Tuesday, February 22, 2011

'धोबीघाट' विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ...

सध्या म्हणे क्रिकेटचा विश्चचषक सुरु आहे आणि त्यात "भारत" म्हणे आघाडीचा दावेदार आहे, आम्ही हे क्रिकेट वगैरे पहातो अशातला काही भाग नाही पण उगाच काहीबाही ४ लोक बोलतात ते आमच्या कानी पडते व त्यावर आम्ही ( कधीमधी ) भाष्य करत असतो. मुळात इन मीन ८-१० (रिकामटेकडे) देश आपला वेळ जात नाही म्हणुन दिवस दिवस जो निरर्थक खेळ खेळतात त्याच्या चक्क विश्वचषक स्पर्धा ?
नाही, मी मान्य करतो की एकुण १०० च्या आसपास देश म्हणे ह्या "आय सी सी ( ही आमच्या पवारकाकांची बरं, नाद नाय करायचा )" शी संलग्न आहेत, पण त्याने कुठे खेळ मोठ्ठा होतो का ? बरं, ह्या १०० तले किती देश नुस्ते नाममात्र क्रिकेट खेळतात हा दुसरा मुद्दा, उरलेल्या मन लाऊन खेळणार्‍या देशांमध्ये ( बरं का, ह्या देशांमध्ये जनरली पॉलिटिशियन जन्तेला चुना लावत असतात व त्यांचे लक्ष ह्या मुद्द्यांकडे जाऊ नये म्हणुन क्रिकेटसारख्या रिकामटेकड्या खेळाला इथे उगाच प्रमोट केले जाते ) मेन ४ देश आशियातलेच ( किंवा भारतीय उपखंडातले, त्यातले ३ म्हणजे स्वातंत्र्यापुर्वीचा भारत, आता बोला) आहेत आणि एकुण उत्पन्नामधला निदान ८०% भाग इथुनच येतो, आता पैसा आला की प्रमोशन आलेच व म्हणुन असल्या स्पर्धेचा गाजावाजाही आला, असो हरकत नाही.

आता तुम्ही म्हणाल की काही आफ्रिकन आणि इतर अरबी देश क्रिकेट खेळतात आणि शिवाय ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड आणि खुद्द इंग्लंडचा पण संघ इथे खेळतो.
अरबी देशांचे काय हो, त्यांच्याकडे मनोरंजन व्हावे म्हणुन कोंबड्यांच्या झुंजी, उंटांच्या शर्यती पासुन ते थेट माणसांच्या ( पक्षी : विकत घेतलेल्या गुलामांच्या ) झुंजी लावतात, मग मला सांगा क्रिकेट खेळवणे ही काय त्यांना अवघड बाब आहे का ?
बाकी त्या शारजाच्या मैदानात मॅच पहायला जमलेले ( काळा गॉगलवाले) रसिक पाहुन आजही आम्हाला ह्या 'जंटलमेन गेम'चे आश्चर्य वाटते बरं.
( बाकी सध्या काही लक्ष्मीपुत्रांनी "आय पी एल" नामक स्पर्धेत असेच प्लेयर्स 'विकत' घेऊन ते आपापल्या गावात मनोरंजनासाठी खेळवणार असल्याचा घाट घातला आहे, ह्यावरुन एका कॅबिनेट मंत्र्याला आणि बीसीसीआय मधल्या एका दिग्गज आसामीचा गुल्ल व्हावे लागले ह्यावरुन आम्हाला ह्या स्पर्धेच्या 'स्पिरीट्'ची अंधुकशी कल्पना येते आहे, असो पण सध्या विषय तो नाही, नंतर ह्यावर सविस्तर भाष्य करु )

असो, भारताने म्हणे १९८३ साली ही स्पर्धा जिंकुन हा विश्वचषक भारतात आणला होता, नाही नाही, ही गोष्ट अभिनंदन करण्यासारखीच आहे त्याबद्दल वाद नाही, त्या संघाचे अभिनंदन आहेच.
अहो पण त्यानंतर त्या स्पर्धेत खेळलेले खेळाडु, मैदानात बाटल्या उचलायला असणारा दुय्यम खेळाडु, सपोर्ट स्टाफ, त्यावेळी मैदानाबाहेर गोळ्या-बिस्कीटे विकणारे ह्यापासुन ते थेट तो सामना झाडावर बसुन फुक्कट पाहणारे हे सगळेच आजकाल मिशीला तुप लाऊन 'क्रिकेट एक्सपर्ट' म्हणुन हिंडतात व काहीही मुक्ताफळे उधळतात ह्याचे आम्हाला मनोसोक्त हसु येते.
आणि बरं का, सन १९८३ नंतर दर ४ वर्षांनी आपल्या इथल्या जनतेला "विश्वचषक विजेते" होण्याची स्वप्ने दाखवुन जो बेमालुम चुना लावण्याचे कार्य इथल्या 'इव्हेंट मॅनेजर्स'नी हाती घेतले आहे त्याला तोड नाही.
असो, पैसा म्हटले की हे आलेच नै का ...
अजुन एक किस्सा सांगु का, मागच्यावेळी की नै आपण ना ( पक्षी : भारत ) पहिल्या फेरीतच धुळ खात गारद झालो ( भेंडी काय दमदार वाक्य होते हे ) असे एका पेप्रात वाचले होते, मग काय हो, धंदाच बसला की ह्या क्रिकेटवाल्यांचा. कारण ह्या पराभवानंतर भारत आणि पाकीस्तान ( ते ही आपले भावंड, पडले पहिल्याच फेरीत बाहेर ) मधले तमाम रसि भयंकर निराश झाल्याच्या बातम्याही आम्ही वाचल्या.
मग काय झाले तर एक गंमतच घडली, २०-२० नामक ह्या क्रिकेटचे एक छोटेसे पिल्लु जन्माला घालण्यात आले, त्याचाही अचान्क विश्वचषक भरवण्यात आला आणि त्यात ना भारत-पाकिस्तान ही 'फायनल' खेळवण्यात आली ( हो हो, खेळवण्यात आली हे बरोबर आहे ) आणि बरं का त्यात ना भारत जिंकला, पुन्हा इथे क्रिकेटचे रोपटे जोमाने फोफावले व पुन्हा पैशाच ओघ सुरु झाल. कालांतराने मग लोकांना हा '२०-२० नशेचा डोस' फार आवडला असे उत्पादकांचे मत झाले व त्यासाठी खास त्यांनी 'आय पी एल' नामक स्पर्धा दरवर्षी भरवण्याचे ठरवले, बघा लेको किती क्रिकेट बघताय ते................................. परफेक्ट बिझीनेस, नै का ?

असो, आम्ही एकदा लिहीत गेलो मी मुळ विषय हरवुन काहीतरी तिसरेच लिहण्याची आम्हाला ( राऊतांसारखी ) सवय आहे, सबब आता आम्ही 'बॅक टु विषय' येतो.
सध्या म्हणे क्रिकेटचा विश्चचषक सुरु आहे आणि त्यात "भारत" म्हणे आघाडीचा दावेदार आहे,पुन्हा असोच.
आमचा तसा ह्याला विरोध वगैरे नाही बरं का पण ह्या निमित्ताने जे 'रान पेटवले' गेले आहे ते पाहुन आम्हाला अंमळ काळजी वाटत आहे की ह्या आगीत आपले किती महत्वाचे विषय उगाच भक्षस्थानी पडणार आहेत.
ह्या महान देशातले लोक आता कामंधंदे सोडुन जिथे मिळेल तिथे क्रिकेट बघत बसणार आणि बाकीचे विषय आपोआप फाट्यावर मारले जाणार.

- आता युनियन बजेट, रेल्वे बजेट आणि अन्य घटना ह्याच कालावधीत घडतील व आपण आणि मिडिया (ह्यांना क्रिकेटचेही देणे नाही आणि बजेटशीही घेणे नाही, पैसा बोल्ता है साब ) ह्याकडे चक्क दुर्लक्ष करु.
- आता सरकारी कार्यालये, खासगी कचेर्‍या, इतर महत्वाच्या सेवा इथले कर्मचारी 'ऑनड्युटी' मॅच बघत बसणार व कामे तुंबणार
- जे लोक आधीच रिकामटेकडे आहेत ते आता चौकाचौकात टीव्ही लाऊन किंवा एखाद्या दुकानासमोर रस्त्यावर उभे राहुन मॅच बघणार, आरडाओरडा करणार व त्यामुळे काय नुकसान होते ते तुम्हीच सांगा, आम्हाला सांगण्याची इच्छा नाही.
- मार्च / एप्रिल म्हणजे परिक्षांचा सिझन हो, आता कसला अभ्यास आणि कसल्या परिक्षा ? मारुन मुटकुन अभ्यासाला बसवणे म्हणजे त्रासच ना ?
- मेन म्हणजे आता ह्या कालावधीत 'वेळ आणि सेवेची गणिते' धडाधड चुकणार
( ( आमची तक्रार नाही, आम्हाला केवळ गंमत वाटते हे आधीच कबुल करतो ) किस्सा पहिल्या दिवशीचा, शनिवारी दुपारनंतर आमच्या भागातली बहुसंख्य दुकाने उगाच बंद किंवा इनअ‍ॅक्टिव्ह झाली, इतर सेवापुरवठादारांनी हक्काची 'मॅच बघायची सुट्टी' घेतली, बाहेर निघालो असतो २-३ ठिकाणी रस्त्यावरच टीव्ही लाऊन भारत्-बांग्लादेश ह्यांच्यातले महायुद्ध(?) पाहण्याचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जोशात चालु होता, त्यामुळे झालेल्या ट्रॅफिकच्या गमतीत आम्हाला उशीर झाला, नंतर एका हॉटेलात जेवायला गेलो असता तिथे चक्क मोठ्ठी स्क्रीन लाऊन सामने पहाणे चालु होते व सर्व सेवापुरवठा करणारे कर्मचारी ते पाहण्यातच व्यस्त होते, सामने पाहण्याचा त्यांचा मुलभुत हक्क मान्य केला तरी 'ऑनड्युटी' हे असे वर्तन आता अजुन ४० दिवस चालणार आहे का ? हे राम ! )

असो, उगाच जास्त वितंडवाद घालत नाही !
क्रिकेट हा एकेकाळी 'बघण्यालायक' खेळ होता, आम्ही बघयचो व तो आता 'बघवेना' असा झाला म्हणुन ही ४ वाक्ये.

बाकी ही सुरवात आहे.
आम्ही आमच्या ह्या आवडत्या खेळावर असेच भाष्य करत राहु, स्पर्धा अजुन ४० दिवस आहे म्हणतात

मध्यंतरी 'धोबीघाट' हा अत्यंत प्रगल्भ, सामाजिक जाणिवा असणारा, आंतरिक संवेदनांना हात घालणारा, आधुनिकोत्तर साहित्यात मानाचे पान असणारा असा लै भारी अभिजात सुंदर चित्रपट आहे असे ऐकले होते ( व म्हणुनच आम्ही तो पाहिला नाही हा भाग वेगळा ).
म्हणुनच आम्ही ही आमची लेखमाला "धोबीघाट" ह्या संकल्पनेच्या स्वरुपात सादर करणार आहोत व एकेका विषयाची मनोसोक्त धुलाई करणार आहोत.

पुढचे आकर्षण : 'धोबीघाट' विश्वविजेतेपदाच्या दावेदारांचा - भाग # १ : भारत

धन्यवाद !

9 comments:

akhildeep said...

क्रिकेट हा एकेकाळी 'बघण्यालायक' खेळ होता, आम्ही बघायचो व तो आता 'बघवेना' असा झाला..
शब्दाशब्दाशी सहमत!
२०-२० वर्ल्ड कपची भारत-पाकिस्तान ही 'फायनल' खेळवली गेली तशीच वानगीदाखल आणखी काही उदाहरणे!

सौरव गांगुली (मला याच्याविषयी आदर आणि सहानुभूती आहे!) झिम्बाब्वे विरुद्ध (का होईना) शतक झळकावतो काय आणि संघाबाहेर बसतो काय!

कसल्यातरी ad मध्ये "मै दादा! भुले तो नही?" म्हणतो काय आणि (कौंटी मध्ये ६९ धावा केल्याबद्दल!) पुढच्या दौ-यात संघात येतो काय!

damian martin सारखा गुणी खेळाडू शरद पवारांना धक्का देतो काय आणि संघातून अकाली निवृत्ती स्वीकारतो काय!

बीसीसीआयने(न खेळण्याचा) दम दिल्याबरोबर आय सी सी भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या (खेळाडूंच्या अस्वच्छपणामुळे आणि सचिनदेवावर झालेल्या बॉल tampering च्या आरोपामुळे गाजलेल्या) अनधिकृत म्याचेस अधिकृत काय करते!

लिस्ट संपायची नाही.. उपाय एकच! बेटिंग अधिकृत करणे! निदान लोकांना कळेल कि फिक्सिंग हा विषय संपलेला नाही!

Anonymous said...

बाकी पोटाला इतका जबरदस्त ठणका लागल्यावर काय करावे यावर उपाय सुचविण्याची माझी कुवत नाही !

हेरंब said...

अतिशय रिकामटेकडा किंवा टुक्कार की कायसंसं म्हणतात तसला लेख (!!!!)

>> मीन ८-१० देश

१४ देश आहेत. टीका करण्यापूर्वी सगळे तपशील (आणि आपली लायकीही) तपासून बघत चला.

रच्याक, मागे त्या तंगडचेंडूच्या (फिफा म्हणतात म्हणे त्याला काही लोक) चषकावर तुम्ही बरंच छान छान लिहिलं होतंत म्हणे. म्हणून अपेक्षेने वाचायला आलो तर या पोटदुखी आणि जळजळीशिवाय काहीच हाती लागलं नाही.

असो. केशराच्या कुरणात गाढव.. अजून काय बोलणार !!!!!!

Pravin said...

नाही पटला लेख राव. तुमचा मुख्य आक्षेप या खेळामुळे इतर महत्वाच्या गोष्टींकडे (युनिअन बजेट, रेल्वे बजेट आणि अन्य घटना) होणाऱ्या दुर्लक्षाकडे असेल तर, विश्वचषक ४ वर्षांतून एकदा होतो आणि तोही जवळपास १.५ ते २ महिने. मग सांगा उरलेल्या ३ वर्षे १० महिन्यांत आपण काय दिवे लावतो? तेव्हा हे प्रश्न चुटकीसरशी सुटतात का?

१०-१२ वीच्या परिक्षांचा मुद्दा मान्य, पण यातून तुम्ही आम्ही सर्व जण गेलो आहोत. अगदी १०-१२ वीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्या परिक्षेचे महत्व माहिती आहेच. माझ्या मते ते आता परिक्षेला महत्व देण्याइतपत इतके सज्ञान नक्कीच असतील.

राहता राहिला प्रश्न कामधंदे सोडून मॅच बघण्याचा तर माझ्या मते जगायला (जिवंत राहायला नव्हे) काहीतरी विरंगुळा असणं आवश्यक आहे डॉनराव. आधीच आपल्या भारतीयांचं जगणं मुश्किल झालं आहे. ४० दिवस (तो ही अर्धाच बरं का, कारण बऱ्याच मॅचेस दिवसरात्र आहेत) त्यांना जरा विरंगुळा मिळत असेल तर मिळू द्या कि. आणि तसं बघितलं गेलं तर चाळीसच्या चाळीस दिवस भारत खेळणार नाहीय. त्यामुळे मला नाही वाटत की ४० च्या ४० दिवस कामधंदा फाट्यावर मारून लोक विश्वचषक पाहतील.

थोडक्यात तुम्ही उल्लेखलेले सर्व प्रश्न न सुटण्याबाबत (केवळ) ४० दिवस चालणाऱ्या विश्वचषकाला जबाबदार धरणं योग्य नव्हे. पटलं तर घ्या नाही तर द्या सोडून, कारण तुम्ही नाही पाहिलात तरी मी तरी आपल्या सर्व मॅचेस रात्रभर जागून पाहणार आहे.

छोटा डॉन said...

प्रतिसादांसाठी आभार ...
माझा प्रमुख मुद्दा हाच आहे की पुर्वी जे क्रिकेटचे स्पिरिट होते, ज्या पद्धतीने ते खेळजे जात होते आणि ज्यासाठी लोक एवढे वेडे होत होते ते आज नाही.
आज क्रिकेट म्हणजे शुद्ध बाजार झाला आहे ( अहो मॅच बघायला टिव्हीसमोर बसलो की पीचच्या वर, खाली, २ साईडला सगळीकडेच जाहिराती दिसतात, बॉ जस्ट प्लेयर क्लियर करुन बाउंडरीकडे गेला की अ‍ॅड, कॅच घेतला का सुटला ते पण कळत नाही, लगेच रिप्ले कर केव्हाच खतम झाले आहेत, प्लेयर्सचे फार वेगळे नाही, काही अपवाद सोडले तर सगळेच त्या-त्या कंपन्यांचे गुलाम. मला सध्याचे 'हे' क्रिकेट आवडत नाही व म्हणुन मी त्यावर टिका करणार ).

@ हेरंब :
बाळ, आपल्याला सोसतील तेवढेच वाचन आणि लेखन करावे, एखादा मुद्दा आपल्याला समजत नाही हेच तुला समजत नसेल तर निदान प्रतिसाद देताना 'लायकी काढणे, गाढव म्हणणे' वगैरे बाबी टाळल्या तर उत्तम, नपेक्षा आत्मचिंतन आणि स्वयंपरिक्षा केलेली काय वाईट, नै का ?
शक्यतो मी आंतरजालावर वादापासुन दुर असतो, मात्र त्यावेळी तुम्हीही एक पातळी सोडु नका ही किमान अपेक्षा आहे.
असो, तुझ्या लेखनाला ओळखतो म्हणुन ही 'विनम्र मागणी' ...

- छोटा डॉन

Anand Kale said...

पटेश...आवडेश.. लाईक्ड.... +++++१११११११११
हेरंबच क्रिकेट प्रेम मला माहीत आहे... त्याची हि प्रतिक्रिया अपेक्षित होतीच.. :) :)

अपुनका भाय बराबर बोला क्या.. :)

Deepak Parulekar said...

हेरंब आणि प्रवीणशी सहमत !!
एक गोष्ट मला नेहमी खटकते ज्या गोष्टीचं आपल्याला काडीचंही ज्ञान नाही. चार पाच रिकामटेकड्या लोकांकडुन ऐकलेल्या वायफळ गप्पांच्या आधारे बडबड करणे माणसांना कसं काय जमत?
हा त्यांच्या ज्ञानाच्या रिकामटेकडेपणाचाच एक भाग असावा ! असो! काय लिहिणार अजुन ! बरं तुमच्यासारखे कमी लोक्स नाहीत इथे ! असो.
प्रवीण आणि हेरंबने जी प्रतिक्रिया दिलीय त्यापेक्षा अजुन काही वेगळी नाही !!

विशाल विजय कुलकर्णी said...
This comment has been removed by the author.
विशाल विजय कुलकर्णी said...

डानराव लै भारी....
आता फ़ुडच्या भागाची वाट बगून रायलो पगा. आपण तं पंखा हावो ना भौ तुमच्या लेखनीचा :)
लवकर लिही रे बाबा !!
बादवे तुला उद्देशुन असलेली ही कमेंट प्रचंड हसवून गेली..
...एक गोष्ट मला नेहमी खटकते ज्या गोष्टीचं आपल्याला काडीचंही ज्ञान नाही. चार पाच रिकामटेकड्या लोकांकडुन ऐकलेल्या वायफळ गप्पांच्या आधारे बडबड करणे माणसांना कसं काय जमत? ;)