Tuesday, January 18, 2011

मिसळपाव.कॉम - क्रिकेट विश्वचषक २०११ - आवाहन ...

मित्रांनो, बर्‍याच दिवसात ( खरं तर महिन्यात ) ब्लॉग अजिबात अपडेट केला नाही, आम्ही ब्लॉगला सोडचिठ्ठी दिली की काय अशीही शंका काही जणांना आली असल्यास त्याचे मला आश्चर्य वाटणार नाही, मनापासुन दिलगीर आहे.
जॉब चेंज आणि इतर काही बाबींमुळे मध्यंतरी लिखाणास अजिबात वेळ मिळाला नाही ...

मात्र आता आम्ही पुन्हा ब्लॉगविश्वात दाखल होत आहोत ते ... क्रिकेट विश्वचषक २०११ चा मुहुर्त साधुन.
सध्या मिसळपाव.कॉमवर आम्ही ह्या विश्वचषकाचा पुर्ण आढावा आणि क्षणचित्रे सादर करण्याचे योजले आहे, आम्ही हेच काम आधी 'फिफा वर्ल्डकपलाही' केले होते.
त्यासंबंधीचे हे निवेदन इथे देत आहे.
तुमच्यातल्या कुणाला ह्यात सामिल होण्याची इच्छा असल्यास मिपावर तुमचे स्वागत आहे :)

आता इथुन पुढे माझा ब्लॉग आणि मिपाचे 'क्रिकेट विश्वचषक सदर' हे नेहमी अपडेट होत राहिल असे विश्वासाने सांगतो.
लोभ आहेच, तो कायम रहावा हीच इच्छा, धन्यवाद :)

======================================================

नमस्कार मंडळी,

तयार आहात ना जल्लोशाला ?
तयार आहात ना ढोल-ताशे, टाळ्यांचा कडकडाट, आरोळ्या आणि जयजयकाराला ?
तयार आहात ना एखाद्या चुकलेल्या फटक्यावर, सुटलेल्या झेलावर आणि न दिलेल्या विकेटीवर खडाजंगी चर्चा करायला ?
तयार आहात ना विजयानंतर डोक्यावर घेऊन नाचायला आणि लाजिरवाण्या पराभवानंतर हक्काने संघाला ४ खडे सुनवायला ?

काय म्हणता ?
कशाची तयारी करायची ?

अहो 'क्रिकेट हा धर्म' असलेल्या आपल्या देशात अजुन महिन्याभरात क्रिकेटचा कुंभमेळा भरतो आहे. जगातले दिग्गज खेळाडु, चाणक्याची कुटिल रणनितीने समोरच्या संघाचे मनोधैर्य नेस्तनाबुत करणारे अनुभवी दिग्गज प्रशिक्षक आणि त्यांच्याबरोबर त्यांचे हजारो पाठिराखे इथे डेरेदाखल होत आहेत.
निमित्त आहे ..... आयसीसी विश्वचषक २०११ !!!

मग झाली का तुमची तयारी ?
सुट्ट्यांचे प्लानिंग केले असेलच, काही उत्साहींनी आपल्या 'मेन इन ब्ल्यु' संघाच्या जर्सीजही मागवल्या असतील, कुठे आणि कुणाबरोबर बसायचे आणि सामना एंजॉय करायचा ह्याचे प्लानिंगही झाले असेल.
अहो एक ना दोन अशा हजारो गोष्टी आहेत, सगळ्यांचे सेटिंग करायचे आहे, वेळ कमी आणि कामे ढीगभर राहिली आहेत, काहीही झाले तरी ह्या विश्वचषक जल्लोश आणि उन्माद अनुभवायचाच आहे.

बरोबर ना ?
तुमचेही अगदी हेच मत असेल तर तुमचे आमच्या क्लबात स्वागत आहे, आम्ही अगदी तुमच्याच शोधात होतो.
आम्हाला हवे आहेत अगदी तुमच्यासारखेच निस्सिन क्रिकेटवेडे आणि 'मेन इन ब्ल्युज' चे खंदे समर्थक.

कारण ....
हेच क्रिकेटचे महायुद्ध इथे मिपावर आपल्याला इथल्या मराठी रसिकांसाठी खास मराठीतुन सादर करायचे आहे, भले अनेक दिग्गज वेबसाईट्स, न्युज चॅनेल्स, प्रिंट मिडिया आपापल्या पद्धतीने हे सर्व कव्हर करणार असतील, करु द्यात त्यांना, पण इथे आपल्याला आपल्या ढंगात, आपल्य मस्तीत आणि आपल्या शैलीत हा 'क्रिकेट महोत्सव' साजरा करायचा आहे.

ह्यापुर्वी आपण साजरा केलेल्या 'फिफा फुटबॉल विश्वचषक-२०१०' चा अनुभव आणि त्यातुन मिळालेले गुंजभर शहाणपण आपल्या सोबत आहेच. पण ह्यावेळी आपला प्लसपॉइन्ट आहे तो तुमच्यासारखे क्रिकेटला धर्म मानणारे क्रिकेटचे निस्सीम चहाते, अहो तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर काय अशक्य आहे ?

आपण इथे काय करणार आहोत ?
१. अहो इथे तुम्हाला ह्या घनघोर युद्धातल्या प्रत्येक संघाची अगदी हटके शैलीत ओळख करुन दिली जाईल, त्यांचे खंदे वीर, बलस्थाने आणि कच्चेदुवे ह्यावर घनघोर चर्चा केली जाईल.
२. प्रत्येक गटाची बळाच्या तोलामोलाची चवीने चर्चा केली जाईल.
३. महत्वाच्या आणि रंगलेल्या सामन्यांचे इथे आपल्या शैलीत विश्लेषण सादर केले जाईल, फोटोफिनिश दिले जाईल.
४. जर-तर च्या अफाट चर्चा बेभानपणे रंगतील.
५. गुणतक्ता, क्रमवारी, सांख्यिकी अगदी अवघे अवघे इथे सादर होईल.
६. सर्वात महत्वाचे, इथे ह्या जल्लोशात 'तुम्ही' असणार आहात, इथे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने जल्लोश केला जाईल, अहो खेळ आपला तर त्याचा जल्लोश आपल्या पद्धतीने नको का ?


मग आहात ना तुम्ही आमच्याबरोबर ?
तुमच्या सहभागाने ही मैफिल अजुन रंगीन होईल व त्यात अजुन मजेदार गहिरे रंग भरले जातिल हा आमचा विश्वास आणि अनुभव आहे ...

नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर आहेत गतवेळचे तज्ज्ञ, ज्ञानी आणि निपुण क्रिडामित्र, आपल्यासोबत आहे त्यांचा अनुभव आणि त्यांची क्रिकेटवरची भक्ती, आपल्यासोबत आहे इतर मान्यवरांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या आपल्याकडुन असलेल्या अपेक्षांचा डोंगर.
तर मग लागा तयारीला, येऊ देत तुमच्या कल्पना, कळवा तुमचा सहभाग आम्हाला, होऊ ह्यात मिपाचा हा क्रिकेट महोत्सव एकदम दणक्यात आणि जोशात !!!
येऊदेत तुमच्या सहभागाची सुचना आम्हाला, तुमच्याही रसिकतेची पेशकश मिपावर होऊद्यात ....

चला, साजरा करुयात 'मिपा - क्रिकेट विश्वचषक २०१ १ महासंग्राम' खास आपल्या शैलीत, आपल्या मस्तीत आणि आपल्या सहभागाने !!!!

टीप :

१. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी कृपया आपला सहभाग मला 'व्यनीने' कळवावा, सोबत तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे ह्याचे थोडक्यात स्पष्टीकरण असावे.
२. माझे आणि इतर संबंधितांचे सध्या बॅकराउंडला ह्या सदरासंबंधीत इतर काम चालु आहे, आपल्या सुचना, आपले सल्ले आणि आपला अनुभव आम्हाला निश्चितच मोलाचा आहे.
३. आम्हाला नुसते टेक्निकल हवे आहे असे अजिबात नाही, तुम्ही अगदी जनरल जल्लोशाबद्दलही लिहु शकता. ऑफिसात, घरात, रस्त्यावर, क्लबात, पबात किंवा कुठेही अनुभवलेल्य रोमांचात तुम्हाला आम्हाला सामिल करुन घ्यायचे असेल तर तुमचेही स्वागत आहे.

बाकी सगळेच इथे देणे शक्य नाही, जशा जशा गोष्टी पुढे सरकतील तशी भर घालत जाऊ ...
चला, पटकन तुमचा सहभाग आणि सुचना / सल्ले / सुचवण्या कळवा, अहो हा तुमचाच महोत्सव आहे आणि तो तुमच्याच श्टायलीत झाला पाहिजे, नै का ? :)

तळटीप :
जे मिपावर नविन आहेत त्यांच्यासाठी आम्ही पुर्वी केलेल्या 'फिफा विश्वचषक २०१०' स्पर्धेच्या जल्लोशाची लिंक खाली देत आहे, त्यावरुन तुम्हाला ह्या महोत्सवाची जराशी कल्पना येईल ...

http://www.misalpav.com/tracker?page=1&title=&uid_touch=&type_1=fifa2010&tid=All&tid_1=All&tid_2=All

धन्यवाद !!!