायकर "करिम बेंझामा" ह्याला वगळण्याचा निर्णय सगळ्यांनाच धक्का देऊन गेला, आता थिररी हेन्रीच्या अनुपस्थितीत आक्रमणाची ताकद बेंझामा नसल्याने काही अंशी कमजोर होणार हे निश्चित.
शिवाय अपेक्षांचे ओझे हा फार मोठ्ठा फॅक्टर फ्रान्सला टॅकल करावा लागेल ...

आमचा अंदाज :

फ्रान्स मुश्लिलीनेच सेमीफायनलपर्यंत जाऊ शकते. फायनलचा ड्रॉ आणि चषकाचे स्वप्न अवघड आहे असे दिसतेय. पहिली फेरी मात्र विनासायास पहिल्या नंबराने पार करतील.

Wednesday, June 9, 2010

ड्रिबल, टॅकल, किक & सेव्ह : अध्याय पहिला ...

इंग्लंडच्या लिव्हरपुल ह्या क्लबचा लिजंडरी मॅनेजर 'बिल शाँक्ली' म्हणतो "Some people believe football is a matter of life and death. I'm very disappointed with that attitude. I can assure you it is much, much more important than that".

काय खोटे आहे त्यात ?
ह्यावेळच्या चॅम्पीयन्स लीगच्या वेळी मॅन्चेस्टर युनायटेडचा सुपरस्टार व इंग्लंडचा मुख्य आधारस्तंभ असलेला 'वेन रुनी' हा बायर्नच्या पहिल्या मॅचच्यावेळी अतिताणामुळे पायाच्या मसल्स फाटल्याने जखमी झाला व त्याला त्या रात्री अक्षरशः पायाला फ्रॅक्चर करुन बाहेर पडावे लागले. पण पुढच्या मॅचमध्ये मॅन-युची इज्जत पणाला लागली तेव्हा तो १००% फीट नसतानाही पुन्हा मैदानावर उतरला, परिणाम पुन्हा त्याची दुखापत वाढली.
रियालचा डिफेंडर पेपे ह्याचे चक्क डोके फुटले असतानासुद्धा हा पठ्ठ्या तात्पुरती पट्टी बांधुन पुन्हा मैदानात उतरला व गोलसमोर एका भिंतीसारखा उभा राहिला.
चेल्सीचा मुख्य आधारस्तंभ दिदियर ड्रोग्बाच्या छातीत अ‍ॅस्टॉनच्या एका प्रतिस्पर्धी मिडफिल्डरची एवढी जोरात लाथ बसते की त्याला २ मिनिटे मैदानावर तळमळत असताना पाहुन इकडे आमचे काळिज लक्ककन हालते, पण १० मिनिटाच्या विश्रांतीनंतर हा पुन्हा मैदानात येतो व अ‍ॅस्टॉनवर एका झंझावातासारखा तुटुन पडुन त्यांची पार वाताहात करतो.
लिव्हरपुलची उरलीसुरली इज्जत वाचवण्याच्या प्रयत्नात फर्नांडो टोरेसला एक अशी खतरनाक टॅकल सहन करावी लागते की ज्याला उरलेल्या सिझनसाठी बाहेर बसवतेच पण आता त्याच्या विश्वचषकातल्या सहभागावरही प्रश्नचिन्ह उभी करते, तीच गत असते ती बार्काच्या जादुई मिडफिल्डर आद्रेयस इनियेस्टाची, त्याचा सहभाग ह्या विश्वचषकात अजुन निश्चित नाही व त्याने ऑलरेडी चॅम्पीयन्स लीगचे महत्वाचे सामने बेंचवर बसुन डोळ्यात पाणी आणुन पाहिले आहेत.
आर्सनेलचा बचावपटु विल्यम गॅलास एवढ्या तडफेने प्रतिस्पर्ध्यापुढे झोकुन देतो की त्याचा परिणाम डायरेक्ट त्याचे पायाचे हाड मोडण्यात होतो व तो आजही पुन्हा फिट होऊन फ्रान्सच्या स्कॉडमध्ये सामिल होण्यासाठी झगडत आहे.

पण हे झालं त्यांच्यासमोर पैशांची रास ओतणार्‍या "प्रोफेशनल क्लब्ससाठी" , तिकडे मिळालेल्या पैशाचे मोल द्यावेच लागते नाही तर कधी लाथ बसेल ह्याची खाती नसते. तरीही हे पठ्ठे एवढे एकढे जीव तोडुन खेळतात.
कारण ?

फुटबॉल ... फुटबॉल ... फुटबॉल
फुटबॉल ... फुटबॉल ... फुटबॉल
फुटबॉल ... फुटबॉल ... फुटबॉल

जगातल्या सगळ्यात वेगवान व सुंदर खेळ.
फुटबॉल म्हणजे केवळ वार्‍याच्या वेगाने धावत जाऊन आणि चित्याच्या चपळाईने प्रतिस्पर्धी बचावपटुंना भेदत जाळ्यात बॉल धाडुन केलेला गोल नव्हे, फुटबॉल म्हणजे आपले शरिर पणाला लाऊन समोरच्या स्ट्रायकरसमोर झोकुन देऊन आपल्या गोलचा बचाव करणे नव्हे, फुटबॉल म्हणजे आपल्या हजारो पाठराख्यांच्या अखंड प्रोत्साहनाच्या आक्रंदनात केलेला जबरदस्त खेळ नव्हे, फुटबॉल असतो एक अंतिम विजय ह्या सर्व गोष्टींच्या वरचा. फुटबॉल असतो तो एक खेळ एका पॅशनचा, त्या पॅशनने केलेल्या गोल्सचा आणि त्याच इर्शेने टॅकल करुन केलेल्या नेत्रदिपक डेफेंडिंग अ‍ॅक्ट्सचा. फुटबॉलमध्ये प्रतिस्पर्ध्याला विजयची संधी दिली जात नाही किंवा आपण स्वतः जिंकण्याची वाट पाहिली जात नाही, फुटबॉल असतो तो प्राण पणाला लाऊन खेचुन आणलेल्या अंतिम विजयाचा.
फुटबॉल हा असा खेळ आहे की ज्यात २२ वेडे एका बॉलमागे जीव तोडुन धावतात, जीव खाऊन त्याला लाथा मारतात, शरिर पणाला लाऊन त्याला आडवतात आणि आणि हे सर्व आपला श्वास रोखुन पाहणारे पाठिराखे ह्या खेळाचे अंतिम विजेते असतात.

फुटबॉल म्हणजे विजय ....
फुटबॉल म्हणजे अंतिम विजय ...
फुटबॉल म्हणजे केवल विजय, विजय आणि विजय ...

हा विजय असतो तो त्या मैदानावर आपल्या पराक्रमाची शर्थ करणार्‍या व जादुई खेळ दाखवुन विजयश्री खेचुन आणणार्‍या ११ जणांचा, हा विजय असतो तो त्या सामन्यात न खेळलेल्या व बेंचवर बसुन आपल्या टीमला चियर करणार्‍या राखिव गड्यांचा, हा विजय असतो तो ह्या मैदानावरच्या अचाट लोकांच्या जादुई शक्तीला एक योग्य दिशा देऊन त्यांच्या कौशल्याला पैलु पाडुन त्याचे विजयश्रीच्या रुपाने सोने करणार्‍या मॅनेजरचा, हा विजय असतो तो ह्यांना प्रत्येक गोष्टीत आपल्या अनुभवाने आणि उपकरणांनी मदत करुन त्यांना 'फायनल जजमेंट'साठी तयार करणार्‍या सपोर्ट स्टाफचा, हा विजय असतो तो हजारोंच्या संख्येने स्टेडियममध्ये व लाखोंच्या संख्येने आपल्या टीमचे पोस्टर्स, झेंडे, पोशाख, टोप्या घेऊन येऊन उन्मादात आणि आरोळ्यांनी आपल्या टीमला प्रोत्साहन देणार्‍या व सामना जिंकल्यावर त्यांना डोक्यावर घेऊन नाचणार्‍या व हारल्यावर आरोळ्यांच्या रुपाने आपल्या संघाचे सांत्वन करुन त्यांना धीर देणार्‍या लाखो अनामिक पाठिराखांचा, हा विजय असतो तो एका विशिष्ठ क्लबचा किंवा एखाद्या राष्ट्राचा किंवा संपुर्ण मानवतेचा ...

विजय !
विजय विजय !!
विजय विजय विजय !!!

ह्या वर्षीचा स्टार प्रशिक्षक 'जोस मोरिन्हो" म्हणतो "You can have the top stars to bring the attention, you can have the best stadium, you can have the best facilities, you can have the most beautiful project in terms of marketing and all this kind of thing. But if you don't win... All the work these people are doing is forgotten".

कुठलाही विजय हा महत्वाचा असतो, मग तो एका इंग्लंडमधल्या शाळकरी टीमने समोरच्या दुसर्‍या शाळकरी टीमवर मिळवलेला विजय असो वा 'कँप नोऊ' इथे इंटर मिलानने बलाढ्य बार्सिलोनाला त्यांच्याच मैदानावर केलेला चीतपट विजय असो, विजय हा विजयच असतो आणि तो महत्वाचाच असतो.

पण इथे सामना जर २ देशांमधला असेल तर ?
हा सामना जर विश्वचषकामधला असेल तर ?
हा सामना जर विश्वषकामधल्या अंतिम लढतीचा असेल तर ?
ह्या विजयाचा आनंद तुम्ही कशात मोजणार ? ह्या विजयचे मुल्य तुम्ही कोणत्या तराजुत तोलणार ? ह्या विजयाला तुम्ही कशाची उपमा देणार ? ह्या विजयाचा जल्लोश तुम्ही कसा साजरा करणार किंवा ह्या लढतीत झालेला पराभव कसा पचवणार ? तुम्ही तुमच्या लाखो पाठिराख्यांना विजयश्रीची भेट देणार की पराभवाचे दु:ख भोगायला लावणार ? ह्या लढतीनंतर तुम्ही कोट्यावधी लोकांसमोर अभिमानाने आपले राष्ट्रगीत वाजवत "विश्वचषक" उंचावणार की ही लढत हारुन आपल्या राष्ट्राला एका दुखवट्यात लोटणार ?

कोण म्हणतो की फुटबॉल हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे ?
अहो साहेब ह्या परिस्थितीत फुटबॉल आणि ह्या अंतिम विजयाची किंमत प्राणाहुन जास्त नाही का ?

इथे हवा आहे केवळ विजय.
हा विजय मिळवण्यासाठी हवे आहेत ते विजेते ... दी चॅम्पियन्स !
आणि ही स्पर्धा आहे ती सर्वोच्च अशा फुटबॉल विश्वचषकाची !

आफ्रिका खंडातल्या सोमालियातला एक फंकार 'कान (K'naan)' म्हणतो ...
Give me freedom, give me fire, give me reason, take me higher
See the champions, take the field now, you define us, make us feel proud
In the streets our heads are lifting, as we lose our inhibition,
Celebration, it surround us, every nations, all around us

हे आहे एक सेलेब्रेशन, एक जल्लोश, एक उन्माद !
हे सेलेब्रेशन आहे ते चॅम्पियन्सचे आणि त्यांच्या देशातल्या लाखो पाठिराख्यांचे !
हा उत्तुंग यशाचा अभिमान आहे ह्या चॅम्पियन्सचा आणि त्यांच्या देशाचा !
हा आहे ............ फिफा वर्ल्ड कप - २०१०, आफ्रिका !

इथे खेळणार आहेत ते चॅम्पियन्स आणि ते खेळणार आहेत ती आपल्या देशाला हा कप जिंकुन देण्यासाठी.
बहुतेक म्हणुनच ते खेळणार आहेत ते नेहमीपेक्षा १० पट जास्त जोशाने आणि तडफेने ...
इथे खेळणार आहेत ते ड्रोग्बा, मेस्सी, टोरेस, रुनी, डेव्हिड व्हिला, रॉबिन्हो, कार्लोस तवेझ, फ्रँक रिबरी, इट्टु सारखे वार्‍याच्या वेगाने हालचाली करुन विद्युल्लतेच्या चपळाईने बॉल जाळ्यात घाडणारे स्ट्रायकर्स ...
इथे खेळणार आहेत ते इनियेस्टा, फॅब्रिगास, झॅवी, गेरार्ड, लँपार्ड,क्रिस्तियानो रोनाल्डो, काका, स्नायडर, डी रोस्सी सारखे नेत्रदिपक खेळाने व अफलातुन पासेस आणि कमालीच्या ड्रिब्लिंग स्कीलने गोल सेट करणारे मिडफिल्डर्स ...
इथे खेळणार आहेत ते टेरी, पुयॉल, पिके, राऊल अब्लालियो, गलास, फर्डिनांड, नेस्टा, कॅनवॅरो सारखे आपले प्राण झोकुन प्रतिस्पर्ध्यांच्या चाली निष्प्रभ करत गोलसमोर एक मानवी भिंत उभा करणारे आणि अफलातुन टॅकल्सनी प्रतिस्पर्धी स्टायकर्सचा घामटा काढणारे डिफेंडर्स....
इथे खेळणार आहेत ते इकर कॅसिलास, व्हिक्टर वाल्देस, वॅन डर सार, करॅसो, पेपे रैना, ज्युलियो सिझर सारखे अभेद्य गोलरक्षक ...

चॅम्पियन्स !
चॅम्पियन्स !
चॅम्पियन्स !

तुम्ही येणार ना चॅम्पियन्सचा खेळ पहायला व फुटबॉलसारख्या नितांतसुंदर गेमचा आनंद घेऊन संपुर्ण मानवतेला विजयी करायला ?
ह्या विश्वचषकाचा उद्देश तोच आहे.
तुम्ही येणार असाल तर लक्षात ठेवा ह्या खेळाचे अंतिम विजेत "तुम्ही" आहात ...

आम्ही आजपासुन पुढे शक्य तितकी ह्या खेळाची, ह्या स्पर्धेची, ह्यांच्यातल्या टीम्सची आणि त्यांच्यातल्या चॅम्पियन्सची नवी माहिती आणि रोचक घडामोडी तुमच्यासमोर आणु.
फक्त तुमचे प्रेम आणो लोभ राहु द्यात ........... आमच्यावर आणि ह्या खेळावर !

Lets rejoice in the beautiful game,
And together at the end of the day
.

We all say
When I get older I will be stronger
They’ll call me freedom, just like a wavin’ flag
When I get older I will be stronger
They’ll call me freedom, just like a wavin’ flag
So wave your flag, now wave your flag, now wave your flag

Saturday, May 1, 2010

पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले...

नमस्कार,

सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व मराठी रसिकांना कळविण्यास आनंद होतो की, मराठी नववर्षारंभाच्या मुहुर्तावर पुस्तकविश्व ह्या प्रकल्पाची (www.pustakvishwa.com) जी घोषणा करण्यात आली होती तो प्रकल्प आज १ मे २०१० रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधुन पुर्णत्वास आला आहे.

आजपासुन पुस्तकविश्व.कॉम (www.pustakvishwa.com) हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी खुले करण्यात येत आहे.

पुस्तकविश्व.कॉम येथे आपण वाचलेल्या, आवडी-नावडीच्या पुस्तकांबद्दल परिचय, परीक्षण लिहु शकता. मराठी माणसाला चर्चा करणे फार आवडीचे! म्हणुनच केवळ पुस्तकाचा परिचय/परीक्षण लिहुन थांबणे नाही, तर आपण इतरांनी लिहिलेल्या परिचयांवर चर्चा करण्याचा पर्यायही उपलब्ध आहेच.

पुस्तकविश्वच्या सुविधा इथेच संपत नाहीत, तर

आपण वाचलेली पुस्तके,
आपल्या संग्रही असलेली पुस्तके
ह्यांचा एक छानसा विदाच आपल्या खातेपानावर बाळगु शकता. ह्यातुन आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचक आपण जाणुन घेऊ शकता, त्यांच्याशी केवळ परिचय/परीक्षणांच्या धाग्यांवरच नव्हे तर वैयक्तिक चर्चाही करु शकता, (शक्य असल्यास) आवडीच्या पुस्तकांची देवघेवही करु शकता.

थोडक्यात, पुस्तक परिचय / परिक्षण, समान आवडी निवडी असलेल्या लोकांशी मैत्री आणि पुस्तक विषयांवर चर्चा असे या संकेतस्थळाचं स्वरूप असेल.

पुस्तकविश्व.कॉम येथे नवनविन सुविधा देण्याच्या प्रयत्नात टीम लोकविकास नेहमीच वचनबध्द राहील.

तर रसिकहो,

www.pustakvishwa.com येथे आजपासुन नोंदणी खुली करण्यात येत आहे. या, पहा, लिहा, वाचा.....पुस्तकवेड्यांनो, पुस्तकविश्वात रममाण होऊन जा.

- (टीम लोकविकास.)


अवांतर :

मित्रांनो, गेले काही दिवस कंपनीच्या कामामुळे, इतर वैयक्तिक गडबडींमुळे आणि सदर ’पुस्तकविश्व प्रोजेक्ट’मध्ये बिझी असल्याकारणे ह्या ब्लॊगवर नवे काही देता आले नाही व त्याबद्दल मी दिलगिर आहे. मात्र इथुन पुढे आपल्या सेवेस सातत्याने नवे लेखन देण्याचा प्रयत्न राहिल अशी मी आपणास ग्वाही देतो.

आपला आमच्यावर लोभ आहेच, फ़क्त तो असाच कायम रहावी हीच विनंती !!!


Monday, March 22, 2010

आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ...

शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची 'आय पी एल टीम' आली.
आता आम्ही वाट पहातो आहे ती टीमच्या नावाची आणि त्यातल्या खेळाडुंची.
ते येईल तेव्हा येईल पण एक (भविष्यातले) पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही "पुणेरी पाट्या" लागोलाग तयार करुन ठेवत आहोत, पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही.

* ह्या पाट्या आहेत त्या 'मैदानावरच्या' .....
१. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.
२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.
३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच !
४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.
६. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.
७. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.
८. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.
९. मैदानात विकत मिळणार्‍या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकु नयेत, बाटलीवरुन खेळाडु घसरुन पडुन जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी.
१०. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देताना हळु आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे !
११. अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये ... व्यक्तींसह !
१२. मैदानातील मोठ्ठे पंखे फक्त दुपारी आणि गर्दी असलेल्या ठिकाणीच लावण्यात येतील. पंख्याखाली बसण्यासाठी मोठ्ठ्या आवाजात भांडण करुन आयोजकांना त्रास देऊ नये.
१३. स्त्रियांचे स्वच्छतागॄह, खेळाडूंचे पॅव्हेलियन, चियरलिडर्स पोडियम, व्हीआयपी गॅलरी, पत्रकार कक्ष इत्यादी ठिकाणी उगाच जास्त घुटमळु नये.
14. सामन्यातील कसल्याही घटनेचा ( सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकुन देणे वगैरे ) राग खुर्च्यांवर काढु नये.
15. सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे खेडाळु, चियरलिडर्स, व्हीआयपी यांच्याबरोबर अथवा खेळपट्टी, पत्रकारकक्ष, समालोचन खोली, पॅव्हेलियन, व्हीआयपे बॉक्स इथे 'फोटु काढुन मिळणार नाहीत' किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही.
16. सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.
17. हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नव्हे. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.
18. पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे.
19. परदेशी खेळाडुंच्या अंगचटीला जाऊ नये तसेच त्यांना स्थानिक भाषेत गलिच्छ आणि अश्लील शिव्या देऊन वेडावुन दाखवु नयेत. ते आपले अतिथी आहेत, आपण घरात पाहुण्यांशी असे वागतो का ?
20. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा.
21. वरील सुचना ह्या चेष्टेचा विषय नव्हे ह्याची नोंद घ्यावी, ह्याची चेष्टा करणार्‍या प्रेक्षकांना संपुर्ण सामना संपोस्तोवर अंधार्‍या खोलीत बळजबरीने बसवुन ठेवले जाईल.

*** ह्या पाट्या आहेत त्या ' आयपीएल-पुणे संघाच्या कार्यालयातल्या" ....
१. फक्त दिवसाचे सामने खेळले जातील, त्यातही दुपारी १-३ असा विश्रांतीचा वेळ राखुन ठेवावा लागेल.
२. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल, कुठल्याही परिस्थीत रात्री ८ वाजता सामना संपवण्याची जबाबदारी आयोजकांची राहिल, सवड मिळाल्यास उरलेला सामना दुसर्‍या दिवशी खेळता येईल.
३. सोमवारी सुट्टी घेतली जाईल.
4. सर्व लोकांना जाहीर निवेदन देण्यात येते की "आयपीएल-पुणे संघ ( पुण्याचा अभिमान, महाराष्ट्राची शान ) " ही आमचा पुर्णपणे स्वतंत्र संघ असुन "मुंबई इंडियन्स, महाराष्ट्र" ह्या संघाशी आमचा कसलाही संबंध नाही. त्या संघाशी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी केवळ तो मराठी आहे ह्या कारणाने घेतली जाणार नाही. तसेच त्या संघाच्याविषयी आमच्याकडे कसलीच चौकशी करु नये.
5. हा क्रिकेटचा संघ आहे. उगाच गाण्याच्या स्पर्धा, नाचकामाचे कार्यक्रम, पाणपोईचे उद्घाटन, नव्या दुकानाची चित्रफीत कापणे ह्या आणि अशाच इतर कामांसाठी खेळाडुंची चौकशी अथवा मागणी करु नये.
6. क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही.
7. देणग्या मागणारे, गौरवनिधी सामने आयोजीत करणारे, सर्व्हे करणारे, फुकटात जाहीरातीसाठी कार्यक्रमाला हजरी लावण्याची विनंती करण्याची शिष्ठमंडळे आदी तत्सम व्यक्ती किंवा संस्था ह्यांना सक्त प्रवेश बंदी आहे, ह्यात कोणत्याही कारणास्तव बदल होणार नाही.
8. आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मानु नये. आमचे इथे क्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही.
9. आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असाल तर इतरांना सांगा, नसताल तर योग्य आणि सभ्य शब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.
10. आमचेकडे शाळकरी संघांना ट्रेनिंग दिले जात नाही
11. आमच्याशी ठरलेल्या करारानुसार सामना झाल्यावर आमच्याकडुन सदिच्छा म्हणुन खेळाडुंचे टी-शर्ट्स, ट्रॅक सुट्स, टोप्या, बॅटी, चेंडु अथवा तत्सम कुठलेही किमती सामान भेट मिळणार नाही. उगाच हावरटपणा करु नये.

ता.क.: बाकी सुचतील तशा नंतर अ‍ॅड करुच ...
तुर्तास एवढेच.

प्रेरणा : काही फॉर्वर्डेड मेल्स आणि पुणेरीपाटी.कॉम

Monday, March 8, 2010

महिला दिन ... "इव्हेंट" की "तळमळ" ?

आज महिला दिन.
रोजच्या आयुष्यात असंख्य रुपाने आणि हातांनी आपल्याला उपयोगी पडणार्‍या महिलांच्या कष्टाची जाण आणि त्याला जमेल तशी मानवंदना म्हणुन "महिला दिन" साजरा करणार्‍याचे ठरले. वरकर्णी पाहता त्यात चुकीचे असे काही नाही.

ह्यातुन जे काही चांगले घडते आहे त्याचे आम्हाला नक्कीच कौतुक आहे पण हे सर्व पाहताना मनात 'महिला दिन' हा दिवस पण "इव्हेंट" बनवुन त्याचा बाजार मांडला जातोय काय अशी आजकाल शंका यायला लागली.

गेल्या ३-४ दिवसांपासुन पेपरवाल्यांनी ह्या दिवसाची प्रचंड जाहिरातबाजी सुरु केली, त्यांच्या स्वतःच्या खास पुरवण्याही आज पेपराबरोबर आल्या. नेहमीप्रमाणे त्यात काही अपवाद वगळता गेल्यावेळी झळकलेल्या सुप्रसिद्ध (?) महिला ह्यावेळीही झळकताना दिसल्या. तेच सिनेमा, मॉडेलिंगमधले नेहमीचे प्लास्टिकचे चेहरे, तेच यशस्वी उद्योजिका वगैरे, त्यात जुन्या ३-४ क्रिडापटु, अजुन अशाच विविध क्षेत्रात काम करणार्‍या नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना आज पुन्हा फ्रंटपेजवर पाहुन अखेर महिलादिनाचाही "इव्हेंट" झाल्याचे कळुन आले.
आता उद्या अजुन पंतप्रधान / राष्ट्रपती / इतर उच्चपदस्थ यांची महिलांबरोबर किंवा एखाद्या 'एन जी ओ' ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढलेली छायाचित्रे, लोकल मिडियातुन लोकल एखाद्या बड्या धेंडाच्या चमच्यांनी ह्या निमित्ताने केलेला त्याचा उदोउदो, ह्या निमित्ताने महिला डॉमिनिटेड पेज-३ पार्ट्या ( दचकु नका, अशा जाहिराती होत्या ) वगैरे पहायची तयारी ठेवली आहे.

पण ह्या सर्व घोळातुन सर्वसामान्य महिलेच्या आयुष्यात नक्की काय फरक पडतो आहे ?
'महिला दिन' साजरा करणे म्हणजे केवळ गोड गोड संदेश देऊन समारंभ करणे अशा खुळात आपण किती दिवस राहणार आहोत ?
ज्यांना खरच मदतीची आणि सहानभुतीची गरज आहे अशा महिलांपर्यंत आपण केवळ ह्या महिलादिनाच्या निमित्ताने तरी पोचणार आहोत की नाही ?

- अजुनही भारतातल्या कित्येक खेड्यात आणि बर्‍यापैकी शहरातही सासुरवास किंवा सासरी केला जाणारा छळ ही प्रमुख समस्या आहे. त्याच्या अनुषंगाने हे महिलादिनवाले काय करतात ?
- रोजच्या प्रवासात, सामाजिक आयुष्यात अनेक प्रकारचे लैंगिक, मानसिक, शारिरीक अहवेलना आणि शोषण सहन करत आपले आयुष्य जगणा-या महिलांसाठी आपण आता तरी "सेफ झोन" तयार करणार आहोत की नाही ?
- अवघ्या ५ वर्ष्याच्या चिमुरडीपासुन ते थेट ७० वर्षाच्या म्हातारीवर बलात्काराच्या घटना मिडियामधुन येत असताना ह्या महिलादिनाची उपयुक्तता आणि यशस्विता ह्यावरच प्रश्नचिन्ह नाही का उभे रहात ?
( कालच कुर्ल्याला एका ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खुन केल्याची घटना महिलादिनाच्या पुर्वसंध्येला समोर आली, ह्याबाबत महिलादिनवाले काय करणार आहेत ? सामान्य पब्लिकने कालच पोलिस स्टेशनवर हल्ला बोलुन आपला निषेध नोंदवला )
- शिक्षणाची समस्या आहेच, अजुनही स्त्री केवळ "चुल आणि मुल" ह्याएवढीच मर्यादित समजली जात असेल तर तिचा कसला आलाय महिलादिन वगैरे ?
- देशातल्या काही भागात मुलगी जन्माला येताच ते नको म्हणुन तिला मारुन टाकण्याची घ्रुणास्पद प्रथा आहे, त्याच्या प्रबोधनासाठी काही संस्था काम करत आहेत पण त्यांना मदत ह्या 'हाय प्रोफाईल महिलादिनवाल्यांनी' करायला नको का ?
- सुशिक्षित आणि नोकरदार वर्गात स्त्रीयांना भेडसावणारी आणि बहुसंख्यवेळा दाबुन टाकली जाणारी "लैंगिक शोषणाची समस्या" अजुनही तेवढीच बिकट आहे.
मग तरीपण कंपन्या काही कमिट्या स्थापन करुन आपले हात कसे झटकु शकतात ?
समोर आलेल्या किती केसेसमध्ये खरोखर निष्पक्षपाती निर्णय होतो ?
बहुसंख्यवेळा मानसिक त्रासाला कंटाळुन स्त्रीयांनीच जॉब बदलल्याचे दिसते, बाकी क्रिमिनल तसाच मोकाट फिरत असतो.

असे १ नाही हजारो प्रश्न आहेत.
त्यांचे गांभिर्य व त्यानिमित्ताने त्यातुन स्त्रीयांचे आयुष्य सुखकर होण्याला आपण काही सिरीयस विचार करणार आहोत की नुसताच इव्हेंट साजरा करत राहणार आहोत ?

असो.
आज आम्ही महिलादिनाच्या निमित्ताने काय पाहिले ते सांगतो :
- मस्त साड्यावगैरे नेसुन दागदागिने घालुन आणि नटुन "इव्हेंट" साजरा करणार्‍या महिला.
- काही हॉटेलात आज महिलांना म्हणे डिस्काऊंट आहे बिलावर
( डिडन्ट मेक्स सेन्स अ‍ॅट ऑल )
- कॉर्पोरेट कंपन्यांनी काय केले तर रांगोळी, फॅशन शो, डान्स, म्युसिक अशा स्पर्धा घेऊन त्याचाही "इव्हेंट" साजरा केला. ह्याच्या निमित्ताने 'एच आर' मधल्या वरिष्ठ मुलींनी कंपनीतल्या काही कनिष्ठ आणि नवशिक्या मुलींना भरपुर राबवुन 'महिलादिन' साजरा केला.
- छान छान आणि गोड गोड भाषणे झाली, काही बाहेरुन वक्ते आले होते, ह्यानिमित्ताने 'एच आर'च्या खात्यावर ४ गुण जास्त लागले.
- रोजच्या प्रवासात शुभेच्छांची देवाणघेवाण झाली व त्यानिमित्त्ताने कुणाकुनाच्या 'लुक्स'चे कौतुक झाले ...

थॅट्स इट, असा साजरा करतो आपण एक मह्त्वाचा दिवस ...

असो, तमाम महिलावर्गालाही आमच्याकडुन महिलादिनाच्या अनेक शुभेच्छा !!!

अवांतर :
ह्या निमित्ताने "मी मराठी" ह्या संकेतस्थळावर घडत असणारी चर्चा आपल्याला इथे पाहता येईल ....

Wednesday, February 24, 2010

काय म्हणता, तुम्ही देव पाहिला नाही ?

देवाशप्पथ ( पक्षी : सचिनशप्पथ ) सांगतो काल सकाळी उठल्यावर कालचा दिवस खुप भारी असेल असे अजिबात वाटले नव्हते, त्यात देवदर्शन होईल असे तर अजिबातच वाटले नव्हते. संध्याकाळच्या ५.३० ची वेळ, नेहमीप्रमाणे गडबडीत सर्व आवरुन घरी पळायच्या गतीतली आमची सवय. कामे फ़टाफ़ट उरकणे चालु होते, एका मित्राचा फ़ोन आला, तो नुकताच खाली कॊफ़ी प्यायच्या निमित्ताने ( पोरी पहायला ) गेला होता. तो म्हणत होता पटकन खाली ये, एक भारी घटना घडते आहे व ती पहायला भाग्य लागते.
जास्त आढेवेढे न घेता आम्ही हातातले काम सोडुन खाली मॊलमध्ये गेलो.

आणि काय सांगु दोस्तहो, काल चक्क देव पहायला मिळाला.
अगदी नक्की, तो देवच होता, त्याशिवाय काय अशा अचाट लीला तो इतक्या लिलया करु शकत होता.
ह्या देवाचे मायंदळ भक्त जमले होते दर्शनासाठी, जोरदार जयघोष चालु होता व देव आपल्या भक्तांना क्षणाक्षणाला काहीतरी नविन देऊन खुष करत होता.
शंकाच नाही, देवच होता तो.

काय म्हणता ?
देव कसा दिसतो ? तो कसा बोलतो ? तो कसा चालतो ? तो काय करतो ?
काय म्हणता ?
तुम्ही अजुन देव पाहिला नाही ?



अगदी जुनी घटना आहे पहा, काळ होता १९८८ चा, मुंबईच्या आझाद मैदानावर एका १४ वर्षाच्या तरुणाच्या रुपाने एका क्रिकेटमधल्या चमत्काराने ... छे छे देवानेच अवतार घेतला होता. त्याने व त्याच्या एका शाळकरी सोबत्याने मिळुन ह्या मैदानावर ६६४ धावांची रास रचली होती व ती ही नाबाद. भल्याभल्यांच्या तोंडात बोट घालायला लावणारी ही घटना होती व देवाच्या भावी चमत्कारांची ही फ़क्त एक झलक होती.
काय सांगता ? तुम्हाला आठवत नाही कोण होता तो ?
हे पहा जरा शेजारी कोण आहे ते ...



ही घटना आहे डिसेंबर १९८९, सियालकोट पाकिस्तान मधली एक कसोटी. १६ वर्षाचं एक कोवळं पोरं मैदानावर उतरतं. बेभान आणि टारगट पब्लिकची "दुध पिता बच्चा ... घर जा" नारेबाजी चालु, ह्या पोराचा त्याला खणखणीत फ़लंदाजीद्वारे तडाखेबंद प्रतिसाद. महान गोलंदाज अब्लुद कादिरचे ह्या पोराला उचकावणे व त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये ह्या मात्र १६ वर्षाच्या पोराने त्याला खणखणीत असे ४ षटकार आणि १ चौकार लगावणे.
काय म्हणता ? कोण होता तो मुलगा ?
अहो काय सांगु, सैतानांच्या असल्या गदारोळात धिरोदत्तपणे आपल्या टिमच्या मागे उभा राहणारा तो १६ वर्षाचा कोवळा मुलगा एक देवच होता.


सन १९९०, ऒगस्टचा महिना, भारताचा इंग्लड दौरा व त्यातली एक महत्वाची कसोटी. भारताच्या इनिंगची दुसरी वेळ, बरीच पडझड झालेली, भारत अलमोस्ट पराभवाच्या छायेत. एक पोरगा पुन्हा एकदा अफ़ाट धैर्याने एका भिंतीसारखा खेळपट्टीवर उभा राहतो व आपल्या नाबाद ११९ रनांच्या जोरावर भारताचा नक्की असलेला पराभव टाळुन कसोटी अनिर्णीत ठेऊन भारताची शान राखतो.
आख्ख्या गोकुळाचा डोलारा आपल्या बोटावर सावरणा-या भगवान कॄष्णासारखाच ह्या पोराचा करिष्मा !
आपल्या साथिदारांच्या मदतीसाठी धावुन येणारा व आख्खा डोलारा सावरणारा हा पोरगा देवासमच नव्हता का ?




नोव्हेंबर १९९३ मधल्या हिरोकपच्या पहिल्या सेमीफ़ायनलची गोष्ट, जवळजवळ ८० हजार प्रे़क्षकांसमोर भारत आणि द्क्षिण आफ़्रिकेची लढत, आफ़्रिकेला हव्या आहेत शेवटच्या शटकात ६ धावा त्या सामना जिंकुन दिमाखात फ़ायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. कर्णधार अझरुद्दिन समोर यक्षप्रश्न ! संघात कपिल, प्रभाकर, कुंबळे, जवागल श्रीनाथसारखे दिग्गज गोलंदाज, चेंडु दिला जातो एका नवख्या बदली गोलंदाजाकडे. ना ह्याचा विकेट घेण्याबाबतचा दबदबा वा धावा रोखण्याचा लौकिक. पण एक महान आश्चर्य घडते, आफ़्रिकेला ह्या नवख्या गोलंदाजाच्या ६ चेंडुत केवळ ३ धावा काढता येतात व सामना भारत खिषात टाकतो.
कोण होता हा बदली जादुगर गोलंदाज ?
कुरुक्षेत्रावर कौशल्याने आपल्या रथाचे सारथ्य करुन पार्थाला योग्य त्या वेळेस योग्य त्या ठिकाणी न्हेण्या-या भगवान श्रीकॄष्णासारखेच कौशल्य ह्या बदली गोलंदाजाने त्या वेळी दाखवुन आपल्या संघाची नाव एकदम व्यवस्थितपणे किना-याला लावली ना ?


फ़ेब-मार्च १९९६ चा मोसम, वेळ होती ती वर्ल्डकपची. कौरवांच्या लक्ष लक्ष सेनेत अनिर्बंध संचार करणा-या, जो समोर येईल त्याला आपल्या अतुलनीय आणि नेत्रदिपक पराक्रमाने नेस्तनाबुद करणा-या, अपराजीत अशा अर्जुनाप्रमाणे क्रिकेटमधल्या एका योद्ध्याचा धुमाकुळ आख्ख्या स्पर्धेत चालु होता. कोणत्याच संघाच्या कोणत्याच कर्णधाराचे डावपेच त्याला रोखण्यात यशस्वी झाले नव्हते, त्याच्याकडुन अर्जुनाच्या गांडीव धनुष्यातुन निघणा-या अगणित बाणासारखीच धावांची बरसात चालु होती व त्याखाली कित्येक गोलंदाजांची कत्तल घडत होती. २ शतके आणि ३ अर्ध शतकांच्या मदतीने त्या शुर वीराने ८७.१६ च्या सरासरीने ५२३ धावांचा पाऊस ह्या स्पर्धेत पाडला.
दैवातीत कार्यच हे, यासम हाच !



सन १९९८, मार्च महिना. जगजेत्ता ऒस्ट्रेलिया संघ भारतात आपल्या विजयाच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा घेऊन आला होता, त्यांना रोखण्यात आत्तापर्यंत कोणत्याच क्रिकेट साम्राज्याला यश आले नव्हते, जिकडे हे जातील तिकडे समोरच्या संघाने त्यांना ’शरणचिठ्ठी’ लिहुन दिलेली असते. मात्र भारतात त्यांचे साफ़ पानीपत होते व कांगारु खालमानेने परत जातात, टेस्टमॆचमध्ये त्यांचा २-१ असा सरळ पराभव झालेला असतो. जरी ही मालिका हरभजनसिंगच्या जादुई फ़िरकीमुळे गाजली असली तरी फ़लंदाजीत एक सुर्य अखंड मालिकाभर तळपत होता. १ द्विशतक, २ शतके आणि १ अर्धशतक ह्यांच्या मदतीने त्याने कांगारुंच्या नाकात दम आणला होता.






ह्यावेळची युद्धभुमी होती ती म्हणजे क्रिकेटची पंढरी, काशी, मक्का, मदिना जे काही पवित्र असेल ते असे इंग्लंड, काळ होता 1999 च्या विश्वचषकाचा. ह्या महानायकाने आपल्या बॆटचे असे काही पाणी प्रतिस्पर्धी संघाला दाखवले की प्रतिस्पर्धी गोलंदाज ह्या लाटेत अक्षरश: वाहुन गेले.
ह्यावेळची एक उल्लेखनीय घटना म्हणजे ह्या दरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाले असताना वैयक्तिक दु:ख स्वत:पुरते वैयक्तिकच ठेवुन संघासाठी पुढच्या सामन्यात शतक झळकावले व त्यानंतर हे शतक आभाळाकडे बघत आपल्या वडिलांना अर्पण केले. देवाशप्पथ सांगतो त्या दिवशी अनेक रसिक त्याच्या बरोबरीने २ थेंब का होईना जरुर रडले असतील.
हाच सिलसिला त्याने पुढच्या २००३ च्या आफ्रिकेच्या वर्ल्ड कपमध्येही चालु ठेवला.
ह्यावेळी त्याने तडाखेबंद फलंदाजी करत त्याने ६७३ धावांची रास रचली, भारताला फायनलमध्ये घेऊन गेला.
त्याच्या ह्या महान कामगिरीमुळे कांगारु विश्वचषक जिंकुनसुद्धा हा "मालिकावीर" म्हणुन गौरवण्यात आला.


कसोटीत सर्वाधीक धावांचे आधी १३००० मग १४००० त्यानंतर आता १५००० धावा असे स्वत:चेच विक्रम मोडत राहणारा हा आमचा देव, कसोटीमध्ये सर्वाधिक अशा ४७ सेंच्यु-या झळकावणारा हा आमचा हिरो, २० वर्षाच्या प्रदिर्घ कारकिर्दीत १६६ कसोटी सामने खेळुन ५०+ ची अविश्वसनीय सरासरी असणारा हा फ़लंदाजांचा फ़लंदाज, ४४२ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात खेळल्याची ह्याच्य नावावर नोंद, त्यातली सलग १८५ सामन्यांमध्ये विना विश्रांती खेळण्याचा भीमपराक्रम, एक दिवसीय सामन्यांमध्ये ४६ शतकांच्या जोरावर ४५+ च्या सरासरीने १७००० ह्य्न अधिक धावांची रास, २ वेळा संघाचे नेतॄत्व कठिण वेळी संभाळण्याची कामगिरी, केवळ चौकारांच्या मदतीने शतक करण्याची जादुई कामगिरी ( एका सामन्यात २५ चौकार ) , ६१ वेळा सामनावीर आणि १५ वेळा मालिकावीर ठरण्याचा झंझावत, सौरव गांगुलीसोबत ६२७१ रनांच्या भागिदारीचा अशक्यप्राय विश्वविक्रम, २ पद्म पुरस्कार १ अर्जुन पुरस्कार १ विस्डेनचा सन्मान आणि राजीव गांधी खेलरत्न सन्मान अशा अनेक सन्मानांची रास, सभ्य माणसांच्या क्रिकेट खेळामधला सर्वात सभ्य माणुस अशी ख्याती ...
किती लिहायचे आणि किती वगळायचे ?

पण काल एक आश्चर्य घडले, असे कधी झाले नव्हते आणि असे कधी होणार नाही. हे मर्त्य मानवाचे कामच नव्हे, अशा कामगिरीसाठी काही दैवी शक्ती हव्यात अशी एक समजुत.
एका एकदिवसीय सामन्यात १४७ चेंडुंच्या मोबदल्यात २०० नाबाद धावांचा विश्वविक्रम....
जे स्वप्नातली पाहिले नव्हते ते याची देही याची डोळा अनुभवायास मिळाले.
भरुन पावलो, धन्य झालो !
आमच्या पुढच्या पिढीला "आम्ही सचिनची एक दिवसीय सामन्यामधली डब्बल सेंच्युरी पाहिली" ही आठवण सांगत आम्ही आयुष्यभर सुखी राहु ...!!!

"झाले बहु, होतील ही बहु,परंतु यासम हाच !!! "



आणि काय म्हणता ?
एवढे समळे पाहुन तुम्ही म्हणता तुम्ही अजुन देव पाहिला नाही ?
आम्ही काल देव पाहिला व त्याच्या दैवी चमत्काराने आम्ही भरुन पावलो, ह्या क्रिकेटप्रेमी जन्माचे सार्थक झाले !

वि.सु. : सर्व प्रतिमा आणि सांखिकी आंतरजालावरुन साभार .....