Thursday, September 17, 2009

आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ....

तर मित्रांनो ही स्पर्धा होती आमच्या आस्थापनात, ती तिथेच घेतली गेली आणि निकाल तिथेच जाहीर झाले. जर पुढेमागे आमची कंपनी केंद्र सरकारने बेल-आउट पॅकेज देऊन चालवायला घेतली तर स्पर्धा महाराष्ट्रात, जाहिरात युपी/बिहारात, प्रत्येक्ष स्पर्धा कर्नाटकात व बक्षिसवितरण समारंभ दिल्लीत वगैरे होऊन ह्याला "*** गांधी पुरस्कॄत क्युबिकल डेकोरेशन स्पर्धा " असे नाव दिले जाऊ शकते ...
( तसे पाहिले तर हा मजकुर वाचायचे काही कारण नाही, ऑलरेडी वाचला असल्यास ( तुमच्या जिवनातल्या अनेक दुर्भाग्यांपैकी एक ) दुर्भाग्य म्हणुन सोडुन द्या Wink )

* क्युबिकल मेकओव्हर कॉम्पिटिशन :
तुम्ही कंपनीत कामाला जाता की नाही, राहु द्यात आपण नुसतेच कंपनीत जातो असे म्हणु, कुणावर कशाला "काम करण्याचा " आरोप करायचा नाही का ?
तर असो. तुम्ही कंपनीत गेल्यावर ( फ़ुक्कटचे इंटरनेट वापरणे, फ़ोन करणे, गप्पा मारणे वगैरेंसाठी सर्व सोयींनी युक्त अशी जी जागा असते त्या ) "क्युबिकल" मध्ये बसता की नाही ?
इमानदारीत व्यवस्थित बसत असाल तर तुम्ही ह्या स्पर्धेला पात्र धरले जाल. ऑफीसमध्ये नुसतेच पोरी फिरवण्याचे धंदे करणार्‍यांनी जर "सैफ अली खान " ह्याचे सर्टिफिकेट आणले तर त्याचाही विचार केला जाईल.

ज्यामध्ये तुम्हाला तुमचे क्युबिकल एक विशिष्ठ थीम घेऊन सजवायचे होते, काहितरी देखावा तयार करायचा होता ( म्हणजे रोज आपण नुसतेच काम करतो आहोत हा देखावा उत्स्फुर्तपणे तयार करतो तो नव्हे, काहितरी वेगळा हवा होता). आपल्याकडे गणपतीला कसे लहान लहान पोरांना नाराज होऊ नये म्हणुन आपण लुटुपुटीच्या स्पर्धा घेतो तर हा त्यातलाच एक भाग, फक्त इथे "कमी पगारवाढ" हा इश्श्यु महत्वाचा होता. ह्याची सुरवात आधीपासुनच झाली होती, रोज आम्ही काम केल्याचा देखावा तयार करायचो मग शेवटी बॉसने एक दिवस "पगारवाढ दिल्याचा" नुसताच देखावा तयार करुन दाखवला व आम्हाला धोबीपछाड घातली. असो, सगळ्याच गोष्टी काढायची ही वेळ नव्हे.

डेकोरेशनसाठी वापरलेली थीम ( उर्फ संकल्पना ), एकुण सजावट, नाविन्य, खर्च्,मेहनत आदी गोष्टी विचारात घेऊन ( व आपल्या कंपुमध्ये कोणकोण आहे हे पाहुन ) बक्षिस जाहीर होणार होती. ( थोडक्यात काय तर कंपुबाजी एक वैश्विक जीवनशैली आहे, चालायचेच ).
सर्वात पहिल्यांदा आम्ही काय केले तर जी काही "ऑर्गनायझिंग कमिटी" होती त्यांना १००० शब्दांचा नियम आणि कायदे यांच्याविषयी अनेक चौकश्या करणारा एक मोठ्ठ्या ई-मेल ( सीसी : एच आर मॅनेजर ) पाठवला. त्यांनी आत्तापर्यंत नियम असे काही बनवलेच नव्हते कारण असे काही खरोखर करावे लागेल ह्यांची त्यांना कल्पना नसावी बहुतेक, त्यांचाच मग घाबरुन "२ दिवसात सर्व डिटेल्स पाठवतो" असा सर्वांना ई-मेल आला व नंतर जेव्हा खरोखर मेल आला तेव्हा भेंडी त्यांनी आमच्याच मेलमधल्या ८०% शंका "नियम" म्हणुन वापरुन टाकल्या होत्या ( तर ह्यातुन आपण काय शिकलो की साहित्यचौर्य हा केवळ आंतरजालाचाच प्रॉब्लेम नाही, ते कोठेही होऊ शकते).

एखादा १००० शब्दांचा लेख अथवा काथ्याकुट लिहायचा असता किंवा एखाद्या संवेदनाशील विषयावर मोठ्ठ्या भिंगाचा चष्मा घालुन व कपाळाला आठ्या घालुन समिक्षा वगैरे करायची असती तर हा आमच्या डाव्या हातचा मळ होता, पण इथे मामला कठिण होता. मग आम्ही मदतीसाठी मिपाकरांना साद घातली आणि बघता बघता अनेक कल्पना आल्या. प्रतिसाद आणि आयडिया देणार्‍या सर्वांना धन्यवाद ( अ‍ॅड्या, राज्या, टार्‍या आणि धम्या तुम्हाला नंतर बघतो साल्यांनो Wink ).
त्यातुन आम्ही एक "सहजरावांनी" सुचवलेली थीम निवडली व पेपरवर्क सुरु केले ( ह्यालाच आमच्या रुममेट्सनी "तुम्ही फक्त कारणे शोधा **साठी " साठी असे म्हणले, पर्याय नाही, जनहितार्थ काही करायचे म्हणले की अशी टिका सहन करावीच लागते ...)

आता माझी थीम तर फायनल झाली होती की "एक मॉडर्न खेडे व एक मेट्रोसिटी" दाखवुन नव्या भारताचे चित्र मांडायचे. मग त्यानुसार नेटवर भरमसाट सर्फिंग करुन काही मॉडेल्स फायनल केली. शहरासाठी भरपुर काही मिळाले पण खेड्यासाठी काय दाखवावे ह्यावर आमचे गाडे पुन्हा आडले, पुन्हा सर्वांना खरडीद्वारे साद घातली व पुन्हा मिपाकरांचे भरभरुन रिप्लाय आले ( पण ह्याच दरम्यान कुठल्यातरी नतद्रष्टाने "मिपाकरांच्या खरडवह्यातल्या खरडींची संख्या" मोजुन सर्वात जास्त टीपी कोण करतो ह्याचा कौल घेतला, पाहुन घेतो रे, पुढचा लेख येऊदेत तुझा, नाय "गल्लत होते आहे" ह्या शिर्षकाखाली १००० शब्दांचा वाघासारखा प्रतिसाद लिहला तर दुसर्‍या आयडीने लेखन करेन).
सर्व काही आवश्यक माहिती मिळाली, मॉडेल्स ( फॅशन टिव्हीवाल्या नव्हे, डेकोरेशनच्या ) ही फायनल झाल्या, मटेरियलही येउन पडले ( ते कोणी आणले ह्याच्या फुक्कटच्या टांभारचौकश्या ( कॄपया "ट" च्या ठिकाणी "च" असे वाचावे) करु नयेत, अपमान होईल). केव्हा, कुणी, काय , कसे आणि किती ( हे सर्व प्रश्न थर्मोकॉल मॉडेल्सशी निगडीत आहेत ह्याची आवश्य नोंद घ्यावी ) ह्याचेही प्लानिंग झाले व युद्धाला तोंड फुटले...

ऑफीसमध्ये कामाच्या वेळात बसुन जर मी थर्मोकॉल-वर्क करत बसलो असतो तर माझ्या बॉसला झीट आली असती व त्याने एक तर मला थर्मोकॉलच्या भिंतीत चिणुन मारले असते वा स्वतः थर्मोकॉलच्य गोळ्या खाऊन आत्महत्या केली असती म्हणुन मी हे काम घरी करण्याचा निर्णय घेतला. घरीही परिस्थीती फार वेगळी नव्हती, आमच्या रुमवर असे काही काम करणे ह्याची तुलना ओसामा बिन लादेनच्या गुहेत "आंतरराष्ट्रिय दहशतवादाचे उच्चाटन" अशी चर्चा घडवुन आणणे किंवा प्रविण तोगडिया / वरुण गांधीबरोबर बसुन "मदरश्यांना वाढीव अनुदान" ह्यावर उहापोह करण्यासारखे आहे. तरीही आम्ही हे अवघड शिवधनुष्य पेलले व स्ट्रॅटेजी तयार करुन त्यानुसार वागण्यास सुरवात केली ( ह्यात २-३ दिवस रुममध्ये अपशब्दांचा वापर कमी करणे, स्वतःचा लॅपटॉप स्वखुषीने दुसर्‍यांना वापरण्यास देणे, वेळप्रसंगी स्वतः ऊठुन चहा वगैरे करणे, विकांताच्या नाष्टा/चहा/आदी पदार्थांचे बिल भरणे वगैरे वगैरे गोष्टी येतात. असो, जास्त खोलात शिरण्याची आवश्यकता नाही).

शेवटी आमच्या ह्या स्ट्रॅटेजीला बळी पडुन बहुतेक बाबीत माणसाशी साधर्म्य असणारा माझा एक मित्र मदतीला तयार झाला. पण हे घडत असताना त्याने निवडणुकपुर्व युती करताना जशी शिवसेना अनंत नाटके करते व रोज उठुन आपल्या युतीतल्या पक्षाला शिव्या घालते तसा "देखावा" त्याने २ दिवस सादर केला, पण माझ्यासमोर भाजपासारखाच इतर काही पर्याय नसल्याने मी आपले शांतपणे त्याचे नखरे ऐकुन घेतले व शेवटी त्याला "थर्मोकॉल कापायच्या" कामाला बसवले. ही एक अभुतपुर्व घटना होती, ह्या मित्राने ह्यापुर्वी डास, ढेकुण आणि कमीत कमी मित्रांची इज्जत ह्याशिवाय इतर काही कधीच कापले नव्हते. वास्तविक पाहता हे त्याचे कामच नव्हे कारण त्याचे कुठुन न कुठुन परशुरामाशी, खंडो बल्लाळाशी आणि बाजीप्रभु देशपांड्यांशी नाते लागत असल्याने त्याला जिभेचा दांडपट्टा फिरवणे एवढेच माहित. असा हा मित्र चक्क बसुन थर्मोकॉल कापत आहे हे दॄष्य पहायला फ्लॅटवरची अवघी मित्रमंडळी लोटली होती. सगळे एकत्र जमणे ह्या योगायोगाचा हा दुसरा प्रसंग, पहिल्या वेळी मी जेव्हा परदेशवारीनंतर बॅगेतुन शिवास रिगलची कुपी ( अ‍ॅड्या, कसा आहेस रे ? ) बाहेर काढली होती तेव्हा हाच सीन घडला होता, त्यानंतर पुन्हा तशी "शनी-मंगळ युती"नाही घडली.
ह्या दरम्यान आम्ही दोघांनी मिळुन आख्खा फ्लॅट थर्मोकॉलमय करुन टाकला होता, जिकडे नजर जाईल तिकडे थर्मोकॉल, सकाळी हापीसात जातना बुट घालायचा म्हणाला तर त्यातुन आहे १२५ ग्रॅम थर्मोकॉलचे तुकडे बाहेर काढा, फॅन लावला की उडणार्‍या थर्मोकॉलबरोबर झिम्मा खेळा आदी प्रकारांनी आमच्या इतर रुममेट्सच्या डोक्याला व्यवस्थित शॉट लागला आहे ह्याची खात्री करून घेतली. पुढे हे प्रकरण एवढे वाढले की एक दिवस खुद्द आम्हाला रात्री ( १ वाजता ) जेवताना मी "बटाट्याची भाजी" खातो आहे की "थर्मोकॉलची भाजी" खातो आहे हेच कळेना.

शेवटी (सरकारस्थापनेवेळेस येतात तशा ) अनंत अडचणींना फाट्यावर मारुन आम्ही कसेबसे एकदाचे सर्व होमवर्क पुर्ण केले व तो सर्व कच्चा माल ऑफीसमध्ये डेकोरेशनदिवशी व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करुन घेऊन गेलो ( पण त्या गडबडीत कंपनीत प्रवेश करण्यासाठी आवश्यक असते ते " आयडेंटि कार्ड " सोईस्कर विसरलो होतो हा भाग अलहिदा ). ते बॉक्स पाहुन आमच्या कलिग्सना झीट यायचीच बाकी होती, मी आल्याआल्या फटाफट "असेंब्ली सिक्वेन्सच्या प्रिंट्स" काढुन आमच्या टिममध्ये वाटल्या व त्यांनाही आता सर्व कच्चा माल असेंबल करुन फायनल डेकोरेशनच्या लुकमध्ये बदलवण्याच्या कामाला लावले. आमच्या बरोबर असलेल्या काही आकर्षक गोष्टींमुळे ( कॄपया फोटो मागु नयेत ) अनेक स्वेच्छेने मदत करणारे स्वयंसेवक मदतीचा हात घेऊन पुढे आले व पाहता पाहता ६ तासात "डेकोरेशन रेडी" झाले ...!!!
हे पहा ते डेकोरेशन :
डेकोरेशनची थीम :
त्याचे नाव मी "इंडिया : फ्युचर इज हियर " असे दिले होते. ह्यत मी एक सर्वसोईसुविधायुक्त असे स्वयंपुर्ण आदर्श खेडेगाव व सर्व निर्यातप्रधान वस्तुंचे उत्पादन करणारे महानगर अशा २ गोष्टींचा सेट-अप लावला होता
मी "स्वयंपुर्ण खेड्यामध्ये" दाखवलेल्या गोष्टी म्हणजे एक मस्तपैकी शेत व ते ही "देशमुख फार्म" ह्या नावाचे, एक मंदिर, काही घरे, पिण्याच्या पाण्याची टाकी, एक शाळा, एक दवाखाना, पंचायत समितीचे कार्यालय, व्यवस्थित आखलेले रस्ते, भरपुर हिरवळ, बायोगॅस प्लँट, कन्युनिकेशन टॉवर्स वगैरे दाखवले होते. ह्या सर्वांना पुरक असे ट्रॅक्टर, बैल, व्यक्ती आदींचे कटाआउटसयोग्य ठिकाणी लावले होते.
मॉडर्न शहर दाखवताना मी त्यात आयटी पार्क, ऑटोमोबाईल कंपन्या, आर & डी सेटप्स, इस्रो वगैरे दाखवले होते. ह्या सर्वांना पुरक आणि आवश्यक म्हणुन दळणवळणाची सुविधा देणारे फ्लायओव्हर्स, एक्स्प्रेस हायव्हेज, मेट्रो रेल्वे, विमानतळ आदी गोष्टी दाखवल्या होत्या ...

मॉरल : शेवटी जेव्हा पहाणीसाठी "परिक्षक" येणार होते तेव्हा त्यांना २ मिनीटात आपली थीम व त्याचे महत्व सांगायचे होते.
मी सांगितले की " शहरांचा विकास होतोय ह्यात वादच नाही, भारतीय शहरे सध्या नुसतेच भारतासाठी महत्वाची नसुन आख्ख्या जगासाठी माहितीची आणि तांत्रिक सेवेचे हब्स झाली आहेत.
पण एवढेच संपुर्ण नाही, आज भारतीय खेडीही अशीच स्वयंपुर्ण झाली तर तिथला माणुस नोकरीसाठी उगाच शहराकडे धाव घेणार नाही सध्या प्रमुख्य समस्या असलेली अस्ताव्यस्त आणि गलिच्छपणे विस्तारणारी शहरे आपोआप सुधारतील ...
भारताच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वरील २ गोष्टी सारख्याच आवश्यक आहेत, अन्यथा संतुलन बिघडुन जाईल व सर्व व्यवस्था कोलमडुन पडेल ...
( नंतर लोकांनी येड्यासारख्या टाळ्या वाजविल्या पण त्यात काही विषेश नाही. असो. )

तर अशा प्रकारे "आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ...."

उपसंहार :
फोटो व वृत्तांत द्यायला ( आमच्या ख्यातीला अनुसरुनच ) बराच उशीर झाला व त्या दरम्यान बर्‍याच घटना घडुन गेल्या. त्याचा थोडक्यात घेतलेला मागोवा :
(ता.क. : खाली उल्लेख झालेली अलमोस्ट सगळीच पात्रे (शब्दश: घेतले तरीही हरकत नाही) ही "मिसळपाव.कॊम" वर लेखन करतात (असे तेच म्हणतात ) त्यामुळे ब-याच जणांना हे आऊट ऒफ़ कंटेक्स्ट वाटु शकते )
  1. आमच्या अक्षम्य दिरंगाईवर खवळुन "नंदनशेठनी" त्यांच्या इथुन प्रकाशित होणार्‍या एका "सॅन डियेगो ट्रिब्युन" ह्य नियतकालीकात " एसी व पीसी वाल्यांचा क्युबिकल डेकोरेशनचा माज ..." ह्या शिर्षकाखाली समस्त व्हाईट कॉलर जॉब वाल्यांना ४ खडे बोल सुनावणारा अग्रलेख लिहला.
  2. "अवलियाशेठ"नी आम्ही दाखवलेल्या मॉडेलमध्ये मंदिरावर "भगवा ध्वज" नसल्याच्या निषेधार्थ आंतरजालीय भगव्या आघाडीला हाताशी धरुन आंतरजालेय मोर्चे आणि निषेधसभा घेतल्या. पुण्याच्या पेशव्यांनी २ दिवस अनेक वेबसाईट्सची बँडविड्थ अडकवुन ठेवल्याच्या बातम्या आहेत.
  3. विजुभाउ, अदिती, टिंग्या आदी धर्मनिरपेक्ष लोकांनी गावामध्ये चर्च आणि मशिद का नाही म्हणुन धरणे धरल्याचे समजते. तसेच आम्हाला घेराव घालण्याचा त्यांचा मनसुबा बोलुन दाखवला. श्री. टारझन ह्यांनी स्वखुषीने आमच्या संरक्षणाची जबाबदारी उचलल्याचे समजले.
  4. गावामध्ये बार न दाखवुन "दारुबंदी" सारख्या अनिष्ठ प्रथांना थारा दिल्याच्या निषेधार्थ राजे व अ‍ॅडी जोशी ह्यांनी रास्तारोको केल्याचे समजते.
  5. धमाल मुलगा ह्यांनी आपल्या घरावरच "देशमुख फार्म" अशी पाटी लावल्याचे चित्र स्थानिक दैनिकात छापुन आले.
  6. बिपीन कार्यकर्ते ह्यांनी पुढच्या भारत भेटीत "आदर्श नगर" ला भेट देऊन तिथे एक कट्टा घेण्याचा मनसुबा व्यक्त केला. नेहमीप्रमाणे निखील देशपांडे हे बिकांना सहमत होते.
  7. पराची ह्या गावात नेटकॅफे कितपत चालेल व सुम्दर कन्या किती आहेत ह्याची चाचपणी सुरु केल्याचे समजते ...
  8. फोटोची चौकशी करण्यासाठी अनेक व्यनी केले गेल्याने "सहजरावांचा" ह्या वर्षीचा "व्यनी कोटा" संपल्याचे समजते, त्यांनी आता दुसर्‍या खात्यासाठी मिपा व्यवस्थापनेकडे अर्ज केल्याचे समजते.

असो, तुर्तास इतकेच ...

ता.क. : सदर डेकोरेशन ला "तृतीय क्रमांकाचे पारितोषीक" मिळाले :)