आपल्या घराच्या विस्तिर्ण अशा बाल्कनीवर फ़ेर्या मारुन ( वे समोर तेच तेच "पडलेले" चेहरे पाहुन ) दादुमहाराजांना प्रचंड वैताग आला आहे, काय करावे काही सुचत नाही. जरा कुठे बाहेर जावे म्हटले तर मिडीयाच्या आग्यामोहळाचा टेरर आहे म्हणुन तो ही उपाय कटाप. मधुनच मिलिंद त्याच्या ब्लॆकबेरीमध्ये डोकावुन काही तरी युसलेस डेटा देत असतो, कार्यकारी संपादक व खासदार ही उगाच काहीतरी बोलायचे म्हणुन उसने अवसान आणुन बोलत असतात पण आता त्याला काहीच अर्थ नाही हे दादुमहाराजांना उमजले आहे म्हणुन ते “जाऊ दे आता, काय करणार ?” अशा अर्थाचे हातवारे करत असतात. एके काळी सरकारला फ़ोडुन काढायला हातात घेतलेला ऊस घेऊन ते (वांद्र्यातुन डागलेल्या व इकडे ) गच्चीत येउन पडलेल्या रॊकेट्सचे अवषेश एका बाजुला सारत असतात, उगाच एक विरंगुळा म्हणुन.
बराच वेळ निघुन जातो, अचानक दादुमहाराज एकदम जोशात म्हणतात “चला रे, एक अपॊइन्टमेंट आहे फ़ॊरेनच्या डॊक्टराची, कमीत कमी ही तरी जागा राखली पाहिजे ...“
सगळी सेना (पक्षी : मिलिंद, कार्यकारी संपादक व इतर १-२ गोटातले ) त्यांच्यामागोमाग निघते.
ठरल्या वेळी ते तज्ज्ञांच्या केबिनमध्ये जाऊन बसतात. मधल्या खुर्चीवर दादुमहाराज कपाळावर रुमाल घेऊन, साईडला मिलिंद एका वेळी ३-४ फ़ोनवर “ बोला, मीच साहेब आहे. “ अशी समोरच्याची बोळवण करत, दुसया बाजुला कार्यकारी संपादक उगाच टेबलावर पेपर चाळत व चेहरा वाकडा करत बसतात.
एक गोरा डॊक्टर घाम पुसत समोरच्या खुर्चीवर येऊन बसतो.
“नमस्कार, तुमच्यातले दादुमहाराज कोण?”
(पुढेपुढे करणा-या मिलिंदाला दाबुन ) “नमस्कार, मीच दादुमहाराज”
“वेल, तुम्ही नक्की काय करता?”
“मी लढतो, आय मीन मी खरेतर वैयक्तीक स्वत: लढत नाही तरीपण पडतो.”
“इंटरेस्टिंग, मजेशीर प्रकरण आहे. लढतो ;पण लढत नाही आणि तरीही पडतो. साऊंड्स क्रेझी.
असो, आता आपण मुद्द्याकडे वळु, नक्की काय लढता किंवा नक्की काय लढत नाही तुम्ही, शिवाय तुम्ही पडता ते नक्की कशात ? “
“मी राजकारण खेळतो, निवडणुका लढतो आणि त्यातच पडतो, आय मीन मी स्वत: लढत आणि पडत नाही पण माझा प़क्ष लढतो आणि आमचे उमेदवार पडतात.”
( १ ग्लास पाणी पिऊन ) “ थांबा थांबा, आपण एकेक मुद्दा घेऊ, माझा जरा गोंधळ होतो आहे. तुम्ही राजकारण खेळता; मान्य. निवडणुका लढता आणि त्यात पडता; हे ही मान्य. पण स्वत: लढत नाही आणि स्वत: पडत नाही हे जरा गोंधळाचे असले तरी तुम्ही म्हणता म्हणुन मान्य.
पण आता ह्यात पक्ष आणि उमेदवार कुठुन आले ? जर ते पडणार असतील तर ते पडलेले लोक कुठे आहेत ? मग तुम्ही इथे कसे ?”
“मी त्यांचा नेता आहे, थोडक्यात विरोधी पक्षाचा नेता.”
“ते कशासाठी ? “
“ .... “
“ .... “
“ त्याचं असं काही खास कारण नाही”
“ बरं, तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही एक नेता असुन राजकारण खेळता व तुमच्या नेतॄत्वाखाली तुमच्या पक्षातले लोक निवडणुका लढतात व त्यात पडतात, करेक्ट ? “
“येस्स, यु आर राईट डॊक्टर”
“पण मग आता तुमचे उमेदवार पडतात कशामुळे हा महत्वाचा मुद्दा येतो, त्याबद्दल काही डिटेल्स ? “
( कार्यकारी संपादक एकदम उसळुन ) “ खंजीर खुपसला हो पाठीत मराठी माणसाने, आजच्या युवा पिढीला महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचे महत्व कळत नाही.”
( डॊक्टर एकदम ब्लॆंक होऊन ) “ हे पहा इथे मुद्द्यांचा फ़ारच गोंधळ होतो आहे, खंजीर खुपसणारा मराठी माणुस कोण ? त्याच्यावर पोलीस का ऎक्शन घेत नाहीत ? हे युवा पिढी आणि १०५ हुतात्मे हा मुद्दा काय ? शिवाय हे महाशय कोण ? हे सुद्धा उमेदवार असुन पडले आहेत काय ? “
“ नाही; हे उमेदवार होते पण पडले नव्हते, ते सध्या राज्य .... “
(बोलणे मध्येच तोडत ) “ पुन्हा विसंगत मुद्दा, मगाशी म्हणलात उमेदवार पडतात, आता म्हणत आहात की हे पडले नाहीत ? “
“ अहो ती वेगळी निवडणुक, ही वेगळी. जाऊ दे ते मह्त्वाचे नाही, आपण मुळ मुद्द्याकडे वळु”
( डॊक्टर घाम पुसत ) “ बरं बरं, ठिक आहे. आता आपण एकेक संदर्भ गोळा करु. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ह्या निवडणुकीत तुमच्या पक्षाचे उमेदवार पडले की ज्याचे तुम्ही राजकारणी नेते आहात, करेक्ट ? मग आता ते कुणामुळे पडले ?”
( मिलिंद पटकन ब्लॆकबेरी उघडतो व कार्यकारी संपादक पेपरात डोके खुपसतात. )
(दादुमहाराज उद्वेगाने ) “ अहो तो आहे ना सुपारीमॆन, त्यानेच खोडा घातला.”
“पुन्हा संदर्भहीन मुद्दा. हा सुपारीमॆन कोण ? त्याने नक्की काय केले ? “
“ आधी आमच्यातच होता, एके दिवशी सनकेत राजीनामा देऊन निघुन गेला व स्वत:ची वेगळी चुल मांडली. आता निवड्णुकीत आमच्या विरोधात होता. कॊंग्रेसच्या सांगण्यावरुन त्याने मराठी माणसाची दिशाभुल करुन आमची मते फ़ोडली व आमचे उमेदवार पडले. ”
“ आता ही कॊंग्रेस नावाची व्यक्ती कोण ? “
“अहो तो एक प़क्ष आहे आमच्या विरोधातला. त्यांच्यातल्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ह्या सुपारीमॆनने आमची हक्काची मराठी मते फ़ोडली व कॊंग्रेसला विजय मिळवुन दिला.”
“ मगाशी तर म्हणालात की विरोधीवाल्यांचे नेते तुम्ही आहात म्हणुन ... ”
“ अहो तो मुद्दा वेगळा, ते आमच्या विरोधातले नेते, थोडक्यात ते सत्ताधारी व आम्ही विरोधक”
“ओह्ह, आय सी. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या सुपारीमॆनने तुमची हक्काची मराठी मते फ़ोडली व त्यामुळे कॊंग्रेस जिंकले. पण ही हक्काची मराठी मते तुमच्याकडे पुर्वी असण्यामागे व आता फ़ुटण्यामागे काही खास कारण ?”
“ त्याचं असं काही खास कारण नाही.”
“ खास नसले तरीही काही तरी कारण असावे असा माझे डायग्नॊस्टिक सांगते. असो, आपण ह्यावर जरा सविस्तर बोलु म्हणजे एकेक गोष्टी स्पष्ट होतील.”
“ अहो त्याला बारामतीच्या काकांची फ़ुस आहे व कॊंग्रेसची सुपारी आहे म्हणुन तो आम्हाला नडतो व आमचे उमेदवार पाडतो.”
“ आता हे बारामतीचे काका कोण ? माझा गोंधळ वाढत चालला आहे.”
“ ते महाराष्ट्राच्या राजकारणातले भिष्मपितामह, अख्खे राजकारण ह्यांच्याभोवती फ़िरते. हे इतर वेळी लोकांना सल्ले द्यायचे, आश्वासने द्यायचे व एखाद्याचा गोड बोलुन घात करण्याचे काम करतात. ह्या काकांचे महत्व प्रचंड आहे, त्यांच्याशिवाय इथे पानही हलत नाही.”
“ ओह; आय सी. अजुन एक प्रश्न. २-३ वर्षामागे तुमच्याच भागातला एक तरुण त्याच्यावर काका अन्याय करतात, दुर्लक्ष करतात वगैरे मुळे मानसिक त्रास होतो अशी तक्रार घेऊन आला होता. तो कोण आणि सध्या काय करत असतो ? “
( २ मिनीटांची निरव शांतता, कार्यकारी संपादक उठुन बाहेर जातात, मिलिंद “हॆलो हॆलो” करत कोप-यात जातो, दादुमहाराज अस्वस्थ होतात. )
“ तो मुद्दा वेगळा आहे आणि महत्वाचा तर अजिबातच नाही, ते काका वेगळे आहेत. आपण हा मुद्दा इथेच सोडुन देऊ हेच बरे कारण त्याने केस कॊम्पिकेटेड होईल.”
“ ओह्ह, ओके. हरकत नाही.”
“ हुश्श्श्श्श “
“ ओके ! म्हणजे आता आपण सगळे संदर्भ पुन्हा एकत्र करु, मी त्याची नोट बनवुन घेतो म्हणजे मला ह्या डेटाचे ऎनालिसीस करता येईल. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही एका पक्षाचे राजकारणे नेते आहात तुमचे कार्यकर्ते निवडणुका लढवतात व त्यात पडतात. तुम्ही स्वत: लढत नाही पण तरीही तुमचा पराभव होतो. ह्यामागचे कारण एक सुपारीमॆन असुन त्याला कॊंग्रेसनामक एका पक्षाची सुपारी आहे, ह्या सुपारीमॆनला प्रेरणा आहे ती बारामतीच्या काकांची. तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा त्रास होतो. करेक्ट ? “
“ ऎब्सोल्युटली राईट डॊक्टर, तुम्हाला अगदी व्यवस्थित समजले सगळे काही.”
“ पण ह्यात त्या दुस-या काकांचा व त्या तरुणाचा काहीही संबंध नाही, करेक्ट ? “
“ नाही, गोंधळ होतो आहे. त्या तरुणाचा व ह्या सुपारीमॆनचा संबंध आहे.”
“ हे पहा हे फ़ारच गोंधळाचे होते आहे, मगाशी म्हणालात त्या काकांचा संबंध नाही. आता म्हणत आहात की सुपारीमॆन आणि तो तरुण ह्यांचा संबंध आहे. मग अशावेळी ते काका काय करतात सध्या ? “
“ खास असे काही नाही, पण जाऊ दे ते महत्वाचे नाही. पण तुम्हाला माझी समस्या बरोबर कळाली असे मला वाटते.”
“ एक मिनीट, जरा थांबा ! हे सर्व फ़ारच गोंधळाचे आहे. एक काम करु, मी आता तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींचे व्यवस्थित ऎनालिसीस करतो. आपण उद्या भेटु.”
“ धन्यवाद डॊक्टर, मी उद्या ह्याच वेळी येतो.”
*********************************************************
( दादुमहाराज व त्यांची सेना जाते व डॊक्टर पुढच्या पेशंटला आत बोलावतात.)
“नमस्कार, तुम्ही कोण व काय करता ? "
“नमस्कार, मी विरोधी युतीमधला नंबर २ चा नेता. मी नेहमी निवडणुका लढवतो व जिंकतो, ह्यावेळी लढलो नाही पण हरलो. आमच्या प़क्षाचे उमेदवारही लढले व पडले ...”
( एकदम जोरदार धप्पकन आवाज येतो.)
आतला पेशंट दार उघडुन बाहेर येतो व ओरडतो “ अरे पळा पोट्याहो, हे डॊक्टर बेणं चक्कर येऊन पडुन राहिलं बे. कोणीतरी खायला आणा बे काहितरी.”
त्याबरोबर बाहेर जमलेले इतर हरिदास साठवले, विजय खातु, देवदास कदम, अनिल देशमुख, अजयसिंह कोयते-पाटील असे नेते पळत येतात व एकमेकांना इथे पाहुन चक्रावुन जातात.
- समाप्त -
4 comments:
खुपच सुंदर झालेलं आहे हे पोस्ट.
चांगली उडवली उध्दवची .... सेना विकायला निघाला आहे हा... अहो येवल्यात भुजबळ विरुध्द सभा घेतली नाही याने ...लासलगावची कॅन्सल केली,,,,, त्या मनोहर जोशीने त्याची सभा 10 किलोमिटर अंतरावर असुन कॅन्सल केली..... सेना अॅडजस्ट होते हे खरेच आहे... म्हणे मराठी माणुस खंजीर खुपसतो....
खूपचं छान. दादुमहाराजांनी वाचायला हवे हे. नक्कीच डॉक्टरकडे जातील.
Nice post raje
Post a Comment