Tuesday, March 18, 2008

आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?

.
.
आता तसं पाहायला गेलं तर या विषयावर बऱ्याच रथी-महारथींनी आधी बरेच काही लिहून ठेवले आहे. आता त्यात वर मी हे पांढऱ्यावरचे काळे करणे म्हणजे "तळ्यात ओंझळीने पाणी टाकून त्याचा समुद्र बनवायचा प्रयत्न करण्यासारखे आहे. सर्वप्रथम मेघना त्यानंतर सामवेद यांनी बरेच काही लिहून "आपण का लिहतो ?" याचा अभ्यास केला अथवा आत्मपरिक्षण केले [ च्यायला शब्द बरोबर आहे ना ? नाहितर फुकट फटके पडायचे !!!. ] आता त्यानंतर आम्हाला कोणी "खो" देण्याची वाट न पाहता " मी का लिहतो याचे हे पुराण. तसे कुणी खो द्यायची वाट न पाहणे उत्तम कारण आपण तेवढे प्रस्थापित व प्रसिद्ध नाही याची आम्हाला जाणिव आहे.[ त्यामुळे गपचूप आपले चड्डीत राहिलेले बरे ...]

असो. खरं तर मीच काय, कुणीही का लिहतो ? हा प्रश्न थोडासा बरोबर वाटतो कारण रामदासांच्या "दासबोध" व तुकाराममहाराजांच्या गाथा व महाभगवद गीता या महान ग्रंथानंतर त्यापुढे मानवी इतिहासात एक शब्द सुध्धा न लिहला तरी चलला असता असे मी कुठेतरी वाचले आहे व ते मनाला पटले सुध्धा. तरीपण हा अट्टाहास, कारण याचे मुळ मानवी स्वभावात दडले आहे. "माणूस हा प्रगतिशील व विचारशिल प्राणी आहे" असे विज्ञान सांगते. आता प्रगतिशील जर व्हायचे आहे तर मला कधीही समाधानी होउन चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी नेहमी कशाची तरी हाव धरावी व ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या दैनैदिन जिवनातल्या आनंदावर पाणी सोडावे, तर अर्थ असा आहे की "बाबा, सध्या जे चालू आहे ते व्यवस्थीत सांभाळ आणि त्यानंतर जमले तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कर ...". आता सुधारणा करायची म्हणजे त्या गोष्टीत सामिल व्हावे लागेल अथवा कमीत-कमी थोडा का होईना सहभाग हवा कारण "To Change The Sytem, You have to be in the System " असे एक गाजलेले व बऱ्याच अंशी मनाला पटलेले एक वाक्य आहे. आता पुढचा प्रश्न "change म्हणजे नक्की काय ?" व मी ४ पाने इथे बसून खरडल्याने त्यात असा काय चेंज होणार आहे ? बरोबर आहे एकारितीने. पण असे जर मानून गप्प राहिलो [ म्हणजे आता काही लगेच तलवार घेउन लढायला निघालो आहे असा काही भाग नाही ....] तर अख्खे आयुष्य असेच जाईल. मग आयुष्याच्या संध्येला असे वाटायला नको की "यार, आपले मनोसोक्त जगायचे राहूनच गेले... येवढ़ा सोन्यासारखा मानवजन्म आपण फक्त किडामुंगीसारखा मरोस्तोवर राबून घालवला."

आता मी काय आणि का लिहतो हे जर लगेच सांगितले नाही तर मला भरपूर शिव्या-शाप खाव्या लागतील. काय आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्याला [ म्हणजे मला ] आवडत नसताना सुध्धा "समाजात राहून एका ठरलेल्या साचाचे सामाजीक जीवन" जगावे लागते. आपल्या कुटुंबासाठी व लोक काय म्हणतील या लाजेसाठी आपल्याला "एक नोकरी किंवा धंदा" करावा लागतो व त्यासाठी कमीत कमी दिवसातला १० ते १२ तासांचा वेळ तरी त्यासाठी द्यावा लागतो, मग उरलेल्या व फावलेल्या वेळात "सिनेमे, पेपर, वाचन, सहली, भेटीगाठी , संभाषण " यासारखे सामाजीक जीवनाला आवश्यक असलेली कर्तव्ये पार पाडावी लागतात. या सर्व गोष्टी करताना शक्य तेवढी आपल्यामुळे कुणी दुखावला तर जात नाही याची काळजी घ्यावी लागते [ मात्र जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दुखवला जात असाल अथव तुमचा स्वाभिनानाला ठेच पोहचत असेल तर ते पण काहिवेळा गप्प राहून सहन करावे लागते ] ...

तर वर उल्लेखलेले सामाजीक जीवन जगताना [ मग ते मनाविरूद्ध क असेना] तुमचा संमंध नाना प्रकारच्या लोकांशी येतो, त्यांच्याबरोबर राहताना तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळू शकतात वा तुम्ही पार गोत्यात येउ शकता, पण हे करावे लागते.काहीवेळा काय होते, एखाद्या गोष्तीची आपल्याला प्रचंड चीड येते पण आपण ती कुनाला बोलून दाखवू शकत नाही कारण त्याचा परिणाम काहीही होउ शकतो आणि समजा जरी बोलून दाखवली तरी ती तेवढ्या सिरीअसली घेतली गेली नाही तर अजून मानसीक त्रास होतो. दुसरे असे की आपल्या भावना शेअर करायला आपल्या "मानसीक पातळीच्या" बरोबर असणारे कोनी सापडेल का याची पण खात्री नाही, असे असल्याने "गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता" असे म्हणण्याशिवाय पर्याय रहात नाही. पण कुठेतरी हे शेअर केले पाहिजे कारण जर असे मनात कुढत राहिले तर एक दिवस मानसीक संतूलन ढासळून जगाच्या लेखी आपण वेडे ठरण्याची शक्यता असते व ते पण आपणाला परवडणारे नाही. म्हणून "ब्लॉग लिहणे" हा सोईस्कर मार्ग, कुणी वाचून प्रतिसाद दिला तर आपल्याला जे वाटते ते काही अनाठायी नाही याचे समाधान मिळते व नाही कुणी वाचले तर कमीत-कमी मनातील कढ तरी निघते. म्हणून आम्ही लिहतो....

आता पुढचा प्रश्न म्हणजे "आम्ही काय लिहतो वा कशावर लिहतो ? ". तसं बघायला गेलं तर या प्रश्नाच उत्तर खूप सोप आहे हक्त त्यासाठी आपल्या डोळ्यावरचं "पांढरपेशीपणाचं कातडं" थोडं बाजूला करायला हवं, मला काय करायच आहे ही वॄत्ती थोडीशी बाजूला ठेवायला हवी. आता सांगायचचं झालं तर "आजकालच्या राजकारण्यांची सत्तेसाठी चाललेली निर्ल्लज धडपड त्यातून त्यांनी केलेला तमाशा , समाजातील श्रीमंत व गरीब वर्गातील वाढती दरी व त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या समस्या, आधी धर्माच्या व आता जातेच्या नावावर होत असलेली समाजाची विभागणी, आमच्या आवडत्या क्रिकेटचे होत असलेले बाजारूकरण, हॉकीची अधोगती , शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या व त्यावर निर्ल्लज राज्यकर्त्यांचे " तो जुगारी होता, कर्जबाजारी होता" अशी डोक्यात जाणारी उत्तरे, हुशार व गरिब मुलांच्या प्राशमिक शिक्षणाची अवघड होत चाललेली परिस्थीती, शिकुनसुध्धा नोकरीची नसलेली शास्वती व त्यातुन बाढत चालली बेरोजगारी व गुन्हेगारी , गरिबांसाठी २ वेळची भाकरी मिळणे मुश्कील होत असताना स्वस्त होत चाललेली ऐश-आरामाची साधने , ज्यावर अवलंबून राहायचे त्या मिडीयाचा बाजारूपणा, राखी सावंतचा छछोरपणा व तिला मिडीयाने डोक्यावर घेणे , दिपीकाचे कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलणे इ. इ. ..."
आता वर उल्लेखलेले प्रश्न मिडीयापण डिस्कस होतात पण त्यातून जे निश्पन्न होते अथवा ज्या मार्गाने ही चर्चा होते ते मनाला पटत नाही, हे पाहून गप्प पण बसवत नाही म्हणून "ब्लॉग लिहण्याचा" हा खटाटोप. कुणी वाचले, कुणाला पटले तर उत्तम जर नाही तर कमीत-कमी मी मुर्दाड मनाचा होत नाही याचे समाधान. आता नुसते लिहून काय होते हा प्रश्न आहेच, आमच्याकडून कॄती आवश्यक आहे हा सूर निघेलच. बरोबर आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा जेवढी शक्य आहे तेवढी कॄती घडेलच अशी अपेक्षा आहे [ खात्री आहे म्हणले तरी चालेल ...]
आता येवढे लिहून तरी काय मिळाले ? याचे उत्तर "मानसीक समाधान" असे देण्यास हरकत नाही ....

Friday, March 14, 2008

"प्रपोज करणे" आणि नकार पचवणे ....

काय हो , तुम्ही कधी कुठल्या मुलीला "मागणी घातली " आहे का ? मागणी म्हणजे जी 'चहा-पोह्याच्या' ऑफेशियल कार्यक्रमात घालतात तसली नाही तर स्वताच काही तरी "टाका भिडवून" म्हणतो मी. कसा वाटला तो अनुभव ?एकतर अगदी "आस्मान छू लिया" ची भावना झाली असेल किंवा चांगलाच "पोपट" झाला असेल....तर मी काही आत्ता मी केलेला प्रपोज आणि मला मिळालेला नकार याची सुरस कथा [ तुमच्यासाठी हो , आमच्यासाठी कसली सुरस ?] सांगणार नाही .

तर "प्रपोज केल्यानंतर" मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे "मिळू शकतात त्याबद्दल काही....[ मला आलेल्या एका विरोपाचे स्वैर भाषांतर ..... ]

१. नाही SSSSSSS
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.
५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....
६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ...
७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....
११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६. होय, मला पण तू आवडतोस , पण तू माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?
१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे कोणतेतरी चांगले "गाढव" सापडले ]
१८. तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ....
१९. नालायका , तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?" [ त्यानंतर कदाचित एक छानशी कानफाडीत ...]
२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ...
तो : नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....]
ती : ७ जन्म .... [ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]
२१. नीच माणसा, मी तर एक "विवाहित स्त्री" आहे तरीपण ....
२२. सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे ....
२३. हा हा....हा हा हा.... हा हा हा हाही ही ... ही ही ही ... ही ही ही ही
२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचार नाही....
२५. मातीत जा ... मला त्याची पर्वा नाही ....
२६. तु माझ्यासाठी काय करू शकसिल ?
२७. मी कितवी आहे? हा हा हा ....
२८. मी तुझ्याबद्दल "तसला विचार' कधी केलाच नाही ...
२९. माझ्या भावाला भेट, तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल....
३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का?
३१. पण तू तर "सपना च्या" मागे होतास , तिने काय थप्पड वगैरे मारली का ?
३२. किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?
३३. " जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाक, माझ्या मुलाची शाळेतून येण्याची वेळ झाली आहे..."
३४. कित्तीSSSS छान ....
३५. पुढच्या ४ महिन्यांची 'वेटिंग लिस्ट ' पन फुल्ल आहे ...
३६. क्काय SSSSS
३७. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ....
३८. मला वटतयं कदाचित मी "एंगेज" असेन ...
३९. मझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त चांगले "ऑप्शन" आहेत...
४०. मला ह्या गोष्टीबद्दल काहिएक बोलायची इच्छा नाही. त्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते .....
४१. माझ्या "बॉयफ्रेंडला" कळले तर तुला त्रास होईल कारण तो खूप तापट आहे ...
४२. खरेतर माझ्या 'चुलत बहिणीला' तू खूप आवडतोस म्हणून मग .....
४३. माझ्या आईला तुझे वागणे, बोलणे, चालणे आवडणार नाही .........
४४. "काय पाहिलसं असं माझ्यात ?????"
४५. सन्नकन एक कानाखाली [ शब्दापेक्षा कृती अधिक बोलकी ...]
४६. हाहाहा ... मला वाटलं नव्हत की तू येवढा चलू निघशीलं .....
४७. नाईस जोक ....
४८. तुम्ही मुल दुसरा कुठला विचार करू शकत नाही का ? कुठली चांगली मुलगी दिसली की लगेच लागले मागे ....
४९. अछ्छा तु पन का ? मला वटले की फक्त राहूल, दिनेश , रवि ... माझ्या मागे आहेत ... असे म्हणून चालायला लागते ........
५०. गाढवा, तुला तर व्यवस्थि प्रपोज पण करता येत नाही... पहिल्यांदाच करतो आहेस कस ? ठिक आहे, चल मी तुल शिकवते कसे करायचे ते ....

आपल्या पैकी मधिल कुणाला जर "यापेक्षा वेगळे उत्तर भेटले" असल्यास "शेअर करायला" हरकत नाही ....

Thursday, March 13, 2008

बेंगलोर आख्यान : भाग २ - आम्ही पण मराठी ....



बेंगलोरला आल्यावर व काही दिवस इथे मुक्त हुंदडल्यावर एक गोष्ट लक्षात आली की येथे "मराठी भाषा" जास्त कुणाला गम्य नाही. कशी असणार हो, इथे पहायला गेलात तर हिंदीचीच बोंबाबोंब आहे तर मग मराठी कोण बोलणार ? ह्या गोष्टीचा फायदा असा होतो की बाहेर फिरताना एखादी गोष्ट [ जनरली सुंदर कन्या ] आपल्याला आवडली किंवा दिसली तर आपण लगेच आपल्या भावना [ म्हणजे आपले जनरल, दिसायला अशी काटा आहे, फटाका आहे, कामाची नाही, काकूबाई आहे इ.इ...] आपल्या मित्रांना आपल्या मातृभाषेत सांगू शकतो व सगळे मिळून त्या गोष्टीवर डिस्कस करून अर्थपूर्ण निष्कर्ष काढू शकतात. याचा दुसरा फायदा असा की समजा एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडली म्हणजे हॉटेलची सर्वीस, रिक्षावाल्याचे अथवा बसकंडक्टरचे मुजोर वागणे, इथल्या काही लोकांचे प्रादेशिकपणे वागणे व मुद्दामुन बाहेरच्या लोकांना त्रास देणे तर अशा गोष्टींवरच्या आपल्या रागाचा कढ आपण आपल्या मातृभाषेत मनोसक्त शिव्या देउन काढू शकतो कारण समोरच्याला आपण काय बोलतो हे घंटा कळत नाही. [ मला वाटते की ते पण हाच मार्ग अवलंबत असावे. असो.] बरोबर आहे ना, कारण त्यांना कळेल अशा भाषेत आपण असे काही विवादास्पद बोललो तर फटके पडतील. म्हणून आम्ही अशा गोष्टीसाठी मराठीची कास पकडली. आमच्या तिथे आधिच २ वर्षापासून राहणाऱ्या मित्रांनी आम्हाला "जपून" असा सल्ला दिला पण ऐकेल ते आम्ही कसले ? आमचे हे प्रयोग चालूच होते पण एके दिवशी आमची मस्त लागली.... [ खूष होउ नका लगेच, मार वगैरे खाण्याची पाळी नाही आली ...]

साधारणता बेंगलोरला येउन १ महिना झाला असावा. एके दिवशी सुट्टीच्या दिवशी माझ्या एका मित्राला त्याच्या "व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेशपरिक्षेचे फॉर्म्स [ त्यापेक्षा एम बी ए एंट्रन्स म्हतलेले काय वाईट ? ] " आणायचे होते. ते फॉर्म्स साधारणता सरकारी बँकांच्या शाखात मिळतात. तसा आमचा "शनिवारचा " काही खास प्रोग्राम नसल्यामुळे त्याने मला "चल तुला बेंगलोर दाखवतो !" असे लालूच दाखवले. मला पण तसे बोअर झाले होते म्हटले चला मस्त फूक़टचे फिरायला मिळेल [ कारण मधल्या सर्व वाहतूक, चहा-पाणी-बिडी इ. खर्चाची जबाबदारी त्याने उचलली होती.] व तो म्हणतोय त्याप्रमाणे बेंगलोरही पाहणे होईल म्हणून मी तयार झालो. आता ती बँक एका "हाय-प्रोफाईल रोड ज्याला ब्रिगेड रोड" म्हणतात येथे येत असल्यामुळे तेथे मस्त सुंदर मुलींचा ताटवा फुललेला असतो अशी एक नवीन माहिती एका मित्राने दिली. बहूतेक यामुळेच का काय आमचा अजून मित्र बरोबर यायला तयार झाला...


तर अशी मजलदरमजल [ म्हणॅजे नक्के काय कोणाला माहित ? व ती कशी करतात हे उपरवाला जाने ] करत आमची स्वारी त्या बँकेत साधारणता १०.३०-११ ला पोहचली. अजून फॉर्म्सची मुदत बरीच असल्याने बँकेत जास्त गर्दी नव्हती कशाला आम्ही तिघेच कडमडलो होतो. साधारणता बँकेचे सर्वेक्षण केल्यावर आमच्या असे लक्षात आले की ही बँक जास्त काही "बिसी" वाटत नाही व त्यामुळेच तिथले कर्मचारीही आम्हाला एकदम निवांत वाटले. आमच्या कामाच्या मित्राला "तू तेरा रास्ता नाप " असे सांगून आम्ही दोघांनी कोपऱ्यातला एक रिकामा [ तसे सगळेच रिकामे होते ] कोच पकडला व त्याच्या आसपास पडलेली बँकेची कागदपत्रे वाच, पेपर चाळ, कन्नडमध्ये लिहलेल्या अगम्य सुचनांचा अर्थ लावण्याचा निष्फळ प्रयत्न कर असे कुटाणे करत बसलो. व त्याच्याबरोबरच आमच्या निर्धास्तपणे "मराठीतून बँकेच्या सद्यस्थितीबद्दल कमेंट्स" चालूच होत्या ।

आता तुम्हाला सांगायचेच म्हटले तर ...........
" च्यायला बँकेचे दुकान काय जास्त चालत नाही असे दिसतेय ?"
"हा ना, बघ सगळे कसे निवांत पडले आहेत "
"आत्ताच पोतभरून इडली-डोसा हादडून झाला आसेल , मस्त आत एसी चालू आहे , द्या ताणून तिच्यायला ...."
"खरच राव, आपण गेल्यावर पुन्हा एकदा राईस हाणतील आणि खरच टेबलं जोडून झोपतील राव ..."
" खी खी खी ..."
"ह्या ह्या ह्या ...... "
यावर आमच्या समोरच बसलेल्या एका पोक्त बाईने डोळे वटारून आमच्याकडे पाहिले व हातानेच "शूउउउउ" अशी खूण केली ।
यावर माझा मित्र
" गप ना भो *** [ आता याला पर्याय नाही. पटकथेची गरज म्हणून आम्हाला असे शब्द ताकावेच लागतील. "हे एकदा म्हटले की झाले तुम्ही मोकळे कसे पण **नाच घालायला. तर असो....], झोप मोडलीना त्यांची ..."
"सॉरी मॅडम , झोपा तुम्ही निवांत [हे हळू आवाजात ...]"
"खी खी खी !!!!"

त्यातूनच आमच्या एका मित्राचे त्या पोक्त बाई शेजारी बसलेल्या एका तरूण व सुस्वरूप म्हणाव्या अशा कन्येवर "टप्पे टाकणे " चालू होते. मीच त्याला "गप ना भा ***" म्हणून दटावले.
तेवढ्यात आमच्या कामाच्या मित्राला खिशात आवश्यक पैसे नसल्याचा साक्षात्कार झाला. यावर "भाड्या, तुला आधी अक्कल नव्हती का ? करा तुम्ही येड्यासारखे बाहेरपण, म्हणून तुला आम्ही कोठे न्हेत नाही " अशी मुक्ताफळे ऐकल्यावर तो बँकेच्या तळमजल्यावर असणाऱ्या त्याच "बँकेच्या ए टी एम " मध्ये गेला. आम्ही आपले तो गेल्यावर "ए टी एम" किती जूने असेल, त्यावर किती धूळ बसली असेल, त्यामुळे मित्राला चक्कर येउन तो बेशूद्ध पडेलि इ.इ. लांबड लावायला सूरवात केली. आमचा आवाज थोडा वाढल्याने व कदाचित त्यांची झोप मोडल्याने बँकेचे कर्मचारी उठून आमच्याकडे पहायला लागले. मग मात्र आम्ही आवरते घेतले. ५ च मिनिटात खाली गेलेला आमचा दोस्त "मशिनमध्ये कार्ड अडकल्याची तक्रार" घेउन आला....

पुन्हा एकदा जोरदार हास्याचा बहर ओसरल्यावर व " माझ्या मित्राची व बँकेच्या जुन्या सिस्टीमची व्यवस्थीत काढून झाल्यावर " मी व माझा मित्र ते कार्ड परत मिळवून देण्याची जबाबदारी असलेया माणसाच्या शोधाला लागलो. त्या महाभागाने आम्हाला " कोण ? कुठले? कसे काय कार्ड अडकले ? कोणाकडून आडकले ? कुणाचे आहे ? कोठे काम करता ? काय काम करता ? कोठे राहता ? फुकट राहता की विकत राहता ? वापरता येते का नाही ? पुन्हा अडकल्यास काय करायचे? आम्हाला तेवढ़ेच काम आहे का ? " अशा अनेक सरकारी व असंबद्ध प्रश्नाची फैरी झाडल्यानंतर कार्ड काढून देण्याची तयारी दाखवली. आम्ही तो म्हणतोय ते सगळे कबूल असल्याचे व पुन्हा असे करणार नाही अशी ग्वाही दिल्यावर त्याने कार्ड काढून दिले. आमचा मित्र ते घेउन पुन्हा पैसे आणायला गेल्यावर मी तिथे बसलेल्या माझ्या मित्राला ही हकिकत ऐकवली व आम्ही दोघे पोट धरून हसलो.

हे सर्व चालू असताना तेथील कर्मचारी आमच्याकडे थोडे रागाने पहात असल्याचे लक्षात आल्यावर आम्ही शांत बसलो. मित्र पैसे घेउन आल्यावर व आवश्यक ती कागदं भरून झ्याल्यावर ज्या ठिकाणी पैसे भरायचे आहेत तो "कॅशिअर" जागेवर नसल्याचे लक्षात आले. यावर " तो झोपला असेल, चहा पित असेल, घरी गेला असेल, भाजी निवडत असेल, भांडी घासत असेल , पोराला आंघोळ घालत असेल , चौकात बिड्या फुंकत बसला असेल " असे तर्क लढवून झाल्यावर १० मिनीटांनी तो 'सद्ग्रहस्थ' आला. माझ्या मित्राने सर्व सोपस्कार पूर्ण करून फॉर्म्स ताब्यात घेतले व आम्ही निघण्याची तयारी केली...................
आता निघाणार तेवढ्यात समोर बसलेली ती पोक्त बाई [ हो तीच आम्हाला शूउउउउ करणारी ] चक्क मराठीत माझ्या मित्राला म्हणाली " बाळ, फॉर्म्स व्यवस्थीत चेक करून घे . नाहितर पुन्हा घोळ करशिल..... " आमचा पार फ्युज उडला. माझा दुसरा मित्र तर चक्क बाहेर पळून गेला. मग उरलेल्या आम्ही दोघांनी आपले " आपण मराठी का ? कुठल्या ? मग इथे कशा ?" असे पांचट व सावरासावरी करणारे प्रश्न विचारले व बाजू संभाळायचा प्रयत्न केला. त्यावर ती बाई मुळची "पुण्याची" [ कळले ना, आत्तापर्यंत गप्प का होती ते ?] असल्याची माहिती दिली. आम्ही मग " बरं आहे, अच्छा मग, येतो " मह्णून तिथून काढता पाय घेतला. बाहेर पडताना चोरून वळून पाहिले तर ती पोक्त बाई व ती सुस्वरूप कन्या काहितर गुलुगुलु बोलत हसत होत्या, मग मात्र आम्ही जोराने धूम ठोकली

बाहेर आलो तर आमचा पळालेला मित्र बँकेच्या १०० पाउले दूर जाउन कोपऱ्यात उभा होता. आमच्या पळालेल्या मित्राला बाहेर आल्यावर तो "गुलुगुलु गप्पांचा " किस्सा सांगितल्यवर तो एकदम दिगमुढ का काय म्हणतात तसा झाला व म्हणाला "च्यायला, म्हणूनच एवढ़्या खुन्नस ने बघत होती ...." मग पून्हा आम्ही "खदाखदा हासून घेतले" व वाटेस लागलो [ कसले, आमचीच वाट लागली म्हणा ना ]...

त्यानंतर आम्ही बरेच इकडे तिकडे हिंडलो, बरेच काही पोटात ढकलले व पोट व डोळे अगदी मनोसोक्त भरल्यावर आम्ही रूम वर परत निघालो. जाताना रिक्षाने जायचे ठरवले. रिक्षात बसल्यावर सकाळची घटना आठवून व दिवसभरात दिसलेल्या काही प्रेक्षणीय गोष्टींविषयी आमची चर्चा आपल्या "मायमराठीतून" चालूच होती. आमच्या असे लक्षात आले की रिक्षावाला आम्ही काहि विनोदी बोललो की हसत आहे व सारखे सारखे आरशातून मागे वळून पहात आहे. मला तो मराठी असल्याचा संशय आल्याने मी मित्रांना "जपून" अशी खूण केली. त्यावर आम्ही बोलण्यातून सगळे "हिंदी व इंग्रजी शब्द वगळून" शुद्ध मराठीत बोलणे सुरु केले. आमचा मित्र त्यावर म्हणालासुद्धा " ऐक आता, घंटा कळणार नाही तुला ".
या गोष्टीमुळे आमचा थोडा चर्चेचा ट्रॅक बदलून तो "रिक्षावाला" यावर केंद्रित झाला।
मग नेहमीप्रमाणे
"त्याला म्हणावं समोर बघून चालव"
"च्यायला बघतय एकीकडे, ऐकतय एकीकडे , चालवतयं तिसरीकडे "
"नाही पण, चालवतोय चांगलं, एकदम निवांत चालू आहे"
"त्याला वॉर्निंग आहे, कुठल्याही परिस्थितीत ओव्हरटेक करायचा नाही व स्पीड ४० च्या वर न्यायचा .............नाही "
"बहूतेक नवीन असावा ...."
"तो नवीन नाही , रिक्षा नवीन आहे ...."
"नवीन म्हणजे सेकंडहॅन्ड नवीन आहे असे तुला म्हणायचे आहे का ?"
"जावू दे, मी झोपतो, घर आले की उठव मला "
"भा ** , झोपतो काय ? तो बघ पडीकडच्या गाडीवरचा माल .... "
अशी आमची मुक्तफळे चालू होती. शेवटी घर आल्यावर आम्ही उतरलो, जेवढे झाले तेवढे पैसे दिले व आता निघणार तेवढ़्यात तो मला म्हणाला "भाउ, किती वाजले रे ?" आता मात्र एक सेकंद न थांबता माझे दोन्ही मित्र पळाले, माझ्याजवळ तोही ऑप्शन नव्हता. मग मी आपले " नमस्कार, मराठी का ? कुठले ? आमचे बोलणे समजले का ? तुमच्याविषयी बोललेल्याचा राग नाही ना आला ? सॉरी " अशी सावरासावर केली . त्यावर तो म्हणाला "मला आधेच कळले होते पण म्हणले बघु काय बोलतात ते, राग नाही आला पण लै मज्जा वाटली " मी आपले " बरयं , ठिक आहे ..." म्हणून रूमवर गेलो व पाहतो तर काय "रूमवरचे सगळे चांडाळं चांगले गडाबडा लोळत हसत आहेत. मग काय करता , मी पण त्यांच्यात सामील झालो ....

तर तात्पर्य काय ? बचके रहना रे बाबा . आपल्या माउलींची मराठी पार कानाकोपऱ्यात पोहचली आहे आणि ती केव्हा तुमचा कान पकडेल याचा काही नेम नाही .....

Wednesday, March 12, 2008

सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती ! धन्यवाद ...

पुणेरी माणसाला पुणेरी मराठीच समजते। म्हणून मानवीय स्रोत विभागाने (Human Resources Department) सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती आहे.
काही उदाहरणे देत आहोत .................

* Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks ..............
रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसूच नये.

* Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls ..........
ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी नाही

* Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first ...............
ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही . सुटली तरी चालेल .

* Please don't use the same elevator in case the same is being used by an associate along with client ...............
ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही .

* Avoid speaking in regional languages within the office premises ..............
गावच्या गप्पा घरी.

* Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette buds only into ash pans provided for ...............
ही जागा तुमधे तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडी चा वापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत . गुमान बूड त्याच्यातच विझवा. ऑफ़िसचा मालक तुमचा बाप नाही .

* When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office .............
शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही

* Please keep a check on the noise levels in the pantries ............
संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसं आहोत.

मला आलेल्या एका विरोपातून साभार ...

Tuesday, March 11, 2008

जमाव असा का वागतो ?

आज सकाळी पुणे मं.पा. येथे जमावाने ५० पेक्षा जास्त पी.एम्.टी. फोडल्या.
कारण काय तर एक १२ वर्षाचा मुलगा सायकलवरून जात असताना पी.एम्.टी. च्या चाकाखाली आला.
रस्त्यावर सगळीकडे काचाच काचा होत्या.
खूप विचार करूनही ठरवता येईना जमावाची ही क्रुती चूक की बरोबर?


मी आधीच कबूल करतो की बसच्या चाकाखाली मुल येणे ही खरच वाईट व गांभिर्याने घेण्यासारखी घटना आहे। जर त्या मयताच्या कुटुंबियांच्या बाजूने विचार केला तर त्यांच्यासाठी हा मोठ्ठा धक्का आहे. त्यामुळे चिडून कदाचित जमाव तोडफोड करत असावा ....

पण आपण कधीतरी त्या "बसड्रायवरच्या" बाजूने पण विचार करायला हवा. माझा अनुभव तर असा आहे की अशा प्रकारच्या अपघातात शक्यतो चूक बस ड्रायवरची नसतेच. तोच आपला बिचारा जीव मुठीत घरून बस चालवत असतो. मला सांगा "पुणे , मुंबई , बेंगलोर ,दिल्ली " अशा प्रचंड वाहतूक असनार्‍या रस्त्यावर बस चालवणे काय जोक आहे का ? त्याला तेवढा अकलेचा भाग व माणूसकी नाही का की तो ऊगाच आपले कुणाच्या अंगावर बस चढवेल? तो काय विकॄत आहे का ? आपण हा का विचार करत नाही की चूक गाडीखाली आलेल्या माणसाची असू शकेल. आजकाल जो तो ट्राफीक मधून पुढे पळण्यासाठी पायजे तसे टर्न घेत असताना चूक एकट्या त्या बसड्रायवरची मानून फोडाफोड करण्यात काय हाशिल ?

माझी थेअरी सांगतो, हे असे करणारे लोक जनरली "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" असतात किंवा अशा परिस्थितीचा फायदा उठवण्यात वाकबगार असे "समाजविघातक गुंडे-मवाली" असतात. सामान्य माणूस यात कधीही उतरत नाही. यांना "फुकटचे , आयते व हरामचे खाऊन" माज आलेला असतो, रक्तात एक रग निर्माण झाली असते मग ती उत्रवणार कुठे ? मग फायदा ऊठवा असल्या संधींचा , करा तोडाफोड .....
ह्यात ह्यांचा फायदा म्हंजे आपला हात धूऊन घेता येतो, जमलेच तर चार पैसे मिळवता येतात, आपल्या नेत्यांच्या डोळ्यात भरण्यासारखे कार्य (???) करता येते [ कारण हे तर समाजासाठी चालले आहे ना ?] व वर फूकटची प्रसिद्धीही मिळते कारण आपल्यासारखा "सवंग व प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारा मीडिया" आख्या जगात नाही....लगेच हे लोक कॅमेरे व माईक घेऊन धावतात, कुणाचीही मुलाखत घेतात, तोडफोड करणार्‍या महाभागांचे कव्हरेज घेतात व ते टीव्हीवर हजारदा दाखवतात ....आणि एकदा का ह्या "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" वा "समाजविघातक गुंडे-मवाली" लोकांना टीव्हीवर मिरवून त्यांच्या कार्याचे सार्थक झाले की ते आयुष्यभर "समाजसेवक" म्हणून मिरवायला मोकळे मग पुढच्या निवडणूकीत कमीतकमी "नगरसेवकाचे तिकीट " तरी कुठे जात नाही , झाला राजकारणाच्या गटारीत त्यांचा प्रवेश. मग अशी ही सुवर्णसंधी हे लोक का सोडतील हो ?

राहता राहिला प्रश्न देशाच्या संपतीचा , तर त्याची काळजी आहे कुणाला ? काय संमंध आमचा त्याच्याशी ? तुम्ही आमाला विचारणारे कोण ? देशाची संपत्ती म्हणजे शेवती जनतेचीच ना ? मग आम्ही बघू त्याचे काय करायचे ते , ती फोडून टाकायची का लोटून खायची ........

जय महाराष्ट्र , भारत माता की जय ...

Wednesday, March 5, 2008

"केस कापणे : एक (दुर्दैवी) अनुभव .......... "

अशी शक्यता आहे की तुम्ही लोक लेखाचे शिर्षक "केस कापणे : एक (दुर्दैवी) अनुभव" वाचूनच गोंधळात पडला असाल! बरोबर आहे ना , त्यात असा मोठा तीर मारला मी "केस कापून" ? त्यात काय नविन ? का आपलं आम्ही वाचतो म्हणून काही पण लिहाल ? तुमचं हे तर 'सुभाष घाई, रामु आणि करन जोहर सारख्या मंडळींच्या वर झाले , कारण त्यांचा असा विश्वास आहे की आपण काही पण दाखवले तरी लोक बघतातच ना, मग नंतर घालेनात का शिव्या आपले तर तुंबडी भरायचे काम झाले आहे... असो. तर खूप विषयांतर झाले, या "फिल्म-इंडस्ट्री' वर लिहण्यासारखं बरचं काही आहे पण तर नंतर कधीतरी ....

आस्मादिकांच्या "ब्लोग" वर भेट दिलेल्या सज्जनाच्या लक्षात असेलच की आम्हाला "केस वाढवण्याचा शौक " आहे. तर त्यानुसार आम्ही बऱ्याच काळापासून ( वर्षापासून) मानेवर रूळण्यापर्यंत मोठी केशसंपदा ( च्यायला असे मोठे शब्द आठवून लिहूस्तोवर दम लागतो , पण करणार काय त्याशिवाय लेखाला वजन येत नाही. ) बाळगून आहोत. त्यां शिंच्या "जॉन अब्राहम" की काय त्याने नंतर आमची नक्कल केली व 'बिपाशा' पण पटवली, आम्ही आपले इथेच. असो [ म्हणावेच लागेल, दुसरं काय ?]. साधारणता क़ॉलेजला असल्यापासून आम्हाला हे खूळ लागले व आम्ही ते खूप आवडीने जोपासले, त्याला खतपाणी (म्हणजे शाम्पू, हेअर क्रीम चा खूराक ) घातले व त्याचा परिणाम म्हणजे आमची १०० लोकात उठून दिसणारी "हेअर-स्टाईल" (गेले ते दिवस आता , सध्या आम्हाला १०० सोडा हो १० लोकात जायला कसेतरीच होते ).

महिन्यापूर्वी पर्यंत आमची तैनाती "पुणे प्रांती" असल्यामुळे आम्हाला हा 'केशसंगोपनाचा' छंद जोपासताना तसा काही त्रास झाला नाही कारण म्हणजे जेव्हा कधी केस कापण्याची पाळी यायची तेव्हा "आपले लोक, आपला प्रांत व आपली भाषा ( मग ती हिंदी का असेना) जाणणारे लोक" असल्यामुळे नेमकी कशी 'हेअर स्टाईल पाहिज' हे आम्ही व्यवस्थीत पणे "केशकर्तनकाराला" [ गेले ते दिवस आता न्हावी म्हणायचे] समजावून सांगत असू व आश्चर्य म्हणजे त्याला पण ते समजत असल्याने आमचा कधी "पोपट" झाला नाही. आह, काय दिवस होते ते ? खरचं मस्त ... पण आस्मादिकांच्या लक्षात असेल की काही 'अंतर्गत राजकारणामुळे' आम्हाला 'पुणे प्रांताची' चाकरी सोडून ह्या अनिळखी 'कन्नड' भाषा असलेल्या 'बेंगलोर प्रांतात चाकरी पत्करावी लागली. येथे येताना आमच्या मनात धास्ती होतीच की "या केसांचे काय करायचे आता ?" बेंगलोरला जायच्या आधीच "ह्या कूल हेअर स्टाईल " ला तिलांजली द्यायची व चंपक बनून जायचे का तिव्ह्यायला होईल ते बघू म्हणून बिनधास्त राहायचे ? शेवटी बऱ्याच विचारांती आम्ही 'केशसंभार' जतन करण्याचा निर्णय घेतला...

बेंगलोरला नव्या कंपनीत दाखल झाल्यावर ह्या मोठ्या केसांमुले बरेच फायदे झाले. एकतर आमची ऑफीसमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झाली, चांगल्याचांगल्या मुलांशी ओळखी झाल्या , आम्हाला वरच्या वाऱ्याला लागलेले पोर समजून कंपनीतले घासू व चाटू लोक दूर राहू लागले, कंपनीच्या "टेबलटेनीसच्या टीम" मध्ये सिलेक्शन झाले [ त्या एच. आर. च्या पोरीला माझ्या खेळापेक्षा माझे खेळताना उडणारे केस आवडले व तिने मला हे म्हणून दाखवले.]... त्यामुळे पहिले काही दिवस मजेत गेले. पण नंतर जेव्हा केसांना पुन्हा एकदा व्यवस्थीत वळण व शेप द्यायची पाळी आली तेव्हा आता आपल्या केसांचे काय टारले होणार याच्या चिंतेने माझी 'रातोंकी निंद हराम' झाली. काही निवडक दोस्तांबरोबर ठिकठिकाणच्या 'केशकर्तनालयांचे सर्वेक्षण ' केल्यावर 'बेंगलोर' हे आपल्याला केस कापण्यासाठी योग्य ठिकाण नाही अशा निर्णयांती आम्ही पोहचलो. याचे कारण म्हणजे इथल्या 'कारागीर'लोकांना "कन्नड" सोडून अवगत नसलेली दुसरी भाषा, इथल्या 'दक्षिण भारतीय' केशसंभार ' पद्धतीचे त्यांच्या हाताला पडलेले वळण, हिंदी शिकण्याची इछ्छा नसणे व इंग्रजी न येणे अशा अनेक अडचणी समोर आल्या व त्यामुळे आम्ही 'बेंगलोरमध्ये केस न कापण्याची प्रतिद्न्या केली। जेव्हा जेव्हा केस कापण्याची पाळी आली तेव्हा तेव्हा मी काहितर कारण काढून 'पुण्याच्या दिशेने धाव' घेतली व यशस्वीपणे माझी हेअर स्टाईल संभाळली...

असे साधारणता ६ महिने गेल्यावर मागच्या आठवड्यात 'फिरंग्यांच्या भारत भेटीची तयारी करा ' असा मेल आला. त्याच वेळी आमचा पुण्याला जायचा प्लान चालू होता ( कारण केस वाढले होते) पण या अचानकच्या संकटामुळे आमचे पार धाबे दणाणून गेले. भेटीची तयारी म्हणजे केस कापणे आलेच व आता पुने त्रीप ची शक्यता नसल्या मुले ते इथेच बेंगलोरला कापणे आले. यावर आमच्यावर जळणाऱ्या काही 'टकलू जमातीतील' मित्रांनी " अब आया उंट पहाड के निचे" असा कूजकट शेरा मारला पण आम्ही त्याच्याकडे दूर्लक्ष केले, आम्ही म्हणले " जलते है तो जलने दो "

आखेर तो घातवार [ पक्षी शनिवार] उगवला , आमचे चांगले चिंतणाऱ्या एका दोस्ताला बरोबर घेउन मी 'केस कापण्याच्या मोहिमेला' निघालो. बऱ्याच दुकानात कुणाला हिंदी अगर इंग्लिश येत नसल्या कारणाने आम्हाला तेथून काढता पाय घ्यावा लागला. शेवटी एका दुकानात एक महान 'कारागिराची गाठ ' पडली , त्याने डायरेक्ट हिंदीतच 'हा कोई बात नही, मै बराबर फीट करता हूं" म्हणून मला दिलासा दिला. मी आणि माझ्या मित्राने सर्व परिस्थीती म्हणजे दूकान व दूकानदाराची कंडीशन याची चाचपणी करून आपल्यावर ''केशसंस्कार" करून घेण्याचा निर्णय घेतला. मग पुढचे १० मिनिट त्या महान माणसाला "कुठले केस कापायचे, कुठले नाही कापायचे, जे कापायचे ते किती कापायचे, जे नाही कापायचे ते किती नाही कापायचे, कुठले केस कुठे वळवायचे " यावर बौद्धिक घेतले. त्याने पण "पर्वा नही, सब फीट कर दूंगा" अशी वाक्ये फेकून चैतन्य निर्माण केले. यानंतर मी माझा "चष्मा काढून" त्या "सुळावर चढलो" व माझ्या मित्राने 'फिल्मफेअर मासिकात ताजे ताजे फोटो' बघण्याच्या उदात्त कार्यात स्वताला गूंतवून घेतले. तर प्रोब्लेम असा आहे की एकदा चष्मा काढल्याव्र बऱ्यापैकी दूर अंतरावर असणाऱ्या आरषात आपल्या डॉक्याचे काय टारले होउन त्याचे पक्षाचे घर्ते होत आहे हे बिलकूल कळत नाही, त्यामुळे पुन्हा आम्ही त्याला सगळी कृती रिपीट केली व त्याने पण "पर्वा नही" अशी ग्वाही दिली. त्याने कात्री वगैरे पराजून माझ्या कानावर रूळणार्य़ा केसाच्या एका झूपक्याला हात घातला, लगेच मी त्याला "आरामसे" असा सला दिला व त्याने नुसतीच मान डोलावून समजले असल्याची खूण केली. पण हाय रे माझे कर्म ! त्याने डायरेक्ट त्या झुपक्याचा "लचाकाच तोडला" व केसांची लांबी ओरिजनलच्या फक्त ३० % करून टाकली. मला नक्की काय ग़्हडले आहे याची कल्पना आली व मी पटकन चष्मा चढवला "पर अब देर हू चूकी थी", मी त्याच्यावर चिडून त्याला खडे बोल सुनावले, त्याच्या कौशल्यावर टीका केली पण यामुळे त्याचा चेहरा खूनषी व नाखूष दिसाय लागला. मग मला पुढे वाढून ठेवलेल्या संकटाची कल्पना आली. आत्ता शांतपणे जे काही होत आहे ते सहन करण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता करण मी जर अजून त्याला डिवचले तर तो अजून माझी दूर्दशा करण्याची शक्यता होती. त्याचे सगळे प्रयोग संपल्यावर त्याने " हा साब, हो गया एकदम परफेक्ट" असा निर्वाळा दिला,. मी चष्मा लाउन माझ्याकेसांकडे पाहिल्यावर माझे डोळे ओले व्हायची वेळ आली. ती हेअर स्टाईल फार फार तर "शेतात काम करणारे गडी , खेड्यातले लहान मुल, कॉलेजमध्ये पुढे पुढे करणारी टीपिकल भावमारू पुनेरी पोरं, गावात येड्यासारखे हिंडणारी चंपक " लोक यांच्या लायकीची होती. पण आता वेळ गेली होती. त्याने केलेल्या " महान कार्याबद्दल " त्याचे आभार मानून मी घरी परतलो।

आल्याआल्या रूमवरच्या चांडाळांनी गदाबळा लोळत हसून घेतले व त्यावर कडी म्हणजे लगेच "मोबाईलवर फोटो " काढून तो "इंटरनेट द्वारे आख्ख्या जगभर पसरलेल्या आमच्या मित्रांना " व्यवस्थीत वर्णनासगट पाठवून दिला...
दुसऱ्यादिवशी ऑफीसमधे तर विचारू नका, लोक काहितरी कारण काढून हळूच केबिनमध्ये यायचे व बाहेर जाताना हसत निधून जायचे, आमच्या ड्रायव्हरने ने पण " साब, वही अछ्छा लगता था, ये एकदम बोगस है" असा शेरा मारला, मुलींचे तर विचारू नका त्यांना "रूमालात किती हसू आणो किती नको" असे झाले होते....

तर अशी ही माझी "अनोळखी भाषा बोळणार्य़ा प्रदेशात केस कापण्याच्या प्रयोगाची कहाणी साठाउत्तरे 'दु'ष्फल संपूर्ण ........

आता तुम्ही पण माझ्यावर पोट घरू धरू हसा बर का ............

Monday, March 3, 2008

"कसं जगायचं , कसं वागायचं ? कुणी सांगेल का मला ?????

"प्रशांत दामलेंच " एक मस्त गाणं आहे बघा
"कसं जगायचं , कसं वागायचं ?
कोणी सांगेल का मला ? "
अशीच माझी अवस्था झाले आहे आज। का म्हणून काय विचारता ? सांगतो ..........

काल मस्त सुट्टी घेतली आणि आज जरा फ्रेश मूड मध्ये कार्यालयात आलो . आल्यावर नेहमीच्या प्रघातासारखे काही महत्वाच्या व्यक्तींना "गूड मॉर्निंग घालून" झाल्यावर [ त्या बाबतीत आम्ही अगदी 'बापू काण्यांच्या' हातावर हात मारला आहे] आमचा 'मेलबॉक्स' ऊघडला. पाहतो तर काय एकूण ५२ 'अनरीड मेल्स ". म्हटलं बरं झाले, लोकांना आमची अनुपस्थीती जाणवल्याने त्यांनी प्रेमाने चौकशी करण्यासाठी केल्या असतील ....
पण हाय रे कर्म , बहूसंख्य 'मेल्स' आमच्या दोस्तांनी / सहकार्यांनी पाठवलेल्या आणि सगळ्या अनंत वेळा "रिपीट" झालेल्या.... च्यायला डोक्याची पार मंडई झाली यामुळे, मूडचा पार **** वाजला ....तुम्ही म्हणाल "काय असतं हो या मेल्समध्ये ? " की ज्यामुळे माझी येवढी चिडचिड झाली ..........
सगळे सविस्तर सांगतो .......
ऊठसूट आज कोणीही कोणाच्याही बंगल्याचे फोटो पाठवतो , हा काय तर फ्रेंच राजवाडा की जिथे 'मित्तलच्या पोरीचे लग्न झाले , हा पहा 'दुबईच्या किंवा ब्रुनोईच्या सुलतानाचा १७६० खोल्या असलेला महाल , हा बिल गेट्सचा प्रासाद , हे जगातील एकमेव '७ स्टार' दर्जाचे हॉटेल , हा जगातला सगळ्यात मोठ्ठा 'कॅसिनो' , हा पाण्यावरच तरंगता महाल , इत्यादी इत्यादी
............................ मला सांगा काय करायचे हो आपल्याला त्याच्याशी ? एकदा पाहिले ठीक , दुसर्यांदाही ओके पण अरे पण कितीदा ?ईथे घरापासून दूर राहता जिव किती तडफडतो ते आम्हालाच माहित। ते सोडा, ह्या नोकरीमुळे घराची संकल्पना फक्त 'दिवसभर कंपनीत राबल्यानंतर रात्री पालथे पडण्यासाठी वापरली जाणारी जागा' अशी उरली असताना काय करायचे हो दुसर्याचे राजवाडे बघून ?आम्हाला तर आमची 'गावाकडची चंद्रमौळी झोपडीच प्यारी ' असे असताना हे 'जूलमाचे प्रासाद दर्शन' कशासाठी ? का फूकटची 'मेल्स' चीसुविघा आहे म्हणून तिचा आधाश्यासारखा वापर कशासाठी ?

अजून एक गोष्ट म्हणजे "प्लीज डोन्ट इग्नोर " या शिर्षकाखाली ढिगाने येणारे मेल्स। यात नेहमी कुठल्या तरी 'मुलीला अथवा मुलाला त्याच्या गंभीर आजारातून मुक्त होण्यासाठी त्वरीत मदतीची अपेक्षा असते', मग तूम्हाला जर खरच कळकळ वाटत असेल तर कुठल्यातरी अलाण्याफलाण्या 'स्वयंसेवी संस्थेला' संपर्क करा अशी तळतीप असते. .............
.............. मला माहित आहे की ही बाब काही वेळेला खरी आणि गंभीर असू शकते पण किती वेळा मदत मागाल ? मी स्वता अशा वेळी गंभीर होऊनआत्तापर्यंत २ वेळा मदत केली आहे. पण आता वाटते की कसली खात्री की मदत योग्य ठिकाणी पोहचते व त्या गरजवंताची गरज भागते ?तुम्हाला सांगतो की "ऍमी ब्रूस नावाच्या ७ वर्षाची मुलगी की रक्ताच्या क्षयाने आजारी आहे व तिला मदत हवी आहे " या आशयाचा मेल मलागेली ३ वर्षे नियमाने येत आहे, "त्या" संस्थेचे नाव घेत नाही कारण फारच 'स्वंयंसेवी ' असल्याचा ते आव आणतात। तुम्ही पैसे कमवा हो ,आम्ही तर दुसरे काय करतो , पण त्यासाठी हा मार्ग कशासाठी ?
"हा मेल तुम्ही १० जणानां 'फॉरवर्ड' करा तुम्हाला नोकियाचा लेटेस्ट मोबाईल मिळेल , 'डेल' चा लॅपटॉप मिळेल, मलेशियाच्या ५ स्टार हॉटेलचे फ्री पासेस मिळतील , सोन्याचे नाणे मिळेल , गोव्यामध्ये क्रूझवर ऐश करायला मिळेल " तत्सम मेल्स् ..........अथवा "तुम्हाला 'मायक्रोसॉफ्ट्ची लॉटरी लागली आहे , गूगलकडून तुमच्या 'आय सी आय सी आय " च्या खात्यावर १०००० रुपये जमा होतील "............
...................... काय अर्थ आहे याचा ? पैसा खरचं का इतका 'ईसी मनी आहे ?" ज्याला खरचं अश्या गोष्टींपासून लाभ झाला आहे अशी एकही व्यक्तीमाझ्या पाहण्यात अथवा संपर्कात नाही । मग हे सगळे का ?आम्हाला जेवढी अक्कल्ल परमेश्वराने दिली आहे आणि आम्ही जेवढे कष्ट करतो व त्यातून आम्हाला जो काही मोबदला मिळतो त्यात जर आम्हीखूष असेन तर ही मोहाची आवताणे कशासाठी ? लहानपणी दिक्षा घेताना " आरामाचा आणि हरामचा पैसा पचत नाही " असे बाळकडूमिळाले असताना हा मोह कशासाठी ? स्वकमायीत घेतलेला साधा 'नोकिया फोन', पोटाला चिमटा काढून वडिलांनी घेऊन दिलेला 'पहिलाकॉम्पुटर ' , कामाच्या रगाड्यातून वेळ काढून घरच्यांबरोबर घालवलेली ४ दिवसांची 'साघीच सुट्टी ' यातिल मजा त्यात आहे का हो ?

"हा मेल डायरेक्ट शिर्डीवरून, सिध्धीविनायकाकडून, तिरूपतीहून, हाजीअली अथवा असल्याच कुठल्या ठिकाणावरून आला आहे त्यात सांगितल्याप्रमाणे करा तुमच्या सगळ्या 'विश ' पूर्ण होतील , तुमच्या स्वप्लातील 'मलिका' तुम्हाला मिळेल ...."
" ही तिबेटीयन टेस्ट पास करा तुम्हाला तुमची आवडती मुलगी मिळेल ".............
................ खरं सांगतो , कशाला रिस्क घ्या म्हणून आत्तापर्यंत कमीत कमी ५०० मेल पाठवले . त्या हिशोबाने 'श्रीक्रीष्णा' येवढ्या १६१०८ नाही पणकमीत कमी १०० मुली तरी मिळायला हरकत नव्हती , पण केलेल्या प्रयत्नातच दम नव्हता हे सत्य मला आत्ता उकलले .....कमाल आहे की नाही या गोष्टीची ?
सगळ्यात डोक्याला किडा आणणार्‍या गोष्टी म्हणजे " हे वापरा व ते वापरू नका " असा उपदेश करणारे मेल्स. कोणी सांगते 'कोकोकोला ' हा उत्तम पचनास मदत करतो तर लगेच दूसर्‍या मेल मध्ये असते की तो 'फक्त संडास साफ करण्यास वापरतात '. 'डिओ मधल्या घटकांनी कॅन्सर होईल म्हणून वापरणे बंद करावे तर शरीराला मेलेल्या 'उंदरासारखा वास ' येतो. तब्येतीस चांगले असताना पण ' बाहेर कापलेली फळे खातान आपल्याला पण संसर्गजन्य' रोग होईल काय अशी भीती वाटते. कूणी 'एड्स' चे इंजेक्शन टोचेल अशी भिती नेहमी थेटरात गेल्यावर वाटते. कुणी सांगते गररोज एक ग्लास 'वाईन' प्या तर कोणी म्हणते 'दारूच्या एका ग्लासामागे ' तुमचे आयुष्य ३ तासांनी कमी होते [ मग मी आज जिवंत कसा ?]. "सिगारेटचे दूष्परिणामचे ' तर एवढे मेल्स आले की आपण तर कंप्लीट सोडून दिले, "सिगारेट " नाही असे " मेल्स" वाचणे ......वास्तूशात्राप्रमाणे , फेंग्-शूई प्रमाणे मेल्समधून मिळाल्या सल्याप्रमाणे मी जर घर बांधले तर ते घर न होऊन 'एक तर ते राहण्याच्या लायकीचे राहणार नाही आणि वर ते एक एंटीक पिस बनून प्रसिद्ध होईल"आजकाल तर फोनवर येणारे अनोळखी नंबर चे कॉल ऊचलताना कोणी आपला फोन हॅक करत नाही ना अशी शंका येते कारण तसे झाल्यास तुम्हाला 'मेल्समध्ये लिहल्याप्रमाणे युरोप , कॅनडा , सोमालिया , कुवेत .... या थिकाणी कॉल लेल्याबद्दल ३५००० बिल येईल".
म्हणून मला असा प्रश्न पडला आहे की .......... "कसं जगायचं , कसं वागायचं ?कोणी सांगेल का मला ? "सगळं पूराण ऐकवण्याचे कारण म्हणजे आपणच कळत्-नकळत असे मेल पाठवत असतो। त्यामुळे अनावश्यक होणारा कंपनीचा खर्च , आपला कालपव्याय , येणारं टेन्शन , मानसीक तणाव याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे । आपलं आहे फूकट म्हणून पाठवा अशी व्रुत्ती असू नये हाच यामागचा उद्देश आहे ...........

या मेल्सला कंटाळलेला , त्रासलेला ......... छोटा डॉन .............

अवांतर : ह्या मेलची 'प्रेरणा' आलेल्या अशाच एका विरोपातून मिळाली ..........

Sunday, March 2, 2008

आळस, कंटाळा व फिरंग्याची भेट !!!!


[ खालील रटाळ व निरर्थक लेख वाचून कुणाला कंटाल व आळस आल्यास त्याची जबाबदारी लेखकावर राहणार नाही. आपापल्या रिस्क वर वाचन करा अथवा सोडून द्या, कसे !!!]

आज एकदम काहितरी वेगळेच वाटत आहे, खूप कंटाळा आला आहे. काहिच करण्याची इच्छा होत नाहीये [ तसे नहितरी आम्ही दररोज काही तीर मारीत नाही, तरिपण ...]. मला वाटतं या सगळ्याचे कारण सोमवार असावं . पण सोमवारच का ? हा काही नोकरीतला पहिला सोमवार नाही , मग अशी अवस्था कशामुळे झाली याचा गुंता काही केल्या सुटत नाही ...
नोकरी लागल्यावर म्हणजे कंपनी जॉईन केल्यावर सुरवातीला ह्या सोमवारच्या दिवशी लै चिडचीड व्ह्यायची कारण ती मस्त सुट्टी घालवल्यावर इथे ऑफीसमध्ये सकाळी लवकर उठून झक मारण्याचा मूड नसायचा. तसे पाहायला गेले तर आम्ही 'सुट्टीच्या दिवशी' असे फार काही "रॉकिंग' करत नव्हतो पण मस्त वाटायचे, च्यायला मस्त पैकी सकाळी पहाटे १० पर्यंत पडून रहा , त्यांनंतर इठण्याची ईच्छा व अंगात ताकद असेल तर [ ही नसण्याला बऱ्याच गोष्टी कारणीव्हूत असायच्या जसे काही रात्रीची "जश्न-ए-बहार' , उगाच गावभर बोंबलत हिंदले, एखादा लेट नाईट शो व ह्य्यतले काही नसेल तर तासनतास रात्रभर त्या "एऑफ़ एंपायर किंवा क्रिकेटची गेम तर ठरलेली ] जास्तीत-जास्त तोंडावर पाणी मारून चहा-पोहा हादडायला जा , येताना पेपरची अख्खी चळत आणून रूमवर टाका व ती अख्खा रूमवर पसरून ठेवा , टीव्हीवर नावापूरता कुठला तरी भिकार सिनेमा अथवा तद्दन बाजारू गाणी लागलेले एखदे चॅनेल लावा व मस्तपैकी लोळत पडा , संध्याकाळी आपल्यासारखीच चांडाळ चौकडी जमवून पुन्हा तेच भटकणे इत्यादी इत्यादी ..... तसे पाहायला गेले तर या गोष्टीतही फार काही अर्थ नव्हताच पण एकदम मस्त वाटायचे .....

असो। तर खूप विषयांतर झाले. प्रश्न असा आहे की आज का आळस आला ? खरच आळस आला की मी स्वताच्या सोईसाठी तशी समजूत करून घेतली ? बर मग ही सोय तर कशासाठी ? ऑफीसमध्ये काम करायला नको म्हणावे तर इथे तसे काही मानेवर जू ठेवले नसतेच. वाटले तर करा अथवा निवांत पडा अशी आमच्या ऑफीसची अवस्था आहे [ तुम्ही म्हणाल मी काय "ऑन बेंच असलेला सॉफ्टवेअर प्रोफेशनल " आहे का ? नाही पण तसेही नाही ]. मला वाटते की या परिस्थीतीचा जरास्सा 'डिटेलवारी आभ्यास करावा" म्हणजे थोडा मूड पण फ्रेश होईल आणि टाईमपास पण होईल ....
तर कालच्या दिनक्रमाप्रमाणे साधारणता ९ वाजता उठल्यावर [ न उठून काय करता ? काल मॅच ना फायनल - भारत वि. ऑस्ट्रेलियाची, सचीन ने काय चोपाला राव ... हाना तिच्यायाला ] जी टीव्ही समोर मांड ठोकली [ म्हणजे गादी टाकून पसरलो ] ते थेट मॅच संपल्यावर चहा पियायलाच उठलो. मधीच 'चाट ' खायची लहेर आल्यामुळे रूमवरच मस्त 'रगडा पॅटीस' बनवले. जबरा झाले होते एकदम. मग संध्याकाळी [ कशीबशी ] आंघोळ वगैरे उरकल्यावर पुन्हा एकदा 'ते शिंचे फिल्मफेयर अवॉर्ड्स ' पाहायला बसलो. कंटाळा आल्यामुळे रूमवरच जेवण मागवले. एकंदरीत अख्खा दिवस झक्कास गेला. येवढ्या सगळ्या पूराणातून निष्कर्ष असा निघतो मी मुळातच आळशी असलो पाहिले पण तसे नाही, आठवडाभर मरमर काम केल्यावर असा सुट्टीचा दिअस जर आमच्यासारख्या 'अविवाहित पोरांनी' घालवायचा नाही तर कुणी ?
तर असा मस्त कालचा दिवस घालावाल्यावर आज सक़ाळी अगदी पहाटे ५ वाजता उठून ऑफीसला आलो कारण 'फिरंग्यांची ऑफीसला सदिच्छा भेट ". लवकर येण्याशिवार दूसरा पर्यायच नव्हता, आल्याबरोबर सगळ्यांना 'रितसर मेल्स , प्रेझेंटेशन व प्रोटोक़ोल्स" ची तयारी होउस्तोवर ८ वाजले. म्हटले बरे झाले ९ ला गेस्ट येतील मग मस्त टाईमपास होईल पण हाय रे कर्म, त्यांच्या अतिमहत्वाच्या अनियोजीत कार्यक्रमामुळे त्यांची आजची भेट पून्हा उद्यावर ढकलण्यात आली आहे. झालं! मूडचा पार **** वाजला . म्हणजे पून्हा उद्या ही तगतग आलीच , काय करणार आलीया भोगासी असवे सादर ....

ही 'फिरंग्यांची भेट' म्हणजे एक मस्त प्रोग्राम असतो बाबा. एकतर दिवसभर काही काम नाही केले तरी चालते फक्त कसले तर 'प्रेझेंटेशनची तयारी केली आणि ते एकदा त्याच्या समोर बडॅबडले की झाले काम, तो पण खूष [???], साहेब पण खूष आणि मी तर लै लै लै खूष. ऑफीसचे वातावरण कसे एकदम चकचकीत होते. ऑफीसमधल्या पोरी भारी भारी नेत्रसूखद ड्रेस घलून येतात [ आजच्या बॉसच्या " पी ए" च्या ड्रेसने तर डॉळ्याचे पारणे फेडले राव ...], ज्या लोकांना 'टेक्निकल मधले' घंटा कळॅत नाही असे पोपट लोक तर सकाळ पासूनच आपले केस व टाय सावरत पळापळ करत असतात, बॉसलोक सारखे आमच्या क्युबिकलकडे चक्कर मारून ते स्वच्छ ठेवण्याची तंबी देत असतात [ म्हणजे आम्ही काही क्युबिकलमधेय रविवारचा बाजार भरवत नाही तरीपण.......], काही चाटू लोक आज कोणत्या तर्हेने पुढेपुढे करण्याचा चान्स मिळेल याची चाचपणी करत असतात, या व इतर अशा अनेक गोष्टी ....

मग तो गरिबांचा मसिहा, जिल्ली ईलाही 'फिरंगी आल्यावर' नेहमीप्रमाणे "हाय, हॅल्लो , हाउ [ उच्चारी हाव ] आर यु ?, लग टाईम नो ? हाउ यु आर डूइंग ? इट वॉस वेरी टायरी जर्नी ।" यासारखे निरर्थक प्रश्नोत्तरे घडतात। त्याच्यासमोर मग आम्ही आत्तापर्यंत काय केले, अश्या काय करण्याचा प्रयत्न करत आहोत व पुढे काय प्लानिंग आहे याचे एक झक्कास 'प्रेझेंटेशन' होते। तो पण मग एकदम मूडमध्ये येउन 'तुम्ही लै भारी काम करता , तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, तुमचे महत्व किती आहे, तुम्हाला पुढे कुठल्या संधी आहेत, कंपनीची स्थिती कशी आहे व त्यापुढे कुठली आव्हाने आहेत " यावर एक तासभर तरी निर्थक व कंटाळवाणे प्रेझेंटेशन देतो. त्यानंतर आमच्यात व त्याच्यात गप्पागोष्तींचे एक सत्र घडते ज्यात आम्ही काय म्हणतो ते त्याला कळत नाही आणि त्याला काय म्हणायचे ते आम्हाला कळत नाही. तो हसला की आम्ही हसतो, आम्ही हसलो की तो पण हसतो ....

तर असा हा एकंदरीत मस्त टाईमपास असलेला सेशन आज रद्द झाल्याने "पुढे आता दिवसभर काय करायचे?" हा प्रश्न आहे। कामाचा तर बिलकूल मूड नाही. तेव्हा म्हटले की चला काही ओळी खरडाव्यात म्हणजे कसे मस्त वाटेल .... तुम्हाला वाचले वाटू तर वाचा नाहितर सोडून द्या. जास्त मनावर घेउ नका नाहितर तुम्हाला पण माझ्यासारखा कंटाळा येण्याची शक्यता आहे ....