Wednesday, October 8, 2008

कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!



बघता बघता "Germany" ला येऊन २ आठवडे झाले. सगळा वेळ सेटलमेंटमध्येच गेला. भारतातुन निघायच्या १ आठवडा आधी व इथे आल्यावर पहिला आठवडा फ़ार जोशात गेला।
नविन जागा, नवा देश, नवी भाषा, नवी संस्कॄती व राहणीमान आणि विचारसारणी व सगळ्यात महत्वाचे म्हणजे "नवे ऑफीस ". फारच फरक पडला या सर्व गोष्टीत, त्यामुळे मनात एक सुप्त आकर्षण, एक दडपण, एक उत्साह व तेवढाच नव्हर्सनेस अशा भावनांनी पार डोक्यात गोंधळ उडाला होता.
असो. त्याबद्दल पुन्हा सवडीने, आज मुख्य मुद्दा आहे ते "ऑफीस कल्चरचा" !!!

आता तसे पहायला गेले तर "बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयात" काम करण्याचा अनुभव हा आयुष्यात प्रथमच असा काही भाग नव्ह्ता, तिकडेही करतच होतोच की.पण इकडे सर्व वेगळे आहे, ह्याला मी म्हणेन "बहुराष्ट्रीय कंपनीचे परफेक्ट कार्यालय" ....
मस्त वाटले इथले वातावरण, या एकदम झकपक व चकचकीत वातावरणात राहताना आपला आपलीच ऐट बघुन आतुन आनंदाच्या उकळ्या फ़ुटत आहेत. आल्यावर पहिल्या दिवशी जी "Formal Welcome Ceremony " होती ती झाल्यावर ५ मिनीटे काहीच सुचेना, अरे एवढी कसली "Formality व Descency", आम्हाला नाही बाबा सवय असल्या गोष्टींची।

स्वाभावीकच मग मन प्रत्यक्षात अनुभवलेल्या व काहीच्या बोलण्या, लिहण्यातुन ओळख झालेल्या "देशी कचेरी उर्फ़ भाऊसाहेबांचे हापीस" यांचा विचार करु लागले ...
[ काळजी नका करु, कंपनीच्या कार्यालयीन वेळात नाही, अशाच निवांत वेळात हो. नाहीतर लगेच आम्हाला "नानु सारंजामे" ठरवुन मोकळे व्हाल. ]

मग माझ्या डोळ्यासमोर आपल्या "जुन्या देशी कचेरी" चे कल्पनाचित्र आले. आता "कचेरी" ह्याचा अर्थ येथे साधारणता "सरकारी कचेरी वा एखाद्या देशी कंपनीची कार्यालये" ह्या अर्थाने घ्यावा. म्हणजे तेथील वातावरण, काम करण्याची पद्धत, त्याची भाषा, तेथील काम करणारी मंडळी, त्यांचे वागणे, पेहराव व बोलचाल आठवले. नकळतच मी त्याची तुलना जराशी सध्याच्या "Corporate Office " शी करुन बघीतली. मला स्वत:शीच प्रचंड हसु आले एवढा प्रचंड फरक आहे त्यांच्यातनक्की काय फ़रक आहे ते एकामागे एक पाहु....

जुन्या कचेरीत प्रवेश करायच्या आधीच त्या इमारतीकडे एकदा पहा, ती जर अगदी जुन्या छापाची इमारत अगदी लाल कौलासह, बाहेर सायकली व मोटारींची ही गर्दी यातुन वाट काढत आत प्रवेश केल्याकेल्या समोर काही दिसु नये याची काळजी घेणारा अंधार, जागोजागी केलेले तंबाखु व पानाच्या पिचकाऱ्यांची नक्षी, दिशाभुल करणाऱ्या पाट्या [असतील तर] , जिन्याच्या मोडलेल्या पायऱ्या, मोडलेल्या फरश्या, बगलेत फ़ायले मारुन कुणाकडेही ढुंकुनही न पाहता पळापळ करणारे कारकुन, जिन्यात साहेब्याच्या पट्टेवाल्यापाशी वशिला लावण्यासाठी त्याच्याभोवती कोंडाळे केलेली सर्वसामान्य जनता असा जर सारंजाम असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहचला आहात हे समजायला हरकत नाही. ही झाली टिपीकल जुन्या कचेऱ्यांची मांडणी....

आता तसे नाही, आतांची ऑफीसे फार लांबुन ओळखु येतात कारण त्याच्या अलिकडे ५ किमी. पासुन "XYZ 5 Km ahead" अशा पाट्या लावतात. त्यामुळे ती जुनी "ओ पाव्हनं, ते येमीशीबी हापीस कुठशीक येतं हो?" या प्रश्नाची व त्याला "जावा की डाव्या अंगानं फर्लांगभर, चौकातनं मारा राईट टर्न, फुड गेल्यावर २० पावलात आलच की हापीस" अशा उत्तरांची मजा नाही. नव्या "Offices" ती डोळे दिपावणारी उंच इमारत, ती काचांची रेलचेल, ते गालीचे, बाहेर बाग व अनेक फुलांची झाडे हे पाहुन एखाद्या जुन्या "कचेरी कारकुना" ला भडभडुन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आत गेल्यावर [म्हणजे तुमच्याकडे परवानगी असेल तर, अन्यथा शक्यच नाही] ते मार्बलचे फ़्लोअर, ते अख्खी टाच रुतेल एवढा गालीचा, ती भिंतीवर लावलेली अगम्य चित्रे व कसे वागावे याचे आदेश देणाऱ्या पाट्या व त्या ही ६-६ भाषेत, छोटे छोटे फुलांचे गुच्छ, शिस्तीत लाऊन ठेवलेली वर्तमानपत्रे, टापटीप पोषाखात वावरणारे एंप्लोयी, सळसळ करीत पळणाऱ्या काचेच्या लिफ्ट्स, आलेल्या अभ्यांगतासाठी मांडलेल्या खुर्च्या [ हे एक आश्चर्यच, नाहीतर जुन्या कचेऱ्यात असले लाड नव्हते.] असा जर नजारा दिसला तर तुम्ही एका "आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट ऑफ़ीसात" आला आहात हे नक्की।

जुन्या कचेरीत प्रवेश करतानाच तुमच्या चेहऱ्यावर एका आगंतुकाची भावना आपसुकच येते, कारण ते वातावरण व आत्तापर्यंत न्य़ात असालेली ऐकीव माहिती. शिवाय आत गेल्या गेल्या "काय पाहिजे ? कोण पाहिजे ? काय काम आहे ? कुणी पाठवले ? परवाना हाय का ? ओ तिकडे नका जाऊ ? आधी बाहेर व्हा. " असा प्रश्नांची सरबत्ती झाली नाही [ कुणी जर तुमच्याकडे लक्ष दिले तर ] तर तुम्ही नशिबवान आहात असे समजायला हरकत नाही . आत गेल्यागेल्या आलेला माणुस गोंधळुन, घाबरुन, बावरुन गेला पाहिजे हा ह्या कचेऱ्यांचा "अलिखीत कायदा" व बाकीचे कायदे नाही पाळले तरी ह्याचे पालन मात्र एकदम इमानाने होते.

आता असे नाही, गेल्यागेल्या [ बहुतेकठिकाणी ] तुमचे स्वागत होते, जर तुम्ही आमंत्रित असाल तर तुम्हाला "Welcome" करायला कोणीतरी गेटवरच हजर असते. जर तुम्ही नवे असाल तर त्या रिसेप्शनवर बसलेली सुंदर, मनमोहक कन्यका "Yes Sir, What can i do for you ? May I help you " अशा प्रश्नोत्तरे होऊन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाते. थोडक्यात तुमचा "कार्यालयाच्या अंतर्भागापर्यंत" चा प्रवास सुखकर होतो. आधीच्या काळात म्हणे लोक या गोष्टींसाठी नवस वगैरे बोलत, व्रतवैकल्य करत आणि ती कचेरी जर पुण्यातील असेल तर मात्र तुमच्या मागे मागच्या "शतजन्माचे पुण्य" पाहिजे, नाहीतर मामला बिकट आहे।

बाकीच्या गोष्टी जाउ दे, आता आपण कार्यालयाच्या आत व्यवहार कसा होतो हे पाहु. मी शक्यतो आतल्या कर्मचारी वर्गाच्या कामाशी संमंधीत संभाषणाबद्दल लिहतो आहे. आता "साहेब व त्याचा पट्टेवाला" ह्या दोन्ही गोष्टी कालबाह्य झाल्याने त्यांच्याशी संमंधीत गोष्टीच्या मजेला आपण मुकलो आहोत.
पुर्वीच्या काळी जर काही कारणामुळे कुणाला कचेरीत पोहचायला उशीर झाला व ते "हजेरी रजिस्टर" साहेबाच्या टेबलावर गेले असेल तर बिचाऱ्याचा जीव अर्धा होऊन जायचा. सामान्यत: हे कर्मचारी मध्यमवर्गीय व बहुसंख्य चाळीत राहणारे असल्याने त्यांना "पाणी उशीरा आले, दुध नासले, गॅस संपला, ट्राम निघुन गेली, पोराला शाळेत सोडायला गेले, सकाळी देवळात गेल्यावर तेथील गर्दी" अशा कारणामुळे उशीर होत. यामुळे कचेरीत उशीरा पोहचल्यावर व साहेबाने ते पाहिल्यावर त्या बिचाऱ्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकत, एक तर ठरलेला "हाफ डे" व वरुन साहेबाची "कंपनी काय घरची समजलात का ? मी किती वेळा गप्प बसायचं ? पुढच्यावेळी मेमो देईन" वगैरे बोलणी....

आता तसे नाही, मुळात एंप्लॉयी आता "फ्लॅट" मध्ये रहात असल्याने त्यांचे प्रॉब्लेम्स जरा वेगळे असतात, म्हणजे "ट्रॅफ़ीक जाम, कार पंक्चर, कालचा ओव्हरहॅंग, वाईफबरोबर सकाळ सकाळ भांडण" वगैरे वगैरे. पण फरक असा की तो ह्या उशीराची मुळीच काळजी करत नाही. तो आपल्या मुडप्रमाणे ऑफ़ीसात पोहचतो. जर साहेबाने पाहिले व त्याने विचारले तरी ह्याला त्याचे काहीच "भ्या" नसते. उलट साहेबाकडुनच एखादी "हॅंगओव्हर लवकर कसा उतरवावा" याबद्दल टीप मि्ळण्याचे चान्सेस असतात.आता "लेटमार्क / हाफ़ डे" अशा गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत.

आधी जर काही काम जास्त पेंडिंग पडले तर साहेब त्या कारकुनाला सगळ्या जनतेसमोर "काय रे, काम कोण तुझा बाप करणार का ? चल पटपट उरक, नुसते नाचुन दाखवुन दाखवुन नकोस. माजलेत साले, काम करायला नको, नुसत्या पाट्या टाकायला येतात भाडे" अशा शब्दात "झाडत". आता मुळात कल्चरच बदलल्याने तो "कडकपणा" गेला. आता फ़क्त एक "Urgency Mail" येतो व परिस्थीती हाताबाहेर चालली तर बॉस त्याला "केबीनमध्ये" बोलावुन "See, we are already running out of deadline. You have to work hard.You know meeting deadlines is very important for our corporate image. We don't have any other option than to work for overnights" असे साध्या शब्दात समजावतो.
जुन्या काळी असा प्रसंग घडल्यावर तो अभागी कारकुन आपला साहेब निघुन गेल्याची खात्री करुन जमलेल्या बघ्या सहकाऱ्यांसमोर उसन्या आवसानाने " साला आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही, समजलात काय ? साहेब असेल तो त्याच्या घरी, इथं आमच्याशी गाठ आहे म्हणावं. कायस्थाचं रक्त आहे, एकवेळ शीर तोडुन देऊ पण इमानाला बोल लावलेला ऐकुन घेणार नाही" अशी सफ़ाई देत पण हे बोलताना साहेब कुठे जवळपास नाही ना याची खात्री आपल्या तिरक्या नजरेने करुन घेत. बाकीचे सहकारी पण मग " जाउ दे वसंतराव, ८ दिवसाचा पाव्हणा आहे. आपल्याला सायबाचेसगळे छक्केपंजे माहित आहेत. चला, चहा घेऊ, थोडे डोके शांत होईल" अशी मांडवली करत. आताच्या वातावरणात असे प्रसंग घडणेच शक्य नाही. जर असा प्रसंग घडलाच तर तो "एंप्लॉयी" जागेवर त्या साहेबाच्या तोंडावर राजीनामा फेकेल वा उलट साहेबालाच डोस देईल "You are crossing limits. This is not way to behave." वगैरे वगैरे।

पुर्वी कचेऱ्यांना सध्याच्या काळासारखे "Client" वगैरे असा प्रकार नसायचा त्यामुळे तिथला "साहेबच" तिथला सर्वेसर्वा. तो म्हणेल ती पुर्व दिशा. अशा परिस्थीत जर कोणी त्याच्याकडे कामाच्या "अर्जंट" असण्याची व ते लवकर करण्याची बोलणी करायला गेले तर संवाद असा घडायचा, " अरे लवकर करा म्हणजे, आम्ही काय इथे माश्या मारतोय का ? मला सांगणारा तो कोण टिकोजीराव लागुन गेला ? मला काय त्याच्या बापाचा नौकर समजला काय ? चल हकाल गाडी, जेव्हा होईल तेव्हा सांगु.". मग तो बिचारा आपला मान खाली घालुन निघुन जायचा. हा किस्सा कचेरीतल्या बाकीच्यांना ८ दिवस पुरे, मग साहेबाने त्याची कशी "बिनपाण्याने केली" ह्यावर अनेक परिसंवाद घडत....

आज परिस्थीती अशी नाही, आज "Client" म्हणजे भगवान, तोच सर्वेसर्वा, आपला मायबाप. त्याचा "मेल" आला रे आला, आपला बॉस एकदम गडबडुन जातो, मग टीम मिटिम्ग काय, डिस्कशन काय, प्रोजेक्ट प्लानिंग काय नाही नाही ते चालते. तिकडे तो एकदा मेल टाकुन पुन्हा आपल्या विश्वात गुंग, इकडे काय रण पेटले आहे ह्याची त्याला काही खबर नसते. मग इथुन त्याला एक अर्जवीचा व आपल्या कामसुपणाची खात्री देणारा एक मेल पाठवला की आपल्या बॉसचा जीव भांड्यात पडतो, तोवर त्याला जेवायची शुद्ध नसते. त्या मेलचा मसुदा साधरणता असा असतो "We are working overnights to meet your deadline. Our most efficient resourses are working on this project. We will come back to you very soon with positive result. We really appreciate your patience.". बघा काळ कसा बदलला आहे ते, जुन्या काळच्या "मी काय त्याच्या बापाचा नौकर नाही" ह्या दमदार वाक्याची जागा "We really appreciate your patience" सारख्या पुचाट वाक्याने घेतली आहे.

आता एखाद्याला जर त्याच्या सध्याच्या कामाचे स्वरुप, त्याचा मोबदला, त्याची पोसीशन पसंत पडले नाही वा त्याच्या कंपनीकडुन अजुन काही अपेक्षा असतील तर तो डायरेक्ट बॉसशी बोलु शकतो. किंबहुना त्याच्यासाठी खास " H R Department" बनवले आहे. तिथे तो बिनधास्त आपले म्हणणे मांडु शकतो. त्यातुनही काही मार्ग निघाला नाही तर तो "पेपर टाकुन" लगेच निघुन जाऊ शकतो कारण सध्या उपलब्ध असलेल्या अनेक संधी. पुर्वी असे नसायचे, मुळात संधीच कमी त्यामुळे माणसे एकदा चिकटली की मग त्यापुढे "ठेविले तैसेची रहावे" ह्या तत्वानुसार वागत, फ़ार त्यांची तक्रार नसे....
त्यातुन कुणी तक्रार घेऊन साहेबाकडे [ हो, त्या काळी HR वगैरे असे लाड नव्हते ] गेलेच तर मग "जंगी खडाजंगी" ठरलेलीच. त्यावेळाच संवाद साधारणता असा ...

" साहेब एक विनंती आहे, २ मिनीटे बोलु का ?"
" बोल लवकर, मला वेळ नाही. काम सोडुन हे नस्ते धंदे ?"
" साहेब, ते जरा मला थोडी ......"
" हे बघ, रजा वगैरे काही मिळणार नाही. इथं कामाचा ढीग पडला आहे आणि तुम्ही हिंडा लेको सुट्ट्या घेऊन चैनी करत"
" रजा नाही साहेब, ते जरा पगारवाढीचे बोलायचे होते"
" कशासाठी रे पगारवाढ ? असे काय दिवे लावले आहेत ? नुसत्या पाट्या टाकता लेको आणि म्हणे पगारवाढ पाहिजे"
" साहेब घरखर्च परवडत नाही, महागाई ....."
नसती कारणे देऊ नकोस, काही पगारवाढ नाही आणि काही नाही, पळ कामे कर"
" साहेब, पोरगा झालाय, त्याच्या दुधा-औषधाचा खर्चाचा मेळ बसत नाही"
" बरं बरं, मी बोलतो हेड-डिपार्टमेंटशी, जा आता काम कर"
" धन्यवाद साहेब, तेवढे बघा नक्की, फ़ार ओढाताण होत आहे सध्या ..."
"........."
"........."
"........."

एवढ्यावर संवाद संपुन हिरमुसल्या चेहऱ्याने तो कारकुन परत जागी येऊन कामाला लागत असे व "पगारवाढीची व घरखर्चाची चिंता" करीत असे. मधल्या सुट्टीत साहेब स्वत: त्याच्या टेबलजवळ येऊन आपुलकीने खांद्यावर हात ठेऊन " हे पहा बंडोपंत, मी बोललो आहे, १०० रुपये मिळेल ह्या महिन्यापासुन. पोराची काळजी घ्या. त्याच्यासाठी गाईचे दुध लावा, तब्येतीला चांगले असते लहान पोराच्या. बाकी काही लागले तर सांगा. " असा आपुलकीचा सल्ला देऊन जात असे. त्यावर तो गेल्यावर "बंडोपंत" आपले डोळे बाहीने पुसत " साला बोलतो फ़डाफ़ड पण माणुसकी आहे त्याच्यात अजुन" म्हणुन सहकाऱ्यांना आपल्या साहेबाच्या "चांगुलपणाचा दाखला" देत।
आत्ताच्या कॉर्पोरेट विश्वास ह्या "माणुसकी व चांगुलपणाच्या पर्सनल रिलेशन्सला" स्थान नाही, तेथे फक्त आहेत "फॉर्मल रिलेशन्स"।

जास्त पाल्हाळ जाऊ दे, थोडक्यात पाहु....

लोक पुर्वीही कामं करायची, आताही करतात पण कामाची एक "Effiecient Work Policy" आली आहे. त्यामुळे कामाचा जास्त बाऊ होत नाही. पुर्वी सर्व गोष्टी ह्या आपपसातील संबंध व जुळवुन घेण्याच्या पद्ध्तीने चालत असल्याने एखाद्या चुकीचे खापर हे एखाद्या "गरिब कारकुनावर" फुटायचे व त्या बिचा-याची २ वर्षे वगैरे इंक्रीमेंट्स थांबायची, तिकडे साहेब मात्र नामानिराळा.
आज तसे नाही, इथे प्रत्येक गोष्टीचे एक कायमस्वरुपी रेकॉर्ड ठेवले जाते, जे काय आहे ते लिखीत स्वरुपात " ई-मेल" मधुन पाठवले जाते त्यामुळे जबाबदारी ढकलता येत नाही.एखाद्या मोठ्ठ्या चुकीबद्दल जशी इंजीनीअरवर आफत येते तसा डायरेक्ट " सी ई ओ" सुद्धा फायर होऊ शकतो, यामुळे कामात एक "सुसुत्रता व परफेक्शन" आले आहे.आजकाल कंपनी कर्मचा-यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्याही आरोग्याची काळजी घेते, पुर्वीही हे असायचे पण आज "माणसाला" जास्त किंमत आली आहे. त्यामुळे कर्मचा-यांचे आयुष्य नाही म्हटले तरी ब-यापैकी सुखाचे झाले आहे।
पुर्वी मुळात कमी पगार असल्याने कर्मचा-याची कुटुंब चालवताना खुप ओढाताण वगैरे व्हायची, त्यात बाहेर दुस-या संधीही उपलब्ध नसायच्या त्यामुळे आजची आमच्या वडीलांच्या वयाची पिढी एकाच ठिकाणी मरमर काम करुन पिचुन गेलेली दिसते।
आज तसे नाही, जागतीकीकरणामुळे कर्मचा-यांचे उत्पन्न वाढले आहे, तशा गरजाही वाढल्या आहेत म्हणा पण बाहेर अनेक संधी उपलब्ध असल्याने म्हणावे अशी "लागत नाही". जीवनपद्धती सुधारली, त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी मिळतील व ती ही शिकुन चांगल्या पदाला पोहचतील. पुर्वी ह्या गोष्टीसाठी अतोनात कष्ट व्हायचे, आज ह्या गोष्टी खुपच नसल्या तरी ब-यापैकी सुकर आहेत.

हे सर्व झाले फ़ायदे, परंतु काही अनिष्ट गोष्टीही आल्या ....
सगळीकडेच स्वत:च्या उत्कर्षासाठी जीवघेणी व गळेकापु स्पर्धा सुरु झाल्याने आजकाल कर्मचा-याचे मानसीक स्वास्थ म्हणावे एवढे स्थीर नाही. नेहमीच माणुस कसल्या ना कसल्या धांधलीत राहतो. आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ...पैसा जरी मिळत असला तरी या एक्स्ट्रा मनी साठी आजकाल ऑफीसमध्ये उशीरापर्यंत थांबणे ओघानेच येते आणि ह्यात त्याच्या "कौटुंबिक जीवनाचा" नेहमीच बळी पडतो.आपल्या मुलाबाळांबरोबर २ दिवस निवांत घालवायला त्याला ६ महिने आधीच प्लानिंग सुरु करावे लागते, प्रमुख तोटा म्हणजे ह्या लाईफ ने त्यांच्या वयोवॄद्ध आईवडीलांना ह्यांच्यापासुन दुर केले.आम्ही असतो इथे मस्त टेचात रहात पण तिकडे आमचे आईवडील "लेकरु कधी ८ दिवस निवांत गावाकडल्या घरात राहिल" ह्याची वाट बघत असतात आणि हो; फक्त वाटच बघत राहतात.कारण हे "कॉर्पोरेट कल्चर" त्याला एवढाही वेळ मिळु देत नाही.

थोडक्यात काय तर "हा ही टेन्शन मुळे सदैव काळजीत, भेट होत नसल्याने बायका-मुले नाराज व आईवडीलांचे काळीज तुटण्याला तर माझाकडे उपमाच नाही" ...
त्याच्या "सामाजीक जीवनाची" तर ऑलरेडी वाजलीच असते पण वेळ न मिळाल्याने नातेवाईकांच्या, आप्तांच्या समारंभाला न जाउ शकल्याने ती ही नाराज. याला सर्व कळते हो, अगदी तो काही अंध किंवा निष्ठुर नाही पण सध्यातरी ह्या प्रश्नांचे त्याच्याकडे उत्तर नाही. हे असेच चालायचे. मग कधीतरी त्याला ह्या सर्व दु:खाचां ताण असह्य होऊन तो एकटाच बेडरुममध्ये "हसमसुन रडुन" घेतो कारण तो ही एक माणुसच ना. पण ही गोष्ट त्याला उघडपणे बोलता येत नाही कारण त्याच्या असलेल्या "वरिष्ठ पदाचा व इमेज" चा बोजा, मग तो आतुनच जळत राहतो. आण असह्य झाल्याने लहान वयातच "हॄदयविकार व रक्तदाबाची" उदाहरणे कमी नाहीत, इनफ़ॅक्ट आता पेपरातुन "तिशीच्या यशस्वी युवकांच्या आत्महत्येच्या बातम्या" ही वाचायला मिळु लागल्या आहेत. फक्त ह्या बाबतीत अजुन सुधारणा हवी असे मनापासुन वाटते.

बाकी ह्या "कॉर्पोरेट लाईफ़ने" खुप काही दिले आम्हाला, अजुनही देतेच आहे फक्त आमच्या कुटुंबियांबरोबर मनोसोक्त वेळ घालवण्याचे स्वातंत्र्य जर मिळाले तर " जगी सर्व सुखी असा कोण आहे ?" ह्या प्रश्नाचे उत्तर मी मोठ्ठ्याने ओरडुन मनापासुन " मी आहे !!! " असे देईन।

असे म्हणातात की काही मार्ग तुम्हाला खुप काही देतील, सुख व दु:ख दोन्हीही, पण त्या मार्गावर जायचा "एक दरवाजा" असेल पण परत यायला "दरवाजाच नसेल" तर ???

तो मार्ग ह्या "कॉर्पोरेट लाईफचा" तर नाही ना ????

2 comments:

Unknown said...

कस सुचत हो तुम्हाला ....

Miami Gardens Stone Contractors said...

Thankk you for being you