Friday, November 20, 2009

स्टार माझा आणि वाचकांचे आभार ... जिंकलो रे !!!

आज सकाळी सकाळीच आमच्या एका अस्सल पुणेकर मित्राचा आमच्या मोबाईलवर फ़ोन आला, च्यायला म्हणलं आता सकाळ सकाळ शिव्या खाव्या लागणार.
पण अहो आश्चर्यम, त्याने २-३ माफ़क शिव्यातच आपला मायना आवरता घेऊन "तुला स्टार माझाच्या ब्लॊग माझा ह्या स्पर्धेत बक्षिस मिळाले आहे" अशी बातमी दिली.

ऒफ़िसमध्ये जाऊन ई-मेल्स चेक करुन बघितले असता स्टार माझाचे संपादक "श्री. प्रसन्न जोशी" ह्यांची अभिनंदन करणारी व निकाल घोषीत करणारी मेल दिसली.
खुप आनंद झाला मित्रानों.
खुप खुप आभारी आहे.

एवढा व्यापक आणि अवाढव्य आवाका असलेली स्पर्धा भरवुन ती यशस्वीपणे पेलल्याबद्दल स्टार माझाचेही अभिनंदन व आभार ...
अशा संस्थांकडुन मिळणा-या प्रोत्साहनामुळे आणि कौतुकामुळे लिहायला हुरुप येऊन नवे अजुन ब्लॊग्स ह्या मराठी ब्लॊगर्सच्या विश्वात दाखल होतील असा आमचा विश्वास आहे.
धन्यवाद स्टार माझा ...

ह्याबरोबर आम्ही आमच्या ह्या यशाचे श्रेय मिसळपाव.कॊम लाही देऊ इच्छितो.
कारण आमच्या भल्या-बु-या लेखनाची सुरवात, कौतुक, विकास हा इथेच घडला.
आजसुद्धा मिपाकरांनी आमचे भरपुर कौतुक केले. धन्यवाद मित्रांनो ...

नॊट दी लिस्ट, आमच्या ब्लॊगच्या तमाम वाचकांचे व हितचिंतकांचे आभार कारण तुमच्या कौतुकामुळे व पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही नवनविन विषयावर उत्साहात लिहीत असतो.
असाच लोभ राहुद्यात ...

स्पर्धेतल्या इतर विजेत्यांचेही मनापासुन अभिनंदन ...!!!
असेच लढा दोस्तांनो.

धन्यवाद ... !!!

- ( आभारी ) छोटा डॊन

Tuesday, November 17, 2009

स्ट्रेट ड्राईव्ह, हाराकिरी आणि ऒफ़साईड वगैरे वगैरे...

म्हणजे बघा सिच्युएशन प्रचंड कॉप्लेक्स आहे. भल्याभल्या समिक्षकांचा आणि ह्या क्षेत्रातल्या दादा माणसांचा ह्यात कस लागु शकतो.

" एक वेल सेट फलंदाज (उदा : सचिन तेंडुलकर ) कसलेल्या गोलंदाजीला समर्थपणे तोंड देत एखाद्या भिंतींसारखा खेळपट्टीवर उभा आहे. विरुद्ध बाजुच्या कर्णधाराचे आणि गोलंदाजचे सर्व डावपेच त्याच्या सरळ बॆटीमधुन आलेल्या ड्राईव्हच्या फ़टक्याबरोबर सीमीरेषेपार वाहुन जात आहेत. बघता बघाता त्याचे द्विशतक जवळ आले आहे, १९९ धावा बोर्डावर लागल्या आहेत. पटकन १ धाव काढुन द्विशतक पुर्ण करण्याची तडप त्याच्या चेहर्‍यावर सहाजिकच स्पष्टपणे दिसत आहे व ह्याच घोळात तो एक चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न करतो. अर्थातच ही धाव मुळीच चोरटी वगैरे नसते, तो असते विरुद्ध संघाच्या धुर्त कर्णधाराचा ( उदाहरणार्थ : हिंदी-इंग्लिश मिडीया ) एक कसलेला डाव. बॅटवर आलेला एक सरळ, साधा चेंडु कव्हरकडे हलकेच ढकलुन तो धव घेण्यासाठी पळायला प्रारंभ करतो. ठरल्याप्रमाणे गोलंदाज चेंडुला कव्हर देण्याच्या बहाण्याने फलंदाजाला आडवा जातो व त्याचा धक्का लागुन फलंदाज पडतो. तोवर तिकडे दक्ष असलेल्या क्षेत्ररक्षकाचा थ्रो बरोबर स्टंपकडे जाऊन यष्ट्या उद्धवस्त होतात. गोलंदाज व क्षेत्ररक्षक जोरदार अपिल करतात व नियमाप्रमाणे जरी फलंदाज बाद असला तरी नैतिकदॄष्ट्या हे चुकीचे आहे हे माहित असुनसुद्धा आपले कर्तव्य म्हणुन पंच ( इथे उदाहरणार्थ : बाळासाहेब ठाकरे ) त्याला बाद देतात. फलंदाज निराश होऊन तंबुत परततो व टीव्हीसमोर बसलेले स्वयंघोषीत समिक्षक ( उदाहरणार्थ : विविध पक्षांचे प्रवक्ते की ज्यांना कधीमधी अशा घटनांवर प्रतिक्रिया देऊन लाईमलाईटमध्ये रहावे लागते. असो, तो मुद्दा वेगळा ), सामान्य प्रेक्षक, क्रिडाप्रेमी विरुद्ध संघाचा डावपेच समजुन न घेता पंचाच्या नावाने मनोसोक्त खडे फोडुन रिकामे होतात ....."

सध्या असेच काही घडले आहे ना ?

आपल्या (अरे हो, आख्ख्या देशाच्या म्हणावे लागेन ना. आजकाल उगाच कशाला रिस्क घ्या बाबा) सचिनच्या कारकिर्दीला २० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने घडत असलेल्या समारंभात व मुलाखतीत एका (हलकट म्हणावे का?) पत्रकाराने मुद्दामुन खाजवुन खरुज काढण्याच्या उद्देशाने "मुंबई"विषयी प्रश्न विचारला. अर्थातच सचिन (आमच्या पवारकाकांसारखा) कसलेला राजकारणी नसल्याने त्याने निरागसपणे आणि प्रामाणिकपणे "I am extremely proud of being a Maharashtrian, but Mumbai is a part of India and I play for India" असे उत्तर दिले. तसे पाहिले तर टेक्निकली ह्या उत्तरात अजिबात काही चुक नाही, त्याचा अर्थही अगदी सरळ आहे.
पण आता कहानी मे ट्विस्ट इथे आहे, लगेच ह्या वाक्याला प्रमाण मानुन व त्याला हवे तसे वाकवुन देशभरातल्या मिडीयाने "सचिन म्हणतो, मुंबई सगळ्यांचीच. प्रदेशवादाला सचिनचे स्ट्रेटड्राईव्हद्वारे खणखणीत उत्तर" वगैरे कंड्या पिकवायला सुरवात केली. वास्तविक पहाता ज्याची काही आवश्यकता नव्हती त्या वादाला सुरवात इथे मिडियाकडुनच घडाली. मुळात ते वाक्य त्या उद्देशाने उच्चारले गेले नसतानाही त्याचा हवा तसा अणि स्वतःच्या सोईचा अर्थ काढुन उगाच रान पेटवणे हे मिडियाच्या कोणत्या तत्वात बसते ?
जवळपास ३ प्रहरे मिडियाने हा हैदोस घातल्यानंतर (राज ठाकरेच्या मराठी टक्क्याच्या जबरदस्त तडाख्याने आधीच घायाळ असलेली) शिवसेना आता ह्या वादात उतरली. दुसर्‍या दिवशी सकाळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधुन " सचिन, तू तुझी आंतरराष्ट्रीय खेळपट्टी सांभाळ! " ह्या शिर्षकाखाली सचिनला ( सो कॉल्ड ) ४ खडे बोल सुनावणारे शिवसेनाप्रमुखांचे (?) पत्र प्रसिद्ध झाले.
अपेक्षेप्रमाणे देशभरचा मिडिया अधिक पावसाळ्यातील छत्रीसारखे उगवणारे समिक्षक, प्रवक्ते वगैरे टिनपाट लोक लगेच ठाकर्‍यांवर आणि शिवसेनेवर तोंडसुख घेऊ लागले. इथे ठाकर्‍यांनी तर फक्त त्यांचे कर्तव्य केले होते हे मात्र सर्व सोईस्करपणे विसरले.

----------------------------------------------------------------

आता काही आमचे मुद्दे किंवा अस्ताव्यस्त विचार :

१. सचिनने ह्या प्रश्नातली खोच ओळखुन ह्याला तेवढेच पोलाईट किंवा कमीत कमी हवे तसे वाकवता न येणारे उत्तर दिले असते तर हा वाद वाढलाच नसता. अगदी सचिनने "'मी मराठी आहे आणि मुंबैकर आहे आणि मुंबै ही सर्वप्रथम मराठी माणसाचीच आहे!" असे प्रखर महाराष्ट्रवादाचे उत्तर देणे अपेक्षित नसले तरी कमीत कमी हा चेंड सोडुन द्यायला अथवा शांतपणे पोलाईटली तटवायला हवा होता.
सचिनला आम्ही देव मानतो व त्याच्या प्रत्येक गोष्टीवर अथवा कॄतेवर आम्ही डोळे झाकुन विश्वास ठेवतो की नाही?
होय ना, मग आमच्या देवानेच जरा जपुन वागायला नको का ?
देवाने देवासारखेच पोलाईट रहायला नको का ?
(ह्या बाबतीत आमच्या पवारकाकांचा हातखंड आहे, एकदा त्यांनी रिलायन्सबाबत वारंवार प्रश्न विचारुन त्रास देणार्‍या पत्रकाराला भर पत्रकार परिषदेतच "Are you agent of Relience ?" असे विचारुन त्याच्याच धोतराखाली फटाकड्याची माळ लावली होते. सचिनने असेच समकक्ष केले असते तर ते सर्वांच्याच सोईचे झाले असते. असो.)

२. बाळासाहेब ठाकरे ह्यांचे तसे पहायला गेले तर काय चुकले ?
एखाद्या फालतु माणसाने ( नीट वाचा, मी इथे कुठल्याही राजकारण्याचे नाव घेतले नाही. फक्त राजकारणीच फालतु असतात असा माझा अजिबात दावाही नाही.) हे करणे आणि सचिनसारख्या "आयकॉन"ने हे करणे ह्यात फरक आहे.सचिन जेव्हा एखादे वाक्य उच्चारतो तेव्हा ते त्याचे वैयक्तिक मत रहात नाही तर ती एखाद्या समाजाची समुहभावना म्हणुन ओळखली जाते.
मग अशा परिस्थीतीत जेव्हा शिवसेना की जी नेहमी मुंबई महाराष्ट्रात अणि मराठी माणसांचीच रहावी ह्यासाही झटली आहे किंव झटते आहे त्यांनी मैदानात उतरणे हे काय चुक आहे ? ते स्टेटमेंट देणारा कोणीही असो, मात्र त्यातल्या भावना जर मराठी माणसाला दुखावणार्‍या असतील तर त्यावर शिवसेनचा आसुड बरसणारच. ह्यात चुक आहे ते काय ? ह्याच स्वभावधर्माला किंवा कर्तव्याला जागुन बाळासाहेब मैदानात उतरले व त्यांची मुळातच सचिनवर माया असल्याने त्यांनी सचिनला आपलेपणाने त्या पत्रात बरेच काही समजावुन सांगितले की ज्यातले बरेच मुद्दे पटण्यासारखे आहेत.

३. त्यानंतर जो मिडिया आणि इतर चिल्लर नेतेमंडंळी शिवसेनाप्रमुखांवर ज्या पद्धतीने बरसली ते पाहुन मात्र आश्चर्य वाटले. "आयत्या बिळावर नागोबा" कशाला म्हणतात ते लक्षात आले. ना ह्यांना सचिनशी , ना बाळासाहेबांशी, ना मराठी माणसाच्या कल्याणाशी देणेघेणे, जर काही असेल तर ते मात्र मुंबईतुन मिळणार्‍या प्रचंड मलिद्याशी मात्र ह्यांना "देणे" नसले तरी "घेणे" नक्कीच आहे व सध्या सर्व अट्टाहास त्याचसाठी चालला आहे असे वाटतेय. पण तेवढ्यात २ बाईट्स देऊन उगाच मिडियावर झळकण्याच्या ह्यांच्या माकडचाळ्याचा मात्र आम्हाला प्रचंड वैताग आला.

४. हा वाद आता इथेच संपवणे उत्तम. उगाच विषयाला फाटे फुटत राहिले तर गरज नसताना उगाच तेढ निर्माण होईल. झाले तेवढे झुप झाले हे सर्वांनीच समजुन घेणे उत्तम.

ता.क. :यांच्यासाठी हा सर्व अट्टाहास केला गेला तो "मनसे" मात्र ह्या वादापासुन दुर राहण्याचा हुशारीपणा आणि परिपक्वपणा दाखवण्यात येशस्वी झाला आहे. ह्या समजुतदारपणासाठी मनसेचे अभिनंदन ...!!!

आता २ शब्द सचिनसाठी :
सचिन तु आमचा देव होतास आणि आहेस आणि चिरंतन राहशीलही. पण तुझे देवत्व आम्ही फक्त क्रिकेटच्या खेळपट्टीपुरतेच मानतो ह्यात मात्र गल्लत होऊ देऊ नकोस, समोरच्याचे डावपेच ओळखुन बॉल तटवायला लागला तरी हरकत नाही.
तु जर ह्या जागी फुटबॉल खेळत असता तर आम्ही त्वरित "ऑफसाईड" चा फ्लॅग दाखवला असता, कमीत कमी ह्या खेळात ह्या क्षणाला खेळ थांबुन पुर्वीची चाल बाद ठरुन पुन्हा पहिल्यापासुन चाली रचाव्या लागतात.
मात्र क्रिकेटचे आणि समाजकारणाचे ( किंवा राजकारणाचे ) असे नाही , इथे फलंदाजाने एकदा टोलावलेला चेंडु किंवा तुझ्यासारख्य एखाद्या आयकॉनने मुखातुन उच्चारलेले वाक्य ह्याला परतीचे वाट नसते....त्याचा परिणाम काहीही होऊ शकतो, चेंडु सीमापार जाऊन विजयध्वज फडकावु शकतो किंवा झेल जाऊन आख्खा सामनाच गमावण्याची पाळी येऊ शकते.

- तुझा एक चाहता
छोटा डॉन

Thursday, November 12, 2009

यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !

प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं. त्यांनी करदात्यांचे वैफल्य, सामान्य माणसाचे जिवन, राडेबाजी ह्या मुद्द्यांचा आधारे आपल्या राखीव कुरणात बेसलेस विधाने आणि आगापिछा नसलेले आरोप घेऊन बराच उतमात घालता.शेवटी आमच्या पराला "शोध विचारवंताचा " नामक मोहीम राबवावी लागली.
सूहासने एक दणदणीत अणि मुद्देसुद प्रतिसाद देऊन ह्या विचारवंतांच्या धोतरालाच हात घातला व अवलियाशेठनी त्यांच्या निषेधाद्वारे ह्यांच्य वर्मावरच घाव घातला.

त्याच पार्शभुमीवर आम्ही ४ ओळी खरडल्या आहेत, मुळ प्रेरणा हे "मंगेश पाडगावकरांची एक कविता" ...
जे आहे ते गोड मानुन घ्या ... ;)

********************************************************


यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

नव्या रक्ताचे सुशिक्षीत युवक
'नवनिर्माणासाठी' जमणार,
चर्चा, निदर्शन, आंदोलन, निषेध
करीत प्रवाहात उरतणार !

यांच सुख नसतच मुळी
कधी ह्यांच्यासाठी,
एकच गोष्ट यांची असते
कपाळावर आठी !

कधीसुद्धा यांचा संयम ढासळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

'मराठी अस्मिते'चे बोला तुम्ही
यांना नैतिक त्रास होतो.
'जय महाराष्ट्र' म्हणल्यावर यांना
देश तोडल्याचा भास होतो ?

यांचा धोशा सुरु असतो
'रस्त्यावर उतरणं वाईट,
त्यानं ट्राफिक ज्याम होतं !
आंदोलनं मुळीच करु नका,
त्याने सामान्यांचं जीणं हराम होतं !
क्रांत्या-बिंत्या सगळं झुट,
त्याने करदात्यांना वैफल्य येतं! '

संयमाचे पुतळेच हे
यांच रक्त चुकुनही सळसळत नाही !
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

सगळेच कसे ऑफिसातुन
लंबेचौडे तात्विक लेख लिहणार ?
किंवा हातामध्ये गीता घेऊन
'चिंता विश्वाची' करीत बसणार?

पांढरपेशी सुखवस्तु कोष झुगारुन कोणी
अन्यायाविरुद्ध उभारतचं ना ?
हातात फलक घेऊन जयघोषात
रस्त्यावर उतरतंच ना?

असं काही दिसलं की
यांच माथं भनकलचं,
यांच्या वैचारिकतेचं गळु
अवघड जागी ठणकलचं !

वांझोट्या शाब्दिक चर्चांचं यांच्या
वेगवाग घोडं असतं !
पण यांना समविचारी भेटतात कसे
हे एक कोडं असतं ?

या कठिण कोड्याचं उत्तम मात्र मिळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

कसल्याही राड्याला
हे सतत भीत असतात
एरंडेल प्यावं तसं
आयुष्य पीत असतात

एरंडेल प्याल्यावर
आणखी वेगळं काय होणार ?
एकच क्षेत्र ठरलेलं
दुसरीकडे कुठे जाणार ?

कारण आणि परिणाम
यांच नातं टळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

- (राडेबाज) छोटा डॉन

Tuesday, November 10, 2009

.... नाठाळाच्‍या माथी हाणू काठी !!!

२ दिवसापुर्वी महाराष्ट्र विधानसभेत जे घडले ते निश्चितच आपल्या गौरवशाली (आता हा शब्द निर्रथकपणे किती दिवस वापरायचा हा प्रश्नच आहे, कसला गौरव ते हर्षवर्धन पाटील जाणोत) परंपरेला साजेसे जरी नसले तरी ते आवश्यक जरुर होते. बाकी आम्हाला तांत्रिक बाबीत घुसायचे नाही पण जे काही घडले ते पाहुन बरे वाटले इतकेच म्हणतो.

अबु आझमी हा इसम मुळातच मस्तवाल आहे. हा माणुस महाराष्ट्रात निवडुन कसा येतो हेच आश्चर्य आहे त्याबद्दल त्या मतदारसंघातल्या (उरल्या-सुरल्या) मराठी किंवा अमराठी पण महाराष्ट्रिय माणसाने आत्मपरिक्षण करायला हवे. मतदारसंघातला निवडक युपी/बिहार वाले मतदार आणि जमलेच तर धर्माच्या नावावर अजुन काही मतदार गोळा करुन त्यांना चुचकारायचे, पाण्यासारखा पैसा ओतायचा, सोबत पोसलेले गुंड आहेतच "इतर" कामे उरकायला, मग काय झाले निवडुन न यायला ?
असो, तो वेगळा मुद्दा आहे ...

मनसेची मागणी अतिशय साधी होती, त्याचा इतर जणांना उगाच प्रेस्टिज इश्श्यु करायची गरज नव्हती, शिवाय हे करत असताना आपण प्रत्यक्ष राज्याच्या भाषिक अस्मितेला आव्हान देतो आहे हे त्यांच्या लक्षात येईल अशी सुज्ञ अपेक्षा ठेवण्याइतके आपण मुर्ख नाही आहोत. त्यामुळे जे काही घडले त्याचे आधीच पुर्ण कॅक्ल्युलेशन करुन आझमींनी अडेलतट्टुपणाकरुन वाद ओढावुन घेतला व त्यात तापलेल्या तव्यावर इतर पक्षांनी "मनसे विरोधी द्वेषाची" पोळी भाजुन घेतली असे आमचे मत झाले आहे ...

झालेल्या घटनेस सर्वस्वीपणे स्वतः अबु आझमी आणि सरकारमधले उच्चपदस्थ की ज्यांना काय आणि कसे घडेल व त्यांचे देशभर पडसाद काय उमटतील ह्याची पुर्णपणे कल्पना होती पण त्यांनी जाणुनबुजुन निष्काळजीपणे हे प्रकरण हाताळुन परिस्थिती एवढी चिघळु दिली.
मनसेच्या लढाऊ आमदारांचे अभिनंदन व इतर बोटचेप्या आमदारांचा धिक्कार ...!!!

काही महत्वाचे मुद्दे की जे पाहुन हे कारस्थान मुद्दामुन मनसेला आडवे जाण्यासाठी रचले गेले अशी आम्हाला शंका येते.

१. जरी कायद्याप्रमाणे कोणताही आमदार अगर खासदार राज्यघटनेत सुचवल्या गेलेल्या मातॄभाषेव्यतिरिक्त इतर १८ भाषात शप्पथ घेऊ शकत असला तरी ह्याचे प्रयोग वारंवार महाराष्ट्रातच कशासाठी ?
इतर राज्यातले समकक्ष उदाहरण डोळ्यासमोर आहे काय ? का मराठी अस्मितेला नेहमीच आव्हान देऊन मराठी माणसाला किंवा मनसेसारख्या मराठी मुद्दा घेऊन लढणार्‍या पक्षाला बदनाम करण्यासाठी मुद्दाम असे उचकावले जाते ?

२. अबु आझमी २० वर्षे इथे रहात आहेत, २ का ३ वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे व त्यांची मातॄभाषा हिंदी असल्याने व त्यामुळेच मराठी व हिंदीची स्क्रिप्ट सारखीच म्हणजे देवनागरी असल्याने त्यांना समस्त महाराष्ट्रिय जनतेच्या सन्मानासाठी "४ ओळी" मराठीत वाचणे जड होते का ?
शिव्यागाळी करायला बरी मराठी जमते ?

३. राज ठाकरे ह्यांनी पुर्वसुचना देऊनसुद्धा प्रकरण एवढ्या थराला गेले ह्यावरुन सरकारने मुद्दामुन हयकडे डोळेझाक केली व नंतर तत्परतेचा आव आणुन कारवाई केली असे आम्हाला वाटते.
आजपर्यंत संसदेत कितीवेळातरी "मार्शल्स" बोलावले आहेत मग ही काळजी काल का घेता आली नाही ?

४. ज्यांनी अजुन शपथच घेतली नाही अशा २ आमदारांना ४ वर्षासाठी निलंबीत करणे ह्याचाच अर्थ सरकार आधीच घुडघ्याला बाशिंग बांधुन बसले होते असा घ्यायचा का ?

५. अबु आझमींना सभापतींच्या आसनासमोर उभे राहुन जी "चप्पल दाखवली" व त्यानंतर अ‍ॅच्युअल धक्काबुक्कीला सुरवात झाली हा महत्वाचा मुद्दा सरकारच्या दृष्टीने काहीच किमतीचा नाही का ?
चप्पल दाखवल्यावरही अबु आझमी निर्दोष ठरुन सभागॄहात बसुच कसे शकतात ?

६. शपथ घेऊन खाली उतरल्यावर मात्र फलक फडकावणार्‍या "शिशीर शिंदे" ह्यांना ढकलुन त्यांच्याशी धक्काबुक्कीची सुरवात कोणी केली हे सरकारने तपासुन पाहिले आहे काय ?
मिडिया फुटेजमध्ये तर स्पष्टपणे आधी आझमींनी ढकलल्याच दिसते आहे ....

७. "वसंत गिते" ह्यांनी नेमके काय केले हे कळु शकेल काय ? कारण आम्ही जे काही फुटेज पाहिले त्यात गिते हे बरेच मागे अथवा प्रत्यक्ष सहभागी नसल्याचे आढळले.
केवळ नाशकात सरकारातल्या एका वरिष्ठ मंत्र्याला स्पर्धा नको म्हणुन गितेंना बाहेर काढण्यात आले काय ?

८. वाद होणार हे माहित असुनसुद्धा सरकारतल्या कोणी वरिष्ठांनी अबु आझमींना विनंती करुन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला असे काही घडले आहे का ? नसल्यास का नाही ह्याचे उत्तर मिळावे ?
सभागॄहात शांतता रहावी हे सगळ्यांचेच कर्तव्य नाही का ?

९. आता महत्वाचा मुद्दा की वर्षाची शिक्षा कितपत योग्य आहे ?
आमदार एकमेकांच्या अंगावर धावुन जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे का ?
६० च्या दशकात "जांबुवंतराव धोटे" ह्या विदर्भातल्या आमदाराने थेट सभापतींना पेपरवेट फेकुन मारला त्या प्रकरणात किती शिक्षा झाली होती ?
दस्तुरखुद्द "छगन भुजबळ" हे जेव्हा शिवसेनेचे एकमेव आमदार होते तेव्हा ते एवढा धिंगाणा घालत की त्यांना कित्येकवेळा मार्शलकरवी अक्षरशः "उचलुन" सभागॄहाबाहेत न्हेले असल्याची उदाहरणे आहेत. तेव्हा किती शिक्षा व्हायची भौ त्यांना ?
शिवसेनेच्या गुलाबराव गावंड्यांनी भर विधानसभेत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतुन घेऊन स्वतः रोबरच इतर सदस्यांनाही धोका उत्पन्न केला होता, त्याचे संदर्भ घेतले आहेत काय ?
कित्येकवेळा माईक उखडले, कागदपत्रे फेकली, धाराधरी व पळापळी झाली, धक्काबुक्की सदृष्य घटना ह्याच सभागॄहात घडल्या आहेत, मग ह्यावेळीच इतकी कठोर शिक्षा का ?


जाऊ देत, एकदा पक्षपात करायचा म्हणला की कसाही करता येतो.

आता ह्यातुन आपले ( पक्षी : सर्वसामान्य मतदाराचे ) नुकसान असे झाले की जे मनसे चे आमदार विधानसभेच्या कार्यकाळात प्रश्न विचारुन अथवा पाठपुरावा करुन सरकारला अडचणीत आणु शकले असते ते आता बाहेत गेले आहेत. त्या ४ जणांचा "आमदार निधी" ही माझ्या माहितीप्रमाणे आता त्यांना मिळणार नाही त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात होणार्‍या भविष्यातील विकासकामांना ह्याची निश्चितच कमतरता भासेल ...
एवढी कठोर शिक्षा द्यायची अजिबात आवश्यकता नव्हती ...

फायनली जर ही घटना समराईझ करायची म्हणले तर मी असे म्हणेन :
अबु आझमीने आपण युपी / बिहार वाल्यांचे आणि महाराष्ट्रात वास्तव्य करणार्‍या हिंदीभाषिक लोकांचे सध्याचे "एकमेव तारणहार" आहोत ही प्रतिमा मजबुत करण्यात यश मिळवले. अबु आझमीचे आज देशपातळीवर नाव झाले हे सत्य आहे. any publicity is good publicity ... !!! अबु आझमीसाठी सरळसरळ विन-विन सिच्युएशन आहे ...
मनसेबाबत म्हणाल तर आपणच आता एकमेव मराठी अस्मितेचे तारक आहोत हा दावा त्यांनी चांगलाच मजबुत केला, भले त्यांना ह्या प्रकरणात ४ लढाऊ आमदारांच्या निलंबनाचे नुकसान सोसावे लागले. बरेच लोक म्हणत आहेत की हे बाहेर गेले ४ जण पुढच्या वेळी अजुन ४० जणांच्या खांद्यावर बसुन थाटामाटात विधानसभेत प्रवेश करतील, होप सो तसेच घडेल. तसे बघायला मनसेसाठीही ही "विन-विन" वाटल असली तरी मला सध्याच्या कालमर्यादेच्या कक्षात ही "विन-लुज सिच्युएशन" वाटते ....

तुर्तास मनसे आमदारांचे अभिनंदन ... !!!

जय महाराष्ट्र !!!!

Tuesday, October 27, 2009

निवडणुका आणि मानसोपचार तज्ज्ञ ...

आपल्या घराच्या विस्तिर्ण अशा बाल्कनीवर फ़ेर्‍या मारुन ( वे समोर तेच तेच "पडलेले" चेहरे पाहुन ) दादुमहाराजांना प्रचंड वैताग आला आहे, काय करावे काही सुचत नाही. जरा कुठे बाहेर जावे म्हटले तर मिडीयाच्या आग्यामोहळाचा टेरर आहे म्हणुन तो ही उपाय कटाप. मधुनच मिलिंद त्याच्या ब्लॆकबेरीमध्ये डोकावुन काही तरी युसलेस डेटा देत असतो, कार्यकारी संपादक व खासदार ही उगाच काहीतरी बोलायचे म्हणुन उसने अवसान आणुन बोलत असतात पण आता त्याला काहीच अर्थ नाही हे दादुमहाराजांना उमजले आहे म्हणुन ते “जाऊ दे आता, काय करणार ?” अशा अर्थाचे हातवारे करत असतात. एके काळी सरकारला फ़ोडुन काढायला हातात घेतलेला ऊस घेऊन ते (वांद्र्यातुन डागलेल्या व इकडे ) गच्चीत येउन पडलेल्या रॊकेट्सचे अवषेश एका बाजुला सारत असतात, उगाच एक विरंगुळा म्हणुन.
बराच वेळ निघुन जातो, अचानक दादुमहाराज एकदम जोशात म्हणतात “चला रे, एक अपॊइन्टमेंट आहे फ़ॊरेनच्या डॊक्टराची, कमीत कमी ही तरी जागा राखली पाहिजे ...“
सगळी सेना (पक्षी : मिलिंद, कार्यकारी संपादक व इतर १-२ गोटातले ) त्यांच्यामागोमाग निघते.

ठरल्या वेळी ते तज्ज्ञांच्या केबिनमध्ये जाऊन बसतात. मधल्या खुर्चीवर दादुमहाराज कपाळावर रुमाल घेऊन, साईडला मिलिंद एका वेळी ३-४ फ़ोनवर “ बोला, मीच साहेब आहे. “ अशी समोरच्याची बोळवण करत, दुसया बाजुला कार्यकारी संपादक उगाच टेबलावर पेपर चाळत व चेहरा वाकडा करत बसतात.

एक गोरा डॊक्टर घाम पुसत समोरच्या खुर्चीवर येऊन बसतो.
“नमस्कार, तुमच्यातले दादुमहाराज कोण?”

(पुढेपुढे करणा-या मिलिंदाला दाबुन ) “नमस्कार, मीच दादुमहाराज”

“वेल, तुम्ही नक्की काय करता?”

“मी लढतो, आय मीन मी खरेतर वैयक्तीक स्वत: लढत नाही तरीपण पडतो.”

“इंटरेस्टिंग, मजेशीर प्रकरण आहे. लढतो ;पण लढत नाही आणि तरीही पडतो. साऊंड्स क्रेझी.
असो, आता आपण मुद्द्याकडे वळु, नक्की काय लढता किंवा नक्की काय लढत नाही तुम्ही, शिवाय तुम्ही पडता ते नक्की कशात ? “

“मी राजकारण खेळतो, निवडणुका लढतो आणि त्यातच पडतो, आय मीन मी स्वत: लढत आणि पडत नाही पण माझा प़क्ष लढतो आणि आमचे उमेदवार पडतात.”

( १ ग्लास पाणी पिऊन ) “ थांबा थांबा, आपण एकेक मुद्दा घेऊ, माझा जरा गोंधळ होतो आहे. तुम्ही राजकारण खेळता; मान्य. निवडणुका लढता आणि त्यात पडता; हे ही मान्य. पण स्वत: लढत नाही आणि स्वत: पडत नाही हे जरा गोंधळाचे असले तरी तुम्ही म्हणता म्हणुन मान्य.
पण आता ह्यात पक्ष आणि उमेदवार कुठुन आले ? जर ते पडणार असतील तर ते पडलेले लोक कुठे आहेत ? मग तुम्ही इथे कसे ?”

“मी त्यांचा नेता आहे, थोडक्यात विरोधी पक्षाचा नेता.”

“ते कशासाठी ? “

“ .... “

“ .... “

“ त्याचं असं काही खास कारण नाही”

“ बरं, तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही एक नेता असुन राजकारण खेळता व तुमच्या नेतॄत्वाखाली तुमच्या पक्षातले लोक निवडणुका लढतात व त्यात पडतात, करेक्ट ? “

“येस्स, यु आर राईट डॊक्टर”

“पण मग आता तुमचे उमेदवार पडतात कशामुळे हा महत्वाचा मुद्दा येतो, त्याबद्दल काही डिटेल्स ? “

( कार्यकारी संपादक एकदम उसळुन ) “ खंजीर खुपसला हो पाठीत मराठी माणसाने, आजच्या युवा पिढीला महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचे महत्व कळत नाही.”

( डॊक्टर एकदम ब्लॆंक होऊन ) “ हे पहा इथे मुद्द्यांचा फ़ारच गोंधळ होतो आहे, खंजीर खुपसणारा मराठी माणुस कोण ? त्याच्यावर पोलीस का ऎक्शन घेत नाहीत ? हे युवा पिढी आणि १०५ हुतात्मे हा मुद्दा काय ? शिवाय हे महाशय कोण ? हे सुद्धा उमेदवार असुन पडले आहेत काय ? “

“ नाही; हे उमेदवार होते पण पडले नव्हते, ते सध्या राज्य .... “

(बोलणे मध्येच तोडत ) “ पुन्हा विसंगत मुद्दा, मगाशी म्हणलात उमेदवार पडतात, आता म्हणत आहात की हे पडले नाहीत ? “

“ अहो ती वेगळी निवडणुक, ही वेगळी. जाऊ दे ते मह्त्वाचे नाही, आपण मुळ मुद्द्याकडे वळु”

( डॊक्टर घाम पुसत ) “ बरं बरं, ठिक आहे. आता आपण एकेक संदर्भ गोळा करु. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ह्या निवडणुकीत तुमच्या पक्षाचे उमेदवार पडले की ज्याचे तुम्ही राजकारणी नेते आहात, करेक्ट ? मग आता ते कुणामुळे पडले ?”

( मिलिंद पटकन ब्लॆकबेरी उघडतो व कार्यकारी संपादक पेपरात डोके खुपसतात. )
(दादुमहाराज उद्वेगाने ) “ अहो तो आहे ना सुपारीमॆन, त्यानेच खोडा घातला.”

“पुन्हा संदर्भहीन मुद्दा. हा सुपारीमॆन कोण ? त्याने नक्की काय केले ? “

“ आधी आमच्यातच होता, एके दिवशी सनकेत राजीनामा देऊन निघुन गेला व स्वत:ची वेगळी चुल मांडली. आता निवड्णुकीत आमच्या विरोधात होता. कॊंग्रेसच्या सांगण्यावरुन त्याने मराठी माणसाची दिशाभुल करुन आमची मते फ़ोडली व आमचे उमेदवार पडले. ”

“ आता ही कॊंग्रेस नावाची व्यक्ती कोण ? “

“अहो तो एक प़क्ष आहे आमच्या विरोधातला. त्यांच्यातल्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ह्या सुपारीमॆनने आमची हक्काची मराठी मते फ़ोडली व कॊंग्रेसला विजय मिळवुन दिला.”

“ मगाशी तर म्हणालात की विरोधीवाल्यांचे नेते तुम्ही आहात म्हणुन ... ”

“ अहो तो मुद्दा वेगळा, ते आमच्या विरोधातले नेते, थोडक्यात ते सत्ताधारी व आम्ही विरोधक”

“ओह्ह, आय सी. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या सुपारीमॆनने तुमची हक्काची मराठी मते फ़ोडली व त्यामुळे कॊंग्रेस जिंकले. पण ही हक्काची मराठी मते तुमच्याकडे पुर्वी असण्यामागे व आता फ़ुटण्यामागे काही खास कारण ?”

“ त्याचं असं काही खास कारण नाही.”

“ खास नसले तरीही काही तरी कारण असावे असा माझे डायग्नॊस्टिक सांगते. असो, आपण ह्यावर जरा सविस्तर बोलु म्हणजे एकेक गोष्टी स्पष्ट होतील.”

“ अहो त्याला बारामतीच्या काकांची फ़ुस आहे व कॊंग्रेसची सुपारी आहे म्हणुन तो आम्हाला नडतो व आमचे उमेदवार पाडतो.”

“ आता हे बारामतीचे काका कोण ? माझा गोंधळ वाढत चालला आहे.”

“ ते महाराष्ट्राच्या राजकारणातले भिष्मपितामह, अख्खे राजकारण ह्यांच्याभोवती फ़िरते. हे इतर वेळी लोकांना सल्ले द्यायचे, आश्वासने द्यायचे व एखाद्याचा गोड बोलुन घात करण्याचे काम करतात. ह्या काकांचे महत्व प्रचंड आहे, त्यांच्याशिवाय इथे पानही हलत नाही.”

“ ओह; आय सी. अजुन एक प्रश्न. २-३ वर्षामागे तुमच्याच भागातला एक तरुण त्याच्यावर काका अन्याय करतात, दुर्लक्ष करतात वगैरे मुळे मानसिक त्रास होतो अशी तक्रार घेऊन आला होता. तो कोण आणि सध्या काय करत असतो ? “

( २ मिनीटांची निरव शांतता, कार्यकारी संपादक उठुन बाहेर जातात, मिलिंद “हॆलो हॆलो” करत कोप-यात जातो, दादुमहाराज अस्वस्थ होतात. )
“ तो मुद्दा वेगळा आहे आणि महत्वाचा तर अजिबातच नाही, ते काका वेगळे आहेत. आपण हा मुद्दा इथेच सोडुन देऊ हेच बरे कारण त्याने केस कॊम्पिकेटेड होईल.”

“ ओह्ह, ओके. हरकत नाही.”

“ हुश्श्श्श्श “

“ ओके ! म्हणजे आता आपण सगळे संदर्भ पुन्हा एकत्र करु, मी त्याची नोट बनवुन घेतो म्हणजे मला ह्या डेटाचे ऎनालिसीस करता येईल. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही एका पक्षाचे राजकारणे नेते आहात तुमचे कार्यकर्ते निवडणुका लढवतात व त्यात पडतात. तुम्ही स्वत: लढत नाही पण तरीही तुमचा पराभव होतो. ह्यामागचे कारण एक सुपारीमॆन असुन त्याला कॊंग्रेसनामक एका पक्षाची सुपारी आहे, ह्या सुपारीमॆनला प्रेरणा आहे ती बारामतीच्या काकांची. तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा त्रास होतो. करेक्ट ? “

“ ऎब्सोल्युटली राईट डॊक्टर, तुम्हाला अगदी व्यवस्थित समजले सगळे काही.”

“ पण ह्यात त्या दुस-या काकांचा व त्या तरुणाचा काहीही संबंध नाही, करेक्ट ? “

“ नाही, गोंधळ होतो आहे. त्या तरुणाचा व ह्या सुपारीमॆनचा संबंध आहे.”

“ हे पहा हे फ़ारच गोंधळाचे होते आहे, मगाशी म्हणालात त्या काकांचा संबंध नाही. आता म्हणत आहात की सुपारीमॆन आणि तो तरुण ह्यांचा संबंध आहे. मग अशावेळी ते काका काय करतात सध्या ? “

“ खास असे काही नाही, पण जाऊ दे ते महत्वाचे नाही. पण तुम्हाला माझी समस्या बरोबर कळाली असे मला वाटते.”

“ एक मिनीट, जरा थांबा ! हे सर्व फ़ारच गोंधळाचे आहे. एक काम करु, मी आता तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींचे व्यवस्थित ऎनालिसीस करतो. आपण उद्या भेटु.”

“ धन्यवाद डॊक्टर, मी उद्या ह्याच वेळी येतो.”

*********************************************************

( दादुमहाराज व त्यांची सेना जाते व डॊक्टर पुढच्या पेशंटला आत बोलावतात.)

“नमस्कार, तुम्ही कोण व काय करता ? "

“नमस्कार, मी विरोधी युतीमधला नंबर २ चा नेता. मी नेहमी निवडणुका लढवतो व जिंकतो, ह्यावेळी लढलो नाही पण हरलो. आमच्या प़क्षाचे उमेदवारही लढले व पडले ...”

( एकदम जोरदार धप्पकन आवाज येतो.)

आतला पेशंट दार उघडुन बाहेर येतो व ओरडतो “ अरे पळा पोट्याहो, हे डॊक्टर बेणं चक्कर येऊन पडुन राहिलं बे. कोणीतरी खायला आणा बे काहितरी.”

त्याबरोबर बाहेर जमलेले इतर हरिदास साठवले, विजय खातु, देवदास कदम, अनिल देशमुख, अजयसिंह कोयते-पाटील असे नेते पळत येतात व एकमेकांना इथे पाहुन चक्रावुन जातात.

- समाप्त -