Monday, April 6, 2009

आमची गध्धेपंचविशी आणि थोडी बाष्कळ बडबड ...

परवाच म्हणजेच मागच्याच आठवड्यात (च्यायला, बघता बघता ८ दिवस झाले. अख्खे आयुष्य असेच झटपट निघुन जाणार असे दिसतेय. जाऊ देत, आयुष्यात खंत तरी किती गोष्टींची बाळगायची) बर्‍यापैकी उत्साहात आणि आनंदात आमचा वाढदिवस "घडुन" गेला. एकदाचे आम्ही २५ वर्षाचे झालो. (आयला वय जाहीर केल्याने ब्लॉगचे वाचक कमी होणार नाहीत ना ? "छोटा डॉन" हा "स्त्री आयडी" वाटत नसल्याने तशी शक्यता कमीच आहे म्हणा. असो). ह्यालाच आम्ही "गध्धेपंचविशीत आलो" असेही म्हणता येईल. आता इथे "घडुन जाणे" ह्या क्रियापदाला एक नैतिक अधिष्ठान (म्हणजे काय कोण जाणे, पण एकदाचा हा शब्द वापरला, द्या टाळी) आहे. त्याचे कसे आहे की आपले वाढते वय लपवणे हा (प्रामुख्याने) स्त्रियांचा व (आजकाल शाहरुखने फेअर & हँडसम क्रीमची ऍड केल्यापासुन) पुरुषांचासुद्धा (आयुष्यातल्या अनेक पालथ्या धंद्यापैकी एक प्रमुख) धंदा आहे. त्यामुळे वाढत्या वयाची आठवण करुन देणारा "वाढदिवस" हा बर्‍याच जणांना नकोसा झाला आहे असे आमचे विचारांती, अनुभवांती, व्यासंगांती मत झाले आहे (हा, मात्र ह्यादिवशी अभक्ष्यभक्षण व अपेयपेयपान ह्याला प्रत्यवाय नसावा). तर मुद्दा असा की वाढदिवस साजरा करणारे आपण कोणी नसतो, तो सत्यनारायणाच्या पुजेसारखा घडुन जातो. असो.

वाढदिवस नेहमीप्रमाणे चांगला थाटामाटात साजरा झाला (ह्याचा आदल्या दिवशी आमच्या गावाजवळ सापडलेल्या हजारो लीटर अवैध देशी-विदेशी मद्याच्या साठ्याशी काहीही संबंध नाही). सर्व काही सोपस्कार पुर्ण करुन आम्ही दुपारी (जेवणामुळेच्या)अंमळ सुस्तीत "चिंता करितो विश्वाची "असा चेहरा करुन बसलो होतो (ह्यालाच काही दुष्ट लोक "असा काय शुंभासारखा चेहरा करुन बसला आहेस ?" म्हणुन हिणवत होती, चालायचेच). मनात (भलत्यासलत्या) विचारांचा ( की अविचारांचा ? ) कल्लोळ उडाला होता (कदाचित ह्या "कल्लोळाचा" आवाज हा सामान्य जनांना "घोरण्यासदॄष्य" वाटत असल्याने मातोश्रींनी आम्हाला "घोरु नकोस, शांतपणे झोप" असा आमचा मुड घालवणारा सल्ला दिला असावा. चालायचेच) . बरेच काही मनात येत होते आणि विचारांचा प्रवाह हा धीरगंभीर नाद करीत आमच्याच मस्तकावर कोसळत होता. आम्ही एका निर्वाणीच्या क्षणी लॅपटॉप घेऊन ह्या उदात्त विचारांच्या निर्मळ झर्‍याला लेखणीवाटे वाट करुन द्यायचा विचार केला. पण ह्या कॄतीचा "पुर्वेतिहास" हा तेवढा प्रेरणादायी नसल्याने आम्ही हा बेत त्वरित डाव्यांच्या/मायावतींच्या पाठिंब्यासारखा मागे घेतला ( आता नको ती आठवण, मागे एकदा आम्ही आमचा ब्लॉग आमच्या आप्तांना वाचायला दिल्यावर त्यांच्या कुजकट कमेंट्समुळे आम्हाला २ दिवस रुमालात तोंड लपवुन फिरायची नामुष्की आली होती. असो). आम्ही ह्या कानाची त्या कानाला खबर न देता आमची "लेखनाची इच्छा" ही पवारसाहेबांच्या मनातल्या पंतप्रधानपदाच्या इच्छेसारखी मनात दाबुन ठेवली व वरकर्णी काही घडलेच नाही असा (कलमाडींसारखा) चेहरा करुन बसलो ....

आता हापीसात ( कुणी नसल्याने व कामही तितकेसे नसल्याने ) भयंकर रिकामा वेळ सापडल्याने आम्ही आम्ही आमचे असंबद्ध आणि बाष्कळ विचार कागदावर उतरवायचे ठरवले. प्रामुख्याने आम्ही "गध्धेपंचविशी" ह्या आयुष्यातल्या महत्वाच्या कालखंडाच्या सुलभतेच्या दॄष्टीने व अर्थात मानवतेच्या रक्षणाच्या हेतुने काही विचार मांडत आहोत. "तरुण हेच देश घडवत असतात " हे सर्वमान्य असल्याने सरकारनेसुद्धा ह्या बाबींचे विवीध पैलु तपासुन योग्य तो निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे ....

१. "गध्धेपंचविशीतले" तरुण हे आयुष्यातल्या महत्वाच्या कालखंडातुन मार्गक्रमण करत असल्याने त्यांच्या मार्गात फुल ना फुलाची पाकळी म्हणुन त्यांचे कामाचे तास त्वरित "अर्धे" केले जावेत तसेच विकांत हा ३ दिवसाचा करावा ...
हा महत्वाचा कालखंड आस्थापनाचे भविष्य घडवण्यात जात असल्याने तरुणाला स्वतःला घडवायची संधी मिळत नाही व पर्यायाने देशाच्या घडवणुकीवर अनिष्ट परिणाम होतो.असे "न घडलेले" तरुण आपल्या देशाचे भविष्य काय "घंटा घडवणार" ?

२. सध्या महागाई ही (पवारसाहेबांच्या गोंधळात टाकणार्‍या विधानांच्या वेगापेक्षा डब्बल) वेगाने वाढत असल्याने आजकाल "संवाद माध्यमं" महाग झाली आहेत, सबब "गध्धेपंचविशीतल्या" तरुणांना (ते काम करत असतील तर) आस्थापनातल्या फोनचा अमर्याद वापर करण्याची परवानगी असावी. मोबाईल फोन्सचे बिल प्रतिमास हे नाममात्र (म्हणजे मुंबई महानगरपालिका मुंबईतली मौक्याची जागा ज्या कवडीमोल दराने बिल्डर्स आणि कंपन्यांच्या घशात घालते त्या) दराने आकारावे ...
आस्थापनात फोनवरच्या वापराला आक्षेप घेतला तर त्याची "मानवी हक्काची पायमल्ली" ह्या गंभीर आरोपालाखाली चौकशी व्हावी (हवे तर ह्या आंदोलनासाठी सेटलवाडबाईंना त्या अजुन "पंचविशीत आहेत" असे सरकारी प्रमाणपत्र उपलब्ध केले जावे.)

३. स्वत:ला घडवण्यासाठी रात्री/अपरात्री चिंतन करीत रस्त्यावर हिंडणार्‍या "गध्धेपंचविशीतल्या तरुणांना" अडवुन त्यांना अपमानास्पद, मानहानीकारक व गंभीर प्रश्न करणार्‍या पोलीसांची बदली ही गडचिरोली/चंद्रपुरला करावी अथवा त्यांना भारताच्या सिमेवर घुसखोरांना "अडवण्यासाठी" पाठवुन द्यावे ...

४. उठसुठ "आजची बिघडलेली तरुणाई, ढासळती मुल्ये, विस्मॄतीत गेलेले संस्कार" ह्यावर तरुणांना बौद्धीके देणार्‍यांना "रासुका"खाली अटक करुन त्यांची रवानगी तुरुंगात केली जावी.

५. चॅनेल व्ही, एम टीव्ही , फॅशन टीव्ही अथवा तत्सम तरुण घडवण्यास मदत करणार्‍या चॅनेल्सला "राष्ट्रीय चॅनेल्स्"चा दर्जा दिला जावा, त्यावर अधिक प्रबोधक ( का उन्मादक ) कार्यक्रम कसे येतील ह्यासाठी एक "उच्चस्तरीय ( की हुच्चस्तरीय ) कमिटी" नेमली जावी ...

६. विवीध शितपेये अथवा मादक द्रव्ये ह्यांना त्वरित "शासकीय दुध योजनेच्या" समकक्ष आणुन त्यावर सरकारी अनुदान दिले जावे व ठिकठिकाणी ह्यांचे वाटप सुलभ व्हावे ह्यासाठी "सरकारमान्य विक्री केंद्रे" काढावीत ...
आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या विवीक्षित "सरकारमान्य क्षक्षक्ष विक्री" केंद्राचा दर्जा हा (काँग्रेसपक्षापेक्षा) खालवला असल्याने त्याच्याकडे त्वरित लक्ष दिले जावे ...

७. बर्गर, पिझ्झा, पास्ता, चायनीज ह्यां जंकफुड्सना "राष्ट्रीय खाद्यान्नाचा" दर्जा दिला जावा ...स्वस्त "झुणका-भाकर केंद्राच्या" धर्तीवर सवलतीत वरील पदार्थ विकणार्‍या वस्तुंची ठिकठिकाणी केंद्रे खोलावीत ...

८. सार्वजनिक स्थळी "प्रेमलाप" करण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाच्या कॄतीला "ऐतिहासीक घोडचुक" असल्याचा दर्जा दिला जावा व ह्याचे प्रायश्चित्त म्हणुन ठिकठिकाणी "प्रेमविहार उद्याने" बांधली जावीत. चौपाटी, पुण्यातला झेड ब्रीज सारख्या स्थळांना "कपल्स ओन्ली" म्हणुन आरक्षित केले जावे ...

९. "टाईम्स ऑफ इंडिया" ह्या अग्रगण्य वॄत्तपत्राने त्यांच्या प्रमुख आवॄत्तीचा आकार ३२ पानांवरुन ४ पानी करावा व त्या बदल्यात "पुणे/मुंबई/बेंगलोर टाईम्स" ह्या आवॄत्यांच्या पानांची संख्या ४/६ वरुन ३६/४० वर न्हेली जावी ....

१०. तरुणांच्या फॅशनेलबल, झकपक, मॉड अशा असलेल्या वरंतु फाटक्या, ढिगळे लावलेल्या अशा अल्पवस्त्रांवर उर्फ शॉर्ट्सवर नाके मुरडणार्‍यांना "तालिबानी" ठरवुन त्यांची रवानगी अमेरिकेच्या "ग्वाटेनामोच्या तुरुंगात" केली जावी ...

११. आजकाल पळुन जाऊन लग्न करणे ही बर्‍याच जणांची सामाजीक व मानसीक जबाबदारी बनल्याचे व ह्यातुन त्यांना बराच सामाजीक, मानसीक व काही अंशी शारिरीक त्रास सहन करावा लागतो असे आमच्या लक्षात आले आहे.म्हणुन आम्ही अशा जोडप्यांना किमान "पद्मश्री" हा सन्मा दिला जावा व त्यांना त्रास देणार्‍यांना "रासुका" लावावा ही सुधारणा सुचवत आहोत ...
(अक्षयकुमारला जर पद्मश्री मिळत असेल आणि वरुण गांधीला जर रासुका लागत असेल तर उपरोक्त गोष्टी अशक्य नाहीत असे आमचे मत आहे.)

१२. पॅरीस, ऍमस्टरडॅम, लंटन, काश्मिर, कुलु मनाली, उटी यासारखी स्थाने "केवळ तरुणांसाठी" म्हणुन आरक्षित केली जावीत. इथे तरुणांच्या "सवलतीत" अथवा जमल्यास "सरकारी खर्चाने फुकटात" सहली आयोजीत कराव्यात ...
ह्यासाठीचा आवश्यक असणारा पैसा हा अनेक मंत्रीमहोदयांच्या सर्दी-पडश्याचा इलाज हा "न्युयॉर्कला सर्जनकडुन" न करता "मौजे पिंपळवाडीच्या वैंदुकडुन" केला तर सहज उभा रहाण्यासारखा आहे ...

१३. बॉली/हॉलीवुडमध्ये वयाच्या २७ व्या वर्षानंतर पुरुषांना व २५ नंतर स्त्रियांना सक्तीची निवृत्ती द्यावी. नव्या "दमाच्या" पिढीला संधी ही मिळायलाच हवी.सिनेमागॄहात जमल्यास सर्व सीट्स ह्या "कॉर्नर सीट्स"मध्ये बदलुन घ्याव्यात, हवी असल्यास त्यात आस्थापनात असतात तशी क्युबिकल्स उभारण्यास प्रत्यवाय नसावा ...
तिकीटांची "विक्री" न करता त्यांना "स्वागतमुल्य" ठेवावे, ज्याची जेवढी इच्छा आहे तेवढे दान तो टाकेल ...
(तसेही पैसे देऊन पहाण्याचे लायकीचे चित्रपट निघतात कुठे ? शिवाय पैसे देऊन थेट्रात खास शिन्माच पहातो कोण ? )
*********************

तुर्तास इतकेच, बाकी आठवेल तसे.
गध्धेपंचविशीतल्या तरुणाईचा जय हो ....!!!

Tuesday, March 10, 2009

उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला.

ही आमची पाककॄती आम्हाला महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी अनेकविध पदार्थांची नावे सांगुन आमचा जीव टांगणीवर लावणार्‍यांना , आंतरजालावर त्याचे फोटो टांगुन आमची गोची करणार्‍यांना , फराळ करतान आमची आठवण काढणार्‍यांना आणि न काढणारे अशा सर्वांना अर्पण ...!!!
तर मेहरबान, कदरदान, खानदान आणि ए.आर. रेहमान ( ऑस्कर मिळलयं म्हटलं त्याला, आहात कुठे ? ) सादर आहे एक धमाल रेसिपी " उपवासाची बॅचलर साबुदाणा थालिपिठे" ...
आता हे "...उर्फ डॉन्याचा सल्ला" असे का लिहायचे ?ह्याचे कारण असे आहे की असे लिहल्याशिवाय पाककॄतीला वजन येत नाही असा ह्या क्षेत्रातली डॉन असलेल्या मेघनाचा सल्ला आहे. असो, आपल्याला काय लेखाला वजन आल्याशी मतलब ;)
***********************
तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे काय ह्याचा पुर्ण विचारान्ती आणि होशोहवासमध्ये ( हो, कारण उपवास सोमवारी होता आणि त्याआधीचा दिवस म्हणजे रविवार ;) ) निर्णय घ्यावा ( हो ना, अन्यथा उपवास नसेल तर उपवासाचे पदार्थ पदराला खार लाऊन करतो कोण ? ज्या गावाला जायचेच नाही त्याचा डिटेल पत्ता काढण्यात काय हाशील ? ) , एकदा का बार उडवायचा ठरले की मग अजिबात मागे हटणे नाही ...
तर आपला "उपवास" आहे हे नक्की झाले मग आता उपवाला चालणारे, इथे मिळणारे, लवकर तयार होणारे आणि स्वस्त असणारे पदार्थ हुडकायला सुरवात करावी व सर्व चाचपणी करुन झाल्यावर आपल्याला "साबुदाणा खिचडी" करायची आहे हे ठरवुन घ्यावे. काळजी नको, मी जरी वर टायटल "थालपीठ" असे टाकले असताना इथे मी "खिचडी" लिहणे म्हणजे महाशिवरात्रीच्या प्रसादाचा पर्यायाने भांगेचा प्रताप नव्हे, ते पुढे कळेलच ..!!!

* साहित्य :
साधारणता १ किलो साबुदाणा
१ /४ किलो शेंगादाणे
1/२ किलो बटाटे
15 -२० हिरव्या मिरच्या
बचकभर जीरे ,
३-४ चमचे जीरेपुड ,
तुप / तेल ( प्रमाण ? छ्या, दारु पिताना काय तुम्ही प्रमाण पाहुन पिता काय ? ) ,
मीठ, तिखट हाताला येईल तसे ( जे मीठ आणि तिखट यांचे व्यवस्थीत प्रमाण सांगु शकतात ते काश्मिर समस्येवर अचुक उपाय सुचवु शकतात ),
२ लिंबं,
एक मोबाईल, एक लॅपटॉप ( इंटरनेट कनेक्शन असलेला ) , एक टीव्ही.
१ ट्रॉपीकाना ऑरेंज ज्युसची बाटली ( कशाला ? नंतर सांगेन ),
आपल्यासारखेच टुकार ५-६ मित्र,
१ ऐनवेळी टांग मारणारा पगारी स्वैपाकी उर्फ कुक
महत्वाचे : रिकामा ३-४ तासाचा वेळ

सर्वात प्रथम उठुन हापीसात गेल्यावर गेल्यागेल्या "आज माझा उपवास आहे" हे जाहीर करावे व स्वतःचे कौतुक करुन घ्यायला सुरवात करावी. दररोज ज्यांच्याबरोबर ब्रेकफास्टला जाताय ( नावे ? आम्ही नाय सांगणार बॉ, लाज वाटते आम्हाला ) त्यांनी आज ठामपणे " नाही" म्हणुन सांगावे, फारच आग्रह झाला व समोरची व्यक्ती अगदीच सोडेनाशी झाली तर त्यांच्याबरोबर जाऊन आपण फक्त "मोसंबी ज्युस" प्यावा व हाच सर्वात उच्च आणि श्रेष्ठ उपहार आहे ह्यावर त्यांचे बौद्धिक घेऊन त्यांना काव आणावा, ते वैतागुन तुमचे ज्युसचे बील स्वतःच भरतील. आख्खा दिवस शक्यतो ज्युस ,फळे, सहकार्‍यांनी "काहितरी खाऊन हे" म्हणुन केलेला आग्रह ह्यावर काढावा.आज उपवास आहे ह्यासबबीखाली हापीसातुन लवकर घरी निघावे व पुढच्या तयारीला लागावे ...

अर्थातच आपल्या फ्लॅटवर साबुदाणा नावाचा प्रकार नसतोच, मग आधी त्याला हिंदी/इंग्रेजीत काय म्हणतात हे आठवायचा प्रयत्न करावा, शेवटी "सागु / सॅगो " हे इंग्रजी नाव आठवल्यावर शंभु महादेवाचे नाव घेऊन खरेदील निघावे. आपले मराठी व इंग्रेजी मिश्रीत हिंदी व त्यांचे शुद्ध कन्नडा अशी २-३ ठिकाणी खडाजंगी झाल्यावर शेवटी एक किलोभर "सब्बक्की उर्फ कन्नड साबुदाणा" घेऊन यशस्वीरित्या घरी यावे.मग लॅपटॉप उघडुन आंतरजालावर कुठे काही रेसिपी दिली आहे का ह्याची चाचपणी सुरु करावी, सर्वात शेवटी मिपाकर असलेल्या चकली यांचा ब्लॉग उघडुन "उपवासाचे पदार्थ" हे पान खोलावे, त्यात साबुदाणा खिचडी हे पाहुन घावे व आपल्याला जमेल इतका कॉन्फीडंस आला की मग पुढ्च्या तयारीत लागावे ...

सर्वात प्रथम साबुदाणा स्वच्छ धुवुन घ्यावा, मग तो "भिजण्यासाठी" एक पातेल्यात मुबलक पाणी घेऊन त्यात टाकुन द्यावा. ब्लॉगवर लिहलेली "उरलेले पाणी काढुन टाकावे" ही सुचना सोईस्कर विसरुन जावी. आपण लै भारी काम केले ह्या आनंदात फटाफट मित्रांना "खिचडी जमते आहे रे " असा समस टाकुन रिकामे व्हावे, त्यांचा फोन येण्याची शक्यता गॄहीत धरुन पटकन कमीत कमी तासभर गप्पा मारता येतील अशा व्यक्तीला फोन लावावा, आपण मस्त गप्पा मारत बसावे व मित्रांच्या "वेटिंगवर असलेल्या कॉल्स" कडे सोईस्कर दुर्लक्ष करावे. शेवटी बसुन, झोपुन, लोळुन, उभे राहुन अथवा कसेही फोन हातात पकडायचा व बोलायचा कंटाळा आला की फोन बंद करावा व मित्रांना परत फोन करुन "काय झाले?" असा प्रश्न करुन काही "प्रेमळ शब्दांची व स्तुतीपर वाक्यांची देवाणघेवाण" करावी, सर्वात शेवटी त्यांना येताना बरोबर आणायच्या पदार्थांची अशी लिश्ट द्यावी की त्यांना त्यापेक्षा पुण्याला जाऊन खिचडी खाऊन येणे परवडेल असे वाटले पाहिजे. असो.
त्यात एका मित्राच्या बोलण्यात "भिजवताना उरलेले पाणी काढुन टाकलेस का ?" असा उल्लेख ऐकल्याबरोबर धावत किचनमध्ये जावे पातेल्यात तयार झालेला " साबुदाण्याचा लगदा" पाहुन डोक्याला हात लावावा व हातासरशी लवकर का बोलला नाही म्हणुन मित्राला ४ शिव्या घालुन घ्याव्यात ...

छे , आता सर्वच गंडले, रात्रीचे जेवण बोंबलणार ह्या कटकटीने टेन्शन आल्यास लॅपटॉप उघडुन मिपामिपा खेळत बसावे अथवा क्रिकेट गेम खेळत बसावी. आत सर्व काही शंभु महादेवाच्या हातात आहे असे मानुन आपण आपले काम ( म्हणजे गेम खेळणे ) मन लाऊन करावे ...

आपण केलेल्या "समस"चा इफेक्ट म्हणुन एखादा मित्र लवकर घरी आल्यस त्याला आल्याआल्या किचन मध्ये न्हेऊन तो "लगदा" दाखवावा व त्याला झीट आणावी. मग तो ज्वर ओसरला की आता ह्याचे काय करता येईल ह्यावर प्रबोधक चर्चा करावी, मित्राची " तो लगदा गॅसवर तापवुन पाहु का ?" ही कल्पना ३-४ शिव्यांच्या आधारे फेटाळुन लावावी ...
मग दोघांनी मिळुन "चकली ब्लॉगवर" अजुन काय शक्य आहे ते पहावे ...
आता खिचडी जमणे अशक्य अशी २-३ ठिकाणी फोन करुन खात्री झाल्यावर आपण आता मस्त "साबुदाणा थालपिठे" करु असे ठरवुन घ्यावे व त्याच्या तयारीत लागावे ...

सोईस्करपणे आपल्या सध्याच्य्या अल्पवस्त्रस्थितीचे कारण पुढे करुन मित्राला बटाटे आणायला हाकलावे व तोवर मी शेंगादाणे भाजतो अशी त्याला खात्री द्यावी. म्हटल्याप्रमाणे कढाई गॅसवर ठेउन, गॅस फुल्ल करुन त्यात शेंगादाणे ओतावेत व ते भाजताना सतत हलवावे लागतात ही महत्वाची गोष्ट विसरुन आपण शांतपणे हॉलमध्ये जाऊन टीव्ही लावावा व त्याचवेळी कुणाला तरी फोन करुन आत्मानंदी तल्लीन व्हावे. थोड्या वेळाने मग काहीतरी तडतड आवाज व जळाल्याचा वास आला की धावत किचनमध्ये जाऊन गॅस बंद करावा व मित्र यायच्या आत जळालेले शेंगदाणे डस्टबिनमध्ये टाकुन द्यावेत, आता मात्र आणिबाणीची परिस्थीती आली असे समजुन थोड्याश्या गांभिर्याने "शेंगदाणे भाजणे" हे कार्य पुर्णत्वाला न्ह्यावे. मित्र आल्यावर त्याच्याकडुन बटाटे घेऊन ते उकडायला कुकरमध्ये लाऊन द्यावेत.

थोड्या वेळाने आणखी १ बॉडीबिल्डर मित्र आल्यावर त्याला आधी हरबर्‍याच्या झाडावर चढवुन त्याला "शेंगादाणे कुटायच्या" कार्याला बसवावे व तोवर आपण आपला क्रिकेटचा गेम पुर्ण करत रहावा....
अजुन १-२ मित्र आल्यावर व त्यांनी आपला व्यवस्थीत उद्धार करुन ते आता सफिशियंट वैतागले आहेत ह्याची खात्री झाल्यावर सर्व तयार असलेले रॉ मटेरियल घेऊन "साबुदाण्याची थालिपीठे" करायला सुरवात करावी ...

एक मोठ्ठी परात घेऊन त्यात उकडलेल्या बटाट्यांचा लगदा करायला घ्यावा, मनोसोक्त बटाटे स्मॅश करुन झाल्यावर त्यात मगाशी तयार झालेला साबुदाण्याचा लगदा + शेंगादाण्याचा कुट + लिंबाचा रस + जीरे आणि जीरेपुड + मीठ + तिखट हे हाताला येईल त्या प्रमाणात मिसळावे. चव जमली आहे की नाही हे तपासण्याशीठी चमचा-चमचा ह्या हिशोबाने टेस्ट करत रहावे व जेव्हा २ वाट्या मिश्रण असेच फस्त होईल तेव्हा ते योग्य जमले आहे असे जाहीर करावे ...
शेवटी हा ( म्हणजे मी ) आता थालिपीठी तयार करणार अशी मित्रांची खात्री झाली व ते निवांत बसले की " अरेच्च्या, मिरच्यांचा ठेचा टाकायचा राहिलाच चुकुन " अशी त्यांना आठवण करुन द्यावी. मग ते चिडुन मिरच्या कुटत असताना आपण शांतपणे हात धुवुन, फ्रीजमधली ज्युसची बाटली काढुन आरामात मिपामिपा खेळत बसावे. त्यांनी ज्युस मागीतल्यास तो उष्टा आहे व उपासाला असे चालणार नाही असे सांगुन एक मोठ्ठा घोट घेऊन तो ज्युस "क्लासऽऽऽऽ" आहे हे जाहीर करावे.शेवटी मिरच्यांचा लगदा मनोसोक्त आधीच्या तयार मिश्रणात मिसळत बसावा ...

मग कंटाळा आला की ते सर्व घेऊन किचनमध्ये जावे. गॅस चालु करुन एक नॉनस्टीक तवा गरम करायला ठेऊन द्यावा व पुन्हा बाहेर जाऊन टीपी सुरु करावा, तवा तापला आहे ह्याची खात्री मित्रच करतील पण मित्रसुद्धा तापले आहेत ह्याची खात्री अपणच करावी , मग आपण एकदम टेचात उठुन किचनमध्ये जावे व कुणाला तरी "एक प्लास्टीकच्या कागदाचा तुकडा आण रे" असा हुकुम सोडावा. तो बिचारा हुडकत बसतो, नियमाप्रमाणे त्याला लवकर सापडत नाहीच. मग आपण इतर मित्रांबरोबर त्याचा व्यवस्थीत उद्धार करुन घ्यावा...
शेवटी सर्व सारंजाम जमला की तयार मिश्रणाचे "मध्यम आकाराचे गोळे" तयार करुन घ्यावेत, ह्या कामात मित्र तुम्हाला खात्रीने मदत करतील. मग त्या कागदाला थोडेसे तुप लाऊन त्यावर हा गोळा ठेवावा व व्यवस्थीत थापुन साधारणता गोल व समान जाडीचा असा पराठासदॄष्य आकार बनवावा. तुप सोडण्यासाठी त्याला मध्ये बोटाने छोटेसे भोक पाडुन ठेवावे ...
मग तो परठा न मोडता तव्यावर तुप सोडुन त्यावर टाकण्याच्या अवघड कामाला सुरवात करावी. शंभु महादेवाला तुमची दया आल्याने हे काम व्यवस्थीत पार पडते.आता हे पलटुन भाजण्यचे काम एका नवशिक्या मित्राकडे सोपवुन द्यावे व आपण संजीव कपुरच्या आवेशात त्याला सुचना करत रहाव्यात. त्याच्या हातुन थालिपीठ तुटते , कधी कच्चे रहाते, कधी कागदावरुन तव्यावर जायच्या ऐवजी निम्मे ओट्यावर पडते पण आपण सन्यस्त दृष्टीने हे सर्व एंजॉय करावे, जो काही समाचार घ्यायचा आहे तो बाकीचे मित्र घेतील ...

आपला थोडा थालपिठे लाटायच्या कार्यात व मित्राचा भाजण्यात हात बसल्यावर मात्र पुढचे सर्व व्यवस्थीत पार पडते. पण त्याआधी वाया गेलेल्या थालपिठांचे दु:ख मानु नये, थॉमस अल्वा ऍडीसननेसुद्धा विजेचा बल्ब बनवताना ९९९ वेळा चुक केली होती हे लक्षात असु द्यावे ...

सर्व थालिपीठे तयार झाल्यावर एका ताटलीत हे थालिपीठ + दही + बटाटा वेफर्स + तुप + द्राक्षे घेऊन आरामात तंगड्या पसरुन टीव्ही पहात मित्रांबरोबर थट्टा मस्करी करत व आज काय काय "पाहण्यालायक" दिसले ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा करत हादडावे. अशा कठोर व्रताने महाशिवरात्र भरभरुन पावते व शंभुमहादेव तुमच्यावर प्रसन्न होतो असे डॉनबाबा बेंगलोरी ह्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहले आहे ....

महत्वाची गोष्ट : फोटो ; आंतरजालावर फोटोविना पाककॄती म्हणजे बॅटविना तेंडुलकर, अंगभर कपडे घालुन मल्लिका शेरावत किंवा निरपेक्ष लिहणारे सुमर केतकरच ...
थोडक्यात अशक्य व अमान्य ...पण वरच्या पाककृतीवरुन आपल्याला जर याचा "फोटो काढता येईल" अशी खात्री असेल तर आपल्या पायाचा फोटो आम्हाला पाठवावा, आम्ही तो फोटो व आमच्या पाककॄतीचा फोटो त्वरित आंतरजालावर टाकु... ;)

Tuesday, March 3, 2009

स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग-२

नमस्कार मंडळी,
ह्या आधीचा भाग आपल्याला स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... इथ पहायला मिळेल ...
नुसता कोरडेपणाने दुसरा भाग सुरु करणे हे अभद्रपणाचे लक्षण, म्हणुन काही मसाला टाकत आहे ..सर्वांनी आत्तापर्यंत राजकीय प्रतिक्रीया पाहिल्या / वाचल्या, पण कोणी "वॄत्तपत्रांकडे" लक्ष दिले का ? भले त्यांनी दमदार अग्रलेख छापले असतील पण संपादक मनातुन काय म्हणतात ते पहा ...
=============================

* सुमार केतकर , लोकसत्ता :
कल्पनेच्या तीरावरील जग सेल्युलॉईडच्या पट्टीवर जिवंत करण्यात आयुष्य घालवलेल्या कलावंतांच्या आयुष्याला सोनेरी किनार प्राप्त करून देणार्‍या या ऑस्करच्या सोहळ्यात एकदम ८ पुरस्कार मिळवुन निर्भेळ यश मिळवणर्‍या स्लमडॉगचे अभिनंदन. गेल्या निवडणुकीत माननीय सोनिया गांधीच्या नेतॄत्वाखाली काँग्रेसने असेच यश मिळवले होते पण ते भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांना पहावले नाही, त्यांनी थयथयाट करुन सोनियाजींना पंत्रप्रधान होण्यापासुन रोखले.
"...ऍण्ड ऑस्कर गोज टू स्लमडॉग मिलेनियर!' या घोषणेनंतर लॉस एंजलिसच्या कोडॅक थिएटरबरोबरच नरिमन पॉईंटवरच्या उत्तुंग इमल्यापांसून धारावीतल्या झोपडपट्टीपर्यंत आणि बनारसच्या दशाश्वमेध घाटापासून झुमरीतलय्यातल्या हवेलीपर्यंत सर्वत्र जल्लोष झाला. भारताच्या धर्मनिरपेक्ष एकात्मतेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मात्र मोदी आणि विहिंप यांनी गुजरात बरोबरच आता कर्नाटक राज्यही हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनवुन तिथे अमानुष हिंसाचाराचे तांडव चालवले आहे व धार्मीक सौर्हाद्याच्या गळ्याला नख लावले आहे, महाराष्ट्रात तर ठाकर्‍यांचा कुणानाही न जुमानता नंगा नाच सुरुच आहे. अशा परिस्थीतीत आपल्याला एका समर्थ नेतॄत्वाची गरज आहे व त्यासाठी आमच्या मते सोनिया गांधींपेक्षा योग्य उमेदवार देशात शोधुन सापडणार नाही.
शेवटी पुरस्कार घेताना रेहमान म्हणतो "'आयुष्यभर मला प्रेम व तिरस्कार यांच्यातून निवड करावी लागली. मी कायम प्रेमाचाच पुरस्कार केला आणि म्हणूनच मी आज येथे उभा आहे! ". धर्माधिष्ठीत राजकारण करणार्‍यांना ही एक सणसणीत चपराक आहे. “धर्म ही अफूची गोळी आहे" असे कार्ल मार्क्सने म्हटले आहे. पण आत ह्याच लालभाईंनी अणुकराराच्या मुद्द्यावर ऐनवेळी पाठिंबा काढुन घेऊन युपीएचा कात्रजचा घाट करण्याचा प्रयत्न केला व त्यांना भाजपा व जात्यंध राजकारण करणार्‍या मायावतींची फुस होती. पण सोनिया गांधींनी एकाच तडाख्यात सर्वांना आस्मान दाखवले.
आता काही मंडळी भारताच्या इमेजचे हनन केले म्हणुन स्लमडॉगच्या नावाने कंठषोश करत आहेत, चांगल्या कामात नाक कापुन अपशकुन करण्याचा हा प्रकार, ह्याला कट असेच म्हणणे योग्य ठरेल. असाच कट भाजपा व त्यांच्या पिल्ल्यांनी मुम्बई हल्ला घडला त्या वेळी करुन सरकारचा राजीनामा मागितला होता, डाव्यांनी अणुकराराच्या मुद्द्यावर सरकारला कट करुन अडचणीत आणले होते. सोनिया गांधींना व पर्यायाने काँग्रेसला अडचणीत आणुन भारतीय लोकशाहीच्या मुळावर उठणार्‍या असल्या हलकट प्रवॄत्तीचा आम्ही निषेध करतो.
असो.
स्लमडॉग चे अभिनंदन ...!!!

* डॉ. वरुण टिकेकर :
कसल्याही लोकशाहीवादी निवडणुकीतुन झालेल्या निवड प्रक्रीयेत मिळणारे यश हे निर्भेळच असते, म्हणुनच स्लमडॉगचे अभिनंदन. आता भारताच्या सांप्रत काळात एकंदरच समाजवादी व उदारमतवादी विचारप्रणाली नामशेष होत असताना स्लमडॉगने असे यश मिळवणे ही एक स्पॄहणीय घटना आहे. लोकहितवादी आगरकर, टिळक व न्या. रानडे ह्यांनी समाजात रुजवलेला उदारमतवाद व सामाजीक सौर्हाद्य ह्याची जर पुन्हा रुजवणी झाली तर भविष्यात यशाच्या अनेक पायर्‍या आपण चढु याबद्दल मनात किन्तु नाही ...

* स्वानंद आगाशे , पुणे सकाळ :
स्लमडॉगने पुरस्कार मिळवुन अख्ख्या जगात आपले नाव करणे ही महत्वपुर्ण घटना आहे. तसेही जगात आजच्या घडीला स्लमडॉग सोडला तर पुणे सोडुन पहाण्यासारखे आहेच काय ? पुण्यातल्या राजकारण्यांनी बीआरटी, रस्ते, पाणी ह्यासारखे मुलभुत प्रश्न आधी सोडवणे गरजेचे आहे. पुणे महोत्सव हा कुणाच्या नेतॄत्वात व्हावा हा मुद्दा गौण आहे. लवकरच आम्ही सप्तरंगमध्ये ह्याबद्दल लिहणार आहोत ...
स्लमडॉगच्या निमीताने युवा पिढीला बोलते करण्यासाठी पुन्हा "युवा सकाळ" सुरु होत आहेच...

*रोखठोक राऊत, सामना :
मराठी माणसाचा मानबिंदु असणार्‍या मुंबईवर बेतलेल्या स्लमडॉगला ऑस्कर मिळण्याची घटना ही अभुतपुर्वच म्हणावी लागेल. काही दळभद्री, पोटार्थी, भिकारड्या, नेभळट व भाकरी शैली असणार्या पत्रकारजंतुंनी आधी ह्याविरुद्ध बरीच आरडाओरड केली होती. तो चित्रपट परकीय आहे म्हणुन का त्यावर असा हल्ला करावा ? ही लोकशाही आहे का मोगलाई ? व्यक्तीस्वातंत्र्याला नख लावणा-या या औरंगजेबी प्रवृत्तींना जागीच ठेचले पाहिजे. असल्या सुपारीबाज व मराठी माणसाच्या मुळावर उठणार्‍या प्रवॄत्तीला आत्ताच जागा दाखवली पाहिजे. काही निवडक धनदांडग्या व आपमतलबी लोकांच्या दाड्या कुरवाळण्याचे प्रकार थांबणार कधी ???

* शरदकुमार राऊत, राज्यसभा खासदार, स्तंभलेखक मटा :
एकंदरीतच सर्वंकष विचार केला तर ही घटना स्पृहणीय आहे असेच म्हणावे लागेल. स्लमडॉगचा सन्मान हा फक्त चित्रपटाचा नसुन समस्त भारतीय जनतेचा व त्यातल्या त्यात झोपडपट्टीत हलाखीचे जीवन जगणार्‍या लढावय्यांना दिलेली आदरांजलीच म्हणावी लागेल. मटानायक उद्धवजी यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना नेहमीच अशा वर्गाच्या मागे उभे राहिली आहे, आत्तापर्यंतचा इतिहास जर आपण सुक्ष्मदॄष्टीने पाहिला तर आपल्याला ठायीठायी ह्या गोष्टी जाणवतील ....
( मग ते बराच वेळ उद्धवजी, अफझल गुरु, नरेंद्र मोदी, गोध्रा, ओबामा, मायावती , भाजपा, समाजवाद , सांस्कॄतीक एकता, शिवसेनेचे कार्य , महाराष्ट्राची प्रगती, मुंबईचे स्थान, मुंबई हल्ला, निष्क्रीय राज्यकर्ते ह्या विषयांवर बोलत राहिले ...
शेवटी मुळ मुद्दा काय होता हे विसरुन गेल्याने त्यांनी एकदम गंभीर मुद्रा करुन थोडेसे खाकरुन आम्हाला "आता निघा" असा सिग्नल दिला. )

* मिखील वागळे , आयबीएन लोकमत :
अरे ऑस्कर देत नाय म्हणजे काय ? स्वतःला समजता कोण ? भारतीय समाज व चित्रपटांना कमी लेखणे थांबणार कधी , किती दिवस ह्या गोष्टींवर टिका करणार ? माझ्यावर तर अनेकदा टिका होते, आरडाओरड होते परंतु मी कधी डगमगलो नाही. परंतु हे कोठेतरी रोखण्याची गरज आहे असे तुम्हांला वाटत नाही का? आपल्याकडे येथे अनेक मान्यवर आहेत, अपण त्यांचे विचार जाणुन घेण्यासाठी त्यांच्याकडे वळणारच आहोत. पण त्याआधी मी घेतो एक ब्रेक, आपण पहात आहात "आय बी एन लोकमत" .....
( असे म्हणुन त्यांनी २ ग्लास पाणी पिले, व दाढी खाजवत विचार करु लागले )
पुन्हा उसळुन ते म्हणाले " अरे असे पडद्याआडुन वार करणे ****चे लक्षण आहे, हिंमत असेल तर स्वतः चित्रपट बनवुन ऑस्कर मिळवुन दाखवावा. मी इतकी वर्षे पत्रकारीतेत आहे, स्पष्ट बोलायला मी कुणाच्याही **ला घाबरत नाही... हा शुद्ध *** आरोप झाला.."
( शेवटी आम्ही त्यांना हा "आजचा सवाल" कार्यक्रम नाही असे भीतभीत सुचवले, त्यांनी मुद्रा एकदम क्रुद्ध केल्याने आम्ही तिथुन काढता पाय घेतला )

* ब्रिटीश नंदी , लोकप्रभा :
ऑस्कर मिळाले ही चांगलीच गोष्ट आहे ह्यात वाद नाही पण महत्वपुर्ण मुद्दा असा की आपण ह्यातुन काही शिकलो आहोत का ?मी माझी "ब्रिटीश नंदी" ही मालिका ह्यात हेतुन सुरु केली होती, जनजागरण ...!!!
पण कुठलेही मत मांडताना मग ते वॄत्तपत्रात असो वा चित्रपटाद्वारे तेव्हा संयम आणि मर्यादाशीलपणा तसेच एकंदर सामाजीक क्षोभाचे भान राखणे अत्यावश्यक ठरते. माझ्या मते इथे स्लमडॉग थोडासा मार खातो. तरीही हरकत नाही ...
अभद्र, असभ्य भाषेत संवाद वा चित्रण, तसेच श्लीलतेच्या मर्यादा ओलांडणारी आयटम सॉग्स वा खळबळजनक गॉसीप्स दाखवुन मलिदा खाणार्‍या व स्वतःची तुंबडी भरणार्‍यांचा आम्ही निषेध करीत आहोत. हे प्रकार जर थांबले तर ऑस्कर बरोबर जनाश्रयही मिळेल असे आम्ही अंतरात्म्याला साक्ष ठेऊन प्रतिपादन करु इछितो ...
========================================
जय हो ...!!!

विषेश आभार : नामवंत वॄत्तपत्रांचे अग्रलेख, बातमीदार ब्लॉग व आजानुकर्णाचा एक जुना लेख ...!

Thursday, February 26, 2009

स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ...

स्लमडॉग मिलेनियर ह्या चित्रपटाला ऑस्कर मिळाले हे सर्वांना माहित आहेच, त्यावर गेले 4 दिवस टीव्हीवर रतीब चालु आहे ...
पण काही "मान्यवरांच्या " खर्‍याखुर्‍या मनातल्या प्रतिक्रीया जाणुन घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली व ह्याबद्दल चर्चा केली. आमचे कॉन्टॅक्ट्स व कनेक्शन्स लै भारी असल्याने आम्हाला हे शक्य झाले ...पहा बर कोण काय काय म्हणते ते ...


डिस्क्लेमर : हे काल्पनिक व विरंगुळा आहे हे सांगायलाच नको, उगाच त्यावरुन डोक्याला त्रास नको.

==================================

* आर्य चाणक्य :
मुळात स्लमडॉगला ऑस्कर मिळाले नसते तर त्याच्या यशस्वीतेला धोका होता, अनेक कारस्थाने रचुन का होईना ऑस्कर मिळणे महत्वाचे होते. ऑस्कर न मिळणे म्हणजे भारतीय पार्श्वभुमीवर बेतलेल्या चित्रपटाच्या व पर्यायाने त्यामधल्या कलाकारांच्या कारकिर्दीला धोका, म्हणजेच संपुर्ण चित्रसॄष्टीला धोका, एकंदर करमणुकीला धोका, सामाजीक स्वास्थ्याला धोका , संपुर्ण प्राणीमात्रांना धोका ...असे चालु राहिले तर काळाच्या ओघात माणुस ही जमात नष्ट होण्याचा धोका ...!

* लोकमान्य टिळक :
स्लमडॉगने ऑस्कर मिळवणे ह त्यांचा जन्मसिद्ध हक्क होता आणि त्याने तो बजावला ...मी मुळात स्लमडॉग हा सिनेमाच पाहिला नसताना त्याच्यावर प्रतिक्रीयांची टरफले मी का टाकु ?

* न्यायमुर्ती रानडे :
ऑस्कर मिळवणे ही स्लमडॉगची आर्थीक, सामाजीक, मानसिक व सैद्धांतिक गरज होती. आपल्याला फक्त त्यांनी सरळ मार्गाने ऑस्कर मिळवले आहे का हेच पहायचे आहे. अन्यथा त्याची योग्य ती न्यायालयीन चौकशी देशातल्या संविधानाच्या सन्मानासाठी होणे आवश्यक ठरते.

* महात्मा गांधी :
स्लमडॉगने ऑस्कर मिळवताना कसलाही कायदेभंग केला नाही अथवा असहकाराचा नारा दिला नाही. भुतलावर निर्माण होणार्‍या प्रत्येक चित्रपटाला ऑस्कर मिळणे हाच प्राणीमात्रांच्या जीवनातील एका अद्भुत घटनेचा एक सुंदर अविष्कार असेल.मात्र शांततामय मार्गाने व सविनयाने काढलेला कुठलाही चित्रपट हा तुम्हाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याचा आत्मानंद देईल.

* शाहु महाराज :
इथे जेव्हा प्रत्येक्षात मुंबईमध्ये झोपडपट्टीत कुत्र्यासारखे जीणे जगणार्‍या माणसाची तुम्हाला किंमत नाही तर आम्ही त्या दिडदमडीच्या स्लमडॉग सिनेमाने ऑस्कर मिळाले ह्याची कशाला पत्रास ठेवायची ?

* जवाहरलाल नेहरु :
स्वतंत्र भारतात निर्माण होनार्‍या कुठल्याही सिनेमाला ऑस्कर मिळवण्याचे पुर्ण स्वातंत्र्य आम्ही घटनेद्वारे त्यांना बहाल केले आहे. शिवाय त्यात लहान मुलांनी उत्तम काम केले आहे असे ऐकुन आहे.लहान मुले म्हणजे देवाघरची फुले.

* अटलबिहारी वाजपेयी :
स्लमडॉगने ऑस्कर मिळवणे हेच "इंडिया शायनिंग" आहे, सध्या मी ह्याच परिस्थीतीवर आणि पर्यायाने देशाच्या उदात्ततेवर कविता करत आहे, लवकरच काव्यसंग्रह प्रसिद्ध होईल.

* लालकृष्ण आडवाणी :
हुं, त्यात काय विषेश ?मी एवढी रथयात्रा केली, १०० ठिकाणी झोपडपट्टीतुन हिंडलो, अनेक ठिकाणी रथ अडवला गेला तेव्हा कुणी आमचे कौतुक केला का ? उलट मी "जीनांचे" नाव घेतल्यावर सर्व बाजुंनी टिका झाली.
असो. हे माझे वैयक्तीक मत आहे.
पक्षाचे जे काही धोरण आहे त्याप्रमाणे जावडेकर प्रतिक्रीया देतील.

* अर्जुनसिंग :
मिळाले का ? बरे झाले ..!
नाही तर मी म्हणतच होतो की "ऑस्करवाल्यांनी बाहेरच्या देशात चित्रीत झालेल्या / बेतलेल्या चित्रपटांना त्यांच्या मुळ कॅटॅगिरीत आरक्षन ठेवावे" म्हणुन...

* शरद पवार :
पक्षाच्या व सरकारच्या धोरणात बसते का नाही ते पाहुन व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन योग्य ती प्रतिक्रीया द्यावी लागेल. तसाही चित्रपट उद्योग हा भारतातील सहकार व व्यापार क्षेत्रातील एक महत्वाचा घटक आहे, तळागाळ्यातल्या सर्वसामान्य गोरगरिब जनतेच्या मनोरंजनाचा तो एक मार्ग आहे.
सध्यातरी सर्व पर्याय खुले आहेत एवढेच सांगतो.

* बाळासाहेब ठाकरे :
जय महाराष्ट्र , मुंबईतल्या मराठी माणसांच्या प्रयतनातुन उभारल्या गेलेल्या स्लमडॉग ह्या चित्रपटाला ऑस्कर हे मिळायलाच हवे. कसे मिळत नाही तेच बघतो. माझा कडवट शिवसैनिक आदेशाची वाट पहात आहे.
बर्‍या बोलाने दिलेत ते उत्तम. अन्यथा तुमच्यासारख्या पोटार्थी, भिकारड्या, नेभळट, पुचाट व गांडुळासारख्या औलादीला कसे वटणीवर आणायचे ते आम्हाला चांगलेच माहित आहे.
कानात सांगुन कळत नसेल तर कानाखाली वाजवुन समजवावे लागेल ...

* मनोहर जोशी :
स्लमडॉगला ऑस्कर मिळाले ही घटना अथवा तो चित्रपट मी प्रत्येक्ष पाहिला नाही. परंतु माननीय बाळासाहेबांच्या आदेश व परवानगीशिवाय हा चित्रपट निघणे व त्याला ऑस्कर मिळणे ह्या घटना शक्य नाही हे मी निश्चितपणे सांगु इच्छितो.

* सोनिया गांधी :
हा महात्मा गांधींचा, श्रीमती इंदिरा गांधींचा, राजीवजींचा व त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन आमच्यामागे व पर्यायाने स्लमडॉगमागे उभे राहणार्‍या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे.

* सुशीलकुमार शिंदे :
हॅ हॅ हॅ, स्लमडॉगला ऑस्कर मिळाले काय ? हॅ हॅ हॅ.
सर्वात प्रथम स्लमडॉगसारख्या तळागाळातल्या व मागास वर्गाचे चित्रण दाखवणार्‍या चित्रपटाला पाठिंबा देऊन त्यांना संधी देण्याबद्दल सोनिया गांधींना धन्यवाद.हा स्लमडॉगचा सन्मानच आहे.

* राज ठाकरे :
स्लमडॉग सारख्या हिंदी-इंग्रजी भाषा असलेल्या मिश्र चित्रपटाला ऑस्कर मिळणे म्हणजे इतर भाषांना कानफाटीत देणे नव्हे.महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट "मराठीतच" दाखवला गेला पाहिजे व त्याला धनदांडग्या परप्रांतियांच्या मल्टीप्लेक्समध्ये "प्राईम टाईम" मध्ये दाखवले गेले पाहिजे, कसे दाखवत नाही ते मी बघतोच ...!

* अमर सिंग :
ऑस्कर पुरस्कार हे काय फक्त अमेरिकेत चित्रपट काढणार्‍यांचे बापजादांचे आहेत काय ?
स्लमडॉगलासुद्धा तिथे सन्मानाने राहता आले पाहिजे, घटनेत तसे उल्लेख आहे ...
वेळ पडल्यास आझमगडहुन २०००० माणसे आणतो पण अमेरिकेतल्या प्रत्येक थेटरात स्लमडॉग झळकवतोच.बघु कोण आडवे येते ते ...

===================================

* पुर्वप्रकाशित : मिसळपाव.कॉम .... स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया.

Wednesday, February 11, 2009

तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे काय ? ...भाग-२

तर मंडळी आता आम्ही आमच्या लेखाचा दुसरा भाग मोठ्ठ्या आनंदाने, उत्साहात आणि नेहमीच्याच जोशात प्रसिद्ध करत आहोत. पण पहिला पार्ट कुठे आहे असे विचारुन आम्हाला अडचणीत नका आणु.पहिला भाग म्हणजे तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे काय ? ...भाग-1 हा तुम्ही वाचला असेलच.
असो.
तर आमच्या मागच्या लेखाप्रमाणे ह्या भागात सुद्धा नवोदितांनी मिपावर सुप्रसिद्ध प्रतिसादकर्ता होण्यासाठी प्रतिसाद कसे लिहावेत ह्यासंबंधी " ४ शब्द" लिहणार आहोत. ( कोण आहे रे तो किबोर्ड बडवुन हासणारा ?, काहीही करतात लेकाचे. )
३. जनातलं - मनातलं :
जनातलं-मनातलं म्हणजे हलकफुलकं लेखन ज्यात कव्य, जडबंबाळ चर्चा यांना व्यवस्थीत काट मारुन मस्तपैकी कथा, ललित लेख, अनुभव, किस्से, स्फुट वगैरे लिहतात तेच. आता आले ना लक्षात हे म्हणजे नक्की काय ते, थोडक्यात नाव जरी लै भारी असले तरी हा प्रकार अगदीच साधासुधा व गोरगरिबांचा आहे. जर तुम्ही सुक्ष्मात जाऊन निरीक्षण केलेत तर तुम्हाला आंतरजालावरच्या दर ३ लेखामागे १ लेख हा "जनातलं मनातलं " ह्या सदरात आल्याचे दिसेल, थोडक्यात हा भाग महत्वाचा. बर्‍याच वेळा आपला लेख नक्की "काथ्याकुट / कविता / आणखी काही " ह्या पैकी कशात मोडतो हे ( वेळीच ) लक्षात न आल्याने बरेच लोक तो थम्ब रुलप्रमाणे "जनातलं मनातलं" ह्य सदरात बिनधास्त टाकुन देतात. असो. ह्यावर कसे प्रतिसाद द्यावेत ह्याचेसुद्धा मी थोडे वर्गीकरण केले आहे.

जर लेखन "कथा" ह्या वर्गात मोडत असेल तर प्रतिसाद देण्याच्या व्याख्या थोड्या भिन्न आहेत. पहिल्यांदा ( जमल्यास ) कथा वाचुन ती नक्की कसली आहे ह्याचा निर्णय करावा. म्हणजे ती भयकथा आहे की सिरीअस आहे की विनोदी आहे की विडंबन करुन कुणाच्या टोप्या उडवणारी आहे ह्याचा निर्णय करुन घ्यावा. नाहीतर काय होते एखादी "भयकथा" असते आणि त्याला तुम्ही चुकुनच " व्वा, काय टोप्या उडवल्यात , हसुन हसुन खुर्चीवरुन पडलो " असा प्रतिसाद देऊन बसता व त्या बिचार्‍या लेखकाचा चेहरा कथेतल्या भुतापेक्षा भयानक होऊन बसतो. तर काळजी महत्वाची हे लक्षात आलेच असेल.
जर कथा ही विनोदी असेल तर तुमचे काम सोपे होते, फक्त " अशक्य , ठ्ठ्या ऽऽऽऽऽ , फु ट लो , आग्गायायाया ऽऽऽ , कळफलकावर + मॉनीटरवर वर कॉफी सांडली , खुर्चीवरुन पडलो , हसुन हसुन मेलो " अशी ५-६ आतिशयोक्तीपुर्ण वाक्ये जवळ बाळगावीत. पण फक्त एवढेच लिहुन प्रतिसाद पुर्ण होत नाही, त्या लेखातीलच २-४ वाक्ये निवडुन ती आहे तशी आपल्या प्रतिक्रीयेत टाकुन त्याखाली वरील तुकडे वापरल्यास प्रतिसादाला "वजन येते" असा अनुभव आहे. सम्जा जर वाक्ये सुचली नाहीत तरीही काळजी नाही, नुसत्या "लोळुन लोळुन हसलो ह्या अर्थाच्या" स्मायली टाकल्या तरी काम भागते. ह्यातलेसुद्धा काहीही करायचा कंटाळा आला असेल तर एखादी भलीमोठ्ठी प्रतिक्रीया निवडावी ( ह्या देणार्‍यांची संख्या मोप आहे, फिकर नॉट ) आणि त्यालाच "असेच म्हणतो , +१ " असा प्रतिसाद टाकुन मोकळे व्हावे ( मात्र ह्याला आम्ही कर्मदरिद्रीपणा म्हणतो. असो ).

जर लेखक एखादा "आंतरजालावरील थोर व्यक्ती " असे तर मात्र " व्वा , भाईकाकांची आठवण आली ( पुलं म्हणणे म्हणजे घोर पाप बरे का. ) , चिंवी जोश्यांची शैली वाटते , हा प्रकार तुम्हाला चांगला जमतो " वगैरे लिहावे लागते, नाहीतर तुमच्या प्रतीक्रीयेला काडीइतकी किंमत नाही, तुम्ही नाही लिहले तर अजुन दुसरे कोणीतरी लिहतेच व लोक त्याला "सहमत आहे" असा उपप्रतिसाद देत राहतात, म्हणुन "स्टाईकर्स ऍडव्हान्टेज " कधीही सोडु नये ...
जेवढा मोठ्ठा प्रतिसद तेवढे तुम्ही जास्त फेमस हे लक्षात आले मग पुढे काही अवघड नाही.

जर कथा ही भयकथा "कॅटेगिरी" तली असेल तर मामला जरासा कठीण आहे, ह्यांना प्रतिक्रीया देण्यासाठी अभ्यास लागतो. नुसत्या " भयानक, दरदरुन घाम सुटला , सरसरौन काटा आला अंगावर , कच्चकन दचकलो " ह्या अगदीच सर्वसामान्य प्रतिक्रीया झाल्या. जर आपली छाप जमवायची असेल तर उगाच आपलं लेखकाची एखाद्या "प्रसिद्ध भयकथा लेखकाशी " तुलना करणे आवश्यक ठरते.
उदा : शेवट जरा मतकर्‍यांसारखा (उल्लेख असाच करावा, जर तुम्ही "रत्नाकर मतकरी यांच्यासारखा" असे लिहलेले तर तुम्ही नवशिके आहात हे आंतरजालावरचे पोरटे सुद्धा ओळखेल ) केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे तुम्हाला....किंवा... तंतोतंत धारपच, मला वाटतं त्यांची "अखेरचा प्रमाद ( म्हणजे काय कुणास ठाऊक ? ) " ही कथा ह्याच अंगाने जाते...किंवा... ते त्या "मुडदे की जान खतरे मे है / सुखी नदीं मे बहती हुई लाश" मधल्या कथानकासारखे वाटते नाही ?
असे प्रतिसाद टाकणे आवश्यक बनते, म्हणाजे काय होते की लेखकाच्या अंगावर मुठभर मास चढुन तो आपला सुमडीत "हॅहॅहॅ, कसेच कसे. त्यात शेवटी माणुस मरुन भुत होत नाही तर भुताला उ:शाप मिळुन त्याचा माणुस होतो व ते दोघे लग्न करतात " असे स्पष्तीकरण देत बसतो, तुम्ही आपलं " हम्म, पण शैली तशी वाटली बॉ,असो." असा ठेका सोडु नका ...
हे एकदा जमले की झालेच ...!

तिसरा प्रकार आहे तो म्हणजे "मुक्तक अथवा सिरीअस लिखाण " करणार्‍याचा ...
महत्वाची सुचना : वर दिलेल्या "शँपल प्रतिक्रीया / सल्ला " ह्याचा वापर इथे अजिबात करु नये. ह्याचा साज पुर्ण वेगळा आहे. नेहमीप्रमाणे ( जमल्यास ) पुर्ण कथा वाचुन काढावी, शक्यतो हा प्रकार "मान्यवर व जाणाकार" व्यक्तीच हाताळत असल्याने ह्यांच्या लेखाला वजन असते, उगाच फालतु प्रतिक्रीया इथे टाकल्यास तुमच्यावर "बदनाम " व्हायची दुर्दशा येऊ शकते.सर्वसाधारण अशा लेखाला " सलाम ..! , केवळ अ प्र ति म , खल्लास वगैरे वगैरे " प्रतिक्रीया प्राथमीक अवस्थीत टाकता येतील. पण आता तुम्ही जम बसवायचे ठरवल्याने तुम्हाला हे अलाऊड नाही.
आता तुम्ही थोडाश्या कलात्मक, नाजुक व साहित्यीक प्रतिक्रीया टाकाव्यात अशी अपेक्षा असते. म्हणजे बघा की " जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्‍याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो " अशा व तत्सम प्रतिक्रीया टाकणे आवश्यक ठरते. जेवढे जास्त "अनाकलनीय" लिहताल तेवढेच जास्त वजन पडते. साध्या सरळ प्रतिक्रीयेला जास्त भाव मिळत नाही. असो.

अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही वेळेला लेखकाचे " अप्रतिम बॉस , आत्तापर्यंत लेखणी का म्यान केली होतीत ? / रुद्ध प्रतिभा भरभरुन वाहु देत / तुमचे नाव वाचले आणि लेख वाचायला घेतल, नेहमीप्रमाणे निराशा झाली नाही. " वगैरे वगैरे प्रतिक्रीया टाकाव्यात, ह्याला समर्थन तर मिलतेच शिवाय तुम्ही लेख्काच्या "बडी लिस्ट" मध्ये जायला मोकळे होता.

शेवटचा "अनकॅटेगराईझ्ड प्रकार " म्हणजे उगाच आपले काहीही लिहणार्‍यांचा, ते आपले उगाच " पुण्यात गादी कुठे मिळेल ? पंखा कुठे दुरुस्त करायचा ? सगळ्यात भारी शेवपापडी /अनारसे कुठे मिळतात ? संघाने चालवलेला गांधीवाद . सलमानने कत्रिनाला काय म्हटले " अशा विषयांवर काहीबाही खरडतो तो, ह्याला विषयांचे बंधन नाही, तुम्ही काहीही लिहु शकता.ह्याला जास्त भाव मिळत नसल्याने "तुम्ही ह्याकडे ढुंकुनही न पहाणे योग्य" ठरेल. तिकडे फिरकुच नका.
उलट आपल्यासारख्याच एखाद्या पप्रथितयश प्रतिसादकर्त्याचा खरडवहीत "काय फालतुपणा चालला आहे, अक्षरशः उबग आला आता , आयला गिरणी लावल्यासारखे लेख पाडतात " अशा पिंका टाकुन द्याव्यात, आपली चर्चा मस्त रंगते व "भोचकपणे आपल्या खव वाचणार्‍यांना" आपण फार "अभिरुचीसंपन्न, चोखंदळ, साहित्याचे खरे वारसदार, गुणग्राहक " वगैरे असल्याचा उगाच गैरसमज होतो व आपली "इज्जत वाढते" , मग हा "गैरसमज" हळुहळु पसरवायला हीच मंडळी मदत करतात. मधुन आधुन त्यांच्याही खरडवह्यात "काय मग, काय नवे लिखाण ? " असे लिहुन यावे त्यावर रिप्लाय म्हणुन " बस का मालक, चेष्टा करता का गरिबाची ? आम्ही कसले लिहणार , आम्ही तर तुमचे फॅन. बोला कधी लिहताय ? " अशी खरड आलीच म्हणुन समजा. त्यावर उत्तर म्हनुन फक्त " लवकरच, सध्या थोडा बिसी आहे, मनासारखे लिहायला निवांत वेळ पाहिजे हो " असे ठोकुन द्यावे. म्हणजे पुढ्च्या वेळी तुम्ही काहीही लिहले तरी "ह्यांचा तुमची तोंड फाटुस्तोवर स्तुती" करणारा प्रतिसाद नक्की ...

४. कलादालन :
हा एक नवा प्रकार मिपावरच प्रथम अस्तित्वात आला आहे, अजुन नाविन्य असल्याने तुम्हाला हात चालवायला बर्‍याच संधी आहेत. पण इथे मात्र फक्त फोटाँवर प्रतिक्रीया द्यायची असल्याने फाफटपसारा चालत नाही, मुद्द्याचे बोलावे लागते. आता हे कसे जमवावे ते सांगतो.नेहमीप्रमाणे टारुबाबाने सांगितल्याप्रमाणे "फो टू के व ळ अ प्र ति म , ४ नंबरचा फोटू झकास आला आहे , डोळ्यचे पारणे फिटले, डेस्कटॉपवर लावला आहे, मस्तच " ह्यासारख्या प्रतिक्रीया टाकुन ठेवाव्यात.

आता महत्वाचा मुद्दा, प्रत्येक प्रतीक्रियेच्या खालीच लगेच "अवांतर " ह्या सदराखाली आपला मोठ्ठेपणा, शहाणपणा , गर्व दाखवणार्‍या कमेंट्स द्याव्यात. जसे की
"सेटिंग काय लावले हो ? नाही , जराशे दुसर वाट्तात फोटो, आय एस ओ ४००० वापरले असते तर अजुन ब्राईट आले असते. असो."
"लेन्स कुठली हो ? फोकस कसा मारलात ? जरा अजुन क्लोजअप हवा होता असे वाटते."
"जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता ..."
"शटर स्पीड थोडे जास्त झाले असे वाटते, एवढ्या प्रकाशाला थोडे कमीच वापरा पुढ्च्या वेळी ..."
ह्या प्रतिक्रीया ठोकल्या की तुम्ही म्हणजे अगदी जगप्रसिद्ध फोटोग्राफरचा आव आणायला रिकामे. लोक सुद्धा ह्यावर मनोसोक्त भांडतात. बिचारा लेखक सुद्धा आपल्याला "टेक्नीकल डिटेल्स्ची" काडीइतकी माहिती न्सल्याचे मान्य करतो व तुम्हाला सांगायची विनंती करतो. तुम्ही मात्र " हम्म, सांगायला हरकत नाही तसे, पण सध्या एवढा मोठ्ठा लेख लिहायला वेळ नाही, बघतो सवडीने " असे ठोकुन द्यावे. लोक वाट बघत बसतात पण कुणी विचारायची हिंमत करत नाही. थोडक्यात तुम्ही जिंकलात स्पष्टपणे ....

अजुन एक प्रकार म्हणजे "फोटोम्च्या स्थानावर / लोकेशन वर कमेंट्स" द्यायच्या ...
उदा :
" का हो तिथल्या डाळिंबच्या बागा अजुन तशाच आहेत का ?"
"आम्हाला आमच्या ट्रीपची आठवण झाली, तुम्ही ज्या दगडाचा फोटो दिलात त्यावरुन पडुन माझा कपाळमोक्ष होता होता वाचला होता."
"आयला, डोंगर अजुन तशेच्या तसेच, मी गेलो होतो ४० वर्षापुर्वी, कमाल आहे."
"त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ?"
"तुम्ही नशिबवान खरे, आम्ही गेल्या वेळी गेलो होतो तेव्हा तेथे चक्क बर्फ होता, मग आमच्या हीने / ह्यांनी त्यावरुन स्कीईंग करता करता पाय मोडुन घेतला होता. असो."
"त्या राजवाड्यची मागची पडकी विहीर पाहिलीत का ? अप्रतिम आहे बॉस .... "
असे जर तुम्ही बोललात तर लोक तुमच्याकडे "काय दर्दी माणुस आहे ?" ह्या नजरेने पाहतील. शिवाय तुम्ही गेलाबाजार निम्मे तरी जग हिंड्ला आहात हे १० लोकात सिद्ध होते. शिवाय तुम्हाला ह्यांची फारच माहिती आहे असा "गैरसमज" भराभर पसरुन तुमचे नाव होते.मग लोक तिकडे जाताना तुम्हाला विचारतात " शेठ, चाल्लो आहे मसणात, काय काय पाहुन घेऊ, तुम्ही अनुभवी लोकं म्हणुन तुमचा सल्ला घ्यावा म्हटले" ...
अशा प्रकारे हा हा म्हणता तुम्ही ह्या प्रकारात "दादा" म्हणुन ओळखले जायला लागता ....