Thursday, November 27, 2008

शहिदों की चिताओं पर ...


शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले,
वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा"

आज ही पोस्ट लिहीत असताना अजुन "भय इथले संपत नाही" अशीच अवस्था आहे, तिकडे आपले बहादुर जवान व सर्वसामान्य जनता अजुनही ह्या अमानुष, भयंकर, राक्षसी अशा लादलेल्या परकीय दहशतवादाशी प्राणपणाने लढते आहे. च्यायला २४ तास उलटुन गेले तरी अजुन कोणीही अजुन पुर्णपणे "दहशतवाद संपवला" ह्याची हमी द्यायला तयार नाही, हा हल्ला आहे की युद्ध ?

होय, हे एक प्रकारचे "अघोषीत युद्धच" आहे भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर एक ठळठळीतपणे जाणवणारे प्रश्नचिन्ह उभे करणारे. २४ तासांपेक्षासुद्धा जास्त लढा द्यायला ह्यांचाकडे एवढा मोठ्ठा शत्रसंभार आला कुठुन ह्याची मुळापासुन चौकशी व्हायला हवी. काल ऐकले होते की हे हरामी आपल्याबरोबर "सॅकमध्ये शस्त्रे" बरोबर घेऊन आले होते. कसं शक्य आहे ?

सॅकमध्ये मावतील एवढी शस्त्रे घेऊन जर कोणी अख्खी मुंबई, पोलीस यंत्रणा, सेना व खास अशा परिस्थीतीत लढण्याचे प्रशिक्षण दिलेले " नॅशनल सिक्युरीटी गार्ड्स" ह्यांना २४ तासापेक्षा जास्त वेठीस धरु शकतो हे मला तर अशक्य वाटते, ह्यामागे फ़ार मोठ्ठे षडयंत्र असण्याचा आम्हाला संशय आहे.

असो. सेना व जवान आपले काम चोख करत आहेत, सध्या त्यांना पाठिंबा व धीर देणे महत्वाचे, बाकीचा तपास व चौकशी नंतर होऊ शकते ( पण झाली पाहीजे हे नक्की ).सध्या त्याम्चे मनोधर्य विचलीत होईल असे कोणतेही पाऊल आपण उचणार नाही ह्याची दक्षता घ्यायला हवी ....

आत्तापर्यंत १०० हुन अधिक निरापराध सर्वसामान्य नागरीक व ११ पोलीस अधिकारी ह्या हल्ल्यात मरण पावले आहेत, नव्हे "शहिद" झाले आहेत. त्यांच्या बलिदानाची आम्हाला नेहमीच आठवण राहिल, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी अपेक्षा बाळगुयात ....
शहिदों तुम्हे लाख सलाम ...
आता जबाबदारी सर्वांचीच वाढली आहे, सर्वांनी ही गोष्ट आता सिरीअसली घ्यायलाच हवी, सध्या सवंग आणि बेजबाबदार मिडीयाने तर जरुर ...
जाता जाता लतादिदींच्या एका अजरामर गाण्यातला एक तुकडा,
"ऐ मेरे वतन के लोगों ज़रा आँख में भर लो पानी,
जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो कुरबानी"
शिवाय आत्ता आठवलं म्हणुन एक व्हिडिओ सुद्धा, बरेच काही घेण्यासारखे आहे यातुन, पहा ..

बाकी आमच्या हातात लेख लिहणे आणि श्रद्धांजल्या वाहणे ह्याशिवाय अजुन काही तरी काय ?

असो, वेळ येईल एखाद्या दिवशी नक्की ...

ता.क. : हा "लेख" इथे संपला नाही, आज फ़क्त जास्त लिहणे उचीत नाही म्हणुन इति लेखनसीमा. बाकी वाचलेल्या आणि पाहिलेल्या घटनांवर सविस्तर (माझे ) विश्लेषण येत्या काही दिवसात जरुर लिहीन ...

Monday, October 20, 2008

दै. सामना चे आभार ...

ह्या महिन्यात म्हणजे उदाहरणार्थ ९ ऑक्टोंबरला शिवतिर्थावर शिवसेनेचा अतिभव्य व भुतो न भविष्यती असा दसरा सोहळा झाला ...
त्या सोहळ्याचा आनम्द आम्ही इथे जर्मनीत बसुन "स्टार माझा" ह्या वाहिनीवर उदाहरणार्थ इंटरनेटवर ऑनलाईन टेलीकास्ट पाहुन घेतला व तो पाहुन आम्ही धन्य झालो.
मग त्याच भारलेल्या अवस्थेत व तीरमिरीत आम्ही एक "लेख - एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !" खरडुन टाकला व तो "मिसळपाव.कॉम" ह्या आम्च्या जीव की प्राण साईटवर ( व तसेच ह्या ब्लॉगवर ) टाकला, त्यावर भरपुर चर्चाही घडली.

असो। तर ह्यात दै. सामनाचा काय संबंध ?

तर दै। सामना ने ह्या लेखाची व त्यावरील चर्चेची दखल घेऊन आमच्या लेखात आम्ही व्यक्त केलेल्या भावना आहे तश्या त्यांच्या उदाहरणार्थ " १४ ऑक्टोंबरच्या अंकात" प्रसिद्ध केल्या.आम्हाला फार बरे वाटले.

आमचे बाळासाहेबांवर फार प्रेम आहे, हा लेख म्हणजे त्यांना आमची दसर्‍याची भेट म्हणुन फुल ना फुलाची पाकळी होती।सामनाने त्याची दखल घेऊन आमचाही सन्मान केला म्हणुन दै. सामनाचेही आभार !!!

हा मुळ लेख आपल्याला "इथे" पहायला मिळेल ...
दै। सामनाने त्याची घेतलेली "दखल" इथे पाहता येईल ...
मिसळपाव.कॉम वर घडलेली चर्चा व प्रतिक्रीया इथे पाहता येतील ...

धन्यवाद वाचकहो आणि दै. सामना !!!!
तसेच आम्हाला ही संधी उपलब्ध करुन देणार्‍या "स्टार माझा " वाहिनीचेही आभार !!!

Friday, October 10, 2008

एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !


दिवस : रामाच्या रुपाने विश्वातल्या चांगल्या शक्तींनी रावणाच्या रुपातल्या वाईट, अमंगल शक्तींवर विजय मिळवुन आपल्या विजयी सेनेसह भारत भुमध्ये प्रवेश केला तो ... विजयादशमीचा ...
स्थळ : आर्यांचा देश .... जर्मनी !
अजुन विस्तारात सांगायचे म्हटले तर माझ्या आस्थापनाचे कार्यालय ...
वेळ : दुपारी १ वाजल्यानंतर संध्याकाळी ६ पर्यंत ....

आज सकाळपासुनच खुप उत्साहात आहे, आजचा दिवस दसर्‍याचा, सण हा "आनंदाचा, मांगल्याचा, आप्तजनांना शुभेच्छा व आपट्याची पानेरुपी सोने" देण्याचा। अतिशय उत्साहात सर्वांना शुभेच्छा देऊन झाल्या व रुटीन कामाला सुरवात झाली. हे सर्व करत असताना आठवण मात्र घरातल्या धामधुमीची, उत्साहाची व खास मराठमोळ्या डौलात साजर्‍या होणार्‍या दसर्‍याचीच होती।

आज दसरा म्हणजे विजयादशमी, अरे हा तर महत्वाचा दिवस, महाराष्ट्राच्या सन्मानाच्या शिरपेचात मोत्याचा तुरा व महाराष्ट्राच्या समाजकारणातील व राजकारणातील अजुन एक महत्वाची घटना दरवर्षी ह्याच मुहुर्ताला घडते ना? मग आज काही हालचाल आहे का नाही ? तसाच आहे का आजपण सळसळता उत्साह, डौल, सारंजाम व मराठी अभिमानाची शान ? चला, जरा पेपर चाळुयात, पाहु या काही आलयं का त्यात ? का गेल्या काही वर्षांसारखी कुठली तरी नैसर्गीक अथवा मानवी आपत्ती येऊन ही परंपरा खंडीत तर झाली नाही ?

हुश्श ! होणार आहे ह्या वर्षी, पुर्वीपेक्षा मोठ्ठ्या प्रमाणात, जरा जास्तच उत्साहात, डौलात व मुर्तीमंत मराठी टेचात हा सोहळा होणार आहे ...

पेपरात तर भरभरुन येत नाही, आपण कसे वाचले नाही ?

जाऊ दे, आता कुठे पहायला मिळते का ते पाहु , दाखवतील ना कुठेतरी ह्या प्रचंड आंतरजाल विश्वात ...कित्येक प्रसंग आपण लाईव्ह पाहिले आहे, हा जर पहायला मिळाला तर "आजी सोनीयाचा दिन असे अमॄताचा क्षण " हे अनुभवायला मिळेल ...

चायला, २ वाजले की म्हणाजे भारतात चक्क संध्याकाळचे ५,३० !!! छे, सोहळा सुरु झाला असेल, कुठे पहायला मिळेल ? जीवाची नुसती तगमग होत आहे, माहिती नसले तर ठीक होते आता संयम राखणे कठीण आहे।कुठुन तरी लिंक मिळवायला हवीच त्या टेलीकास्टची ....

च्यायला ह्या भैय्या चॅनेल्सचे काहीतरी वेगळेच चालले आहे, सारखी त्या मनमोहन आणि सोनीयाच्या दिल्लीच्या प्रगतीमैदानातल्या "रामलीलेचे क्षणचित्रे" अथवा अन्य काही फुटकळ। च्यायला अजुन एक पोरगं खड्ड्यात पडलं का? झालं आता हे लोक हीच बातमी दाखवणार, मरु दे तिच्यायला, दुसरीकडे पाहु ...

हुश्श्श !!! हुर्रे ....सापडली ,स्टार माझा लिंक मिळाली, ह्यावर आहे लाईव्ह टेलीकास्ट ...
शेवटी स्टार माझा त्याच्या किर्तीला जागला म्हणायचा ....

आयचा घो, साक्षात तोच सोहळा सुरु आहे, आता मरु दे काम , हेच पहात रहावे ....

"एकच दिवस, एकच मैदान, एकच वक्ता, गेले ४३
वर्षेशिवसेनेचा दसरा मेळावा, स्थळ : शिवाजी पार्क ;मुंबई, वक्ता : बाळासाहेब ठाकरे "

अर्रे बापरे, काय गर्दी जमली आहे, किती लोक आले आहेत साहेबांना ऐकायला व त्यांचे विचार ऐकायला, च्यायला कसली ही प्रेरणा व केवढे हे प्रेम ...गर्दीवर नजर ठरत नाही, अक्षरशः लाखांच्या संख्येने लोक येतात भौ , जबरदस्त ...अख्खे मैदान भगव्या रंगात न्हाऊन निघाले आहे, अवघा हिंदुत्वाचा जागर म्हणता येईल ....


काय पाहतो आहे मी, साक्षात "उद्धव ठाकरे" अक्षरशः प्रचंड जनसमुदायाला संबोधीत करत आहेत, थोडा लेटाच झाला साईट उघडायला, आधी कोण कोण बोलले, काय काय बोलले, कुणाला फाडले, काही कळायला मार्ग नाही, असो हे पहात रहावे ....
व्वा, भारी बोलत आहे की उद्धव, ह्याला लोक " संयमी व्यक्ती" म्हणुन बदनाम का करतात ? शोभतो खरा हा "सिंहाचा छावा" , चढ बाप्पु, जबरदस्त ...फारच वाईट मारतो आहे सगळ्यांची, सगळ्या मुद्द्यांचा परामर्ष घेत आहे. वा काय बोलतो आहे "मुंबई आमच्या बापाचीच, मुंबईत येऊन मुंबई कुणाची असे विचारण्याची हिंमत कशी होते कुणाची ?". जबरदस्त, भारी ठोकला, असेच बोलायला पाहिजे, माजलेत हे उपरे. त्याचावर होणार्‍या कमजोरपणाच्या टीकेबद्दल काय बोलतो हा ? दिले ह्याने उत्तर, म्हणे " हिंदुहॄदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी मांजराची पिल्ले नव्हे वाघाचे बछडे जन्माला घातले आहेत. शिवसेनाप्रमुखांची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत, इतर कुणी काळजी करु नये "ये हुई ना बात, जबरदस्त उत्तर दिले. ह्या लोकांच्या भुमीका व त्यामगेचे राजकीय डावपेच गेले चुलीत, दमदार बोलतो आहे नक्की, बाकीच्याशी आपल्याला काय देणेघेणे ?

अरे सगळे हाच बोलतो आहे, "साहेब" येणार आहेत की नाही ? कुठे तशी घोषणाही होताना दिसत नाही ? नक्की काय होणार ?


बेश्ट, उद्धवने भाषण आवरते घेतले व " शिवसेनाप्रमुखांचे शिवतिर्थावर आगमन" ही घोषणा झाली ...
हुर्रे, साहेब आले। लोकांना आशांना त्यांनी ठेच पोहचु दिली नाही ....कुठे आहेत साहेब ? कुठे आहेत ? आता कसे दिसतात ? वय खुप वाढले आहे ? नुसतेच येणार की भाषण पण करणार ?

आले ... आले रे ... साहेब आले रे !!!
"साहेबांना" लिफ्टमधुन स्टेजवर आणण्यात येत आहे, अरेरे बघता बघता वार्धक्याने ह्या सिंहालासुद्धा सोडले नाही। चेहर्‍यावर वय स्पष्ट दिसत आहे ...अनेक संकटे स्वतःच्या निधड्या छातीवर झेलणारे बाळासाहेब आज शिवसैनिकांच्या आधारने पाऊले टाकत आहेत ...आले, स्टेजवर आले ते, आल्याआल्या " मॉंसाहेब, प्रबोधनकार व बिंदुमाधव" च्या प्रतिमांना हार घातला। चांगले आहे, आपल्याला साथ देणार्‍यांचे विस्मरण कधीही न होऊ देणे हे कधीही स्तुतीपरच ...शेवटी समोर आले ते, स्टेजच्या मध्यभागी आले, खरच थकले आहेत आता, त्यांना आधार देऊन खुर्चीवर बसवले व भोवती कोंडाळे आहे ....

सर्व जमाव शांत !!! एकदम चिडीचुप शांतता ...

बाळासाहेब स्वतःच्या ताकतीवर उठले, बाकीच्यांना बाजुला सारुन समोर जमलेल्या विशाल, अगणित जनसमुदायाला नमस्कार केला व खास त्यांच्या स्टाईलीत अभिवादन केले ....




आयला, अंगावर काटा आला हे पाहुन, शेर जरी म्हातारा झाला तरी अजुन आपली चाल नाही विसरला, अजुन तोच कणखरपणा ....

जिओ बाळासाहेब, जिओ ....
जनसमुदायला काय करावे कळेना, प्रचंड जयघोष सुरु " बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद , शिवसेना झिंदाबाद " !!!
उद्धव, मनोहर जोशी आणि इतर गलबलुन गेलेले दिसत आहेत। खुप सोसले साहेबांनी व अजुनही हिंमत नाही हरलेत ...

त्यांना खुर्चीवर बसवुन त्यांच्यापुढे माईक ठेवण्यात आला, साहेबांनी सुरवात केली ....
" इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो .... "

जिंकले !!!! अगदी शब्दश : जिंकले .....
पुढचे सांगण्यात अर्थ नाही, माझी शब्दसंपदा दुबळी पडत चालली आहे, फक्त डोळेभरुन पाहुन घेतले आणि धन्य झालो ....
तसेही सगळे सविस्तर पेपरमध्ये आलेच आहे ...
मला मात्र दसर्‍याची उत्तम भेट मिळाली .... धन्य झालो !!!

डिस्लेमर : हे लिखाण कुठल्याही राजकीय पक्षाचा अथवा नेत्याचा "उदोउदो" करण्यासाठी लिहलेले नाही. मी पाहिलेल्या एका अभुतपुर्व घटनेचे माझ्या अतिक्षुद्र लेखणीतुन हे वर्णन. कसलाही "पक्षसापेक्षत्वाचा आरोप" आम्ही आत्ताच फेटाळतो ...

अवांतर : मी दिलेले "लेखाचे शिर्षक" मला अजुन परफेक्ट वाटत नाही. जोग्य व समर्पक शिर्षक सुचविल्यास आपला मी आभारी राहिन. धन्यवाद !!!

Wednesday, October 8, 2008

कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!



बघता बघता "Germany" ला येऊन २ आठवडे झाले. सगळा वेळ सेटलमेंटमध्येच गेला. भारतातुन निघायच्या १ आठवडा आधी व इथे आल्यावर पहिला आठवडा फ़ार जोशात गेला।
नविन जागा, नवा देश, नवी भाषा, नवी संस्कॄती व राहणीमान आणि विचारसारणी व सगळ्यात महत्वाचे म्हणजे "नवे ऑफीस ". फारच फरक पडला या सर्व गोष्टीत, त्यामुळे मनात एक सुप्त आकर्षण, एक दडपण, एक उत्साह व तेवढाच नव्हर्सनेस अशा भावनांनी पार डोक्यात गोंधळ उडाला होता.
असो. त्याबद्दल पुन्हा सवडीने, आज मुख्य मुद्दा आहे ते "ऑफीस कल्चरचा" !!!

आता तसे पहायला गेले तर "बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयात" काम करण्याचा अनुभव हा आयुष्यात प्रथमच असा काही भाग नव्ह्ता, तिकडेही करतच होतोच की.पण इकडे सर्व वेगळे आहे, ह्याला मी म्हणेन "बहुराष्ट्रीय कंपनीचे परफेक्ट कार्यालय" ....
मस्त वाटले इथले वातावरण, या एकदम झकपक व चकचकीत वातावरणात राहताना आपला आपलीच ऐट बघुन आतुन आनंदाच्या उकळ्या फ़ुटत आहेत. आल्यावर पहिल्या दिवशी जी "Formal Welcome Ceremony " होती ती झाल्यावर ५ मिनीटे काहीच सुचेना, अरे एवढी कसली "Formality व Descency", आम्हाला नाही बाबा सवय असल्या गोष्टींची।

स्वाभावीकच मग मन प्रत्यक्षात अनुभवलेल्या व काहीच्या बोलण्या, लिहण्यातुन ओळख झालेल्या "देशी कचेरी उर्फ़ भाऊसाहेबांचे हापीस" यांचा विचार करु लागले ...
[ काळजी नका करु, कंपनीच्या कार्यालयीन वेळात नाही, अशाच निवांत वेळात हो. नाहीतर लगेच आम्हाला "नानु सारंजामे" ठरवुन मोकळे व्हाल. ]

मग माझ्या डोळ्यासमोर आपल्या "जुन्या देशी कचेरी" चे कल्पनाचित्र आले. आता "कचेरी" ह्याचा अर्थ येथे साधारणता "सरकारी कचेरी वा एखाद्या देशी कंपनीची कार्यालये" ह्या अर्थाने घ्यावा. म्हणजे तेथील वातावरण, काम करण्याची पद्धत, त्याची भाषा, तेथील काम करणारी मंडळी, त्यांचे वागणे, पेहराव व बोलचाल आठवले. नकळतच मी त्याची तुलना जराशी सध्याच्या "Corporate Office " शी करुन बघीतली. मला स्वत:शीच प्रचंड हसु आले एवढा प्रचंड फरक आहे त्यांच्यातनक्की काय फ़रक आहे ते एकामागे एक पाहु....

जुन्या कचेरीत प्रवेश करायच्या आधीच त्या इमारतीकडे एकदा पहा, ती जर अगदी जुन्या छापाची इमारत अगदी लाल कौलासह, बाहेर सायकली व मोटारींची ही गर्दी यातुन वाट काढत आत प्रवेश केल्याकेल्या समोर काही दिसु नये याची काळजी घेणारा अंधार, जागोजागी केलेले तंबाखु व पानाच्या पिचकाऱ्यांची नक्षी, दिशाभुल करणाऱ्या पाट्या [असतील तर] , जिन्याच्या मोडलेल्या पायऱ्या, मोडलेल्या फरश्या, बगलेत फ़ायले मारुन कुणाकडेही ढुंकुनही न पाहता पळापळ करणारे कारकुन, जिन्यात साहेब्याच्या पट्टेवाल्यापाशी वशिला लावण्यासाठी त्याच्याभोवती कोंडाळे केलेली सर्वसामान्य जनता असा जर सारंजाम असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहचला आहात हे समजायला हरकत नाही. ही झाली टिपीकल जुन्या कचेऱ्यांची मांडणी....

आता तसे नाही, आतांची ऑफीसे फार लांबुन ओळखु येतात कारण त्याच्या अलिकडे ५ किमी. पासुन "XYZ 5 Km ahead" अशा पाट्या लावतात. त्यामुळे ती जुनी "ओ पाव्हनं, ते येमीशीबी हापीस कुठशीक येतं हो?" या प्रश्नाची व त्याला "जावा की डाव्या अंगानं फर्लांगभर, चौकातनं मारा राईट टर्न, फुड गेल्यावर २० पावलात आलच की हापीस" अशा उत्तरांची मजा नाही. नव्या "Offices" ती डोळे दिपावणारी उंच इमारत, ती काचांची रेलचेल, ते गालीचे, बाहेर बाग व अनेक फुलांची झाडे हे पाहुन एखाद्या जुन्या "कचेरी कारकुना" ला भडभडुन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आत गेल्यावर [म्हणजे तुमच्याकडे परवानगी असेल तर, अन्यथा शक्यच नाही] ते मार्बलचे फ़्लोअर, ते अख्खी टाच रुतेल एवढा गालीचा, ती भिंतीवर लावलेली अगम्य चित्रे व कसे वागावे याचे आदेश देणाऱ्या पाट्या व त्या ही ६-६ भाषेत, छोटे छोटे फुलांचे गुच्छ, शिस्तीत लाऊन ठेवलेली वर्तमानपत्रे, टापटीप पोषाखात वावरणारे एंप्लोयी, सळसळ करीत पळणाऱ्या काचेच्या लिफ्ट्स, आलेल्या अभ्यांगतासाठी मांडलेल्या खुर्च्या [ हे एक आश्चर्यच, नाहीतर जुन्या कचेऱ्यात असले लाड नव्हते.] असा जर नजारा दिसला तर तुम्ही एका "आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट ऑफ़ीसात" आला आहात हे नक्की।

जुन्या कचेरीत प्रवेश करतानाच तुमच्या चेहऱ्यावर एका आगंतुकाची भावना आपसुकच येते, कारण ते वातावरण व आत्तापर्यंत न्य़ात असालेली ऐकीव माहिती. शिवाय आत गेल्या गेल्या "काय पाहिजे ? कोण पाहिजे ? काय काम आहे ? कुणी पाठवले ? परवाना हाय का ? ओ तिकडे नका जाऊ ? आधी बाहेर व्हा. " असा प्रश्नांची सरबत्ती झाली नाही [ कुणी जर तुमच्याकडे लक्ष दिले तर ] तर तुम्ही नशिबवान आहात असे समजायला हरकत नाही . आत गेल्यागेल्या आलेला माणुस गोंधळुन, घाबरुन, बावरुन गेला पाहिजे हा ह्या कचेऱ्यांचा "अलिखीत कायदा" व बाकीचे कायदे नाही पाळले तरी ह्याचे पालन मात्र एकदम इमानाने होते.

आता असे नाही, गेल्यागेल्या [ बहुतेकठिकाणी ] तुमचे स्वागत होते, जर तुम्ही आमंत्रित असाल तर तुम्हाला "Welcome" करायला कोणीतरी गेटवरच हजर असते. जर तुम्ही नवे असाल तर त्या रिसेप्शनवर बसलेली सुंदर, मनमोहक कन्यका "Yes Sir, What can i do for you ? May I help you " अशा प्रश्नोत्तरे होऊन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाते. थोडक्यात तुमचा "कार्यालयाच्या अंतर्भागापर्यंत" चा प्रवास सुखकर होतो. आधीच्या काळात म्हणे लोक या गोष्टींसाठी नवस वगैरे बोलत, व्रतवैकल्य करत आणि ती कचेरी जर पुण्यातील असेल तर मात्र तुमच्या मागे मागच्या "शतजन्माचे पुण्य" पाहिजे, नाहीतर मामला बिकट आहे।

बाकीच्या गोष्टी जाउ दे, आता आपण कार्यालयाच्या आत व्यवहार कसा होतो हे पाहु. मी शक्यतो आतल्या कर्मचारी वर्गाच्या कामाशी संमंधीत संभाषणाबद्दल लिहतो आहे. आता "साहेब व त्याचा पट्टेवाला" ह्या दोन्ही गोष्टी कालबाह्य झाल्याने त्यांच्याशी संमंधीत गोष्टीच्या मजेला आपण मुकलो आहोत.
पुर्वीच्या काळी जर काही कारणामुळे कुणाला कचेरीत पोहचायला उशीर झाला व ते "हजेरी रजिस्टर" साहेबाच्या टेबलावर गेले असेल तर बिचाऱ्याचा जीव अर्धा होऊन जायचा. सामान्यत: हे कर्मचारी मध्यमवर्गीय व बहुसंख्य चाळीत राहणारे असल्याने त्यांना "पाणी उशीरा आले, दुध नासले, गॅस संपला, ट्राम निघुन गेली, पोराला शाळेत सोडायला गेले, सकाळी देवळात गेल्यावर तेथील गर्दी" अशा कारणामुळे उशीर होत. यामुळे कचेरीत उशीरा पोहचल्यावर व साहेबाने ते पाहिल्यावर त्या बिचाऱ्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकत, एक तर ठरलेला "हाफ डे" व वरुन साहेबाची "कंपनी काय घरची समजलात का ? मी किती वेळा गप्प बसायचं ? पुढच्यावेळी मेमो देईन" वगैरे बोलणी....

आता तसे नाही, मुळात एंप्लॉयी आता "फ्लॅट" मध्ये रहात असल्याने त्यांचे प्रॉब्लेम्स जरा वेगळे असतात, म्हणजे "ट्रॅफ़ीक जाम, कार पंक्चर, कालचा ओव्हरहॅंग, वाईफबरोबर सकाळ सकाळ भांडण" वगैरे वगैरे. पण फरक असा की तो ह्या उशीराची मुळीच काळजी करत नाही. तो आपल्या मुडप्रमाणे ऑफ़ीसात पोहचतो. जर साहेबाने पाहिले व त्याने विचारले तरी ह्याला त्याचे काहीच "भ्या" नसते. उलट साहेबाकडुनच एखादी "हॅंगओव्हर लवकर कसा उतरवावा" याबद्दल टीप मि्ळण्याचे चान्सेस असतात.आता "लेटमार्क / हाफ़ डे" अशा गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत.

आधी जर काही काम जास्त पेंडिंग पडले तर साहेब त्या कारकुनाला सगळ्या जनतेसमोर "काय रे, काम कोण तुझा बाप करणार का ? चल पटपट उरक, नुसते नाचुन दाखवुन दाखवुन नकोस. माजलेत साले, काम करायला नको, नुसत्या पाट्या टाकायला येतात भाडे" अशा शब्दात "झाडत". आता मुळात कल्चरच बदलल्याने तो "कडकपणा" गेला. आता फ़क्त एक "Urgency Mail" येतो व परिस्थीती हाताबाहेर चालली तर बॉस त्याला "केबीनमध्ये" बोलावुन "See, we are already running out of deadline. You have to work hard.You know meeting deadlines is very important for our corporate image. We don't have any other option than to work for overnights" असे साध्या शब्दात समजावतो.
जुन्या काळी असा प्रसंग घडल्यावर तो अभागी कारकुन आपला साहेब निघुन गेल्याची खात्री करुन जमलेल्या बघ्या सहकाऱ्यांसमोर उसन्या आवसानाने " साला आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही, समजलात काय ? साहेब असेल तो त्याच्या घरी, इथं आमच्याशी गाठ आहे म्हणावं. कायस्थाचं रक्त आहे, एकवेळ शीर तोडुन देऊ पण इमानाला बोल लावलेला ऐकुन घेणार नाही" अशी सफ़ाई देत पण हे बोलताना साहेब कुठे जवळपास नाही ना याची खात्री आपल्या तिरक्या नजरेने करुन घेत. बाकीचे सहकारी पण मग " जाउ दे वसंतराव, ८ दिवसाचा पाव्हणा आहे. आपल्याला सायबाचेसगळे छक्केपंजे माहित आहेत. चला, चहा घेऊ, थोडे डोके शांत होईल" अशी मांडवली करत. आताच्या वातावरणात असे प्रसंग घडणेच शक्य नाही. जर असा प्रसंग घडलाच तर तो "एंप्लॉयी" जागेवर त्या साहेबाच्या तोंडावर राजीनामा फेकेल वा उलट साहेबालाच डोस देईल "You are crossing limits. This is not way to behave." वगैरे वगैरे।

पुर्वी कचेऱ्यांना सध्याच्या काळासारखे "Client" वगैरे असा प्रकार नसायचा त्यामुळे तिथला "साहेबच" तिथला सर्वेसर्वा. तो म्हणेल ती पुर्व दिशा. अशा परिस्थीत जर कोणी त्याच्याकडे कामाच्या "अर्जंट" असण्याची व ते लवकर करण्याची बोलणी करायला गेले तर संवाद असा घडायचा, " अरे लवकर करा म्हणजे, आम्ही काय इथे माश्या मारतोय का ? मला सांगणारा तो कोण टिकोजीराव लागुन गेला ? मला काय त्याच्या बापाचा नौकर समजला काय ? चल हकाल गाडी, जेव्हा होईल तेव्हा सांगु.". मग तो बिचारा आपला मान खाली घालुन निघुन जायचा. हा किस्सा कचेरीतल्या बाकीच्यांना ८ दिवस पुरे, मग साहेबाने त्याची कशी "बिनपाण्याने केली" ह्यावर अनेक परिसंवाद घडत....

आज परिस्थीती अशी नाही, आज "Client" म्हणजे भगवान, तोच सर्वेसर्वा, आपला मायबाप. त्याचा "मेल" आला रे आला, आपला बॉस एकदम गडबडुन जातो, मग टीम मिटिम्ग काय, डिस्कशन काय, प्रोजेक्ट प्लानिंग काय नाही नाही ते चालते. तिकडे तो एकदा मेल टाकुन पुन्हा आपल्या विश्वात गुंग, इकडे काय रण पेटले आहे ह्याची त्याला काही खबर नसते. मग इथुन त्याला एक अर्जवीचा व आपल्या कामसुपणाची खात्री देणारा एक मेल पाठवला की आपल्या बॉसचा जीव भांड्यात पडतो, तोवर त्याला जेवायची शुद्ध नसते. त्या मेलचा मसुदा साधरणता असा असतो "We are working overnights to meet your deadline. Our most efficient resourses are working on this project. We will come back to you very soon with positive result. We really appreciate your patience.". बघा काळ कसा बदलला आहे ते, जुन्या काळच्या "मी काय त्याच्या बापाचा नौकर नाही" ह्या दमदार वाक्याची जागा "We really appreciate your patience" सारख्या पुचाट वाक्याने घेतली आहे.

आता एखाद्याला जर त्याच्या सध्याच्या कामाचे स्वरुप, त्याचा मोबदला, त्याची पोसीशन पसंत पडले नाही वा त्याच्या कंपनीकडुन अजुन काही अपेक्षा असतील तर तो डायरेक्ट बॉसशी बोलु शकतो. किंबहुना त्याच्यासाठी खास " H R Department" बनवले आहे. तिथे तो बिनधास्त आपले म्हणणे मांडु शकतो. त्यातुनही काही मार्ग निघाला नाही तर तो "पेपर टाकुन" लगेच निघुन जाऊ शकतो कारण सध्या उपलब्ध असलेल्या अनेक संधी. पुर्वी असे नसायचे, मुळात संधीच कमी त्यामुळे माणसे एकदा चिकटली की मग त्यापुढे "ठेविले तैसेची रहावे" ह्या तत्वानुसार वागत, फ़ार त्यांची तक्रार नसे....
त्यातुन कुणी तक्रार घेऊन साहेबाकडे [ हो, त्या काळी HR वगैरे असे लाड नव्हते ] गेलेच तर मग "जंगी खडाजंगी" ठरलेलीच. त्यावेळाच संवाद साधारणता असा ...

" साहेब एक विनंती आहे, २ मिनीटे बोलु का ?"
" बोल लवकर, मला वेळ नाही. काम सोडुन हे नस्ते धंदे ?"
" साहेब, ते जरा मला थोडी ......"
" हे बघ, रजा वगैरे काही मिळणार नाही. इथं कामाचा ढीग पडला आहे आणि तुम्ही हिंडा लेको सुट्ट्या घेऊन चैनी करत"
" रजा नाही साहेब, ते जरा पगारवाढीचे बोलायचे होते"
" कशासाठी रे पगारवाढ ? असे काय दिवे लावले आहेत ? नुसत्या पाट्या टाकता लेको आणि म्हणे पगारवाढ पाहिजे"
" साहेब घरखर्च परवडत नाही, महागाई ....."
नसती कारणे देऊ नकोस, काही पगारवाढ नाही आणि काही नाही, पळ कामे कर"
" साहेब, पोरगा झालाय, त्याच्या दुधा-औषधाचा खर्चाचा मेळ बसत नाही"
" बरं बरं, मी बोलतो हेड-डिपार्टमेंटशी, जा आता काम कर"
" धन्यवाद साहेब, तेवढे बघा नक्की, फ़ार ओढाताण होत आहे सध्या ..."
"........."
"........."
"........."

एवढ्यावर संवाद संपुन हिरमुसल्या चेहऱ्याने तो कारकुन परत जागी येऊन कामाला लागत असे व "पगारवाढीची व घरखर्चाची चिंता" करीत असे. मधल्या सुट्टीत साहेब स्वत: त्याच्या टेबलजवळ येऊन आपुलकीने खांद्यावर हात ठेऊन " हे पहा बंडोपंत, मी बोललो आहे, १०० रुपये मिळेल ह्या महिन्यापासुन. पोराची काळजी घ्या. त्याच्यासाठी गाईचे दुध लावा, तब्येतीला चांगले असते लहान पोराच्या. बाकी काही लागले तर सांगा. " असा आपुलकीचा सल्ला देऊन जात असे. त्यावर तो गेल्यावर "बंडोपंत" आपले डोळे बाहीने पुसत " साला बोलतो फ़डाफ़ड पण माणुसकी आहे त्याच्यात अजुन" म्हणुन सहकाऱ्यांना आपल्या साहेबाच्या "चांगुलपणाचा दाखला" देत।
आत्ताच्या कॉर्पोरेट विश्वास ह्या "माणुसकी व चांगुलपणाच्या पर्सनल रिलेशन्सला" स्थान नाही, तेथे फक्त आहेत "फॉर्मल रिलेशन्स"।

जास्त पाल्हाळ जाऊ दे, थोडक्यात पाहु....

लोक पुर्वीही कामं करायची, आताही करतात पण कामाची एक "Effiecient Work Policy" आली आहे. त्यामुळे कामाचा जास्त बाऊ होत नाही. पुर्वी सर्व गोष्टी ह्या आपपसातील संबंध व जुळवुन घेण्याच्या पद्ध्तीने चालत असल्याने एखाद्या चुकीचे खापर हे एखाद्या "गरिब कारकुनावर" फुटायचे व त्या बिचा-याची २ वर्षे वगैरे इंक्रीमेंट्स थांबायची, तिकडे साहेब मात्र नामानिराळा.
आज तसे नाही, इथे प्रत्येक गोष्टीचे एक कायमस्वरुपी रेकॉर्ड ठेवले जाते, जे काय आहे ते लिखीत स्वरुपात " ई-मेल" मधुन पाठवले जाते त्यामुळे जबाबदारी ढकलता येत नाही.एखाद्या मोठ्ठ्या चुकीबद्दल जशी इंजीनीअरवर आफत येते तसा डायरेक्ट " सी ई ओ" सुद्धा फायर होऊ शकतो, यामुळे कामात एक "सुसुत्रता व परफेक्शन" आले आहे.आजकाल कंपनी कर्मचा-यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्याही आरोग्याची काळजी घेते, पुर्वीही हे असायचे पण आज "माणसाला" जास्त किंमत आली आहे. त्यामुळे कर्मचा-यांचे आयुष्य नाही म्हटले तरी ब-यापैकी सुखाचे झाले आहे।
पुर्वी मुळात कमी पगार असल्याने कर्मचा-याची कुटुंब चालवताना खुप ओढाताण वगैरे व्हायची, त्यात बाहेर दुस-या संधीही उपलब्ध नसायच्या त्यामुळे आजची आमच्या वडीलांच्या वयाची पिढी एकाच ठिकाणी मरमर काम करुन पिचुन गेलेली दिसते।
आज तसे नाही, जागतीकीकरणामुळे कर्मचा-यांचे उत्पन्न वाढले आहे, तशा गरजाही वाढल्या आहेत म्हणा पण बाहेर अनेक संधी उपलब्ध असल्याने म्हणावे अशी "लागत नाही". जीवनपद्धती सुधारली, त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी मिळतील व ती ही शिकुन चांगल्या पदाला पोहचतील. पुर्वी ह्या गोष्टीसाठी अतोनात कष्ट व्हायचे, आज ह्या गोष्टी खुपच नसल्या तरी ब-यापैकी सुकर आहेत.

हे सर्व झाले फ़ायदे, परंतु काही अनिष्ट गोष्टीही आल्या ....
सगळीकडेच स्वत:च्या उत्कर्षासाठी जीवघेणी व गळेकापु स्पर्धा सुरु झाल्याने आजकाल कर्मचा-याचे मानसीक स्वास्थ म्हणावे एवढे स्थीर नाही. नेहमीच माणुस कसल्या ना कसल्या धांधलीत राहतो. आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ...पैसा जरी मिळत असला तरी या एक्स्ट्रा मनी साठी आजकाल ऑफीसमध्ये उशीरापर्यंत थांबणे ओघानेच येते आणि ह्यात त्याच्या "कौटुंबिक जीवनाचा" नेहमीच बळी पडतो.आपल्या मुलाबाळांबरोबर २ दिवस निवांत घालवायला त्याला ६ महिने आधीच प्लानिंग सुरु करावे लागते, प्रमुख तोटा म्हणजे ह्या लाईफ ने त्यांच्या वयोवॄद्ध आईवडीलांना ह्यांच्यापासुन दुर केले.आम्ही असतो इथे मस्त टेचात रहात पण तिकडे आमचे आईवडील "लेकरु कधी ८ दिवस निवांत गावाकडल्या घरात राहिल" ह्याची वाट बघत असतात आणि हो; फक्त वाटच बघत राहतात.कारण हे "कॉर्पोरेट कल्चर" त्याला एवढाही वेळ मिळु देत नाही.

थोडक्यात काय तर "हा ही टेन्शन मुळे सदैव काळजीत, भेट होत नसल्याने बायका-मुले नाराज व आईवडीलांचे काळीज तुटण्याला तर माझाकडे उपमाच नाही" ...
त्याच्या "सामाजीक जीवनाची" तर ऑलरेडी वाजलीच असते पण वेळ न मिळाल्याने नातेवाईकांच्या, आप्तांच्या समारंभाला न जाउ शकल्याने ती ही नाराज. याला सर्व कळते हो, अगदी तो काही अंध किंवा निष्ठुर नाही पण सध्यातरी ह्या प्रश्नांचे त्याच्याकडे उत्तर नाही. हे असेच चालायचे. मग कधीतरी त्याला ह्या सर्व दु:खाचां ताण असह्य होऊन तो एकटाच बेडरुममध्ये "हसमसुन रडुन" घेतो कारण तो ही एक माणुसच ना. पण ही गोष्ट त्याला उघडपणे बोलता येत नाही कारण त्याच्या असलेल्या "वरिष्ठ पदाचा व इमेज" चा बोजा, मग तो आतुनच जळत राहतो. आण असह्य झाल्याने लहान वयातच "हॄदयविकार व रक्तदाबाची" उदाहरणे कमी नाहीत, इनफ़ॅक्ट आता पेपरातुन "तिशीच्या यशस्वी युवकांच्या आत्महत्येच्या बातम्या" ही वाचायला मिळु लागल्या आहेत. फक्त ह्या बाबतीत अजुन सुधारणा हवी असे मनापासुन वाटते.

बाकी ह्या "कॉर्पोरेट लाईफ़ने" खुप काही दिले आम्हाला, अजुनही देतेच आहे फक्त आमच्या कुटुंबियांबरोबर मनोसोक्त वेळ घालवण्याचे स्वातंत्र्य जर मिळाले तर " जगी सर्व सुखी असा कोण आहे ?" ह्या प्रश्नाचे उत्तर मी मोठ्ठ्याने ओरडुन मनापासुन " मी आहे !!! " असे देईन।

असे म्हणातात की काही मार्ग तुम्हाला खुप काही देतील, सुख व दु:ख दोन्हीही, पण त्या मार्गावर जायचा "एक दरवाजा" असेल पण परत यायला "दरवाजाच नसेल" तर ???

तो मार्ग ह्या "कॉर्पोरेट लाईफचा" तर नाही ना ????

Wednesday, August 27, 2008

सिंग इज किंग : शुद्ध व निखळ मनोरंजन नव्हे तर "फसवणुक" !!!


.
समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे. दिवसेंदिवस रटाळ, टाकाऊ, बोगस, बेचव अन्नपदार्थ तुमच्या नशिबी येत आहेत, त्यामुळे जिभेला व मनाला एक प्रकारची बाभळी आली आहे.

त्यात आशेचा किरण म्हणजे गेले काही दिवस एका "प्रसिद्ध हॉटेल" कडुन "लज्जतदार, चवदार व जिभेचे पांग " फेडु शकणार्‍या एका भुतोनभविष्यती अशा "फुडफेस्टीवलची जाहिरात" पेपरातुन प्रसिद्ध होत असते. तुम्ही दररोज त्याची चवदार वर्णने पेपरातुन वाचत असता, त्या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे खास झणझणीत पंजाबी स्टाईलचे, मराठमोठ्या साजाचे, मसालेदार मोगलाई पद्धतीचे, चायनीज चस्क्याचे व गुजराती मधुरपणाचे अनेक उत्तमोत्तम पदार्थ येथे तुमचे चोचले पुरवण्यासाठी उपलब्ध असणार आहेत। तुमच्या नजरेत एक वेगळीच चमक येते, मनाला एक उत्साह वाटु लागतो, शरिराला एक तरतरी येते व तुम्ही त्या "खाद्यमहोत्सवात " आपले सीट बुक करण्यासाठी धाव घेता, तुमच्या समव्यसनी मित्रांना पण तुम्ही पटवता व तुमच्या भाग्याने तुम्हाला बुकिंग मिळते सुद्धा. तुम्ही छाती वीतभर जास्तच फुगवुन त्या "बुकिंगची" आपल्या मित्रपरीवारात व इतर ओळखीच्या लोकात जाहीरात करता। काही लोक तुमच्याकडे "तुमची काय बाबा ऐश आहे, आमचे एवढे भाग्य कुठले " असे आसुयेचे उद्गार काढुन त्यांच्या दुर्भाग्याची हळहळ व्यक्त करतात तर काही जाणकार लोक "त्यात काय दम नसतो बाबा, आपली घरची मीठभाकरी बरी" असा निराशेचा सुर काढतात। पण तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रीयेकडे लक्ष द्यायला वेळ नसतो व तुम्ही त्या मानसीक स्थीतीतही नसता. आता तुमच्या रक्तात त्या "खाद्यमहोत्सवाचे खुन सवार झाले असते" व डोक्यात त्याची नशा चढलेली असते.

मग तो सुदीन उजाडतो, तुम्ही अतिशय उत्साहाने त्या "कार्यक्रमस्थळी" जाता. वातावरण एकदम भारलेले आहे. आधी जाहीरात केल्याप्रमाणे सर्व पदार्थांची रेलचेल आहे. अनेक प्रतिष्ठीत व मोठ्ठी मंडळी जेवणासाठी रांगा लाऊन शिस्तीत उभी आहेत. तुमचाही नंबर येतो, तुम्ही तुमच्या जागेवर बसता व तोंडाला पाणी सुतलेल्या अवस्थेत आपल्या समोर डिश येण्याची वाट पाहता. शेवटी तो "सोनीयाचा क्षण" येतो, राजेशाही पोशाख केलेले वाढपी तुमच्यासमोर झाकलेली "सो कॉल्ड लज्जतदार डिश " आणुन ठेवतो। तुम्ही आधाशीपणाने त्याचे झाकण काढुन फेकता व वखवखलेल्या नजरेने त्या डिशकडे पाहता ....

पण हाय रे कर्मा ऽऽऽऽऽ

त्या गाढवांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे अन्नपदार्थ एकाच ताटात वाढण्याचा मुर्खपणा केल्याने त्याच्या चवीचा पार बँड वाजला असतो. सरमिसळ झाल्याने त्याची वेगळी चव अशी लागत नाहीच. जाहीरात केल्याप्रमाणे झणझणीत पंजाबी स्टाईलचे, मराठमोठ्या साजाचे, मसलेदार मोगलाई पद्धतीचे, चायनीज चस्क्याचे व गुजराती मधुरपणाचे अनेक उत्तमोत्तम पदार्थ खरेच तेथे असतात पण त्यांची सरमिसळ झाल्याने तुमचा अपेक्षाभंग होतो. तुम्ही पट्टीचे खाणारे असल्याने असल्या "भेसळीची" तुम्हाला सवय नसते त्यामुळे " श्रीखंड, चायनीज मंचुरीअन, पंजाबी पराठा व तंदुरी चिकन, खमणठोकणा, मटनाचा तांबडा रस्सा, हक्का न्युडल्स, वांग्याचे भरीत" असे उत्तमोत्तम पदार्थ एकाच बैठकीत एकाच ताटात व एकाच वेळी खाण्यास तुमचा तात्वीक विरोध असतो। खल्लास ऽऽऽऽऽ . तुमच्या मुडचा पार बोर्‍या वाजला असतो, आता भरल्या ताटावरुन उठण्यास तुमची तयारी नसते कारण "मोजलेले बक्कळ पैसे व जनलज्जा", त्यामुळे तुम्ही कशीबशी डिश संपवता व आयोजकांना शिव्या देत बाहेर पडता. त्याच तीरमिरीत आयुष्यात पुन्हा कधी असल्या कार्यक्रमाला जाण्याची [ व न पाळली जाणारी ] शप्पथ तुम्ही घेता. त्यानंतर ह्या अनुभवानंतर मित्रात झालेले तुमचे हसे वेगळेच ...एकंदरीत खिशाला चाट बसवणारा व मनोसोक्त मनस्ताप देणारा हा अनुभव ठरतो ...

नक्की चुक कोठे झाली ?
तुमच्या साईडने तर तुम्ही अगदी अचुक आहात, मग नक्की बिघडले काय ?
ह्याचे उत्तर आहे "कुटलीही पुर्वचौकशी न करता अन्नपदार्थावर भुलुन आयोजकांवर ठेवलेला अंधविश्वास" ....
ह्याला काही उत्तर नसते तुमच्याकडे कारण हा तर तुमचा "वीक पॉईंट" !!!

नेमके हेच "सिंग इज किंग" नामक सध्या "सो कॉल्ड गाजत असलेल्या व यशाचे अनेक विक्रम उद्धवस्त " करणार्‍या चित्रपटाबाबत घडते। त्यातल्या कलाकारांच्या पुर्वपुण्याईला भुलुन व प्रचंड जाहीरात होत असलेल्याने व त्यात दाखवलेल्या दॄष्यांना भुलुन तुम्ही पदरमोड करुन पिक्चरला जाता हीच ती "घोडचुक" ...

आता थोडेसे स्टोरी बद्दल, मुळात सगळ्यात मोठ्ठी बोंबाबोम्ब इथेच असल्याने मी काय लिहणार हा प्रश्न आहे।तरीपण जनरीती प्रमाणे काही तरी लिहावेच लागेल ...

तर त्याचे असे आहे की चित्रपटाचा नायक "हॅप्पी सिंग [ अक्षयकुमार ] " पंजाबातल्या एका कुठल्याश्या खेड्यात रहात असतो. तो लहानपणापासुनच थोडासा अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश, लाडोबा व तरीही इतरांच्या मदतीला धावून जाणारा, गावकऱ्यांच्या खोड्या करणारा काहीसा साधाभोळा, थोडास बनेल, मोकळा ढाकळा शीख तरुण आहे. आता एवढ्या भुमीका तो एकाच वेळी कशा सांभाळतो हा एक प्रश्न आपल्याला पडतो पण दिग्ददर्शक असल्या मुलभुत भावनेतुन दुर जाऊन अतिशय उच्च पदाला पोहचल्याने त्यांना हा प्रश्न पडला नसावा. त्याचा एक मित्र "रंगीला [ ओम पुरी ] ", हा हॅप्पी पेक्षा किंचीत कमी पण तसाच अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश. ह्या दोघांनी आपला " महान कॄत्यांनी" गावकर्‍यांना पुरते हैराण केले असते व ते बिचारे हतबल झाले असतात। पण मुळात हे दोघे "लाडोबा" असल्याने त्यांना कुणी समजावुन सांगण्याचा वा समज देण्याचे दुष्कॄत्य करत नाही व ह्यांचे चाळे चालु राहतात. ह्यांच्या हाताला काम व डोक्याला ताण नसल्याने ह्यांना अनेक अफाट कल्पना सुचत असतात, त्यातल्या एका प्रसंगात हॅप्पी सिंग एक कोंबडी पकडण्यासाठी निम्मे गाव खाली झोपवतो व त्यांच्या नुकसानीची पर्वा न करता " कोंबडी पकडली की नाही" असा आव आणुन ताठ मानेने फिरक असतो. गावकरी ह्यांना काहीतरी कारण काढुन गावाबाहेर हकलुन देण्याच्या संधीच्या शोधात असतात. त्यच्यामध्ये ह्यांचे चाळे चालुच असतात व इकडे आपली कवटी सरकत असते. कारण कुठल्याही अंगविक्षेपाला वा पाचकणाला पोट धरुन हासायला आपण काही युपी/बिहारचे भैय्या प्रेक्षक किंवा नवज्योतसिंग सिद्धु नसतो.असो.

त्याच्यादरम्यानच त्यांच्यांच गावचा एक सुपुत्र "लकी सिंग [ सोनु सुद - चांगला कलाकार आहे बिचारा ] " हा ऑस्ट्रेलियात जाऊन डॉन बनला असतो व त्याचे तिकडे ११ भाई गँग्स व ११ देशातल्या पोलीसांशी चांगलेच वाजले असते। त्यातुनच त्याच्यावर एक "खुनी हल्ला" होतो, तो जखमी होतो, ती खबर एकडे पंजाबातल्या गावात येते, त्याचे वडील आजारी पडतात व लकीला परत आणा असा हट्ट धरतात. गावकर्‍यांनी ही चांगली संधी वाटते, ते "हॅपी व रंगीला" यांना ह्या कामगिरीवर पाठवतात व आयुष्यात कधीही गावाची वेस न ओलांडलेले दोघे डायरेक्ट ऑस्ट्रेलियाला निघतात...

इथपर्यंत आपण पिक्चर कसाबसा सहन करु शकतो ...
त्यानंतर जो मुर्खपणाचा कळस सुरु होतो त्याला तोड नाही आणि उत्तर तर नाहीच नाही ...

त्या प्रवासाच्या दरम्यान ह्या २ अर्धवट गाढवांचे तिकीट दुसर्‍याशी अदल्याबदल झाल्याने ते इजिप्तला जातात व तिकडे "पटकथेच्या मागणीनुसार" त्यांना "सोनिया [ कतरिना कैफ ] " भेटते. आता हे इजिप्तला कसे जातात? त्यांना सोडते कोण ? तिकडे त्यांची व्यवस्था काय ? व्हिसाचे काय ?असले मला पडनारे क्षुल्लक त्यांना पडत नाहीत व ते त्याची काळजीही करत नाहीत। असो. त्यानंतर त्यांना मधीच आठवते की आपल्याला तर ऑस्ट्रेलियाला जायचे होते, मग पुन्हा गाडी ऑस्ट्रेलियात पोहचते व ह्यापुढचा समस्त गाढवपणा, हैदोस, पाचकळपणा हा ऑस्ट्रेलिया ह्या देशी घडतो [ व आपल्याला मस्त "देशी" पिऊन शांत झोपावे अशी इच्छा होते ]....
तर होते काय की ह्या गडबडीत त्या खर्‍या "किंग उर्फ लक्की" वर पुन्हा एक हल्ला होऊन तो जायबंदी होतो व त्यांच्यासमोर आता आपला नेता कोण हा प्रश्न पडतो. दुसरे कोणी "लायक" न सापडल्याने पुन्हा एकदा "पटकथेच्या मागणीनुसार" हे लोक "हॅप्पी सिंग उर्फ अक्षयकुमारला" नवा किंग म्हनुन घोषीत करतात. मला नाही झेपला हा प्रकार. ४ शब्द सरळ बोलता येत नसलेला, अक्षरश : अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश हा "हॅप्पी सिंग" कुठल्या कर्तुत्वाने "किंग" होण्यास लायक होतो. फक्त डोक्यावर पगडी हा नॉर्म असेल तर "हरभजसिंगने" काय घोडे मारलेय ? [ तसा तो पण थोडा अर्धवट आहे म्हणा पण तो आपला विषय नाही.]

आता आम्ही सावरुन बसतो, डोक्याने अधु ब बुद्धीने अर्धवट असलेला "हॅप्पी" त्याच्या अंगच्या गुणामुळे काही तरी धमाल उडवुन देणार व ज्यासाठी आपण एवढे रुपडे मोजले तो "अफाट विनोदी शिन्स" पहायला भेटणार ...
पण नाही। सगळे मुसळ शेवटी केरातच !

पण मुळात गुंडगिरीला विरोध असणारा हॅप्पी हा किंग झाल्याझाल्या एकदम "बापु, भय्या, अम्मा, महाराज" टाईप वागायला लागतो व कुत्र्याचे वाकडे शेपुट सरळ [ म्हणजे त्या गुंडांना सुधरवायच्या ] करायच्या मागे लागतो। त्याला संधीही तशी मिळते. आरंभीच्या त्याच्या ऑस्ट्रेलियात हलाखीच्या काळात म्हणजे जेव्हा " लक्की खाऊ घालीना व पगडी भीक मागु देईना" अशी परिस्थीती असते तेव्हा त्याला मदत करणार्‍या [ फुलाचे दुकान चालवणार्‍या ] एका बाईच्या पोरीच्या सुखासाठी एक नवे नाटक तो उभारायचे ठरवतो. त्याच्या सुदैवाने [ व आपल्या दुर्दैवाने] ती कन्या म्हणजे खुद्द "सोनिया" निघते। आता बोला ! काय बोलणार, ती तर पटकथेची मागणी, आपण हाताची घडी आणि कपाळावर बोट. त्यात भर म्हणुन ती बरोबर आपला बॉयफ्रेंड "पुनीत [ रणवीर शौरी , तोच तो थप्पडखाऊ अभिनेता. आठवा "अग्ली & पग्ली ". जाऊ दे, कशाला आठवताय, फुकट डोक्याला शॉट ] यालाही बरोबर आणते. मग त्या [ पुर्वाश्रमीच्या श्रीमंत ] बाई ची इज्जत जाऊ नये म्हणुन हा नवा किंग अख्ख्या गँगला एका पोरकट खेळात ओढतो व अख्ख्या पिक्चरचा खेळखंडोबा करतो.

इथुन पुढे मी माझे [ पगडी नसलेले ] डोके चालवण्याचा व वापरण्याचा निष्फळ प्रयत्न सोडला व "दाखविले किंगे तैसेची पहावे, चित्ती असु द्यावे असमाधान" ह्या उक्तीनुसार पुढचा चित्रपट पाहिला ...

नंतर जो प्रेमाचा त्रिकोण आणि त्यासाठीचा त्याग असा भंपक ड्रामा, जिकडे तिकडे फक्त सिंगच , किंग म्हणून कोणीच नाही, सोनिया आणि पुनितचं प्रेमप्रकरण व त्यात हॅप्पीच्या हितचिंतकांची लुडबुड व त्याला हॅप्पीने फटकारणे, काही अगम्य आणि अतर्क्य घटनातुन किंगच्या इरसाल आणि अस्सल गुंड साथ्यांचे मानसीक परिवर्तन, सोनियाला सच्च्या प्रेमाचा साक्षात्कार व तिच्या लग्नाच्या वेळी गोंधळात तिचे गडबडीने तिचा हॅप्पीशी होणार विवाह व तिनेही खेळकरपणे याला दिलेली मान्यता हे विनोद, प्रसंग मला नाही झेपले। मात्र ह्या घोळात पिक्चर "झोपला" हे नक्की ...शेवटी तर असा गोंधळ उडतो की "किंग" कुठेच दिसत नाही , सगळीकडे फक्त आणि फक्त पगडीवाले "सिंग" च दिसतात.त्यामुळे आपली डोक्याची पगडी सटकुन सिनेमागॄहात कुठेतरी हरवते ...

शेवटी एकदाचा [ कसाबसा ] सिनेमा संपल्यावर आपण आपली अकलेची पगडी जी तिकीट काढताना मोठ्ठ्या सन्मानाने घातली होती ती आता कुठे हरवली याचा विचार करत चित्रपटगॄहाच्या बाहेर पडतो।

माझा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला, निर्मात्यांना व कलाकारांना एकच छोटा प्रश्न आहे की " एवढा टाकाऊ, टुकार, भंगार पत्रा लोखंड, पाचकळ, पुचाट सिनेमा तुम्ही कशाच्या जोरावर हिट म्हणता ? पगडी न घालणार्‍या बिनडोक मिडीयाला हाताशी धरुन अवाढव्य उत्पन्नाचे आकडे तोंडावर फेकले की सिनेमा चांगला कसा ठरु शकतो ? पब्लिकचे [ विना पगडेआवाले ] डोके काय पेंड खायला जाते का एवढे उत्पन्न मिळवुन द्यायला ?"

तात्पर्य : हा "सिंग" नावाचा "किंग" आपल्याला चांगलाच "हिंग" लाऊन जातो ...

---[ विना पगडीवाला किंग ] छोटा डॉन