Sunday, April 27, 2008

शौर्य : नितांतसुंदर चित्रपट


परवाच एक "इंडियन आर्मी" हा बेस असलेला नितांतसुंदर चित्रपट पाहण्याचा योग आला. सर्वसाधारणपणे हे असे चित्रपट म्हणजे रक्तरंजित, बटबटीत, टाळ्या घेणारे डायलॉग, प्रखर देशभक्तीचे सिन्स याने भरलेले म्हणजे थोडक्यात पैसावसूल असतात. पण "शौर्य" हा हटके आहे, हा कुठला युद्धपट नाही तर तो आहे बॉर्डर वर लढणार्‍या सर्वासामन्य सैनीकाची मानसिकता टिपणारा एक मस्त चित्रपट , भारतीय सैन्यदलाच्या काहीश्या काळ्याबाजूला उघड करणारा आणि तरीही पैसावसूल आणि हमखास पहावा असा ....

पिक्चरची सुरवात होते साधारणता मध्यरात्री चालू असलेल्या आर्मीच्या दहशतवाद्यांना हुडकन्यासाठी चालू असणार्‍या कोंबिंग ऑपरेशनपासून. तिथे अचानक गोळीबार होऊन आर्मीतल्या एका "मेजराचा म्हणजे मेजर राठोड यांचा मॄत्यु" होतो व त्याला मारण्याचा आरोप असतो त्याच्या हाताखालच्या एका अधिकार्‍यावर म्हणजे "कॅप्टन जावेद खान" वर. मग त्याचे कोर्टमार्शल सुरू होते. हा मुस्लीम असल्याने सर्व जण त्याला दहशतवादी ठरवून मोकळे होतात व त्याची शिक्षा सुनावण्यासाठी एका औपचारीक कोर्टमार्शल मिटिंगची वाट पाहतात ...

मग एंट्री होते एका आर्मीत पेशाने वकील असणार्‍या परंतु वॄत्तीने एकंदरीत गूलछबू व ऐशाआरामी तरूणाचा म्हणजे "मेजर सिद्धांत" ची, त्याला हे सर्व म्हणजे एक नसती कटकट वाटत असते. बळजबरीने ही केस त्याच्या गळ्यात मारली जाते व त्याला "कॅप्टन जावेद खान" चा डिफेन्स करण्यासाठी नेमन्यात येते. त्याला स्पष्ट सूचना असते की कही नाही ही केस आधीच सॉल्व झालेली आहे, शिक्षा ठरलेली आहे, तुझी वकीली म्हणजे फक्त एक फॉर्मालिटी आहे आणि त्याने पण ही परिस्थीती कबूल केली असते. आता ही केस मुळात मुस्लीम दहशतवादाशी निगडीत असल्याने सर्वजण त्याला त्याच्या जास्त खोलात न शिरण्याचा सल्ला देतात. पण जेव्हा हा त्याचा अशिलाला भेटतो तेव्हा त्याची मनाला सलणारी शांतता व त्याला दॄढनिश्चयी चेहरा त्याला एका विचारात पाडतो व तो ह्या केसचा मुळापासून तपास करण्याचा निर्णय घेतो. त्यादरम्यान त्याच्याकडून निष्काळजीपणाने एका रिपोर्टरला दिलेल्या एका मुलाखतीचा परिणाम त्याला त्याच्या वरच्या अधिकार्‍याक्डून झाडण्यात होतो. एकंदरीत सर्व वरिष्ठांची मानसीकता व ही केस दाबण्याकडे असलेली वॄत्ती पाहून त्याला नक्कीच कुठे तरी पाणी मुरते आहे याची खात्री पटते व याचा व्यवस्थीत तपास करायल सुरवात करतो ...

या केसशी संबंधीत व्यक्तींचा तपास करताना तो अनेकांची गाठ घेतो व त्यांच्याकडून सत्यपरिस्थीती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यात त्याला भेटतात त्या भागाचे सर्वेसर्वा असणारे अधिकारी म्हणजे "ब्रिगेडीयर प्रताप", ह्यांची त्याच्या झालेल्या संभाषनातून व वागणूकीवरून ते अतिषय उद्दाम, निष्ठूर, हेकट व मुस्लीमांविषयी अतिशय पूर्वगॄहधिष्ठीत असलली मानसीकता या गोष्टी समोर येतात. त्यानंतर त्याची भेट होते "मेजर राठोड" यांच्या पत्नीशी, तिच्या बोलण्यातून राठोडांचा असलेला एकसूरी, निष्ठूर व दिलेल्या आज्ञांचा कुठलाही विचार न करता त्याचे पालन करणाच्या स्वभावाची ओळख पटते, स्वता: राठोडाच्या पत्नी याला खूप कटाळलेल्या असतात व त्या एक तडाजोड म्हणून संसार करत असतात. राठोडांच्या मॄत्य नंतर त्यांच्या चेहर्‍यावर आलेली "मुक्तीची भावना" सिद्धांतच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही. सर्वात शेवटी तो भेटतो "कॅप्टन जावेद खानच्या " आईला, तेथे त्यांच्या बोलण्यावरून व एकंदरीत त्यांच्या खानदानाच्या इतिहासावरून व जावेदच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीच्या आलेखावरून त्याच्या राठोडांना मारण्यामागे एक वेगळे कारण असल्याची शंका सिद्धांतला येते व तो दिशेने तपास चालू करतो. शेवटी बरेच कोर्ट सिन्स झाल्यावर त्या हत्यकांडाचा खरा शोध लागतो आर्मीच्या कोर्टासमोर या सर्व गोष्टी मांडल्यावर योग्य तो न्याय होऊन चित्रपट संपतो ...
आता प्रश्न असा आहे की हा चित्रपट का बघावा ? याचे उत्तम म्हणजे राहुल बोससारख्या संयमी अभिनेत्याची पुन्हा एक उत्तम पेशकश , केके मेनन (ब्रिगेडीअर प्रताप) चा अभिनय तर उत्तमच. शेवटी ब्रि. प्रतापची साक्ष घेतानाचा त्याचा एक १० -१२ मिनीटाचा सलग संवाद आहे. एका संतूलित, सर्वं गोष्टी आपल्या पकडी खाली असायला हव्यात आणि आपण म्हणजे मुर्तीमंत शौर्य आहोत असं मानणार्‍या ब्रि. प्रतापचा एका दुखावलेल्या बापात आणि त्याच मुळे मुस्लीमद्वेष्ट्या अधिकारार्‍यात झालेला बदल दाखवणारा अभिनय, मनिषा लांबाचा नवा लुक , जावेद जाफरी कसलाही आचरटपणा न करता केलेला रोल, दोन-तीन आणि तीही समयोचित गाणी आणि शेवटचं शाहरूखच्या आवाजातील शौर्य क्या है तर एकदम झकास. ...

तर आता प्रश्न असा येतो की शौर्याचा याच्यशी काय संबंध ? आर्मीचे शौर्य जनरली हे रणात गाजवलेल्या पराक्रमाशी निगडीत असते पण इथे तर एक अधिकारी दुसर्‍या अधिकार्‍याची हत्या करतो, हेच का ते शौर्य ? होय, हेच ते, कुठल्याही परिणामाची पर्वा न करता सर्वसामन्य नागरीकांच्या कल्याणासाठी व त्यंच्या सौरक्षणासाठी कसलीही भिती न बाळगता जावेद ने आपल्या अधिकार्‍याला घातली गोळी हे शौर्य, कुठल्याही दबावाला बळी न पडता योग्य तपास करून जावेदची सुटका करणार्‍या व ब्रिगेडीयर प्रतापांना योग्य शिक्षा घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून मेजर सिद्धांअतने दाखवलेले शौर्य, हेच ते शौर्य !!!!

पिक्चरची पटकथा अतिशय उत्तम, मांडणी झकास, घेतलेले कलाकार अतिशय बॅलेन्स्ड ....

शेवटी "शाहरूख खानच्या" शौर्य म्हणजे काय हे स्पष्ट करणार्‍या एका गद्याच्या वाचना हा नितांतसुंदर चित्रपट संपतो ...
"शौर्य क्या है ?
थरथराती हुई धरती को रौंधती फौजींयोंकी पलटन का शोर,
या सेहमेसे आसमान को चिरता हुआ बंदूकोंकी सलामी का शोर,

शौर्य क्या है ?
हरी वर्दीपर चमकते हुए चंद पितल के सितारे,
या सरहद के नाम पर खिची हुई अनदेखी लकीरोंकी नुमाईशे ?

शौर्य क्या है ?
दुर खामोश उडते हुए परिंदे को भुंदनेका अहसास,
या गोलोंकी बरसात से पलभरमे एक शहरको समशान बनानेका अहसास ?

शौर्य !!!
बारूदसे धुंदले इस आसमान मे शौर्य क्या है ?
वादियोंसे गुंजते हुए एस गावमे मातममे शौर्य क्या है ?

शौर्य ,
शायद एक हौसला ,
शायद एक हिंमत,
हमारे बहूत अंदर ,
मजहबसे बनाये इस नारे को तोडकर किसीका हात थामनेकी हिंमत ,
गोलीयों के इस शोरको अपने खामोशीसे चिरनेकी हिंतत,
मरती-मारती इस दुनीयाने निहत्ते डटे रहने की हिंमत ...

शौर्य, आने वाले कल खातीर अपने हिस्सेकी कायनात को आज बचा लेने की हिंमत ...

Saturday, April 5, 2008

मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग १


डिस्क्लेमरः
लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व.
इथे वयाचा, ज्ञानाचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा राखला जाण्याची अपेक्षा करू नये. कुणी थट्टा केली तर आपल्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडतील असं वाटणार्‍यांना अगोदरच ही सावधगिरीची सूचना!!:))यासाठी "बेस" म्हणून "मिपा" वर लिहले गेले साहित्य तसेच त्याला पडलेले प्रतिसाद हा मसाला कच्चा माल म्हणून वापरण्यात आले आहेत तरी कोणी आमच्यावर "साहित्यचोरीचा आळ" घेऊ नये, तसे झाल्यास त्या निषेघांच्या खलित्यास केराची टोपली दाखवण्यात येईल असे आम्ही नमूद करू ईच्छितो ....

.

पुण्यातील "मिपा कट्ट्याच्या" उत्तुंग यशानंतर व त्याचसुमारास दिल्लीत गाजलेल्या व शिवसेनेच्या संजय राउतांनी आयोजीत केलेल्या "मराठमोळ्या खाद्यपदार्थाच्या मेजवानीच्या" पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा "मिपा कट्टा तोही खाद्यसंभेलनासगट [ म्हणजे थोडक्यात खादाडी ] म्हणजे ज्याची थीम मिसळपाव असेल असे संभेलन " भरवण्याची मागणी जोर धरू लागली. आख्या जगभरातून खरडींचा, व्य. निंचा व फोनचा तात्यांवर मारा सुरू झाला. शेवटी सर्वानुमते हा फस्कास कार्यक्रम आयोजीत करण्याचे ठरले. "काडीसम्राट छोट्या डॉनने" यावेळीही हा कार्यक्रम आयोजीत करण्यात पुढाकार घ्यायची तयारी केली पण मागच्या वेळेसचा त्याचा "काडी टाकून " पळून जाण्याचा अनूभव जमेस धरून त्याला "तू फक्त [ जमल्यास] हजर रहायचे बघ " म्हणून परस्पर टोलवण्यात आले. शेवटी "महामहिम तात्यासाहेब, 'धुरं'धर; महापराक्रमी असलेला देशमुखांचा छावा सर्वस्वी धमाल मुलगा , इनोबा ठाकरे , विजूभाउ, डॉक्टरसाहेब, पेठकर साहेब व कांदळकर काका " अशी कार्यकारणी ठरवण्यात आली...........

आता कट्ट्यासाठीचा कारभारीपणा आपल्याकडे आहे म्हणून तात्यांनी लगेच हा कार्यक्रम "ठाण्यातच" आहे असे समजून पुढची आखणी करायला सूरवात केली पण यामुळे मोठ्ठा गोंधळ होउन शेवटी चर्चा करून सर्वमान्य ठिकाणी संभेलन घेण्याचे ठरवले. त्यानुसार चर्चा सुरु झाली. सहाजीकच त्याला अनेक फाटे फुटले, तात्या; सृलाताई; पेठकरसाहेब व बाकी मुंबईकरांच्या मते हा कार्यक्रम केव्हाही "मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या ठाण्यात किंवा गिरगावात" घ्यावा तर इनोबांनी हा कार्यक्रम "गेली १०००० वर्षे मराठी संस्कृतीची जपणूक करणाऱ्या पुण्यात घ्यावा" अशी मागणी केली व त्याला आपसूकच आनंदयात्री, केशवसुमार, छत्रपती, चित्तर, विजूभाउ, मनस्वी, भुईनाळा, संजोपराव यांचा पाठिंबा लाभला. त्यामुळे विनोबांनी आपली मागणी मान्य न झाल्यास " कार्यक्रमामध्ये घूसून राडा करण्याची धमकी" दिली. याउप्पर छोटा डॉन, स्वयंभू, आर्य, अबब च्या मते हा कार्यक्रम "दक्षिणेत घेणे योग्य" कारण त्यानिमीत्ताने आपल्याला तेथेही हातपाय पसरता येतील. त्याबरोबर लगेच डांबिसकाका, प्राजू, सर्कीट, नंदन, बेसनलाडू, कोलबेर, टिंग्याच्या मते हा कार्यक्रम म्हणजे " मराठी संस्कृतीला सातासमुद्रापार न्हेण्याची सुवर्णसंधी " आहे म्हणून तो "यक्षनगरीत" घेणे चांगले असा त्यांचा प्रतिवाद सुरु झाला. "धमाल मुलाला" काय सगळेच सारखे होते त्यामुळे त्याने "कुठही घ्या बायलीला, आपण नक्की येतेओ" असे आश्वासन दिले. आता या घोळात "कार्यक्रमाचा बोऱ्या वाजतो काय ?" या शंकेने व कदाचित विनोबांच्या धमकीचा परिणाम असेल म्हणून तात्यांनी हा कार्यक्रम "पुण्यनगरीत होणार" असे जाहीर केले. शेवटी प्रत्येकाने समझोता म्हणून "पुण्यात" यायचे ठरवले. कांदळकार काका पण औरंगाबाद वरून येण्यास तयार झाले....
तरी शेवटी सृलाताईंनी "शी बाई, काय ते पुणे ? आमच्या मुंबईत रात्री २.३० ला चहा मिळतो, पुण्यात दुपारी २.३० ला मिळायची मारामार" असा सूर लावला. त्यावर भडकून धमाल व विनोबाने दिवसाच काय पण रात्रीपण कितीही वाजता आणि काय काय म्हणजे " कॉफी, ब्रेड बटर, सॅ॑डविच, सामोसा, पोहे, अ॑डा / चिकन बिर्याणी, ऑम्लेट, भुर्जी पाव, चिकन मसाला, चिकन कलेजी, कटलेट, लस्सी, प॑जाबी डिशेस, खर्डा-झुणका भाकरी आणि सर्व प्रकारच्या दारवा " असा आख्खा पुण्याचा रात्रीचा मेनू तिच्यासमोर आदळला. त्यावर सृला ने "मला पुण्याबद्दल असे म्हणायचे नव्हते, माझ्या विधानाचा विपर्यास झाला." असे म्हणने मांडून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला व शेवटी "पुणे तिथे काय उणे ?" हे मान्य करून आपली काहीही हरकत नसल्याचे कबूल केले....

मागच्यावेळीस साध्य न झालेली गोष्ट म्हणजे "मिपाची मालकीण सर्वश्री अनुष्काभाभी" यांचा सहभाग या वेळी नक्की असेल असे तात्यांनी आश्वासन दिले त्यासाठी तात्यांनी तिला फोन केल्याची व ती "हो" म्हणाली याची खात्री पटावी म्हणून काही "फोटो" प्रसिद्ध केले. तर या कार्यक्रमाचे प्रमूख आकर्षण "अनुष्काभाभी" असणार ही जवळजवळ "काळ्या दगडावरची पांढरी रेघ " आहे अशी सर्वांची खात्री झाली.पण यात एक गोम होती, तात्यांनी " मी अनुष्काला आणतो पण या संपूर्ण कार्यक्रमासाठी बल्लवाचार्याची भूमिका सर्वश्री पेठकरकाकांनी संभाळावी " अशी अट घातली. त्यावर उसळून पेठकर साहेबांनी " आयला..... हे बरंय! आपण स्वतः अनुष्काच्या कुशीत आणि प्रभाकर पेठकर स्वयंपाक घरात काय? अन्याय आहे हा.... घोर अन्याय. थांबा... आता जेवण असे तिखट ज्ज्ज्ज्जाळ्ळ्ळ्ळ बनवून ठेवतो की दुसर्‍या दिवशी चांगलाच 'पश्चातताप' होईल. (पश्चातताप = 'मागून' होणारा ताप.)" अशी धमकी दिली. त्यावर "पुण्याच्या पेशव्यांनी" हा पश्चाताप कमी करण्यासाठी 'अस्सल बेळ्गावी लोणी (पिठ मिसळलेले का होईना!)' आणण्याचे कबूल केले.


*** शेवटी सगळ्यांच्यात "दिलजमाई" होउन शेवटी हा " कार्यक्रम पुणे मुक्कामी अनुष्काच्या उपस्थीतीत व पेठकरकाकांच्या हातून बनलेल्या मिसळीला साक्षी ठेउन होईल" असा फतवा जारी करण्यात आला.***


क्रमशः ...

Thursday, April 3, 2008

"वळू":- मराठी महासिनेमा ...

परवाच्या अतिशय छोट्या पुणे ट्रीप मध्ये "वळू" नावाचा अतिशय मोठा [ महान या अर्थी] सिनेमा बघण्याचा योग आला. त्याआधी "नेटवर" व वॄत्तपत्रातून याविषयी बरेच वाचले होते त्यामुळे सिनेमाबद्दल बर्‍याच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. यामुळेच कदाचित सिनेमाला जाताना तो एकदम तद्दन बकवास निघण्याची शक्यता वाढली होती कारण पुर्वानुभव ... पण नाही "वळू" खरच झकास आहे. खूप वर्षांनी एवढा सुंदर मराठी सिनेमा बघितल्याचे सूख लाभले ....
सिनेमाची पटकथा [ अथवा थीम ] = गावातल्या ग्रामदेवतेला वाहिलेला व आता मोकाट सुटलेला आणि डोईजड झालेला एक "बैल" पकडून त्याचा बंदोबस्त करणे. आता येवढी एका ओळीची स्टोरी असलेल्या सिनेमात हे दाखवणार काय हा प्रश्न पडू शकतो. पण बघाच ....

आता प्रथम मी जनरली आपण मराठी "अशा सिनेमाला का जात नाही ?" यासंमंधी थोडे स्पष्टीकरण देतो. काय आहे, मुळात सिनेमा आहे एका "वळू" वर, आजकालच्या "सो कॉल्ड सोफॅस्टीकेटेड मी मराठी" लोकांना "वळू" म्हणजे नक्की कोण हे माहित नसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि समजा माहित असले तरी आजकालच्या "डायनॉसॉर, ड्रॅगन, ऍनाकोंडा, गॉडझीला" सारख्या महाअतिकाय व ग्लोबल जनावरांच्या जगात तुम्ही "वळू" सारख्या "गावठी व पुचाट प्राण्यावर [ सॉरी जनावरावर] कसला पिक्चर काढता ही शंका येणे रास्त आहे. दुसरे म्हणजे जर "वळू" दाखवायचा म्हणला तर तो तुम्हाला "लंडन, लॉस एंजलीस, पॅरीस, स्विर्त्झलँड" सारख्या मनमोहक ठिकाणी दाखवता येणार नाही तो तुम्हाला एखाद्या "मागास खेडेगावातच" दाखवावा लागेल मग असे मागास खेडेगाव व ते जनावर बघण्यासाठी आम्ही कशाला पैसे घालवू असे पण वातण्याची शक्यता आहे. अजून सांगायचे म्हटल्यास पिक्चरमध्ये कुणी बडा स्टार म्हणजे हॄतीक, सलमान, शाहरूख [ आता हा आला की त्यामागोमाग अख्खे बॉलीवूड व जमल्यास काही क्रिकेटपट्टू आलेच] नसल्यामुळे पिक्चरला "फेसव्यॅल्यु" नाही. बरं, पाहायला गेले तर त्याचा दिग्दर्शक कोणी "रामू, भंसाळी, फराह खान, बडज्यात्या वा घाई" मंडळीपैकी कोणी नसल्यामुळे पिक्चरला तेवढे "ग्लॅमर" पण नाही. आता हे सर्व नसतील तर ऑबविअसली मसाला , आयटेम साँग, मनोसोक्त हाणामारी , २-४ बेड सीन्स, काही टाळ्या मिळवणारे डायलॉक, जबरदस्त लोकेशन्स नाहित. आता या सर्व गोष्टी नसतील तर कशाला आम्ही खिशाला चाट लावून थेटरात पिक्चर बघण्याचा नतद्रष्टपणा दाखवू ?
आता तुम्हाला सांगतो "वळू" का बघायचा ते ...

पिक्चरमध्ये आहे एक "सरकारी वनअधिकारी [ अतुल कुलकर्णी ] " जो महाराष्ट्राच्या एका दुर्गम भागात एका खेड्यात इमानदारीने आपली ड्युटी करत असतो. त्याच्या अखत्यारीतल्या भागात असलेल्या एका खेड्यात एका मोकाट सुटलेल्या "वळू" ला पकडायची जबाबदारी त्याच्यावर येते. आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक कर्तबगारीची कामे केलेया स्वानंदला [ बाय द वे, स्वानंद हे त्याचे नाव ] हे असले फालतू काम म्हणजे त्याचा अपमान वाटतो पण "बॉस इज ऑलवेज राईट" या ब्रिदाला स्मरून तो या " कामगिरीवर" निघतो. निघताना त्याच्या लहान भावाच्या हट्टामुळे त्यालापण बरोबर घेतो. हा भाऊ म्हणजे "हौशी माहितीपट बनवणारा" असल्याने तो "वळू कसा पकडला ?" याचा माहितीपट [ पिक्चरच्या भाषेत डॉक्युमेंट्री ] बनवायचे सर्व साहित्य बरोबर घेतो. आता ही सर्व टीम निघाली आहे एका खेड्यात आणि ते तेथे पोहचून तिथल्या ग्रामस्थांची मदत घेऊन शेवटी एकदाचे त्या "वळूला पकडण्यात" यशस्वी होतात. अशी साधारणता थीम आहे पिक्चरची.
तसे पाहायला गेले तर स्टोरीत काहिच दम नाही पण खरी कमाल आहे ती "दिग्दर्शकाची" ...

कशी ? सांगतो ...
आता आधीच सांगितल्याप्रमाणे स्वानंदच्या भावाला "डोक्युमेंट्री" बनवाय्ची असल्याने तो "स्वानंद" तिथल्या ग्रामस्थांकडून वळूबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेत असतानाच्या प्रसंगाची "डॉक्युमेंट्री" बनवायचे हा भाऊ ठरवतो. पिक्चरची सुरवात होते या प्रसंगातूनच ... यातून दिग्दर्शकाने त्या डॉक्युमेंत्रीवाल्याचा समजूतदारपणा व उत्साह, ग्रामस्थांचा उत्साह; गडबड्; अज्ञान्; चौकसपणा, त्यांचे मानसन्मान; इगो; निरागसता हे सर्व गूण अगदी चपलखपणे दाखवले आहेत. "डॉक्युमेंट्री शूट" करताना दिलेल्या सूचना "माझ्याकडे बघा, लाजू नका, फक्त डूरक्याबद्दल बोला [ बाय द वे, "डूरक्या" हा पिक्चरचा हिरो पक्षी वळू ], असे वळून बघून बोला" केवळ अप्रतिम. यावर कडी म्हणजे ही "डॉक्युमेंट्री" आपल्या टीव्ही वर दिसणार या कल्पनेने प्रत्येकाचा त्यात चमकण्याचा प्रयत्न, दूसर्‍यावर कडी करण्यासाठी खेळलेल्या चाली, ही डॉक्युमेंट्री म्हणजे आपल्या समस्या सरकारला कळवण्यासाठीचे व्यासपिठ समजून भाबडेपणाने लोकांचे "विहरीतला गाळ काढा, रस्ते सुधारा, लायटीची व्यवस्था करा, शेताबद्दलच्या समस्या" मांडणे , समजा आपली लहान पोरगी ह्यात नाचलेली दिसली तर मोठेपणी तिच्यासाठी उघडणारी फिल्मसॄष्टीची दारे असा समज , त्यावर स्वानंदने फक्त "डूरक्याबद्दल बोला" असा दिलेला दम .... सारेच उत्तम, लाजबाब ... सगळ्यात मनाला भावणारी गोष्ट म्हणजे लोकांचा निरागसपणा ....
वळू पकडण्यासारख्या शूल्लक घटनेतून त्या छोट्या गावात जे "राजकारण घडते" व ते दिग्दर्शक्शाने ज्या ताकतीने दाखवले आहे त्याला तोड नाही. गावात २ मुख्य राजकीय फळ्या , १ म्हणजे सध्या "सरपंच" असलेया वयोवॄद्ध आण्णांची [ मोहन आगाशे ] व दुसरी म्हणजे गावातले "असंतुष्ट तरूण धडाडीचे नेतॄत्व" आबा. या दोघांचीही रोल जबरदस्त, त्यांची ऍक्टींग जबरदस्त, टायमिंग जबरदस्त. त्याचबरोबर या दोघांचे के कार्यकर्ते दाखवले आहेत ते तर अजूनच "अवली आणि भाबडे" त्याला जबाब नाही ....
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पिक्चरमध्ये दाखवलेला वनअधिकार्‍याचा उत्साह, इंप्रेशन मारायचे त्याचे प्रयत्न, प्रत्येक गोष्ट एकदम सिस्टिमॅटीक पद्धतीने करण्याकडे त्याच असलेला कल, सरपंचांची प्रत्येकाला सांभाळून घेण्याची सवय, गावठी माधुरी दिक्षीत [ अमॄता सुभाषने या रोलमध्ये जान ओतली आहे ] व तिची प्रेमकहाणी , आण्णांचा विरोधक असलेल्या आबाचे त्यांच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न , गावातील अतिउत्साही कार्यकर्त्यांचे वळूला पकडसाठीचे प्रयत्न, त्यांची दिरंगाई व ढीली कार्यपद्धती, त्यांचा निरागस भाबडेपणा व अज्ञान आणि त्यांचे एकमेकावर असलेले प्रेम व आत्मियता यांचे चित्रण या सर्व गोष्टींचे उत्तम रसायन जमून एक मस्त पिक्चर बघितल्याचे सुख आपल्याला लाभते ...
सर्वात शेवटी एका माणसाचा उल्लेख केला नाही तर त्याच्यावर अन्याय होईल , तो म्हणजे गावातील एक खंदा कार्यकर्ता "जगन्या ". त्याची एकूण पळापळ, उत्साह, कार्यक्षमता या सर्व गोष्ती उत्तम रितीने त्याच्या रोलमधून दिसून येतात ...

"प्रत्येक मराठी माणसाने मरण्याच्या आधी हा पिक्चर बघावा" असा आदेश देणार्‍या व परमेश्वरावर विश्वास नसणार्‍या "श्रीराम लागूंवर" आमचा विश्वास नाही तरीपण आम्ही सांगतो "हा पिक्चर थेटरातच जरूर बघा ....".