Monday, April 15, 2013

We are not here to make friends ... खरंच ?

मी शक्यतो व्यक्तिचित्रं वगैरे लिहीत नाही....

माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या घटना आणि त्याच्याशी संबंधित असणारे अनेक लोक ह्यांबाबत कधी ब्लॊगवर काही लिहीत नाही, मला ते तितकेसे आवडत नाही....
तसेच आपण काम करत असलेल्या जागेबद्दल आणि तिथे घडत असलेल्या घटनांबद्दल ब्लॊगवर लिहणे हे ही मला तितकेसे योग्य वाटत नाही....
पण आज थोडंसं हे सर्व बाजुला ठेऊन ४ शब्द लिहावेसे वाटत आहेत.

सध्या तसं पाहता आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ कुठे जात असेल तर ऑफ़िसात. दिवसातले जागेपणातले महत्वाचे निदान ९-१० तास तरी आपण ऑफ़िसात असतो. इथे मग अनेक लोकांशी आपला संबंध येतो. मुळात ऑफिस म्हणजे काय तर जिथे ४ लोक एकत्र जमुन मी जे काही करतो ते सगळ्यात भारी कसे आहे आणि त्यामुळे कंपनीला अमुकतमुक फायदा कसा होतो हे सांगायचा प्रयत्न करत असतात ती जागा, ऑफिस म्हणजे काय तर हेच ४ लोक जरा चान्स मिळाला की भले दुसर्याच्या डोक्यावर पाय देऊन का होईना पण पदजेष्ठतेच्या वरच्या पायरीवर जायचा प्रयत्न करतात ती जागा .. भले ह्याला मग फास्ट ट्रॅक करियर वगैरे म्हणतही असतील, ऑफिस म्हणजे काय तर ज्याच्याशी आपले पटत नाही किंवा समोरच फारच स्पष्ट आणि खरे बोलतो हे लक्षात आल्यावर इतर ३ जणांनी कंपु करुन त्याला कुठे ना कुठे दाबायला बघणे आणि त्याला होणार्या त्रासात स्वतःला सुख मानुन घेण्याची जागा, ऑफिस म्हणजे काय तर वरच्या पोझिशनसाठी आणि हेवी पे-पॅकेजेससाठी जमेल ती तडजोड करणे आणि त्याला नंतर अॅाजिलीटी/व्हर्साटाईल असल्याचे गोंडस नाव देणे ... असे बरेच काही लिहता येईल आणि ते बहुतांशी खरेच आहे. ऑफिसमध्ये वर लिहले आहे असे काही घडत नाही असे ज्यांना वाटते ते साधुसंत आहेत असे माझे प्रामाणिक मत आहे आणि ते हिमालयात जायचे सोडुन चुकुन ह्या सिमेंटच्या जंगलात आले आहेत असेही मला वाटते.


ऑफ़िसमध्ये शक्यतो एक समंजसपणाचा मुखवटा चढवुनच रहावे लागते, ह्याची गंमत अशी की ह्यामुळे समोर पाहताच मुस्काटात मारावी अशी इच्छा होत असुनसुद्धा एखाद्याशी उगाच गोडगोड बोलावे लागते ...तर दुसरीकडे एखादा अगदी आपल्यासारखाच आहे आणि तो आपला परफ़ेक्ट दोस्त बनु शकतो हे कळत असतानाही काही अलिखित ऒफ़िशियल कारणांमुळे आपण त्याच्याशी हवे तेवढे मोकळेपणाने वागु शकत नाही .. मुखवट्याची कृपा.
एवढी सगळी लफडी असताना आणि स्वतःला प्रोजेक्ट करायचे एवढे काम बाकी असताना ऑफिसात दोस्ती वगैरे करायचा भानगडी हव्यातच कशाला? दोस्ती वगैरे ठिक आहे हो, पण उद्या हाच दोस्त आपल्या प्रमोशनच्या रस्त्यात दत्त म्हणुन उभा राहिला किंवा ह्याच्या तिथे असण्यामुळे आपले एखादे भारी ट्रेनिंग किंवा ऑनसाईट व्हिसिट वगैरे धोक्यात येत असेल तर ह्याचय दोस्तीचे काय लोणचे घालायचे ? बरं, समजा मी ह्याच्यासाठी शक्य त्या तडजोडी केल्या आणि समोरुन त्याने काहीच न करता जिथे चान्स मिळेल तिकडे चान्स मारला तर मी तक्रार तरी कुणाकडे करायची ? एकंदरीत हे रिस्कीच प्रकरण नाही का ?

म्हणुनच बरेच जाणकार सांगतात की ऑफिसात शक्यतो प्रेमाच्या आणि दोस्तीच्या फंदात पडु नये .. पहिले जमले, दुसरे साफच गंडले, असो.
पण काहीही असले तरी मी शक्यतो ऒफ़िसात मित्र बनवत नाही, त्या मित्रांचा त्रास होतो, त्रास होतो म्हणजे असा की त्यांच्या अपरिहार्य असणा-या दुरावण्यामुळे त्रास होतो, असा अनुभव निदान २-३ वेळा घेऊन झाला आहे त्यांमुळे आजकाल जरासा मी सावधच असतो, उगाच पटकन कोणीतरी यायचा आणि दोस्त होऊन जायचा, ही साली दोस्ती नंतर उदाहरणार्थ गंमतच होऊन बसते. त्यापेक्षा आपलं मुन्नाभाईमधल्या जे. अस्थाना ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे "We are not here to make friends" हे पाळावे आणि निदान ऒफ़िसात मित्र वगैरे बनवायच्या भानगडीत पडु नये. शाळा / कॊलेजात बनणारे मित्र हे शक्यतो आपल्यासारखे येड** असल्याने त्यांचा कधी त्रास होत नाही पण ऒफ़िसात बनणारे मित्र उगाच समंजस वगैरे असतात. काही लफ़डे किंवा वादविवाद झाले तर शाळा/कॊलेजातल्या मित्रांशी कसे ’तु आधी *कात जा अन मी पण इकडे भ*त जातो’ म्हणुन प्रश्न मिटवता येतो, पण हे ऒफ़िसातला मित्र साले उगाच समंजस वगैरे असल्याने स्वत:ही भो*त जा नाहीत आणि समोरच्यालाही जाऊ देत नाहीत, म्हणुन सांगत असतो की शक्यतो ऒफ़िसात दोस्ती वगैरे करु नये.
पण ही दोस्ती पण अशी नाठाळ चीज आहे की साली उगाच होऊन जाते, झालेलीही कळत नाही. रितसर चेतावणी वगैरे देऊन दोस्ती होत असली तर आपली काय हरकत नाय, निदान सावध होऊन सेफ़ होण्याचा चान्स मिळतो, पण हे असे अचानक दोस्त होऊन जाणे म्हणजे आफ़तच आहे.


आयडियली स्पिकिंग ऑफिसात होणार्‍या दोस्तीला कुठेना कुठे अंत असतोच, अंत म्हणजे अगदी दी एंड नव्हे पण एखाद्याने काही कारणासाठी दुसर्‍या ठिकाणी निघुन जाणे हे अगदीच स्वाभाविक आहे. करियर म्हणा, वैयक्तिक तडजोडी म्हणा किंवा अन्य काही कारणाने म्हणा पण हे घडतेच, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करत असणारे आणि पक्के दोस्त असणारे ह्यांचीही उदाहरणे विरळ नाहीत पण आजच्या घडीला हे तितकेसे स्वाभावीक नाही.
मुळ ज्या गोष्टीमुळे आपण एकत्र आलेलो असतो त्या ऑफिसला ह्या मुव्हमेंटमुळे काही फरक पडत नाही (निदान वरकर्णी असे म्हणायची पद्धत आहे). कारण एक गेला की त्याला जागा घ्यायला इतर ४ जण तयार असतात, इनफॅक्ट त्याच्या जाण्याची वाटच बघत असतात. पण इथे प्रत्येकजण निराळा आहे आणि कुणीच कुणाची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही हे सत्य आहे तेच बर्याचदा लोकांना कळत नाही.

रुटिन कामाचे एक ठिक आहे हो ते कसेही होऊन जाते, पण निघुन गेलेला माणुस त्याच्याबरोबर जी एनर्जी घेऊन गेला ती कुठुन आणणार? इथुन निघुन गेलेल्या माणसाचा समंजसपणा आणि कामे करुन घेण्याचे व त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे कामे करण्यास माणुस तयार करण्याचे स्कील कुठुन आणणार? एखाद्याचे डेडिकेशन आणि कमालीचा आत्मविश्वास ह्यामुळे इथे दिसणारा परिणाम असा सहजासहजी रिप्लेस करता येतो? एखाद्या इव्हेंटवेळी त्याच्याकडुन येणार्या क्रिएटिव्ह आयडियास अशा सहजासहजी रिप्लेस करता येतात? वरुन कितीही दडपण आले तरी त्याची झळ खालच्या लेव्हलपर्यंत येऊ न देता मधल्यामध्ये सर्व काही शांत करण्याची खुबी अशी जादुसारखी उभी करता येते?

नाही .. सगळ्याच गोष्टींना रिप्लेसमेंट देता येत नाही म्हणुनच अशा मुव्हमेंट्स जस्टिफाईड नसतात .. समाजासाठी आणि त्या त्या ग्रुपसाठी.

हे ही सर्व एक वेळ जमुन जाईल, पण ह्याचा परिणाम जो पर्सनल लेव्हलला होतो त्याचे नुकसान मात्र कधीही भरुन ने येण्यासारखे असते. डिटेल लिहायची गरच नाही पण अगदी छोट्याछोट्या गोष्टीतही एखाद्याच्या असण्याची सवय झाली असते, आता त्याचे इथे नसणे एवढे रिप्लेसेबल नक्कीच नसते.



पण अपरिहार्य आहे हे सगळे .. हे सगळे करावेच लागते.
तुमची अगदी लाख इच्छा नसली तरी ह्या गोष्टी घडतात आणि त्यातुनच माणुस पुढे जातो, आता किंचित लांब असल्याने दोस्ती अजुनही गहिरी होत जात असते कदाचित, निदान अशा अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे ?
'अतिपरिचयात अवज्ञा' टाळावी असे म्हणतात, म्हणजे असे की एखाद्याशी फारच घसट वाढली की त्यातुन मानापमानाचे प्रसंग उद्भवतात असा मानवी स्वभाव आहे. परिचय कधी 'अति' झाला असे वाटलेच नाही, अवज्ञेचा तर प्रश्नच येत नाही, तरीही ह्या उपरोक्त वचनाची प्रचिती कशी येते ते बघु येत्या काळात ...



असो, फारच तात्विक आणि काहीसे सेन्टीमेन्टी टाईपचे लिखाण झाले.
असे काही होण्याचा अन असे काही लिहण्याचा माझा स्वभाव नाही, एकंदरीत भावनांचे प्रदर्शन न करण्यातच मला जास्ती सुख वाटत आले आहे. खुद्द माझ्या बाबतीतच सांगायचे म्हटले तर बेंगलोरच्या ३ वर्षापेक्षा जास्त सहवासानंतर ते सोडायची जेव्हा वेळ आली होती तेव्हा भावना ह्यापेक्षा जास्त उत्कट झाल्या होत्या, मात्र काळ हेच औषध ठरले, असो.
आता हे सर्व उकरुन निघण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात आमचा एक दोस्त ट्रान्सफर होऊन दुसरीकडे गेला, त्याच्या सेन्डॉफसदृष्य कार्यक्रमाला माझ्या सुभाग्याने मी हजर नव्हतो, जरी हजर असतोच तरी हेच बोललो असतो (बोलता आले असते का नाही ते माहित नाही), पण नसल्याने हे राहुन गेले होते, आता तेच इथे उतरले आहे ...

काटेकोर नियम असा नाही पण ब्लॊगवर शक्यतो मी मित्रांबाबत लिहीत नाही ... पण हे खास श्रीकांतसाठी !!!


Shrikant