पण काही "मान्यवरांच्या " खर्याखुर्या मनातल्या प्रतिक्रीया जाणुन घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली व ह्याबद्दल चर्चा केली. आमचे कॉन्टॅक्ट्स व कनेक्शन्स लै भारी असल्याने आम्हाला हे शक्य झाले ...पहा बर कोण काय काय म्हणते ते ...
डिस्क्लेमर : हे काल्पनिक व विरंगुळा आहे हे सांगायलाच नको, उगाच त्यावरुन डोक्याला त्रास नको.
==================================
* आर्य चाणक्य :
मुळात स्लमडॉगला ऑस्कर मिळाले नसते तर त्याच्या यशस्वीतेला धोका होता, अनेक कारस्थाने रचुन का होईना ऑस्कर मिळणे महत्वाचे होते. ऑस्कर न मिळणे म्हणजे भारतीय पार्श्वभुमीवर बेतलेल्या चित्रपटाच्या व पर्यायाने त्यामधल्या कलाकारांच्या कारकिर्दीला धोका, म्हणजेच संपुर्ण चित्रसॄष्टीला धोका, एकंदर करमणुकीला धोका, सामाजीक स्वास्थ्याला धोका , संपुर्ण प्राणीमात्रांना धोका ...असे चालु राहिले तर काळाच्या ओघात माणुस ही जमात नष्ट होण्याचा धोका ...!
* लोकमान्य टिळक :
स्लमडॉगने ऑस्कर मिळवणे ह त्यांचा जन्मसिद्ध हक्क होता आणि त्याने तो बजावला ...मी मुळात स्लमडॉग हा सिनेमाच पाहिला नसताना त्याच्यावर प्रतिक्रीयांची टरफले मी का टाकु ?
* न्यायमुर्ती रानडे :
ऑस्कर मिळवणे ही स्लमडॉगची आर्थीक, सामाजीक, मानसिक व सैद्धांतिक गरज होती. आपल्याला फक्त त्यांनी सरळ मार्गाने ऑस्कर मिळवले आहे का हेच पहायचे आहे. अन्यथा त्याची योग्य ती न्यायालयीन चौकशी देशातल्या संविधानाच्या सन्मानासाठी होणे आवश्यक ठरते.
* महात्मा गांधी :
स्लमडॉगने ऑस्कर मिळवताना कसलाही कायदेभंग केला नाही अथवा असहकाराचा नारा दिला नाही. भुतलावर निर्माण होणार्या प्रत्येक चित्रपटाला ऑस्कर मिळणे हाच प्राणीमात्रांच्या जीवनातील एका अद्भुत घटनेचा एक सुंदर अविष्कार असेल.मात्र शांततामय मार्गाने व सविनयाने काढलेला कुठलाही चित्रपट हा तुम्हाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याचा आत्मानंद देईल.
* शाहु महाराज :
इथे जेव्हा प्रत्येक्षात मुंबईमध्ये झोपडपट्टीत कुत्र्यासारखे जीणे जगणार्या माणसाची तुम्हाला किंमत नाही तर आम्ही त्या दिडदमडीच्या स्लमडॉग सिनेमाने ऑस्कर मिळाले ह्याची कशाला पत्रास ठेवायची ?
* जवाहरलाल नेहरु :
स्वतंत्र भारतात निर्माण होनार्या कुठल्याही सिनेमाला ऑस्कर मिळवण्याचे पुर्ण स्वातंत्र्य आम्ही घटनेद्वारे त्यांना बहाल केले आहे. शिवाय त्यात लहान मुलांनी उत्तम काम केले आहे असे ऐकुन आहे.लहान मुले म्हणजे देवाघरची फुले.
* अटलबिहारी वाजपेयी :
स्लमडॉगने ऑस्कर मिळवणे हेच "इंडिया शायनिंग" आहे, सध्या मी ह्याच परिस्थीतीवर आणि पर्यायाने देशाच्या उदात्ततेवर कविता करत आहे, लवकरच काव्यसंग्रह प्रसिद्ध होईल.
* लालकृष्ण आडवाणी :
हुं, त्यात काय विषेश ?मी एवढी रथयात्रा केली, १०० ठिकाणी झोपडपट्टीतुन हिंडलो, अनेक ठिकाणी रथ अडवला गेला तेव्हा कुणी आमचे कौतुक केला का ? उलट मी "जीनांचे" नाव घेतल्यावर सर्व बाजुंनी टिका झाली.
असो. हे माझे वैयक्तीक मत आहे.
पक्षाचे जे काही धोरण आहे त्याप्रमाणे जावडेकर प्रतिक्रीया देतील.
* अर्जुनसिंग :
मिळाले का ? बरे झाले ..!
नाही तर मी म्हणतच होतो की "ऑस्करवाल्यांनी बाहेरच्या देशात चित्रीत झालेल्या / बेतलेल्या चित्रपटांना त्यांच्या मुळ कॅटॅगिरीत आरक्षन ठेवावे" म्हणुन...
* शरद पवार :
पक्षाच्या व सरकारच्या धोरणात बसते का नाही ते पाहुन व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन योग्य ती प्रतिक्रीया द्यावी लागेल. तसाही चित्रपट उद्योग हा भारतातील सहकार व व्यापार क्षेत्रातील एक महत्वाचा घटक आहे, तळागाळ्यातल्या सर्वसामान्य गोरगरिब जनतेच्या मनोरंजनाचा तो एक मार्ग आहे.
सध्यातरी सर्व पर्याय खुले आहेत एवढेच सांगतो.
* बाळासाहेब ठाकरे :
जय महाराष्ट्र , मुंबईतल्या मराठी माणसांच्या प्रयतनातुन उभारल्या गेलेल्या स्लमडॉग ह्या चित्रपटाला ऑस्कर हे मिळायलाच हवे. कसे मिळत नाही तेच बघतो. माझा कडवट शिवसैनिक आदेशाची वाट पहात आहे.
बर्या बोलाने दिलेत ते उत्तम. अन्यथा तुमच्यासारख्या पोटार्थी, भिकारड्या, नेभळट, पुचाट व गांडुळासारख्या औलादीला कसे वटणीवर आणायचे ते आम्हाला चांगलेच माहित आहे.
कानात सांगुन कळत नसेल तर कानाखाली वाजवुन समजवावे लागेल ...
* मनोहर जोशी :
स्लमडॉगला ऑस्कर मिळाले ही घटना अथवा तो चित्रपट मी प्रत्येक्ष पाहिला नाही. परंतु माननीय बाळासाहेबांच्या आदेश व परवानगीशिवाय हा चित्रपट निघणे व त्याला ऑस्कर मिळणे ह्या घटना शक्य नाही हे मी निश्चितपणे सांगु इच्छितो.
* सोनिया गांधी :
हा महात्मा गांधींचा, श्रीमती इंदिरा गांधींचा, राजीवजींचा व त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन आमच्यामागे व पर्यायाने स्लमडॉगमागे उभे राहणार्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे.
* सुशीलकुमार शिंदे :
हॅ हॅ हॅ, स्लमडॉगला ऑस्कर मिळाले काय ? हॅ हॅ हॅ.
सर्वात प्रथम स्लमडॉगसारख्या तळागाळातल्या व मागास वर्गाचे चित्रण दाखवणार्या चित्रपटाला पाठिंबा देऊन त्यांना संधी देण्याबद्दल सोनिया गांधींना धन्यवाद.हा स्लमडॉगचा सन्मानच आहे.
* राज ठाकरे :
स्लमडॉग सारख्या हिंदी-इंग्रजी भाषा असलेल्या मिश्र चित्रपटाला ऑस्कर मिळणे म्हणजे इतर भाषांना कानफाटीत देणे नव्हे.महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट "मराठीतच" दाखवला गेला पाहिजे व त्याला धनदांडग्या परप्रांतियांच्या मल्टीप्लेक्समध्ये "प्राईम टाईम" मध्ये दाखवले गेले पाहिजे, कसे दाखवत नाही ते मी बघतोच ...!
* अमर सिंग :
ऑस्कर पुरस्कार हे काय फक्त अमेरिकेत चित्रपट काढणार्यांचे बापजादांचे आहेत काय ?
स्लमडॉगलासुद्धा तिथे सन्मानाने राहता आले पाहिजे, घटनेत तसे उल्लेख आहे ...
वेळ पडल्यास आझमगडहुन २०००० माणसे आणतो पण अमेरिकेतल्या प्रत्येक थेटरात स्लमडॉग झळकवतोच.बघु कोण आडवे येते ते ...
===================================
* पुर्वप्रकाशित : मिसळपाव.कॉम .... स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया.