Monday, June 8, 2009

एंजल्स & डेमन्स ...

डॅन ब्राऊनच्या गाजलेल्या व अत्यंत आवडलेल्या "दा विंची कोड" ह्या चित्रपटानंतर ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो "एंजल्स & डेमन्स" काल चित्रपटगॄहात जाऊन पाहिला, त्याच्या आधीच पुस्तक मिळवुन पुर्वाभ्यास केला होता त्यामुळे चित्रपट पहाताना जास्त मज्जा आली ...जरुर आणि जरुर पहावा असा हा चित्रपट आहे.

टीप : स्पॉयलर्स नाहीत, बिनधास्त वाचा ... ***********************************************
चित्रपटची सुरवात होते ती २ अत्यंत वेगळ्या जगातल्या आणि वेगळ्या पातळीवरच्या घटनांमधुन, धर्म आणि विज्ञान ह्यातल्या महत्वपुर्ण घडामोडींवर प्रकाश टाकुन चित्रपट सुरु होतो.

रोममध्यल्या "व्हॅटिकन सिटी"मध्ये सध्या पदावर असलेल्या "पोप"चे निधन होते व त्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व प्रथा पाळुन पुढील धर्मसत्ता सांभाळणार्‍या एका नव्या पोपची निवड करणार्‍या "कॉन्क्लेव्ह" ह्या कार्यक्रमाची आखणी केली जाते. जुन्या पोपचा वैयक्तीक आणि सर्वात जवळचा सेवक असलेला धर्मगुरु ज्याला "केमरलिंगो" ह्या नावाने ओळखले जातो तो कार्लो व्हेन्ट्रेसा ह्या विधीची सुरवात करतो. ह्या विधीसाठी संपुर्ण जगातुन ख्रिश्चन धर्माचे अत्युच्च असे १६५ कार्डीनल्स हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल होतात, आख्ख्या जगभरातला मिडिया ह्या संपुर्ण विधीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी रोममध्ये हजर असतो व त्यांना सोबत असते ती लाखो श्रद्धाळु ख्रिश्चन धार्मिक लोकांची.
ह्या घडामोडींपासुन अत्यंत दुर व अत्यंत तटस्थ अशा एका "सर्न (European Organization for Nuclear Researc)" नावाच्या जिनेव्हामधल्या संस्थेमध्ये मात्र वेगळीच धांदल उडाली असते. "हे विश्व देवाने बनवले आहे, मर्त्य मानवाला शुन्यापासुन नविन काही ( Creation of Something from Nothing ) बनवणे शक्य नाही " ह्या संकल्पनेला तडा देणारे काम इथे चालु असते, शात्रज्ञ लिओनार्डो व्हेट्रा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली "अँटीमॅटर" तयार करण्यात येतो, ही मानवाची नवीच झेप. ज्या देवाने घडवलेल्या "बिग बँग" प्रक्रियेतुन विश्व निर्माण झाले त्यावेळी तयार झालेल्या अँटीमॅटरचे यशस्वी उत्पादन मानव पुन्हा करतो हीच महत्वाची घटना. मात्र हा अँटीमॅटर अत्यंत किमती, अत्यंत जोखमीचा व अत्यंत स्फोटक अशी त्याची ख्याती.
ह्या घटनेनंतरच काही तासांमध्ये ह्या कडेकोट सुरक्षा असलेल्या प्रयोगशाळेतुन डॉ. व्हेट्रांची अत्यंत गुढ हत्या होते व हत्या करणारा खुनी बहुमुल्य आनि धोकादायक असे "अँटीमॅटर" त्याच्या सुरक्षा करणार्‍या कॅनिस्टरसह घेऊन तिथुन गायब होतो.

ह्या दोन्ही घटनांपासुन मानसीक व शरिरीकपणे अत्यंत दुर असलेल्या हॉवर्डमधील सिम्बोलॉजिस्ट ( मराठी शब्द ? ) व इतिहासतज्ज्ञ प्रा. रॉबर्ट लँग्डन यांना स्वीस गार्डकडुन ( व्हॅटिकन सिटीचे रक्षक ) "अत्यंत आणिबाणीची परिस्थीती" असे सांगुन तातडीचे बोलावणे येते.

इकडे व्हॅटिकनमध्ये दाखल झालेल्या कार्डिनल्सपैकी अत्यंत महत्वाचे आणि भविष्यातले पोप होऊ शकणार्‍यापैकी ४ कार्डिनल्सचे अत्यंत गुढ पद्धतीने "अपहरण" झालेले असते. अजुन एक गोष्ट म्हणजे सुरक्षेसाठी लावलेल्या एका कॅमेर्‍यामध्ये सर्नमधुन चोरी गेलेले "अँटीमॅटर" दिसलेले असतात. अपहरणकर्त्याने फोन करुन ४ कार्डिनल्सच्या दर तासाने एक ह्या पद्धतीने त्यांच्या सार्वजनिकस्थळी खुनाची व सर्वात शेवटी अँटीमॅटरचा वापर करुन संपुर्ण व्हॅटिकन नष्ट करण्याची धमकी दिली असते. अपहरणकर्ता स्वतःची ओळख "इल्युमिनाटी * ( खाली थोडे विस्तारीत स्पष्टीकरण देतो ) गटाचा सदस्य" म्हणजे "व्हॅटिकन चर्चचा महान,अत्यंत जुना परंतु ताकदवान आणि हुशार शत्रु" अशी करुन देतो.

मागण्या ???
मागण्या काहीच नसतात व काही तडजोड ही तो नाकारतो, त्याच्या मते जे चर्चने ४०० वर्षापुर्वी ४ शास्त्रज्ञांच्या हत्या करुन व त्यांच्या मॄतदेहाची सार्वजनिकस्थळी विटंबना करुन जे क्रौर्य दाखवले त्याचा हा सरळसरळ "सुड" आहे, सुड घेताना त्यात कसलीही तडजोड अथवा सौदा होऊ शकत नाही.

ह्याच परिस्थीतीची उकल करण्यासाठी, अपहरणकर्त्याचा व अँटीमॅटरचा शोध घेण्यासाठी प्रा. रॉबर्ट लँग्डन आणि सर्नमधील शात्रज्ञ "व्हिटोरिया व्हेट्रा" हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल होतात. ह्या सर्व शोध सत्राची व व्हॅटिकनमध्ये घडणार्‍या इतर धार्मिक घटनांचे नेतृत्व स्वतः "केमरलिंगो" हा धार्मिक अधिकारी करत असतो.

आता सुरवात होते अनेक गुढ, धक्कादायक, अंगावर रोमांच आणणार्‍या घटनांना ....
रॉबर्ट लँग्डनच्या मते जर अपहरणकर्ते खरोखर इल्युमिनाटी गटाचे सदस्य असतील तर त्यांची स्वतःची अशी एक पद्धत आहे आणि ती काटेकोरपणे पाळण्याबद्दल इल्युमिनाटींची ख्याती आहे. ह्या जगाची निर्मीती "पंचतत्वांमधुन" झाली ह्यावर अत्यंत गाढा विश्वास असणारे‍या इल्युमिनाटी त्यांच्या संदेशात व कार्यक्रमात ह्या पंचतत्वांचा जरुर वापर करत असल्याने त्या दिशेने शोध घेतल्यास आपण नक्की त्यांना पकडु असे लँग्डनला वाटते. इल्युमिनाटींच्या पद्धतीनुसार ४ खुन व अँटीमॅटर्चा स्फोट ह विवीक्षित ठिकाणीच होणार व ते शोधण्यासाठी अपल्याला एक "कोडे सोडवावे" लागेल असा लँग्डनचा विश्वास असतो, एका खुणेवरुन दुसरी, त्यावरुन तिसरी असे शोधत जाऊन आपण त्या अपहरणकर्त्यापर्यंत जरुर पोहचु असे लँग्डन सर्वांना पटवुन देतो.


ह्या शोधसत्राचा पहिला दुवा हा "व्हॅटिकन अर्काईव्ह्ज"मध्ये असलेल्या महान खगोलतज्ज्ञ गॅलेलियोच्या "सत्याचा नकाशा (Diagramma della Verità : Diagram of Truth)" ह्या पुस्तकात मिळणार असल्याने सर्व नियम, रुढी, गुप्तता झुगरुन देऊन केमरलिंगो लँग्डनला ते पाहण्याची परवानगी देतात.त्यात मिळालेल्या कोड्याची उकल केल्यावर त्यांना खुनाच्या पहिल्या जागेचा अंदाज येतो व ते धावत तिकडे पोहचतात, पण इथे मात्र त्यांच्या शत्रुने त्यांच्यावर सरळसरळ मात केलेली असते. पंचतत्वांमधल्या पहिले तत्व असलेल्या "जमिन" याचा उपयोग करुन पहिल्या कार्डिनलची हत्या करण्यात आली असते व त्याचा मॄतदेह तिथे पडला असतो.
इथे असलेले "एंजल्सचे पुतळे" आणि "पंचतत्वे" ह्यांच्यातील संबंधच आपल्याला पुढचा दुवा देतील ह्या धारणेतुन लँग्डनचे शोधकार्य चालुच राहते ते मिळालेल्या संकेतांनुसार एका जागेवरुन दुसरीकडे धाव घेत असतात.मात्र त्यांचे नशिब त्यांना साथ देत नाही, अजुन २ कार्डिनल्सची पंचत्त्वांनुसार "हवा व अग्नी" ह्यांचा वापर करुन अत्यंत निर्घुण हत्या होते व खुनी पळुन जाण्यात यशस्वी होतो.
चौथ्या आणि शेवटच्या कार्डिनल बॉजियांना वाचवण्यात लँग्डन यशस्वी ठरतो मात्र अत्यंत धोकादायक असा खुनी आणि त्याच्याबरोबर असलेले "अँटीमॅटर" ह्यांचा अजुन अजिबात पत्ता नसतो, ते गुढ अजुन कायमच असते.

इकडे चर्चच्या रुढीनुसार नव्या पोपच्या निवडीसाठी आवश्यक असणारे "कॉन्क्लेव्ह" त्या ४ कार्डिनल्सच्या अनुपस्थिती सुरु झालेले असते व स्वतः केमरलिंगो सर्व परिस्थीतीवर बारीक लक्ष ठेऊन असतो. त्याच्या व्हिट्टोरिया व्हेट्राबरोबर झालेल्या चर्चेत आलेल्या शंकानुसार मरण पावलेल्या पोपच्या शरिराची पुन्हा तपासणी करण्यात येते व इथे आश्चर्याचा धक्का म्हणजे हा पोप नैसर्गिकरित्या मरण पावला नसुन त्यांची हत्या झाली आहे असा निष्कर्ष निघतो. हे एकुण प्रकरण गंभीर आहे, इल्युनाटींचा अजुन पत्ता नाही, अँटीमॅटरचा धोका अजुन आहे ह्या सर्व शक्यता लक्षात घेऊन केमरलिंगो कॉन्क्लेव्ह चालु असलेल्या "सिस्टीन चॅपेल" इथे धाव घेऊन, परंपर मोडुन, विधी थांबवुन तिथे असलेल्या सर्व कार्डिनल्सना सध्या घडत असलेल्या घटनांची कल्पना देऊन विधी थांबवण्याची विनंती करतो. "देवावरची श्रद्धा मोठ्ठी की विज्ञानाचे अस्तित्व खरे ? संकटातुन तुम्हाला विज्ञान वाचवते की देवावरची श्रद्धा ? विज्ञान हे देवाच्या विरुद्ध आहे की ते परस्परांना पुरक आहेत ? न जाणो अजुन विज्ञान बाल्यावस्थेत असल्याने अत्यंत गहन असलेल्या देव आणि धर्माला समजण्यास नालायक ठरत असेल तर तो त्यांचा अक्षम्य गुन्हा मानायचा का ? ह्य विज्ञानप्रेमींना धर्माच्या प्रवाहात समावुन घेतले तर ते बरोबर नव्हे का ?" असे एक भावुक व तात्विक भाषण करुन तिथे जमलेल्या सर्व काडिनल्सना विधी थांबवण्यची व इल्युमिनाटीबरोबर ( विज्ञानप्रेमी ) समझोता करण्याची घोषणा करण्याची विनंती करतो. पण त्याच्या हाती निराशा पडते, देवाच्या ताकदीवर गाढ श्रद्धा असलेले व देवच आपले रक्षण करेल ह्यावर प्रगाढ विश्वास असलेले "स्कुल ऑफ कार्डिनल्स" आपला कॉन्क्लेव्ह हा विधी पुढे चालु ठेवतात ...

काही वेळानंतर खुद्द "केमरलिंगो"वर खुनी हल्ला होतो, करणारा त्याच्या जवळचाच माणुस निघतो व तो "इल्युमिनाटीचा हस्तक" आहे असे ठरवुन त्याला ठार मारले जाते, खुद्द केमरलिंगो जखमी होतो.
इकडे खुनावरुंन खुणा, दुव्यावरुन दुवे शोधत असलेल्या लँग्डनला अखेरीस येश मिळते. ते अँतिमॅटर हुडकण्यात यशस्वी ठरतात, ते अँटिमॅटर असलेले कॅनिस्टर त्यांना सापडते व खुन्याचाही बंदोबस्त होतो ....

पण इथे अजुन एक नवा टर्न ...
अँटिमॅटर संभाळनार्‍या कॅनिस्टरची बॅटरी फक्त ५ मिनीटे शिल्लक राहिली असते, ते संपल्यावर आतल्या अँटिमॅटरचा व बाहेरच्या मॅटरचा संपर्क होऊन एक महाविस्फोट होण्याची शक्यता निर्माण होते, हातात असतात फक्त ५ मिनीटे व पणावर लावले असते अख्खे व्हॅटिकन सिटी, ख्रिश्चन धर्मातले सर्वोच्च अधिकारी, लाखो लोक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांचा धर्मावरील विश्वास ...

ही आव्हान पेलायला उपस्थित असतात स्वीस गार्डचे काही कडवे रक्षक, प्रा. लँग्डन, व्हिट्टोरिया व्हेट्रा आणि स्वतः केमरलिंगो ....

पुढे ???
पुढे काय होते ???
अँटीमॅटर संभाळले जाते की त्याचा स्फोट होतो ? स्कुल ऑफ कार्डिनल्सचा पोपसंबंधी काय निर्णय होतो ? आत्त्तापर्यंत अखंड कष्ट व परिश्रमाची उच्च पातळी गाठलेल्या प्रा. लँग्डन आणि केमरलिंगो यांचे काय होते ?धर्मावरील श्रद्धेचा विजय होतो की विज्ञानातील सत्याचा ???

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला थेटरमध्ये चित्रपट पहुनच मिळतील. आत्ता मी इथे काही लिहणे म्हणजे "मिस्टरी स्पॉईल" करण्यासारखे होईल, तेव्हा आपण हा चित्रपट जरुर थेटरमध्येच पहावा.
माझ्याकडुन इतकेच....

शौर्य आणि क्रौर्य , धर्म व धर्मातील रुढीवरील विश्वास आणि विज्ञान , धोकेबाजपणा आणि पराकोटीची स्वामीनिष्ठा , सत्तापदांचा मोह आणि निरिच्छपणे केलेली सेवा, कमालीची गुप्तता आणि त्यांची उकल ह्या सर्वांचे सुम्दर मिश्रण असणारा हा एक नितांतसुंदर चित्रपट म्हणजे "एंजल्स आणि डेमन्स ", जरुर पहा आणि कसा होता ते मला आवश्य कळवा ...
धन्यवाद ...!!!!

* इल्युमिनाटी :

हा ख्रिश्चनिटीमधल्या चर्चया विरोधात असणार्‍या काही कडव्या लोकांच्या म्हणजे मेसन्सच्या गटामधला एक लहान गट, प्रामुख्याने ह्या गटात त्या त्या काळातले महान शात्रज्ञ, शिल्पकार, कलाकार, तंत्रज्ञ लोक वगैरे असत. ब्रदरहुड ह्या अजुन एका चर्चविरोधी गटाकडुन मिळणार्‍या मदतीमुळे अनेक नव्या संकल्पना ह्या इल्युमिनीस्ट लोकांनी मांडल्या. बव्हेरियन राजाच्या आर्थीक मदतीचा स्त्रोत अखंड चालु असल्याने ह्यांनी बरेच संशोधनात्मक कार्यही केले.हे सर्व "विज्ञानवादी" लोक होते.मात्र ह्यांचे संशोधन हे "बायबलमधल्या संकल्पनांच्या विरोधात" गेल्याने व्हॅटिकन चर्चच्या रोषास हे इल्युमिनाटिस्ट बळी पडले, ह्यांच्यावर बंदी आली व सदस्यांचे प्रचंड छळ झाले व अनेक हत्याही झाल्या ..."गॅलालियो, केपलर, न्युटन,लिओनार्ड दा विंची, व्हिस्टन चर्चिल" वगैरे इल्युमिनीस्ट होते असा एक समज आहे ...


( वाचकांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्यास मी एक "मेसन्स आणि इल्युमिनाटी" ह्यांच्यावर सखोल भाष्य करणारा लेख टाकेन, अर्थात वेळ आणि गरज ह्यावर सर्व अवलंबुन असेल. मात्र खरोखर जाणण्याची इच्छा असेल तर जरुर लिहीन )

3 comments:

भानस said...

मीही ह्या सिनेमाची वाट पाहत होते. त्यामुळे लागलीच पाहीला. पण अजून किमान एकदा तरी पाहायला हवाच.धर्म व Science ह्याची फारच गूढ रितीने गुंतागूंत करून थोडे अगम्य करून तुमची मती गूंग करून टाकली आहे. त्यामुळे जे नजरेतून सुटते किंवा नजरेत आले तरी मनातून सुटते...पुन्हा पाहायलाच हवे. तुम्ही खूपच सविस्तर विवेचन केले आहे.त्यामुळे न समजलेले पटकन उलगडेल.आवडले.

Rohit Khirapate said...

नमस्कार छोटा डॉन,
आपला ब्लॉग अप्रतिम आहे. पण ब्लॉगवर कुठेच आपल्याशी कसा संपर्क साधायचा ह्याचा उल्लेख नसल्याने ह्या प्रतिक्रियेतून आपल्याशी संपर्क साधत आहे.
कृपया आपला email id कळवावा
rohit@aamhimarathi.in

Smita said...

Your blog is too nice. Please give your email id