नमस्कार,
आज धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण १२ शके १९३२. आजच्या या शुभदिनी 'पुस्तकविश्व'चा पहिलावहिला दिवाळी अंक आपल्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा अंक ऑनलाईन तसेच पीडीएफ स्वरुपात एकाच वेळी प्रसिद्ध होत आहे.
अनुभव, पुस्तकपरिचय, लेखकांचे परिचय, मुलाखत आणि कवितासंग्रहाचे परिचय असे विविधरंगी लेखन आपणास या अंकात वाचायला मिळेल. पुस्तकविश्वचा अंक म्हणजे पुस्तक/लेखकांबद्दल असे जरी असले तरी लेखांच्या विषयात वैविध्य राखायचा प्रयत्न केला आहे.
या दिवाळी अंकाचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांची दिलखुलास मुलाखत. 'भिन्न' आणि 'ब्र' या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांबद्दल त्यां भरभरुन त्या भरभरुन बोलत आहेत, या पुस्तकांसाठी काम करतांना त्यांना आलेले अनुभव सांगत आहेत तसेच त्यांच्या इतर प्रकल्पांची माहिती देत आहेत. छापील पुस्तकांची पुढची पिढी म्हणजे डिव्हीडीवरचे पुस्तके येउ घातलीत, त्यांच्याबद्दल मत-प्रदर्शन करत आहेत.
'पुस्तकविश्व'ची सुरुवात होऊन अजून उणेपुरे वर्षही झाले नाही. या एवढ्याश्या कालखंडात त्याने छान बाळसे धरले आहे. तुम्हां सर्व पुस्तकवेड्या रसिक वाचकांमुळेच हा पल्ला आपण गाठला आहे, ही जाणीव मनी ठेवून मी आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा अंक आपणास आवडेल अशी आशा करतो.
पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०
ऑनलाईन वाचा.
डाउनलोड करा.
- व्यवस्थापन
पुस्तकविश्व डॉट कॉम