सध्या आम्ही विवीध मराठी संकेतस्थळांवर लिहताना एक स्वाक्षरी करतो, त्याचा तजुर्मा "एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो" असा आहे. तात्पर्य काय की माणसाने कुठल्याही "सजिव" व्यक्तीला देव मानु नये, कारण पुढेमागे ह्या देवाने काही चुका अगर अपराध केला मग त्याच्यावर होणार्या चौफेर टिकेन आपणही दुखावलो जातो व शिवाय आपलाही वैचारीक गोंधळ होतो. सबब "कुणालाच देव मानु नये" असे आम्ही बर्याच वेळा ठरवतो ...पण आमच्या अनेक पालथ्या धंद्यापैकी एक म्हणजे उठसुठ कुणालातरी "देव मानणे" हा आहे ...
आता हा विषय निघायचे कारण म्हणजे सध्या आम्हीच देव मानलेल्या २ देवांची भांडणे. सध्या "शाहरुख खान" आणि "सुनील गावसकर (लोकांनी आडनावाचे एवढी विडंबने केली आहेत की गावसकरही गोंधळात पडणार नक्की)" ह्या आमच्या २ देवांचा वाद गाजतो आहे. पहिल्यांदा ही २ नावे एकत्र वाचुन आम्हाला वाटले की स्वतः सुनील गावसकर हा (रोहन गावसकरला काही केल्या क्रिकेट जमत नसल्याने जसे थोरल्या बच्चननी धाकल्या बच्चनचे करियर सावरायला जसा ऍक्टिव्ह सहभाग घेतला तसा) "कोलकता नाईट रायडर्स" कडुन खेळणार की काय ? पण तसे नव्हते, त्याचे काय झाले की गावसकरांनी जॉन बुकाननच्या ( शाहरुखच्या टीमचा कोच) निर्णयांविरुद्ध आपल्या लेखणीतुन तोफ डागली. कारण काय तर गावसकरचे क्रिकेटप्रेम. पण विषय इथे संपला नाही कारण शाहरुखने एक पत्रकारपरिषद घेऊन गावसकरांविरुद्ध "त्यांना काय टी-२० क्रिकेट कळते ? ते कधी खेळले नाहीत तर मग त्यांनी बोलणे योग्य नाही. हवे तर स्वतःचा संघ बनवुन (पक्षी पैसे मोजुन) काय हवे ते करा" असे अकलेचे तारे तोडले ...मुद्दा असा की त्यांच्या भांडणात त्यांचे काहीही जात नाही मात्र हे दोघेही आम्हाला "देवासमान" असल्याने कुणाची बाजु घेऊन लिहावे हा प्रश्न आहेच.
(शाहरुखच्या मते) शाहरुखचे असे म्हणणे आहे की गावसकर टेन्टी-टेन्टी क्रिकेट खेळले आहेत का ? मग ते त्याच्या डावपेचाबद्दल का बोलतात ? शाहरुखची गोष्ट वेगळी आहे. लोक कसे जाहीरपणे "गुप्तदान" देतात तसा तो आयुष्यभर जाहीरपणे "गुप्त २०-२० क्रिकेट" खेळत आला आहे. त्याच्या मनात आले तर आजही तो "२०-२० चा बादशहा" म्हणुन स्वतःला जाहीर करु शकतो व शिवाय भारताच्या टीमचा कोच म्हणुन भारताला विश्वकप जिंकुन दिला असा चित्रपटही तो काढु शकतो. गरज पडल्यास त्यात तो स्वतः शर्ट काढुन भर मैदानात पीचवर "कोरबो कोरबो कोरबो रे, जितबो जितबो जितबो रे" सारखे आयटम्स सॉन्ग काढुन त्यात विंचु डसल्यासारखे बेफाट नाचु शकतो. त्याला कोण आडवणार ?
(शाहरुखच्या मते) गावसकरांनी त्या टेस्टमध्ये काय ज्या असतील त्या १०००० रन्सा काढुन काय तीर मारला का ? मनात आणले तर शाहरुख प्रत्येक देशात १०००० रन करणारे प्लेयर पगार देऊन नोकरीला ठेऊ शकतो. त्यांनी परदेशात "शतके" वगैरे काढली पण त्यात काय मोठेसे ? शाहरुखही परदेशात "स्टेज शो" करत असतोच की, उलट क्रिकेटच्या १० पट जास्त गर्दी व पैसा हे स्टेज शोज खेचतात.गावसकर हे स्वतः मैदानाच्या गॅलरीत उभारुन माकडउड्या मारु शकतात का ? ते सिनेसॄष्टीतल्या "पडेल नटांचा/नट्यांचा जथ्था" घेऊन ग्राउंडवर "पेज-थ्री" पार्टी करु शकतात का ? आपल्या संघाने केलेल्या संधीच्या मातीचे समर्थन ते चाचरत पाचकळ विनोद करुन करु शकतात का ?ते करोडो रुपये देऊन विकत घेतलेले खेळाडु गल्लीतल्या पेक्षा टुकार खेळत असताना आनंदाने उड्या मारु शकतात का ? ते क्रिकेटचा फायदा घेऊन आपल्या चित्रपटांचे प्रमोशन व जमल्यास लगेहाथ प्रतिस्पर्ध्यांची (बरोबर ओळखलेत, बच्चन आणि आमीर शिवाय आहेच कोण ?) " टांग ओढु शकतात का ?ह्या प्रश्नांची उत्तरे "नाही" अशी असतील तर मग "गावसकरांना २०-२० क्रिकेट कळते" असे कसे म्हणता येईल ?
मुळात गावसकरांची तर काय चुक. हा सद्गॄहस्थ बिचारा आयुष्यभर प्रामाणेकपणे क्रिकेट खेळला, देश्-विदेशात हजारो धावांची रास रचली. त्यावेळी कसलीही शिरस्त्राणे नसताना तोफखान्यासारख्या वेगवान गोलंदाजीसमोर टिच्चुन उभा राहिला. अनेकवेळा एकहाती भारताची क्रिकेटमधली अब्रु संभाळली. त्यानंतर त्यांनी क्रिकेट ऍकॅडमी वगैरे काढुन सेवा करण्याचा प्रयत्न केला. आजही ते एक अभ्यासु आणि विचारशील समिक्षक म्हणुन जमेल तसा क्रिकेटच्या प्रगतीला हातभार लावायचा प्रयत्न करतात ...
मग चुक झाली कुठे ?
उत्तर आहे की त्यांनी २०-२० व ते ही "आयपीएल" सारखी सर्कस ह्यात लक्ष घालले.
गावसकरसर इथेच तुम्ही चुकलात ? ह्या असल्या जत्रेतल्या तमाशावर तुमच्यासारख्या महान व्यक्तीने बोलवे हेच चुकले ? मनमोहनसिंग कधी तासगावच्या पतसंस्थेच्या अपहाराबद्दल बोलतात का ? सर अब्दुल कलाम कधी तालुकापातळीवरच्या विज्ञानस्पर्धेच्या निकालात झालेल्या वशिलेबाजीविषयी आपले मत मांडतात का ? लता मंगेशकर कधी "चिंचपोकळीची गानकोकीळा" ह्या सोसायटीच्या कार्यक्रमावर टिका करतात का ? संजीव कपुर कधी ताथवडे खुर्द गावातल्या जत्रेच्या वेळी भाजीत पडलेल्या जास्तीच्या मिठाबद्दल बोलतो का ? ओबामा कधी आझमगढच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांतील गैरप्रकाराचा निषेध करतात का ?नाही ना ? मग सर आपण कशाला असल्या "तमाशाकडे" लक्ष दिलेत ? जाऊ द्यात ना, काय करायचे ते करु द्यात ना त्यांना ...
सिंपली ईत्स नन ऑफ युवर बिसनेस ...!!!
मुळात हे "इंडियन प्रिमीयर लीग" हे डोईजड झालेल प्रकरण आहे. पॅकर सर्कसने जसे क्रिकेट बाजारु केले होते ही त्याची पुढची पायरी आहे. आता तर हे लोक ह्या देशातल्या "निवडणुकांना" ही जुमानायला तयार नव्हते, मग त्याची नक्की "लायकी" आपण काय समजायची? पैशाच्या राशी ओतुन देशोदेशीची क्रिकेटपटु इकडे आणलेत , आता त्यांच्या टकरा लावायच्या अगदी माजलेल्या वळुंच्या चालीवर, त्याची प्रचंड जाहिरात करुन ही माती सोन्याच्या भावात विकायची आणि आपल्या तुंबड्या भरुन घ्यायच्या असा हा सरळसरळ धंदा आहे. ह्यात इतके "सिरीअसली" घेण्यासारखे काही नाही. वाटले तर फारफार तर टीव्हीवर खातखात हा तमाशा बघण्याचा लायकीचा आहे ...मुळात आपण क्रिकेट बघतो का कारण त्यात खेळाडु देशप्रेमाने भारुन वगैरे खुन्नस लाऊन खेळतात असा आपला एक सर्वसाधारण समज आहे (क्रोनिये आणि अझर कंपनीने आपल्याला कधीच वेड्यात काढले आहे हा भाग वेगळा, आता तर अझर निवडणुक लढवतो आहे, म्हणजे तो क्रिडामंत्री होऊन खेळाडुंनी कसे देशासाठी खेळावे ह्यावर बौद्धिके देणार तर. चालायचेच). पण इथे "देश" आहेच कुठे ? शहरांची नावे गुंफुन ह्या देशातल्या धनदांडग्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विकत घेतलेले संघ आहेत हे. मग त्याच्यासाठी सर तुम्ही कशाला स्वतःला त्रास करुन घेताय ? खेळाडुंचे तरी काय "जिकडे खोबरे तिकडे चांगभले" असे असल्याने त्यांना कोलकल्त्याकडुन खेळले काय किंवा मुंब्राकडुन खेळले काय, काहीही फरक पडत नाही ? पुढेमागे समजा भर मैदानातच एखाद्या फलंदाजाला नोटांचे पुडके दिले तर तो बॅट फेकुन फिल्डींगला उभा राहणार नाही ह्याची गँरेंटी पुढे देणे शक्य नाही ? सगळा पैशाचा बाजार हा. त्यात अजुन लोकप्रियता कमी पडते की काय असे वाटल्याने "हरभजन" चक्क "श्रीशांतच्या" मस्तपैकी श्रीमुखात भडकावुन देतो व ह्याची व्यवस्थित जाहिरात होऊन टकरांना अजुन जास्त लोक येतात ...
आता राहता विषय राहिला ह्या संघांच्या मालकांचा.
ते कोण आहेत ?ते आहेत पक्के व्यवसायीक. जरा ह्यांची नावे तर पहा विजय मल्ल्या, शाहरुख खान, अंबानी, शिल्पा शेट्टी, नेस वाडीया + प्रिती झिंटा ...
ह्यांनी खणखणीत पैसे मोजुन संघ विकत घेतले आहेत, त्यामुळे ह्यांना वाटेल ते ते करणार. आहे कुणाची ह्यांना आडवायची हिंमत आणि नैतीक जाणीव ?
समजा उद्या विजय मल्ल्याला वाटले की द्रविडमध्ये काय दम नाही म्हनुन त्याने देवेगौडानां कर्णधार करुन सलामीला उतरवले आणि त्यांच्या जागेवर द्रविडला डुलक्या घ्यायला लावल्या तर मल्ल्यांना कोण रोखणार ?
समजा प्रिती अगर शिल्पाला आपल्या मैत्रिणींचा संघ खेळावायची इच्छा झाली तर शेन वॉर्नला शिल्पाच्या मैत्रिणींशे गुलुगुलु गप्पा माराव्या लागतील (तसा ह्याचा अनुभव ह्यात "दांडगा" आहे बरं) आणि युवराज ह्यांचे फोटो काढत हिंडेल. आहे कोणाची टाप ह्यांना जाब विचारण्याची ?
उद्या अंबानीला वाटले की आपल्या टीमने स्पोर्ट्स वेअर न घालता "सफारी" घालुन क्रिकेट खेळावे तर ह्यांना खेळावे लागेल. हरभजनला सफारी घालुन बॉलिंग करताना पहायची तुमची हिम्मत आहे का ?
समजा शाहरुखने गांगुलीला "नॉन प्लेयिंग कॅप्टन" केले आणि मैदानात फरहा खान, अर्जुन रामपाल, करन जोहर,करिना कपुर, दिपीका पदुकोणे वगैरेंची तीम मैदानात उतरवली आणि मॅच चालु असताना मध्येच करिना आणि समोरच्या तीमची प्रिती ह्यांनी भर मैदानात "झिम्मा-फुगडी" खेळायला सुरु केले तर त्यांना विचारणारे आपण कोण ?
समजा कुणी "मंदिरा बेदीला" करारबद्ध केले आणि ती तिची जगप्रसिद्ध "चोळी ( की जी प्रेक्षकांचे अंग अंग जाळी )" घालुन समजा "अंपायर" म्हणुन उभी राहिली तर का म्हणुन विचारणारे आपण कोण ?
थोडक्यात, ह्याला सिरीअसली क्रिकेटचा दर्जा दिला जावा का ?
नसल्यास, गावसकर सर तुम्ही कशाला असल्या फालतु गोष्टीत लक्ष घालता ?
सिंपली इट्स नन ऑफ युवर बिसीनेस. यु आर नॉट कर्न्सर्न्ड टु इट ऍट ऑल ...!!!
त्यामुळे शाहरुखला ४ कर्णधार खेळवु दे, नॉन प्लेयिंग कॅप्टन करु देत, गांगुलीला स्टंम्प म्हणुन उभे करु देत अथवा स्वतःचा कर्णधार होऊन मैदानात झेंडु फुटल्यागत नाचु देत. शेवटी हा "धंदा" आहे व तो कसा करायचा हे शाहरुख नक्की जाणतो व आपल्याला हे न लक्षात आल्याने व आपण क्रिकेटच्या प्रेमापोटी बोलत असल्याने असे झोल झाले आहेत ...
असो, तुर्तास; पप्पु ... सॉरी सॉरी .. किंग खान कान्ट रॉन्ग साला ...!!!