Sunday, November 6, 2011

’देव’ नाही ’देवळा’त ...

सिनेमा पहाणे ह भक्तिभाव मानला तर सिनेमा थेट्राला 'देऊळ' मानायला हवे आणि आपण ज्या श्रद्धेने ह्या देवळात 'सिनेमाची स्टोरी, चित्रण, गीत-संगीत, नावजलेले कलाकार अणि त्यांनी समर्थपणे पेललेल्या भुमिका' पहायला आणि त्यांचा आस्वाद घ्यायला जातो त्यांना 'देव'च म्हणायला हवे.
आपल्या अपेक्षांप्रमाणे सिनेमात सर्व काही असेल तर थेटररुपी देवळात साक्षात 'देवदर्शन' झाल्याचे समाधान लाभते व ह्या देवळाची वारी एक उत्सव होऊन जातो.

उमेश कुलकर्णींच बहुचर्चित 'देऊळ' हा सिनेमा खास थेट्रात जाऊन पाहिला असता आम्हाला 'देव नाही देवाळात' असा अनुभव आला. ज्या अपेक्षेने आम्ही देवाचे दर्शन घ्याला गेलो तो देवच तिथे नव्हते, बाकी मंदिराची दिव्यभव्यता आणि जाहिरातीद्वारे सुरु असलेला भक्तीचा जागर मात्र डोळ्यात मावेना इतका प्रचंड होता.
हे आमच्यासारख्य भक्तीभावाने सिनेमा पाहणार्‍या पटण्यासारखे नाही, म्हणुनच 'देऊळ'बद्दल आमचे हे ४ शब्द ....



’देऊळ’ हा सिनेमा लोकांना शक्यतो आवडणार नाही.
१. लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही.
२. तगडी स्टारकास्ट घेऊन उगाच शास्त्रापुरते सत्य दाखवणे त्याहुन आवडत नाही.

मला ’दुस-या कारणा’मुळे देऊळ तितकासा आवडला नाही. पिक्चर बर्‍यापैकी जमला नाही असे मला म्हणावेसे वाटते.
वलयांकित असे मोठ्ठे कलाकार घेऊन आणि त्याचा भरपुर गाजावाजा करुन शेवटी यथातथाच असलेला चित्रपट असे मी ह्याचे वर्णन करेन.
पुर्वार्धात हा चित्रपट भयंकर संथ आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर रटाळ वाटला.
गाजावाजा करुन मोठ्ठे मोठ्ठे कलाकार घेऊन त्यांना ह्या सिनेमात अक्षरशः वाया घालवले आहे असे वाटते. त्या त्या कलाकाराच्या क्षमतेला न्याय देणारे एकही पात्र ह्या चित्रपटात नाही ... अपवाद गिरीश कुलकर्णींचा केशा आणि दिलीप प्रभावळकरांचा अण्णा.
त्यांच्या पात्राची पार्श्वभुमी अथवा घडण चित्रपटात कुठेच ठळकपणे दिसत नाही. वातावरण निमिर्ती आणि पात्र ओळखीसाठी अत्यावश्यक असलेले डिटेलिंग इथे भरकटले आहे, उलट त्या नादात ह्या विषयाशी अगदीच अनावश्यक असलेले प्रसंग उगाच घुसडले गेले आहेत असे वाटले. मी तर असे म्हणेन की ह्या बड्या नावाऐवजी अगदी कुणीही त्या त्या भुमिका सहजपणे करु शकला असता, असे असताना उगाच मोठ्ठी नावे वापरुन, त्यांना यथातथा भुमिका देऊन उगाच 'बिग बजेट' अशी जाहिरात करणे हे पटले नाही.
नाना पाटेकर, मोहन आगाशे, किशोर कदम ह्यांना अक्षरशः वाया घालवला आहे.
सोनाली कुलकर्णी ह्यांची भुमिका खास आहे म्हणण्यात अर्थच नाही, इनफॅक्ट त्यांच्या व्यक्तिरेखेला तसा वावच नाही, हेच कारण बहुदा सर्वच बड्या नावांबाबत घडते.
नसरुद्दिन शहाचे पात्र ह्या सिनेमात 'उगाच' घुसडल्यासारखे वाटते, उगाच २-३ डायलॉक आणि अनावश्यक प्रसंग रचना ह्याने काय मिळाले ते कळत नाही. हां, बड्या नावांची जाहिरात करायची असेल तर मात्रचे आमचे मौन बाबा, त्यातले आम्हाला जास्त समजत नाही.
चित्रपटाचे संगीत, गाणी आदी बाबत न बोललेलेच बरे. सध्या जरा वादग्रस्त असलेले 'दत्ताचे गाणे' हे बर्‍यापैकी सत्यपरिस्थीतीच्या जवळ जाणारे आहे आणि नादमधुर नसले तरी गुणगुण्यासारखे वाटले.

सिनेमात काही चांगल्या गोष्टी आहेत पण त्या पेलण्यात जरा गडबड झाली आहे.
'एका देवस्थानाचा जन्म' अशी एका व्याख्या करता येण्याजोगा हा चित्रपट आहे, विषयाच्या निवडीला आणि त्यात दाखवलेल्या बर्‍यापैकी डिटेलिंगला फुल्ल नसले तर उत्तम गुण.
मात्र ह्याच अनुषंगाने आम्ही वर केलेल्या 'लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही' ह्या विधानाबाबत २ शब्द न लिहणे हे ह्या सिनेमावर अन्याय ठरेल.
एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी जे जे घडते ते ते दिग्दर्शकाने जसे आहे तसे दाखवले आहे. स्थानिक ग्रामस्थांचा संपुर्ण बाजारपेठेवर कब्जा, देवस्थानाच्या निमित्ताने चालणारे अन्य उद्योग-धंदे व त्यालाही असणारी बरकत, सतत येणार्‍या पैशाचा ओघामुळे दिवसेंदिवस 'श्रीमंत' होत जाणारे देवस्थान आणि त्याचे व्यवस्थापक, ह्याच पैशाचा जोरावर देवळाला अजुन 'मोठ्ठे' करण्याची व त्यामार्गे अजुन पैसा कमवण्याची इच्छा, कालांतराने भक्तीभावाला बाजुला सारुन केवळ दिखावा, सारंजाम, भपकेपणा आणि त्यात कमी की काय म्हणुन स्थानिक राजकारणाचा हातभार आदी बाबींबर 'देऊळ' व्यवस्थित भाष्य करतो.
खरे तर हे सत्य सर्वांनाच माहित आहे, अशी 'उभारलेली' देवळंही अनेकजणांना माहित असतील, पण ही बाब स्पष्टपणे दाखवण्याचे धाडस केल्याचेही कौतुक आहे.
मुर्ती चोरीला गेल्यावर पहिल्यापेक्षा अधिक भारी मुर्ती आणुन येनकेनप्रकारे 'देऊळ' चालु राहिले पाहिजे हा सोसही मस्त दाखवला आहे.
ह्या
निमित्ताने दिग्दर्शकाने 'देवस्थानाचे बाजारीकरण' ह्यावर बर्‍यापैकी कठोर भाष्य केले आहे असे म्हणायला हकरत नसावी. ह्याच्या जोडीला ग्रामीण भागातले राजकारण, लोकांच्यातला बेरकीपणा, मिडियाची ताकद, ग्रामीण जीवनातला एकंदरीत संथपणा आणि रिकाम्या हाताचे व निवांत डोक्याचे लोक वेळ घालवण्यासाठी काय काय करत असतात हे चांगले दाखवले आहे.

उपरोक्त बाबींमुळे चित्रपट बर्‍यापैकी पाहण्यासारखा होतो, पण हे आणि इतकेच दाखवण्यासाठी बड्या नावांची अजिबात गरज नाही हे सत्यही पुन्हा ढळढळीतपणे समोर येते.
'कंचुकी तंग दाटली उरी, मट्रीअल आत मायीना... आनं माळावर प्रकटला दत्त, पर भाव मनी दाटना....' सारख्या संवाद/काव्याची ह्या लेव्हलला आणि चित्रपटात एवढे बडे कलाकार असताना गरज नव्हती, असली स्ट्रॅटेजी बी ग्रेडी चित्रपटाने वापरायची असते, ती तिकडेच शोभून दिसते, अन्यथा उगाच हसे होते, असो.

तर एकंदरीत चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे, आवर्जुन थेट्रात पाहण्याची गरज नाही, मराठी चित्रपटसृष्टीला मदत करायची असेल तर पाहु शकता, यथावकाश टिव्हीवर येईलच.
माझे ह्या चित्रपटाचे एका वाक्यात वर्णन .... बडा घर, पोकळ वासा. असो.

- (चित्रपटाबद्दल असामाधानी आणि स्ट्रॅटेजीवर नाराज) छोटा डॉन

रेटिंग वगैरे द्यायचे असल्यास : (विषयाची निवड आणि त्यासंदर्भातले काही प्रसंग इत्यांदीमुळे राउंडफिगर ) २ स्टार **