देवाशप्पथ ( पक्षी : सचिनशप्पथ ) सांगतो काल सकाळी उठल्यावर कालचा दिवस खुप भारी असेल असे अजिबात वाटले नव्हते, त्यात देवदर्शन होईल असे तर अजिबातच वाटले नव्हते. संध्याकाळच्या ५.३० ची वेळ, नेहमीप्रमाणे गडबडीत सर्व आवरुन घरी पळायच्या गतीतली आमची सवय. कामे फ़टाफ़ट उरकणे चालु होते, एका मित्राचा फ़ोन आला, तो नुकताच खाली कॊफ़ी प्यायच्या निमित्ताने ( पोरी पहायला ) गेला होता. तो म्हणत होता पटकन खाली ये, एक भारी घटना घडते आहे व ती पहायला भाग्य लागते.
जास्त आढेवेढे न घेता आम्ही हातातले काम सोडुन खाली मॊलमध्ये गेलो.
आणि काय सांगु दोस्तहो, काल चक्क देव पहायला मिळाला.
अगदी नक्की, तो देवच होता, त्याशिवाय काय अशा अचाट लीला तो इतक्या लिलया करु शकत होता.
ह्या देवाचे मायंदळ भक्त जमले होते दर्शनासाठी, जोरदार जयघोष चालु होता व देव आपल्या भक्तांना क्षणाक्षणाला काहीतरी नविन देऊन खुष करत होता.
शंकाच नाही, देवच होता तो.
काय म्हणता ?
देव कसा दिसतो ? तो कसा बोलतो ? तो कसा चालतो ? तो काय करतो ?
काय म्हणता ?
तुम्ही अजुन देव पाहिला नाही ?
अगदी जुनी घटना आहे पहा, काळ होता १९८८ चा, मुंबईच्या आझाद मैदानावर एका १४ वर्षाच्या तरुणाच्या रुपाने एका क्रिकेटमधल्या चमत्काराने ... छे छे देवानेच अवतार घेतला होता. त्याने व त्याच्या एका शाळकरी सोबत्याने मिळुन ह्या मैदानावर ६६४ धावांची रास रचली होती व ती ही नाबाद. भल्याभल्यांच्या तोंडात बोट घालायला लावणारी ही घटना होती व देवाच्या भावी चमत्कारांची ही फ़क्त एक झलक होती.
काय सांगता ? तुम्हाला आठवत नाही कोण होता तो ?
हे पहा जरा शेजारी कोण आहे ते ...
ही घटना आहे डिसेंबर १९८९, सियालकोट पाकिस्तान मधली एक कसोटी. १६ वर्षाचं एक कोवळं पोरं मैदानावर उतरतं. बेभान आणि टारगट पब्लिकची "दुध पिता बच्चा ... घर जा" नारेबाजी चालु, ह्या पोराचा त्याला खणखणीत फ़लंदाजीद्वारे तडाखेबंद प्रतिसाद. महान गोलंदाज अब्लुद कादिरचे ह्या पोराला उचकावणे व त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये ह्या मात्र १६ वर्षाच्या पोराने त्याला खणखणीत असे ४ षटकार आणि १ चौकार लगावणे.
काय म्हणता ? कोण होता तो मुलगा ?
अहो काय सांगु, सैतानांच्या असल्या गदारोळात धिरोदत्तपणे आपल्या टिमच्या मागे उभा राहणारा तो १६ वर्षाचा कोवळा मुलगा एक देवच होता.
सन १९९०, ऒगस्टचा महिना, भारताचा इंग्लड दौरा व त्यातली एक महत्वाची कसोटी. भारताच्या इनिंगची दुसरी वेळ, बरीच पडझड झालेली, भारत अलमोस्ट पराभवाच्या छायेत. एक पोरगा पुन्हा एकदा अफ़ाट धैर्याने एका भिंतीसारखा खेळपट्टीवर उभा राहतो व आपल्या नाबाद ११९ रनांच्या जोरावर भारताचा नक्की असलेला पराभव टाळुन कसोटी अनिर्णीत ठेऊन भारताची शान राखतो.
आख्ख्या गोकुळाचा डोलारा आपल्या बोटावर सावरणा-या भगवान कॄष्णासारखाच ह्या पोराचा करिष्मा !
आपल्या साथिदारांच्या मदतीसाठी धावुन येणारा व आख्खा डोलारा सावरणारा हा पोरगा देवासमच नव्हता का ?
नोव्हेंबर १९९३ मधल्या हिरोकपच्या पहिल्या सेमीफ़ायनलची गोष्ट, जवळजवळ ८० हजार प्रे़क्षकांसमोर भारत आणि द्क्षिण आफ़्रिकेची लढत, आफ़्रिकेला हव्या आहेत शेवटच्या शटकात ६ धावा त्या सामना जिंकुन दिमाखात फ़ायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. कर्णधार अझरुद्दिन समोर यक्षप्रश्न ! संघात कपिल, प्रभाकर, कुंबळे, जवागल श्रीनाथसारखे दिग्गज गोलंदाज, चेंडु दिला जातो एका नवख्या बदली गोलंदाजाकडे. ना ह्याचा विकेट घेण्याबाबतचा दबदबा वा धावा रोखण्याचा लौकिक. पण एक महान आश्चर्य घडते, आफ़्रिकेला ह्या नवख्या गोलंदाजाच्या ६ चेंडुत केवळ ३ धावा काढता येतात व सामना भारत खिषात टाकतो.
कोण होता हा बदली जादुगर गोलंदाज ?
कुरुक्षेत्रावर कौशल्याने आपल्या रथाचे सारथ्य करुन पार्थाला योग्य त्या वेळेस योग्य त्या ठिकाणी न्हेण्या-या भगवान श्रीकॄष्णासारखेच कौशल्य ह्या बदली गोलंदाजाने त्या वेळी दाखवुन आपल्या संघाची नाव एकदम व्यवस्थितपणे किना-याला लावली ना ?
फ़ेब-मार्च १९९६ चा मोसम, वेळ होती ती वर्ल्डकपची. कौरवांच्या लक्ष लक्ष सेनेत अनिर्बंध संचार करणा-या, जो समोर येईल त्याला आपल्या अतुलनीय आणि नेत्रदिपक पराक्रमाने नेस्तनाबुद करणा-या, अपराजीत अशा अर्जुनाप्रमाणे क्रिकेटमधल्या एका योद्ध्याचा धुमाकुळ आख्ख्या स्पर्धेत चालु होता. कोणत्याच संघाच्या कोणत्याच कर्णधाराचे डावपेच त्याला रोखण्यात यशस्वी झाले नव्हते, त्याच्याकडुन अर्जुनाच्या गांडीव धनुष्यातुन निघणा-या अगणित बाणासारखीच धावांची बरसात चालु होती व त्याखाली कित्येक गोलंदाजांची कत्तल घडत होती. २ शतके आणि ३ अर्ध शतकांच्या मदतीने त्या शुर वीराने ८७.१६ च्या सरासरीने ५२३ धावांचा पाऊस ह्या स्पर्धेत पाडला.
दैवातीत कार्यच हे, यासम हाच !
सन १९९८, मार्च महिना. जगजेत्ता ऒस्ट्रेलिया संघ भारतात आपल्या विजयाच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा घेऊन आला होता, त्यांना रोखण्यात आत्तापर्यंत कोणत्याच क्रिकेट साम्राज्याला यश आले नव्हते, जिकडे हे जातील तिकडे समोरच्या संघाने त्यांना ’शरणचिठ्ठी’ लिहुन दिलेली असते. मात्र भारतात त्यांचे साफ़ पानीपत होते व कांगारु खालमानेने परत जातात, टेस्टमॆचमध्ये त्यांचा २-१ असा सरळ पराभव झालेला असतो. जरी ही मालिका हरभजनसिंगच्या जादुई फ़िरकीमुळे गाजली असली तरी फ़लंदाजीत एक सुर्य अखंड मालिकाभर तळपत होता. १ द्विशतक, २ शतके आणि १ अर्धशतक ह्यांच्या मदतीने त्याने कांगारुंच्या नाकात दम आणला होता.
ह्यावेळची युद्धभुमी होती ती म्हणजे क्रिकेटची पंढरी, काशी, मक्का, मदिना जे काही पवित्र असेल ते असे इंग्लंड, काळ होता 1999 च्या विश्वचषकाचा. ह्या महानायकाने आपल्या बॆटचे असे काही पाणी प्रतिस्पर्धी संघाला दाखवले की प्रतिस्पर्धी गोलंदाज ह्या लाटेत अक्षरश: वाहुन गेले.
ह्यावेळची एक उल्लेखनीय घटना म्हणजे ह्या दरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाले असताना वैयक्तिक दु:ख स्वत:पुरते वैयक्तिकच ठेवुन संघासाठी पुढच्या सामन्यात शतक झळकावले व त्यानंतर हे शतक आभाळाकडे बघत आपल्या वडिलांना अर्पण केले. देवाशप्पथ सांगतो त्या दिवशी अनेक रसिक त्याच्या बरोबरीने २ थेंब का होईना जरुर रडले असतील.
हाच सिलसिला त्याने पुढच्या २००३ च्या आफ्रिकेच्या वर्ल्ड कपमध्येही चालु ठेवला.
ह्यावेळी त्याने तडाखेबंद फलंदाजी करत त्याने ६७३ धावांची रास रचली, भारताला फायनलमध्ये घेऊन गेला. त्याच्या ह्या महान कामगिरीमुळे कांगारु विश्वचषक जिंकुनसुद्धा हा "मालिकावीर" म्हणुन गौरवण्यात आला.
ह्यावेळी त्याने तडाखेबंद फलंदाजी करत त्याने ६७३ धावांची रास रचली, भारताला फायनलमध्ये घेऊन गेला. त्याच्या ह्या महान कामगिरीमुळे कांगारु विश्वचषक जिंकुनसुद्धा हा "मालिकावीर" म्हणुन गौरवण्यात आला.
कसोटीत सर्वाधीक धावांचे आधी १३००० मग १४००० त्यानंतर आता १५००० धावा असे स्वत:चेच विक्रम मोडत राहणारा हा आमचा देव, कसोटीमध्ये सर्वाधिक अशा ४७ सेंच्यु-या झळकावणारा हा आमचा हिरो, २० वर्षाच्या प्रदिर्घ कारकिर्दीत १६६ कसोटी सामने खेळुन ५०+ ची अविश्वसनीय सरासरी असणारा हा फ़लंदाजांचा फ़लंदाज, ४४२ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात खेळल्याची ह्याच्य नावावर नोंद, त्यातली सलग १८५ सामन्यांमध्ये विना विश्रांती खेळण्याचा भीमपराक्रम, एक दिवसीय सामन्यांमध्ये ४६ शतकांच्या जोरावर ४५+ च्या सरासरीने १७००० ह्य्न अधिक धावांची रास, २ वेळा संघाचे नेतॄत्व कठिण वेळी संभाळण्याची कामगिरी, केवळ चौकारांच्या मदतीने शतक करण्याची जादुई कामगिरी ( एका सामन्यात २५ चौकार ) , ६१ वेळा सामनावीर आणि १५ वेळा मालिकावीर ठरण्याचा झंझावत, सौरव गांगुलीसोबत ६२७१ रनांच्या भागिदारीचा अशक्यप्राय विश्वविक्रम, २ पद्म पुरस्कार १ अर्जुन पुरस्कार १ विस्डेनचा सन्मान आणि राजीव गांधी खेलरत्न सन्मान अशा अनेक सन्मानांची रास, सभ्य माणसांच्या क्रिकेट खेळामधला सर्वात सभ्य माणुस अशी ख्याती ...
किती लिहायचे आणि किती वगळायचे ?
पण काल एक आश्चर्य घडले, असे कधी झाले नव्हते आणि असे कधी होणार नाही. हे मर्त्य मानवाचे कामच नव्हे, अशा कामगिरीसाठी काही दैवी शक्ती हव्यात अशी एक समजुत.
एका एकदिवसीय सामन्यात १४७ चेंडुंच्या मोबदल्यात २०० नाबाद धावांचा विश्वविक्रम....
जे स्वप्नातली पाहिले नव्हते ते याची देही याची डोळा अनुभवायास मिळाले.
भरुन पावलो, धन्य झालो !
आमच्या पुढच्या पिढीला "आम्ही सचिनची एक दिवसीय सामन्यामधली डब्बल सेंच्युरी पाहिली" ही आठवण सांगत आम्ही आयुष्यभर सुखी राहु ...!!!
"झाले बहु, होतील ही बहु,परंतु यासम हाच !!! "
आणि काय म्हणता ?
एवढे समळे पाहुन तुम्ही म्हणता तुम्ही अजुन देव पाहिला नाही ?
आम्ही काल देव पाहिला व त्याच्या दैवी चमत्काराने आम्ही भरुन पावलो, ह्या क्रिकेटप्रेमी जन्माचे सार्थक झाले !
वि.सु. : सर्व प्रतिमा आणि सांखिकी आंतरजालावरुन साभार .....