टीप : ह्या लेखात कसलेही साहित्यीक मुल्य वगैरे सापडणार नाही, वेळोवेळी मनात आलेले व्यक्त/अव्यक्त भाव शक्य तितके शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे, काही ठिकाणी जमेल तितकी टवाळकी केली आहे.
तो त्याच्या "उद्योगाला" लागला व आम्ही शांतपणे समोरचे निरीक्षण करु लागलो.
तो त्याच्या "उद्योगाला" लागला व आम्ही शांतपणे समोरचे निरीक्षण करु लागलो.
या आधीचा भाग आपल्याला इथे पहायला मिळेल .....
*******************************************************
समोरच एका टेबलावर एक मस्त "हम २ हमारे २" वाले कुटुंब बसले होते, त्यांची ऑर्डर अजुन आली नव्हती त्यामुळे त्यांचा मस्त टाईमपास चालु होता. ते २ छोटुले मस्तपैकी (काटेरी चमच्याने) अपडाथपडी खेळत होते, त्याआधी बहुतेक त्यांनी "नॅपकिन्सची सुलभ कस्पटे" हा छोटासा वर्कशॉप केला होता असे दिसते आहे. कारण त्याचे छिनविछीन्न अवशेष टेबलावर दिसत होते. नवरा-बायको दोघेही आपापल्या मोबाईलमध्ये डोके घालुन बसले होते, बहुतेक एकमेकांना "समस" करत असावेत, सॉफ्टवेअर इंजिनीयर असावेत लेकाचे, समोरच बसलेल्या व्यक्तीशी पिंग करुन बोलणे ही तिकडचीच सवय.
एका मोठ्ठ्या टेबलावर एक मस्तपैकी "कॉलेज ग्रुप" बसला होता, बहुतेक पार्टी असावी अन्यथा एका दमात एवढे लोक (स्वखर्चाने)"पिझ्झा हट"ला येणे शक्य नाही. त्यांच्यातला "होस्ट" मी लगेच ओळखला, कारण त्याच्या चेहर्यावर जे बॉसने हापीसात अनैतिक काम करताना पकडल्यासारखे भाव असतात ते लगेच ओळखु येतात. मित्रांना पार्टी देणे ह्या प्रसंगाची तुलना एक तर "पगार देऊन स्वतःला शिव्या देण्यासाठी एखादा कोल्हापुरी माणुस नोकरीला ठेवणे" अथवा "उदयनराजेंना आपल्या पक्षात घेणे व रोज त्यांच्याकडुन शिव्या खाणे" ह्यांच्याशीच होऊ शकते, धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही असा हा पार्टीचा प्रकार आहे. गॄपमधल्या काही मुलांचा नैसर्गिक गुणधर्माने पोरींवर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न चालु असल्याचे दिसले, बहुदा मग त्यासाठी काही पाचकळ विनोद ( पक्षी : जे आम्ही करतो ते ) करुन हास्यफवारे उडवणे चालु होते. बहुतेक मुलीही आपले (कॄत्रीम)सौंदर्य बेदाग कसे राहिल ह्याची काळजी घेताना दिसत होत्या, हो ना, नाहितर तोंडाने त्या पिझ्झाच कोरडा तुकडा खाऊन नंतर सारखे इवलाश्या नॅपकीनने व (आपल्याच) कोमल हातांनी सारखे आपलेच नाक, कपाळ व गाल साफ करणे ह्याला काय म्हणावे ?
छे, बर्याच आठवणी जाग्या होतात अशी दृष्ये दिसली की, अशा पार्ट्यांवर एक स्वतंत्र लेखच टाकु असे म्हणत एक दिवस माझा ट्रकभर लेख लिहतो असे ( नुसतेच ) म्हणणारा डाँ. न्या. खैरनार होणार असे दिसतेय.
तिकडे एका जराश्याच लांब असलेल्या टेबलावर "३ देवियाँ किंवा चार्लिज एंजल्स" बसल्या होत्या. त्यातली एक मुलगी खुपच सुंदर आहे असे आमच्या मित्राचे मत झाले. ( अर्थात त्याच्या सुंदरतेच्या संकल्पना ह्या "बिपाशा बासु, कोयना मित्रा, राखी सावंत, तनुश्री दत्ता" इथंपर्यंतच मर्यादीत असल्याने मला त्याचे जास्त आश्चर्य वाटले नाही. अर्थात कुणाला कशाचे आकर्षण वाटावे ह्याचेही काही लिखीत नियम नाहीत, हवे असल्यास तुम्ही "शायनी आहुजा"चे उदाहरण घेऊ शकता). मात्र त्या ज्या पद्धतीने समोरचे अन्न खात कम चिवडत होत्या ते मात्र नक्की रोचक होते, काट्यावर (वजनाच्या नव्हे, तो विषय वेगळा. इथे फोर्क ह्या अर्थाने ) अडकवलेला पिझ्झा आपल्या मानेची, हाताचे, डोळ्यांची आणि केसांची किती कमाल हालचाल करीत किती नाजुकपणे खावा ह्याचे ते एक उत्तम उदाहारण होते. मला त्यातल्या एका मुलीची दर घासानंतर समोरच्या आरश्यात पाहुन केलेली "लिपस्टीकची अॅडजेस्टमेंट" हा प्रकार फारच मनोरंजक वाटला, किती जपतात हो मुली ह्या लिपस्टीकला, पण आवडले ( लिपस्टिक नव्हे तर तो प्रकार, अर्थात लिपस्टिक आवडले असल्याचे आम्ही कबुल करणार नाही हे ही आहेच). खरेतर " ((दिवसा)महत्वाची कामे करताना) लिपस्टिक कसे जपावे?" ह्याचे कोर्सेस निघाले पाहिजेत, खुप फायदा होईल त्याचा ( मला नव्हे, माझ्याबद्दल बोलत नाही मी, मी लिपस्टिक वापरत नाही पण माहिती असलेली काय वाईट हो ?). ज्ञान कधी वाया जात नाही म्हणतात, कुठे ना कुठे त्याच्या "योग्य वापर" होईलच की.
तेवढ्यात आमच्या मित्राने "अरे, हिला पाहिलेस का ? ( येडाच आहे लेकाचा, पाहिल्याशिवाय काय आम्ही सोडतोय का ? ) मी ना हिला क्ष ठिकाणी य बरोबर पाहिले होते. च्यायला बहुतेक आपल्याच ब्लॉकमध्ये रहाते" अशी बहुमोल आणि बिन-उपयोगी माहिती दिली.आता माझ्या ह्या रुममेट मित्राबद्दल ४ शब्द सांगणे महत्वाचे आहे ( ओ अॅडी जोशी, तुमच्या रुमवर झोपायला जागा आहे ना ? मी ८ दिवस तिकडे रहायला येईन म्हणतो ). तो उभा असलेल्या ठिकाणीपासुन १ किमी त्रिज्येच्या परिसरात असणारी प्रत्येक पोरगी त्याने कुठेना कुठे कुणा ना कुणा बरोबर पाहिलेली असते असा त्याचा दावा आहे व दिवसातुन कमीत कमी २० किमी गाडी पळवणे हा त्याचा प्रण आहे. थोडक्यात आख्ख्या बेंगलोरमध्ये त्याने "क्ष" मुलगी व ती पण "य" ह्या ठिकाणी पाहिली नाही ह्या दोन्हीही शक्यता शुन्य आहेत कोणी असा दावा करत असल्यास सरळसरळ तो झरदारी अमेरिकेला मारतात तशा बिनबुडाच्या थापा मारतो आहे हे लक्षात घ्या. आम्हाला फक्त काळजी जेव्हा तो स्वतःच्या लग्नासाठी "मुलगी पहायला" जाईल त्या वेळची आहे कारण खासकरुन आपण "वेगळ्याच कारणासाठी" मुलगी पहात आहोत हे जर त्याच्या लक्षात नाही तर मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. असो, खुप विषयांतर ( केले किंवा ) झाले.
इथे आम्हाला एक सुपरिचीत दृष्यही दिसले, आपल्या पुण्यात कसे सणासुदीला लोक पारंपारिक पोषाख घालुन, नटुन थटुन सहकुटुंब सहपरिवार असे जे.एम. रोड अथवा तत्सम ठिकाणी हॉटेलात जेवायला जातात व "पंजाबी डिशेस" खातात तसेच इथे एक "कुटुंब" पिझ्झा पार्टी झोडायला आलेले दिसले. कुटुंब हे अक्षरशः कुटुंब होते, म्हणजे पार आजोबा-आजींपासुन ते नातवापर्यंत. काळ फारच वेगाने बदलत चालला आहे खरा, बेंगलोरसारख्या सायबर सिटीत तर फारच वेगाने. आश्चर्य म्हणजे आजोबा मस्तपैकी ऑथेंटिक पद्धतीने पिझ्झा काटा-सुरी वापरुन खात होते, आमची अपेक्षा होती की ते राईस-रस्सम सारखे मस्तपैकी काला करुन खाणार. आज्जीची थोडी पंचाईत झाल्यासारखी दिसत होती पण नातु तिला मदत करताना दिसला व हे दॄष्य फारच आवडले , खरेतर हेवा ही वाटला, खोटे कशाला बोला ?त्यांना घेऊन येणार्या त्या घरातल्या "कर्त्या पुरुषाच्या" चेहर्यावरच्या भावांची शब्दात ओळख करुन देणे मला शक्य नाही, माझ्यापुरता प्रश्न म्हणजे " त्या सुखी माणसाचा सदरा त्याने कुठुन घेतला" असा होता. ह्याचेही उत्तर खचितच एवढे सोपे नाही.
बाकी काय इतर दृष्ये नॉर्मल होती, बहुसंख्य पिझ्झा खाण्याच्या कम (लिमीटेड) एकांतात गप्पा मारण्याच्या हेतुने आलेली कपल्स होती, ते आपल्या सुखात दंग होते. त्यांच्या भावनांचा लिखाणाद्वारे बाजार मांडुन त्यांच्या ज्या काही असतील त्या भावनांचा अपमान करण्याचा माझा इरादा विचार नाही ( न जाणो त्या घोळात मी ते अनुभव माझ्या शब्दात लिहताना गाफीलपणे एखादे नाव घेउन बसायचो व नंतर पंचाईट होऊन बसायची ).
बाकी इतर "आम्ही पिझ्झा हटमध्ये येऊन पिझ्झा खातो, आय कॅन अॅफोर्ड इट ...!" असे आव आणुन बसलेले महाभागही होते, ह्या भावनाही पटकन चेहर्यावरुन व बॉडीलँग्वेजवरुन वाचता येतात. वारंवार वेटर्सना त्रास देणे, मोबाईल खेळवत बसणे, चेहर्यावर कुत्रे खाल्यासारखे किंवा शिष्ठ भाव ठेऊन समोरच्याला उत्तरे देणे वगैरे कॉमन लक्षणे.त्यांचेही काही खास नाही.
अजुन एक म्हणजे "जाहिरातीतील कुटुंबे" सुद्धा दिसतात, वयाच्या मानाने जरा जास्तच अवखळ आणि अल्ट्रा मॉडर्न लहान मुली, त्यांचे डोक्यात जाणारे फालतु लाड व कौतुके, जणु त्या लहान मुलीची मोठ्ठी बहिणच आहे असा आव आणणार्या व इतरांचे लक्ष वेधुन घेण्याच्या पराकाष्ठा करणार्या अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या त्यांच्या आया व त्यांचे कॄत्रीम लाडेलाडे बोलणे आणि हे सर्व हतबलतेने अथवा कौतुकाने पाहणारा त्यांचा हतबल अथवा मुर्ख नवरा ...
चालायचेच.
मात्र एका गोष्टीचे जरुर कतुक करु वाटते ते म्हणजे तिथल्या "टेक अवे काउंटरवरचा डिलेव्हरी बॉय ( तोच तो , आम्हाला फुक्कट पेप्सी दिलेला)", ज्या चपळाई व सहजतेने तो बर्याच गोष्टी अगदी सफाईने हाताळत होता ते पाहुन कौतुक वाटले. रांगेत उभे असलेल्यांच्या ऑर्डरी देणे, नव्या ऑर्डरी घेणे, फोनवरची ऑर्डर व त्यांची लफडी ( पक्षी : आमच्यासारखी ) निस्तारणे, पैशाचे हिशिब संभाळणे, कुणालाच दुर्लक्षीत न करता सर्वांना महत्व देणे, कंटाळलेल्या एखाद्या लहान मुलीला फुगा फुगवुन देणे, जाणार्या येणार्या गिर्हाईकांना योग्य ट्रिटमेंट देत अभिवादन करणे ...
क्लासच, त्याचे जरुर कौतुक आहे...
एकंदर संध्याकाळ मस्त गेली, फार नाही पण जास्तीत जास्त २० ते २५ मिनीटांची कथा आहे ही.
गर्दीतला स्वतःच्या विश्वात मग्न असणार्या, काही वेळा आपल्या भोवतालच्या विश्वात आपण कसे दिसु याची काळजी घेणार्या, गाफील असणार्या किंवा कमालीचा सावध असणार्या, लहान मुलाची निरागसता घेऊन वावरणार्या तर कधी पराकोटीचा धुर्तपणा बाळगणार्या, एखाद्या मोठ्ठ्या गॄपमध्ये एकटे असणार्या तर कधी एकटेच बसुन स्वतःच्या मनातल्या आठवणींच्या गर्दीत भान विसरुन हरवुन गेलेल्या अशा सर्व "सामान्यातल्या असामान्य क्षणांची व भावनांची" ही कहाणी.....
"गर्दीतला माणुस" हे फारच अतर्क्य आणि अनप्रेडिक्टेबल रसायन आहे असे आमचे मत आहे ...
जाता जाता हे सर्व करत असताना ऐकलेले "राहत फतेह अली खान" चे एक अप्रतिम गाणे
बासच ...!!!!" कहने को साथ आपने एक दुनियाँ चलती है,पर छुपके इस मन मे एक तनहाई पलती है ...."
शेवटी ( वाचकांच्या दृष्टीने काडीइतकी किंमत नसलेला ) आमचा पार्सल पिझ्झा आला व ते घेऊन आम्ही परत आमच्या फ्लॅटवर आलो ...
अवांतर :
जाता जाता पिझ्झा हट प्रशासनाला काही मुलभुत प्रश्न :
१. पिझ्झा हटमध्ये "इंग्रजी" न बोलल्यास शिक्षा म्हणुन पैसा डब्बल घेऊन पिझ्झाच्या बदल्यात आमटी-भात खाऊ घालण्याची शिक्षा आहे का ?
२. नोकरभरती करताना "त्यांचे बोलणे आम्हाला कळत नाही व आम्ही काय म्हणतोय ते त्यांना कळत नाही" अशी नॉर्थ्-इस्टची पोरं भरती करण्यामागचे रहस्य काय आहे (अर्थात माझा मुद्दा हा प्रांतिक विरोधाचा नाहीच )? कमीत कमी त्यांना स्थानिक भाषा अथवा कमीत कमी इंग्रजी/हिंदीचा स्थानिक अँक्सेंट यांचे ट्रेनिंग कधी देणार ? का ह्या सर्व गोष्टी आपल्या "ग्राहक समाधान व सोईसुविधा" ह्यांच्या कक्षेत येत नाहीत.
एक किस्सा : मागे पुण्यात असल्याच एका प्रकाराला वैतागुन आमच्या एका मित्राने त्या नॉर्थ-इस्टच्या मुलीशी चक्क शुद्ध मराठीतुन प्रश्नोत्तरे करायला सुरवात केली, तीने "तुम्ही काय म्हणताय ते मला समजत नाही" हे सांगितल्यावर त्याने " बरोबर आहे तुझे, माझेही काहीसे असेच होते आहे" असे सुनावले होते ।
३ . गर्दीच्या वेळी दारात उभा असणारा पिझ्झा हटचा कर्मचारी हा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमला असतो की गोंधळ वाढवण्यासाठी ?कमीत कमी २ वाक्ये त्याला व्यवस्थित बोलता यावीत हे महत्वाचे नाही का ?
कैच्या कै अवांतर :
एका गोष्टीसाठी वाचकांची माफी मागतो, लिहण्याच्या ओघात "टवाळकी" मधुन मध्येच लेख "सिरीयस" कसा झाला ते कळालेच नाही. अर्थात माझ्या मते ह्यात चुक काहीच नाही, हा परफेक्ट शेवट आहे. पण जर कुणाचा अपेक्षाभंग झाला असेल तर माफी असावी ...
आजकाल बर्याच वेळा "हास्य ओठात साठलेले, जाते कुठे सांग ना.. आश्रु नजरेत साचती कसे सांग ना!!" असे होत आहे, कशामुळे ते माहित नाही, बहुतेक काहीतरी बिघडलेले आहे नक्की.असो.
धन्यवाद ..!!!
3 comments:
पिझ्झा हटची पंचवीस मिनिटे छान आहेत.
जास्त आवडले ते शेवटचे ....
हास्य ओठात साठलेले, जाते कुठे सांग ना.. आश्रू नजरेत साचती कसे सांग ना!! ..........भापो.
Good one!
आमच्या भागात एक नविन पिझ्झा चे दुकान उघडले आहे.
काल तिकडे पार्सल आणायला गेलो होतो. तिथली काही निरिक्षणे.
१) बहुतेक लोक हे हातात २५% सवलतीची ची कुपने घेउनच आले होते. म्हणजे बहूदा सवलतीत आहे तेंव्हा खाऊन बघू काय आहे ते हा भाव चेहेर्यावर होता.
२) नवश्रीमंत (बहुतेक IT मधले) कुटुंब, नवरा, (न शोभणय्रा जीन्समधली, मोठी टिकली व भले मोठे मंगळसुत्र घातलेली) मॉडर्नपणाचा आव आणणारी बायको.
३) आपण जणू रोजच पिझ्झा खातो असा आव आणत (प्रत्यक्षात : भाव खोटे आहेत हे कळत होते) ऑर्डर देणारे लोक.
४) अगदी घरगुती, सोज्वळ काकू, हा काय नवीन प्रकार आहे ते एकदा पाहू म्हणून आलेल्या.
ह्या सगळ्या प्रकारात मी एकटाच बहुदा कोणतीही सवलत न घेता, पार्सल घेऊन जाणारा असेन.
अनिकेत वैद्य.
Post a Comment